Wednesday, March 28, 2012

पिवळ्या घरातले दोघेजण


अजरामर पन्नास चित्रं, जी प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहिली, त्यांचा अल्बम पहात असताना देदिप्यमान, विलक्षण प्रतिभेची चुणूक प्रत्येक रेषेवर, रंगाच्या प्रत्येक फटका-यावर दिमाखानं मिरवणा-या मायकेल ऍन्जेलो, लिओनार्दोच्या भव्य चित्रांना मागे टाकून अचानक व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आर्ल्समधल्या बेडरुमचं साधसुधं चित्रं समोर येतं.


व्हॅन गॉघच्या सुप्रसिद्ध सूर्यफ़ुलांना, सोनेरी गव्हाच्या शेतांना, एकाकी पायवाटेवरच्या सायप्रस वृक्षांना मागे टाकून ही वर वर सामान्य दिसणारी खोली पुढे येते.
असं काय आहे या पिवळ्या रंगानी रंगवलेल्या खोलीत की जगभरातल्या लोकांना पुन्हा पुन्हा ही खोली न्याहाळाविशी वाटावी?
द यलो रुमअत्यंत साधी आहे, कुणाची तरी वाट पहाणारी, तयारीत सज्ज असलेली ही खोली, सोबतीची अपेक्षा करणारी. दोन खुर्च्या, दोन उशा.. बंद खिडकी, विरुद्ध रंगांचे, जाडसर रंगवलेले ठळक पॅचेस, काहीसं विचित्र वाटणारं पर्स्पेक्टीव्ह कारण मागच्या भिंतीचा कोन जरासा तिरपा.
फ़्रान्सच्या दक्षिणेच्या आर्ल्स या खडकाळ, वैराण प्रदेशात चित्र काढण्याकरता व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ येऊन राहीला त्यावेळी तो यलो हाऊसमधे रहात होता. तो आर्ल्समधे होता त्यापैकी नऊ महिने त्याचा मित्र, जो स्वत: प्रतिभावंत चित्रकार होता, तो पॉल गोगॅं त्याच्या सोबत होता.
अस्वस्थ मनोवृत्तीचा, अशक्त कुडीचा व्हिन्सेन्ट आणि कणखर स्वभावाचा, बलदंड गोगॅं, त्यांची व्यक्तिमत्वे, स्वभाव वेगळे. मैत्री, आपुलकी, स्पर्धा, असूया यांचं एक विलक्षण स्फोटक रसायन त्या दोघांत होतं.
गोगॅंने आर्ल्सला यावं, यलो हाऊसमधे रहावं, दोघांनी उघड्या निसर्गात लांबवर भटकत जाऊन चित्रं रंगवावी, एकमेकांच्या सोबतीने रहावं याचा गॉघने आर्ल्समधे आल्यापासूनच ध्यास घेतला होता. गोगॅंला इकडे येण्याबद्दल आग्रह करणारी पत्रे तो आपला भाऊ, थिओला वारंवार पाठवत होता. गोगॅं अखेर यायला तयार झाला. त्याचं आगमनाची विलक्षण उत्कंठतेनं वाट पहाणा-या व्हिन्सेन्टच्या मनावर आता त्याच्या स्वभावानुसार तणाव आला. गोगॅंला आर्ल्स आवडेल का? त्याचा अपेक्षाभंग तर होणार नाही इकडे आल्यावर? हा वैराण प्रदेश पाहून तो चिडणार, वैतागणार तर नाही?
या अस्वस्थतेला मागे सारत त्याने यलो हाऊसमधली खोली सुसज्ज करायला सुरुवात केली. मनावरचा ताण कमी करायला त्याला काही वेगळे व्यवधान हवेच होते.
खोली सजवण्याकरता व्हिन्सेन्टने मनापासून कष्ट केले. ही खोली कलाकारांची वाटावी, त्यातल्या फ़र्निचरपासून भिंतीवर टांगलेल्या चित्रांपर्यंत प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असावे, खोलीत मनाला निवांतपणा मिळावा असं त्याला वाटत होतं. फ़िकट व्हायोलेट रंगाच्या भिंती, लालसर तपकिरी जमीन, ताज्या लोण्याच्या पिवळसर रंग असलेल्या लाकडाचे पलंग आणि खुर्च्या, पलंगावरची चादर आणि उशांचे अभ्रे लिंबाच्या पिवळसर हिरव्या रंगाचे, गडद लाल पांघरुण, हिरव्या खिडक्या, जांभळा दरवाजा. खोलीत फर्निचर फ़ार नाही. सदैव आर्थिक चणचण असणा-या व्हिन्सेन्टकडे खोलीत भपकेबाज फ़र्निचर आणण्याइतके पैसे अर्थातच नव्हते. लाकडी पलंग, दोन खुर्च्या, कपडे टांगायला स्टॅन्ड, लाकडी ड्रेसिंग टेबल, केस विंचरायला ब्रश, दाढीचे सामान, आरसा.. इतकंच. पण झळाळत्या रंगांनी ती भरुन गेली आहे. खोलीचं ऐश्वर्य आहे भिंतीवर टांगलेली व्हिन्सेन्टने स्वत: रंगवलेली चित्रं. त्यात त्याचं स्वत:चं व्यक्तिचित्र आहे आणि त्याची लाडकी सूर्यफ़ुलंही आहेत.
