Saturday, August 19, 2006

Land of thunder dragons : Bhutan


थिम्फूच्या त्या आयताकृती, दगडी फरसबंदी घातलेल्या, रस्त्याच्या एका अंगाला बर्‍याच खालच्या पातळीवर असणार्‍या चौकात एका थंडगार, काळ्या, दगडी बाकावर मावळत्या संध्याकाळी भुतानचं ते आत्तापर्यंत फक्त national geographicच्या अंकांमध्ये किंवा discovery chanel वर पाहिलेले गूढ, अध्यात्मिक आणि अलौकिक सौंदर्य आम्हाला वेढून टाकत होते. दगडी चौकाच्या मागच्या अंगाला लागून असलेली छोटी दुकाने कागदी आकाशदिव्यांच्या सौम्य प्रकाशात आणि विशिष्ट वासाच्या उदबत्त्यांच्या आणि धुपाच्या वलयांमधे गुरफटून शांत उभी होती. लाल, सोनेरी नक्षीकाम केलेले कापडी फलक, ज्यांवर खर्‍या सोन्याने त्या गुढ भुतानी लिपीमधे काही प्रार्थना चितारलेल्या असतात, अगम्य चेहर्‍याचे मुखवटे रंगवलेले असतात ते आणि आपल्या मनातल्या इच्छा मृतात्म्यांपर्यंत पोचवण्यासाठी वार्‍यावर लहरत लावलेल्या त्या फिक्या आकाशी, गुलाबी रंगांच्या कापडी त्रिकोणी पताका, पितळी नक्षीकाम केलेली अजस्त्र लंबगोलाकार प्रार्थना चक्रे चौकाच्या मधोमध होती. लाल, तपकिरी किंवा निळ्या जांभळ्या चौकटींची पारंपरिक वस्त्रे परिधान केलेली भुतानी माणसे मधुनच ती चक्रे तोंडाने काहीतरी पुटपुटत हलक्या हाताने फिरवून जायची. चौकातली गुढ शांतता तेव्हा जास्तचं गडद व्ह्यायची. वरच्या अंगाला वाहता रस्ता होता पण त्यांवरची वर्दळ, पारंपरिक वस्त्रेच परिधान केलेल्या भुतानी तरुण तरुणींचे घोळके ह्यांचा कोणताच आवाज खाली झिरपत नव्हता.

रस्त्याच्या किनारीला लागूनच बर्च, फर वृक्षांच्या रांगा थेट हिमालयाच्या अजस्त्र उतारांपर्यंत जाऊन भिडल्याचे इथून फक्त भास होत होते कारण मधोमध संध्याकाळच्या अंधारात मिसळून गेलेले धुके वातावरण अस्पष्ट आणि धूसर बनवत होते.

जायगाव ह्या भारताच्या हद्दीतील शेवटच्या गावापासून भुतानच्या ह्या राजधानीच्या शहरात येण्यासाठी आज पहाटेच बसने सुरु केलेला, सलग ७ ते ८ तासांचा प्रवास फारसा काही सुखावह झालेला नव्हता. भीषण पर्वतराजींना उभं कापत आमची बस जेव्हा वरवर जात होती तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त लाल मातीचा धुरळा, दगडमातीचे ढीग, क्रेन, गर्डर्सचा आवाज, डीझेलचा वास आणि हातात कुदळ, फावडी घेतलेले नेपाळी तोंडावळ्याचे मजूर, त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले भारतीय सैन्याच्या अखत्यारीतले जवान, त्यांच्या गाड्या हेच दृष्य सतत दिसत होते. भुतान सरकारचे रस्ते बांधणीचे काम भारतीय सरकारच्या मदतीने जोरात सुरु होते बहुधा पण त्याचा आम्हाला त्रासच झाला. बस अगदी हळू वेगाने तरीही गचके खात चालली होती, वाटेत थांबून कुठे पाय मोकळे करण्याइतकी किंवा चहा पिण्याचीही सोय नव्हती. दूर नजर लावली तर रस्त्याला लागून असणार्‍या, थेट पाताळापर्यंत जाऊन भिडल्या आहेत अस वाटणार्‍या खोल दर्‍या एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला आकाशात टोकं घुसवलेल्या पर्वतरांगांचे कातीव कडे. ह्या सार्‍याच प्रवासाने आम्हाला भुतानच्या आत्ता नजरेसमोर दिसणार्‍या गुढ, शांतगंभीर सौंदर्याला सामोरे जाण्याची काहीच मानसिक तयारी करुन घेतलेली नव्हती. अचानक सामोरे आलेल्या भुतानने आत्ता आम्हाला ज्याप्रकारे चकीत करुन सोडले होते, काहीशी तशीच स्थिती ऐंशीच्या दशकात जेव्हा भुतानच्या देवभुमीवर पाय ठेवायची संधी बाहेरच्या जगातील लोकांना मिळाली तेव्हा तेही भारावून गेले. इथले सौंदर्य खर्‍या अर्थाने अनाघ्रात होते. १७व्या शतकात इथे आलेला बौद्ध धर्म खोलवर इथल्या मातीत रुजलेला होता. प्राचीन परंपरा, रितीरिवाजांचे पालन इथले लोकं श्रद्धेने करत होते. भुतानमधे राजघराण्याची सत्ता अजून सक्रीय आहे. इथे अजुनही वैयक्तिक प्रवासाला परवानगी नाही. इथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर भुतानी सरकारचे कडक नियंत्रण असते. भुतानचा ठराविक भागच लोकांना पहाता येतो. सारे जग पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आकर्षक क्लुप्त्यांचा वापर करण्यात मग्न झालेले असताना अजूनही भुतान सरकारचे पर्यटकांच्या संख्येवरचे हे नियंत्रण चकीत करुन सोडते. पण फक्त ह्याच बाबीत भुतानचे वेगळेपण नाही. ते अनेक गोष्टींत दिसून येते. तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या वापरावर अथवा त्याच्या विक्रीवर कायदेशीर मनाई आणणारे जगातले हे एकमेव राष्ट्र. पर्वतशिखरांवर चढायला मनाई असणारेही हे एकच राष्ट्र. अर्थात ह्या सार्‍या मनाईमागे इथल्या विलक्षण देखण्या आणि आगळ्या निसर्गाचे संरक्षण हा एकमेव हेतू आहे. त्याला धर्माचे अधिष्ठान दिलेले आहे. इथला निसर्ग हा त्यांच्या दृष्टीने केवळ बर्फाची शिखरे, रंगित फुले पाने, झाडे, प्राणी नाही, तर देव आणि पवित्र आत्मे ज्यांत वास करतात ते ठिकाण असते. त्यामुळे त्यांच्या शांतीला कोणत्याही प्रकारे धक्का बसू न देणे ह्याला भुतानी लोकं श्वास घेण्याइतके महत्व देतात आणि जपतात.

