Thursday, December 15, 2016

सिनेमा आणि संस्कृती:भाग-४ मुस्लिम सोशल्स

भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.
त्या त्या दशकातले सिनेमे पाहिले की त्यावेळच्या एकंदर समाज मनोवृत्तीचे, त्यांच्या राहण्या, जेवण्या, रितीरिवाजांच्या, पेहरावाच्या संस्कृतिचे दर्शन इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मांकडे बाकी समाजाची बघण्याची, बघण्याच्या बदलत गेलेल्या नजरियाची प्रक्रियाही निरखता येते. हिंदी सिनेमांचं हे सर्वात मोठं आणि देखणं वैशिष्ट्य की त्यात अनेक जिनसी संस्कृती एकजिनसीपणे सामावून जाऊ शकल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी संस्कृती आपापल्या गुणवैशिष्ट्यांसह पडद्यावर साकारल्या.
भारतीय समाजावर, सिनेमावर, कलांवर, जाणीवांवर आत्तापर्यंत सर्वाधिक प्रभाव टाकणारी संस्कृती म्हणजे मुस्लिम संस्कृती जी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर सातत्याने साकारली आणि कधीच उपरी वाटू शकली नाही.
गझल, कव्वाल्या, मुशायरे, पर्दा, निकाह, तेहजिब, मुजरा, सुफी संगित हे आणि अशा तर्‍हेचे मुस्लिम संस्कृतिचे पडद्यावर वारंवार, गेली पन्नास दशकांहून जास्त काळ सातत्याने साकारले गेलेले घटक हिंदी सिनेमाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. तवायफ उमराव जानचा मुजरा आणि राजनर्तिका आम्रपालीचे नृत्य साकारणारा हिंदी सिनेमाच्या धमन्यांमधून वाहणारा संस्कृतीप्रवाह एकाच स्त्रोताशी नातं जोडणारा. मोगलेआझमच्या महालात बाळकृष्णाच्या पाळण्याला झोके देणार्‍या जोधाबाईच्या हाताला हात लावलेला अकबर आणि त्याच्या दरबारात मोहे पनघटपे गाणारी मधुबाला हिंदी सिनेमाचे प्रेक्षक असणार्‍या भारतीय समाजाला कधी वेगळे वाटूच शकले नाहीत. साहजिकच आहे कारण प्रत्यक्षातही त्याला आपल्या आकाशात गणेश चतुर्थीच्या आणि ईदच्या चंद्राची कोर ढळढळीतपणे एकत्र चमकताना पाहण्याची सवय होती. भारतीय सिनेमांमधली ही संस्कृती म्हणजे समाजातल्या दोन सर्वथा भिन्न असलेल्या संस्कृती कलेच्या संदर्भात किती एकजिव भिनून कातडीखाली एकप्रवाही होत गेल्या आहेत त्याचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहासच.
मोगल-ए-आझमची सुवर्ण जयंती भारतीय चित्रपटसृष्टीचे रसिक उत्साहाने साजरे केली. त्याबद्दल लिहूनही खूप आले. हा चित्रपट म्हणजे मुस्लिम संस्कृतीच्या त्यानंतरच्या काळात, भारतीय सिनेमांच्या पडद्यावरुन लयाला गेलेल्या उच्च कलात्मक सांस्कृतिक परंपरेचे शेवटचे वैभवशाली दर्शन होते. चित्रपटाच्या यशास कारणीभूत झालेला प्रत्येकजण मुस्लिम होता.
अभिनय (मधुबाला-दिलिप कुमार), गायन (रफी, बडे गुलाम अली खां), दिग्दर्शक (के.आसिफ), संगित (नौशाद).
उर्दू भाषेतली नजाकत आणि रुबाब, मुस्लिम तेहजिब, ऐश्वर्य आणि कलेचा संगम, सौंदर्य आणि शौर्य हे सारं यात एकवटलेलं होतं.
मुस्लिम संस्कृतीमधली जी काही चांगली वैशिष्ट्ये होती त्यांचं दर्शन इतरही अनेक चित्रपटांमधून अनेकदा झालं. चित्रपट रसिकांवर प्रत्येक वेळी त्याची मोहिनी पडली.

भारतीय चित्रपट रसिकांना या प्रकारच्या सिनेमांमधे प्रामुख्याने असणार्‍या शेरोशायरी, नाचगाणी, मुजरा, गझल, कव्वाल्या यांचेच फक्त आकर्षण होते का? हे आकर्षण होतेच पण अजूनही काहीतरी या सिनेमांमधून त्यांना मिळत होते.
ते 'काहीतरी' म्हणजे पडद्याआडच्या एका संस्कृतीचे दर्शन.
झाकलेले अधिक उत्साहाने पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल हे समाजातील प्रत्येकालाच असते. मुस्लिम समाज भारतीय समाजात राहूनही कुठेतरी आत्यंतिक खाजगीपणा जपणारा असाच राहिला. त्यांच्या बहुबेट्या कायम पडद्यात, त्यांची नमाजाची पद्धत, मस्जिद, त्यांचे शादीसमारंभ हे सारे दिसत असूनही अनोळखी. पण पडद्यावर मात्र चित्रपट रसिकांना खुले आम मुस्लिम स्त्रियांच्या अंतःपुरातही प्रवेश मिळाला. नकाबाआड दडलेलं देखणं मुस्लिम सौंदर्य सिनेमाच्या पडद्यावरुन कधी मीना कुमारी, सुरैय्या, नर्गिस, आणि अर्थातच मधुबाला, वहिदा रेहमानच्या रुपात रसिकांनी मनसोक्त न्याहाळलं.
शेरोशायरीची त्यांच्या मनावरची भुरळ तर गालिब, उमर खय्याम इतकी जुनी. त्यानंतर साहिर, शकिल बदायुनी, मजरुह, राजा मेहंदी अली खां यांनी उर्दू भाषेची सारी नजाकत सिनेरसिकांवर हात जराही आखडता न घेता उधळली. नौशाद, गुलाम मोहम्मद, खय्याम, सज्जाद हुसेन सारख्यांचे स्वरसाज त्यावर चढले.
नबाबी ऐश्वर्याची झगमग, राहणीमानातले शानशौक, रसिकता, आदब, मेहमाननवाझी, जिगर या सार्‍या खास मुस्लिम संस्कृतीतल्या वैशिष्ट्यपूर्ण छटा जेव्हा जेव्हा पडद्यावरुन दिसल्या तेव्हा त्या मोहकच भासल्या. सिनेरसिकांवर त्याची दीर्घकाळ मोहिनी पडली नसती तरच नवल.
मात्र सिनेमाच्या पडद्यावरुन दिसलेली संस्कृती आणि समाजाचं प्रत्यक्ष वास्तव या दोन्हींचं बदलत जाणारं रुप किती यथार्थ असू शकतं याचं उदाहरण जर बघायचं असेल तर त्याने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर साकारत गेलेल्या मुस्लिम संस्कृतीवर आधारीत चित्रपटांच्या वाटचालीचे निरिक्षण करावे. ऐतिहासिक, प्रेमकथांपासून, सामाजिक आणि आता दहशतवादी चित्रणापर्यंत प्रवास करत गेलेली ही संस्कृती. पडद्यावरच्या मुस्लिम संस्कृतीचा प्रवाह प्रत्येक येत्या दशकागणीक झपाट्याने बदलत गेलेला सिनेरसिकांनी पाहिला. समाजाचेच प्रतिबिंब पडद्यावर इतक्या खरेपणाने उमटलेले फार क्वचितवेळा दिसले.
१९२० ते ३० च्या दशकात लैला-मजनू, शिरी-फरहाद, हातिमताई आले,
१९३९ मधे सोहराब मोदीचा पुकार आणि ऐलान आला,
५७ मधे मिर्झा गालिब,
६० मधे के.आसिफचा मोगले आझम आणि गुरुदत्तचा चौदहवी का चांद,
६३ मधे मेरे मेहबूब,
७१ मधे कमाल अमरोहीचा पाकिझा,
७३ मधे गर्म हवा,
८१ मधे उमराव जान,
८५ मधे चोप्रांचा तवायफ,
८९ मधे सईद मिर्झांचा सलिम लंगडे पे मत रो,
९४ मधे मम्मो,
९६ मधे सरदारी बेगम,
२००८ मधे आशुतोष गोवारीकरचा जोधा-अकबर,
२०१० मधे कुर्बान, करण जोहरचा माय नेम इज खान, ..
चित्रपटांच्या यादीकडे फक्त नजर जरी टाकली तरी भारतीय मुस्लिम समाजाच्या बदलत गेलेल्या जीवनधारेचे, इतर समाजाच्या या संस्कृतीकडे बघण्याच्या बदलत गेलेल्या दृष्टीचे ठळक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
स्वातंत्र्यपूर्व काळातली बादशाही, नवाबी संस्कृती.
स्वातंत्र्योत्तर काळातला स्वप्नाळू, काव्यात्म, काहीसा भोळा भाबडा आविष्कार (तु हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा.. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा).
मधल्या म्हणजे सत्तर-ऐंशीच्या दशकातले स्मगलर्स, गँगस्टर्स..
आणि आत्त्ताच्या काळातले दहशतवादी, गुन्हेगारी संस्कृतीतल्या मुस्लिमांचे चित्रण करणारे चित्रपट.
हा प्रवास दीर्घ असला तरी अविश्वसनीय नाही, खोटा नाही याचे भान कधी नव्हे ते सिनेरसिकांना कायम राहिले कारण या प्रवासाचे साक्षिदार ते स्वतः होते.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावरुन अतिशय नेमकेपणे भारतातील मुस्लिम समाजसंस्कृतीच्या वाटचालीचे चित्रण होत गेले. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक संपता संपता आलेल्या चित्रपटांनी नकारात्मकतेचं एक सील मुस्लिम संस्कृतीवर ठोकल्यासारखं मारुन ठेवलं आणि आयरॉनिकली भारतातील बहुसंख्य समाज आजही ज्या हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात ते आहेत- सलमान, आमिर, शाहरुख, फराह, सरोज, राहत अली वगैरे खान कुलोत्पन्न किंवा जावेद अख्तर, फरहान अख्तर, शबाना आझमी वगैरे. या सर्वांनी मुस्लिम समाजातला पिढ्यान पिढ्यांचा चित्रपटाच्या पडद्यावरचा कलात्मक वारसा पुढे चालवला, आणि रसिकांनी त्यांच्यावर, मनात कोणताही संशय न ठेवता, राजकारण आड न आणता दिलखुलास प्रेम करण्याचा वारसा पुढे चालवला असंच म्हणायला हवं.

