Sunday, June 24, 2012

गोल्ड ऑफ़ देअर बॉडीज


अनोख्या, लखलखीत सूर्यप्रकाशात सदैव न्हाऊन निघालेल्या ताहिती बेटांवर राहून पॉल गोगॅंने अक्षरश: असंख्य चित्र काढली. नजरेला भुल घालणारा तिथला निसर्ग, दाट, पाचूसारखी हिरवी अरण्यं, उबदार समुद्र, निळेशार तलाव आणि सुंदर ताहिती स्त्रिया. त्यांच्या त्वचेवरची झळझळती सुवर्णआभा, चेह-यावरचे निरागस भाव त्याच्या पेंटींग्जमधे उमटले. मात्र गोगॅंच्या या पेंटींग्जमधे फक्त एव्हढेच नव्हते.
ताहिती बेटांवरच्या प्राचीन, पोलिनेशियन संस्कृतीच्या अस्तित्त्वखूणा, तिथल्या माओरी आदिवासींच्या चालीरिती, रिवाज, त्यांच्या देवदेवता, अंधश्रद्धा या सा-याचे चित्रण, इतकेच नव्हे तर कालांतराने एकेकाळच्या इथल्या अस्पर्शित निसर्गावर, निरागस आदिवासींच्या जगण्यावर उमटत गेलेल्या आधुनिक युरोपियन संस्कृतीच्या प्रदुषणाच्या खुणाही गोगॅंच्या पेटींग्जमधून स्पष्टपणे उमटल्या. ताहिती बेटावरच्या निसर्गाने गोगॅंमधल्या चित्रकाराला भुरळ पाडली होती आणि त्याचवेळी त्याच्यातल्या संवेदनशील माणुसकीने, बुद्धीवादी विचारसरणीने त्याला अंतर्मुखही केले होते. पॉल गोगॅंने काढलेली ताहिती तरुणींची पेंटींग्ज नंतरच्या काळात जितकी गाजली तितकीच त्याने तिथल्या वास्तव्यात लिहिलेली, माओरी संस्कृतीच्या झपाट्याने होत जाणा-या -हासाचे, युरोपियनांच्या उन्मत्त, बेफ़िकिर, स्वैर वागण्याचे डोळस डॉक्युमेन्टेशन करणारी ताहितीयन जर्नल्सही गाजली.

जून १८९१ मधे पॉल गोगॅं ताहिती बेटांवर पोचला. गोड गुलाबी, एंजेलिक चेह-यांच्या तरुणींची दिवाणखान्याला शोभेलशी पेंटींग्ज करणा-यांच्या आणि ती मोठ्या संख्येनी विकत घेणा-यांच्या पॅरिसमधे रहाण्याचा त्याला उबग आला होता. नवे प्रदेश शोधत, अपरिचित जगामधे आपल्या कलाविष्काराला पोषक वातावरण धुंडाळत भटकणारे चित्रकार अनेक आहेत. मात्र गोगॅं त्या सर्वांपेक्षा वेगळा होता.
बाह्यत: बेदरकार, उद्धट, स्पष्टवक्ता गोगॅं मनाने हळवा, संवेदनशील होता. स्वैराचारी म्हणून नंतरच्या काळात शिक्का बसलेला गोगॅं खरं तर त्याच्या पत्नीवर, मुलांवर जीवापाड प्रेम करणारा होता. मर्चंट बॅंकिंगच्या पैसे मिळवून देणा-या क्षेत्राला लाथ मारुन त्याने पूर्णवेळ पेंटींगला वाहून घेतलं होतं खरं पण त्याची वास्तववादी,आधुनिक शैलीतली पेंटींग्ज कोणालाही आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे मिळत नव्हतेच शिवाय टीका पदरी पडत होती. श्रीमंतीची सवय असणा-या बायकोने घटस्फ़ोटाची नोटीस दिली होती, मुलांचे हाल होत होते. युरोपमधे कुठेच त्याला पेंटींगच्या जीवावर जगता येईना. शेवटी तो या फ़िल्दी युरोप चा त्याग करुन ताहिती बेटांवर कायमचे रहाण्याकरता गेला.
इथे अपल्याला स्वर्ग सापडेल अशी त्याच्यातल्या चित्रकाराला भाबडी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष वास्तव्यात त्याला तिथे स्वर्गीय निसर्गसौंदर्याच्या जोडीला प्रदुषित सामाजिक जीवनही अनुभवायला मिळाले. त्यामुळे तो व्यथित झाला. ख्रिस्ती मिशन-यांनी जगभर धर्मप्रसाराकरता फ़िरताना आपल्यासोबत आणलेल्या आधुनिक युरोपियन जीवनशैलीचा विपरित परिणाम बेटांवर हळू हळू आणि निश्चितपणे होत होता.