भुतानमधे फिरताना इथल्या निसर्गसौंदर्यातला अपार्थिवपणा, इथल्या वातावरणातला दैवी भारलेपणा म्हणूनच जाणवत रहातो. निसर्गातल्या त्या अज्ञात शक्तीपुढे आपण आपल्याही नकळत नतमस्तक होत जातो.

इतकी वर्षे फक्त म्हणूनच तत्वज्ञ, चिंतक, यात्रेकरुंचाच स्पर्श झालेल हे ठिकाण. मन:शांती, एकांत, गूढ अध्यात्मिक अनुभवाच्या शोधात असलेल्यांना कायम खुणावत राहिलेलं. पण सहज प्रवेश मिळू न शकणार हे स्थान. आजही इथे येणारे एकतर इथल्या सरकारचे पाहुणे म्हणून नाहीतर राजघराण्याचे आमंत्रीत म्हणूनच इथे येऊ शकतात. भारतीय प्रवाशांना व्हिसा लागत नसला तरी लेखी कायदेशीर परवाना आणि समुहातच प्रवास करण्याची अट पाळावी लागते.
थिम्फू मधे खरेदी करण्याचा अनुभव मात्र केवळ अजब होता. कुठल्याही पौर्वात्य देशात पर्यटकांसाठीच असलेल्या खास दुकानांमधे असतात ते सगळे exotic आणि अर्थातच प्रचंड महाग आणि खरेदी केल्या केल्या आपल्या निरुपयोगीपणाची खात्री पटवणारे त्यांमधे खच्चून भरलेले होतेच. पण खास भुतानचे वैशिष्ट्य असे रेशमी भरतकाम केलेली हातमागाचे स्कार्फ्स, स्टोल्स, कुर्ते, किंवा त्यांच्या त्या लाल, निळ्या, सोनेरी कॉम्बिनेशनमधे हाताने विशिष्ट धार्मिक पुराणांतील चेहरे, प्राणी, dragonच्या आकृत्या काढलेले कापडी फलक, नाहीतर एकातएक घट्ट बसणारे दोन अर्धगोल. जे बंद करुन हलवले की त्यांतून छान मंजुळ नाद यायचा अशा काही वस्तु खरेदी करायला आपण त्या दुकानांमधे पाऊल ठेवले की ग्राहकांबाबतच्या उदासिनतेची एक मोठीशी लाटच आपल्या अंगावर चालून यायची. विक्रेती (९९ % स्त्रियाच) जागची ढीम्म हलायचीही नाही. भाषेचा अडसर असायचा पण चेहर्‍यावर आमच्याकडे तुम्ही खरेदी करायला आला आहात ह्याचा उत्साह कणभरही नाही. उलट नाही घेतलेत काही तर बरेच असाच भाव वागणुकीत. डॉलरच्या मोहात असल्याने भारतीय ग्राहकांकडे दुर्लक्ष करतात म्हणावे तर परदेशीही बरेचदा दरवाजांतूनच वस्तूंची चौकशी करुन पुढे जाताना दिसायचे. भुतानच्या एका प्रसिद्धी पत्रकात लिहिले होते की आम्ही GNP कडे नाही तर GNH वाढवण्याकडे लक्ष देतो. Gross National Happiness. ह्या स्वमग्न, निरिच्छ मुद्रेने जागेवर बसून दुकानातून परस्पर बाहेर निघून जाणार्‍या गिर्‍हाईकांकडे बघूनही काही हालचाल न करणार्‍या विक्रेत्या स्त्रियांकडे पाहून त्यांचा happiness Index बहुधा असाच भरभर वर चढत असणार. बुद्ध धर्म इथे इतका खोलवर झिरपला आहे की भुतानी स्त्री पुरुषांच्या चेहर्‍यावरही बुद्धाचेच ते निरिच्छ, मंद स्मीत सतत विलसतच असते हे मात्र खरे.


भुतान ह्या शब्दाचा संस्कृतमधे अर्थ भू-उत्तन अर्थात वरची जमीन. अजून एक अर्थ म्हणजे तिबेटचा शेवट किंवा दक्षिण तिबेट. भुतानी भाषेत मात्र भुतान ला ड्रक-यूल म्हणजेच land of thunder dragons म्हणतात. जेमतेम साडेपाच लाख लोकंसंख्येच्या भुतान मधे पन्नास हजारावर लोकंसंख्या एकट्या थिम्फू ह्या राजधानीच्या शहरातच सामावली आहे. थिम्फू शहर आम्ही बहुतेककरुन पायी चालतच पाहीलं. झाडांच्या रांगांनी सजलेले रस्ते, दोनमजल्यांपेक्षा जास्त उंची कोणत्याच घराची अथवा हॉटेलची नव्हती. सर्व इमारतींच्या खिडक्या आणि दारांच्या लाकडी चौकटी वैशिष्ट्यपुर्ण लाल, निळ्या, पिवळ्या नक्षीने नटलेल्या. रस्त्यांवर कुठेही वाहतुकीचे सिग्नल असलेले खांब नाहीत. आणि प्लास्टिक, थुंकणे ह्याची कुठेही नामोनिशाणीही नसलेले सुंदर रस्ते आणि मोकळी मैदाने. थिम्फूच्या मुख्य रस्त्यावरच 15th Park avenue चित्रपटाच शूटींग झालेल आमच्या हॉटेल मालकाने कौतुकाने सांगितल. नव्या आलेल्या हिंदी पिक्चर्सच्या स्टोर्‍या त्याला सविस्तर माहीत होत्या आणि शाहरुख खानचे कौतुक करताना तो थकत नव्हता. लाल मिर्च्या, चीज, बटाटा, सुक्या भाज्या ह्यांचा सढळ वापर असलेले भुतानी जेवण आम्ही आवडीने खात होतो ह्याचही त्याला अगदी कौतुक वाटलं होत.

