Friday, December 04, 2009

पुन्हा एकदा राही!

प्रश्न फक्त दरम्यानचा आहे..

राही अनिल बर्वे सध्या काय करत आहे? 'मांजा' बनवून झालेला आहे, 'तुंबाड' बनायचा आहे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं, तर काहीच नाही.. आणि तरीही खूप काही. गुलजारच्या भाषेत सांगायचं, तर कदाचित तो 'कलेक्टिंग मोमेंट्स..'च्या प्रक्रियेत असू शकतो.एक कलाकृती हातून घडून गेलेली असते. दुसरं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि जास्त अचूक बनवायचं असतं. आता काय निर्माण होणार आहे, याची स्वतःलाच उत्सुकता असते. मनात आत्मविश्वासाची मस्ती असते, उरात लाल धगही असते; पण नवनिर्मितीची प्रक्रिया काही बाह्य कारणांमुळे, मग ती आर्थिक असोत किंवा आणखी काही, पण जागच्या जागी अचानक थांबते. वाट पाहण्याचा कालावधी लांबत जातो. हात दुसरं काही बनवायला नकार देतात. कलाकार ह्या काळामध्ये काय करतो? आताच्या अस्वस्थ, आत बरंच काही खदखदत असताना वरकरणी शांत राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या राही अनिल बर्वेला पाहताना मनात पुन्हा पुन्हा हाच विचार येत होता.

----------------------------------------------------------------------------






















सिनेमॅटोग्राफ़र पंकज, रांका, आणि दिग्दर्शक राही

तू 'मांजा' बनवलास. ज्यांनी ज्यांनी ही फिल्म पाहिली त्यांना ती आवडली. काहींच्या अंगावर आली. ही खूप डार्क शॉर्ट फिल्म आहे. त्याच्यात खूप एक्स्ट्रीम्स आहेत. अर्थात 'राशोमान'वर बोलताना कुरोसावा म्हणाले होते - "I like extremes, because I find them most Alive." तुझ्याबाबतीत काय? ही फिल्म अशीच बनवायची हे तुझ्या डोक्यात पक्कं असणारच अर्थात. तरीही त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांग. खूप वेगळी निर्मिती आहे ही, त्यामुळे तुझ्याकडून हे सर्व ऐकायची उत्सुकता वाटतेय.

राही: ती प्रक्रिया आता खूप मागे राहिली आहे आणि 'मांजा'ही खूप मागे पडलाय. 'मांजा'ने मला फिल्म कशी बनवावी याविषयी जास्त काही शिकवलं नाही, पण कशी बनवू नये याबाबत मात्र भरपूर शिकवलं. मी त्यावेळी ते शिकायला बर्‍याच ठिकाणी, बर्‍याचदा कुठे, कसा कमी पडलो, तेदेखील 'मांजा'च तुम्हाला सांगेल.मी 'मांजा' बनवला, तेव्हा माझे फिल्मविषयक ज्ञान अतिशय जुजबी होतं. लिंच, कोप्पोला, तारकोव्स्की, वाँग के वई.. त्यांची नावेदेखील माझ्या कानांवरून कधी गेली नव्हती. त्यांच्या कामांपासून शिकायचा प्रयत्न 'मांजा'नंतर सुरू झाला. त्यातून आता 'तुंबाड' घडतोय.
मला 'मांजा' बनवल्यावर आता काही वेडी मुले विचारतात, 'How to make a film? At least a short film? Please help us.' मी म्हणतो, तुमचं स्क्रिप्ट जर तयार असेल आणि ते चांगलंच आहे हा तुमचा विश्वास असेल, तर तुमच्यापेक्षा वेडी आणि तुमच्याइतकीच टॅलेंटेड माणसं शोधून काढा. अभिनेते, तंत्रज्ञ.. खूप कठीण जाणार नाही. कारण तेदेखील तुमच्यासारखा माणूस शोधत फिरत असतील. पॅशनेट, अतिशय टॅलेंटेड. पण रिकाम्या खिशांची, बेकार, अशीच माणसे गाठा. Don't go for known names. त्यांनादेखील त्या फिल्मविषयी तुम्ही पेटलाय, तसे पेटवा. Be their leader. तुमची लहानशी टीम बनवा. ती जमेल तितक्या वेगात एकसंध करा. मग खोटं बोला, मॅनिप्युलेट करा, न लाजता बेधडक भीक मागत फिरा. जवळ असलेलं, नसलेलं सारं पणाला लावा आणि हरायलादेखील तयार राहा. हे सारं करताना कुठलीही मर्यादा मनाशी ठरवून ठेवू नका. तशी मर्यादा जर तुम्ही तुमच्यावर घालून घेतलीत, तर मग ती फिल्म करताना असो किंवा इतर काहीही, ती मर्यादाच तुमच्या आयुष्याचा एक हिस्सा बनून जाईल. तुमचं काम, तुमची नीतिमत्ता, तुमच्या सार्‍या अस्तित्वालाच ही मर्यादा वेटोळं घालून बसेल. तुम्हांला ती ओलांडून जाणं भागच आहे. If it kills you, it kills you. भक्कम, छोटी टीम आणि लहानसे, पण प्रॅक्टिकल बजेट उभे करा. खिसे पूर्ण रिकामे असताना, कुठलाही अनुभव पाठीशी नसताना, इतक्या बेसिक स्टेजला जर हे उभे करू शकलात, तर पुढला प्रवास कठीण नाही. फिल्म मेकिंगच्या तांत्रिक बाजू माहीत नाहीत, म्हणून कधीही हातपाय गाळून बसू नका. असा डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी शोधा, ज्याला त्या माहीत आहेत आणि तुम्हांला त्या तो हळूहळू समजावू शकेल. पण वेळ आल्यावर शूट करताना त्याच्या विचारांपेक्षा स्वतःच्या अननुभवी दृष्टिकोनाशी जास्त प्रामाणिक राहा, कारण ती दृष्टी तुमची स्वतःची असेल आणि पुढे चुकली, तर उलट जास्त शिकवेल.
'मांजा'चे ओरिजिनल बजेट चोवीस लाख होते, क्रू रिक्वायरमेंट किमान पंचेचाळीस जणांची होती. आणि शेड्यूल बत्तीस दिवसांचे होते. दोन वर्षे फंड्ससाठी अथक परिश्रम करून हरल्यावर, आम्ही फक्त चारजणांनी (तीन काम करणारे अ‍ॅक्टर्स वगळून) तो अखेरीस साठ हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. नाईट शॉट्ससाठी कित्येकदा पंकजने कार-बाईक्सचे लाईट्स वापरले. पण महत्त्वाचे म्हणजे, जर हाती पुढे जायला दुसरा उपाय नसेल, तर ... this method works.


