Saturday, March 14, 2009

पेल्टोफ़ोरम डायरी


फ़ेब्रुवारी महिना संपला.
उन्हाळा चांगलाच सुरु झालेला आहे. मुंबईत तो तसा कधी नसतो म्हणा! पण या दिवसांत घाम कमी त्यामुळे उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवतो. आजूबाजूचा शिल्लक निसर्गही धूळभरला, रुक्ष आणि कोमेजलेला.
भर दुपारी माझ्या खिडकीबाहेरच्या त्या कृश, काटकिट्या, तपकिरी फांद्यांचा पसारा कसाबसा सावरत उभ्या असणा-या उदास पेल्टोफ़ोरमला (दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा असाच दिसतोय) पहात मी हातातलं रस्किनचं पुस्तक हताशपणे मिटते. मला त्याचा (पुन्हा एकदा) हेवा वाटत असतो. या दिवसांत त्याच्या खिडकीबाहेरच्या चेरीच्या झाडांवर गुलाबी कळ्या उमलायच्या घाईला आलेल्या आहेत. वसंत त्याच्या दाराशी आहे अगदी आता. हिमालयातल्या देवदारांनी भरलेल्या उतारांवरच्या गावातल्या त्याच्या घराच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याच्या हाताच्या अंतरावर असतो. आणि तो लवकरच फ़ुलणार असतो.

------------------

मार्चचा पहिला आठवडा संपत आला. उन आता अजूनच वाढलय. अगदी सकाळी आठलाही डोळ्यांवर गॉगल्स चढवावे असं वाटायला लागतं. अकरानंतर तर घामाच्या धाराच सुरु होतात. आंब्यांना आणि ब-याचशा झाडांना छान कोवळी पालवी फ़ुटतेय तांबुस.
माझ्या खिडकीबाहेरचा पेल्टोफ़ोरम अजूनही तसाच आहे. मळकट, तपकिरी सुकलेल्या आपल्य काटकिळ्या फांद्यांचा ढिगारा कसाबसा सांभाळत. काही घरी येणारे तर अगदिच मेलय हे झाड असंही खुशाल म्हणतात. मी लक्ष देत नाही.

-------------------

यावर्षी मुंबईत थंडीही अजिबात पडली नव्हती. फ़ेब्रुवारी महिना संपत आला की खिडकीच्या काचांआडून सोनसळी, उबदार उन्हाच्या लडी अंगावर खेळायला सुरुवात व्हायची आणि कदाचित म्हणूनही असेल पण पेल्टोफ़ोरमचे ते कृश विरुप नजरेला एरवी इतकं खुपायचं नाही.
पण आता त्याकडे बघवेना. संक्रांतीच्या आसपास उडवलेल्या पतंगांपैकी एक पांढरा पतंग एका काडीसारख्या सुकलेल्या फांदीच्या टोकावर अडकून निर्जिवपणे हलत होता. तेव्हढीच काय ती त्या झाडावर जिवंत हालचाल.
शिशिर ऋतुंत तसंही पेल्टोफ़ोरमवर मागे राहिलेलं अस्तित्व असतं फक्त तांब्याच्या लांबट चपट्या शिक्क्यांसारख्या दिसणा-या शेंगांचं. त्या काटकिळ्या फांद्यांना झाकून टाकून आपलं रस्टी कॉपरशिल्ड बेअरर नाव सा-या हिवाळाभर सार्थ करत रहातं हे झाड.
पेल्टोफ़ोरमवर अजून ताम्रयुगच चालू आहे एकंदरीत. हवेत मार्च महिन्यातला ताजा, सोनेरी गंध पसरला असला तरी या झाडावर त्याच्या सुवर्णयुगाची वैभवी झळाळी पसरायला अजून वेळ आहे. वसंत फार दूर आहे...!

------------------------

मार्चचा दुसरा आठवडा सुरु झाला आणि एका पहाटे खिडकीच्या काचेबाहेरचे केशरी पडदे दूर केल्या केल्या समोरच्या उगवतीच्या फिकट कोवळ्या प्रकाशातून एक तेजस्वी, पोपटी, तजेलदार हिरव्या नव्हाळीचा झोतच सामोरा आला. गेले दोनेक दिवस छोट्या, हिरव्या चिंचेच्या पानांहून खूपच सतेज आणि थोड्या मोठ्या आकाराच्या पानांचे झुबके फांद्यांच्या कृश हातांच्या ह्या त्या कोप-यांवर झालरींसारखे झुलत होते खरे पण त्याचा हा एवढा मोठा हिरवा मंडप असा एका रात्रीतून बनेल असं वाटलच नव्हतं.

