काल शिवाजी पार्क वर भव्य वगैरे ग्रंथ प्रदर्शन आणि गड किल्ले दर्शन होतं ते बघायला गेले होते. खरं तर आदल्या दिवशीच्या पेपर मधे ते सगळ्या खंडीभर सेलेब्रिटीजनी नामवंत कवींच्या कविता वाचून प्रदर्शनाचं उद्घाटन केल्याचं वाचलं होतं तेव्हाच जायचा उत्साह कमी झाला होता. हल्ली सेलेब्रिटीज म्हणजे सर्कशीतले विदुषक झालेले असतात. आपलं क्षेत्र काय आहे? आपण कशात कशासाठी प्रसिद्ध आहोत ते बाजूला. जिथे जिथे मिडीया एक्स्पोजर तिथे तिथे सगळेच नाचायला तयार. कविता वाचल्या तरी ठिक आहे. पण वाचायच्याच तर त्या नामवंतांच्या कशाला? इतके उच्च दर्जाचे अत्यंत गुणवान नवोदीत कवी उपेक्षेच्या अंधारात पडून आहेत. त्यांना तरी आपल्या प्रसिद्धीचा फ़ायदा देवून उजेडात आणण्याचे पुण्यकर्म ह्या सेलेब्रिटीजनी करावं नां? पण नाही. घ्या एक संदीप खरे नाहीतर ग्रेस नाहीतर प्रद्न्या लोखंडे नाहीतर नीरजा नाहीतर गेला बाजार सौमित्र आहेच. आणि पाडा त्यांच्याच कविता. मग त्यांचा अर्थ कुणाला उलगडलेला असो वा नसो. ग्रेस च्या किंवा सौमित्रच्या कविता असे अर्ध्या हळकुंडांनी पिवळे पडलेले सेलेब्रिटीज म्हणत असतात तेव्हां त्या कवींची कीव येते.
तर ते प्रदर्शन. शिवाजी पार्क चं.
आख्ख्या हायवेवर, फ़्लाय ओव्हर वर पोस्टर्स लागलेली. सर्व नामवंत प्रकाशक सहभागी असल्याचे दिसत होते. तेव्हां ती एक उत्सुकता होती पण तितकी नाही कारण आता दिवाळीच्या सुमारास अजीर्ण होईल इतकी पुस्तक प्रदर्शन दादर-पार्ले-डोंबिवली ह्या मराठी सांस्कृतिक त्रिकोणातल्या सर्व शक्य अशक्य जागांवर भरतच असतात. पण सोबत महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचही प्रदर्शन होतं. तेव्हा ते एक added attraction.
गड किल्ले प्रदर्शन अत्यंत badly oraganised. सगळीकडे फक्त फोटो लावलेले. काही ठराविक किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकृती होत्या पण त्यांवर माहीती निट नाही. सिंधुदुर्गाला जल दुर्ग म्हणायचं की गिरीदुर्ग? मग एका बघण्याच्या मर्यादे नंतर माणिक गड कोणता आणि प्रबळ गड कोणता हे फोटोत सारखच दिसायला लागलं. शेकडो किल्ले महाराष्ट्रात आणि सगळे मोस्टली उध्वस्त अवस्थेत. तेव्हा ह्या तुटलेल्या कड्याचा एक फोटो. त्या बुरुजाचा एक वगैरे. तेव्हा ते प्रदर्शन भराभर मागे टाकून एकदाचे पुस्तकांच्या स्टॉलवर पोचलो. क्रेडीट कार्डची सोय केली आहे हे अनाउन्स करत होते तेव्हां जरा हुरुप आला. चक्कं जाताना टॆक्सी करुनच जावं. अनायासे डिस्काउन्ट पण मिळेल आणि वर क्रेडीट कार्डाची सोय तेव्हां मला अगदी आपण दोन्हीं हातांत भरभरुन पुस्तकं वहातोय असं सुखद दृष्य पहिल्या स्टॉलवर पाय ठेवतानाच दिसायला लागलं. इतर वेळी पाहिलेली पण घ्यायची राहून गेलेली सगळी पुस्तकं भराभर नजरेसमोरून जायला लागली.
पहीला स्टॉल. असंच एक प्रकाशन. एक सोनेरी काडीचा चष्मा लावलेले गृहस्थ काउंटरवर. मी चारपाच पुस्तकं उचलली. गृहस्थांनी बिल बनवलं.
क्रेडीट कार्ड साठी एकच मेन काऊंटर असेल नां? :मी .
माहीत नाही. आठशे त्र्याण्ण्व द्या: गृहस्थ निर्विकारपणे.
अहो पण. क्रेडीट कार्ड?
माहीत नाही.
डिस्काउन्ट लिहिलाय तो चाळीस टक्के?
तो फ़क्त ठराविक पुस्तकांवर?