मांजा'चं लोकांकडून झालेलं कौतुक, त्याला मिळालेले 'मिफ'चा सुवर्णशंख आणि इतरही अनेक पुरस्कार, डॅनी बॉयलने ही फिल्म एसएमडीच्या 'ब्ल्यू रे डीव्हीडी'सोबत दाखवण्यास निवडणे, पदार्पणातच असं कौतुक आणि यश मिळणं, या सगळ्यांवर तुझी नक्की प्रतिक्रिया काय?

राही: काही नाही. It's just beginner's luck. That's it. पुढच्या प्रवासात ते माझ्यासोबत राहील की नाही याचा विचार मी केला नाही. सुरुवात ठीक झाली, याहून जास्त या सर्वांना फारसा काही अर्थ नाही.

तुझी 'आदिमायेचे' ही कादंबरी पॉप्युलर प्रकाशनातर्फे नुकतीच प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल सांग. तिच्या लिहिण्यामागच्या प्रेरणेबद्दल सांग. 'पूर्णविरामानंतर..' या तुझ्या कथासंग्रहानंतर जवळ जवळ दहा-बारा वर्षांनी तू ही लिहिलीस. मधल्या काळात लिहावेसे वाटले नाही काही?

राही: बारा ते सोळा ह्या वयात मी - बरं-वाईट जे काही असेल ते, पण - झपाटून लिहिले होते. 'पूर्णविरामानंतर..'मधील सर्व कथा त्यावेळच्या आहेत. त्यातल्या बहुतांशी आता मला स्वतःला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे बोलणे टाळतो. नंतर लिखाण पूर्ण थांबले. पुढील अकरा वर्षे एक ओळही लिहिली नाही. पुढे कधी लिहीन असं वाटलं नव्हतं. पण २००४ साली अचानक 'आदिमायेचे' लिहिली. त्याच वेळी 'मांजा'चं फायनल स्क्रिप्ट आणि 'तुंबाड'चा कच्चा ड्राफ्टही लिहिला. त्याचवेळी चित्रे काढायलाही शिकलो. 'आदिमायेचे' लिहायला जितकी कठीण होती, त्याहीपेक्षा ती चारशे पाने एडिट करायला खूप जास्त कठीण होती. आणि मला माझं पुस्तक कुठल्याही परिस्थितीत शंभर-सव्वाशे पानांच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. तिची सारी ताकद थोडक्यातच सामावलेली आहे. पूर्ण झाल्यावर, मला ती मी सोडून दुसर्‍या कुणाला समजेल, आवडेल, अशी खात्री वाटेना. तेव्हा ती आणखी दोन वर्षे तशीच पडून राहिली. त्या अवधीत मी 'मांजा' बनवला. 'तुंबाड'वर पुढे गेलो. भरपूर फिरलो. खूप धमाल उद्योग केले. सारी सुरुवात त्या पुस्तकापासून झाली. एका अर्थी त्या पुस्तकाने मलाच लिहिलं. गेल्या वर्षी ती पॉप्युलरला दिली. त्यांना ती आवडली.
मी एक सतत पाहिलंय, कादंबरीतला हा जो कुणी 'मी' असतो, सतत स्वतःकडे द्रष्ट्याची भूमिका वगैरे घेऊन पानापानाला फार वैतागवाणी ऑनेस्टी झाडत असतो. घडून गेलेल्या घटना आणि व्यक्तिरेखा तो आपल्यासमोर फार प्रांजळपणे, काहीही लपवाछपवी न करता मांडतो. हा आदिमायेतला 'तरंग' फार काळ माझ्या मनात घर करून होता. तो द्रष्टा नाही, दांभिक आहे. भोंदू, चलाख, हलकट, पण खोल आत कुठेतरी माणुसकीचा झरा असलेला. त्याच्याकडे सांगण्यापेक्षा लपवण्यासारखे खूप जास्त आहे. घडून गेलेल्या घटनांविषयी, आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांविषयी फार प्रांजळपणा राखून बोलणे त्याला अजिबात परवडणारे नाही आणि स्वत:च्या फायद्या-तोट्यानुसार घडलेल्या घटना, माणसे मॅनिप्युलेट करून आपल्यासमोर वेगळ्या स्वरूपांत मांडण्याची हातोटी त्याला उपजत आहे.. (आणि ती कमीअधिक प्रमाणात आपल्या प्रत्येकात असते.) फक्त त्याचे चित्त थार्‍यावर नसल्याने सांगताना होणार्‍या विसंगतींतून क्षणासाठी सत्य आपल्यासमोर अवचित झळाळून नाहीसे होत राहते. 'तरंग'च्या शब्दांवर पूर्ण विसंबून 'आदिमायेचे' सरळसोट वाचली, तर ती समजायला थोडी कठीण जाईल इतकं नक्की. आणि तिचा शेवट आवडलेला, किमान 'ठीक' वाटलेला माणूस मला अद्याप भेटायचाय. :D