५०-६० च्या दशकातले अनारकली, पुकार, मोगलेआझम, मेरे मेहबूब, बहू बेगम, चौदहवी का चांद हे गाजलेले सिनेमे सुरेल संगिताने, अभिनयाने नटलेले होते. मुस्लिम समाजातली ही कलात्मकतेच्या कळसाला पोचलेली गौरवशाली पिढी. नवाबी, शायराना स्वभावाच्या, रोमॅन्टिक व्यक्तिरेखा यात होत्या.
'मेरे मेहबूब' मधे खानदानकी इज्जत कशी आपल्या रहात्या शाही हवेलीच्या लिलावाची वेळ येते तेव्हा पणाला लागली जाते याचं नाट्यपूर्ण चित्रण होतं. नवाब अख्तरला लिलावाच्या या दु:खद घटनेपुढे आपल्या प्राणांची काहीच किंमत नाही असं वाटत असतं. तरुण आणि आधुनिक विचारांचा अन्वर मात्र शेवटी त्याला पटवून देतो की, प्रतिष्ठा आणि इज्जत हे कोण्या हवेलीच्या विटामातीच्या यःकिश्चित ढिगार्‍याचे मोहताज नसतात. जगण्यातली सच्चाई आणि प्रामाणिकपणा तुम्ही किती टिकवून ठेवू शकता यावर ते अवलंबून असतं. जेव्हा तुमचा आत्मा तुम्ही विकायला काढता तेव्हा प्रतिष्ठा धूळीस मिळते. तुमची माणुसकी, चांगुलपणा पणाला लावता तेव्हा इज्जत धूळीला मिळते. अन्वर जेव्हा नवाब अख्तरला हे समजावून सांगत असतो, तेव्हा त्याचे हे बोलणे कोणत्याही समाजातल्या नितीमत्तांना आणि मूल्यांना साजेसेच असते. त्यामुळे त्यात काहीही अतिशयोक्ती वाटली नाही. नवाब अख्तर चित्रपटाच्या शेवटी आपली राजेशाही हवेली सोडून बाहेर पडतो.
पन्नास ते साठच्या दशकातल्या सरंजामशाहीची कालबाह्य मूल्ये मोडीत काढायला निघालेल्या, स्वतंत्र भारताच्या लोकशाही समाजाच्या दृष्टीने चित्रपटातली ही मूल्ये आणि हा शेवट सुसंगत असाच होता.
साठपर्यंतच्या दशकातल्या मुस्लिम सोशल्स सिनेमांमधून नवाबी, सरंजामी वातावरणातून आलेल्या, जुन्या संकुचित विचारसरणीच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या आणि त्यातून बाहेर पडू इच्छिणार्‍या मध्यमवर्गीय, उदार विचारसरणीच्या, सुशिक्षित नायकांच्या व्यक्तिरेखा दिसल्या.
हे मुस्लिम नवयुवक स्वतःला नव्याने घडवू पहाणारे होते. नवाबी घराण्याला महत्व न देता बाहेरच्या जगातल्या, खुल्या सांस्कृतिक वातावरणात ते रममाण होणारे नायक होते. कवी होते, शायर होते. सच्च्या, प्रामाणिक मनोवृत्तीचे होते.
ऐलान सिनेमातला जावेद, मेरे मेहबूब मधला अन्वर, चौदहवी का चांद मधला अस्लम, पालकी मधला नसिम, बहू बेगम मधला युसूफ या सार्‍या मुस्लिम नायकांच्या व्यक्तिरेखा खानदानी मुस्लिम पार्श्वभूमीमधून आलेल्या, सुसंस्कृत, आधुनिक जगात भक्कम पाय रोवणार्‍या आणि भविष्याकडे आशेने पाहणार्‍या अशा होत्या.
अजून एक कुतूहलजनक गोष्ट या दशकातल्या मुस्लिम सिनेमांमधे समान आहे. या सिनेमांमधल्या प्रेमकहाण्या बहुतेककरुन कॉलेजच्या पार्श्वभूमीवर खुललेल्या आहेत.
पर्दानशिन आणि तरीही कॉलेजात शिकणार्‍या नायिका म्हटल्यावर साधनाचे नकाबाआडचे ते सुंदर डोळे आणि नायकाशी टक्कर झाल्यावर खाली विखुरलेली पुस्तके गोळा करणारे तिचे नाजूक हात कोणाला आठवणार नाहीत? आणि त्यातला तो शेरवानी घातलेला, भावूक मनोवृत्तीचा " मेरे मेहबूब तुझे मेरे मुहोब्बत की कसम.. आ मुझे फिर उन्ही हाथोंका सहारा दे दे.." गाणारा नायक.
मेरे मेहबूब मधल्या 'अन्वर आणि हुस्ना' ला मिळालेले स्वातंत्र्य, प्रेम करण्याची मुभा ही केवळ आणि केवळ उच्च शिक्षणामुळेच मिळालेली आहे असा एक अप्रत्यक्ष संदेश मुस्लिम युवकांना यातून मिळत गेला नसल्यास नवलच
मेरे मेहबूब, मेहबूब की मेहंदी, बहूबेगम इत्यादी सर्वच सिनेमांमधे हा माहोल होता. कॉलेजातले शिक्षण आणि प्रेम यांची हमखास एकत्र सांगड घालणारा हा जमाना. मुशायर्‍यामधून गाणारा, आपल्या मनातल्या भावना रेडिओवरुन नायिकेपर्यंत पोचवणारा, कॉलेजातल्या 'पोएट्री कॉम्पिटिशन' मधे भाग घेणारा नायकही याच चित्रपटांची देन. .
मुस्लिम सामाजिक चित्रपटांचा पाया या सुरेल सिनेमांनी घातला. हळवा रोमान्स यात काठोकाठ भरुन होता.
मेरे मेहबूब प्रमाणेच 'दिल ही तो है' मधेही प्रमुख मुस्लिम नायक नायिकांच्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात राज कपूर आणि नूतन या नॉन मुस्लिम कलाकारांनी साकारल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना सहज स्विकारलं. " जिस घडी मैने तेरा चांद सा चेहरा देखा.. ईद हो के ना हो मेरे लिए ईद हुई.." असं म्हणणारा नूतनचा गोड चेहरा मुस्लिम सामाजिक प्रेमकथेमधे सहज मिसळून गेला.
कवी वृत्तीच्या, संवेदनशील विचारांच्या गुरुदत्तलाही याच पार्श्वभूमीवर सिनेमा काढायचा मोह व्हावा यात नवल काहीच नाही. त्याने प्रमुख भूमिका केलेला 'चौदहवी का चांद' या काळातला महत्वाचा मुस्लिम सोशल सिनेमा. त्याचा सहाय्यक अब्रार अल्वीने दिग्दर्शित केलेला 'साहिब, बिबी और गुलाम' जरी बंगालच्या जमिनदारी पार्श्वभूमीवरचा असला तरी त्याचे सारे सेटिंग हे टिपिकल मुस्लिम सोशल चित्रपटासारखेच होते.
मुस्लिम समाजातली स्त्रियांवर लादलेली 'पर्दा' पद्धत त्याकाळातल्या खानदानी, सरंजामशाही हिंदू समाजाला अनोळखी वाटण्याचे काहीच कारण नव्हते. साहिब बिबी मधल्या छोटी बहूच्या घुसमटण्यातून त्याचेच दर्शन झाले.
मुस्लिम सामाजिक सिनेमांमधून मात्र या 'पर्दा' किंवा 'नकाब' चे रोमॅन्टिक उदात्तीकरण जास्तच केले गेले. उदा. पालकी चित्रपटातले हे गाणे-
चेहरे से अपने आज तो पर्दा उठाईये
या इल्लाह मुझको चांदसी सूरत दिखाईये
अशी अनेक गाणी सापडतील.
नायिकेला बेपर्दा करुन तिचे सौंदर्य न्याहाळण्याची आस असलेला कवीहृदयाचा नायक आणि बुरख्याचा फायदा घेऊन नायिका बदलण्याचा डाव रचणारे खलनायक, हवेलीतली बेगम आणि कोठ्यावरची तवायफ अशी दोन टोकं असणार्‍या व्यक्तिरेखा दाखवून चांगल्या- वाईटाचा ठळक फैसला हे चित्रपट करत होते.

पण मग सत्तरचं दशक आलं आणि हिंदी चित्रपटांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखांच्या चित्रणात जाणवण्याइतका फरक पडला.
या काळातल्याही बर्‍याचशा व्यक्तिरेखा नवाबी होत्या पण त्यांच्यात तो खानदानी रुबाब शिल्लक नव्हता. ह्या व्यक्तिरेखा बहुतांशी ऐय्याश, उधळ्या, व्यसनी, कोठ्यावरच्या नाचगाण्यांमधे, मुजर्‍यामधे रमलेल्या, घरातली धनसंपत्ती दौलतजाद्यावर उधळणार्‍या अशा होत्या. उदा, मेरे हुझूर, पाकिझा, उमराव जान वगैरे मधले नवाब. पण बाकी सुरेल संगित, देखणे सेट, उत्तम केश-वेशभुषा, उत्कृष्ट अभिनय, डौलदार संवाद ही मुस्लिम चित्रपटांतली इतर सारी वैशिष्ट्ये यात पुरेपूर भरुन होती. चित्रपट अर्थातच रसिकांनी डोक्यावर घेतले.
या सिनेमांमधल्या पुरुष व्यक्तिरेखा कमकुवत, ऐय्याश होत्या आणि कोठ्यावर मुजरा करण्याचे नशिबी आलेल्या नायिका असहाय्य, आणि तरीही कुठेतरी स्वतंत्र, संवेदनशील वृत्ती जोपासणार्‍या, वेगळे जीवन जगण्याची इच्छा असणार्‍या होत्या. पाकिझामधली साहेबजान, उमरावजान मधली उमराव जान अदा.. या व्यक्तिरेखा हिंदी सिनेमांमधल्या ज्या काही मोजक्या, सशक्तपणे रेखाटलेल्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यांपैकी महत्वाच्या अशाच.

