Saturday, August 19, 2006

Land of thunder dragons : Bhutan


थिम्फूच्या त्या आयताकृती, दगडी फरसबंदी घातलेल्या, रस्त्याच्या एका अंगाला बर्‍याच खालच्या पातळीवर असणार्‍या चौकात एका थंडगार, काळ्या, दगडी बाकावर मावळत्या संध्याकाळी भुतानचं ते आत्तापर्यंत फक्त national geographicच्या अंकांमध्ये किंवा discovery chanel वर पाहिलेले गूढ, अध्यात्मिक आणि अलौकिक सौंदर्य आम्हाला वेढून टाकत होते. दगडी चौकाच्या मागच्या अंगाला लागून असलेली छोटी दुकाने कागदी आकाशदिव्यांच्या सौम्य प्रकाशात आणि विशिष्ट वासाच्या उदबत्त्यांच्या आणि धुपाच्या वलयांमधे गुरफटून शांत उभी होती. लाल, सोनेरी नक्षीकाम केलेले कापडी फलक, ज्यांवर खर्‍या सोन्याने त्या गुढ भुतानी लिपीमधे काही प्रार्थना चितारलेल्या असतात, अगम्य चेहर्‍याचे मुखवटे रंगवलेले असतात ते आणि आपल्या मनातल्या इच्छा मृतात्म्यांपर्यंत पोचवण्यासाठी वार्‍यावर लहरत लावलेल्या त्या फिक्या आकाशी, गुलाबी रंगांच्या कापडी त्रिकोणी पताका, पितळी नक्षीकाम केलेली अजस्त्र लंबगोलाकार प्रार्थना चक्रे चौकाच्या मधोमध होती. लाल, तपकिरी किंवा निळ्या जांभळ्या चौकटींची पारंपरिक वस्त्रे परिधान केलेली भुतानी माणसे मधुनच ती चक्रे तोंडाने काहीतरी पुटपुटत हलक्या हाताने फिरवून जायची. चौकातली गुढ शांतता तेव्हा जास्तचं गडद व्ह्यायची. वरच्या अंगाला वाहता रस्ता होता पण त्यांवरची वर्दळ, पारंपरिक वस्त्रेच परिधान केलेल्या भुतानी तरुण तरुणींचे घोळके ह्यांचा कोणताच आवाज खाली झिरपत नव्हता.

रस्त्याच्या किनारीला लागूनच बर्च, फर वृक्षांच्या रांगा थेट हिमालयाच्या अजस्त्र उतारांपर्यंत जाऊन भिडल्याचे इथून फक्त भास होत होते कारण मधोमध संध्याकाळच्या अंधारात मिसळून गेलेले धुके वातावरण अस्पष्ट आणि धूसर बनवत होते.