व्हिन्सेन्टच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी गोगॅ आर्ल्सच्या वास्तव्याबद्दल लिहिताना या चित्रांबद्दल लिहितो- "माझ्या पिवळ्या खोलीत, जांभळ्या डोळ्यांची सूर्यफ़ूलं, पिवळ्या पार्श्वभूमीवर झळाळत असायची, त्यांचे देठ पिवळ्या टेबलावरच्या, पिवळ्या फ़ुलदाणीत बुडालेले. चित्राच्या कोप-यात चित्रकाराची सही होती: व्हिन्सेन्ट. खोलीतल्या पिवळ्या पडद्याआडून सोनेरी सूर्यप्रकाश जेव्हा या फ़ुलांवर पडायचा तेव्हा संपूर्ण खोली सोन्यासारख्या झळझळीत स्फ़ुरदिप्तीने भरुन जायची; रोज सकाळी माझ्या पलंगावरुन उठताना मनात विचार यायचा, फ़ार सुंदर वास असणार या फ़ुलांना."
आर्ल्समधल्या यलो हाऊसमधल्या या खोलीत व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आयुष्यातला सर्वात वादळी, अस्वस्थ, वेदनादायी आणि सर्वात सर्जकही असा कालखंड कोंडलेला आहे. इथल्या वास्तव्यातच व्हिन्सेन्टने आपल्या मित्रावर, पॉल गोगॅंवर प्राणघातक हल्ला केला, नंतर आलेल्या मानसिक तणावाच्या झटक्यात स्वत:चा कान वस्त-याने कापला. वाहत्या रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहीला. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या एकाकी, वेदनामय आयुष्याच्या सगळ्या जखमा या खोलीत उघड्या पडल्या.
दोन सर्वस्वी भिन्न व्यक्तिमत्वाचे चित्रकार, दोघांनी काही काळ एकत्र राहून भरपूर चित्रं काढली, कल्पनांची देवाणघेवाण केली, त्यांच्यात वाद झाले, काही हिंसक पातळीवर पोचले. या सर्व दिवसांचे पोत, कधी मुलायम, कधी ठाशीव, अनेकदा खडबडीत असे या चित्राला आहेत. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघचं हे सिन्ग्युलर बायोग्राफ़िकल वर्क. त्याच्या आयुष्यासारखंच नाट्यपूर्ण, एकाकी आणि झळझळीत, प्रतिभावंतही.
आर्ल्समधल्या द यलो हाऊसची कहाणी जाणून घेतल्यावर साध्यासुध्या, कुणाची तरी वाट पहात असणा-या या पिवळ्या खोलीला विलक्षण करुण संदर्भ प्राप्त होतात. ‘एव्हरी आर्ट इज बायोग्राफ़िकल’ हे फ़ेलिनीचे वाक्य बेडरुम इन आर्ल्सच्या बाबतीत आत्यंतिक खरे वाटते.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने चितारलेले गव्हाच्या शेतावरचे, आरती प्रभूंच्या काळ्या पक्ष्यांच्या तिरप्या भरारीची आठवण जागवणारे कावळे, रस्त्यावरचा एकाकी सायप्रस पहाताना कोणत्याही संदर्भांवाचूनही मनाला खिन्नता, उदासी येतेच पण जेव्हा संदर्भ कळतात तेव्हा मन जखमी होते. आपल्या भावनांची तीव्रता शतपटींने वाढते. मग त्याच्या अस्थिर, जलद रंगांच्या फ़टका-यांचे, पिवळ्या रंगाच्या अतिरिक्त वापराचे मूळ त्याच्या औदासिन्यात असू शकेल हे जाणवते.
कलाकृतीचा आस्वाद कलाकाराच्या कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय संदर्भांशिवाय स्वतंत्रपणे घेता यायला हवा हा काही समीक्षकांचा आग्रह असतो. पण जर चित्रकाराच्या वेदनेचे, जीवनसंघर्षाचे अवशेष त्या चित्राला चिकटून राहिलेले असले तर तेही जाणून घेणे चित्रांच्या बाबतीत आवश्यकच ठरते. तसं केलं नाही तर आर्टिस्ट्स इन्टेन्शनला ते नाकारणे ठरते आणि मग त्या चित्रकृतीवरही तो अन्याय ठरतो. माहीत असलेल्या, माहीत करुन घेतलेल्या जीवनसंदर्भांच्या खूणा चित्रांमधे शोधणे अपरिहार्य ठरते.