सत्तरच्या दशकातच समांतर सिनेमांची चळवळ सुरु झाली. ऐलान, सलिम लंगडे पे मत रो सारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमधून निम्न-मध्यमवर्गीय आर्थिक स्तरातल्या मुसलमान तरुणांच्या दिशाहीनतेवर भाष्य होतं. 'गर्म हवा' सारखा दर्जेदार, वेगळ्या पठडीतला संवेदनशील सिनेमाही सत्तरच्या दशकातच आला. गर्म हवा मधल्या मुस्लिम कुटुंबातून दिसलेले भारत पाक फाळणीमुळे जन्माला आलेले मानवी कारुण्य काळजाला स्पर्श करणारे होते.
सत्तरच्या दशकातल्या उत्तरार्धात आलेले दोन मुस्लिम सामाजिक चित्रपट महत्वाचे ठरतात. - निकाह आणि बाजार.
मुस्लिम समाजातल्या काही रुढींवर नकारात्मक टीका करणारे भाष्य पहिल्यांदाच ठळकपणे, कोणत्याही रोमॅन्टिक उदात्तीकरणाशिवाय केले गेलेले याच चित्रपटांमधुन दिसले.
बी.आर.चोप्रांच्या 'निकाह'ची कथा सशक्त होती. मुस्लिम समाजातल्या वाईट बाजूंना प्रकाशात आणणारी होती. उदा.मुस्लिम पुरुष कसे सहजतेनं, नुसतं ३ वेळा 'तलाक' शब्द उच्चारुन बायकोला निराधार आणि असहाय्य करु शकतात. पण यातल्या फॅक्ट्स तपासल्या नाहीत, इस्लाम असे सांगत नाही वगैरे विरोध करुन मुस्लिम समाजातल्या बर्‍याचशा कट्टर धर्मवाद्यांनी हा सिनेमा नाकारला.
मात्र 'बाजार' सिनेमाच्या बाबतीत त्यातून दिसणारे ढळढळीत, कटू वास्तव नाकारणे कोणालाच शक्य नव्हते. हा सिनेमा प्रत्यक्ष घडलेल्या, सत्य घटनेवर आधारीत होता. इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजाला टीकेच्या खाईत लोटणार्‍या, त्या समाजातल्या अशिक्षित, अल्पवयीन मुलींना पैशाच्या लोभापायी बाजारातल्या गुरांप्रमाणे विकण्याच्या एका घातक रॅकेटला उजेडात आणणारा होता.
हैद्राबादेतले गरीब मुस्लिम घरांतले आईवडिल, आपल्या दारिद्र्यावर उपाय म्हणून अल्पवयीन मुलींचा निकाह प्रौढ, श्रीमंत अरबांशी लावून देण्याच्या सत्य घटनांवर आधारीत 'बाजार' चित्रपटाने मुस्लिम समाजातील विदारक, काळ्या बाजूला समाजासमोर उघडे पाडले आणि वेगळेही पाडले.
बहुसंख्य भारतीय समाजाने हा मागासलेला, वाईट चालिरितींचा नव्याने पायंडा पाडणारा, स्त्रियांना कस्पटासमान लेखणारा समाज जणू नाकारुन टाकला. प्रगत विचारसरणीच्या, सुशिक्षित मुस्लिम समाजाने आपल्या समाजाची ही काळी बाजू टीकेस योग्य मानली. पण धर्मवादी, कट्टर मुस्लिम मुग गिळून गप्प राहिले. वर वर एकसंध वाटणार्‍या या दोन भिन्न विचारसरणीच्या धार्मिक संस्कृती, समाजात आणि कलेच्या प्रांतातही न सांधणार्‍या तफावतीने दुभंगण्याची सुरुवात सत्तरीच्या दशकात अशा तर्‍हेने होत होती.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर मुस्लिम समाजातील व्यक्तिरेखा संपूर्ण तीन तास लांबीच्या चित्रपटांमधून दिसण्याची सुद्धा ही अखेर ठरली.
हिंदी सिनेमांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखा हळूहळू १५-२० मिनिटांच्या अवधीत बसवणे सर्वांनाच सोयीस्कर वाटू लागले. उदा.- शोलेतला रहिम चाचा, मुकद्दर का सिकंदर मधली जोहराबाई.
आता चित्रपटांमधल्या मुस्लिम व्यक्तिरेखा अलिगढ कट शेरवानी घालणार्‍या, डोक्यावर जरीची, मळकी टोपी , पान तंबाखू चघळणार्‍या, तोंडातून ओघळणारे पानांचे लाल ओघळ पुसत इक्बाल-गालिबची शेरोशायरी वाक्यावाक्यातून झाडणार्‍या, आणि यातल्या स्त्रिया बुरखा किंवा जड, भरजरी लेहंगा, तोंडावर भडक रंगरंगोटी केलेल्या, कानात हैद्राबादी झुमके घालणार्‍या किंवा वयस्कर अम्मीजान टाईप पान चघळणार्‍या, नमाज पढणार्‍या अशा होत्या.
या व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या की आता कव्वाली नाहीतर मुजरा किंवा गझल ऐकायला मिळणार हे प्रेक्षकांना तोंडपाठ झाले. मुस्लिम संस्कृती म्हणजे कव्वाल्या, मुजरा हेच समिकरण रुढ झाले.
मुस्लिम समाजाची काही वेगळी परिमाणं पडद्यावरुन दिसणं बंद झालं.
सत्तरीच्या दशकाच्या अखेरीला हिंदी सिनेमाचाही चेहरामोहरा झपाट्याने बदलत गेला. मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधल्या गुन्हेगारी जगताला केन्द्रस्थानी ठेऊन सिनेमे निघायला लागाले.
ऐंशीच्या दशकाची सुरुवातच झाली अंडरवर्ल्ड डॉनचे चित्रण मुस्लिम व्यक्तिरेखेवर आधारित होताना पहाणे प्रेक्षकांनी सहज स्विकारले. पडद्यावरची नावं मुस्लिम नसली तरी या व्यक्तिरेखा प्रत्यक्ष समाजातल्या कोणत्या डॉनवर किंवा गुंडांवर बेतल्या गेल्या आहेत हे सहज लक्षात येई.
निगेटिव्ह, खलनायकी स्मगलर्स कधी अरबी झगा घालून सिगार ओढणारे होते, कधी पांढरा सफारी घालून, डोळ्यांना सोनेरी काड्यांचा काळा चष्मा, हाताच्या दहाही बोटांत सोन्याच्या जाडजुड अंगठ्या, हातात नोटांनी भरलेली ब्रीफकेस घेतलेले हे ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपटांच्या पडद्यावरचे मुस्लिम व्यक्तिरेखेचे सहज दिसणारे दृष्य.
ऐंशीचे दशक संपता संपता हा ट्रेन्ड जास्तच ठळक होत गेला. गुलाम-ए-मुस्तफा, अंगार मधली मुस्लिम व्यक्तिरेखांची चित्रणं भडक होती.
एकंदरीतच हिंदी सिनेमाच्या पडद्यावरुन नॉर्मल, सुशिक्षित मुस्लिम नागरिक, ज्याला काही धार्मिक, कडवी, गुन्हेगारी परिमाणं चिकटलेली नाहीत, अशा व्यक्तिरेखा एकदम गायब झाल्या.
मध्यमवर्गिय समाजातही त्या कुठे दिसेना.
धार्मिक मुसलमानाचे चित्रण प्रतिकात्मकरित्या व्हायला लागले. यालाच समांतर असे काही अर्धे-कच्चे हिंदू-मुस्लिम ऐक्याला धरुन चित्रपट काढण्याचे प्रयत्नही होत होतेच. पण त्यांची हाताळणी हास्यास्पद, प्रचारकी होती. त्यांच्यात करमणूक मूल्यही धड नव्हते. इमानधरम, क्रान्तीवीर सारख्या सिनेमांमधून असे बटबटीत प्रसंग अनेक दिसले. त्यापेक्षा मग मनमोहन देसाईंच्या अमर अकबर अ‍ॅंथनीमधला धार्मिक ऐक्याचा मसाला सुसह्य होता. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांची आजपर्यंत पडद्यावर साकार झालेली सारी सांकेतिक, ढोबळ रुपे त्यांनी यात भाबडेपणाने आणली. पण निदान निखळ करमणूक हा एकमेव हेतू तरी प्रामाणिकपणे निभावला गेला होता.