थिम्फू नंतर बघण्यासारख भुतानमधल दुसर शहर म्हणजे पारो. रस्त्यावरुन जाताना इथला दरीच्या पोटात असलेला चिमुकला एअरपोर्ट आणि त्यावरुन धावत वर आकाशात झेपावणारे ड्रक-एअर ह्या भुतानी हवाईकंपनीचे वरुन छोट्या खेळण्यासारखे दिसणारे विमान हे एक प्रेक्षणीय दृश्य होते. भुतानचे राजे जिग्मे सु वांगचू ह्यांचा राजवाडा अगदी लांब अंतरावरुनच फक्त बघता येतो. त्यानंतर एक म्युझियम, काही बुद्ध मोनास्ट्रीज. बास. टिपिकल पर्यटकांना पाहाण्या सारख्या भुतानमधे इतक्याच गोष्टी. पण गंमत म्हणजे ह्या पाहिलेल्या गोष्टी आपल्या लक्षातही रहात नाहीत. लक्षात रहातो तो फक्त इथला विलक्षण निसर्ग. पुन्हा पुन्हा आपली नजर जात रहाते ती हिमालयाच्या दमदार उतारांवर, त्यावरच्या दगडांवर फ़ुललेल्या जंगली जास्मिनवर. नाजुक लाल जांभळ्या जंगली गुलाबांच्या झुबक्यांवर, गडद रंगांची उधळण झालेली इथली फुले पापणी मिटू देत नाहीत पहाताना. लार्कस्पर्स, एस्टर्स, डेन्डेलिऑन्स, जिरानियम्स, जेन्शिअन्स, असंख्य प्रकारच्या लिली, र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि कहीशी बुटकी ज्युनिपर्सची, अतीभव्य देवदाराची झाडे, त्यावर झेपावलेल्या शुभ्र magnoliya, प्रदुषणमुक्त हवेची ग्वाही देणार्‍या लायकेन्स आणि हिरव्या शैवालाचे पांघरुण घेतलेली ओकची झाडे हे सारेच भुतानला 'ढगांमधले जंगल' असे का म्हणतात ते संगत रहातात. इथले पर्वत, नद्या, तलाव, झरे, खडक सारेच गुढरम्य आणि अलौकिक वाटते. इथली लोकं समजतात त्यात पवित्र आत्मे रहातात. त्यांना त्रास दिला तर इथे रोगराई फैलावेल, संकट ओढवतील. आपण निदान तिथे असेपर्यंततरी सहज त्यांच्या ह्या समजुतीवर विश्वास ठेवतो. आणि कदाचित म्हणूनच सार्‍या जगातून नामशेष झालेला काळ्या मानेचा हंस पक्षी फक्त इथेच, ह्या देवभुमीत सुरक्षितता वाटल्यामुळेच असेल कदाचित पण इथे मोठ्या संख्येने आढळून येतो. ह्या हंसराजांचे भुतान मधले वसतीस्थान फोबिजिका ज्याचा अर्थ जादूचे घर असा होतो तिथे आहे आणि जेव्हा हे पक्षी त्यांचे हिवाळ्यातले घर इथे वसवायला येतात तेव्हा इथल्या बुद्धाच्या देवळाला तीनवेळा उडत प्रदक्षिणा घालतात आणि मगच घरटी बांधायला लागतात असं इथले स्थानिक समजतात. जगातल्या ज्या मोजक्या दहा जैविक विविधता त्यांच्या मुळच्या नैसर्गिक अवस्थेत अजुनही जपल्या गेलेल्या जागा आहेत त्यांतले भुतानचे स्थान बरेच वर आहे. पक्ष्यांच्या दुर्मिळ 770 जाती, 50हून अधिक ऑर्किड्स आणी र्‍होडेडेन्ड्रॉन्स, थक्क करुन सोडतील इतक्या औषधी वनस्पती, तेकिन, स्नो लिओपार्ड्स, सोनेरी तोंडाची लंगुर जातीची माकडे, निळ्या मेंढ्या, वाघ, पाणम्हशी, हत्ती, लाल तोंडाचे कोल्हे, एक ना अनेक समृद्धजंगल प्राण्यांच्या संपत्तीने नटलेला हा प्रदेश पहाताना मन थकत नाही, शरीर दमत नाही.

अधिकृतपणे बाहेरच्या जगातली लोकं भुतान मधे येऊन फार नाही जेमतेम 26/27 वर्षेच लोटली आहेत. इथल्या रस्त्यांवरुन तोपर्यंत फक्त घोड्यावरुन वाहतुक चालयची आणि साठीचे दशक उलटून जाईपर्यंत इथे आधुनिक जगात तोपर्यंत कमालीचे विकसीत झालेले telecommunications चे अस्तित्वही भुतानमधे नव्हते ह्यावर आता विश्वासही बसणार नाही इतक्या झपाट्याने निदान थिम्फू, पारो सारख्या शहरी विभागांमधले भुतानचे जिवन बदलत आहे ह्यात शंका नाही. टेलेफोन्स, इंटरनेटचे बुथ्स जागोजागी दिसतात. टेलेव्हिजनचे आगमन सर्वात उशिरा झालेला जगातला भुतान हा एकमेव देश. केबल टिव्हीचे जाळे पसरुन इथे मोजकीच वर्षे लोटलीत पण ह्या चारपाच वर्षांच्या काळातही भुतानमधले गुन्हेगारीचे आत्तापर्यंत शून्यावर असणारे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. राजघराणे अधिकृअतरीत्या 2008 साली पाय उतार होऊन तिथे संसदेचे आगमन होईल. भुतान झपाट्याने बदलतेय आणि बदलत रहाणारच. आपला निसर्ग, पर्यावरण, चालिरीती, परंपरा ह्यांचे जतन करण्याची इथल्या लोकांची धडपड अजून किती काळ यशस्वीपणे चालू राहू शकेल हे येणारा काळच ठरवेल. पण आजही जेव्हा भुतानी 'किरा' नेसलेली एखादी षोडश वर्षिय तरुणी थिम्फूच्या रस्त्यावरुन चालते तेव्हा तिच्या पायातले जवळच्याच पाश्चिमात्य वस्तूंनी भरलेल्या दुकानातून घेतलेले उंच टाचांचे शूज आपल्याला भावी बदल कुठल्या दिशेने भुतानला अपरीहार्यपणे घेऊन जाणार आहे आणि किती वेगाने ते सांगत रहातात तेव्हा मन चुटपुटते जरुर.
जेमतेम चार वर्षांपूर्वी आलेल्या मोबाईलने आणि इंटरनेटने हा बदल जरा जास्तच झपाट्याने इथल्या नव्या तरुण पिढीच्या आयुष्यात आणलेला आहे हे मात्र खरे. इथल्या The Bhutan Times मधे आलेली ही आकडेवारी हॉटेलच्या लाउंजमधे वाचताना मन जरा उदासले हे खरेच. थिम्फूच्या केवळ पन्नासहजार लोकसंख्येमधे 15,000 इंटरनेट युजर्स आणि 25000 landline users आणि 23000 मोबाईल फोन सबस्क्राइबर्स आहेत. नव्या जमान्याचे नवे पडसाद भुतानमधे जरा जास्तच वेगाने पडघम वाजवत येणार आहेत का?