'मांजा'नंतर तू 'तुंबाड' बनवायला घेतलास. त्याबद्दल सांग.


राही: 'तुंबाड' २०१० च्या ऑक्टोबरमध्ये किंवा २०११ च्या सुरुवातीला रिलीज होईल. 'तुंबाड' अतिशय प्राचीन भयकथांवर आधारित आहे. आम्ही २००५ पासून 'तुंबाड'च्या फायनान्ससाठी प्रचंड प्रयत्न केले, पण बिग बजेट - नो स्टारकास्ट - अतिशय वेगळा, ह्यापूर्वी कधीही न हाताळलेला - बिझनेसच्या परिभाषेत 'अतिशय रिस्की' विषय, आणि कुठलीही तडजोड करायला तयार नसलेल्या डायरेक्टर-सिनेमॅटोग्राफरची जोडगोळी. अशावेळी ज्या चिपळ्या वाजायच्या त्या सार्‍या वाजल्या. दोन मोठे हॉलिवूड स्टुडिओज अखेरच्या स्टेजला शूटिंगच्या फक्त महिना-दीड महिना आधी एकामागोमाग एक 'तुंबाड'मधून बॅक आऊट झाले. त्याही आधी दोन वर्षांपूर्वी - आम्ही 'तुंबाड' खूप लहान स्केलवर करत असताना आमचे फायनान्सर्स शूटिंगच्या फक्त चोवीस तास आधी बॅक आऊट झाले होते. पुढे ते पूर्ण प्रॉडक्शन हाऊसदेखील कोलॅप्स झालं.. आता चौथ्यांदा पुन्हा 'तुंबाड' उभा राहतोय तोदेखील इंटरनॅशनल फंडिंग्ज आणि फॉरेन स्टुडिओजमुळे उभा राहतोय. कारण टिपिकल मेनस्ट्रीम हिंदी फिल्म्सचे प्रोड्यूसर्स 'तुंबाड'वर नजर टाकायलासुद्धा तयार नव्हते.आमचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता, दीड-दोनशे माणसांची टीम पुन्हा पुन्हा अथक परिश्रमांनी उभी करणे आणि ती अगदी अखेरच्या क्षणी पुन्हा कोलॅप्स होणे, दोन वर्षांत तीन वेळा ..Its hard to handle. बरेच अ‍ॅक्टर्स, जिवाभावाचे क्रू मेंबर्स ह्या दोन वर्षांत रिप्लेस झाले. पण चांगलं इतकंच, की मुरून मुरून ह्या सर्व कालावधीत आमच्या नकळत ही फिल्म वाढत गेली. पहिल्या खेपेस शूटिंगच्या चोवीस तास आधी कोलॅप्स झालेला 'तुंबाड', आणि आज पुन्हा चौथ्यांदा उभा राहतोय तो 'तुंबाड', दोन्ही पूर्णपणे भिन्न फिल्म्स वाटाव्यात इतका प्रचंड फरक दोघांत आहे.

डोक्यात आपल्याला आता काय करायचे आहे हे पक्के तयार असते, बाहेर उसळी मारत असते आणि सर्जनाची ही प्रक्रिया कोणत्याही कारणाने - मग ते आर्थिक कारण असो किंवा काही इतर अडथळे - जेव्हा अचानक थांबवली जाते, तेव्हा त्याला तू कसा रिअ‍ॅक्ट होतोस?

राही: ती आत्तापर्यंत इतक्यांदा आणि इतक्या वाइटात वाईट प्रकारे थांबवली गेली आहे, की खूपच पूर्वी माझ्या पोतडीतल्या सार्‍या रिअ‍ॅक्शन्स देऊन देऊन संपल्या. आजकाल मी फक्त शांतपणे फार गाजावाजा न करता उठून पुन्हा उभा राहतो.

संघर्षाच्या काळात आतली धग टिकवून ठेवणे, त्यावर राख जमा होऊ न देणे हे कसं जमवू शकलास?