१९९५ मधे आलेल्या 'बॉम्बे' मधे हिंदी सिनेमांतल्या मुस्लिम व्यक्तिरेखांना पुन्हा एकदा नवे पैलू मिळाले. १९९३ मधे मुंबईतल्या बॉम्ब स्फोटांच्या, त्यानंतरच्या उसळलेल्या दंगलीच्या जखमा अजूनही समाजाच्या मनावर ताज्या होत्या. या दंगलींची पार्श्वभूमी असलेल्या 'बॉम्बे' मधे हिंदू मुलाच्या प्रेमात पडून पळून जाणारी मुसलमान मुलगी होती, धर्मापेक्षा प्रेम महत्वाचे मानण्याचा यातला विचार प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रोमॅन्टिसिझमच्या पांघरुणामुळे स्विकारला. धार्मिक ओरखड्यांवर प्रेमाचे हे मलम कदाचित तात्पुरते सुखावह वाटले असावे.
वीर-झारा सारख्या सिनेमामधूनही हा रोमॅन्टिसिझम खास चोप्रा पद्धतीने भारतीय मुलगा आणि पाकिस्तानी मुलगी यांच्यातले प्रेम देश की मिट्टी, दोन्ही धर्मियांचे रक्त एकच, संस्कृतिचा वारसाही एकच वगैरेची फोडणी देऊन पडद्यावर आला. पण तोपर्यंत भारतीय समाजाचा एकमेकांच्या संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन साफ बदलला होता हे निश्चित.
हिंदी सिनेमांमधून आता मुस्लिम संस्कृतिचे नाही तर धर्माचे चित्रण होत होते.
सरफरोश सारख्या सिनेमांमधून सीमेवरुन चोरट्या मार्गाने भारतात घुसून कारवाई करणार्‍या, कलावंतांच्या बुरख्या आड आपला कडवा, धार्मिक, भारतद्वेषाचा चेहरा लपवणार्‍यांचे बुरखे फाडण्याचे प्रयत्न थेट झाले.
या पुढच्या सिनेमांनी मुस्लिम म्हणजे जिहाद, टेररिस्ट या समिकरणांना घट्ट केले. 'बॉम्बे' काढणार्‍या मणीरत्नमने आता त्याच्याच 'रोजा' मधून आता मुसलमानांची राष्ट्रीयता आणि जिहादी दहशतवाद यांच्यातला संघर्ष ठळकपणे अधोरेखित केला.
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आता एखाद्या धबधब्यासारखे असे चित्रपट कोसळत राहिले. काही भडक होते, काही संवेदनशिलतेने भिडणारे होते. मा तुझे सलाम, पुकार, गदर, फिझा, मिशन काश्मिर, बॉर्डर, एलओसी, फना या सर्व चित्रपटांना आंतराष्ट्रीय मुस्लिम दहशतवादी कारवायांची पार्श्वभूमी होती.
दशतवाद्यांचा चेहरा, मोहरा, पेहराव, मुखवटा आंतरराष्ट्रीय असला तरी त्यामागचा मुस्लिम चेहरा लपून राहणारा नव्हताच. दहशतवादाला दुसरा चेहरा असूच शकत नाही हे या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात घट्ट रुजवले गेले. त्यात काही विकृत रंगही होते पण प्रेक्षकांनी सर्व सिनेमे उचलून धरले कारण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत दहशतवादाचा काळा चेहरा येऊन ठेपला होता. कोंडलेल्या, असहाय्य संतापाला सिनेमाच्या पडद्यावरुन वाट मिळत होती.
मात्र यात पडद्यावरच्या हिंदू देशप्रेमाला आणि राष्ट्रीयत्वाला झपाट्याने भडक राजकारणी रंगही चढत गेलेले लपून राहिले नाहीत.
'ब्लॅक फ्रायडे' सारखा एखादाच सिनेमा ज्याने तटस्थपणे आणि खरेपणे मुंबईवरील बॉम्बहल्ल्यामागच्या मुस्लिम कारवायांचे अत्यंत थंड डोक्याने केलेले सारे कटकारस्थान चित्रपटाच्या पडद्यावर कोणत्याही भडकपणा शिवाय दाखवले. घटनाच इतकी भडक होती की त्याला अजून कसलाही रंग द्यायची गरजच नव्हती. समाज हा चित्रपट पाहून सुन्न झाला.
अमेरिकेतल्या ९/११ घटनेनंतर तर आंतराराष्ट्रीय दशतवादाचा मुस्लिम चेहरा जगभरात उघडा पडला. भारतात दहशतवादी पडसाद जास्त तीव्रतेने उमटत होते. रोज उठून या कारवायांच्या नव्या बातम्या कधी स्वतःच्या शहरात, कधी दूरच्या सीमेवर घडत असलेल्या वाचाव्या लागत होत्या.
एकंदरीतच भारतात काय किंवा जगातही, काही असेही मुस्लिम तरुण असतील जे तुमच्या आमच्यासारखे रोज उठून ऑफिसला जात असतील, गाणी ऐकत असतील, पुस्तक, वृत्तपत्रे वाचत असतील, चहा पित असतील, हास्यविनोद करत असतील, आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाची काळजी करत असतील यावर कोणाचा सहजी विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती आली. दहशतवादी मुस्लिम तरुण कसे प्रशिक्षण घेतात, त्यांची मजबुरी, त्यांच्यावरही होत असलेले अन्याय वगैरेंना केन्द्रस्थानी ठेऊन या काळात काही चित्रपट बनले.
दहशतवाद्यांचा एक चेहरा माणसाचाही असतो वगैरे विधाने सामान्य माणसाने फारशा सहानुभूतीने स्विकारली नाहीत पण असे चित्रपट मात्र बनले, काही गाजले. उदा. गँगस्टर.
९/११ नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम चेहर्‍याला मिळत असलेली सावत्र वागणूक आणि त्याचा सामान्य, निरपराध मुस्लिम नागरिकांना, जे आहेत यावरही आता कुणाचा विश्वास राहिला नाही, त्यांची बाजू मांडणार्‍या कुर्बान, माय नेम इज खान, न्यूयॉर्क सारख्या चित्रपटांनी एकविसाव्या शतकाची अखेर झाली.
हिंदी सिनेमांमधून सकारात्मक, सामाजिक संदेश देणार्‍या चित्रपटांची संख्या आजवर नेहमीच जास्त राहिलेली आहे. समाजात एकत्रितपणे नांदत असलेल्या इतर धर्मियांची संस्कृती अगदी भाबड्या, एकसाची वाटाव्या इतक्या, पण शक्य तितक्या चांगुलपणानेच पडद्यावर आत्तापर्यंत चितारली गेली. त्यांना कधी विनोदाचे रंग दिले, कधी कारुण्याचे. त्या त्या धर्माच्या लोकांनीही ते सहजतेने स्विकारले.
शिख धर्मिय म्हणजे उदार, विशाल हृदयाचे, प्रामाणिक, निर्भय, कष्टाळू, आनंदी, ख्रिश्चन म्हणजे दयाळू, साधे, देवभक्त, अनाथ मुलांना आसरा देणारे, गोव्याचे असतील तर मौजमजा करुन जीवनाचा आनंद उपभोगणारे वगैरे.
हार्मनी हा भारतीय सिनेमांचा कायमच परवलीचा शब्द राहिलेला आहे. अशा वेळी अशी एक संस्कृती जी भारतात अनेक पिढ्या बरोबरीने नांदली, भारतीय कला, स्थापत्य, संगित, नृत्य, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत राहिली, अजूनही उमटवते आहे. त्या संस्कृतीचा संपूर्ण र्‍हास भारतीय चित्रपटाच्या पडद्यावरुन होणे ही गोष्ट खेदाची वाटते.
संस्कृतीच्या विलोभनीय रंगांवर धार्मिक कडवटपणामुळे जो काळा फराटा उमटला आहे तो आता दीर्घकाळ भारतीय सिनेमाच्या पडद्यावरुन आपले अस्तित्व दाखवत रहाणार हे निश्चित.
समाजाच्या अंगावर रक्तबंबाळ ओरखडे जोपर्यंत उमटत रहाणार आहेत तोपर्यंत तरी निश्चितच.
साहिरच्या भाषेत बोलायचे तर- हालात से लडना मुश्किल था, हालात से रिश्ता जोड लिया. जिस रात की कोई सुबह नही उस रातसे रिश्ता जोड लिया..
=================================================
लेख श्री व सौ मासिकामधे पूर्वप्रकाशित. 