जायगाव ह्या भारताच्या हद्दीतील शेवटच्या गावापासून भुतानच्या ह्या राजधानीच्या शहरात येण्यासाठी आज पहाटेच बसने सुरु केलेला, सलग ७ ते ८ तासांचा प्रवास फारसा काही सुखावह झालेला नव्हता. भीषण पर्वतराजींना उभं कापत आमची बस जेव्हा वरवर जात होती तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त लाल मातीचा धुरळा, दगडमातीचे ढीग, क्रेन, गर्डर्सचा आवाज, डीझेलचा वास आणि हातात कुदळ, फावडी घेतलेले नेपाळी तोंडावळ्याचे मजूर, त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले भारतीय सैन्याच्या अखत्यारीतले जवान, त्यांच्या गाड्या हेच दृष्य सतत दिसत होते. भुतान सरकारचे रस्ते बांधणीचे काम भारतीय सरकारच्या मदतीने जोरात सुरु होते बहुधा पण त्याचा आम्हाला त्रासच झाला. बस अगदी हळू वेगाने तरीही गचके खात चालली होती, वाटेत थांबून कुठे पाय मोकळे करण्याइतकी किंवा चहा पिण्याचीही सोय नव्हती. दूर नजर लावली तर रस्त्याला लागून असणार्‍या, थेट पाताळापर्यंत जाऊन भिडल्या आहेत अस वाटणार्‍या खोल दर्‍या एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला आकाशात टोकं घुसवलेल्या पर्वतरांगांचे कातीव कडे. ह्या सार्‍याच प्रवासाने आम्हाला भुतानच्या आत्ता नजरेसमोर दिसणार्‍या गुढ, शांतगंभीर सौंदर्याला सामोरे जाण्याची काहीच मानसिक तयारी करुन घेतलेली नव्हती. अचानक सामोरे आलेल्या भुतानने आत्ता आम्हाला ज्याप्रकारे चकीत करुन सोडले होते, काहीशी तशीच स्थिती ऐंशीच्या दशकात जेव्हा भुतानच्या देवभुमीवर पाय ठेवायची संधी बाहेरच्या जगातील लोकांना मिळाली तेव्हा तेही भारावून गेले. इथले सौंदर्य खर्‍या अर्थाने अनाघ्रात होते. १७व्या शतकात इथे आलेला बौद्ध धर्म खोलवर इथल्या मातीत रुजलेला होता. प्राचीन परंपरा, रितीरिवाजांचे पालन इथले लोकं श्रद्धेने करत होते. भुतानमधे राजघराण्याची सत्ता अजून सक्रीय आहे. इथे अजुनही वैयक्तिक प्रवासाला परवानगी नाही. इथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर भुतानी सरकारचे कडक नियंत्रण असते. भुतानचा ठराविक भागच लोकांना पहाता येतो. सारे जग पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आकर्षक क्लुप्त्यांचा वापर करण्यात मग्न झालेले असताना अजूनही भुतान सरकारचे पर्यटकांच्या संख्येवरचे हे नियंत्रण चकीत करुन सोडते. पण फक्त ह्याच बाबीत भुतानचे वेगळेपण नाही. ते अनेक गोष्टींत दिसून येते. तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या वापरावर अथवा त्याच्या विक्रीवर कायदेशीर मनाई आणणारे जगातले हे एकमेव राष्ट्र. पर्वतशिखरांवर चढायला मनाई असणारेही हे एकच राष्ट्र. अर्थात ह्या सार्‍या मनाईमागे इथल्या विलक्षण देखण्या आणि आगळ्या निसर्गाचे संरक्षण हा एकमेव हेतू आहे. त्याला धर्माचे अधिष्ठान दिलेले आहे. इथला निसर्ग हा त्यांच्या दृष्टीने केवळ बर्फाची शिखरे, रंगित फुले पाने, झाडे, प्राणी नाही, तर देव आणि पवित्र आत्मे ज्यांत वास करतात ते ठिकाण असते. त्यामुळे त्यांच्या शांतीला कोणत्याही प्रकारे धक्का बसू न देणे ह्याला भुतानी लोकं श्वास घेण्याइतके महत्व देतात आणि जपतात.

भुतानमधे फिरताना इथल्या निसर्गसौंदर्यातला अपार्थिवपणा, इथल्या वातावरणातला दैवी भारलेपणा म्हणूनच जाणवत रहातो. निसर्गातल्या त्या अज्ञात शक्तीपुढे आपण आपल्याही नकळत नतमस्तक होत जातो.