राही: ते कुणालाही विचारपूर्वक प्रयत्न वगैरे करून जमवता येत नाही. ती खरी असेल, तर आपोआप टिकते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही. नसेल, तर सोबत तुमच्या स्वप्नांची राख घेऊन आपसूक विझते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही.

चित्रपट जितका बिग बजेट तितकी फायनान्सरची चित्रपटावरची सत्ता वाढत जाते. मग यातून मनासारखा चित्रपट बनवणे कितपत शक्य होणार?

राही: मुळात ती सत्ता मर्यादेबाहेर वाढू न देणे, हे सर्वस्वी माणसा-माणसांवर अवलंबून असते. तुम्ही नावाजलेले दिग्दर्शक नसाल - जो, जे हवे ते मिळत नसल्यास विरोध करून ते मिळवण्याच्या फर्म कॉन्फिडंट लेव्हलला आहे - तर तुम्ही आधी तिथवर पोचू शकत नाही, कारण कुणी तेवढा मोठा जुगार तुमच्यावर खेळणार नाही - हे एक. आणि विरोध करायला जी धमक लागते, त्या धमकेचा पाया त्या स्टेजला त्या फायनान्सर्स/प्रोड्यूसर्स/स्टुडिओंच्या लेखी सर्वस्वी तुमच्या तोवर मिळवलेल्या बॉक्स-ऑफिसच्या यशात दडला असतो. तुमच्या सर्जनशील मनाशी त्यांना फारसे देणे-घेणे नसते. तुम्ही फर्म असाल, तर त्या स्टेजला मनासारखा चित्रपट बनवणे तितकेसे कठीण जात नाही. १९७२ साली फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाने गॉडफादर बनवताना स्टुडिओ एक्झिक्युटिव्हजशी सतत अखेरपर्यंत लढून कुणा एका अल पचिनो नावाच्या नवख्या अनोळखी अभिनेत्याला प्रमुख भूमिकेमध्ये शूट संपेपर्यंत टिकवण्याची आणि अशीच असंख्य इतर उदाहरणे आहेतच की. He actually threatened to quit the production. इथलंच उदाहरण द्यायचं, तर अनुरागने 'ब्लॅक फ्रायडे' पासून 'देव-डी' ज्या हलाखीत आणि तरीही ज्या त्वेषाने बनवले त्याला तोड नाही. पण आता तो स्वतःशी एकही काँप्रोमाईज न करता तितक्याच त्वेषाने शंभर-दीडशे कोटींचा 'बाँबे वेलव्हेट' बनवतोच आहे की.. म्हटलं ना.. माणसा-माणसांवर असतं. आणि शर्मिला, प्रामाणिकपणे सांगायचं, तर समोरच्याला विरोध करणे खूप सोप्पे असते, पण त्यामागची कारणे आपण ज्यांना विरोध करतोय त्यांना 'समजतील' अशा पद्धतीने समजावणे आणि मुख्य म्हणजे अखेरीस पटवून देणे, ह्याला खरी चलाखी आणि हातोटी लागते. तो फिल्म मेकिंगचा एक अविभाज्य भाग आहे, असे समज हवं तर. ती हातोटी नसली, की दोन-तीन चांगल्या, पण अपयशी प्रयत्नांनंतर आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये जाऊन बसलेले आणि सार्‍या जगावर 'कळत नाही .. कळत नाही..' च्या खिन्न ओल्या पिचकार्‍या सोडणारे तांब्याचे सेमिनार-संन्यासी निर्माण होतात. पण चांगला चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रचंड बजेटची गरज नसते, हाच इथे सार्‍या फकिरांसाठी एकमेव उ:शाप आहे.

तू लिहितोस, चित्रं काढतोस आणि चित्रपट बनवतोस - अभिव्यक्तीची ही तीनही सारख्याच ताकदीची माध्यमं तू सहज हाताळू शकतोस. तुझं आवडतं माध्यम कोणतं आणि का? या तिन्ही माध्यमांची नक्की ताकद, मर्यादा व त्यांतला फरक काय?

राही: चित्रं केव्हाही मूड आला, की काढता येतात, कल्पना चमकून गेली, की कुठेही बसून केव्हाही लिहिता येते आणि लिहिल्यावर तातडीने ते वाचता येते. पण मध्यरात्री तीन वाजता लाल डोळ्यांनी आणि शांत समाधानाने फायनल एडिट पूर्ण झालेला स्वतःचा प्रोजेक्ट पहिली काही वर्षे रक्त, घाम ओकल्याखेरीज कुणालाही नाही पाहता येत. तीच त्यांची ताकद. त्याच मर्यादा. आणि आवडतं माध्यम? त्या-त्या वेळी जे करत असू, ते त्या-त्या वेळी सर्वांत जास्त आवडत असतं. सिंपल.

ही माध्यमं एकात एक गुंतलेली आहेत आणि एकातून पुढे असा सहज प्रवास होणं नैसर्गिक आहे, असं तुला वाटत नाही?

राही: मी अशा सार्‍यांचा फार विचार नाही करत. झाला, तर कळेल. नाही कळला आणि तरी होत असला, तर बरंच आहे.

