Thursday, May 06, 2010

Kasab got his verdict!

अजमल कसाबला मरेपर्यंत फाशी.
भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो! तुकाराम ओबळेंच्या आत्म्याला आता थोडी स्वस्थता लाभेल.
पण अजमल ही फक्त सापाची शेपटी आहे. दहशतवादाचा आख्खा विषारी अजगर पाकिस्तानात सुस्तावून पडलेला आहे त्याला कधी ठेचणार? मास्टरमाईन्ड मिळेपर्यंत कसाबाच्या फाशीचा पूर्ण आनंद लुटता येणार नाही.
अर्थात तसंही याच भारतीय न्यायसंस्थेने फाशीची शिक्षा सुनावलेले ३८ जण अजून रांगेत आहेत त्यानंतर कसाबचा नंबर लागणार. म्हणजे कधी अजून पंचवीस वर्षांनी कसाबला फासाच्या दोराला लटकलेलं बघता येणार? तोपर्यंत सीएसटी स्टेशनात मारले गेलेल्या त्या सार्‍या निरपराध आत्म्यांनी काय करायचं? नुसतंच तळमळायच?

तरीही पुन्हा भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो!
उज्वल निकम आणि जज टहलियानींचे आभार.

Saturday, May 01, 2010

'A Pack Of Lies'- गौरीच्या मुलीचं पुस्तक

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.

उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.

उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.

गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले.
मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.

या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.

आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.

स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.

आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!

उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?