Sunday, December 04, 2016

सिनेमा आणि संस्कृती- लग्न (एक)

सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.
सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. १९१३ साली दादासाहेब फाळक्यांनी पहिला बोलपट प्रदर्शित केला त्यानंतर आजतागायत समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्‍यानचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं उमटत गेलं.
हिंदी सिनेमांमधेही प्रयोग झाले, स्थित्यंतरं झाली, जागतिक सिनेमाच्या तोडीचे दिग्दर्शन, कथा अपवादाने का होईना पडद्यावर दिसल्या, त्या अ‍ॅप्रिशिएटही झाल्या पण मुख्य प्रवाहात बनत रहाणारे सिनेमे आणि ते बघणारे प्रेक्षक कुठेतरी पक्के परंपरावादीच राहिले. स्त्रिया, स्त्री-पुरुष नातेसंबंध, रितीरिवाज, मुले, सणवार, एकत्र कुटुंब पद्धती, खेड्यांमधली जीवनपद्धती, शहरी जीवन, नोकरीधंदा, तरुण पिढी, म्हातारी होत गेलेली पिढी अगदी सगळ्या सगळ्यांवर सिनेमे आले पण त्यांचा मुळ गाभा हा भारतीय समाजजीवनातल्या परंपरांचे गोडवे गाणारा, नात्यांमधल्या घट्ट विणीचे कौतुक करणाराच राहीला.
या सर्व सिनेमांच्या स्टोर्‍या पडद्यावर साकार झाल्या तेव्हा पारंपरिक नाती, रिवाजांचे बोचणारे कंगोरे, टोचणारे कोपरे मोठ्या खुबीने गुळगुळीत केले गेले, चालिरितींना, परंपरांना सोयीनुसार कधी भडक, अवास्तव स्वरुप देऊन तर कधी मवाळ, कुणाच्या धार्मीक, भावनीक संवेदनांना न दुखवेल असं सौम्य करुन सिनेमाच्या पडद्यावर साकार केलं गेलं. तसं केलं की (च) सामान्य प्रेक्षक सुखावतो ह्याची पक्की जाण जणू हे असे सिनेमा बनवणार्‍यांच्या गुणसूत्रांमधे, आणि जुन्या चालिरितींना ग्लोरिफाय करणं म्हणजेच आदर्शवादी भारतीय संस्कृतीची परंपरा पुढे चालवणं अशी जाण ते इथल्या प्रेक्षकांच्या गुणसूत्रांमधे जन्मतःच येत असावी.
साहजिकच मग संस्कृतीचं जे प्रतिबिंब सिनेमांमधे उमटत गेलं ते दिखाऊ, झगमगीत आणि फँटसीचा मुखवटा चढवून. इथल्या काचेच्या चंद्राचं चांदणं कितीही झगमगतं दिसलं तरी राहीलं आभासीच. समाजातल्या काळ्या वास्तवाला उलट एक रुपेरी झिलई चढवण्याची किमया त्यामुळे सहजी शक्य झाली.
या सार्‍याचं अगदी सहजी नजरेसमोर येणारं उदाहरण म्हणजे सिनेमांच्या पडद्यावर आत्तापर्यंत साकार झालेली 'लग्न'. फिल्मी भाषेतच बोलायचं तर 'शादी'.
सिनेमांमधे लग्नाशी संबंधित चित्रपटांची सुरुवातीच्या काळापासून मोठी परंपरा आहे. अगदी आधीचे सामाजिक समस्यांवरचे 'कुंकू' किंवा 'अछुत कन्या' पासून 'वर्‍हडी वाजंत्री' ते 'नवरी मिळे नवर्‍या' ला आणि अलीकडच्या सनई चौघडेसारखे मराठी सिनेमे असोत, बटबटीत पंजाबी लग्न भव्यपणे हिंदी पडद्यावर आणणारे चोप्रा-जोहर असोत किंवा अलीकडच्या काळातले पार्टनर स्वॅपिंगवर आधारीत मल्टिप्लेक्सी मुव्हीज असोत 'लग्न' हीच मुख्य थीम.
हिंदी-मराठीच कशाला? हॉलिवुडच्या सिनेमांमधेही 'वेडिंग' या थीमशी संबंधित चित्रपटांची अक्षरशः भली मोठी यादीच आहे. अगदी १९३५ साली आलेल्या 'द वेडिंग नाईट' पासून २००९ मधल्या 'ब्राईड वॉर्स' पर्यंत. या अशा सिनेमांमधून दिसणार्‍या लग्नांमधे किती तोच तोचपणा आहे, किती वेगळेपणा आहे, दिखाऊगिरी किती आणि वास्तव किती यावर नजर टाकली तर आपोआपच एक मोठा वेगवेगळ्या संस्कृतींचा एकत्रित ओघ त्यातून दिसतोय असं वाटतं.
------------------------------------------
साठ सत्तरच्या दशकातले अगदी मोजके अपवाद वगळता पडद्यावर आलेला प्रत्येक हिंदी सिनेमा कुठेना कुठेतरी लग्नाशीच संबंधित होता. सिनेमातलं सगळं काही शेवटी होणार्‍या लग्नाच्या दिशेनेच चाललेले. त्याचे-तिचे भेटणे, त्यांचे लडाई-झगडे, त्यातूनच मग ती सुप्रसिद्ध मोहोब्बत, प्यार के वादे-इकरार वगैरे. मग लग्न ठरवणे, खानदान की इज्जत, मग अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, हाणामार्‍या, दु:ख, जुदाई मग परत एकत्र येणे आणि या सार्‍या प्रवासानंतर (प्रत्येक टप्प्यावरची प्रसंगांना अनुसरुन गाणी ऐकल्यानंतर अर्थात)एकदाची शेवटी येणारी 'द एन्ड'ची पाटी हिंदी सिनेमाचा प्रेक्षक जेव्हा वाचतो तेव्हा त्याचा अर्थ त्याच्या मनात आपोआप 'तो आणि ती सुखाने नांदू लागले' असाच इंटरप्रिट केला जाईल अशीच रचना त्या अख्ख्या सिनेमाची.
काही सिनेमांमधे लग्न अ‍ॅक्चुअली दाखवली आणि तरीही स्टोरी पुढे सरकत राहीली खरी पण तो प्रवास बहू, सांस्,देवर वगैरे नात्यांच्या खाचखळग्यांमधूनच जाणारा राहीला. थोडाफार दर्दभराच हा प्रवास! त्याचाही प्रेक्षक स्वतंत्र. पण तो असतोच. म्हणून मग हा प्रवास.
काही थोडंफार वास्तवाचे भान असणार्‍याच दिग्दर्शकांनी चक्क वैवाहिक जीवन, त्यातले ताण-तणाव, समज गैरसमज वगैरेही दाखवले. किंवा मोडलेली लग्नंही. ती कां मोडली यावर भाष्य,विश्लेषण मात्र फारशी सखोल नव्हती. नातेसंबंधातली गुंतागुंत, गहराई ही कुठे ना कुठे कळत न कळत म्हणा किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या अशा चित्रपटांमधूनही बहुतांशी शेवटी सुखी होणार्‍या लग्नाशीच संबंधीत राहिली.
भारतीय लग्नसंस्कृतीतला पडद्यावरच्या आणि प्रत्यक्ष आयुष्यातही जाणवण्यासारखा बदल झाला गेल्या काही वर्षांमधे.
१९९४ मधे 'हम आपके है कौन' पडद्यावर झळकला. आणि त्यातल्या निशा आणि प्रेमच्या लग्नाने संपूर्ण भारतातल्या लग्नसंस्कृतीतच आमुलाग्र बदल घडवून आणला. तोपर्यंत 'लग्न' हा एक धार्मिक समारंभ म्हणूनच प्रामुख्याने मानला गेलेला. त्या त्या घरांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, सामाजिक प्रतिष्ठेनुसार हे लग्नसमारंभ 'दणक्यात', 'साधेसुधे' 'जेवणावळ-पंगती' सोबत कधी कधी 'रिसेप्शन'ही असणारे असे पार पडत होते. पण मग हा सिनेमा आला आणि लग्नसमारंभ बघता बघता एक 'इव्हेन्ट' झाला. त्याना 'शोकेस'चं स्वरुप आलं. डिझायनर साड्या, प्रोफेशनल मेकप, मेहेंदी-संगित, व्हिडिओ शुटिंग, पंचतारांकित बुफे, स्टेज डेकोरेशन्स, थीम, डिजे, बारात, फुलांच्या पायघड्या, पालखी, बिदाई.. एक ना दोन. शोकेसमधल्या सजावटीला अक्षरशः उत येत गेला. 'HaHK' काय कमी होता म्हणून मग त्यानंतर २००१ साली आला मीरा नायरचा 'मान्सून वेडिंग'. मग २००४ ला गुरिन्दर चढ्ढाचा 'ब्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडिस' आला.
जोहर-चोप्रा ब्रॅन्ड सिनेमे मधल्या काळात येतच होते. यावेळीच परदेशातल्या 'वेडिंग प्लॅनर्स' मंडळींचा यात शिरकाव झाला. एन आर आय मंडळींच्या हौसेमौजेला 'भारतीय लग्नां'मुळे एक नवे झगमगते परिमाणच लाभले आणि बघता बघता ही भारतीय लग्नं जगभरात 'अ बिग फॅट इन्डियन वेडींग' म्हणून 'ब्रॅन्डेड' झाली. मिलियोनेर वेस्टर्नर्स त्यासाठी जयपूर उदयपूरचे महाल, ताज हेरिटेजचे स्वीट्स महिनोनमहिने बुक करुन या 'एक्झॉटिक इव्हेन्ट्स'चा आनंद लुटायला लागली. त्यासाठी भारतातल्या काही शहरांत खास 'वेडिंग मॉल्स' बांधले गेले. भारतातली ही नवी 'लग्न-संस्कृती इतकी भरभराटीला आली की न्यूयॉर्क टाईम्सने तिची दखल ' अकरा बिलियन यूएस डॉलर्स' इतक्या प्रचंड ताकदीची आणि दरवर्षी २५% वेगाने वाढत जाणारी 'वेडिंग इंडस्ट्री' म्हणून घेतली.
असं म्हणतात एखादी परंपरा पिढ्यानपिढ्या वाहती रहाते तेव्हा एक संस्कृती जन्माला येते. भारतीय 'लग्नसंस्कृती' आहे त्या स्वरुपात विकसित व्हायला अशाच अनेक पिढ्या उलटून गेल्या असणार. आणि मग अशी नेमकी कोणती ताकद या हिन्दी सिनेमांमधे होती / आहे की त्यांमुळे ही संस्कृती एका पिढीपेक्षाही कमी काळात अशी आमुलाग्र बदलून जावी?
सिनेमांचा प्रभाव संस्कृतीवर इतका पडू शकतो? की सिनेमा संस्कृती हीच आपली संस्कृती मानणारी एक नवी पिढीच आता उत्क्रांत झाली आहे?
'फादर ऑफ द ब्राईड' सिनेमामधे 'डिझायनर वेडिंग' हवं असा हट्ट करुन बसलेल्या आपल्या मुलीच्या आणि पत्नीच्या भरमसाठ पैशांची उधळपट्टीने हैराण झालेला वधुपिता (स्टीव्ह मार्टिन) म्हणतो," मला वाटत होतं 'लग्नं' हा एक साधासुधा प्रकार आहे. मुलगा आणि मुलगी भेटतात, प्रेमात पडतात, तो तिच्यासाठी अंगठीची खरेदी करतो, ती स्वत:साठी पोशाख निवडते आणि मग ते दोघे 'आजन्म एकत्र रहाण्याच्या' शपथा घेतात. पण असं समजणं ही माझी चूक होती. त्याला दोघांचं 'लग्न होणं' म्हणत असावेत बहुतेक. 'लग्न-समारंभ' हा एक मला सर्वस्वी अनोळखी प्रकार आहे. अनोळखी आणि महागडा." हे वाक्य म्हणणारा स्टीव्ह मार्टिन पाहिला आणि मजाच वाटली. सिनेमांमुळे 'लग्नसंस्कृती' बदलली म्हणताना अजून एका सिनेमातच त्यावरची टीका ऐकायला मिळावी!
ठरवून केलेली लग्न किंवा अ‍ॅरेन्ज्ड मॅरेजेस हे भारतीय समाजपद्धतीमधले एक महत्वाचे, अगदी युनिक असे अंग. भारतीय लग्नसंस्कृती उभारली गेली आहे तीच मुळी दोन कुटुंबांनी आपल्या मुलामुलींची लग्ने जुळवायची आणि दोन कुटुंबांमधले नातेसंबंध दृढ करायचे याच समजुतीच्या पायावर. अर्थातच मग कुटूंब आणि ज्यांची लग्न होणार असतात ते दोघे यांच्यातला संघर्ष लग्न ठरताना आणि झाल्यावरही होणे अटळ असते.
अर्थातच त्यामुळे पटकथाकारांना पडद्यावर रोमॅन्टिक, नाट्यमय प्रसंग, संवाद, गाणी पेरायला पुरेपुर स्कोपही मिळत असे त्यामुळे प्रेक्षकही खुश. गेल्या पिढीतल्या या नायिका नायकावर कितीही जीव तोडून प्रेम केलं तरी 'शादी मां बाप के मर्जीके बिना' होणार नाही हे मान्य करणार्‍या होत्या. अगदी यश चोप्रांच्या रोमॅन्टिक 'कभी कभी' मधली राखीही अमिताभला त्याच्या शायरीचं स्फुर्तीस्थान आपणच आहोत हे माहित असूनही, त्याच्यावर प्रेम करुनही, आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणे नाकारताना अगदी 'आपल्याला तसा अधिकारच नाही' वगैरे सांगत अमिताभला समजावते. यातूनच मग पुढे वेगळ्या धार्मिक, सांस्कृतीक पार्श्वभुमीवरचे, लग्न ठरताना होणार्याश संघर्षांवरचेही चित्रपट प्रचंड गाजले. उदा. एक दुजे के लिये, बॉम्बे.
नव्या पिढीच्या सिनेमांमधुन या संघर्षाचे अधिकच तीव्र पडसाद उमटणे अपरिहार्य होते. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांची पुढची पिढी या संघर्षाला कशी सामोरी जाते, भारतीय लग्नसंस्कृतीचा हा अविभाज्य भाग समजावून घेण्याच्या प्रयत्नात त्यांना येणारे यश-अपयश हेही हिंदी सिनेमांमधे दिसले. नागेश कुकनूरच्या हैद्राबाद ब्ल्यूज हा याअर्थाने पहिला प्रातिनिधीक चित्रपट म्हणायला हरकत नाही. विपुल शहाचा 'नमस्ते लंडन' याच संघर्षावर बेतला होता.
झुंपा लाहिरीच्या कादंबरीवर आधारीत, मिरा नायरच्या 'द नेमसेक' मधून याच संघर्षाचा एक वेगळा पैलू अवचित दिसला. सर्वसाधारणपणे स्वैराचारी, मुक्त, संसार मोडणारी बहू दाखवायची तर ती पाश्चात्य असा एक प्रचलित प्रघात हिंदी सिनेमाने रुढ करुन दिला होता त्याला 'द नेमसेक'मधल्या लग्नातून छेद गेला.
आपल्या परदेशात जन्मलेल्या मुलाचे लग्न तिथेच जन्मलेल्या मुलीसोबत करुन द्यायला लागणार हे नाईलाजाने मान्य केलेल्या तब्बूला त्यातल्या त्यात ती मुलगीही भारतीय, अगदी आपल्यासारखीच सुसंस्कृत बंगाली घरातल्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेलीच असावी असं वाटतं आणि आपल्या मुलाचे लग्न ती हट्टाने अशा एका मुलीशी लावून देते. पण नंतर ती मुलगी दुसर्‍याच एका मुलावर आधीपासून प्रेम करत असलेली, पण आईवडिलांच्या आग्रहामुळे लग्न करायला मान्यता देणारी निघते. लग्नानंतरही ती आपलं प्रकरण चालूच ठेवते आणि मग नंतर अपरिहार्यपणे त्यांचा घटस्फोट होतो. मुलगा नंतर एका समजुतदार, त्याच्यावर आधीपासून प्रेम करणार्‍या अमेरिकन मुलीशी लग्न करुन खरा सुखी होतो. 'द नेमसेक'मधे परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबातील इतर सामाजिक बदलांना यशस्वीपणे तोंड देणार्‍या पण लग्नसंस्कृतीमधले पारंपारिकत्व अट्टाहासाने जपायचा प्रयत्न करणार्‍या भारतीयांची मानसिक ओढाताण छान दिसून आली.
क्रमशः--