लिहिणे आणि चित्रपट बनवणे याबाबतीतले तुझे प्रेरणास्रोत कोणते? त्यांच्यापेक्षा तू कोणत्या पातळ्यांवर वेगळा आहेस असं तुला वाटतं?

राही: प्रेरणास्रोत, पातळ्या, वेगळेपण वगैरे फार गहन खोल्या वगैरे लाभलेली प्रकरणे आहेत. मी नुकता नुकता गुडघाभर पाण्यात पाय मारायला शिकतोय. असा खोलात गेलो, तर बुडेन.

अनिल बर्व्यांचा मुलगा म्हणून ओळखलं जाताना काही दडपणं जाणवतात का? विशेषत: तूही लिहितोस म्हणून.

राही: मला स्वतःला बर्व्यांचं लिखाण फारसं आवडत नाही. बर्‍याचदा फार मेलोड्रॅमॅटिक आणि बहुतांशी 'लाल' नक्सलाईट विचारांनी बजबजून भरलेलं वगैरे असायचं. त्या सार्‍या 'ब्लाइंडली लेफ्टिस्ट' ठोंब्यांचा आणि व्यक्तिरेखांच्या तोंडून स्वतःच्या, लाल केशरी जी काय असेल ती, राजकीय बोंबाबोंब करणार्‍या लेखकांचा, एकूणच मला स्वतःला तिटकारा आणि कंटाळा आहे. थोडक्यात खूप लिहिण्याची त्या माणसाची हातोटी मात्र जबरदस्त होती.
माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचे मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं. पण त्यात कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. कुठल्याही भाषेत असा एखादा लेखक शतकांतून एकदा केव्हातरी चुकून अपघाताने येऊन जातो.. त्यामुळे ठीक आहे.
आणि दडपण? विनोदी प्रश्न. मी लेखक-साहित्यिक वगैरे आहे, असे भयंकर भास माझ्या अतिशय वाईट दिवसांतदेखील मला कधी झाले नाहीत आणि डोकं शुद्धीवर असेपर्यंत होणारही नाहीत. कधीतरी मूड आला, तर थोडेसे लिहून जातो, ते वर्षा-दहा वर्षांतून केव्हातरी टीचभर. बास. त्यामुळे कुठलं दडपण? कसलं दडपण? आणि कशासाठी?

--------------------------------------------------------------------------------

राही एकटाच काही या 'दरम्यानच्या काळात' अडकून पडलेला नाहीये. त्याच्यासारखे अनेक कलाकारांचे अस्वस्थ आत्मे आजूबाजूला असतात. स्वतःशी, बाहेरच्या जगाशी त्यांचा सतत झगडा चालूच असतो. 'ईटर्नल स्ट्रगलर' असतात ते त्या अर्थाने. कदाचित ते आपल्याही आत असतात. या झगड्याला सामोरे जायची वेळ येतेच कधी ना कधी.. काय करायचं असतं तेव्हा आपण? राहीसारख्या मनस्वी कलावंताकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो बहुधा.

Tuesday, August 04, 2009

असंच!

( खरं तर या पोस्टला काही अर्थ नाही तसा. पण अर्थाचंच लिहायला हवय असं कोणी सांगीतलं? अर्थात मुद्दाम ठरवून निरर्थक लिहायचं असंही काही नाही. मेल थ्रू पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करायचं बरेच दिवस मनात होतं ते आज करायचं ठरवलं पण विषयच डोक्यात नव्हता. मग समोर एचटी च्या संडे सप्लीमेन्टमधून दोन चिरतरुण सुंदर चेहरे डोकावताना दिसले. )

महाराणी गायत्री देवी आणि अभिनेत्री लीला नायडू.
दोन्ही सर्वात सुंदर स्त्रिया लागोपाठ जाव्यात हा काय विचित्र योगायोग? केवळ व्होगच्या यादीत प्रसिद्ध झाली त्यांची नावे म्हणून त्या जगातल्या सर्वात सुंदर स्त्रिया असं नाही मला म्हणायचं. खरोखरच अतिशय क्लासिक चेहरे होते दोघींचे.

सिक्किम ट्रेकला आम्ही गेलो होतो तेव्हा येताना कुचबिहार संस्थान ला दोन दिवस राहिलो होतो. जवळच लतागुरी अभयारण्य होतं ते पहाणं हा मुख्य हेतू होता. सिक्किम-भुतानचा नितांत सुंदर निसर्ग पाहिल्यावर कोणत्या कधी नावही न ऐकलेल्या कुचबिहार संस्थानातले कोणे एका काळातले राजवाडे आणि गतवैभव पहाण्यात निदान मला तरी बिल्कूल इंटरेस्ट नव्हता. शिवाय त्या राजवाड्याचं रुपांतर म्युझियममधे केलं आहे हे ऐकल्यावर तर ते स्कीपच करायचं ठरवलं. पण मग लतागुरी दुस-या दिवशी बघायचं ठरलं आणि कुचबिहारच्या हॉटेलात संध्याकाळ घालवणं जिवावर आलं. राजवाडा सरप्राइजींगली अतिशय उत्त्तम अवस्थेत होता. उतरत्या संध्याकाळी तिथे रोषणाईसुद्धा केली होती.
राजवाड्यात शिरल्यावर पहिल्याच दालनात एका डिव्हाईनली सुंदर टीनएज मुलीचा घोड्याशेजारी उभा असलेला एक ब्लॅक ऍन्ड व्हाईट आता सेपिया टोन आलेला फोटोग्राफ पाहिला आणि पाय हलेचनात. रोमन हॉलिडेमधली ऑड्रे हेपबर्न माझ्यामते आत्तापर्यंतची सर्वात सुंदर रॉयल ब्युटी. पण हा फोटो तर तिच्यापेक्षाही निदान शंभर पटींनी सुंदर होता. सारं दालनच या सुंदर मुलीच्या फोटोंनी भरुन गेलेलं. अगदी तान्हेपणापासून पुढच्या सर्व टप्प्यांमधे ते सौंदर्य उमलत जाताना प्रत्येक फोटोत दिसत होते.
कुचबिहार म्हणजे गायत्रीदेवींचे जन्मस्थान हे मला माहितच नव्हते. काहीशा अंधा-या त्या दालनात प्रत्येक छायाचित्रातून गायत्री देवींचे अलौकिक सौंदर्य उजळून निघत होते. कमळासारखे डोळे असणे म्हणजे काय हे त्यादिवशी कळलं.
इतर राजघराण्यातील स्त्रियांनी कितीही तलम शिफॉन नेसून गळ्यात टपो-या मोत्यांचा दुपदरी सर घालून महाराणी गायत्री देवींची नक्कल केली तरी त्यांच्या त्या अस्सल क्लासिक फ़ेस कटची बरोबरी करता येणे कुणाला कधीच शक्य नव्हते.

आणि लीला नायडू!!

मला खूप पूर्वी टीव्हीवर पाहिलेला ब्लॅक ऍन्ड व्हाईट ’अनुराधा’ अनेक कारणांसाठी कधीही विसरता आलेला नाही. त्यातली ती नाजूक, क्लासिक युरोपियन चेहरे शैलीतली अभिनेत्री, बलराज सहानीची संयत एक्स्प्रेशन्स, रवीशंकरांची त्यातली सतार आणि ते गाणं.. जाने कैसे सपनोंमे खो गयी आखियां... ’

नंतर कधीतरी बेनेगलच्या त्रिकाल मधे सुद्धा लीला नायडू दिसल्या होत्या. तेव्हां प्रौढ वय असणार त्यांचं. पण तरीही तितक्याच आवडल्या.

मात्र या कितीही सुंदर स्त्रिया असल्या तरी वयानुसार काळाला सुद्धा आपल्या खुणा त्यांच्या चेह-यावर उमटवण्याचा मोह आवरणे शक्य झाले नसावे. त्या तशा उमटल्याही. पण सौंदर्य किंचितही न उणावता.

गायत्री देवी आणि लीला नायडू या दोघींच्या वृद्धत्वातल्या चेह-यावरचं सुरकुत्यांचं अस्पष्ट जाळं पाहिलं की मला जीएंची ती अप्रतिम उपमा आठवते. " एखाद्या तेजस्वी महावस्त्राला अंगभुत पडलेल्या चुण्या असाव्यात तशा त्या खानदानी चेह-यावरच्या सुरकुत्या .." वृद्धत्वातल्या सौंदर्याचं इतकं अचूक वर्णन दुसरं नाही आणि ह्या शब्दांना सार्थ ठरवणारे इतके सुंदर चेहरेही दुसरे नाहीतच.

Saturday, March 14, 2009

पेल्टोफ़ोरम डायरी


फ़ेब्रुवारी महिना संपला.
उन्हाळा चांगलाच सुरु झालेला आहे. मुंबईत तो तसा कधी नसतो म्हणा! पण या दिवसांत घाम कमी त्यामुळे उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवतो. आजूबाजूचा शिल्लक निसर्गही धूळभरला, रुक्ष आणि कोमेजलेला.
भर दुपारी माझ्या खिडकीबाहेरच्या त्या कृश, काटकिट्या, तपकिरी फांद्यांचा पसारा कसाबसा सावरत उभ्या असणा-या उदास पेल्टोफ़ोरमला (दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा असाच दिसतोय) पहात मी हातातलं रस्किनचं पुस्तक हताशपणे मिटते. मला त्याचा (पुन्हा एकदा) हेवा वाटत असतो. या दिवसांत त्याच्या खिडकीबाहेरच्या चेरीच्या झाडांवर गुलाबी कळ्या उमलायच्या घाईला आलेल्या आहेत. वसंत त्याच्या दाराशी आहे अगदी आता. हिमालयातल्या देवदारांनी भरलेल्या उतारांवरच्या गावातल्या त्याच्या घराच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याच्या हाताच्या अंतरावर असतो. आणि तो लवकरच फ़ुलणार असतो.

------------------

मार्चचा पहिला आठवडा संपत आला. उन आता अजूनच वाढलय. अगदी सकाळी आठलाही डोळ्यांवर गॉगल्स चढवावे असं वाटायला लागतं. अकरानंतर तर घामाच्या धाराच सुरु होतात. आंब्यांना आणि ब-याचशा झाडांना छान कोवळी पालवी फ़ुटतेय तांबुस.
माझ्या खिडकीबाहेरचा पेल्टोफ़ोरम अजूनही तसाच आहे. मळकट, तपकिरी सुकलेल्या आपल्य काटकिळ्या फांद्यांचा ढिगारा कसाबसा सांभाळत. काही घरी येणारे तर अगदिच मेलय हे झाड असंही खुशाल म्हणतात. मी लक्ष देत नाही.

