Sunday, February 02, 2014

ज्याचं त्याचं लिटफ़ेस्ट

जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.

गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?


लिटफ़ेस्ट मला नव्या नव्हत्या. अर्थात आजवर उपस्थित राहीलेल्या लिटफ़ेस्ट्स किस झाड की पत्ती वाटाव्या असा इथला प्रचंड पसारा. नोबेल, पुलित्झर, बुकर विनर, आंतरराष्ट्रीय साहित्यिक इथे आमंत्रण मिळावं म्हणून उत्सुक असतात. जगातली सर्वात मोठी विनामूल्य लिटरेचर फ़ेस्ट म्हणून लौकिक यांच्या खाती जमा आहे. पाऊण लाख लोकं यावर्षी भेट देतील असा अंदाज.
जयपूर लिटफ़ेस्टचं उद्घाटन सकाळीच अमर्त्य सेनांच्या भाषणाने झालं होतं. ते आणि नंतरचे जेवणाच्या वेळेपर्यंतचे कार्यक्रम सगळे मिस झालेले. आता दुपारच्या सत्रातले सगळे अटेंड करायचे हा विचार मनात. पण ते नेमके कुठे, कोणते ठरवताना गोंधळ उडत आहे.

हातातल्या भरगच्च प्रोग्रॅम शेड्यूल मधली दडपवून टाकणारी नावं, विषय वाचताना हे सगळं आपल्याला झेपणार आहे का, नेमकं कशाला आलो आहोत आपण इथे? वाटायला लागतं. आपण जागतिक साहित्य वाचनात खालच्या पायरीवरच अजून, काहीबाही लिहितो म्हणून रजिस्ट्रेशन टॅगवर नाव लेखिका लागले आहे इतकंच. पण प्रादेषिक भाषेला कोण विचारतय इथे? काही असेल आपल्याकरता मग इथे? असं काही ऐकण्याने जाणीवा अचानक समृद्ध वगैरे होतील, बौद्धिक पातळी उंचावेल अशा भ्रामक कल्पनाही सोबतीला नाहीत.
भारतीय लेखक माहीत आहेत, झुंपा लाहिरी, कॅथरिन बू, ग्लोरिया स्टाइन्मेनला ऐकायची, बघायची उत्सुकता आहे, पण बाकी?

इतक्यात बाजूच्या डेस्कवर कोणीतरी येतं. माझ्या अगदी शेजारी. सहा फ़ूट उंची, पांढरे-शुभ्र केस, भारतीय सावळा, हसरा, मृदू, देखणा चेहरा. मी उत्सुकतेनं गळ्यातल्या टॅगवर नजर टाकते. पार्थ मित्तर. पार्थ मित्तर? हे नाव कसं विसरले? ते वाचूनच रजिस्ट्रेशन केलं. प्रत्यक्ष पार्थ मित्तर त्यांच्या ’मच मलाइन्ड मॉन्स्टर’ पुस्तकाच्या नव्या आवृत्ती संदर्भात बोलणार, ते पुस्तकाचे वाचन करताना आपण ऐकणार ही कल्पनाच माझ्याकरता थ्रिलिंग. मी पार्थ मित्तर भाग घेणार असलेल्या एकंदर तीन कार्यक्रमांवर टीकमार्क करते. ती करतानाच मग ऍन्ड्रू ग्रॅहम डिक्सन नाव दिसते. कारव्हॅजियो वर पुस्तक लिहिणारा. मी त्याही नावावर खूण करते. अचानक बरीचशी ओळखीची नावं दिसायला लागतात. निकोलस शेक्सपियर, राणा दासगुप्ता, अनिता नायर, कविता सिंग, आर्शिया सत्तारही माहीत आहेत. विल्यम डॅलरेम्पल, मायकेल सान्डल, समान्था विनबर्गही माहीत आहेत. मी खूणा करत जाते. काहीतरी मिळेलच माझ्याकरता.

आज लिटफ़ेस्टवर लिहिताना मनात पुन्हा गोंधळ. इतकं मिळालं आहे, अनुभवलं आहे ते फ़क्त काही थोडक्या शब्दांमधे कसं बसवायचं?