National Geographic चे जे आर्टिकल मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेले होते त्यात भुतानचे वर्णन " kingdom in the clouds.. scarsly touched by the modern age" असे केलेले होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अगदी दोन वर्षांपूर्वीच एका फिल्म फेस्टीवलमधे Travellers and the magisianहा सिनेमा पाहीला होता. भुतानचे आजपर्यंत कधीच जगासमोर न आलेले अवगुंठीत सौंदर्य ह्या सिनेमाने सर्वात प्रथम लोकांना दाखवले. त्यात कामेही कुठल्या व्यावसायीक नट नट्यांनी नाही तर भुतानी स्थानिक लोकांनीच केली होती. त्या सिनेमातला तो अद्भुत भुतान पाहून मन केवळ थक्क झाले होते. प्रत्यक्ष भुतान फिरुन पहातानाही ही जादू यत्किंचितही उणावलेली कधी जाणवली नाही. तिथून परत येताना सोबत हाताने विणलेल्या रंगित वस्त्रांची, मंजुळ आवाज करणार्‍या लाकडी बाउल्सची सुवेनियर्स जवळच्या सामानात होती खरी, पण खरी सोबत होती ती तिथल्या अनाघ्रात निसर्गाची, दैवी, गूढ, अलैकिक सौंदर्याची आणि अजूनही निष्पापणा जपणार्‍या तिथल्या माणसांची.

Wednesday, June 14, 2006

भुतान पासून नंदुरबार पर्यंत

एप्रिल अखेरीस माझं जे भटकणं सुरु झालं ते जून च्या चार तारखेला शेवटी संपल. ह्या काळात मी सिक्किम, दार्जिलिंग, भुतान असा एक पंधरा दिवसांचा, नंदुरबार चा तीन दिवसांचा आणि पुणे, कोल्हापुर चा सहा दिवसांचा असा प्रवासदौरा केला. भुतान सिक्किम चा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता. ह्या प्रवासाची डायरी मला खरेतर लगेचच इथे टाकायची होती पण आल्या आल्या लगेचच पुणे कोल्हापुर झालं. मग मुलीची शाळा खरेदी, आवराआवरी, प्रवासाचा शीण त्यातच असाईनमेंट्स च्या डेडलाईन्स ह्यात सिक्किम भुतान बरच लांब राहिलं खरं.

नंदुरबार ला ऐन उन्हाळ्यात जाणं म्हणजे स्वत:हून आगीच्या भट्टीत उडी टाकण्यासारखेच. आम्हा मुंबईकरांना ही खानदेशातली रसरसती उन्हाची काहिली सहन होत नाही हेच खरं. अपेक्षेप्रमाणेच तिकडे गेल्यावर उन्हाचा प्रचंड त्रास झाला खरा पण ज्या कारणासाठी रादर जे पहायला आम्ही तिकडे गेलो होतो ते पाहिल्यावर उन्हाचा त्रास विसरायलाच झाला. डॉ. उर्जिता जैन आणि त्यांचे पती डॉ. चेतनकुमार जैन या दोघांनी मिळून नंदुरबार, धुळे दरम्यानच्या रखरखीत उजाड पट्ट्यात नक्षत्रवनाच अक्षरश: नंदनवन फुलवलय. वनौषधींच्या क्षेत्रातल उर्जिता जैनांचं चं कर्तृत्व वादातीतच आहे. आता त्यांनी तिथेच Herbal Science and Techology' च कॉलेज सुरु केलय. ते पहायला जैन दांपत्यानी आग्रहानी निमंत्रीत केलं होत. मी नक्षत्रवना बद्दल बरेच दिवस ऐकून होते. पहायची उत्सुकता तर होतीच. आता कॉलेजच निमित्त होत तर जावच म्हणून अगदी ऐन मे मधे जायच होत तरी पाय मागे घेतला नाही. आणि खरच गेल्याच चीज झाल. तिथला तो दहाहजार sq. ft. इतक्या प्रशस्त जागेतला वनौषधी महाविद्यालयाचा पसारा, अत्याधुनीक प्रयोगशाळा, A.C. क्लास रुम्स, चैतन्य वनातली झाडे, रक्तचंदनाचे ओळीने लावलेले वृक्ष, जैन पतीपत्नींचा पाहुणचार सारचं मन प्रसन्न करणारं होत. नक्षत्रवनातल्या रुद्राक्षाच्या झाडाखाली पडलेला रुद्राक्षाच्या सडा आणि भुर्ज वृक्षा च्या सावलीतला थंडावा ह्या दोन गोष्टी तर मी मला नाही वाटत कधी विसरेन.

भुतान सिक्किम ट्रेक तर अफलातून होता. त्याचं वर्णन असं जाता जाता करणं केवळ अन्यायकारक ठरेल.

दरम्यान वाचन बरच झालय पण विस्कळीतपणे. सलग जे वाचून झालय त्याबद्दल बुकशेल्फ़ मधे टाकतेच एकदोन दिवसांत.

नंदन ने पुस्तकनिष्ठांची मांदियाळी सुरु केलीय ती ज्या कौतुकास्पदरीत्या मराठी ब्लॉगर्स पुढे चालवत नेत आहेत ते पाहून इतका आनंद झाला! कोणं म्हणतं नवी पिढी पुस्तके वाचत नाही म्हणून?? सर्वांचेच वाचन, साहित्याची जाण प्रगल्भ आहे. अभिमान वाटण्यासरखीच आहे. आणि ह्यासाठी पहिले अभिनंदन नंदनचे करायला हवे!!