मी अतीव आनंदाने काचा उघडते. पानांचा हिरवा पिसारा नजरेसमोर फ़ुलून आला होता. पोपटी पानांच्या गर्दीतून मधूनच माना वर काढून आता सोबत मिळाल्याच्या आनंदात डुलणारे ताम्रवर्णी शेंगांचे तुरे अचानक देखणे, सतेज दिसायला लागले.
सूर्य पूर्ण उगवला आणि त्याच्या सोनेरी प्रकाशाचे झोत आज नेहमीसारखे डायरेक्ट खिडक्यांमधून घरात अधिरपणे नाही घुसले. हिरव्या पानांशी लडिवाळपणे बिलगून पूर्ण एका पानगळीच्या मोसमात राहून गेलेल्या गप्पांची देवाणघेवाण करुन झाल्यावर मग सावकाश ते माझ्यापर्यंत पोचले.
मला घाई नव्हती.
नजरेसमोरची सोनेरी हिरव्या कवडशांची नक्षी आता हा एक आख्खा वसंत ऋतूभर माझ्या खिडकीबाहेर माझ्यासाठी ओठंगून राहणार होती. शिवाय आता लगेचच येणा-या एका रात्रीत कधीतरी ह्या हिरव्या नकाबामागून ते लख्ख सुवर्णमुद्रांचं सौंदर्य अशाच पहाटे माझ्यापर्यंत ह्याच खिडकीतून येऊन पोचणार होतं. विस्तृत वैभव अचानकच डोळ्यांपुढे ओतण्याचं या झाडाचं कसब आता माझ्या परिचयाचं झालं होतं.

मी आनंदाने वाट पहायला तयार होते.


-------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या घरातून थेट समोर दिसणारा पेल्टोफ़ोरम गेली ६/७ वर्षं तरी तिथे आहे. आता त्याचा विस्तार चांगलाच पसरलाय. रस्त्यावर अजूनही इतर बरीच पेल्टोफ़ोरम, गुलमोहोर, करंज आणि अर्थातच आंब्याची, नारळीची झाडे आहेत. पण आमच्या खिडकीसमोरचा पेल्टोफ़ोरम स्वत:च्याच मस्तीत असल्यासारखा. इतर झाडांवर जेव्हा पालवी तेव्हा हा उघडाबोडका आणि बाकीच्या झाडांवर पावसाच्या झडीत एकही फ़ुल शिल्लक रहात नाही तेव्हा याच्या छतावर पिवळ्याजर्द फ़ुलांचे बुंदके भरभरुन.
पूर्वी फक्त हॉलच्याच खिडक्यांमधून याच्या फांद्या दिसायच्या आणि दुस-या मजल्यावरच्या आमच्या घराच्या लेव्हलला जेमतेम पोचायच्या. आता पूर्ण बहरात असला की नजरेत मावत नाही. स्वयंपाकघर, बेडरुमच्या खिडक्यांमधूनही याच्या फांद्या नजरेसमोर दिसतात. चार वर्षांपूर्वी हॉलच्या पूर्वाभिमुख अर्ध्या भिंतींवरच्या खिडक्या काढून आम्ही फ़्रेन्च विन्डोज बसवल्या. ती भिंत पूर्ण काचेचीच झाली.
आणि त्याच वर्षी पेल्टोफ़ोरमला पहिला भरगच्च बहर आला.

बरेच दिवस आधी हिरव्या पालवीने आणि ताम्रशेंगांनी भरलेल्या त्याच्या फांद्यांवर बुंदीसारख्या कळ्यांचे उभट तुरे डोकावत होते. बघता बघता सा-या झाडाची कॅनोपी या तु-यांनी भरुन गेली. मग त्यावर एकटं दुकटं चुकार पिवळं फ़ुलही दिसायला लागलं होतं. पण पानांची हिरवी गर्दी इतकी दाट की त्यांच्याकडे लक्षही जात नव्हतं. त्यात ह्या फ़ुलांचा रंग अमलताशाच्या फ़ुलांसारखा तकतकित पिवळा नाही. थोडी गडद झाक आणि मधोमध चॉकलेटी पुंकेसरांचा वर्तुळाकार झुबका.
तपकिरी शेंगांची गर्दी आणि हिरवी पाने अजूनही झाडावर ऐन बहरात असताना ही तुरळक फ़ुले फारशी आकर्षक दिसत नव्हती. मात्र एक दिवस पहाटे झाडावरच्या सगळ्याच कळ्यांनी ठरवून ठेवल्यासारखे डोळे उघडले आणि सोनेरी जरतारी बुंदक्यांसरख्या फुलांनी झाडावरचं प्रत्येक हिरवं पान झाकून टाकलं.
भिंतीच्या काचा पूर्ण पिवळ्या रंगांनी रंगल्या.
ते सोनेरी वैभव अवर्णनीय होतं.
घरात येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या सोनेरी झगमगत्या अक्षरश: डोंगरासारख्या आकारात रचलेल्या फ़ुलांच्या राशीकडे पहात रहात. उतरत्या दुपारी त्यावर सातभाईंचा गजबजाट, फ़ुलपाखरांची येजा सुरु होई. सकाळी मधमाशा गर्दी करत. काही उघड्या काचांमधून घरातही शिरत.
पण आमची तक्रार नसे.
अगदी मध्यरात्री सुद्धा उठून ते फ़ुलांच वैभव पहात बसावं असं होतं. आकाशात चंद्राच्या प्रकाशात ते पिवळे जरतारी बुंदके अजूनच सतेज होत. पायातळीचा रस्त्यावरही याच फ़ुलांचे यलोकार्पेट. सारा आसमंतातच सोनेरी आभा पसरुन रहाते.