माणसांची चित्रं

सामान्य माणसं जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा त्यांना इतर कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण ओळख नसते. त्यांचं सामान्य असणं, त्यांचं नीरस, रुटीन आयुष्य हेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. चित्रकारांच्या दृष्टीने. म्हणूनच ती जेव्हा चित्रांमधून येतात तेव्हा समुहाने येतात.
सामान्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न, गरीबीची भूक, कष्ट फ़ार कमी वेळा चित्रांमधे उतरली, जेव्हा उतरली, तेव्हा त्यांचं फारसं स्वागत झालं नाही, सामान्यांकडूनही नाही.
साहजिक आहे, कष्टमय, नीरस जीवन रोज जगणा-यांना आपल्या या जगण्याचं चित्रणं बघण्यापेक्षा आभासी, जे आपल्याजवळ नाही, जे हवसं वाटतय ते बघण्यात जास्त रुची.
चित्रकला सुरुवातीपासूनच देवालयांमधे रुजली, राजाश्रयाने फोफावली. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक चित्रविषय, राजबिंडी व्यक्तिचित्रणं, रमणीय निसर्गचित्रं जास्त लोकप्रिय झाली.
चित्रचौकटीतलं ते अद्भूत विश्व, त्या कहाण्या सामान्यांच्या नव्हत्या, चित्रांमधल्या नायक नायिकांच्या भावभावना कितीही खर्‍यासारख्या भासल्या तरी त्यातून सामान्य माणसाच्या वेदना उमटत नव्हत्या. सामाजिक बांधिलकी मानणारे कलाकार मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके, चित्रकार तर आणखीनच कमी. तरीही काही मोजक्या चित्रकारांनी सामान्य माणसाला आपल्या कॅनव्हासवर स्थान दिलं आणि तेही केवळ त्यांची गरिबी, सामान्य, हलाखीतलं जगणं 'कलात्मकरित्या' देखणं दिसतं म्हणून नाही, तर खरोखर या चित्रकारांना सामान्य माणसाचं जगणं रंगविण्यात रस होता.
वेलाकुझचं १७व्या शतकातलं कष्टकर्‍यांना जेवण करुन वाढणार्‍या स्त्रीचं चित्र किंवा व्हॅन गॉघचं दरिद्री खाणकामगारांचं, बटाटे खाऊन भूक भागवू पहाणार कुटुंब, त्या काळापेक्षा नंतरच लोकांनी नावाजलं, आणि तेव्हाही चर्चा त्या माणसांपेक्षा चित्रकाराच्या गुणवत्तेबाबतच झाली.