Sunday, April 16, 2006

वाचत असलेली पुस्तके

माझ्या पुस्तक वाचनात शिस्त नाही. म्हणजे एका वेळी एक पुस्तक वाचून पूर्ण करणे किंवा एका लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपविणे, पुस्तका मधून आपल्याला काय मिळालं, पुस्तकाचा सारांश, टिपणं वगैरे काढून ठेवणं मला कधी जमलच नाही. खरतर अशी ही शिस्त वाचनाला लावून घेणे अत्यंत चांगली व आवश्यक गोष्ट आहे. त्यासंदर्भात काही लेखन करने, परीक्षण करणे, आपल्या इतर लेखांसाठी संदर्भ म्हणून टिपणांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यामुळे शक्य तर होतातच पण वाचन सुरळीत चालू असल्याचा एक फ़ील पण येतो.

मला एकतर एकावेळी अनेक पुस्तके वाचायची खोड. म्हणजे समजा मी दुकानातून, प्रदर्शनातून चार पुस्तके आणली तर मी घरी आल्यावर ती एकामागून एक सगळी वाचायला सुरुवात करते. लायब्ररीची पुस्तके सोबतीला असतातच. वाचन वेळ मिळेल तस कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी चालू असतं त्यामुळे मग त्या त्या वेळी हाताला येईल ते, पर्स मधे असेल ते पुस्तक आधीच्या पानावरुन पुढे वाचायला सुरुवात होते. अपवाद असतोही एखाद्या खूपच मनाची पकड घेणार्‍या पुस्तकाचा. पण तसे पुस्तक अपवादानेच हातात पडते हल्ली. रात्रभर जागून हातातले पुस्तकं संपवल्याशिवाय झोपच न येणे असा प्रसंगच खूप कमी येतो.

मॅजेस्टीकच्या ग्रंथयोजनेची मी सभासद आहे. परवा त्या योजनेची वार्षिक मुदत संपली. मग एकदम एकावेळी खूप पुस्तके विकत घ्यायचा सुवर्णयोग आला. अधाशासारखी पुस्तके विकत घेतलीत. आणि आणल्यापासून ह्या पुस्तकाची दोन पाने, त्याची काही प्रकरणे असं चालू केलय. न वाचलेलं पुस्तकं घरात अवतीभवती असणं मनाला त्रासदायक असतं. चैनच पडत नाही. पण ह्यावेळी मात्र मी मनाशी ठरवलय की जमेल तितकं शिस्तीने पुस्तकं वाचायची. त्यांची जमतील तशी परीक्षणं पण लिहायची. त्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग उघडायचा मनात आहे.

सध्या माझ्या अवतीभवती पसरून असलेली पुस्तकं ही आहेत्:

१ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२ ब्र - कविता महाजन
३ मौनराग -महेश एलकुंचवार
४ स्टुडिओ - सुभाष अवचट
५ जगण्यातील काही - अनिल अवचट
६ फुलवा -डॉ. श्रीश क्षिरसागर
७ सिनेमाचे दिवस - विजय पाडळकर
८ कोबाल्ट ब्लू -सचिन कुंडलकर
९ चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
१० रानातल्या वाटा -मारुती चितमपल्ली
११ केशराचा पाऊस -मारुती चितमपल्ली
१२ भूमी -आशा बगे
१३ राजा रविवर्मा - रणजित देसाई
१४ भूप -मोनिका गजेन्द्रगडकर ( ह्या विद्याधर पुंडलिकांच्या कन्या )

तर मित्रांनो .... शक्य तितक्या लवकर संपवते ही पुस्तके आणि लिहीते त्यावर जमेल तस परीक्षण

Friday, April 14, 2006

नथ - एक असंस्कृत परंपरा


पारंपरिक महाराष्ट्रीयन स्त्रीचे दर्शन नथ ह्या दागिन्याशिवाय पुरेच होवू शकत नाही असे मानले जाते. पेशवाई संस्कृतीचा हा अगदी पिढ्यानपिढ्या घरांमधून जपला गेलेला, सणासमारंभात अभिमानाने मिरवण्याचा दागिना. पण नथ हा दागिना महाराष्ट्रात कसा व कुठून आला ते वाचल तर हा अभिमान शिल्लक राहील का?

नथ हा संपूर्ण अभारतीय असणार्‍या परकी संस्कृतीमधला आणि भारतीयांनी त्याज्य मानावा असा अलंकार. भारतात नाक टोचण्याची परंपरा नाही. रामायण, महाभारत, प्राचीन लेख, वेरुळ अजिंठा येथील चित्रे व शिल्पे यांत कोठेही नाकातील अलंकारांचा निर्देश नाही. ही चाल येथे मुस्लिम धर्मियांनी आणली. त्यांच्या संस्कृतीत स्त्रीची किंमत गुराढोरांएवढीच. उंटाच्या नाकात मध्ये भोक पाडून जी वेसण अडकवली जाते तिला 'बुलाक' असे नाव आहे. तीच बुलाकची संकल्पना दागिन्याच्या रुपात त्यांनी स्त्रीच्या नाकात अडकवली.हळूहळू येथे आलेले मुसलमान राज्यकर्ते झाले. त्यांची साम्राज्ये वाढली आणि येथील हिंदू सरदार सुभेदार त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले. त्यांच्या पोषाखाचे अनुकरण करु लागले. त्या वेळी हा बुलाक दागिना येथील हिंदू स्त्रियांच्या नाकातही प्रवेशला.
आज गुजराती, मारवाडी महिला नाकात मध्यभागी लोंबणारे सोन्याचे कडे व त्याला डाव्या आणि उजव्या बाजूंना अडकवून कानापर्यंत नेलेली सोन्याची साखळी असा जो अलंकार धारण करतात, तो म्हणजे दुसरे काहीही नसून ही सोन्याची किंमतवान वेसणच आहे.
महाराष्ट्रात हा दागिना थोडा उशिराच आला ( बहामनी राजवट ) पण येथेही त्याला तीच प्रतिष्ठा लाभली. त्याला प्राकृत भाषेतील 'नथ' हा शब्द वापरला गेला. नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार रईस लोकांनी या मूळच्या नथीचे रुप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून जे नथीचे नवे स्वरुप तयार केले तेच आता महाराष्ट्रात चालू आहे.
नथ या अलंकाराला कोणतीही भारतीय आणि सन्मान्य परंपरा नही हे सत्य आपणास कधी नाकारता येणार नाही. संस्कृती परंपरा जपण्याच्या नादात आपण कसे कधी कधी चुकीच्या चालीरितींचे जतन करतो इतकेच नव्हे तर पुढल्या पिढ्यांनीही त्या जपाव्यात हा आग्रह अजाणतेपणातून धरतो त्याचे हे रत्नजडीत उदाहरणच म्हणायचे