पेल्टोफ़ोरम त्यावर्षीपासून आमच्या खिडकीसमोर असाच भरभरुन फ़ुलतोय.
वाट पहायला लावतो आणि बहरतो तेव्हां हातचं राखून न ठेवता. मनसोक्त.

त्या फ़ुलांच्या कडांनी कातरल्यासारख्या दिसणा-या नाजूक नक्षीदार पातळ सोनेरी पाकळ्य़ांमधून असंख्य पिवळी त्या फ़ुलांपेक्षा थोड्या फ़िक्या रंगांची फ़ुलपाखरं बागडतात. एखाद्या संध्याकाळी दुर्मिळ ब्लू मॉर्मोनही फ़ुलांवर पंख पसरुन जातं. पहाटेला भारद्वाज त्या सुवर्णराशीवर बसून जातो आणि पिवळे चिमुकले टिट्स, केशरी फ़ुलचुखे, सनबर्ड्स तर झाडावरुन मुक्काम हलवयालाच तयार नसतात.

मुंबईत एप्रिल-मे चा उन्हाळा तेव्हा ऐन भरात असतो. भर दुपारी घामाच्या धारा वहात असताना खिडकीत बसून त्या पिवळ्याजर्द सोनमोहोरांच्या राशीवर आपले निळे पंख पसरुन निवांत पहुडलेलं एखादं फ़ुलपाखरु मला दिसतं.
मला आता रस्किनचा हेवा वाटत नसतो. माझ्याही खिडकीबाहेर वसंत फ़ुललेला असतो. पेल्टोफ़ोरम ऐन बहरात असतो.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पेल्टोफ़ोरम इंडिजिनस नाही. दक्षिण अमेरीकेतून तो आपल्या इथे आलेला आणि आता मुंबईच्या मातीने, पक्षांनी, फ़ुलपाखरांनी आपलाच मानून टाकलेला. उप-यांना आपलं म्हणायच्या त्यांच्या सवयीनेही असेल बहुतेक.
मुळ या मातीतलं नाही म्हणूनच बकुळ, अमलताश (बहावा)चा असतो तसा याचा कुठलाच उल्लेख संस्कृत काव्यांत, चालिरीतींत, अगदी गुलमोहोराचा असतो तसा आधुनिक साहित्यामधेही नाही. त्यादृष्टीने इतक्या देखण्या फ़ुलांचं वैभव अंगावर वागवूनही हा उपेक्षितच. शिवाय अतिरेक करुन मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर याची लागवड करुन सर्वसामान्य करुन टाकलेला. मुंबईत एकेकाळी गुलमोहोर आणि बहाव्याच्या रोडऍव्हेन्य़ूसाठी असणा-या पॉप्युलॅरिटीवरही पेल्टोफ़ोरमच्या संख्येने मात केली. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा पण त्या बळकट नसतात, केबलच्या जाळ्यांना याचा अडथळाच होतो आणि तरी अगदी छोट्या गल्ल्यांमधूनही काही सेन्स न दाखवता मुन्सिपाल्टीने हा लावून टाकलेला. त्यामुळे अनेकांच्या रोषालाही हा पात्र.

माझ्या दृष्टीने मात्र माझ्या खिडकीबाहेर निसर्गाचं एक संपूर्ण चक्र फ़ुलत ठेवणारा हा पेल्टोफ़ोरम अगदी खास. माझ्या घरासाठीच फ़ुलणारा. फ़ुलेल आता. मग मी फोटो टाकीन :)


-------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 20, 2009

फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन? माय फ़ूट!!

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

Friday, February 13, 2009

रस्किन, गुलझार आणि मी (:P)

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच! मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य (म्हणजे त्यात पैसा मिळतो आणि यात नाही हा सोडून) आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन सारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहिता यावं.
नाही जमत :(
असाईन्मेन्ट्सचं टेन्शन आणि उलटून गेलेल्या डेडलाईन्स नजरेसमोर दिसत असताना साध्या खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरम कडे नाही लक्ष जात भलेही त्यावर सोनेरी बुंदक्यांसारख्या फ़ुलांच्या राशी जमा झालेल्या असोत.
तर ते जाऊचदेत.
जिनियस क्रिएटिव्ह आणि आपल्यासारखे कुडमुडे क्रिएटिव्ह ह्यांत इतपत फरक तर असणारच. नाही कां?

Wednesday, August 27, 2008

पत्ता पत्ता.. बुटा बुटा..