९व्या शतकात गुस्ताव कोर्बेने भव्य आकाराच्या कॅनव्हासवर सामान्य लोकांचं आयुष्य रंगवलं तेव्हाही त्याला या बिनमहत्वाच्या, सामान्य विषयाकरता एव्हढी मोठी जागा आणि आपली कला फ़ुकट घालवल्याबद्दलची टीका सहन करायला लागली.
अमेरिकेत ग्रेट डिप्रेशनच्या काळात सोशल रिऍलिझम या आर्ट मूव्हमेन्टने जोर धरला. भारतामधे मात्र सामाजिक सत्यता चित्रांमधून यायला त्यानंतर निदान दोन दशकं वाट बघायला लागली. भारतीय चित्रकलेवर रविवर्माचा, आर्टस्कूल्समधल्या ऍकेडेमिक शैलीचा प्रभाव तीव्र होता, प्रोग्रेसिव्ह आर्टची चळवळ अधिक काळ रुजली असती तर कदाचित हा पाया त्यांच्याकडून भक्कमपणाने घातला गेलाही असता.
५०च्या उत्तरार्धात सामाजिक मूल्यांमधे मुलभूत बदल होऊ लागले. औद्योगिकीकरण, राजकीय अस्थिरतेच्या काळात हे बदल अधोरेखीत करणारी, नव्या पिढी समोरील प्रश्नांना उच्चारणारी समकालीन चित्रभाषा आधुनिक भारतीय चित्रकलेच्या मुख्य प्रवाहात रुळवण्याचे महत्वाचे काम केले सुधीर पटवर्धन, गीव्ह पटेल, नलिनी मलानी, विवान सुंदरम यांनी. सामाजिक समस्यांना त्यांनी वैयक्तिक आपलेपणातून न्याहाळले. त्यांच्या चित्रांमधून शहर दिसलं. शहरी ताणतणाव, कुटुंब-समाजाची घुसमट दिसली. भाऊ पाध्ये, किरण नगरकर, अरुण कोलटकर, नारायण सूर्वे, नामदेव ढसाळ अशा समकालिनांच्या साहित्यातून जशी खरी मुंबई दिसली तशी ती यांच्या चित्रांमधूनही दिसली.
सामान्य माणसाला सातत्याने आपल्या कॅनव्हासवर स्थान देणार्‍या चित्रकार सुधीर पटवर्धनांची कामगिरी या सर्वामधे मुलभूत आणि महत्वाची. त्यांची शैली थेट. चित्रभाषा सहज, सोपी पण अंतर्मुख करणारी. त्यांच्या चित्रातल्या माणसांच्या कहाण्या खर्‍या, आजच्या.
ही माणसं दीर्घकाळ लक्षात रहातात, त्यांच्या जगण्याबद्दल विचार करायला भाग पाडतात. कधी ती माणसं रस्त्यावरच्या अपघाताला अलिप्तपणे न्याहाळणारी, कधी उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव बचावू पहाणारी, कधी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कष्ट करणारी, कधी लोकलच्या प्रवासातली. समाजातली माणसे आणि समाजाचाच एक भाग असलेल्या कुटुंबातलीही.
सुधीर पटवर्धनांचं मला सर्वात अस्वस्थ करुन टाकणारं चित्र फुल सर्कल’.
मध्यमवर्गीय कुटुंब रहात असलेल्या घरातली एक खोली. समोर खुर्चीवर हातात मोबाईल घेऊन बसलेली एक व्यक्ती, बाजूला एक स्त्री वाकून केर काढते आहे. बिछान्यावर वृद्ध आजारी गृहस्थ. पलीकडे एक तरुण. पाठमोरी तरुण स्त्री. एक लहान मुलगा खेळण्यातल्या गाड्यांशी खेळतो आहे.