Wednesday, March 22, 2006

मुंबई युनिव्हर्सिटीच्या आवारात फ़िल्म शूटींग

मुंबई युनिव्हर्सिटीच्या आवारात फ़िल्म शूटींगला परवानगी दिली ही बातमी ऐकून फ़ारसं बरं वाटल नाही. मुंबईमधल्या म्हणजे फ़ोर्ट, चर्चगेट परिसरातल्या काही देखण्या इमारतींमधे युनिव्हर्सिटीच्या इमारतीचा नंबर खूप वरचा. राजाबाई टॉवर वरच्या घड्याळाचे घनगंभीर टोले ऐकत, प्रशस्त, हिरवाईने नटलेल्या युनिवर्सिटीच्या प्रांगणातून फ़ेरफ़टका मारताना मनाला कस शांत वाटतं. क्रॉस मैदान आणि राजाबाई टॉवरच्या मधोमध वाहता रस्ता आहे ह्याची जाणीवही आत आवारात होत नाही. युनिवर्सिटीच्या सर्वच इमारती दगडी, चिरेबंद, थंडगार आणि भव्य. दीक्षांत समारंभ जिथे होतो तो हॉल तर अत्यन्त देखणा. युनिवर्सिटीच्या आवारात कित्येक दुर्मिळ झाडे, वनस्पती उत्तम जोपासल्या आहेत. पत्रकारीतेचे आमचे वर्ग ज्या इमारतीत भरायचे ती अगदी आतली टोकाची इमारत होती. तिथे आत जाताना प्रवेशाशीच केशरी, गोल मंदपणे लकाकणार्‍या दिव्यांप्रमाणे दिसणारी गोल चेंडूसारखी फ़ुले असलेला अतिशय देखणा कदम्ब वृक्ष होता. त्याच्या फ़ांद्या थेट खिडकीतून आत घुसायच्या. दुर्दैवाने गेल्या वर्षीच्या धुआंधार पावसात तो कोसळला. युनिवर्सिटीच्या आवारात कैलासपती, मोह, नीरफ़णस, आसूपालव, सीतेचा अशोक, अर्जून, साग, पुत्रंजीवा, बदाम, उर्वशी असे कितीतरी सुरेख, दुर्मिळ वृक्ष आहेतं. त्यांच्या सावलीखाली असलेल्या दगडी बाकांवर बसून काही लिहायला वाचायला किती छान नीरव शांतता मिळते.
शूटींगला परवानगी दिल्यावर युनिवर्सिटीचे हे शांत पावित्र्य, गंभिरपणा जपला जाईल का? शंका आहे.

Wednesday, March 15, 2006

गृहिणी दीपशिखा

शरू रांगणेकरांनी आपल्या बहारदार आणी खुसखुशीत शैलीत भारतीय व्यवस्थापकांच केलेलं सुरस आणि चमत्कृतीपूर्ण वर्णन ( Ref. In the Wonderland Of Indian Managers ) वाचताना माझ्या डोळ्यांपुढे राहून राहून ज्यांना कौतुकानं (!!) आद्य व्यवस्थापक म्हणून संबोधल जातं, त्या घरोघरीच्या गृहव्यवस्थापिका उर्फ़ सामान्य भाषेत गृहिणी उभ्या राहत होत्या.

स्वत : शरू रांगणेकर तर नेहमीच कधी मिश्किलपणे तर कधी उपरोधिकपणे गृहिणींची उदाहरणं देत आले आहेत. त्यामुळंसुद्धा असेल कदाचित, पण भारतीय व्यवस्थापकांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त आणि मस्त अशा मनोवृत्तीचं त्यांनी केलेलं वर्णन मला गृहिणींसाठीच जास्त चपखल वाटलं.

सगळ्याच भारतीय बायका, मग त्या नोकरी करणार्‍या असोत वा नसोत, स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या असोत वा राजकारणात, कलावंत असोत वा खेळाडू, त्यांना स्वत : ला आपण कशा आधी छानशा गृहिणी आहोत आणि बाकी सगळं नंतर, म्हणजे गृहिणीपण सांभाळून मग, असं दाखवायला भारी आवडतं. दाखवायला शब्द महत्वाचा आहे. कारण खरं ते निभवायला किती कठीण असतं ते समजेपर्यंत आणि त्यांनी ते मान्य करेपर्यंत त्या ना धड गृहिणी राहिल्या असतात, ना इतर काही. पण आदर्श गृहिणीपणाचा देखावा करण्यात त्या मनापासून रमतात.

फ़ारसं काही वेगळ करुन दाखवावं, अशी त्यांची स्वत : कडून किंवा इतरांची त्यांच्याकडून अपेक्षाच नसल्यानं हा देखावा बहुतेक वेळा पुरेसा ठरतो.

मूळ मुद्दा असा की, सुस्त, व्यस्त, त्रस्त, मस्त हे भारतीय व्यवस्थापकांच्या स्वभावाचं चित्रण गृहव्यवस्थापिकांना चपखल का आणि कस बसतं? आपण जरा आजुबाजुला नजर टाकूया का?

