फ़ेक ब्लॉगिंग ह्या विषयावर एका लेखाच्या निमित्ताने माहिती जमवत असतानाच मराठी ब्लॉगिंग विश्वात कोणा एका संवादिनी नामक ब्लॉगरवर अशाच स्वरुपाचा आरोप केला गेल्याचे दृष्टीस पडले हा योगायोगच. त्या आरोपात तथ्य असेल किंवा नसेलही. इंग्रजी ब्लॉगर्सच्या विश्वात फ़्लॉगर्सच्या सुळसुळाटामुळे मधल्या काळात बराच गदारोळ होऊन गेला. फ़क्त व्यावसायिक कारणांसाठीच फ़ेक ब्लॉगिंगचे तंत्र वापरण्यात येते ह्या आत्तापर्यंतच्या समजाला एअरहोस्टेस डायरी किंवा स्टीव जॉब्जच्या पर्सनल फ़ेक ब्लॉग्जमुळे जोरदार तडा गेला आणि वैयक्तिक स्वरुपाच्या म्हणजे डायरी टाईप लिखाण करत असलेल्या ब्लॉगर्सच्या विश्वासार्हतेला जो धक्का बसला त्याचे पडसाद मराठी ब्लॉगविश्वातही उमटावेत ह्यात तसे पाहता नवल नाही. मराठीत खूप दर्जेदार,सातत्याने लिहिणारे अनेक ब्लॉगर्स आहेत. जसे कौस्तुभ, नंदन,संजोपराव,कोहम,संवेद,अभिजित,प्रियमभाषिनी,गायत्री,ट्युलिप,अजानुकर्ण,मेघना,यशोधरा,गणेश मतकरी,संगीता,पराग,शिरवळकर. सर्वांनाच आपापला वाचकवर्ग आहे. पण सर्वात जास्त फ़ॅन फ़ॉलोईंग वैयक्तिक स्वरुपाच्या लेखनाला आहे हे वेगळ सांगायला नको. मराठीत वैयक्तिक डायरी टाईप ब्लॉगिंग मधल्या काळात खूप प्रमाणात झाले. ट्युलिप सारख्या सिनियर ब्लॉगर्सनी आपल्या सुरुवातिच्या काळातले लेखन तसेच केले होते. त्या लेखनाला उत्कृष्ट ललित दर्जा होता आणि त्याला जबरदस्त फ़ॉलोईंग मिळाले. आता तिने लिहिणे कां थांबवले कळायला मार्ग नाही पण त्या ब्लॉगला मिळालेल्या प्रसिद्धीने आणि पुरस्काराने प्रोत्साहित होऊन अनेक त्या स्वरुपाचे ब्लॉग्ज उगवले होते मधल्या काळात ही सुद्धा चांगलीच गोष्ट होती. पर्सनल लिखाणात वाचक गुंतत जातात. त्यांच्या भावनांना आवाहन करणारे साहित्य तेही मातृभाषेतून सामोरे आले की आपल्यासारखाच/सारखीच कोणीतरी आपल्याच भावना शब्दबद्ध करतेय ही जाणिव हे गुंतणे वाढवत नेते. अर्थातच त्याप्रकारचे लेखन सातत्याने करत राहणे सोपे नसते आणि ते जेन्युईनली करणे ज्यांना जमत नाही अशा नव्या ब्लॉगर्सना फ़ेक ब्लॉगिंग करण्याचा मोह होऊ शकतो हे समजण्यासारखे आहे. मराठी ब्लॉग विश्वात आज ना उद्या हा प्रश्न चर्चेला येणारच होता. यायला हवाच होता. आपापल्या ब्लॉगवर काही लिहिले तरी तो ज्याचा त्याचा प्रश्न असा आजपर्यंत एक समज होता. पण वाचकांची त्या ब्लॉग्जमधे होत असलेली भावनिक गुंतवणुक लक्षात घेता हा प्रश्न संपूर्ण वैयक्तिक स्वरुपाचा राहूही शकत नाही. इंग्रजीतील फ़ेक ब्लॉगिंगच्या घटनांवरुन तर तसे सिद्धच झाले आहे. फ़्लॉगर्सना अटकाव होणे आता फ़ारसे कठिण राहिलेले नसले तरी वैयक्तिक स्वरुपाच्या ब्लॉग्जच्या बाबतीत तसे सिद्ध होणे खूपच कठिण होऊन बसते. मराठी वाचकांचा भावनेच्या लोंढ्यात वाहून जाण्याचा प्रकार बघता तर इथे तसे सिद्ध करणे अशक्यच. संवादिनीच्या ब्लॉगचे जेव्हां ऍट वन गो वाचन केले तेव्हां त्या अनामिकांच्या अथवा जुहि दिक्षितच्या म्हणण्यामागचा रोख काय आहे आणि कां ते सहज लक्षात आले, पटलेही आणि तरी काही वाचकांचा ते मान्य करायला असलेला आक्षेपही सहज समजून आला. कारण आता ते त्यात गुंतून गेले आहेत. तरीही मेलोड्रामा न करता तटस्थपणे विचार करुन मग वाचकांनी प्रतिक्रिया द्यायला हव्यात. तसे होताना दिसत नाही. वाचकांना लिखाण आवडले तर ते जेन्युईन आहे की ती एक रचलेली कथा आहे ह्याला महत्व देण्यात कितपत तथ्य आहे हा विचार फ़्लॉगर्सच्या बाबतीत वेगळे स्वरुप धारण करतो. कांदबरी असल्यास तसे निदान मेन्शन करणे नैतिकदृष्ट्या जबाबदारिचे मानले जावे असे मला वाटते. वैयक्तिक स्वरुपाच्या लिखाणातली वाचकांची भावनिक गुंतवणूक लक्षात घेतली तर नैतिकदृष्ट्या हा शब्द महत्वाचा ठरतो.
मराठी ब्लॉग कम्युनिटी ही दिवसेंदिवस विस्तारत जाणारी आहे. भल्या वाईट सगळ्याच गोष्टी इंग्रजी ब्लॉगिंग प्रमाणे इथेही घडत रहाणार हे गृहितच आहे. शक्य असेल तर सर्वांनीच आपली ह्याबाबतीतली मते मांडावीत.
तळटिप: वरील राईट अप मधे व्यक्त केलेले विचार हे कोणत्याही प्रकारे कोणावरही आरोप करणारे नाहीत.
Thursday, July 31, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
शमा, संतुलित शब्दांत मांडले आहेत विचार. मला आवडली ही पोस्ट. स्वतःच्या ब्लॉगवर काय किंवा एखाद्या संस्थळावर काय, लिहिताना तारतम्य हे बाळगायला हवच, आणि वाचकांची भावनिक गुंवणूक होते, वगैरे हे मुद्देही काही अंशी पटले. पण, मला वाटतं की वाचकांनीही आपली सारासार बुद्धी वापरुनच या लेखनाकडे पहायला हवं. कोणताही ब्लॉगर काही तुम्हांला आमंत्रण द्यायला येत नाही, की या, अन् माझा ब्लॉग वाचाच म्हणून... आपल्याला एखादा ब्लॉग आवडत नसेल, पटत नसेल, झेपत नसेल तर नाही वाचू! जबरदस्ती तर नसते ना?? पण, एकतर जाऊन वाचायचं, वरुन आवडत नाही, असच का अन् तसच का, यावर नेहमी कुत्सित शेरेबाजी करायची हेही काही बरोबर आहे, असं नाही! लिहिणार्या व्यक्तीला किंवा ब्लॉगरला ही तिच्या/ त्याच्या ब्लॉगवर हवं ते लिहायची मुभा आहेच की! वाचकांनी काय घ्यायचं, कितपत गुंतायचं हे वाचकांवर अवलंबून आहे! लिखाण खरं की खोटं हा तर वेगळाच मुद्दा आहे, कितपत योग्य आहे, ठाउक नाही... एखाद्याने आपल्या आयुष्यातल्या सत्य गोष्टीच लिहाव्यात, असा आग्रह तरी का?? काय होणार आहे सत्य समजून घेऊन? असे किती तरी फाटे फुटतील.... जोपर्यंत व्यक्ती 'अ' आपल्या ब्लॉगवर अस काही लिहित नाही, ज्यामुळे व्यक्ती 'ब' ला काही त्रास होतोय किंवा बदनामी होतेय वगैरे, तोपर्यंत 'ब' ला 'अ' चय लिखाणाबद्दल असच का लिहिलं अन् तसच का लिहिलं असे आक्षेप घ्यायचा कितपत अधिकार?? असो.