दिवस दुसरा, संध्याकाळचे पाच-

डिग्गी पॅलेसच्या चार-बागेमधे ’स्टोरी टेलिंग अराउंड द ग्लोब’ चर्चासत्र चालू आहे.
कला इतिहासतज्ञ, सौंदर्यशास्त्राच्या आणि बंगाली आणि राजस्थानी लोककथांच्या अभ्यासक जे.एन.यूच्या कविता सिंग मिनिएचर पेंटींग्जचं पारंपरिक कथनशैलीतलं स्थान समजावून देत आहेत. त्यांच्या सोबत इंग्लिश-चायनिज चित्रपट लेखिका शिओलू ग्वो, ज्यांनी लहान मुलांकरता वेगळ्या धर्तीची गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत, हार्वर्ड स्कॉलर किकू अदात्तो ज्या स्टोरीटेलिंगच्या पारंपारिक पद्धतींवर संशोधन करतात, आहेत. विल्यम डॅलेरिम्पल चर्चेचा मेळ राखत आहेत. स्क्रीनवर शाहनामा, पर्शियन, मुघल पेंटींग्ज. आपण ऐकण्यात गुंग.

गार, बोचरा वारा वहातो. अंगावर शिरशिरी येते. चारबागेतला हा खुला मंडप, गर्द झाडीने वेढलेला. बाजूला कमानदार भिंत, खास जयपूरी गर्द गुलाबी रंगाचा दगड. गारठा वाढतो आहे. उद्यापासून अशा उघड्या टेन्टमधले कार्यक्रम संध्याकाळी मिस करायचे. कुल्हडमधल्या वाफ़ाळत्या चहाची उब पुरत नाही. मंदावलेला प्रकाश जाणवतो. स्क्रीनवर झुकलेलं बाजूचं डेरेदार झाडही मिनिएचर पेंटींगमधनं उठून आल्यासारखं वाटायला लागतं. अचानक कुठूनतरी तीन देखण्या लांडोरी उडत येऊन बाजूच्या दगडी कमानीवर विसावतात, लगेच भरारी घेत नाहीशा होतात, आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. आणि मग एक मोर येऊन कमानीवर बसतो. आपला निळा, जांभळा वैभवशाली पिसारा एकदा उलगडतो, मिटतो. आपण अवाक. पहात आहोत ते सत्य की दृष्टीभ्रम ठरवता येत नाही. आपण आजूबाजूला बघतो, प्रेक्षकांमधले अनेक तिकडेच बघत आहेत हे कळल्यावर दिलासा मिळतो, पण मनातली त्या मोराची नवलाई ओसरतच नाही. नजर पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच वळत रहाते.
जयपूर लिटफ़ेस्ट शैलीतली ही एक खास आपल्याकरता असलेली कहाणी समोर उलगडते आहे असं वाटत रहातं.


दिवस- बहुधा तिसरा
फ़्रन्ट-लॉन

रेझा अस्लन- इराणियन-अमेरिकन स्कॉलर, धर्म या संकल्पनेचा अभ्यासक. त्याच्या “Zealot- The Life and Times of Jesus of Nazaretha” पुस्तकाने जगभर खळबळ माजवली. त्याला सातत्याने विचारले गेले, तू स्वत: मुस्लिम असताना ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा तुला काय अधिकार? तुझा काय हेतू?
“एका तटस्थ धर्म-अभ्यासकाने एका मोठ्या धर्माची स्थापना करणा-या जीझसचा शोध घेण्याचा, अनेक अर्थ उलगडवण्याचा हा फ़क्त एक प्रामाणिक प्रयत्न होता.” रेझा अस्लन हे पुस्तक लिहिण्यामागची त्याची भूमिका सांगतो आहे. बहुतेक पहिल्यांदाच. धर्माचा अर्थ प्रत्येकाकरता वेगळा असतो. ओसामा बिन लादेनसारख्या कट्टर धर्मनिष्ठाकरता इस्लामचा अर्थ वेगळा. आणि माझ्यासारख्याला ज्याला श्रद्धा म्हणजे काय याची व्याख्याही धड मांडता आलेली नाही, त्याच्याकरता इस्लाम वेगळा. चौदाशेहून जास्त वर्ष या धर्माचा नेमका अर्थ मदरशांच्या चार भिंतींआड बंदिस्त होता, आता प्रत्येकजण स्वत:चा, वैयक्तिक अर्थ शोधू पहातो आहे ही चांगली गोष्ट आहे. काहीजणांना ती भविष्याकडे घेऊन जाण्याची सुरुवात वाटते, काहींना ती भविष्याची अखेर होण्याची सुरुवात वाटते. धर्माचा अर्थ काही शांतता, सहिष्णूता, समानता लावू पहातात, काही भिती, दहशत, अन्याय. धर्म हे मला मुक्कामापर्यंत घेऊन जाण्याचं फ़क्त एक साधन आहे. तो मार्ग आहे, मुक्कामाचे ठिकाण नाही. मला आज विचारतात तू इस्लामशी एकनिष्ठ आहेस का? मी सांगतो त्या सर्वांना याच व्यासपीठावरुन- I don’t believe in Islam, I believe in God.