इथे दिलेल्या गोगॅंच्या या दोन पेंटींग्जमधे त्याच्या या दोन्ही अनुभवांची आणि दृष्टीकोनांची झलक दिसते.
गोल्ड ऑफ़ देअर बॉडीजपेंटींगमधे पुढील काळात गोगॅंची ओळख बनलेल्या त्वचेवर झळझळती सुवर्णआभा ल्यायलेल्या, निरागस चेह-याच्या माओरी तरुणी, पार्श्वभूमीवर ताहिती बेटावरचा अम्लान, देखणा निसर्ग, खास गोगॅंचे बोल्ड, कलरफ़ुल कॉम्पोझिशन आहे, आणि दुस-या पेंटींगमधे पश्चिमेकडून आलेल्या प्रगतीचे प्रतिक अशा खुर्चीवर बसलेली, मेलॉन्कलिक चेह-याची ताहिती स्त्री दिसते आहे. पेंटींगमधल्या भिंतीवर अजून एक पेंटींग आहे ज्यात ताहिती बेटांवरच्या आदीसंस्कृतीचे वैभव, तिथला एकेकाळचा स्वर्गीय म्हणून ओळखला जाणारा निसर्ग अजूनही अबाधित आहे. पेंटींग जितके साधे आहे तितकेच ट्रॅजिक आहे. खुर्चीवर बसलेली ही उदास स्त्री गोगॅंने अनुभवलेल्या प्राचीन आणि आधुनिक संस्कृतिच्या कात्रीत सापडलेल्या माओरी आदिवासींच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. कदाचित अशा द्विधा मनोवृत्तीत सापडलेल्या सगळ्या तिस-या जगातल्या संस्कृतीचेच हे प्रतिक आहे.

(दै.लोकमत 'मंथन' पुरवणीकरता लिहिलेला हा आर्ट कॉलम इथे पुनर्प्रकाशित)

Tuesday, June 12, 2012

स्क्रीsssssssम पुन्हा एकदा


अरे निदान संदर्भ देण्याचं तरी सौजन्य बाळगा.

आत्तापर्यंत मला आपल्या कॉलम/लेख/ब्लॉगपोस्ट्सची मराठीतल्या मराठीत झालेली चोरी पहायची सवय होती. पण आता इंग्रजी वृत्तपत्रेही सरळ सरळ (आणि शब्दशः) डल्ला मारायला लागलीत.
दै.लोकमतकरता मी लिहित असलेल्या 'चित्रभाषा' कॉलमचे एक वाचकचाहते श्री. रवी वेलणकर यांनी आजच सकाळी कुरिअरने 'डेक्कन हेराल्ड' च्या बंगलोर आवृत्तीमधले (२७ मे.१२) एक कात्रण मला पाठवले. 'द स्क्रीम' या माझ्या कॉलमचे (१३ मे.१२) शब्दश: भाषांतर कोणा गिरिधर खासनिसांनी संडे हेराल्ड- आर्ट अ‍ॅन्ड कल्चर करता केले आहे. काही फुटकळ वाक्य तेव्हढी स्वत्;ची घातली लांबी वाढवायला. केवळ धन्य प्रकार आहे हा.
'उचलेगिरी' इतक्यांदा झालीय की आता खरं तर त्याबद्दल काही आश्चर्य/राग इत्यादी वाटायचाही कंटाळा यायला हवाय. पण तरीही जे वाटतं ते उद्वीग्नतेच्या पलीकडचं असतं.


Sunday, June 10, 2012

हुसेन, भाभा आणि म्यूरल


गेल्या आठवड्यात *टीआयएफ़आर कलेक्शन प्रत्यक्ष टीआयएफ़आर मधे जाऊन पहाण्याची दुर्मिळ संधी मिळाली. विज्ञान संकुलाच्या देखण्या आवारात प्रवेश करत असताना आता ती सगळीच्या सगळी २६० चित्र-शिल्प आपण बघणार असल्याची अनिवार उत्सुकता काठोकाठ भरुन ओसंडत होती.   
टीआयएफ़आरचं आगळं वास्तुवैभव, गॉथिक खांबांच्या रांगा, आवारातली देखणी, फ़ुलांनी बहरलेली वृक्षराजी नजरेत जेमतेम सामावेपर्यंत रिसेप्शन लाउन्ज आलं आणि समोर इतक्या आकस्मिकपणे ते येऊन ठाकलं की सावरायलाही वेळ मिळाला नाही.

पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगातलं नजरेतही न सामावणारं लांबचलांब, भव्य म्यूरल. म्हणजे तिथे ते आहे माहीत असतं पण ते असं इतक्या अचानक, इतकं झळझळीत दिसत असेल हे अपेक्षितच नसतं.


टीआयएफ़आरच्या रिसेप्शन एरियाच्या वर, मेझनिन फ़्लोरच्या मोठ्या कॉरिडॉरची संपूर्ण भिंत व्यापणारे, आजूबाजूच्या भव्यतेत बेमालूम मिसळून जात त्या वास्तूला आगळी अभिजातता प्राप्त करुन देणारे ११५ मीटर लांबीचं हुसेननी रंगवलेलं भारत भाग्य विधाता म्यूरलचं असं अनपेक्षित सुंदर दर्शन.

म्यूरलचं सौंदर्य एकाच वेळी सलगपणे नजरेत सामावत नाही, रेलिंगचे खांब मधे मधे अडथळा आणतात म्हणून मग आपण जिन्याच्या पायर्‍या चढून वर जातो, म्यूरलच्या अगदी जवळ उभं राहून ते निरखतो. आणि मग प्रतिभेच्या पायर्‍या चढत अत्युच्च शिखराकडे जाणा-या चित्रकाराच्या कलेचं सगळं वैभव, सामर्थ्य, त्याचं हुनर, कौशल्य, त्याची सगळी वैशिष्ट्यपूर्णता एकत्रितपणे सामावून घेणा-या कलेचं दर्शन किती थक्क करुन सोडतं आपल्याला त्याची जाणीव होते.
जशी मला गेल्या आठवड्यात टीआयएफ़ आरमधलं हुसेनने रंगवलेलं ते म्यूरल बघताना झाली.

या म्यूरलची लहान आवृत्ती आधी पाहिली होती, मॉर्टिमर चॅटर्जीने लिहिलेल्या टीआयएफ़आर-कलेक्शनच्या पुस्तकात फोटो आहेत, नेटवरही हे म्यूरल न्याहाळलं होतं पण एखाद्या भव्य, विस्तारलेल्या वटवृक्षाला, त्याच्या पारंब्यांसहीत जवळून न्याहाळणे आणि त्या वटवृक्षाचे बोनझाय बघणे यात जो फ़रक तोच त्यातही. हुसेनच्या रंगांमधली पॅशन, त्याच्या प्रवाही, ठाशीव रेषांची लय, आकाररचनेचा आकर्षक मेळ या म्यूरलमधून संपूर्णपणे जाणवते.
१९६२-६३ या काळात हुसेनने हे म्यूरल रंगवले तेव्हा तो ४८ वर्षांचा होता. त्याची कला-कारकिर्द ऐन भरात होती.
डॉ. होमी भाभा समकालिन चित्रकलेचे प्रोत्साहक आणि संग्राहक होते. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपमधील चित्रकारांचे ते विशेष चाहते. टीआयएफ़आरच्या वार्षिक अंदाजपत्रकातील एक टक्का रक्कम चित्र-शिल्पखरेदीकरता राखून ठेवली जात होती.
१९६२ मधे भाभांनी आपल्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या या संस्थेकरता उभरत्या, समकालिन चित्रकारांकडून म्यूरल डिझाईन करुन घेण्याकरता स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेकरता हुसेनसह आरा, गायतोंडे, जामिनी रॉय, बद्रीनारायण, बेन्द्रे, हेब्बर, सतीश गुजराल, बी.प्रभा, रावळ इत्यादी चित्रकारांनी आपली स्केचेस पाठवली. त्यामधून हुसेनचे स्केच भाभांनी निवडले. इन्स्टीट्यूटमधे दोन वर्षे मुक्काम करुन हुसेनने हे म्यूरल रंगवले. १९६४ मधे ते रंगवून पूर्ण झाले.
एकदा एका मुलाखतीत हुसेनने सांगीतले होते- हे म्यूरल मला दोन महिन्यातही रंगवून पूर्ण करता आले असते. पण टीआयएफ़आरच्या सुंदर परिसरात रहाण्याचा मोह शिवाय डॉ.भाभा दर आठवड्याला म्यूरलची प्रगती कुठवर आली पहाण्याकरता फ़ेरी मारत तेव्हा ते करत असणारी स्तुती ऐकण्याचाही मोह जबरदस्त होता. त्यांचा सल्लाही उपयोगी पडे. इन्स्टीट्यूटमधे देशीविदेशी अनेक शास्त्रद्य रहात. प्रत्येकाच्या नावाची पाटी असणारी केबिन त्यांना दिलेली असे. डॉ. भाभांनी मलाही माझ्या नावाची पाटी असणारी केबिन दिली होती, रोज या शास्त्रद्न्यांसोबत मी लंच घेत असे. खूप सन्मानाचे आणि आनंदाचे ते दिवस होते.
तो सन्मान, ती खुशी म्यूरलमधे, त्यातल्या रंगांमधे प्रतिबिंबित झाली नसती तरच नवल. म्यूरल रंगवण्याची रुपये पंधरा हजार बिदागी मिळाली.
  