*लेख श्री व सौ मासिकामधे तसेच मायबोली या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित

सिनेमा आणि संस्कृती- लग्न (दोन)

हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
बागेत, रस्त्यावर, ट्रेनमधे, एअरपोर्टवर, समारंभात, प्रवासात.. हिंदी सिनेमातल्या नायक नायिका जगात कुठही अचानक भेटू शकतात आणि त्यांना आपल्यातल्या जन्म जन्मांतरीच्या रिश्त्याची ओळख पटू शकते. हिंदी सिनेमांमधे पहली मुलाकात ही लग्नापर्यंतच्या प्रवासातली सर्वात महत्वाची आणि आवश्यक पायरी मानली असली तरी बहुतेक वेळा ती खुलवली जाते फ़क्त गाण्यंच्याच माध्यमांतून. पहिल्या भेटीनंतर, परिचय, एकमेकांची ओळख म्हणजे स्वभाव, आवडीनिवडी यांतून परस्परांचा अंदाज घेत, भांडण, गैरसमज, समजुतदारपणा यांचे टप्पे ओलांडत मग परस्परांसोबत लग्नाच्या आणाभाका घेण्यापर्यंतचा प्रवास हा गाण्यांचे थांबे घेत घेत पार पडल्याने फ़ार कमी वेळा यात भावनिक तीव्रता जाणवली.
इंग्रजी सिनेमांमधे मात्र ही गाणी प्रकरण नसल्याने प्रथम भेटीच्या प्रसंगांना खुलवण्यात दिग्दर्शकांची कसोटी लागलेली अनेकदा दिसून आली.
'पी.एस. आय लव्ह यू' नावाच्या एका भावरम्य सिनेमात त्या दोघांचे लग्न होऊन दहा वर्षांचा काळ उलटला असतो. आणि मग तो ट्युमरमुळे मरतो. आजारपणाच्या काळात त्याला जाणवतं की लग्नानंतरच्या दहा वर्षांत ती भावनिक दृष्ट्या आपल्यावर नको इतकी अवलंबून राहिलेली आहे. तिच्या आयुष्याचा फ़ोकसच संपूर्णपणे बदलून गेला आहे. आपण गेल्यानंतर तिला पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आयुष्याची उभारणी करणे किती कठिण जाईल या जाणिवेतून तो अस्वस्थ होतो आणि मग तो तिला पत्र लिहून ठेवतो. आपल्या मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या काही काळात तिला सावरायला मदत करणारी, तिला मार्गदर्शन करणारी, काही निर्णय घ्यायला मदत करणारी ही सारी पत्रं तिला खरंच खूप उपयोगी पडतात.
आणि मग तिला एक पत्र वाचताना कळते की आता हे शेवटचे पत्र.
या पत्रात त्याने ते दोघं दहा वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटले होते त्यावेळचा प्रसंग वर्णन केला असतो. पडद्यावर हा सारा भागच अत्यंत सुरेख खुलवला आहे. आयर्लंडमधे ती हिच हायकिंग करायला आली असताना एकदा रस्ता चुकते आणि त्याला ती रस्त्याच्या मधोमधच अत्यंत गोंधळून जाऊन उभी राहिलेली दिसते.
हिरव्या पिवळ्या गवताच्या कुरणावर एखाद्या रंगीबेरंगी पुष्पगुच्छासारखी ती दिसत असते.
"इतके रंग एकाच व्यक्तिच्या अंगावर मी पहिल्यांदाच पहात होतो," तो मिश्किलपणे पत्रात लिहितो. तिचा निळा पिवळ्या फ़ुलांचा शर्ट, केशरी स्कार्फ़, लाल हॅट, ब्राऊन शूज, पांढरा बेल्ट, जांभळा स्कर्ट. इतके सारे रंग अंगावर ल्यायलेली ती असतेही खूप वेगवेगळ्या तर्‍हेतर्‍हेच्या आवडीनिवडी, छंद, उत्साह मनात जपलेली. उन्मुक्त. तिला रस्ता दाखवत चालत जात असताना त्या दोघांची मैत्री होते. खूप गप्पा करतात ते. ती त्याला कविता म्हणून दाखवते, शब्द विसरत असते मधून मधून पण तरी तिचा उत्साह प्रचंड असतो.
" मला काहीतरी करुन दाखवायचय आयुष्यात. काहीतरी वेगळं." ती त्याला सांगते.
" काय करायचय?" तो कुतुहलाने विचारतो.
"माहीत नाही." प्रामाणिक भाबडेपणाने ती म्हणते," काय ते माहित नाही. पण काहीतरी स्वत:चं. जे फ़क्त मीच करु शकते."
तो पत्रात तिला लिहितो- 'आपल्या त्या पहिल्या भेटीत तुझ्या प्रेमात मी पडलो आहे हे जाणवण्याचा हाच तो क्षण. तु मला आवडलीस. तुझा उत्साह, तुझ्यातली कला, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं आवडलं. आणि तुझा गोंधळही आवडला. तुला नक्की काय करायचय याचा निर्णय घेणं अवघड जातय हे मला समजलं. जोपर्यंत तुला आयुष्यात काय हवय, कुठपर्यंत जायचय हे कळत नाही तोपर्यंत एका दिशा दाखवणार्‍याची गरज तुला नेहमीच भासणार हे मला कळत होतं. तुझ्यावर प्रेम आहे हे उमगलं तेव्हाच मला हेही समजलं होतं. तुला नीट मुक्कामाला पोचवेन हे मी तुला वचन दिलं होतं. आता दहा वर्षांनंतर मला जाणवतय की आपण खूप प्रेमाचा संसार केला असला तरी तुला ती दिशा दाखवायचय अजून राहूनच गेलं. मला ती पहिली भेट आत्ता आठवतेय आणि त्या रस्त्यावरची तु .. जिला काहीतरी स्वत:च करायचं होतं ती मला नीट आठवतेय. पण तु मात्र तिला विसरुन गेलीस.'
पत्र पुरं करताना तो तिला धीर देतो आणि सांगतो, ते माझं वचन आता पुरं होईल. तुला ती दिशा नक्की मिळेल.
लग्न म्हणजे नुसतं एकमेकांवर प्रेम करणं नाही. किंवा खरं तर प्रेमाचा अर्थच मुळी एकमेकांची क्षमता समजून घेत त्याप्रमाणे एकमेकांचं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करत जाणे. एकमेकांच्या सोबतीने प्रवास करताना एकमेकांना सतत ओळखत रहाणे. सिनेमामधे पहिल्या भेटीचा प्रसंग पडद्यावर दाखवताना दिग्दर्शकाने किती सुरेख हा अर्थ उलगडून दाखवला!
आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर' या भव्य, पोषाखी चित्रपटातही तरुण अकबर आणि जोधाने एकमेकांच्या व्यक्तिमत्वांची ओळख करुन घेत, भिन्न संस्कृतींमधून आलेल्या एकमेकांच्या चालीरिती जाणून घेत, समज गैरसमजांवर मात करुन परस्परांच्या ओढीची खात्री पटवत मग प्रेमाच्या कबुलीपर्यंतचा प्रवास आणि तोही लग्न झाल्यावर खूप छान, नजाकतीने खुलवला होता.
भारतीय समाज व्यवस्थेमधे खरं तर एकमेकांना ओळखण्याचा, समजा गैरसमजांच्या कसोटीचा काळ हा लग्नानंतरच सुरु होतो. पण दुर्दैवाने सिनेमांच्या पडद्यावर नेमकी तिथेच 'द एन्ड' ची पाटी येत असल्याने याचे चित्रण दिग्दर्शकांनी अगदी क्वचित केले.. यात बासू भटटाचार्यांचे नाव सर्वात आधी घेणे आवश्यक आहे हे निश्चित. बासूदांनी सत्तरच्या दशकापासून अनुभव, आविष्कार, गृहप्रवेश पासून आस्था पर्यंतच्या सिनेमांमधून पती पत्नी नात्यातले चढ उतार, ताण, अस्थिरता यांचे बर्‍यापैकी वास्तव चित्रण केले.
१९७१ मधे आलेला बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली.
'अनुभव' ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते. त्रुफ़ांच्या चित्रपटांचा प्रभाव आहे असा समीक्षकी दावाही अनेकांनी केला पण यातली सुंदर गाणी, चित्रपटाची हाताळणी, कलात्मकता, पेहेराव आणि मुख्यत: पात्रांचे व्यक्तीचित्रण यांतून हा संपूर्णपणे आधुनिक भारतीय चित्रपटच वाटला हे नक्की.
अमर (संजिव कुमार) आणि मिता (तनुजा) हे मुंबईत रहाणारे लग्नाला सहा वर्ष उलटून गेलेले सुखवस्तू घरातले जोडपे. सहा वर्षांमधेच लग्नाला शिळेपणा आलेला. परस्परांविषयीच्या ओढीला ओहोटी लागलेली. संबंधांमधे तोच तोच पणा डोकावत असलेला.
अमर वर्तमानपत्राचा कायम बिझी संपादक आणि मिता घरात छान छान साड्या नेसून, नीट केस बांधून परफेक्ट पत्नी दिसायचा प्रयत्न करणारी. आपल्या लग्नात नकळत साचलेपणा आलाय, शारीरीक ओढही वाटेनाशी झालीय हे लक्षात आल्यावर मात्र मिता आपल्या दिखावू पत्नीपणाचा बुरखा काढून फ़ेकून देते. घरातल्या सार्‍या कामाचा ताबा घेतलेल्या जुन्या नोकरांना काढून टाकते, स्वत: स्वयंपाक करायला लागते, नवर्‍याकडे वैयक्तिक लक्ष पुरवायला लागते.
वरवर पारंपारिक वाटणार्‍या या दृष्यांमधून सिनेमा चक्क अगदी फ़ेमिनिस्ट वाटावा अशा तर्‍हेने झुकतो. घराचा कंट्रोल घेत असतानाच मिताला स्वत:च्या आयुष्याचा ताबा मिळतो आणि मग नवर्‍याचा आणि संसाराचा. त्याच्या ऑफ़िसात तो बॉस असेल पण घरात संपूर्णपणे तो मिताच्या म्हणण्याला मान देतो, तिच्याबद्दल त्याला आदर वाटायला लागतो. एकत्र जेवण घ्यायला लागताना हळूहळू अमर आणि मिता एकमेकांना नव्याने ओळखायला लागतात.
आणि मग मिताचा जुना कॉलेजातला मित्र अमरचा असिस्टंट म्हणून येतो. मिताचा तो जुना प्रियकर असतो. अमरला हे अर्थातच माहित नसते. मिताला तो अजूनही आवडतो पण आपल्या लग्नाला कोणताही धोका पोचवण्याची तिची तयारी नसते. जुन्या मित्राला ती उगीचच मुद्दाम डाफ़रुन बोलते. अमरला जेव्हा कळतं की मिताचा हा जुना मित्र तेव्हा तो अस्वस्थ होतो. मिता प्रत्येकवेळी अमर जेलस झाला की मनातून खूष होते. वरवर तिने कितीही अस्वस्थ झाल्याचा आव आणला तरी मनातून ती खुष आहे, नवर्‍याच्या जेलसीतून त्याच्या प्रेमाची खात्री पटतेय म्हणून. नवर्‍याला थोडी असुरक्षितता वाटलेली चांगलीच, म्हणजे तो पुन्हा आपल्या प्रेमाला गृहित धरण्याची चूक करणार नाही हे ती उमगून आहे. मिताचा संपूर्ण ताबा आहे आता घरावर, नवर्‍यावर, संसारावर आणि मुख्य म्हणजे स्वत:वर.
बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. मिताचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तिच्या नंतरच्या आयुष्यात नवर्‍याला तिने स्वीकारायला लावणे, इतकेच नाही तर आधीच्या प्रियकराशी कोणत्याही दडपणाखाली किंवा चोरटेपणाने न वागता, आता ह्या लग्नात तुला स्थान नाही हे ठामपणे स्पष्ट करणे आणि तरीही तो आवडतो हे न नाकारणे, लग्नात निर्माण होणारे पेचप्रसंग आत्मविश्वासाने सोडवणे, सुखी संसार असेल तरच नातेसंबंध सुखाचे होतात हे ओळखून असणे, आणि संसार सुखाचा होण्यात मोठा वाटा पत्नीचाच असतो याची जाणीव पतीलाही करुन देणे हे बासूदांनी पडद्यावर फ़ार छान दाखवले.
भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक.
बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.
continued...

