Saturday, July 31, 2010

बातमी?

काल दुसरं काहीच महत्वाचं घडत नव्हतं देशात ज्याची बातमी व्हावी.दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सगळ्या चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज/विशेष बातमी/हेडलाईन काय तर डिम्पीने राहूलचं घर सोडलं.नक्की काय लायकीचे आहेत हे दोघे की त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सतत ऐकलच पाहिजे?All news channels are pathetic.

Sunday, July 25, 2010

वाचायच्या आधीच..

हिंदू हातात आलं आणि अगदी गार गार वाटलं. येताना टॅक्सीत पुरेसा प्रकाश मिळेना बाहेर काळे ढग दाटून आलेले म्हणून, तर मी अगदी खिडकीच्या बाहेर तिरकं काढून वाचायचा प्रयत्न करत होते आणि तशी जेमतेम दोन पाने वाचली मग मिटवून टाकलं. अशा पुस्तकांना रात्रच हवी वाचायला. निरव रात्र. बाहेर पावसाचा आवाज आणि गच्च काळोख. आपल्यापुरत्या प्रकाशाच्या चौकोनात आपल्या आवडणारच याची खात्री असणारं पुस्तक. फार कमी वेळा अशी पुस्तकं हातात येतात.
हिंदू प्रकाशित वगैरे झाली पण खरं तर का कोणास ठाऊक पण मला अजिबात घाई गडबडीने ती वाचायची उत्सुकता वाटत नव्हती. म्हणजे आहे मी नेमाडे किंवा कोसला म्हणूयात तर कोसलाप्रेमी गटातलीच तेव्हा कादंबरीबद्दल उत्सुकता जरुर होती. पण एक तर ती काही मी प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आगाऊ नोंदणी वगैरे केलेली नव्हती. त्याबद्दल रोज बातम्या वाचल्या जात होत्या की अमुक जणांनी नोंदवली वगैरे पण मी पडले अशा बाबतीत आळशी. मग ती प्रकाशित झाली तेव्हाही काही मी त्या समारंभाला गेले नाही. मग पार्ल्याच्या मॅजेस्टिकमधे डोकावले तर तिथल्या हिंदूच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती फक्त आगाऊ नोंदणीदारांसाठी आहेत वगैरे कळल्यावर मला वैताग. म्हटलं जाऊचदे. तरी वाटलं पुढे जवाहरमधे विचारावं. निघाले आणि पाऊस सुरु झाला जोरदार. कशाला हिंदूला भिजवा आता. बघू उद्या म्हणत मी तशीच घरी. बरं अजून कोणी काही झाली बुवा आमची वाचून. आवडलीय नाही आवडली काहीच बोलेना. अर्थात मला त्याने फरक पडणाराच नव्हता. मला ती आवडणारच हे मला माहित होत. एक तर मला पुस्तकं, सिनेमे वगैरेबाबत अगदी सिक्स्थ सेन असल्यासारखं आधी कळतच की आपल्याला हे आवडणार. हे नाही आवडणार. आणि हा अंदाज एरीली ९०% वेळा बरोबर ठरतो. मिथिला म्हणते की आता आवडणार म्हटलय ना म्हणून आवडतच. तर त्यात काही अर्थ नाही. १०% वेळा नाही आवडत त्याचं काय? एक तर आधीच वाचलेलं की या पुस्तकात पुरातन मोहन्जोदडो संस्कृतीतल्या उत्खननाची वगैरे थ्रिलिंग पार्श्वभूमी आणि नेमाडे लिहिणार म्हणजे पुरेसा विस्तृत पट घेऊन याची खात्रीच.
तर हिंदू काही त्यादिवशी हातात आली नाही. दुसर्‍या दिवसापासून मुंबईत धुआंधार पाऊस. काल म्हणजे शनिवारी दादरला आयडियल, मॅजेस्टिकवर धाड घालायचं ठरवलं पण पाऊस काही थांबला नाही. पण आज सकाळी प्रहार मधे प्रभा गणोरकरांनी हिंदूबद्दल लिहिलेलं वाचलं आणि ताडकन उठलेच. सही दिसतय आणि हे लगेच अगदी लगेच वाचण मस्ट आहे आणि आपण काय पाऊस, सवलत करतोय मूर्खासारखं असं म्हणत गेले रविवारची दुपार विसरुन दादरच्या शिवाजी मंदिर मॅजेस्टिकमधे. तिथे पुन्हा तेच. प्रती फक्त आगाऊ नोंदणीधारकांकरता. बुक केलय कां? म्हटलं नाही पण हवय आत्ताच. त्या काऊंटरमागच्याला काय वाटलं काय माहीत. तो तिथल्या मुलाला म्हणाला त्या काल सही करुन आलेल्या पंधरा प्रती आहेत त्यातली एक आण. आणि माझ्या हातात प्रत. अगदी नेमाडेंच्या सहीची वगैरे. मग मी असं एखादंच पुस्तक घेणं बरं नसतं म्हणत अजून तीन घेतली. त्यातलं एक अजित हरिसिंघानींचं बाईकवरचं बिर्‍हाड.सानियाचं अशी वेळ, मिलिंद बोकिलचं समुद्रापारचे समाज. सॉरी चार घेतली. तारा वनारसेंचं तिळा तिळा दार उघड. मग वाढलेल्या टॅरिफची वगैरे किरकोळ चिंता न करता टॅक्सी. पुस्तकांना असं बसमधून वगैरे नेणंही बरोबर नाही. मग टॅक्सीत बसल्या बसल्या पहिलं पान उघडलं.
प्रस्तावना-