ऑगस्ट-सप्टें. हे महिने म्हणजे वर्षाऋतुचा जवळजवळ मध्य. या दिवसांत पाऊस चांगला स्थिरावलेला असतो. निसर्गाला त्याने सर्वांगाने बहरुन आणलेलं असतं. वेली, झुडुपे, झाडे, वृक्ष सारेच पानाफ़ुलांनी नखशिखांत सजलेले. जमिनीतलं प्रत्येक पडलेलं बीज रुजुन वर आलेलं असतं. ऋतु आणि निसर्गाशी कायमच मनोरम गुंफ़ण करुन असलेली आपली सण-संस्कृती साहजिकच या दिवसांत पर्णफ़ुलांच लेणं लेवूऩच साजरी होते यात नवल नाही.
दुर्गाबाई श्रावणसाखळीतल्या शेवटच्या दुव्याचे म्हणजे भाद्रपदाचे वर्णनच मुळी सर्व ऋतुंचे सार असणारा महिना असे करताना लिहितात, " वसंताचे पुष्पवैभव, ज्येष्ठाचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल सारेच काही ह्या महिन्यात अनुभवायला मिळते."
समृद्ध हिरवाईने खुललेल्या ह्या भाद्रपदात आपल्या घरात पाहुणे येणा-या आद्यदेवतेचे श्री गणरायांचे स्वागत जनलोक ह्याच बहुविध पत्री,फ़ुले,फ़लादींच्या समर्पणाने करतात हेही साहजिकच. त्यासाठीच्या सगळ्याच वनस्पती नैसर्गिकपणे उगवणा-या. ती फ़ुले, पत्री गोळा करुन आणायचं कामही घरातल्या लहान मुलामुलींचं किंवा स्त्रियांच. ताज्या,टवटवीत निसर्गाच्या इतक्या समीप जाऊन त्याचा परिचय दृढ करुन घ्यायची किती छान संधी ही!
लहानपणी ठाण्याला रहात असताना घराभोवतीचं या दिवसांतलं अंगण मधुमालती, अनंत, चाफ़ा, सोनटक्का, गुलबक्षी, जाई, पारिजातक, कण्हेर, कृष्णकमळीच्या फ़ुलांनी, दुर्वा-तुळशींच्या गजबजाटाने फ़ुलून आलेलं असायचं. मला वाटतं पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इतपत हिरवाई सा-यांच्याच अंगणांमधे असायची. सोबतीला फ़ेर धरुन जांभूळ, उंबर, पांगारा वगैरेंची मोठी झाडेही असायचीच.
त्यानंतरच्या काळात मात्र अंगणच संकोचली आणि रस्त्यावरच्या मुद्दाम लावलेल्या बहावा, गुलमोहोर, पेल्टोफ़ोरम, आणि रेनट्रीच्या पाना फ़ुलांशिवाय इतर हिरवाई पहायला ह्याच स्त्रिया, मुलेमुली मोठ्या संख्येने नेचर ट्रेल्स नाहीतर जंगलांच्या वाटांवर फ़िरु लागली. ऑगस्ट-सप्टें. महिन्यांमधे शिलोंढा, जिजामाता उद्यानापासून कांसच्या पठारावर मोठ्या संख्येने जाणारे ग्रूप्स हेच तर दर्शवतात. पण मग य सा-यातून हाती पडतय ते फ़क्त दूरुन निसर्गाला निरखणं. त्याच्याशी ख-या अर्थाने जवळीक साधलीच जात नाही जी स्वत:च्या अंगणातल्या फ़ुलझाडांची फ़ुले-पत्री डोळसपणे, आपलेपणे हाताळण्यातून, निरखण्यातून साधली जायची आपोआप ही रुखरुख ख-या निसर्गप्रेमीच्या मनातून जाता जात नाही.
त्याची टोचणी बनली ती मात्र नुकतीच फ़ुलबाजारात गेल्यावर फ़ुलांच्या ढिगांनी ओसंडून वाहणा-या टोपल्यांशेजारी रस्त्यावर रचला गेलेला हिरव्या पानांचा अस्ताव्यस्त ढिगारा पाहिला तेव्हां.

"पत्री घ्या ताई" फ़ुलवाला त्या व्यक्तिमत्वहीन, नुसत्याच हिरव्या रंगाचे अस्तित्व मिरवणा-या पानांना विस्कटत मला म्हणाला.

ही पत्री? मला लहानपणी घरच्या गणपतीच्या फ़ुलांच्या परडीशेजारच्या तबकातली सुबकपणे रचलेली तजेलदार, टवटवीत पत्री आठवली. प्रत्येक पान स्वत: गोळा केलेलं.
"वरच्या कोवळ्या पानांना नका हाताळू गं. खालची जुन पानं नख न लावता अलगद तोडा. फ़ांद्यांशी धसमुसळेपणा नको." अशा आजीच्या पाने, फ़ुले कशी खुडावीत याबद्दलच्या किमान पन्नास सूचनांचा मान राखून गोळा केलेली ती पत्री.

फ़ुलवाल्यासमोरचा तो पानांचा ढिग मी जरा चाचपून वर खाली केला. ही कोणती पाने? गणपतीच्या पूजेला जी २१ पत्री लागतात त्यांपैकी ह्यात एकही तर दिसत नाही. इतरच झाडांचा पर्णसंभार हवा तसा ओरबाडलेला. द.भा.धामणस्करांच्या ओळी आठवून मन कळवळून गेले.-

" सकाळ झालीय
फ़ुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्त्र जनावर काठीने
पाना-फ़ुलांवर हल्ले करीत आहे.
बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हां
इथल्या झाडांना
फ़ुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुख-या मुळापर्यंत पसरलेली असेल... "

-------------------------------------------------------------------------

आपल्या सणांची ऋतु आणि निसर्गाशी सांगड घालताना आपल्या पूर्वजांनी निसर्गात होत असणारे बदल लक्षात घेऊन मोठ्या कौशल्याने त्यामागच्या परंपरा निर्माण केल्या. या दिवसात बहरणा-या बहुतेक सा-याच वनस्पती औषधी गुणधर्म असणा-या. त्यांचे जीवनचक्रही मर्यादित कालाचे. त्यांना योग्य प्रकारे हाताळणे म्हणूनच जास्त गरजेचे.