टीआयएफ़आरमधे म्यूरलच्या स्पर्धेत ज्या चित्रकारांनी स्केचेस किंवा लहान आवृत्त्या रंगवून पाठवल्या होत्या, त्या सर्व लावलेल्या आहेत. सर्वच म्यूरल सुंदर आणि त्या त्या चित्रकारांची नंतरच्या काळात नावाजली गेलेली वैशिष्ट्य साकारणारी आहेत. काही म्यूरल स्केचेस तर अत्यंत परिपूर्ण दिसतात, उलट हुसेनचे स्केच तितके बारकाईने केलेले दिसत नाही. हुसेन टीआयएफ़आर-कलेक्शनच्या पुस्तकात सांगतो की त्याला अजिबातच अपेक्षा नव्हती इतक्या मोठ्या नावांमधून त्याचे स्केच निवडले जाईल. पण पैशांची गरज होती आणि मित्रांनी आग्रह केला म्हणून काहीशा अनिच्छेने त्याने क्रेयॉनने म्यूरल स्केच रंगवून स्पर्धेकरता पाठवून दिले. नंतर दोन महिने उलटले तरी त्याला काहीच समजलं नाही. भाभांचे मित्र फ़िरोझा वाडियांना त्याने शेवटी काय झाले एन्ट्रीचे याबद्दल विचारले. वाडियांना आश्चर्य वाटले की हुसेनना काहीच कसे समजलेले नाही. त्यांनी उलटा भाभांना फोन लावला आणि हुसेनना सांगितले की म्यूरल तुलाच रंगवायचे आहे.

खरं तर दरम्यानच्या काळात टीआयएफ़आरमधे जे घडले ते डॉ. होमी भाभांची व्हिजन आणि कलेची जाण किती अचूक होती तेच दर्शवणारे आहे. संस्थेमधे हुसेनसोबत रावळ यांचे स्केचही फ़ायनल झाले होते. रावळ यांचे डिझाईन अचूक, बारकाव्यांसहित, ब्राईट रंगसंगतीचे, लयदार रेषांचे होते. संस्थेच्या सदस्यांपैकी सर्वांनाच तेच स्केच आवडले. मात्र भाभांनी निर्णयाची घाई केली नाही.
हुसेनचे स्केच आपण का निवडले याबद्दल नंतर बोलताना भाभांनी लिहिले आहे- रावळचे काम एलेगन्ट, व्यवस्थित आहे यात काहीच शंका नाही. पण काळाच्या कसोटीवर उतरणारी अभिजातता हुसेनच्या डिझाईनमधे आहे. दीर्घकाळानंतरही या म्यूरलमधल्या रेषा आणि रंग नवं काहीतरी देत रहातील.
प्रतिभावंत पारखायला प्रतिभावंताचीच नजर लागते आणि तिची अचूकता काळाच्या कसोटीवर खरी ठरते.
डॉ. होमी भाभा कधीच गेले. हुसेन जाऊनही आज एक वर्ष झाले. टीआयफ़आरमधले हे म्यूरल आता ५० वर्षांचे होईल. भाभांची व्हिजन आणि हुसेनची अभिजातता दोन्ही काळाच्या कसोटीवर किती खरे उतरले याची साक्ष देत टीआयएफ़आर आणि ते म्यूरल अजूनही तितक्याच देखणपणाने, ताजेपणाने देत.बघणा-याला चकित करत आहेत.  

==============================================================

*(टाटा इन्स्टीट्यूट ऑफ़ फ़ंडामेन्टल रिसर्च संस्थेचे संस्थापक आणि संशोधक डॉ. होमी भाभा स्वत: उत्कृष्ट आर्टिस्ट होते आणि कलेचे मोठे चाहते संग्राहक होते. स्वातंत्र्योत्तर भारतातल्या आधुनिक आणि समकालिन कलेचा महत्वाचा चित्र आणि शिल्पसंग्रह त्यांनी केला जो टीआयएफ़आर कलेक्शन म्हणून सुप्रसिद्ध आहे.)

'चित्रभाषा' कॉलम दै.लोकमतच्या रविवार 'मंथन' पुरवणीमधे प्रकाशित होतो. तिथून पुनर्मुद्रीत.