हे सारेजण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत हे निश्चित. बिछान्यावरची आजारी व्यक्ती एकेकाळची घरातली कर्ती असावी, भोवताली त्यांचा भाऊ, मुलगा, सून, नातवंड. आजारपणाचं सावट घरातल्या प्रत्येकाच्या दैनंदिन व्यवहारावर अपरिहार्यतेनं पडलेलं स्पष्टपणाने दिसतं. खुर्चीतल्या गृहस्थांच्या चेहर्‍यावर थकवा, डोळे मिटलेले. डुलकी किंवा विचारांमुळे. हातातल्या मोबाईलवर आजारी व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल नुकतीच काही चर्चा झाली असावी. कुणाच्या तरी चौकशीला उत्तर दिलं गेलं असेल.. अजून काहीच फरक नाही, जैसे थे. एक ओशाळवाणेपणा चेहर्‍यावरच्या थकव्यात मिसळलेला. मागचा तरुण निश्चित असा कुठे पाहत नाही. त्याचे खांदे झुकलेले, चेहरा ओढलेला आहे. तोही कसल्या तरी विचारात मग्न. पाठमोर्‍या स्त्रीच्या देहबोलीतून त्रयस्थता, अलिप्तता व्यक्त झाली आहे. तिच्या पाठीतून कठोरपणाचा भाव जाणवतो.
ही सहा माणसं एका खोलीत असली तरी सुटी सुटी आहेत. कुणीही एकमेकांशी, किंवा काहीच बोलत नाहीयेत. प्रत्येकजण स्वतःतच मग्न. कसलं तरी दडपण त्यांच्यावर आहे. सर्वच व्यक्तींचे चेहरे झाकोळलेले आहेत. लांब मुदतीच्या आजारपणाचं, येऊ घातलेल्या मरणाचं सावट सर्वांच्या चेह-यावर पडलेलं दिसतं.
त्या सगळ्यांना एकत्र बांधणारी व्यक्ती डोळे मिटून बिछान्यावर पडलेली आहे. लहान मुलगाही आपलं जग निर्माण करून त्यात मग्न आहे. थोडीफ़ार हालचाल करतात ती केर भरणारी स्त्री आणि हा लहान मुलगा. बाकी काळ साचून राहिलेल्या शेवाळासारखा स्तब्ध. एकेकाळी घरात वाहता असलेला जीवनप्रवाह आता थांबल्यासारखा झाला आहे. काळाच्या एका अनाकलनीय लूपमधे अडकल्यासारखी ही माणसं अनंत काळ अशीच बसून असल्यासारखी.
ही खोली जगण्याच्या चैतन्यानं नव्हे तर मरणाच्या औदासीन्यानं भारलेली आहे.
हे लोक काय विचार करत असतील? लहान घरात, जागेची अडचण असताना खोलीतला मुख्य पलंग वृद्ध, बिनकामाच्या व्यक्तीकडून असा दीर्घकाळाकरता अडवला गेल्यावर घरातल्यांच्या, मग ते जवळचे नातेवाईक का असेना, मनात जे काही कटू विचार उमटून जातील ते सारे या चित्रात स्पष्ट वाचता येतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातलं आजारपणाचं वातावरण कधी एकदाचं संपेल याची वाट पाहते आहे. प्रतीक्षेमुळे सहनशक्तीचा अंत होतो, मुखवटे गळून पडतात . मृत्यू किंवा आजार बरा होऊन, कसंही. पण वातावरण पूर्वपदावर यावं अशी प्रत्येकाच्या मनात तरळती इच्छा. दुस-याच्या जगण्या-मरण्याच्या विचारानं या चित्रातली स्थिती भारलेली आहे. जवळच्या व्यक्तीच्या मरणाची इच्छा परिस्थितीला शरण जाऊन का होईना, मनाच्या खोल तळातून पृष्ठभागावर येते त्या वेळी काय स्थिती होत असेल?
हे चित्र पाहत असताना आपण अस्वस्थ होतो. कारण हे चित्र आपल्याच मनाचा तळ ढवळत असतं.
कलेने अंतर्मुखही करायला हवे. कलेचे ते कर्तव्य आहे.
=====================