-------------------

यावर्षी मुंबईत थंडीही अजिबात पडली नव्हती. फ़ेब्रुवारी महिना संपत आला की खिडकीच्या काचांआडून सोनसळी, उबदार उन्हाच्या लडी अंगावर खेळायला सुरुवात व्हायची आणि कदाचित म्हणूनही असेल पण पेल्टोफ़ोरमचे ते कृश विरुप नजरेला एरवी इतकं खुपायचं नाही.
पण आता त्याकडे बघवेना. संक्रांतीच्या आसपास उडवलेल्या पतंगांपैकी एक पांढरा पतंग एका काडीसारख्या सुकलेल्या फांदीच्या टोकावर अडकून निर्जिवपणे हलत होता. तेव्हढीच काय ती त्या झाडावर जिवंत हालचाल.
शिशिर ऋतुंत तसंही पेल्टोफ़ोरमवर मागे राहिलेलं अस्तित्व असतं फक्त तांब्याच्या लांबट चपट्या शिक्क्यांसारख्या दिसणा-या शेंगांचं. त्या काटकिळ्या फांद्यांना झाकून टाकून आपलं रस्टी कॉपरशिल्ड बेअरर नाव सा-या हिवाळाभर सार्थ करत रहातं हे झाड.
पेल्टोफ़ोरमवर अजून ताम्रयुगच चालू आहे एकंदरीत. हवेत मार्च महिन्यातला ताजा, सोनेरी गंध पसरला असला तरी या झाडावर त्याच्या सुवर्णयुगाची वैभवी झळाळी पसरायला अजून वेळ आहे. वसंत फार दूर आहे...!

------------------------

मार्चचा दुसरा आठवडा सुरु झाला आणि एका पहाटे खिडकीच्या काचेबाहेरचे केशरी पडदे दूर केल्या केल्या समोरच्या उगवतीच्या फिकट कोवळ्या प्रकाशातून एक तेजस्वी, पोपटी, तजेलदार हिरव्या नव्हाळीचा झोतच सामोरा आला. गेले दोनेक दिवस छोट्या, हिरव्या चिंचेच्या पानांहून खूपच सतेज आणि थोड्या मोठ्या आकाराच्या पानांचे झुबके फांद्यांच्या कृश हातांच्या ह्या त्या कोप-यांवर झालरींसारखे झुलत होते खरे पण त्याचा हा एवढा मोठा हिरवा मंडप असा एका रात्रीतून बनेल असं वाटलच नव्हतं.

मी अतीव आनंदाने काचा उघडते. पानांचा हिरवा पिसारा नजरेसमोर फ़ुलून आला होता. पोपटी पानांच्या गर्दीतून मधूनच माना वर काढून आता सोबत मिळाल्याच्या आनंदात डुलणारे ताम्रवर्णी शेंगांचे तुरे अचानक देखणे, सतेज दिसायला लागले.
सूर्य पूर्ण उगवला आणि त्याच्या सोनेरी प्रकाशाचे झोत आज नेहमीसारखे डायरेक्ट खिडक्यांमधून घरात अधिरपणे नाही घुसले. हिरव्या पानांशी लडिवाळपणे बिलगून पूर्ण एका पानगळीच्या मोसमात राहून गेलेल्या गप्पांची देवाणघेवाण करुन झाल्यावर मग सावकाश ते माझ्यापर्यंत पोचले.
मला घाई नव्हती.
नजरेसमोरची सोनेरी हिरव्या कवडशांची नक्षी आता हा एक आख्खा वसंत ऋतूभर माझ्या खिडकीबाहेर माझ्यासाठी ओठंगून राहणार होती. शिवाय आता लगेचच येणा-या एका रात्रीत कधीतरी ह्या हिरव्या नकाबामागून ते लख्ख सुवर्णमुद्रांचं सौंदर्य अशाच पहाटे माझ्यापर्यंत ह्याच खिडकीतून येऊन पोचणार होतं. विस्तृत वैभव अचानकच डोळ्यांपुढे ओतण्याचं या झाडाचं कसब आता माझ्या परिचयाचं झालं होतं.

मी आनंदाने वाट पहायला तयार होते.