फ़ुलबाजारातून नुसतीच पानांची कोणतीही गर्दी आपल्या घरातल्या देवाला वाहण्यापेक्षा त्या वनस्पतींची ओळख, त्यांचे उपयोग आणि महत्व नव्याने माहित करुन घेणे अत्यंत आवश्यक बनलेले आहे. अंगणातल्या वनस्पती दूर जंगलात, तिथून परत बाजारात पोचल्या आणि तिथून कदाचित त्यांचा मार्ग अस्तंगत होण्याच्या दिशेने झपाट्याने जाऊ शकतो तेव्हां वनस्पतींना या अर्थाने ’समर्पयामी’ म्हणून निरोप द्यायची वेळ टाळायची तर ’पत्री’ म्हणुन गणपतीला अर्पण करायच्या वनस्पती नक्की कोणत्या, त्या कोठून येतात, कशा प्रकारे उगवतात, किती प्रमाणात असतात, त्यांचे उपयोग, रोजच्या व्यवहारातले महत्व, निसर्गात त्यांची विपुलता किती प्रमाणात शिल्लक आहे, नसल्यास त्या किती प्रमाणात वापरल्या पाहिजेत म्हणजे नष्ट होणार नाहीत असे अनेक विचार आपण नक्कीच करु शकतो.

गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस वनस्पतींची माहिती, त्यांचे स्थानिक व शास्त्रीय नाव, कुळ व औषधी उपयोग माहिती झाली तर ह्या वनस्पतींची वैयक्तिक पातळीवर लागवड, जोपासना, संरक्षण आणि संवर्धन करता येईल पुन्हा अधिक डोळसपणे आणि मग त्यातून नेचर ट्रेलला जाण्यापेक्षा जास्त समाधान आणि फ़ुलबाजारातून विकत आणलेल्या पत्री वाहाण्यापेक्षा जास्त पुण्य कदाचित आपल्या पदरात पडेल.


पुढच्या पोस्टमधे (निसर्गायण ह्या ब्लॉगवर) ह्या एकवीस वनस्पतींची शास्त्रीय माहिती देईन. शक्यतो फोटोग्राफ्ससकट.