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरुन जगण्याची समृद्ध अडगळ

सुरुवात-
कोण आहे?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तु कोण?
मी तु आहे, खंडेराव.
अंमळ चुळबुळात्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वतःलाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
ही तर मोठीच आफत आली आपल्यासारख्या माणसावर. हल्ली सांगायला गोष्टच तेव्हढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं. असं म्हणून मी वरच्या तंबूच्या कापडावरचे काळेपांढरे ठिपके पाहत पुन्हा झोपी जातो. पुन्हा दिसायला लागतो मी मोठ्या मेहनतीने तयार केलेला सप्तसिंधू भुप्रदेशाचा नकाशा. आकाशातून खूप उंचीवरुन अफगाणीस्तानातल्या शरयू नदीपासून राजस्थानातल्या सरस्वती नदीपर्यंतच्या या नव्या नकाशामुळेच माझं संशोधन सर्वचर्चित झालं.


आवडलं. आवडलं हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ. मला कळतं वाचायच्या आधीच बरोबर.

Wednesday, July 21, 2010

चीनमधून बेचैन

नाही.ही काही चीनचं राजकीय वगैरे विश्लेषण मनात ठेऊन केलेल्या प्रवासवर्णनाची सुरुवात नाही.
गेले जवळपास दोन महिने चीनमधे होते आणि तरीही असलं काहीही मी करणार नाहीये.इतक्यात :P
यावेळी तिकडे जाताना साईटसिईंग फारसं मनात नव्हतं.
एकतर माझ्यासोबत भटकत बसायला मोशायला वेळ असेलच असं सांगता येतं नव्हतं कारण ही माझी प्लेझर टूर असली तरी त्याची स्ट्रिक्टली बिझिनेस टूर होती.आणि भाषा येत नसताना एकटीने चीनमधे फिरणं,तेही तुम्ही ओन्ली व्हेज कॅटगरीमधे असताना तर निव्वळ अशक्यप्राय गोष्ट.तरीही चीनमधे एकंदरच चिक्कार भटकणं झालं.Unplanned.तिथे झालेली माझी मैत्रिण श्यू तिच्या पीचफार्मर आईवडिलांकडेही रहायला घेऊन गेली.अगदी छोट्याश्या त्या गावात रहाताना इतकं सुंदर वाटलं.पर्ल बकच्या कादंबरीतल्या साध्यासुध्या चिनी शेतकर्‍यांनाच अवतीभवती बघतेय असं अनेकदा वाटलं.शांघाय, बेजिंगने त्यांच्या आलिशान नखर्‍याने जितकं मला प्रभावित केलं नाही तितकं श्यूच्या त्या लिनहाय गावाने केलं.
यावेळी चीनमधे वेळ आहे तेव्हा मी माझी गेले 4-5 वर्षं अर्धवट लिहिली गेलेली कादंबरी नक्कीच पूर्ण करणार असं जाताना मारे मोशायला दहादा सांगितलं.अगदी वागवायला आणि वापरायला सुटसुटीत लेनोव्हो नेटबुकही त्यासाठी घेतलं.पण त्या कादंबरीची अगदी एकही ओळ लिहून झाली नाही.एकंदरीतच माझ्याबाबतीत प्लॅनिंग हा प्रकार काम करत नाही.म्हणजे टुडू लिस्ट्स वगैरे अगदी भारंभार रोज बनवणार.पण त्यापैकी प्रत्यक्षात दहा टक्केही उतरणार नाही.