सुस्त गृहव्यवस्थापिका

' बघू ' , नंतर, काय घाई आहे?, मला बाई कंटाळा .... ' हे यांचे परवलीचे शब्द. कामाची चालढकल, दिरंगाई करण्यात यांचा हातखंडा. नोकरी करणार्‍या गृहिणींना या विभागात बसवता येणार नाही असं कुणाला वाटत असेल, तर तो मोठाच गैरसमज आहे. सुस्तपणाला कामाच्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तर भरपूर वाव. टेबलावरच्या बराच काळ न हललेल्या फ़ायली, लेडीज रुममध्ये जास्तीत जास्त घालवलेला वेळ, त्यांच्यावर महत्वाची कामं कधीच न सोपवण्याची त्यांच्या बॉसनं घेतलेली खबरदारी त्यांच्या 'सुस्त'पणाच द्योतक असतं. मुलांच्या शाळांची तयारी करताना यांना ऑफ़िसचं हजेरीपत्रक काठायला उशीर होतो म्हणून सहानुभूती दाखवावी, तर त्यांच्या मुलांचीही शाळेची पहिली घंटा कायम चुकलेलीच दिसते. गंमत म्हणजे घरात असताना बहुतेक वेळा त्यांचा सुस्तपणा छुपाच असतो. किंबहुना तो छुपा राखण्याइतकी चतुरता त्यांच्यात उपजतच असते. त्यांच्या मागं कुणी ऑफ़िसमधल्या सहकार्‍यांनी किंवा शेजारणींनी तगादा लावलाच तर उद्या, पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी असे वायदे करताना त्या जराही कचरत नाहीत.

यांचा दुसरा गुण म्हणजे दुसर्‍यांकडून कामं वेळेत करवू घेणं यांना व्यवस्थित जमतं. त्यात त्या जराही सुस्तपणा दाखवत नाहीत. यांचे नवरे आणि मुलं साहजिकच स्वावलंबी असतात. याच कारण त्यांचा सुस्तपणा असं चुकूनही मनात आणू नका. कारण आपण नोकरी करुन घर सांभाळतो आणी घराला कशी योग्य शिस्त लावली आहे, याबद्दल आपली पाठ वरचेवर थोपटून घेण्यात त्या सर्वात पुढे असतात. यांची मोलकरीण शक्यतो दांडीच मारत नाही. कारण जितक्या दिवसांची दांडी, तितक्या दिवसांच साठलेलं कामं हे समीकरण त्यांना महागातच पडतं. छे, छे, पगार कापण्याच चुकीच धोरण त्या कधीच अवलंबत नाहीत. तुम्ही दुर्दैवाने कामसू आहात आणि त्यांची शेजारीण आहात, तुम्ही तुमच्या मोलकरणीला इतकं सारंकाही देता, पण तुमच्या घरी दांडी मारून तुमची मोलकरीण सुस्त शेजारणीचं कामं हळूच संध्याकाळी येऊन करूण टाकते. याचं कारणं तुमचा मूर्ख कामसूपणा. सिंकमधे चमचा सुद्धा राहिलेला चालत नाही तुम्हाला. मग भांड्यांचा ढिगारा न घासता तुम्ही राहूच देणार नाही, हे तुमच्या मोलकरणीला बरोबर माहीत असतं.

गृहिणीच्या भूमिकेत घरात वावरताना या जशा आपल्या घरातल्या पसार्‍याबद्दल संकोच बाळगत नाहीत, तसच ऑफ़िसात टेबलभर पसरलेल्या कागदांचाही बाऊ करत नाहीत. पसारे आवरत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घेणं महत्वाचं, असं त्या ठणकावून सांगतात. पण ऑफ़िसातही उगाच घाईगर्दी करुन चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा वेळ लागला तरी चालेल अस बजावतात.

सुस्त गृहव्यवस्थापिका बहुतेकदा वजनदार असतात, त्यामुळं उगाचच त्या आनंदी असल्याचा आभासही उत्पन्न होतो. ऑफ़िसचा, कामाचा ताण पदतो म्हणून वरचेवर हॉटेलातून पार्सलं मागवावी लागतात, फ़ास्ट फ़ूड खाल्लं जातं, असं त्या अगदी दु : खी चेहर्‍यानं सांगतात, तेव्हा तुमचा लगेचच विश्वास बसतो. स्वयंपाकचा व्याप उगाचच वाढवत बसण्यापेक्षा इतर चार 'क्रिएटिव्ह' कामं करावीत असं त्या वारंवार सांगत असल्या, तरी ती इतर चार कामं कायम गुलदस्त्यातच राहतात.

एकंदरीत काय, तर 'संथ वाहते कृष्णामाई' च्या धर्तीवर त्यांच कार्य चालतं. फ़क्त एक लक्षात ठेवा, कधी काळी एखाद्या बॅंकेत कर्जमंजुरीसाठीचा तुमचा अर्ज या व्यक्तिमत्वाच्या स्त्री अधिकार्‍यांच्या हातात गेला, तर पुढची तीन चार आर्थिक वर्षं तुमचं कर्ज मंजूर व्हायला लागणारं हे नक्की.

व्यस्त गृहव्यस्थापिका

सुस्त गृहिणींच्या अगदी उलटा यांचा स्वभाव. सदैव घाईत. कामत अतिव्यग्र. हातात तीन पिशव्या, शिवाय खांद्यावर एक लटकवलेली, अशा त्या या दुकानातून त्या दुकानात, घरातून शाळेत, शाळेतून बॅंकेत अशा धावत असतात. एका फ़ेरीत अनेक कामे होऊ शकतात, यावर मुळी त्यांचा विश्वासच नसतो. मी आहे म्हणून ... हे त्यांचे पालुपद. भरपूर कामात असल्याचा देखावा करण्यात यांचा हातखंडा. कुणाकडच्या लग्नकर्यात वा समारंभात यांचा 'नारायणी' अवतार पाहून भलेभले भुलतात. ऑफ़िसात कधी या चुकून खुर्चीवर आढळल्याच, तर त्या फ़ोनवर बोलण्यात गुंग असतात. कुठल्या चर्चेकरता किंवा कामाकरता त्यांना अजिबात वेळ नसतो. भरपूर काम आधीच शिल्लक आहे आणि आख्ख्या ऑफ़िसात त्या एकट्याच काम करणार्‍या आहेत, असं त्यांच्या वरिष्ठांना पटवण्यात त्या यशस्वी असल्यानं त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर अधिक काम सोपवायला नेहमीच कचरतात.