Monday, August 11, 2008

ब्लॉगविश्वातला पाऊस

Thursday, July 31, 2008

फ़्लॉगर्स किंवा फ़ेक ब्लॉगर्स

फ़ेक ब्लॉगिंग ह्या विषयावर एका लेखाच्या निमित्ताने माहिती जमवत असतानाच मराठी ब्लॉगिंग विश्वात कोणा एका संवादिनी नामक ब्लॉगरवर अशाच स्वरुपाचा आरोप केला गेल्याचे दृष्टीस पडले हा योगायोगच. त्या आरोपात तथ्य असेल किंवा नसेलही. इंग्रजी ब्लॉगर्सच्या विश्वात फ़्लॉगर्सच्या सुळसुळाटामुळे मधल्या काळात बराच गदारोळ होऊन गेला. फ़क्त व्यावसायिक कारणांसाठीच फ़ेक ब्लॉगिंगचे तंत्र वापरण्यात येते ह्या आत्तापर्यंतच्या समजाला एअरहोस्टेस डायरी किंवा स्टीव जॉब्जच्या पर्सनल फ़ेक ब्लॉग्जमुळे जोरदार तडा गेला आणि वैयक्तिक स्वरुपाच्या म्हणजे डायरी टाईप लिखाण करत असलेल्या ब्लॉगर्सच्या विश्वासार्हतेला जो धक्का बसला त्याचे पडसाद मराठी ब्लॉगविश्वातही उमटावेत ह्यात तसे पाहता नवल नाही. मराठीत खूप दर्जेदार,सातत्याने लिहिणारे अनेक ब्लॉगर्स आहेत. जसे कौस्तुभ, नंदन,संजोपराव,कोहम,संवेद,अभिजित,प्रियमभाषिनी,गायत्री,ट्युलिप,अजानुकर्ण,मेघना,यशोधरा,गणेश मतकरी,संगीता,पराग,शिरवळकर. सर्वांनाच आपापला वाचकवर्ग आहे. पण सर्वात जास्त फ़ॅन फ़ॉलोईंग वैयक्तिक स्वरुपाच्या लेखनाला आहे हे वेगळ सांगायला नको. मराठीत वैयक्तिक डायरी टाईप ब्लॉगिंग मधल्या काळात खूप प्रमाणात झाले. ट्युलिप सारख्या सिनियर ब्लॉगर्सनी आपल्या सुरुवातिच्या काळातले लेखन तसेच केले होते. त्या लेखनाला उत्कृष्ट ललित दर्जा होता आणि त्याला जबरदस्त फ़ॉलोईंग मिळाले. आता तिने लिहिणे कां थांबवले कळायला मार्ग नाही पण त्या ब्लॉगला मिळालेल्या प्रसिद्धीने आणि पुरस्काराने प्रोत्साहित होऊन अनेक त्या स्वरुपाचे ब्लॉग्ज उगवले होते मधल्या काळात ही सुद्धा चांगलीच गोष्ट होती. पर्सनल लिखाणात वाचक गुंतत जातात. त्यांच्या भावनांना आवाहन करणारे साहित्य तेही मातृभाषेतून सामोरे आले की आपल्यासारखाच/सारखीच कोणीतरी आपल्याच भावना शब्दबद्ध करतेय ही जाणिव हे गुंतणे वाढवत नेते. अर्थातच त्याप्रकारचे लेखन सातत्याने करत राहणे सोपे नसते आणि ते जेन्युईनली करणे ज्यांना जमत नाही अशा नव्या ब्लॉगर्सना फ़ेक ब्लॉगिंग करण्याचा मोह होऊ शकतो हे समजण्यासारखे आहे. मराठी ब्लॉग विश्वात आज ना उद्या हा प्रश्न चर्चेला येणारच होता. यायला हवाच होता. आपापल्या ब्लॉगवर काही लिहिले तरी तो ज्याचा त्याचा प्रश्न असा आजपर्यंत एक समज होता. पण वाचकांची त्या ब्लॉग्जमधे होत असलेली भावनिक गुंतवणुक लक्षात घेता हा प्रश्न संपूर्ण वैयक्तिक स्वरुपाचा राहूही शकत नाही. इंग्रजीतील फ़ेक ब्लॉगिंगच्या घटनांवरुन तर तसे सिद्धच झाले आहे. फ़्लॉगर्सना अटकाव होणे आता फ़ारसे कठिण राहिलेले नसले तरी वैयक्तिक स्वरुपाच्या ब्लॉग्जच्या बाबतीत तसे सिद्ध होणे खूपच कठिण होऊन बसते. मराठी वाचकांचा भावनेच्या लोंढ्यात वाहून जाण्याचा प्रकार बघता तर इथे तसे सिद्ध करणे अशक्यच. संवादिनीच्या ब्लॉगचे जेव्हां ऍट वन गो वाचन केले तेव्हां त्या अनामिकांच्या अथवा जुहि दिक्षितच्या म्हणण्यामागचा रोख काय आहे आणि कां ते सहज लक्षात आले, पटलेही आणि तरी काही वाचकांचा ते मान्य करायला असलेला आक्षेपही सहज समजून आला. कारण आता ते त्यात गुंतून गेले आहेत. तरीही मेलोड्रामा न करता तटस्थपणे विचार करुन मग वाचकांनी प्रतिक्रिया द्यायला हव्यात. तसे होताना दिसत नाही. वाचकांना लिखाण आवडले तर ते जेन्युईन आहे की ती एक रचलेली कथा आहे ह्याला महत्व देण्यात कितपत तथ्य आहे हा विचार फ़्लॉगर्सच्या बाबतीत वेगळे स्वरुप धारण करतो. कांदबरी असल्यास तसे निदान मेन्शन करणे नैतिकदृष्ट्या जबाबदारिचे मानले जावे असे मला वाटते. वैयक्तिक स्वरुपाच्या लिखाणातली वाचकांची भावनिक गुंतवणूक लक्षात घेतली तर नैतिकदृष्ट्या हा शब्द महत्वाचा ठरतो.

मराठी ब्लॉग कम्युनिटी ही दिवसेंदिवस विस्तारत जाणारी आहे. भल्या वाईट सगळ्याच गोष्टी इंग्रजी ब्लॉगिंग प्रमाणे इथेही घडत रहाणार हे गृहितच आहे. शक्य असेल तर सर्वांनीच आपली ह्याबाबतीतली मते मांडावीत.

तळटिप: वरील राईट अप मधे व्यक्त केलेले विचार हे कोणत्याही प्रकारे कोणावरही आरोप करणारे नाहीत.

Friday, June 13, 2008

मांजा.




राही अनिल बर्वे चा 'मांजा' समोर पडद्यावर पाहणे हा सोपा अनुभव नव्हता. मुंबईत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मिफ मधे पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनासहीत सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा सुवर्णशंख पुरस्कार मिळालेली ही फिल्म मी दुसर्‍यांदा यशवंतराव मधे पहात असतानाही मन तसेच सुन्न झाले होते.

जेमतेम चाळीस मिनिटांचा मांजा समोर पडद्यावर उलगडत जाताना त्यातल्या प्रत्येक ब्लॅक ऍन्ड व्हाईट फ्रेममधून एक काचेरी धार अतिथंडपणे तुमच्या संवेदनशिलतेचा गळा खोलवर चिरत मन रक्तबंबाळ करुन सोडत जाते.