मग ह्यां पुस्तकांवर?
दहा टक्के देवू. - आवाज मेहेरबानी टाईप.
मी पुस्तकं खाली ठेवली. आमचा जवाहरवाला तसाही वीस टक्के देतोच. मॆजेस्टीक मधे बुक क्लब ची मेम्बर तेव्हां तिथे पंचवीस टक्के. इथे दहा टक्क्यांची भीक कशाला? ती सुद्धा रोख पैसे मोजून? हा अनुभव मग पुढचे दोन तीन स्टॉल.
साहीत्य अकादमीचा आणि नॆशनल बुक ट्रस्टचा स्टॊल पाहून खुशी वाटली. ही पुस्तकं सहजासहजी बघायलाही मिळत नाहीत. इतके सुंदर अनुवाद किंवा विविध विषयांवर असूनही योग्य मार्केटींग अभावी फ़ुकट पडून रहातात वाचकांच्या नजरेलाही पडण्या ऐवजी. तिथून मात्र तिथल्या निरुत्साही सरकारी मुद्रेच्या लोकांना न जुमानता पाच सहा पुस्तकं घेतलीच.
व्यक्तीमत्व विकास, पाकक्रीया, ऐतिहासिक पुस्तकं, व.पु. ह्यांना मिळत रहाणारा वाचक प्रतिसाद मन खंतावून टाकतो बरेचदा. वाचक कधी बाहेर पडणार त्यांतून? पुढच्या इयत्तेकडे इतकी कमी जण कां जातात? ग्रंथालीची सुरेख छोटेखानी ज्ञानयज्ञ मालीकेतली पुस्तके धुळ खात पडून. पॉप्युलर प्रकाशनाच्या तेंडूलकरांच्या कम्पाईल्ड पुस्तकांना ओलांडून सगळे पुढे. पानवलकर सासणे कोणाच्या खिजगणततीतही नाहीत. ते तरीही ठिक आहे. प्रत्येकाची आवड असते. पण एक मौज आणि ग्रंथाली आणि डिंपल प्रकाशनाची लोकं सोडली तर कोणालाही आपली पुस्तकं आकर्षकपणे नुसती मांडूनच चालत नाहीत तर विक्रेत्याच्या मुखावर सुद्धा आपुलकी, उत्साह अशा भावभावनांची गरज असते हे लक्षातच नाही असं वाटणारी परिस्थिती. राज ठाकरेंनी स्टॉल्सची भाडी अवास्तव लावून जबरदस्ती तिथे बसवल्यासारखे सगळे. स्वत:च चहा पिण्यात, वडे खाण्यात मग्न विक्रेते. उरलेली नुसती माश्या हाकत बसलेली नाहीतर पुस्तकं हाताळणार्या सर्वांनाच संशयास्पद नजरेनी न्याहाळत. आयमिन अशा मोठ्या प्रदर्शनात असते भिती लोकांनी पुस्तकं उचलून पिशव्यां मधे वगैरे घालण्याची पण त्यासाठी नजर ठेवायला थोडी डिस्क्रीट पद्धती वापरा की. हे काय आपलं सगळ्यांनाच तशा नजरेनी बघणं?
खरंतर हल्ली किती उत्साहात प्रदर्शनं भरवतात पुस्तकांची. नव्या नव्या स्कीम्स आणतात. पण स्टॉलवरचे विक्रेते जर पुस्तकप्रेमी नसतील तर प्रदर्शन कशी निरस होऊ शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण. मैत्रेय प्रकाशनाच्या स्टॊललवर मात्र अगदी उलट अनुभव. या या. हे गणिताच्या कोड्यांचं पुस्तक बघा. अगदी बुद्धीला चालन देतं बरं का. आणि हे विणकामाच्या नव्या टाक्यांच पुस्तंक. अगदी लेटेस्ट. not bad. मी कोणत्याही angle ने विणकाम मुद्रेची दिसत नसूनही विक्रेत्याचा उत्साह कमी होईना. मग अचानक शिरिष कणेकरच्या पुस्तकांच्या रांगेसमोरुन त्याने माझी परेड केली. आता आधी कॉलम वाचा. त्यातल्या त्याच त्या शिळ्या कढीला उत विनोदांना हसा आणि मग परत त्यांची पुस्तकं पण तिनशे रुपये देऊन विकत घ्या? वेल. मला काही इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा मी निला सत्यनारायण चं एक पूर्ण-अपूर्ण उचललं.
आता दिवस दिवाळी अंकांचे. हे एक प्रकरण मात्र असं आहे की घेतल्या वाचून रहावत नाही आणि घेतल्यावर गेले ते दिन गेले म्हणून रडल्यावाचून वाचवत नाही. मौज चे अंक गौरी वाचून सूने आणि दीपावलीचे अंक दळवींवाचून रिकामे. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.