*लेख श्री व सौ मासिकात तसेच मायबोली या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित

सिनेमा आणि संस्कृती- लग्न (तीन)

हिंदी सिनेमांमधलं, अनेक पिढ्या बिदाई, घुंगट आणि पतीपरमेश्वर याच्या आसपासच घोटाळत राहिलेलं लग्न नव्या, तरुण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधून बर्‍यापैकी ताजा आणि मोकळा श्वास घ्यायला लागलं. पती-पत्नी नात्यांमधल्या ताण तणावांना न बिचकता, थेट हाताळण्याचं धाडस करण्याचा प्रयत्न यांपैकी अनेकांनी केला. झाडांभोवती फिरत रोमान्स करणारे हिंदी सिनेमांमधले नायक नायिका अशा प्रयत्नांमुळे जरा वैचारिक दृष्ट्या मॅच्युअर्ड वाटायला लागले आणि नशिबाने असे प्रयत्न समजुन घेणार्‍या मॅच्युअर्ड प्रेक्षकांची साथही त्यांना मिळाली.क्वार्टर लाईफ क्रायसिसमधून जाणार्‍या तरुण पिढीला पडद्यावरची लग्न जमवताना, झाल्यावर, नवे नाते टिकवताना होणार्‍या दमछाकीवर बेतलेली पटकथा कधी नव्हे ते स्वतःच्या आयुष्याशी मिळती जुळतीही वाटू लागली.इम्तियाझ अलीने 'ज्याच्याशी लग्न करायचे आहे त्याच्याशी ते न होणे, प्रेम करत असतानाही पालकांच्या दबावामुळे अॅरेन्ज्ड मॅरेजला सामोरे जायला लागणे' ह्या भारतातल्या ९०% मुलामुलींची कथा, त्यांच्या मनात अशावेळी उडालेला गोंधळ याचे चित्रण आजच्या पार्श्वभुमीवर 'सोचा न था' मधून फार सुंदर दाखवला. आजचीच नव्हे तर गेल्या अनेक पिढ्यांमधली मुले मुली या मानसिक द्वंद्वाला सामोरी गेली. आजची तरुण मुले मुली यातून त्यांच्या पद्धतीने कसा मार्ग काढते, बंडखोरी करतानाही कशी गोंधळते, परस्परांवरच्या प्रेमाबाबतही त्यांच्या मनात कधी ठामपणा, कधी साशंकता असे भाव कसे येत रहातात हे इम्तियाझने इतके खरेपणे दाखवले की तरुणच काय त्याआधीच्या पिढीतल्याही अनेकांना ते जवळचे वाटले.
'सोचा न था' मधली नायिका लग्नासाठी 'दाखवून घ्यायला' तयार होते खरी पण मग तेच तेच प्रश्न, एकतर्फी चौकशा यामुळे वैतागून, हताश होते, चिडते. ' जी करता हैं चाय का कप फेकू उसके चेहरेपे' अशा शब्दात आपला संताप व्यक्तही करते. आयेशा टाकियाचा या दृश्यातला अभिनय इतका उत्स्फुर्त होता की असंख्य तरुणी एका क्षणात तिच्या जागी स्वतःलाच बघायला निश्चित लागल्या असणार.
इम्तियाझचा पुढचा 'जब वी मेट' मधली नायिका वास्तवापासून, जे तिच्या मुक्त विचारसरणीच्या आड येतं त्यापासून सतत पळत रहाते. यातली गीत लग्न या प्रकाराकडे, ते सहज मोडता येते असे मानून, कॅज्युअली पहाते खरी पण नात्यांमधल्या जबाबदारीचे तिला कुठेतरी कायम भान आहे. तिच्या व्यक्तिरेखेच्या परिपक्व होत जाण्याला समांतर तिची या जबाबदारीची उमज वाढत जाते. तिला आपल्या मर्जीनेच लग्न करायचे आहे. आपल्या वागण्यामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ती धैर्याने सामोरी जाते. एकटीने निभावून नेते आणि नंतर आपली चूक मान्य करण्याचं धाडस, मोकळेपणाही दाखवते. अगदी प्रत्यक्ष नायकालाही तिच्या विलक्षण सकारात्मक, मुक्त विचारसरणीतून आपल्याला आयुष्यात काय हवय, ते कसं मिळवायचं याबद्दलची एक नवी दृष्टी मिळते हे इम्तियाझने दाखवणे हा प्रकार हिंदी सिनेमाच्या पडद्यावर एक ताजी झुळूक आणणारा होता. नव्या सहस्त्रकातल्या बंडखोर, मुक्त मुलीचे चित्रण आजच्या तरुण पिढीला जवळचे, ते आपलेच आहे असे वाटल्यास नवल नाहीच.
'मैं, मेरी पत्नी और वो' मधे पत्नीच्या सुंदर रुपामुळे न्यूनगंड आलेल्या पतीच्या मनातली असुरक्षितता त्यांच्यातल्या वैवाहिक जीवनात काय काय प्रकार घडवून आणते हे पहाणं हा टिपिकल हिंदी सिनेमापेक्षा एक वेगळा अनुभव होता.
भारतीय लग्नसंस्कृतीमधे प्रेमाला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आणि कुटुंबाची प्रतिष्ठा, व्यावसायिक, राजकीय हितसंबंध यांना महत्वाचे स्थान. या मानसिकतेला बळकटी आणणारी असंख्य लग्नं हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आजपर्यंत आली. अशा लग्नांमधून निर्माण होणारे पती पत्नीचे नाते नक्की कोणत्या पायावर उभारले जाते, त्या नात्याची जडण घडण कशी होतं जाते याचे अलिकडच्या काळातील सुंदर चित्रण आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा-अकबर' मधे दिसले.
लग्नाचा सौदा कसा केला जातो याचे चित्रण मुझफ्फर अलींच्या 'बाझार' मधे अशाच मुस्लिम पार्श्वभुमीवरच्या चित्रपटामधून फार विदारकपणे दिसले होते. ऐंशीच्या दशकात हैद्राबाद, लखनौमधल्या कोवळ्या वयातल्या मुस्लिम तरुणींचे खोटे निकाह करुन त्यांना दुबई, सौदीमधल्या श्रीमंत अरबांना विकण्याचे प्रमाण भयावह होते. त्याचे प्रतिबिंब बाझारमधे उमटले. या आणि अशाच वाईट सामाजिक चालिरितींचे चित्रण 'निकाह' (एकतर्फी तलाकची पद्धत) सारख्या सिनेमांमधूनही झाले. कोठ्यावर नाचगाणी करणार्‍या नायिकेला लग्न करुन सामाजिक प्रतिष्ठा मिळणे किती अवघड असते याचे चित्रणही मुस्लिम पार्श्वभुमीवरच्या 'पाकिझा' या नितांतसुंदर गाण्यांनी नटलेल्या सिनेमामधून या आधी झाले होते. पाकिझामधला आधीच्या पिढीच्या लग्नात परावर्तित न होऊ शकलेल्या विफल प्रेमाची दास्तां सांगत असलेला अशोककुमारचा जनाजा साहेबजानच्या गुलाबी कोठीच्या दरवाजात विसावतो आणि त्याला साक्षी ठेवून तिचा निकाह आणि बिदाई होते. पाकिझाचा हा रोमॅन्टिक, गुलाबी क्लायमॅक्स पुढे जाऊन अशा बदनाम वस्त्यांमधल्या स्त्रियांच्या पुनरुद्धाराचा मार्ग खुला करणारा वगैरे काही नक्कीच ठरला नाही. तसा तो ठरणारही नव्हताच. सिनेमांमधून अशी गोड, सुंदर स्वप्नं बघताना लोकांना छान वाटतं इतकंच. एक तर निकाह केल्याने स्त्रियांच्या मानहानीला खरंच तिलांजली मिळून तिला काही दर्जा किंवा प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते यावर कोणाचा विश्वास असेल अशी त्या समाजात परिस्थितीच निर्माण होऊ दिलेली नाही आजतागायत. निकाह केल्यावर त्या बिचार्‍या स्त्रीची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होते.