विचार मांडायची संधी दिल्याबद्दल थँक्स :)
फ्लॉगर्स हा प्रकार ठाऊक नव्हता. परंतू एखादा ब्लॉग हा व्ययक्तीक स्वरूपाचा असेल आणि पुढे तो फेक ब्लॉग आहे असे समजले तर मी तो वाचायचा सोडून देईन.
मला जे वाटलं ते यशोधराने चांगले मांडले आहे. माझ्यामते ब्लॉग वर लेखक काहीही लिहीत असेल, तो त्याचा प्रश्न आहे.. सत्य घटना,वैयक्तिक आयुष्यातल्या वगैरे फिक्शन म्हणून मांडणं काय, किंवा उलटे, काय फरक पडतो त्याने? लेखकाला या दोन्ही गोष्टी करायचा अधिकार आहे. हं आता त्या लेखनाबद्द्ल एखादी गोष्ट नाही आवडली तर वाचक फारफार तर सुचवू शकतो..तो बदल, लेखकाने केलाच पाहीजे असेही बंधन नाही.. पण मूळात लेखकाने काय लिहावे,खरंच किंवा खोटंच लिहावं हे सांगण्याचा अधिकार नाहीये त्यांना.. अजिबातच नाही! त्यामुळे मला हे नाही पटले की लिहीताना लेखकाने वाचकांची भावनिक गुंतवणूक वगैरे विचार करून लिहावं.. नाही पटलं.. ब्लॉग हा वैयक्तिक डायरीचाच भाग आहे,फक्त तो सगळ्यांना दिसतो.. दॅट्स इट! त्याने तिथे काय लिहावे हा त्याचा टोटली वैयक्तिक प्रश्न!
बाकी मी खूप इंग्लिश ब्लॉग्स वाचत नाही, त्यामुळे फ्लॉगींग बद्दल काही कल्पना नव्हती.. ते काय ते आता समजले.. :)
एखाद्याने आपल्या आयुष्यातल्या सत्य गोष्टीच लिहाव्यात, असा आग्रह तरी का?? काय होणार आहे सत्य समजून घेऊन? >>> यशोधरा मला वाटतं तसा आग्रह कोणीच धरत नाही आहे.प्रश्न आहे त्या गोष्टी स्वत:च्या आयुष्यातल्या सत्य गोष्टी आहेत असा वाचकांचा समज करुन देण्यात.बरेचदा असे होते की कथा कादंबरीच्या दृष्टीने जे लेखन तद्दन भुक्कड म्हणून वाचक दूर सारतो तेच लेखन कोणी माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी खर्या घडत आहेत असं सांगून केले तर वाचकाला ते आकर्षक वाटू शकते.त्या लेखनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आपोआप.फ़्लॉगर्स फ़ायदा उठवतात तो वाचकांच्या ह्याच मेन्टलिटीचा.
एखादा ब्लॉग हा व्ययक्तीक स्वरूपाचा असेल आणि पुढे तो फेक ब्लॉग आहे असे समजले तर मी तो वाचायचा सोडून देईन >>>> पर्सनली मी स्वत: सायलेन्स च्या मताशी संपूर्ण सहमत आहे.
आभार सर्वांचे.
बऱ्याच दिवसात मासिकांमधे, वर्तमानपत्रामधे आपला लेख वाचनात आला नाही.
Post a Comment