रेझा अस्लनचे शब्द मंत्रमुग्ध करुन टाकतात. रेझाचं अजून एक सत्र ऐकलं आहे नुकतंच. Leaving Iran. इराण सोडून दुस-या देशात रहाताना काय अनुभव येतात? त्यात त्याच्यासोबत द एक्झाइल्डची लेखिका फ़रोबा हात्रुदी, जी फ़्रान्समधे स्थलांतरीत होती. त्यांना विचारलं, कुठे रहाणं सोपं आहे? अमेरिकेत की फ़्रान्समधे? रेझा अस्लन उत्तर देतो- इराणियन असताना जगात कुठेही रहाणं सोपं नाही.

मी बुकस्टॉलवर. राणा दासगुप्ताचं द कॅपिटल घ्यावं की रेझा अस्लनचं झेलट घ्यावं विचार ठरत नसतो. पुस्तकांची ओझी किती वहाणार? दोन्ही जाडजुड. एकच घ्यावं. कोणतं?

“तू हे पुस्तक घेतलस तर मी इथेच सही करुन देईन.” शेजारुन आवाज येतो. रेझा अस्लन स्वत:.
मी त्याला विचारते, “तुझं एकही पुस्तकं मी अजून वाचलेलं नाही. पहिल्यांदाच वाचायचं तर कोणतं घेऊ?”
“अर्थातच हे लेटेस्ट, ज्याकरता मी इथे आलो. प्रोमोशन फ़र्स्ट, नाही का?”
पुस्तकावर रेझा अस्लन सही करतो. “तू लिहितेस का?” माझ्या गळ्यातल्या टॅगवर तो नजर टाकतो. होय. मी मान डोलावते. “मग अभिप्राय लिहून पाठव प्रकाशकांना.”
“पण मी मराठीमधे लिहिते.”
“हे तर फ़ारच छान. मला अजून कोणतंही मराठी भाषेतलं मेल आलं नाहीये. माझा पोर्टफ़ोलिओ सुधारेल.”
रेझा अस्लन जातो. मी अजूनही चकित. इतका साधेपणा, प्रामाणिकपणा.. आणि आपण इतक्या सहज भेटतो आहोत जागतिक साहित्यिकाला, कोणतेही सुरक्षेचे कडे नाही, भोवती प्रशंसकांची गर्दी नाही. गेल्या वर्षी यायला हवं होतं. ओर्हान पामुकला असं भेटता आलं असतं तर?
मनाला अनेक आधीच्या चुकलेल्या लिटफ़ेस्ट्सची हुरहुर लागून रहाते. यापुढची एकही चुकवायची नाही.


बर्डन्स ऑफ़ आयडेन्टिटी- वीमेन रायटर्स

नमिता गोखले सांगते मी जन्माने कुमाउं, पहाडी. लग्न करुन मराठी प्रागतिक, ब्राह्मण कुटुंबात आले. नाव बदलणं गृहित धरलं. मग मी लिहायला लागले. पहाडी पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा. अनेक भुवया उंचावल्या गेल्या. तू पहाडी लोकांच्या धैर्याच्या, कष्टांच्या कहाण्या लिहायला हव्यास. तू स्त्रियांच्या वेदनांवर, असामान्य जीवनावर लिहायला हवंस. तू स्त्री आहेस, स्त्रीची वेदना तू नाही मांडणार तर कोण? अशा जुनाट प्रेमकथा लिहिणं हा वेळेचा अपव्यय. ब-याच तेच करतात, पण तूही?