हिंदी सिनेमांमधे पंजाबी आणि मुस्लिम कलाकारांचे, निर्माते दिग्दर्शकांचे वर्चस्व आजपर्यंत सर्वात जास्त असल्याने पडद्यावर प्रत्यक्ष दिसणारी बहुसंख्य लग्नं ही बहुसंख्य लग्नही त्याच पद्धतीची चित्रित होत राहिली. फिल्मी लग्नसोहळा म्हणजे सेहरा, लाल जोडा, सात फेरे, मांग में सिंदूर असा समज रुढ झाला तो यातूनच. अगदी क्वचित सई परांजपेंच्या 'कथा' किंवा विशाल भारद्वाजच्या अलिकडच्या 'कमिने' मधून मराठी लग्नसोहळा दिसला. 'कमिने'मधे मराठी नववधूच्या वेशातली नाचणारी प्रियान्का गोड आणि त्या टिपिकल लेहेंगा चुनरी वेषातल्या दुल्हनच्या रुपापेक्षा वेगळी उठून दिसली. पण अशी चित्रणं अगदीच क्वचित. बंगाली लग्न काही बंगाली दिग्दर्शकांच्या 'स्वामी, परिणिता' वगैरे सिनेमांमधून दिसली. परिणितामधले मानसिक पातळीवरचे लग्न हा एक वेगळाच लग्नाचा प्रकार. गांधर्व विवाहांपेक्षाही जास्त सुटसुटीत. भन्सालीच्या देवदासमधे एक झगमगते बंगाली लग्न दिसले. त्याच्याच 'हम दिल दे चुके सनम' मधला गुजराथी लग्नसोहळा सलमान ऐश्वर्याच्या गाण्यांमुळे जास्त लक्षात राहीला. लग्नसोहळ्यांबाबतच अजून बोलायचं तर एखादं पारशी, ख्रिश्चन लग्नं (खट्टा-मिठा, कभी हां कभी ना), एखादे तमिळ लग्न (हम है राही प्यार कें) मधूनच दिसलं हिंदी सिनेमाच्या पडद्यावर.
अगदी क्वचितच एखाद्या ' एक चादर मैली सी' सारख्या हटके सिनेमामधून पती निधनानंतर धाकट्या दिराशी लग्न करण्याच्या पंजाबमधल्या जुन्या सामाजिक चालिरीतीचे दर्शन घडते. राजिंदरसिंग बेदींच्या सशक्त कथानकामुळे सिनेमा आतपर्यंत भिडतो. गुलझारच्या 'खुशबू' मधे बालपणात लग्न ठरलेल्या दोघांचे पुढच्या आयुष्यात बदलत गेलेले नाते, समजुती-गैरसमजुतींचा खेळ, अहंकार आणि स्वाभिमानाचे ताणबाणे गुलझारने आपल्या पटकथेतल्या बारीकसारीक कंगोर्‍यांसह पडद्यावर खूप सुरेख फुलवले. खुशबूतले न बांधले जाणारे विवाहबंधन लक्षात राहीले. मानसिक आंदोलनांचे असे वैवाहिक जीवनातले हेलकावे पडद्यावर साकारावे तर ते गुलझारनेच. आंधी, इजाजत, घर, लेकीन ही काही सशक्त उदाहरणं. असे सिनेमे अधून मधून दिसत रहातात ही गोष्ट नक्कीच सुखावह. एरवी बाकी सारे नुसतेच लग्नसोहळे. तेही पंजाबी.
लग्न जुळण्याची पद्धत कोणतीही असो, लग्न होण्याची पद्धत कोणतीही असो, सुहाग रात कशीही साजरी केलेली असो.. पती पत्नींचे जीवन खर्‍या अर्थाने सुरु होते ते हे सारं पार पाडल्यानंतरच. एकमेकांना समजून घेताना, परस्परांच्या स्वभावाशी, सवयींशी जुळवून घेताना, एकमेकांसोबत आयुष्य घालवून पुढे जात रहाताना पती पत्नीचे नाते कसे बदलत जाते, मुरत जाते, कधी विखरत जाते हे जाणून घेण्यात सुजाण प्रेक्षकांना कायमच रस राहिला पण पडद्यावर मात्र त्याचं चित्रण अभावानच घडत राहीलं. विशेषतः हॉलिवुडमधले दिग्दर्शक ज्या ताकदीने या नात्यांचा वेध घेतात त्यापुढे अजूनही आपल्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक फार कमी पडतात. १९६७ सालच्या 'बेअरफुट इन द पार्क' मधे नुकत्याच हनिमूनवरुन परतलेल्या दोघांना आपले आयुष्याकडे बघण्याचे दृष्टिकोनच किती भिन्न आहेत हे उमगते आणि तरीही आपले प्रेम एकमेकांवर आहे ते कसं काय हे जाणून घ्यायचा ते ज्या प्रकारे प्रयत्न करत रहातात ते पहाणे, ' शॅल वी डान्स' मधल्या पतीपत्नी नात्यामधल्या एकसुरीपणाला कंटाळलेल्या पण पत्नीवर मनापासून प्रेम करणार्‍या पतीने नृत्य शिकायला जावून आयुष्याकडे बघण्याच्या एक नवा दृष्टीकोन मिळवायचा प्रयत्न करणे आणि पत्नीने ते नंतर समजुदारपणे लक्षात घेणे.. किंवा अलिकडच्या ऑस्कर मिळालेल्या 'द रिव्होल्यूशनरी रोड' मधे वरवर दोघे आदर्श पती पत्नी आहेत पण जरा कातडीच्या आत डोकावून पाहिले तर तिच्या गृहकृत्यदक्ष असण्यामागे, सतत मुलांकडे आणि स्वयंपाकघरामधे लक्ष घालत रहाण्याच्या ऑब्सेशनमागे आणि त्याच्या कंटाळवाणे झालेल्या कौटुंबिक दिनक्रमाकडे उसन्या उत्साहाने रस भरत रहाण्याच्या प्रयत्नांमागे जी मानसिक आंदोलने चालेली असतात ती पडद्यावर पहाणे असो.. असे प्रत्येक अनुभव आपल्यामधली नात्यांची जाणीव समृद्ध करणारा ठरत जातात हे नक्की.
हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांना अशी सखोलता दाखवणं नाही जमलं. भारतीय पारंपारिक लग्नव्यवहारांनाच अशी मानसिक आत, आत घेऊन जाणारी दृष्टी अस्वस्थ करते कदाचित. ढोबळपणा त्यापेक्षा जास्त सोयीचा मग तो प्रत्यक्ष व्यवहारांमधे असो किंवा रजतपटावर.
समाज कोणताही असो, संस्कृती कोणतीही असो, लग्नसोहळे कोणत्याही पद्धतीने साजरे केलेले असोत, मानवी नातेसंबंध, पती-पत्नी नात्यांआडचे नाजूक पदर, कंगोरे सगळीकडे सारखेच असतात, नात्यांमधल्या ताण-तणावांना, आंदोलनांना सामोरे जाण्याची वेळ फक्त आपल्यावरच येत नसते.. जगभरातल्या कोणत्याही चार घरांमधल्या भिंतींआड लग्नानंतर पती पत्नींमधले नाते अशाच गतीने प्रवास करते, त्यात कधी फुलण्याचे ऋतू येतात कधी कोमेजण्याचे.. पती-पत्नी नात्यांमधली ही एक अपहार्यता आहे ही जाणीव या सार्‍या फिल्मी लग्नांनी करुन दिली, लग्नबंधनाचा अर्थ नव्याने समजावून द्यायला ही फिल्मी लग्नं कळत नकळत मदतीला आली.
'शॅल वी डान्स' मधे पत्नीच्या भुमिकेतली सुझान लग्नाचा अर्थ फार विलक्षणरित्या समजावून जाते. 'आपण नक्की लग्न कां करतो?' या प्रश्नाच उत्तर देताना ती म्हणते," आपल्या आयुष्याला एक साक्षिदार प्रत्येकाला हवा असतो. जगात कोट्यावधी माणसे रहातात.. कुणा एकाचे आयुष्य असे कितीसे महत्वाचे असणार कुणाला? पण लग्नात तुम्ही एकमेकांना परस्परांची काळजी घेण्याचे, एकमेकांवर प्रेम... दिवसेंदिवस, रोज करण्याचे वचन देता! एकमेकांच्या चांगल्या, वाईट, अगदी सामान्य गोष्टींचीही काळजी करण्याचं, त्यांकडे लक्ष देण्याचं तुम्ही कबूल करता. तुम्हाला एक खात्री मिळते. आपलं आयुष्य अगदीच दुर्लक्षित, बिनमहत्वाचं नाही जाणार.. असं कोणीतरी आहे आपल्या आयुष्यात ज्याच्या दृष्टीने या गोष्टी महत्वाच्या आहेत.. कोणीतरी एक आपल्या आयुष्याचा साक्षिदार आहे!"
अशी ही फिल्मी लग्न. काही इथली, काही तिथली. पती पत्नींच्या संपूर्ण सहजीवनातील नातेसंबंधाचा पट एका वाक्यात उलगडवून दाखवण्याची ताकद असणारी.. कायम बदलत्या समाजसंस्कृतीचे पदर पुढच्या काळातही अशाच तरलतेने, अधिक सखोलतेने आपल्यापुढे पडद्यावरुन येत रहातील.
कंटीन्यू-
*लेख ’श्री व सौ’ मासिकामधे तसेच मायबोली संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित.