Friday, June 13, 2008

मांजा.




राही अनिल बर्वे चा 'मांजा' समोर पडद्यावर पाहणे हा सोपा अनुभव नव्हता. मुंबईत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मिफ मधे पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनासहीत सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा सुवर्णशंख पुरस्कार मिळालेली ही फिल्म मी दुसर्‍यांदा यशवंतराव मधे पहात असतानाही मन तसेच सुन्न झाले होते.

जेमतेम चाळीस मिनिटांचा मांजा समोर पडद्यावर उलगडत जाताना त्यातल्या प्रत्येक ब्लॅक ऍन्ड व्हाईट फ्रेममधून एक काचेरी धार अतिथंडपणे तुमच्या संवेदनशिलतेचा गळा खोलवर चिरत मन रक्तबंबाळ करुन सोडत जाते.

अनेक भीषण 'वास्तवांना' आत्तापर्यंत पडद्यावर अनेकदा पाहून आता निर्ढावलीय असं वाटायला लागलेली तुमच्यातली सेन्सिबिलिटीही समोरच्या रांका आणि चिमीच्या रोजच्या आयुष्यातल्या एका कोणत्याही २४ तासांत जे काही घडून जातं ते पाहून अंतर्बाह्य विछिन्न होऊन जाते, आणि मग मनावर काजळी धरत जाते एका दाट अस्वस्थतेची.. आपण जिथे सुखाने रहातोय त्या ह्या चकचकीत शहराच्या आंतरत्वचेवर फाटक्या चिंध्यांप्रमाणे लोंबकळत रहाणार्‍या वस्त्यांमधल्या कोणत्याही १०-१२ वर्षांच्या रांका आणि त्याच्या ४-५ वर्षांच्या बहिणीला हे सारं कदाचित रोजच भोगावं लागत असणार...!.
मांजाचा विषय चाईल्ड मोलेस्टेशनचा आहे आणि पटकथेतून तसेच दिग्दर्शनातून राही प्रत्येक फ्रेममधून ज्या धाडसाने तरीही संयतपणे, विषयावरची पकड किंचितही न सोडता, आवश्यक त्या 'डार्कनेस'सह आपल्यासमोर आणतो त्याला तोड नाही.
इतक्या कमी वेळात तिनही महत्वाच्या पात्रांच्या स्वभावतले कंगोरे, बारकाव्यांसहीत आणि मोजक्या परिणामकारक संवादासहीत विलक्षण ताकदीने आपल्यापर्यंत पोचतात..

शहराच्या क्षितिजावर म्लान काळेपणाने उडणार्‍या कावळ्यांच्या थव्यासारखी रांकाच्या आयुष्यात येणारी रोजची एक संध्याकाळ. दुष्काळी खेड्यातून आईबाप आणि किंचितश्या खुळ्या बहिणीसोबत शहरात जगायला आलेला रांका. काही दिवसांतच आई शरीर विकून पैसे कमवायचा सोपा रस्ता पकडायला निघून गेलेली आणि ते पाहून बापाने गाडीखाली जीव दिल्यावर काहीही मिळणारं काम करुन धाकट्या बहिणीला हिमतीने सांभाळत रस्त्यावर राहताना कसं जगायचं असतं हे आजूबाजूची परिस्थिती रांकाला शिकवत असतेच. ते शिकताना डोळ्यांतली उमज वय उलटून गेलेल्या माणसाची बनत चाललेली.
पतंग उडवण्याच्या वयातल्या रांकाचे हात आता काचांचा भुगा करत मांजा बनवण्यात गुंतलेले. पोट भरायचं त्याचं ते साधन. त्या संध्याकाळी तो तेच करत असताना, धांदोट्या झालेल्या फ्रॉकच्या मागे कोणीतरी मस्करीत बांधलेली पोचट डबड्यांची माळ फरपटवत, आपल्या अशक्त चिरचिर्‍या आवाजात रडत चिमी भावाला शोधत तिथे येऊन पोचते.
खाकी वर्दीतला तो हवालदार नेहमीप्रमाणे तिथेच आसपास घोंगावत आहे. ह्या हल्लीच दिसायला लागलेल्या अनाथ भावंडांची त्याला काहीशी काळजी आणि कुतुहल. त्याच्या अकारण चौकशा, विनाकारण सलगी. कामात लुडबुड करणार्‍या चिमीवर रांका खेकसतो तेव्हां हवालदार त्याच्यावरच डाफरत चिमीला समजावतोही. तिच्या फ्रॉकच्या मागची डबड्यांची माळही सोडवतो.
संध्याकाळ आणखी गडद,काळी होत जाते.
काचांचा थर दिलेला मांजा रात्रभर सुकवायला म्हणून दोन खांबांना ताणुन बसवून देत रांकाने आजचे काम संपविलेलं.त्यानंतरचं मग फुटपाथवरच्या दिव्याच्या मलूल उजेडातलं रांका चिमीचं, भटक्या कुत्र्याला पंगतीला घेऊन झालेलं 'जेवण', हवालदाराच्या जवळ येत पुन्हा झालेल्या गप्पा.
त्या कधी नव्हें ते मिळालेल्या शाब्दिक फुंकरीने सैलावलेलं रांकाचं मन आणि त्याभरात चिमीला आईस्क्रीम खायला घेऊन जाण्याची त्याने हवालदाराला दिलेली परवानगी.
'चांगला आहे हवालदार'.. मग बिडीचं थोटूक फुंकताना हातभट्टीवाल्या मित्राला तो सांगतो तेव्हां त्याच्याकडून अचानक कळलेला हवालदाराचा विकृत स्वभाव.
मध्यरात्रीच्या तडकलेल्या अंधारात जिवाच्या आकांताने रांका बहिणीला हाका मारत सैरभैर धावत सुटतो. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या राबिटमधलं अशक्त हुंदके देत झोपलेलं चिमीचं चिमुकलं शरीर, तिचा फोलकटासारखा उडून बाजूला लटकणारा फ्रॉक आणि मुर्दाड थंडपणाने रांकालाच समजवणारा हवालदाराचा निर्लज्ज अविर्भाव.. जग असंच वागत असतं रांका, शिकून घे.
रांका आंधळ्या आवेशाने लाथा बुक्क्यांसकट तुटून पडताना हवालदाराचा फक्त कोडगा पश्चात्ताप.
पहाटे चिमीला रस्त्यावरुन चालवत नेताना रांका तिला चुचकारायला तिच्या खांद्यावर थोपटायला जातो तेव्हां भ्यालेल्या कोकरागत चिमी अंग काढते आणि रांका मुळासकट हादरतो आणि दिवसभर काही न सुचून वणवणल्यावर त्याच्या मनात पडते ती सुडाची ठिणगी.
त्याच रात्रीच्या अंधारात मग रांकाने हवालदाराचा दारुच्या गुत्त्यामधे घेतलेला तो विलक्षण सूड.
तो घेताना त्या एवढ्याशा पोरामधे जागलेली मानवी स्वभावातल्या कमजोर जागांवर अचूक प्रहार करण्याची जाण.
रक्ताने ओघळून जात मांजा संपतो तेव्हां रिकाम्या लटकत राहिलेल्या फिरकीप्रमाणे आपलं मन सुन्न भिरभिरत रहातं. मात्र मांजाचा हा शेवट नसतो.
सुदैवाने.
शेवट होतो तो चिमीच्या भाबड्या, विस्कटून गेलेल्या नजरेत माणसावरच्या विश्वासाचा कोवळा किरण पुन्हां उमटवण्यात तिच्या भावाला यश मिळाल्यावरंच.
'मांजा' कृष्णधवल रंगातली डिजिटल फिल्म आहे. संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट, दुपार आणि मग पुन्हां रात्र अशा २४ तासांतल्या प्रत्येक प्रहराचं, तेही मुंबई शहरातल्या धारावी सारख्या एखाद्या बकाल वस्तीतल्या प्रहरांचं यात चित्रण आहे. चिआरास्क्युरोचा-प्रकाश छायेचा खेळ काळ्या-पांढर्‍या रंगामधून दृश्यांमधे किती ताकद आणू शकतो त्याचा नजरबंदी करणारा अनुभव या आधी आपण अनेकदा घेतलेला आहे. कागज के फूल, चारुलता मधे तो एक तरल सौंदर्यानुभव असतो आणि त्यातूनच मानवी भाव-भावनांची आंदोलने नाजूकपणे आपल्यापर्यंत पोचवली जातात, तर तारकोस्कीच्या स्टॉकर मधल्या 'झोन'पर्यंतच्या प्रवासात हाच चिआरास्क्युरो आपल्याला 'भय इथले संपत नाही...' चा विलक्षण वेगळ्या पातळीवरचा अनुभव देतो. 'मांजा' मधे केलेला चिआरास्क्युरोचा वापर ह्यां दोन्हीं अनुभवांचा एकत्रित प्रत्यय आपल्याला देतो. आधी शहरातली कठोर वास्तवता अधिक दाहकपणे आपल्यापर्यंत पोचते तर शेवटच्या दृश्यामधून 'जखम जिवाची हलके हलके भरुन यावी..' असं वाटायला लावणारी कोवळीकही जाणवून जाते. राही इतकंच ते श्रेय सिनेमॅटोग्राफर पंकजकुमारचं.

'मांजा' सुरु होताना जेव्हां समोर पडद्यावर कथा,पटकथा,दिग्दर्शन्,संकलन अशा 'सबकुछ' भूमिकेत 'राही अनिल बर्वे' ही अक्षरे दिसतांत आणि नंतर मांजा उलगडत जाताना ज्या वेगळ्याच पद्धतीने जातो ते पहातांना काही वर्षांपूर्वी वाचलेला राहीचा 'पूर्णविरामानंतर...' हा कथासंग्रह आठवणे अपरिहार्य असते. त्यांतल्या सगळ्याच कथा अशाच छोट्या आणि परिणामकारक, वाचकांना वेगळ्याच दृश्यप्रतिमांच्या जगात नेऊन पोचविणार्‍या, बर्‍याचशा ऍबस्ट्रॅक्ट आणि मानवी संवेदनांची टोकदार जाणीव करुन देणार्‍या, खूपशा जीएंच्या जातकुळीतल्या. मांजाची हाताळणी 'पूर्णविरामानंतरच्या' मधल्या जगाशी नातं जोडणारी नक्कीच वाटते.
कथांच्या वेगळेपणाचं भरपूर कौतुक होऊनही राहीने नंतर काहीच लिहीलेलं वाचण्यात आलेलं नाही. एकदम हा 'मांजा'. मधल्या मौनाच्या दीर्घप्रवासानंतरचा हा पहिलाच टप्पा.
टप्पा घेतलाय तोही कसल्या अफलातून उंचीवरचा!
अनिल बर्वेंच्या डोंगराएवढ्या उंचीपर्यंत एका उडीतच पोचलाय त्यांचा पोरगा हे नक्की.
त्याच्या आगामी 'तुंबाड' ह्या पूर्ण लांबीच्या हिंदी फिल्मबद्दल आणि 'आदिपश्य' ह्यां पॉप्युलर तर्फे प्रसिद्ध होणार असणार्‍या कांदबरीबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झालीय हे वेगळं सांगायलाच नको.