इतकी वर्षे फक्त म्हणूनच तत्वज्ञ, चिंतक, यात्रेकरुंचाच स्पर्श झालेल हे ठिकाण. मन:शांती, एकांत, गूढ अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात असलेल्यांना कायम खुणावत राहिलेलं. पण सहज प्रवेश मिळू न शकणार हे स्थान. आजही इथे येणारे एकतर इथल्या सरकारचे पाहुणे म्हणून नाहीतर राजघराण्याचे आमंत्रीत म्हणूनच इथे येऊ शकतात. भारतीय प्रवाशांना व्हिसा लागत नसला तरी लेखी कायदेशीर परवाना आणि समुहातच प्रवास करण्याची अट पाळावी लागते.
थिम्फू मधे खरेदी करण्याचा अनुभव मात्र केवळ अजब होता. कुठल्याही पौर्वात्य देशात पर्यटकांसाठीच असलेल्या खास दुकानांमधे असतात ते सगळे exotic आणि अर्थातच प्रचंड महाग आणि खरेदी केल्या केल्या आपल्या निरुपयोगीपणाची खात्री पटवणारे त्यांमधे खच्चून भरलेले होतेच. पण खास भुतानचे वैशिष्ट्य असे रेशमी भरतकाम केलेली हातमागाचे स्कार्फ्स, स्टोल्स, कुर्ते, किंवा त्यांच्या त्या लाल, निळ्या, सोनेरी कॉम्बिनेशनमधे हाताने विशिष्ट धार्मिक पुराणांतील चेहरे, प्राणी, dragonच्या आकृत्या काढलेले कापडी फलक, नाहीतर एकातएक घट्ट बसणारे दोन अर्धगोल. जे बंद करुन हलवले की त्यांतून छान मंजुळ नाद यायचा अशा काही वस्तु खरेदी करायला आपण त्या दुकानांमधे पाऊल ठेवले की ग्राहकांबाबतच्या उदासिनतेची एक मोठीशी लाटच आपल्या अंगावर चालून यायची. विक्रेती (९९ % स्त्रियाच) जागची ढीम्म हलायचीही नाही. भाषेचा अडसर असायचा पण चेहर्‍यावर आमच्याकडे तुम्ही खरेदी करायला आला आहात ह्याचा उत्साह कणभरही नाही. उलट नाही घेतलेत काही तर बरेच असाच भाव वागणुकीत. डॉलरच्या मोहात असल्याने भारतीय ग्राहकांकडे दुर्लक्ष करतात म्हणावे तर परदेशीही बरेचदा दरवाजांतूनच वस्तूंची चौकशी करुन पुढे जाताना दिसायचे. भुतानच्या एका प्रसिद्धी पत्रकात लिहिले होते की आम्ही GNP कडे नाही तर GNH वाढवण्याकडे लक्ष देतो. Gross National Happiness. ह्या स्वमग्न, निरिच्छ मुद्रेने जागेवर बसून दुकानातून परस्पर बाहेर निघून जाणार्‍या गिर्‍हाईकांकडे बघूनही काही हालचाल न करणार्‍या विक्रेत्या स्त्रियांकडे पाहून त्यांचा happiness Index बहुधा असाच भरभर वर चढत असणार. बुद्ध धर्म इथे इतका खोलवर झिरपला आहे की भुतानी स्त्री पुरुषांच्या चेहर्‍यावरही बुद्धाचेच ते निरिच्छ, मंद स्मीत सतत विलसतच असते हे मात्र खरे.


भुतान ह्या शब्दाचा संस्कृतमधे अर्थ भू-उत्तन अर्थात वरची जमीन. अजून एक अर्थ म्हणजे तिबेटचा शेवट किंवा दक्षिण तिबेट. भुतानी भाषेत मात्र भुतान ला ड्रक-यूल म्हणजेच land of thunder dragons म्हणतात. जेमतेम साडेपाच लाख लोकंसंख्येच्या भुतान मधे पन्नास हजारावर लोकंसंख्या एकट्या थिम्फू ह्या राजधानीच्या शहरातच सामावली आहे. थिम्फू शहर आम्ही बहुतेककरुन पायी चालतच पाहीलं. झाडांच्या रांगांनी सजलेले रस्ते, दोनमजल्यांपेक्षा जास्त उंची कोणत्याच घराची अथवा हॉटेलची नव्हती. सर्व इमारतींच्या खिडक्या आणि दारांच्या लाकडी चौकटी वैशिष्ट्यपुर्ण लाल, निळ्या, पिवळ्या नक्षीने नटलेल्या. रस्त्यांवर कुठेही वाहतुकीचे सिग्नल असलेले खांब नाहीत. आणि प्लास्टिक, थुंकणे ह्याची कुठेही नामोनिशाणीही नसलेले सुंदर रस्ते आणि मोकळी मैदाने. थिम्फूच्या मुख्य रस्त्यावरच 15th Park avenue चित्रपटाच शूटींग झालेल आमच्या हॉटेल मालकाने कौतुकाने सांगितल. नव्या आलेल्या हिंदी पिक्चर्सच्या स्टोर्‍या त्याला सविस्तर माहीत होत्या आणि शाहरुख खानचे कौतुक करताना तो थकत नव्हता. लाल मिर्च्या, चीज, बटाटा, सुक्या भाज्या ह्यांचा सढळ वापर असलेले भुतानी जेवण आम्ही आवडीने खात होतो ह्याचही त्याला अगदी कौतुक वाटलं होत.

