ऑगस्ट-सप्टें. हे महिने म्हणजे वर्षाऋतुचा जवळजवळ मध्य. या दिवसांत पाऊस चांगला स्थिरावलेला असतो. निसर्गाला त्याने सर्वांगाने बहरुन आणलेलं असतं. वेली, झुडुपे, झाडे, वृक्ष सारेच पानाफ़ुलांनी नखशिखांत सजलेले. जमिनीतलं प्रत्येक पडलेलं बीज रुजुन वर आलेलं असतं. ऋतु आणि निसर्गाशी कायमच मनोरम गुंफ़ण करुन असलेली आपली सण-संस्कृती साहजिकच या दिवसांत पर्णफ़ुलांच लेणं लेवूऩच साजरी होते यात नवल नाही.
दुर्गाबाई श्रावणसाखळीतल्या शेवटच्या दुव्याचे म्हणजे भाद्रपदाचे वर्णनच मुळी सर्व ऋतुंचे सार असणारा महिना असे करताना लिहितात, " वसंताचे पुष्पवैभव, ज्येष्ठाचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल सारेच काही ह्या महिन्यात अनुभवायला मिळते."
समृद्ध हिरवाईने खुललेल्या ह्या भाद्रपदात आपल्या घरात पाहुणे येणा-या आद्यदेवतेचे श्री गणरायांचे स्वागत जनलोक ह्याच बहुविध पत्री,फ़ुले,फ़लादींच्या समर्पणाने करतात हेही साहजिकच. त्यासाठीच्या सगळ्याच वनस्पती नैसर्गिकपणे उगवणा-या. ती फ़ुले, पत्री गोळा करुन आणायचं कामही घरातल्या लहान मुलामुलींचं किंवा स्त्रियांच. ताज्या,टवटवीत निसर्गाच्या इतक्या समीप जाऊन त्याचा परिचय दृढ करुन घ्यायची किती छान संधी ही!
लहानपणी ठाण्याला रहात असताना घराभोवतीचं या दिवसांतलं अंगण मधुमालती, अनंत, चाफ़ा, सोनटक्का, गुलबक्षी, जाई, पारिजातक, कण्हेर, कृष्णकमळीच्या फ़ुलांनी, दुर्वा-तुळशींच्या गजबजाटाने फ़ुलून आलेलं असायचं. मला वाटतं पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत इतपत हिरवाई सा-यांच्याच अंगणांमधे असायची. सोबतीला फ़ेर धरुन जांभूळ, उंबर, पांगारा वगैरेंची मोठी झाडेही असायचीच.
त्यानंतरच्या काळात मात्र अंगणच संकोचली आणि रस्त्यावरच्या मुद्दाम लावलेल्या बहावा, गुलमोहोर, पेल्टोफ़ोरम, आणि रेनट्रीच्या पाना फ़ुलांशिवाय इतर हिरवाई पहायला ह्याच स्त्रिया, मुलेमुली मोठ्या संख्येने नेचर ट्रेल्स नाहीतर जंगलांच्या वाटांवर फ़िरु लागली. ऑगस्ट-सप्टें. महिन्यांमधे शिलोंढा, जिजामाता उद्यानापासून कांसच्या पठारावर मोठ्या संख्येने जाणारे ग्रूप्स हेच तर दर्शवतात. पण मग य सा-यातून हाती पडतय ते फ़क्त दूरुन निसर्गाला निरखणं. त्याच्याशी ख-या अर्थाने जवळीक साधलीच जात नाही जी स्वत:च्या अंगणातल्या फ़ुलझाडांची फ़ुले-पत्री डोळसपणे, आपलेपणे हाताळण्यातून, निरखण्यातून साधली जायची आपोआप ही रुखरुख ख-या निसर्गप्रेमीच्या मनातून जाता जात नाही.
त्याची टोचणी बनली ती मात्र नुकतीच फ़ुलबाजारात गेल्यावर फ़ुलांच्या ढिगांनी ओसंडून वाहणा-या टोपल्यांशेजारी रस्त्यावर रचला गेलेला हिरव्या पानांचा अस्ताव्यस्त ढिगारा पाहिला तेव्हां.
"पत्री घ्या ताई" फ़ुलवाला त्या व्यक्तिमत्वहीन, नुसत्याच हिरव्या रंगाचे अस्तित्व मिरवणा-या पानांना विस्कटत मला म्हणाला.
ही पत्री? मला लहानपणी घरच्या गणपतीच्या फ़ुलांच्या परडीशेजारच्या तबकातली सुबकपणे रचलेली तजेलदार, टवटवीत पत्री आठवली. प्रत्येक पान स्वत: गोळा केलेलं.
"वरच्या कोवळ्या पानांना नका हाताळू गं. खालची जुन पानं नख न लावता अलगद तोडा. फ़ांद्यांशी धसमुसळेपणा नको." अशा आजीच्या पाने, फ़ुले कशी खुडावीत याबद्दलच्या किमान पन्नास सूचनांचा मान राखून गोळा केलेली ती पत्री.
फ़ुलवाल्यासमोरचा तो पानांचा ढिग मी जरा चाचपून वर खाली केला. ही कोणती पाने? गणपतीच्या पूजेला जी २१ पत्री लागतात त्यांपैकी ह्यात एकही तर दिसत नाही. इतरच झाडांचा पर्णसंभार हवा तसा ओरबाडलेला. द.भा.धामणस्करांच्या ओळी आठवून मन कळवळून गेले.-
" सकाळ झालीय
फ़ुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्त्र जनावर काठीने
पाना-फ़ुलांवर हल्ले करीत आहे.
बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हां
इथल्या झाडांना
फ़ुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुख-या मुळापर्यंत पसरलेली असेल... "
-------------------------------------------------------------------------
आपल्या सणांची ऋतु आणि निसर्गाशी सांगड घालताना आपल्या पूर्वजांनी निसर्गात होत असणारे बदल लक्षात घेऊन मोठ्या कौशल्याने त्यामागच्या परंपरा निर्माण केल्या. या दिवसात बहरणा-या बहुतेक सा-याच वनस्पती औषधी गुणधर्म असणा-या. त्यांचे जीवनचक्रही मर्यादित कालाचे. त्यांना योग्य प्रकारे हाताळणे म्हणूनच जास्त गरजेचे.
फ़ुलबाजारातून नुसतीच पानांची कोणतीही गर्दी आपल्या घरातल्या देवाला वाहण्यापेक्षा त्या वनस्पतींची ओळख, त्यांचे उपयोग आणि महत्व नव्याने माहित करुन घेणे अत्यंत आवश्यक बनलेले आहे. अंगणातल्या वनस्पती दूर जंगलात, तिथून परत बाजारात पोचल्या आणि तिथून कदाचित त्यांचा मार्ग अस्तंगत होण्याच्या दिशेने झपाट्याने जाऊ शकतो तेव्हां वनस्पतींना या अर्थाने ’समर्पयामी’ म्हणून निरोप द्यायची वेळ टाळायची तर ’पत्री’ म्हणुन गणपतीला अर्पण करायच्या वनस्पती नक्की कोणत्या, त्या कोठून येतात, कशा प्रकारे उगवतात, किती प्रमाणात असतात, त्यांचे उपयोग, रोजच्या व्यवहारातले महत्व, निसर्गात त्यांची विपुलता किती प्रमाणात शिल्लक आहे, नसल्यास त्या किती प्रमाणात वापरल्या पाहिजेत म्हणजे नष्ट होणार नाहीत असे अनेक विचार आपण नक्कीच करु शकतो.
गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस वनस्पतींची माहिती, त्यांचे स्थानिक व शास्त्रीय नाव, कुळ व औषधी उपयोग माहिती झाली तर ह्या वनस्पतींची वैयक्तिक पातळीवर लागवड, जोपासना, संरक्षण आणि संवर्धन करता येईल पुन्हा अधिक डोळसपणे आणि मग त्यातून नेचर ट्रेलला जाण्यापेक्षा जास्त समाधान आणि फ़ुलबाजारातून विकत आणलेल्या पत्री वाहाण्यापेक्षा जास्त पुण्य कदाचित आपल्या पदरात पडेल.
पुढच्या पोस्टमधे (निसर्गायण ह्या ब्लॉगवर) ह्या एकवीस वनस्पतींची शास्त्रीय माहिती देईन. शक्यतो फोटोग्राफ्ससकट.