Tuesday, March 20, 2012

सूर्य, कमळे आणि संध्यामठ

यातला सूर्य 'इम्प्रेशनिझम' चा.

मी तो पहिल्यांदा पाहीला होता तेव्हा मला ते माहीत नव्हतं. पण तो अगदी गुलझारच्या शाम के पेडपर टंगा हुवा सूरज फ़लकसे पक कर गिरनेहीवाला..दिसत होता. त्यामुळे लक्षात राहीला.





पेंटींग क्लॉद मोने या विख्यात फ़्रेन्च इम्प्रेशनिस्ट चित्रकाराचं होतं. मोने माहीत होता त्याने काढलेल्या तलावातल्या कमळांच्या चित्रांमुळे. शाळेत असताना माझ्याकडे फ़िनलंडच्या पेनफ़्रेन्डने पाठवलेली वही होती. तिच्या कव्हरवर लंबगोल तळ्यात निळी हिरवी एकातएक गुंतलेल्या वर्तुळांसारखी, भोवती पानांची दाटी असलेली, नजर खिळवून ठेवणारी कमळफ़ुलं आणि त्यावर मधूनच पडलेले मऊ उन्हाचे कवडसे.. भोवतालच्या धूक्याच्या झिरझिरीत पडद्यातून पाण्याच्या आतपर्यंत पोचणारे. तो तलाव नुसता मोहक नव्हता, जिवंतपणे स्पंदन पावणारा होता. पाणी आणि त्यावरची कमळं थरथरताहेत असं काहीतरी




वाटायचं. आणि कितीही वेळा पहा, दिवसाच्या प्रत्येक वेळी ती कमळं वेगळी दिसायची. वहीच्या आत दर काही पानांनंतर पुन्हा कमळं, पण ती सुद्धा वेगळी, तलाव तोच. पण छाया प्रकाशाचा खेळ, रंगांचे विभ्रम वेगळेच.




१९२० साली मोने आपल्या गिव्हर्नीतल्या घरात रहायला गेल्यावर त्याने बागेतल्या तलावात फ़ुललेल्या वॉटरलिलीजची ही असंख्य ऑइल पेंटींग्ज रंगवलेली आहेत, असंख्य म्हणजे किती, तर तब्बल दोनशे. गिव्हर्नीच्या घरात रहायला आल्यावर मोनेची दृष्टी डोळ्यांच्या काही विकारामुळे मंदावत होती. तरीही दिवसाच्या प्रत्येक प्रहरात वेगळं दिसणारं तलावाचं रुप कॅनव्हासवर उतरवण्याचा त्याचा ध्यास आणि मंदावलेल्या दृष्टीतूनही त्याच्या हातून उतरलेल्या या उत्कृष्ट कलाकृती थक्क करुन सोडता.