थिम्फू नंतर बघण्यासारख भुतानमधल दुसर शहर म्हणजे पारो. रस्त्यावरुन जाताना इथला दरीच्या पोटात असलेला चिमुकला एअरपोर्ट आणि त्यावरुन धावत वर आकाशात झेपावणारे ड्रक-एअर ह्या भुतानी हवाईकंपनीचे वरुन छोट्या खेळण्यासारखे दिसणारे विमान हे एक प्रेक्षणीय दृश्य होते. भुतानचे राजे जिग्मे सु वांगचू ह्यांचा राजवाडा अगदी लांब अंतरावरुनच फक्त बघता येतो. त्यानंतर एक म्युझियम, काही बुद्ध मोनास्ट्रीज. बास. टिपिकल पर्यटकांना पाहाण्या सारख्या भुतानमधे इतक्याच गोष्टी. पण गंमत म्हणजे ह्या पाहिलेल्या गोष्टी आपल्या लक्षातही रहात नाहीत. लक्षात रहातो तो फक्त इथला विलक्षण निसर्ग. पुन्हा पुन्हा आपली नजर जात रहाते ती हिमालयाच्या दमदार उतारांवर, त्यावरच्या दगडांवर फ़ुललेल्या जंगली जास्मिनवर. नाजुक लाल जांभळ्या जंगली गुलाबांच्या झुबक्यांवर, गडद रंगांची उधळण झालेली इथली फुले पापणी मिटू देत नाहीत पहाताना. लार्कस्पर्स, एस्टर्स, डेन्डेलिऑन्स, जिरानियम्स, जेन्शिअन्स, असंख्य प्रकारच्या लिली, र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि कहीशी बुटकी ज्युनिपर्सची, अतीभव्य देवदाराची झाडे, त्यावर झेपावलेल्या शुभ्र magnoliya, प्रदुषणमुक्त हवेची ग्वाही देणार्‍या लायकेन्स आणि हिरव्या शैवालाचे पांघरुण घेतलेली ओकची झाडे हे सारेच भुतानला 'ढगांमधले जंगल' असे का म्हणतात ते संगत रहातात. इथले पर्वत, नद्या, तलाव, झरे, खडक सारेच गुढरम्य आणि अलौकिक वाटते. इथली लोकं समजतात त्यात पवित्र आत्मे रहातात. त्यांना त्रास दिला तर इथे रोगराई फैलावेल, संकट ओढवतील. आपण निदान तिथे असेपर्यंततरी सहज त्यांच्या ह्या समजुतीवर विश्वास ठेवतो. आणि कदाचित म्हणूनच सार्‍या जगातून नामशेष झालेला काळ्या मानेचा हंस पक्षी फक्त इथेच, ह्या देवभुमीत सुरक्षितता वाटल्यामुळेच असेल कदाचित पण इथे मोठ्या संख्येने आढळून येतो. ह्या हंसराजांचे भुतान मधले वसतीस्थान फोबिजिका ज्याचा अर्थ जादूचे घर असा होतो तिथे आहे आणि जेव्हा हे पक्षी त्यांचे हिवाळ्यातले घर इथे वसवायला येतात तेव्हा इथल्या बुद्धाच्या देवळाला तीनवेळा उडत प्रदक्षिणा घालतात आणि मगच घरटी बांधायला लागतात असं इथले स्थानिक समजतात. जगातल्या ज्या मोजक्या दहा जैविक विविधता त्यांच्या मुळच्या नैसर्गिक अवस्थेत अजुनही जपल्या गेलेल्या जागा आहेत त्यांतले भुतानचे स्थान बरेच वर आहे. पक्ष्यांच्या दुर्मिळ 770 जाती, 50हून अधिक ऑर्किड्स आणी र्‍होडेडेन्ड्रॉन्स, थक्क करुन सोडतील इतक्या औषधी वनस्पती, तेकिन, स्नो लिओपार्ड्स, सोनेरी तोंडाची लंगुर जातीची माकडे, निळ्या मेंढ्या, वाघ, पाणम्हशी, हत्ती, लाल तोंडाचे कोल्हे, एक ना अनेक समृद्धजंगल प्राण्यांच्या संपत्तीने नटलेला हा प्रदेश पहाताना मन थकत नाही, शरीर दमत नाही.