रोज उठून मोशायच्या अपार्टमेन्टबाहेरच्या त्या सुंदर गार्डनमधे मी अगदी नेटबुक घेऊन जाणार आणि मग गार्डनला लगटून वहाणार्‍या नदीकडे नाहीतर आजूबाजूला पळणार्‍या सफरचंदी गालांच्या चिनी बच्चेकंपनीकडे,तिथल्या जॉगिंगला आलेल्या पेन्सिल-स्लिम देहयष्टीच्या चिनी सुंदर्‍यांकडे आणि त्यांच्या त्यामानाने जरा यडचापच दिसणार्‍या चिनी जोडिदारांकडे पहात नुसतंच नेटबुकचा चार्ज संपवण्यात बराच काळ घालवणार.नाहीतर युबिसी कॅफेमधे बेजिंग हुटांग्स न्याहाळत नुसतीच तंद्री लावणार.असं अनेकदा झाल्यावर मी तो प्रकारच बंद केला.इथे असताना मोशायचे कान अक्षरशः किटवून टाकले होते अनेकदा की मला निवांत, निसर्गरम्य ठिकाणी, झिमझिमत्या पावसाला काचेतून पहात,हातात कॉफीचा कप घेत दिवसचे दिवस घालवण्याची संधी मिळू देत.बघ मग माझी कादंबरी कशी लग्गेच पूर्ण होईल.कप्पाळ.एक प्रकरणही पूर्ण केलं नाही.हा चायना नोट्स मात्र रेग्युलर काढल्या.आणि हजारांनी फोटो काढले.तिथून ब्लॉगसाईट अ‍ॅक्सेस होत नव्हती नाहीतर अगदी रोज एक चायना पोस्टकार्ड टाकलं असतं इथे इतकं सारं निरर्थक सुंदर जमा होत होतं जवळ.
इथे आलेय परत तर डोक्यावर पुन्हा धबाधबा लिहिण्याच्या प्रोफेशनल असाईन्मेन्ट्स कोसळायला लागल्यात.ज्यांच्या डेडलाईन नेहमीप्रमाणे गेल्याच आठवड्यात संपल्यात.मोशाय पुन्हा परदेशात गेला.आता नेहमीच रुटीन धावपळीचं चक्र चीड्चीड होण्याइतक्या सुरळीतपणे सुरु होईल.आता हातातला शिल्लक वेळही बघता बघता संपून जाईल.चिन्हं वार्षिकाचं काम सुरु होईल.रविवर्मा स्टोरीचा पुढचा भाग करायचा आहे.थोडक्यात काय तर ऑफिस, फ्री- लान्सिंगच्या चक्रात बाहेरचा सुंदर झिमझिमता पाऊसही बघण्याइतकी चैन परवडणारी नाहीये सध्या काही दिवस.
भटकून पोट मात्र कधीच भरत नाही उलट खिसे नको इतके रिकामे होतात हे नेहमीप्रमाणेच लगेच कळलं.इतका खर्च झालाय की खड्डा भरुन काढायला पुन्हा नको त्या असाईन्मेन्ट्स स्विकारल्या जाणार.पुन्हा भटकंतीचे प्लॅन्स करायचे तर त्यासाठी पुरेसे पैसे जमवणं भागच आहे हे क्रेडीट कार्डाचे चेक्स भरताना नेहमीसारंखच डोळ्यापुढे चमकून गेलं.नैराश्याच्या झटक्यात ठरवूनही टाकलं आता कुठेही जाणार नाही पण अमृताचा फोन आल्यावर ऑगस्टमधे लेहलदाख करायचे प्लॅन्स सुरु झालेही.बिच्चारी कादंबरी पुन्हा एकदा नेटबुकमधेच बंदिस्त.पुन्हा आता जेव्हा मी अगदी निवांतपणे,एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तासंतास हातात कॉफीचा कप घेऊन लिहिण्याची चैन करायला जाईन तेव्हा होईलच म्हणा ती पूर्ण.नाहीच तर मार्गारेट मिशेल किंवा गेला बाजार नेमाडेंनंतर कादंबरी लिहायला घेतल्या गेलेल्या सर्वाधिक वेळेची नोंद माझ्या नावावर होईल हे नक्की.
----------------------------------------------------------------------------------P.S.
जावेद अख्तर खूप वगैरे काही आवडत नाही.पण ट्विटरवर त्याने लिहिलेलं बरेचदा आवडतं:-
वापस जो चाहो जाना तो जा सकते हो
मगर
अब इतनी दूर आ गयें हम;देखो,अब नही