ती नैसर्गिक उजेडातल्या निळ्या-हिरव्या रंगछटांच्या जिवंतपणाची कमाल, हलक्या रंगांच्या फटका-यांमुळे एकातएक मिसळल्यासारखी दिसणारी पानांची वर्तुळ, कमळांच्या कडा..आणि पाण्याचे तरंग, ही मोने ज्याचा मास्टर होता त्या इम्प्रेशनिस्ट शैलीची कमाल होती हे नंतर कळलं, जेव्हा मी त्याच्या त्या पिकल्या फळाप्रमाणे दिसणारा लाल-केशरी सूर्य पाहीला.
क्लॉद मोनेनी १८७४ साली आपल्या समविचारी, म्हणजे स्टुडिओबाहेर पडून नैसर्गिक सूर्यप्रकाशात बदलत्या छायाउजेडाच्या विभ्रमांमधे प्रत्यक्ष जीवनातले क्षण कॅनव्हासवर बंदिस्त करण्याच्या वेडाने झपाटलेल्या एडगर देगा, सिस्ले आणि ऑगस्त रेन्वा या तीन मित्रांसमवेत भरवलेल्या प्रदर्शनातले
"इम्प्रेशन: सनराईज" या नावाचे हे चित्र. समीक्षकांनी उपहासाने प्रदर्शनातल्या सगळ्याच चित्रांना आणि चित्रकारांना "इम्प्रेशनिस्ट" असे संबोधन दिले, आणि मग पुढील काळातल्या आधुनिक चित्रकारितेचा पाया रोवणारी महत्वाची "इम्प्रेशनिस्ट मूव्हमेन्ट उदयाला आली. मोनेनी या खास शैलीत रंगवलेली कुरणं, नद्यांवरचे पूल, चर्चेस, इमारती, पॉप्लरची शेतं सगळीच आकर्षक.
मोनेनी रंगवलेली गिव्हर्नीची कमळं बहुतेकांनी कुठे ना कुठे पाहीलेली असतातच. जगप्रसिद्ध म्युझियम्समधे ती व्यवस्थित ठेवलेली आहेत, फ़्रान्समधे तर मोनेच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ खाल म्युझियमधे लंबगोलाकृती दालने बांधली आणि त्यात मोनेच्या कमळांची म्यूरल्स जतन करुन ठेवली. सोथेबी, ख्रिस्टीजसारख्या ऑक्शन्समधे कित्येक मिलियन पौंडांना वॉटरलिलिजच्या बोली लागत असतात. कमर्शियली त्याच्या असंख्य प्रिन्ट्स, प्रतिकृती विविध माध्यमांमधून लोकांसमोर गेली कित्येक वर्षं येत असतात. मोनेची कमळं ही लोकांकडून सर्वात जास्त ओळखल्या जाणा-या चित्रांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत ते साहजिकच.
निसर्गाची नुसतीच नक्कल करणारे हजारो मिळतात, पण बाह्य निसर्गातली प्रत्येक वस्तू नैसर्गिक उजेडात कधी उजळून कधी मंदावून जात असते, प्रकशाच्या तीव्र-मध्यमतेनुसार वस्तूंमधले रंग स्पंदन पावत असतात हे ओळखून मग त्यांची आपल्या मनात उमटलेली रुपं अभिव्यक्त करणारे चित्रकार मोजकेच आणि म्हणूनच कायमचे लक्षात रहाणारे.
आणि अगदी अलीकडे आबालाल रेहमान (१८५६/६० ते १९३१) यांनी रंगवलेलं संध्यामठ चित्र पहायला मिळालं