अधिकृतपणे बाहेरच्या जगातली लोकं भुतान मधे येऊन फार नाही जेमतेम 26/27 वर्षेच लोटली आहेत. इथल्या रस्त्यांवरुन तोपर्यंत फक्त घोड्यावरुन वाहतुक चालयची आणि साठीचे दशक उलटून जाईपर्यंत इथे आधुनिक जगात तोपर्यंत कमालीचे विकसीत झालेले telecommunications चे अस्तित्वही भुतानमधे नव्हते ह्यावर आता विश्वासही बसणार नाही इतक्या झपाट्याने निदान थिम्फू, पारो सारख्या शहरी विभागांमधले भुतानचे जिवन बदलत आहे ह्यात शंका नाही. टेलेफोन्स, इंटरनेटचे बुथ्स जागोजागी दिसतात. टेलेव्हिजनचे आगमन सर्वात उशिरा झालेला जगातला भुतान हा एकमेव देश. केबल टिव्हीचे जाळे पसरुन इथे मोजकीच वर्षे लोटलीत पण ह्या चारपाच वर्षांच्या काळातही भुतानमधले गुन्हेगारीचे आत्तापर्यंत शून्यावर असणारे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. राजघराणे अधिकृअतरीत्या 2008 साली पाय उतार होऊन तिथे संसदेचे आगमन होईल. भुतान झपाट्याने बदलतेय आणि बदलत रहाणारच. आपला निसर्ग, पर्यावरण, चालिरीती, परंपरा ह्यांचे जतन करण्याची इथल्या लोकांची धडपड अजून किती काळ यशस्वीपणे चालू राहू शकेल हे येणारा काळच ठरवेल. पण आजही जेव्हा भुतानी 'किरा' नेसलेली एखादी षोडश वर्षिय तरुणी थिम्फूच्या रस्त्यावरुन चालते तेव्हा तिच्या पायातले जवळच्याच पाश्चिमात्य वस्तूंनी भरलेल्या दुकानातून घेतलेले उंच टाचांचे शूज आपल्याला भावी बदल कुठल्या दिशेने भुतानला अपरीहार्यपणे घेऊन जाणार आहे आणि किती वेगाने ते सांगत रहातात तेव्हा मन चुटपुटते जरुर.
जेमतेम चार वर्षांपूर्वी आलेल्या मोबाईलने आणि इंटरनेटने हा बदल जरा जास्तच झपाट्याने इथल्या नव्या तरुण पिढीच्या आयुष्यात आणलेला आहे हे मात्र खरे. इथल्या The Bhutan Times मधे आलेली ही आकडेवारी हॉटेलच्या लाउंजमधे वाचताना मन जरा उदासले हे खरेच. थिम्फूच्या केवळ पन्नासहजार लोकसंख्येमधे 15,000 इंटरनेट युजर्स आणि 25000 landline users आणि 23000 मोबाईल फोन सबस्क्राइबर्स आहेत. नव्या जमान्याचे नवे पडसाद भुतानमधे जरा जास्तच वेगाने पडघम वाजवत येणार आहेत का?

National Geographic चे जे आर्टिकल मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेले होते त्यात भुतानचे वर्णन " kingdom in the clouds.. scarsly touched by the modern age" असे केलेले होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीच एका फिल्म फेस्टीवलमधे Travellers and the magisianहा सिनेमा पाहीला होता. भुतानचे आजपर्यंत कधीच जगासमोर न आलेले अवगुंठीत सौंदर्य ह्या सिनेमाने सर्वात प्रथम लोकांना दाखवले. त्यात कामेही कुठल्या व्यावसायीक नट नट्यांनी नाही तर भुतानी स्थानिक लोकांनीच केली होती. त्या सिनेमातला तो अद्भुत भुतान पाहून मन केवळ थक्क झाले होते. प्रत्यक्ष भुतान फिरुन पहातानाही ही जादू यत्किंचितही उणावलेली कधी जाणवली नाही. तिथून परत येताना सोबत हाताने विणलेल्या रंगित वस्त्रांची, मंजुळ आवाज करणार्‍या लाकडी बाउल्सची सुवेनियर्स जवळच्या सामानात होती खरी, पण खरी सोबत होती ती तिथल्या अनाघ्रात निसर्गाची, दैवी, गूढ, अलैकिक सौंदर्याची आणि अजूनही निष्पापणा जपणार्‍या तिथल्या माणसांची.