तमिळ-मुस्लिम कवयित्री सलमा म्हणाली, मुळात मी काही लिहिणंच अपेक्षित नाही, त्यातून कविता म्हणजे तर धर्माला बट्टा. त्यात स्त्री-पुरुष प्रेमाची, शारिरीक वर्णनं म्हणजे तर जगणंही मुश्किल. मग मी टोपण नाव घेतलं.
नव-याच्या शेजारी झोपताना, तो झोपला की मला कविता सुचते. मग मी बाथरुममधे जाउन एका कागदावर त्या खरडून टाकीच्या वर लपवून ठेवते.

इस्त्राएली लेखिका झरुर शालेम. हिच्या घरी सगळेच थोर लेखक. आईवडिल, भाऊ, चुलत भाऊ, नवरा, सासू-सासरे. सगळे धर्म-राजकारणावर अभ्यासपूर्ण लिहिणारे. मी लिहायला लागले मानवी भावनांच्या कादंब-या. हळव्या, वैयक्तिक. कुणालाच ते आवडत नाही. पण मी बॉर्डर ऑफ़ नेशन पेक्षा बॉर्डर ऑफ़ इमोशन्स महत्वाच्या मानते. मला वॉर ऑफ़ सेक्शुआलिटी जास्त महत्वाची वाटते वॉर ऑफ़ नेशन पेक्षा. माझ्यावर एकदा राजकीय अत्याचार घडला. माझा देश माझं आयुष्य ताब्यात घेऊ पहात होता. मी ते होऊ दिलं. पण माझ्या लेखनावर त्यांना ताबा नाही मिळवू दिला. या दारुण राजकीय अनुभवावर मी निदान एक लेखिका म्हणून लिहायला हवं असं माझ्या मित्र-मैत्रिणींनाही वाटलं. मला त्यातून बाहेर पडायला सहा महिने लागले होते. त्यानंतर मी जे पहिलं वाक्य लिहिलं ते माझ्या सहा महिन्यांपूर्वी अर्धवट सोडलेल्या कादंबरीतलंच पुढचं वाक्य होतं. एक लेखिका म्हणून मी कोणत्याही दडपणाला बळी पडले नाही याबद्दल मला माझा अभिमान वाटतो.


सत्तर वर्षांची ग्लोरिया स्टाइन्मेन बोलत असताना खचाखच गर्दी. तिच्या वाक्या वाक्याला गर्दी उसळत होती. टाळ्यांचा कडकडाट, घोषणा. अजमेरच्या मेयो कॉलेजातून आलेल्या मुलींचा एक मोठा ग्रूप. त्यातली एक प्रश्न विचारते ग्लोरियाला- पन्नास वर्षं होऊन गेली स्त्री-वादी चळवळीला. अजूनही स्त्रिया घरगुती अत्याचारांमधूनही वाचलेल्या नाहीत. जगभरातून या तक्रारी येतच रहातात. स्त्री-वादी चळवळीचं हे अपयश नाही का?
ग्लोरिया शांतपणे उत्तर देते. एका अत्याचाराच्या घटनेचे परिणाम भरुन यायला चार पिढ्या जातात. मग हे तर हजारो वर्षांचे अत्याचार. नाही. पुढच्या निदान शंभर वर्षांमधे तरी जेन्डर इक्वालिटीची मी अपेक्षा करत नाही. पितृसत्ताक घरांमधून फ़क्त पितृसत्ताक पद्धतीतली मुलं आणि अन्यायाला बळी पडणा-या मुलीच जन्माला येत रहाणार. हे सत्य आहे.


एक आयरिश ग्रूप. पाच पुरुष, तीन स्त्रिया. त्यांचा रायटर्स ग्रूप आहे. दर वर्षी जयपूर लिटफ़ेस्टला येतात. हे त्यांचं पाचवं वर्षं. यावर्षी आम्हाला जोनाथन फ़्रान्झेनबद्दल उत्सुकता आहे. फ़िलिप हेन्शर आम्हाला लिहिण्यात मार्गदर्शन करतात. तेही यावर्षी इथे आहेत. अमर्त्य सेनचं भाषण आम्ही रेकॉर्ड करुन घेतलं इतकं ते आवडलं. आठही जण त्यांच्या नोट्सने भरलेल्या वह्या दाखवतात.
हिंदी कादंबरीकार ध्रूव शुक्ल भोपाळहून आले आहेत. ऑटोबायोग्राफ़िकल नॉव्हेल्स आणि ट्रॅव्हल रायटींगवरची चर्चासत्र ते अटेंड करतात फ़क्त. त्यांना गणेश देवींच्या प्रादेषिक भाषांच्या अस्तित्त्वाच्या संदर्भातल्या भाषणाची उत्सुकता आहे.