अनेक भीषण 'वास्तवांना' आत्तापर्यंत पडद्यावर अनेकदा पाहून आता निर्ढावलीय असं वाटायला लागलेली तुमच्यातली सेन्सिबिलिटीही समोरच्या रांका आणि चिमीच्या रोजच्या आयुष्यातल्या एका कोणत्याही २४ तासांत जे काही घडून जातं ते पाहून अंतर्बाह्य विछिन्न होऊन जाते, आणि मग मनावर काजळी धरत जाते एका दाट अस्वस्थतेची.. आपण जिथे सुखाने रहातोय त्या ह्या चकचकीत शहराच्या आंतरत्वचेवर फाटक्या चिंध्यांप्रमाणे लोंबकळत रहाणार्‍या वस्त्यांमधल्या कोणत्याही १०-१२ वर्षांच्या रांका आणि त्याच्या ४-५ वर्षांच्या बहिणीला हे सारं कदाचित रोजच भोगावं लागत असणार...!.
मांजाचा विषय चाईल्ड मोलेस्टेशनचा आहे आणि पटकथेतून तसेच दिग्दर्शनातून राही प्रत्येक फ्रेममधून ज्या धाडसाने तरीही संयतपणे, विषयावरची पकड किंचितही न सोडता, आवश्यक त्या 'डार्कनेस'सह आपल्यासमोर आणतो त्याला तोड नाही.
इतक्या कमी वेळात तिनही महत्वाच्या पात्रांच्या स्वभावतले कंगोरे, बारकाव्यांसहीत आणि मोजक्या परिणामकारक संवादासहीत विलक्षण ताकदीने आपल्यापर्यंत पोचतात..

शहराच्या क्षितिजावर म्लान काळेपणाने उडणार्‍या कावळ्यांच्या थव्यासारखी रांकाच्या आयुष्यात येणारी रोजची एक संध्याकाळ. दुष्काळी खेड्यातून आईबाप आणि किंचितश्या खुळ्या बहिणीसोबत शहरात जगायला आलेला रांका. काही दिवसांतच आई शरीर विकून पैसे कमवायचा सोपा रस्ता पकडायला निघून गेलेली आणि ते पाहून बापाने गाडीखाली जीव दिल्यावर काहीही मिळणारं काम करुन धाकट्या बहिणीला हिमतीने सांभाळत रस्त्यावर राहताना कसं जगायचं असतं हे आजूबाजूची परिस्थिती रांकाला शिकवत असतेच. ते शिकताना डोळ्यांतली उमज वय उलटून गेलेल्या माणसाची बनत चाललेली.
पतंग उडवण्याच्या वयातल्या रांकाचे हात आता काचांचा भुगा करत मांजा बनवण्यात गुंतलेले. पोट भरायचं त्याचं ते साधन. त्या संध्याकाळी तो तेच करत असताना, धांदोट्या झालेल्या फ्रॉकच्या मागे कोणीतरी मस्करीत बांधलेली पोचट डबड्यांची माळ फरपटवत, आपल्या अशक्त चिरचिर्‍या आवाजात रडत चिमी भावाला शोधत तिथे येऊन पोचते.
खाकी वर्दीतला तो हवालदार नेहमीप्रमाणे तिथेच आसपास घोंगावत आहे. ह्या हल्लीच दिसायला लागलेल्या अनाथ भावंडांची त्याला काहीशी काळजी आणि कुतुहल. त्याच्या अकारण चौकशा, विनाकारण सलगी. कामात लुडबुड करणार्‍या चिमीवर रांका खेकसतो तेव्हां हवालदार त्याच्यावरच डाफरत चिमीला समजावतोही. तिच्या फ्रॉकच्या मागची डबड्यांची माळही सोडवतो.
संध्याकाळ आणखी गडद,काळी होत जाते.
काचांचा थर दिलेला मांजा रात्रभर सुकवायला म्हणून दोन खांबांना ताणुन बसवून देत रांकाने आजचे काम संपविलेलं.त्यानंतरचं मग फुटपाथवरच्या दिव्याच्या मलूल उजेडातलं रांका चिमीचं, भटक्या कुत्र्याला पंगतीला घेऊन झालेलं 'जेवण', हवालदाराच्या जवळ येत पुन्हा झालेल्या गप्पा.
त्या कधी नव्हें ते मिळालेल्या शाब्दिक फुंकरीने सैलावलेलं रांकाचं मन आणि त्याभरात चिमीला आईस्क्रीम खायला घेऊन जाण्याची त्याने हवालदाराला दिलेली परवानगी.
'चांगला आहे हवालदार'.. मग बिडीचं थोटूक फुंकताना हातभट्टीवाल्या मित्राला तो सांगतो तेव्हां त्याच्याकडून अचानक कळलेला हवालदाराचा विकृत स्वभाव.
मध्यरात्रीच्या तडकलेल्या अंधारात जिवाच्या आकांताने रांका बहिणीला हाका मारत सैरभैर धावत सुटतो. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या राबिटमधलं अशक्त हुंदके देत झोपलेलं चिमीचं चिमुकलं शरीर, तिचा फोलकटासारखा उडून बाजूला लटकणारा फ्रॉक आणि मुर्दाड थंडपणाने रांकालाच समजवणारा हवालदाराचा निर्लज्ज अविर्भाव.. जग असंच वागत असतं रांका, शिकून घे.
रांका आंधळ्या आवेशाने लाथा बुक्क्यांसकट तुटून पडताना हवालदाराचा फक्त कोडगा पश्चात्ताप.
पहाटे चिमीला रस्त्यावरुन चालवत नेताना रांका तिला चुचकारायला तिच्या खांद्यावर थोपटायला जातो तेव्हां भ्यालेल्या कोकरागत चिमी अंग काढते आणि रांका मुळासकट हादरतो आणि दिवसभर काही न सुचून वणवणल्यावर त्याच्या मनात पडते ती सुडाची ठिणगी.
त्याच रात्रीच्या अंधारात मग रांकाने हवालदाराचा दारुच्या गुत्त्यामधे घेतलेला तो विलक्षण सूड.
तो घेताना त्या एवढ्याशा पोरामधे जागलेली मानवी स्वभावातल्या कमजोर जागांवर अचूक प्रहार करण्याची जाण.
रक्ताने ओघळून जात मांजा संपतो तेव्हां रिकाम्या लटकत राहिलेल्या फिरकीप्रमाणे आपलं मन सुन्न भिरभिरत रहातं. मात्र मांजाचा हा शेवट नसतो.
सुदैवाने.
शेवट होतो तो चिमीच्या भाबड्या, विस्कटून गेलेल्या नजरेत माणसावरच्या विश्वासाचा कोवळा किरण पुन्हां उमटवण्यात तिच्या भावाला यश मिळाल्यावरंच.
'मांजा' कृष्णधवल रंगातली डिजिटल फिल्म आहे. संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट, दुपार आणि मग पुन्हां रात्र अशा २४ तासांतल्या प्रत्येक प्रहराचं, तेही मुंबई शहरातल्या धारावी सारख्या एखाद्या बकाल वस्तीतल्या प्रहरांचं यात चित्रण आहे. चिआरास्क्युरोचा-प्रकाश छायेचा खेळ काळ्या-पांढर्‍या रंगामधून दृश्यांमधे किती ताकद आणू शकतो त्याचा नजरबंदी करणारा अनुभव या आधी आपण अनेकदा घेतलेला आहे. कागज के फूल, चारुलता मधे तो एक तरल सौंदर्यानुभव असतो आणि त्यातूनच मानवी भाव-भावनांची आंदोलने नाजूकपणे आपल्यापर्यंत पोचवली जातात, तर तारकोस्कीच्या स्टॉकर मधल्या 'झोन'पर्यंतच्या प्रवासात हाच चिआरास्क्युरो आपल्याला 'भय इथले संपत नाही...' चा विलक्षण वेगळ्या पातळीवरचा अनुभव देतो. 'मांजा' मधे केलेला चिआरास्क्युरोचा वापर ह्यां दोन्हीं अनुभवांचा एकत्रित प्रत्यय आपल्याला देतो. आधी शहरातली कठोर वास्तवता अधिक दाहकपणे आपल्यापर्यंत पोचते तर शेवटच्या दृश्यामधून 'जखम जिवाची हलके हलके भरुन यावी..' असं वाटायला लावणारी कोवळीकही जाणवून जाते. राही इतकंच ते श्रेय सिनेमॅटोग्राफर पंकजकुमारचं.