त्रस्त गृहव्यवस्थापिका



यांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या कामात या व्यस्त असतात, त्याविषयी त्यांची सतत तक्रार असते. यांची मोलकरीण भांडी कधीच स्वछ घासत नाही, यांच विजेच बील इतरांपेक्षा नेहमीच जास्त येतं, असं त्यांना खात्रीपूर्वक वाटतं. 'माझी घरात कुणाला कदर नाही' असं त्यांच वाक्य वारंवार कानावर पडल्यानं बर्‍याचदा खरोखरच तशी परिस्थिती निर्माण होते. ऑफ़िसात काम यांना करावं लागतं, पण सवलती इतर नटमोगर्‍यांना असं त्या कायम तणतणत राहतात. ऑफ़िसात सहकार्‍यांशी आणि घरी सासूशी, नणंदेशी यांचे कायम खटके उडतात. यांची कटकट ऐकण्यापेक्षा फ़ायली स्वत : च बघणं योग्य असा निर्णय वरिष्ठ स्वत : हूनच घेतात. शिवाय यांचा त्रस्तपणा आजुबाजुला एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा सहजी पसरतो. त्यांच्या सहवासात राहिल्यावर तुमच्याही कपाळावर आठ्यांच जाळं पसरलं, तर नवल नाही.



मस्त गृहव्यवस्थापिका



इथं मस्तं शब्द गुणवत्तादर्शक आहे. या जिथं जातील, तिथलं जग जणू त्या उजळून टाकतात. आदर्शपणाचा आव आणण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. वेळच्या वेळी कामं आटोपून इतर चार छंद जोपसण्याइतका उत्साह त्यांच्यात नेहमीच असतो. ऑफ़िसात सुद्धा तक्रारीला त्या वावच ठेवत नाहीत. हे सगळं त्यांना सहजी जमतं, उपजतच असतं असं जरी आजुबाजूचे समजत असले, तरी त्या मागं त्यांची मेहनत, नियोजन, जीवनाकडं पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याची जाणीव कुणालाच नसते. यांची मुलं गुणी निघतात, यशस्वी होतात, यांना बढती चटकन मिळते, याबद्दल हेवात्मक चर्चा त्यांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त मैत्रीणी नेहमीच करतात. पण शंभरात एखादीच अशी मस्तं हे त्याही मान्य करतातच.
शरु रांगणेकर 'मस्त' व्यक्तिमत्वाच्या व्यवस्थापकाला 'दीपशिखा' म्हणून संबोधतात. दीपशिखेची ही उपमा अशा एखाद्याच गृहव्यवस्थापिकेला देता येईल, जिच्यामुळं सारं घरदार उजळून निघतं.

Wednesday, March 08, 2006

Respect Yourself!!

....... "मी स्त्री असल्यामुळे मला यशस्वी होण्यासाठी जरा जास्तच कष्ट करावे लागतात, कारण जर अयशस्वी झाले तर कुणी असं म्हणणार नाही, ' तिला ते शक्य झालं नाही कारण तेवढी तिची क्षमता नव्हती.' ते म्हणतील,' बाईला हे करता येणं शक्यच नाही. कारण तेवढी तिची क्षमताच नसते.'
.... Clare Boothe Luce
मतदानाचा अधिकार ही नसलेल्या स्त्रियांचा काळ आणि आज राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकारवाणीने निर्णय घेऊन तो कार्यान्वित करणार्‍या स्त्रिया. खुप मोठी वाटचाल स्त्रिया करुन आलेल्या आहेत आणि स्त्री पुरुष मिळून एक समानतेच्या, परस्पर सन्मानतेच्या, आदराच्या पातळीवरील एक निरोगी समाज उभारण्याच्या दिशेने स्त्रियांना पुरुषांच्या सोबतीने अजून एक फ़ार मोठी वाटचाल करायची आहे. थोड थबकून जरा स्मरण करुयात त्या सार्‍याच स्त्री पुरुषांचे ज्यांनी स्त्रियांना आत्मसन्मान शिकवला. स्वाभिमान शिकवला. महात्मा ज्योतिबा फ़ुले, महर्षी धोंडो केशव कर्वे ह्या पितामहांनी कधी स्त्रीमुक्ती वगैरे शब्द वापरले नाहीत पण त्यांनी जे केले त्याचे मोल केवळ अनमोल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशविदेशांमधे ज्या ज्या स्त्रियांनी पुरुषांनी स्त्रियांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला त्या सर्वांबद्दल आज बरच काही लिहून येईल, पण निदान महाराष्ट्रात प्रत्येक स्त्रीने ह्या दोन थोर पुरुषांपुढे आदराने नतमस्तक व्हायलाच हवे. आज आणि नेहमीच.

Tuesday, February 28, 2006

मित्र मैत्रिणींनो .....

हाय!! .... ब्लॉग चे नाव उर्दूमध्ये असले तरी मी मराठीच आहे आणि मराठीतच लिहिणार आहे. खरतर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच ब्लॉग चा शुभारंभ करण्याच मनात होत. थोडा उशिर झाला. पूर्वी इंग्रजीमधून blogging केल्याने ब्लॉगविश्व तस ओळखीच आहे पण मराठीमधून हा ब्लॉग सुरु करण्या आधी थोडा मराठी ब्लॉगविश्वाचा फेरफटका मारला तेव्हा अगदी आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. किती छान नोंदी केल्यात मराठीमधे मुलामुलींनी. साहित्य, वैयक्तिक, प्रवास अनुभव, चालू घडामोडी अशा कितीतरी विषयांवर देशविदेशातील पब्लिक लिहितं आहे. संख्या त्यामानाने फार नाही. पण मला वाटत युनिकोड सुविधा नुकतीच लोकांपर्यंत पोचली आहे. हळूहळू वाढेल मराठी ब्लॉगर्स ची संख्या.

माझी ओळख पण ह्या निमित्ताने करुन देते. मी मुंबईची मराठी पत्रकार. तसं व्यवसायाने मराठी इंग्रजी भाषेत कॉपिरायटींग करते पण पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे आणि आवड असल्याने, आणि मनमोकळ लिहिता याव, बंधन नसाव म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करते. अर्थात Free Lancing . व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे माझ्या आवडीचे लेख विषय. ब्लॉग मध्येही त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करीन. प्रवास आणि संगित हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय. पण खुप कमी वेळ त्यासाठी काढता येतो ही खंत कायम मनात असते. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा पण माझा छंद.

भेटत राहूच. तुम्हा सर्वांची ओळख होऊन ती खुप खुप वाढेल ही खात्री आहे.
इथे नियमीत येण्याइतका सलग वेळ मिळो ही सदिcछा मी माझी मलाच देऊन घेते.