आयरा रॉबिन्सन पेंटर आणि म्युझिशियन. दर एक वर्षांनी तो इथे येतो. पूर्वी सगळे महाग खाण्याचे पदार्थ मिळायचे. पण आता वीस रुपयात उत्कृष्ट ब्रू कॉफ़ीही मिळते हे खूप छान झालं आहे. आयरा भारतीय खाद्यपदार्थ मात्र खात नाहीत. पोटाला झेपत नाहीत. आयराला एका चर्चासत्रातलं आर्टिस्ट सुबोध गुप्ताचं वाक्य- मला गेल्या पंचवीस वर्षांमधे एकाही कलामहाविद्यालयाने लेक्चरकरता बोलावलं नाही हे खूप खटकलं. मी स्वत: बनारसला एका लहान शाळेत पेंटींग शिकवायला जातो, विनामूल्य. त्या शाळेत, किंवा इतर कितीतरी लहान ठिकाणी अशा मोठ्या आर्टिस्ट्सना जायला वेळच कुठे असतो, ते स्वत: का नाही इन्स्टीट्यूशन उभारत केवळ सरकारला नावं ठेवण्यापेक्षा? आयरा विचारतो. सुबोध गुप्ताचं वाक्य माझं काम कला निर्मितीचं, मी आर्ट इन्स्टीट्यूशन मधे का लक्ष घालवू हे वाक्य मलाही खटकलेलं असल्याने मी आयराला दुजोरा देते.


गारठलेल्या या गुलाबी शहरात साहित्याचा हा महाकुंभमेळा ओसंडून वहात असतो.

सायन्स, गणित, अनुवाद, प्रादेषिक भाषा, लोकसाहित्य, स्थलांतरित, धर्म, कला, राजकारण, सिनेमा, इतिहास अनेक विषय. ऐकणारे कोणी नवोदित, कोणी प्रस्थापित, कोणी वाचक, कोणी लेखकराव, कोणी प्रकाशक, कोणी भाषाप्रेमी, काही स्त्री-वादी, विद्रोही, अनेक इतिहासप्रेमी. चित्रकार, संगीतप्रेमी, काही पत्रकार, काही पहिली कादंबरी लिहू पहाणारे, काही ब्लॉगर्स, काही नुसतेच ट्वीटर्स. पण प्रत्येकाला लिटफ़ेस्ट काहीतरी देतं आहे. लिटफ़ेस्टने अनेकांना आपल्यात सामावून घेतले. आधीच्याही लिटफ़ेस्टने अनेकांना हे मिळाले म्हणूनच ते पुढच्या वर्षीही येत राहीले.

साहित्यिक प्रस्थापित असो, सुप्रसिद्ध असो, जग गाजवणारे असोत.. ते इतके सौजन्यशील, हसरे, नम्र प्रतिसाद, उत्तरे देणारे, वाचकाला न विसरलेले, अभ्यासूपणे इतरांचंही ऐकणारे, रांगेत उभं रहाणारे, आपल्या टेबलावर बसून खाणारे, पुस्तकं विकत घेत फ़िरणारे असू शकतात हा अनुभव मला लिटफ़ेस्ट देत आहे. किती चांगले लेखक, किती वेगवेगळ्या विषयांवर लिहित आहेत, ते क्लिष्टतेचा जराही बडिवार न माजवता बोलू शकतात, या अनुभवासकट.

वाचकांच्या आवडी किती टोकाच्या असू शकतात. आपल्या शेजारचा ज्यावर खूणा करतो आहे त्यातलं एकही आपल्याशी कॉमन नाही, आणि फ़िक्शन, नॉन फ़िक्शन दोन्हीनाही तुडुंब प्रतिसाद मिळतो अजूनही हेही या लिटफ़ेस्टला कळले.