'मांजा' सुरु होताना जेव्हां समोर पडद्यावर कथा,पटकथा,दिग्दर्शन्,संकलन अशा 'सबकुछ' भूमिकेत 'राही अनिल बर्वे' ही अक्षरे दिसतांत आणि नंतर मांजा उलगडत जाताना ज्या वेगळ्याच पद्धतीने जातो ते पहातांना काही वर्षांपूर्वी वाचलेला राहीचा 'पूर्णविरामानंतर...' हा कथासंग्रह आठवणे अपरिहार्य असते. त्यांतल्या सगळ्याच कथा अशाच छोट्या आणि परिणामकारक, वाचकांना वेगळ्याच दृश्यप्रतिमांच्या जगात नेऊन पोचविणार्‍या, बर्‍याचशा ऍबस्ट्रॅक्ट आणि मानवी संवेदनांची टोकदार जाणीव करुन देणार्‍या, खूपशा जीएंच्या जातकुळीतल्या. मांजाची हाताळणी 'पूर्णविरामानंतरच्या' मधल्या जगाशी नातं जोडणारी नक्कीच वाटते.
कथांच्या वेगळेपणाचं भरपूर कौतुक होऊनही राहीने नंतर काहीच लिहीलेलं वाचण्यात आलेलं नाही. एकदम हा 'मांजा'. मधल्या मौनाच्या दीर्घप्रवासानंतरचा हा पहिलाच टप्पा.
टप्पा घेतलाय तोही कसल्या अफलातून उंचीवरचा!
अनिल बर्वेंच्या डोंगराएवढ्या उंचीपर्यंत एका उडीतच पोचलाय त्यांचा पोरगा हे नक्की.
त्याच्या आगामी 'तुंबाड' ह्या पूर्ण लांबीच्या हिंदी फिल्मबद्दल आणि 'आदिपश्य' ह्यां पॉप्युलर तर्फे प्रसिद्ध होणार असणार्‍या कांदबरीबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झालीय हे वेगळं सांगायलाच नको.