. आबालाल रेहमान हे कोल्हापूरचे आद्य चित्रकार. जे जे स्कूल ऑफ़ आर्ट मधे शिक्षण घेतलेले कोल्हापूरचे ते पहिले चित्रकार. त्यांच्याबद्दल खूप कुतूहल मनात होतं. पण त्यांची छापलेली चित्रही अस्पष्ट, लहान आकारांतली त्यामुळे कधी नीट पाहिलीही गेली नव्हती.
संध्यामठ या त्यांच्या चित्रात तसाच पाण्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचा तरल खेळ, वाहत्या वार्‍याचा आभास, रंगांचा तजेला, मन मोहून टाकणारं निर्दोष तंत्रकौशल्य.. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर नव्याने दिसणारा रंगांचा, प्रकाशाचा खेळ. मन थक्क झालं. जगाच्या दोन टोकांवर साधारण (कारण चित्र नक्की कोणत्या साली काढलं त्याची तारीख उपलब्ध नाही) एकाच सुमारास एकच चित्रभाषा वापरली जावी हे खरंच थोर, आणि इतकंच नव्हे तर आबालाल रेहमानांनीही संध्यामठाचं हे एकच नाही तर दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे, बदलत्या सूर्यप्रकाशात या वास्तूचं बदलतं रुप चित्रित केलेलं होतं, इतकंच नाही तर त्यांनी कोल्हापूर जवळच्या कोटीतीर्थ या ठिकाणी जाऊन तिथल्या निसर्गरम्य एकांतात तिथल्या तलावात पसरलेल्या कमलपुष्पांचा आणि पाण्याचा मनोहारी गालिचाही अशाच त-हेने दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे चित्रित केला होता असंही समजलं. नुसतंच समजलं. कारण मोनेची जशी २००/२५० वॉटरलिलीज चित्रांची सिरिज जतन करुन म्युझियम्समधे जपून ठेवल्या आहेत तशा प्रकारचं सुदैव आबालाल रेहमानांचं नाही. म्हणतात की आबालाल रेहमानांनीही एकुण सुमारे पंधरा ते वीस हजार चित्रे काढली होती, पण त्यांच्या चित्रांचा संग्रह कुठेही एकत्रितपणे नाही, देशाच्या कोणत्याही महत्वाच्या म्युझियममधे त्यांची चित्रं सामान्य लोकांना बघायला मिळत नाहीत. इतक्या प्रचंड संख्येने काढलेली त्यांची बरीचशी चित्रं काळाच्या ओघात नष्ट झाली, खराब झाली.
आबालाल रेहमानांबद्दल वाचायचा, माहिती मिळवायचा प्रयत्न केला तेव्हा जे वाचलं त्यातले किस्से कोणते आणि ख-या कहाण्या कोणत्या कळणार नाही इतकं सगळं मोघम लिहिलेलं. बाबुराव सडवेलकरांनी त्यांच्या महाराष्ट्रातले कलावंत या पुस्तकात आबालाल रेहमान यांच्यावर लिहिलेला उत्कृष्ट लेख मात्र अपवाद. त्यात त्यांनी आबालाल रेहमानांकडे झालेल्या दुर्लक्षाची, आपल्याकडे कलाकारांच्या कलावस्तूंची नीट जतन न करण्याच्या मनोवृत्तीची, नसललेल्या कलासंस्कृतीबाबतची खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात-" आमच्या पिढीला आबालाल मास्तरांच्या कलागुणांचा साक्षात्कार कुणीही घडवला नाही. त्यांच्याबद्दलच्या अद्भूतरम्य गोष्टी ऐकल्या पण ते चित्रकार म्हणून क श्रेष्ठ, त्यांच्या चित्रात नेमके कोणते गुण, तंत्रदृष्ट्या त्यातून काय शिकण्यासारखं याचा कोणी विचारच केला नाही. आजही तो कुणी करत नाही. त्यांच्या चित्रांचा संग्रहही कुठे उपलब्ध नाही, त्यामुळे अभ्यासाची इच्छा असणा-यांनाही ती संधी मिळत नाही. आजच्या पिढीला मोने, मॅने, पिसारो माहीत असतात पण आबालाल नाहीत."
चित्रकाराची चित्रभाषा कितीही समर्थ, भावनांना हात घालणारी, अद्वितीय असली तरी जर ती लोकांपर्यंत पोचलीच नाही तर ते दुर्दैव त्या चित्रकाराच्या कलेचे तर आहेच पण त्याहून जास्त चित्ररसिकांचे. कलाकाराच्या आयुष्यातल्या दंतकहाण्याच जास्त प्रसृत झाल्या तर कलाकाराची चित्रभाषा, कलाकृती लोकांपर्यंत पोचत नाही, पोचली तरी त्याचे महत्व त्यांना उमगत नाही.
मोने म्हणाला होता," समुद्राचं खरं सौंदर्य दाखवायचं तर त्याची प्रत्येक लाट रोज, प्रत्येक प्रहरात त्याच जागी जाऊन रंगवायला हवी, तास न तास निरखत रहायला हवी." मोनेच्या जगप्रसिद्ध झालेल्या चित्रांच्या शैलीचं मर्म, त्याचे परिश्रम यातून आपल्याला कळतात, आबालाल रेहमानही कोटीतीर्थाच्या त्यांच्या वास्तव्यात मनन चिंतन करत असताना, संध्यामठाची चित्रं रंगवत असंच काही नक्की म्हणाले असतील. पण आपल्यापर्यंत ते पोचणार नाही. त्यांनी कोटीतीर्थाच्या वास्तव्यात सविस्तर डायरीही लिहिली होती असं म्हणतात, त्यातून त्यांच्या शैलीचं मर्म, परिश्रम पोचू शकले असते कदाचित, पण त्यांच्या असंख्य चित्रांप्रमाणे ती सुद्धा गहाळ आहे. तेव्हा आबालाल रेहमानांची चित्रभाषा या अर्थानी कायम अबोधच रहाणार.
==============================================================================