पुरेशी आसन व्यवस्था, खाण्या-पिण्याच्या सहज सोयी, स्वच्छ टॉयलेट्स, उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, वेळेची तत्परता, स्वयंसेवकांची योग्य कामगिरी हे सगळं सहजतेनं पार पडत आहे इथे. लिटफ़ेस्टचा अजून एक महत्वाचा अनुभव.  


पण मराठी साहित्यिक, बुद्धीमान लेखक इथे क्वचितच फ़िरकतात. आपल्याला काही मिळेल यातून असं त्यांना वाटत नाही.
त्यात काय? मार्केटींगचा जमाना आहे. स्वत:च्या बुक प्रमोशनकरता ही नावाजलेली मंडळी इथे येतात. बिग डिल. काही म्हणतात. असूदेत ना. बुक प्रोमोशन, मार्केटींग या आजच्या जगातल्या आवश्यक गोष्टी ही मंडळी किती सफ़ाईने, व्यावसायिकतेनं करतात, आपण लिहिलेल्यातलं, त्यातल्या त्यात कमी वेळेतही वाचकांच्या कानावर पडावं म्हणून धडपडतात. निदान ही कौशल्य शिकून घ्यायला, निरखायला तरी यावं की..


पार्थ मित्तरने किती सहज त्याचा खाजगी इमेल आयडी देऊन म्हटलं, कलेच्या प्रांतातलं मराठीत नेमकं काय काय लिहून येतं, कोणत्या विषयांवर ते वाचायला मला नक्की आवडेल. खूप मोठी मराठी नावं आहेत कलेच्या इतिहासात. मला आदर आहे मराठीबद्दल. जास्तीतजास्त लिंक्स मेल कर.

आधी कधीच माहीत नसलेले लेखक, आता त्यांच्या तीन-तीन चर्चासत्रांनंतर इतका माहितीचा, जवळचा होतो, मग तोही बाहेर लॉनवर वगैरे भेटतो तेव्हा ओळखीचं हसतो, मग तुम्ही लगेच त्याची जाडजाड पुस्तकं विकत घेऊन टाकता. एखादी आपली आवडती कादंबरी लिहिणारी लेखिका बोलताना अगदी आपल्यासारखाच विचार करते हे जाणवून देणारा एखादाच क्षण लिटफ़ेस्टमधे तुमच्या वाट्याला येतो आणि तुमचं सेल्फ़ एस्टीम हजार पटींने वाढतं.

जयपूर लिटफ़ेस्ट या अशा अनुभवांकरता प्रत्येकाला घडावा. लिटफ़ेस्टला तोवर जावं, जात रहावं जोवर आपल्याला अजूनही हे सगळं अनुभवता येतय याची खात्री वाटते.


आपण लेखक बनलो कारण आपल्याला लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला खूप आवडतं याची आठवण पुन्हा एकदा लिटफ़ेस्टने करुन दिली. नवे लेखविषय, कथाविषय डोक्यात घोळायला लागले, त्याकरता संशोधन करायला, अभ्यास करायला अमाप उत्साह अंगात भरला.
कोणीतरी भेटतच जे सांगतं आता लिटफ़ेस्टला पूर्वीसारखी मजा नाही. वैयक्तिक जिव्हाळा कमी झाला आहे. फ़क्त व्यावसायिकतेला जास्त महत्व दिलं जात आहे.


एक ब्रिटिश रायटर सांगत होती कोणत्यातरी सेशनला शेजारी बसली असताना- इथे खूप तरुण चेहरे दिसतात. त्यात मजा करायलाच आलेले जास्त असू शकतात, पण ते दिसतात हे मला महत्वाचं वाटतं. लिटफ़ेस्ट आपलाही चेहरा तरुण करुन टाकतं.


चटकन संपूनही गेलेलं, पण मनाला हुरहूर लावून जाणारं उत्कट प्रेमप्रकरण असावं तसं वाटलं लिटफ़ेस्ट. पाच दिवसांमधला प्रत्येक क्षण त्याच्याच विचारांनी व्यापलेला. आणि नंतरही खूप काही शिल्लक ठेवून गेलेला.

* लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ’संवाद’ पुरवणीमधे प्रकाशित झालेला आहे.