-------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या घरातून थेट समोर दिसणारा पेल्टोफ़ोरम गेली ६/७ वर्षं तरी तिथे आहे. आता त्याचा विस्तार चांगलाच पसरलाय. रस्त्यावर अजूनही इतर बरीच पेल्टोफ़ोरम, गुलमोहोर, करंज आणि अर्थातच आंब्याची, नारळीची झाडे आहेत. पण आमच्या खिडकीसमोरचा पेल्टोफ़ोरम स्वत:च्याच मस्तीत असल्यासारखा. इतर झाडांवर जेव्हा पालवी तेव्हा हा उघडाबोडका आणि बाकीच्या झाडांवर पावसाच्या झडीत एकही फ़ुल शिल्लक रहात नाही तेव्हा याच्या छतावर पिवळ्याजर्द फ़ुलांचे बुंदके भरभरुन.
पूर्वी फक्त हॉलच्याच खिडक्यांमधून याच्या फांद्या दिसायच्या आणि दुस-या मजल्यावरच्या आमच्या घराच्या लेव्हलला जेमतेम पोचायच्या. आता पूर्ण बहरात असला की नजरेत मावत नाही. स्वयंपाकघर, बेडरुमच्या खिडक्यांमधूनही याच्या फांद्या नजरेसमोर दिसतात. चार वर्षांपूर्वी हॉलच्या पूर्वाभिमुख अर्ध्या भिंतींवरच्या खिडक्या काढून आम्ही फ़्रेन्च विन्डोज बसवल्या. ती भिंत पूर्ण काचेचीच झाली.
आणि त्याच वर्षी पेल्टोफ़ोरमला पहिला भरगच्च बहर आला.

बरेच दिवस आधी हिरव्या पालवीने आणि ताम्रशेंगांनी भरलेल्या त्याच्या फांद्यांवर बुंदीसारख्या कळ्यांचे उभट तुरे डोकावत होते. बघता बघता सा-या झाडाची कॅनोपी या तु-यांनी भरुन गेली. मग त्यावर एकटं दुकटं चुकार पिवळं फ़ुलही दिसायला लागलं होतं. पण पानांची हिरवी गर्दी इतकी दाट की त्यांच्याकडे लक्षही जात नव्हतं. त्यात ह्या फ़ुलांचा रंग अमलताशाच्या फ़ुलांसारखा तकतकित पिवळा नाही. थोडी गडद झाक आणि मधोमध चॉकलेटी पुंकेसरांचा वर्तुळाकार झुबका.
तपकिरी शेंगांची गर्दी आणि हिरवी पाने अजूनही झाडावर ऐन बहरात असताना ही तुरळक फ़ुले फारशी आकर्षक दिसत नव्हती. मात्र एक दिवस पहाटे झाडावरच्या सगळ्याच कळ्यांनी ठरवून ठेवल्यासारखे डोळे उघडले आणि सोनेरी जरतारी बुंदक्यांसरख्या फुलांनी झाडावरचं प्रत्येक हिरवं पान झाकून टाकलं.
भिंतीच्या काचा पूर्ण पिवळ्या रंगांनी रंगल्या.
ते सोनेरी वैभव अवर्णनीय होतं.
घरात येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या सोनेरी झगमगत्या अक्षरश: डोंगरासारख्या आकारात रचलेल्या फ़ुलांच्या राशीकडे पहात रहात. उतरत्या दुपारी त्यावर सातभाईंचा गजबजाट, फ़ुलपाखरांची येजा सुरु होई. सकाळी मधमाशा गर्दी करत. काही उघड्या काचांमधून घरातही शिरत.
पण आमची तक्रार नसे.
अगदी मध्यरात्री सुद्धा उठून ते फ़ुलांच वैभव पहात बसावं असं होतं. आकाशात चंद्राच्या प्रकाशात ते पिवळे जरतारी बुंदके अजूनच सतेज होत. पायातळीचा रस्त्यावरही याच फ़ुलांचे यलोकार्पेट. सारा आसमंतातच सोनेरी आभा पसरुन रहाते.

पेल्टोफ़ोरम त्यावर्षीपासून आमच्या खिडकीसमोर असाच भरभरुन फ़ुलतोय.
वाट पहायला लावतो आणि बहरतो तेव्हां हातचं राखून न ठेवता. मनसोक्त.

त्या फ़ुलांच्या कडांनी कातरल्यासारख्या दिसणा-या नाजूक नक्षीदार पातळ सोनेरी पाकळ्य़ांमधून असंख्य पिवळी त्या फ़ुलांपेक्षा थोड्या फ़िक्या रंगांची फ़ुलपाखरं बागडतात. एखाद्या संध्याकाळी दुर्मिळ ब्लू मॉर्मोनही फ़ुलांवर पंख पसरुन जातं. पहाटेला भारद्वाज त्या सुवर्णराशीवर बसून जातो आणि पिवळे चिमुकले टिट्स, केशरी फ़ुलचुखे, सनबर्ड्स तर झाडावरुन मुक्काम हलवयालाच तयार नसतात.

मुंबईत एप्रिल-मे चा उन्हाळा तेव्हा ऐन भरात असतो. भर दुपारी घामाच्या धारा वहात असताना खिडकीत बसून त्या पिवळ्याजर्द सोनमोहोरांच्या राशीवर आपले निळे पंख पसरुन निवांत पहुडलेलं एखादं फ़ुलपाखरु मला दिसतं.
मला आता रस्किनचा हेवा वाटत नसतो. माझ्याही खिडकीबाहेर वसंत फ़ुललेला असतो. पेल्टोफ़ोरम ऐन बहरात असतो.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पेल्टोफ़ोरम इंडिजिनस नाही. दक्षिण अमेरीकेतून तो आपल्या इथे आलेला आणि आता मुंबईच्या मातीने, पक्षांनी, फ़ुलपाखरांनी आपलाच मानून टाकलेला. उप-यांना आपलं म्हणायच्या त्यांच्या सवयीनेही असेल बहुतेक.
मुळ या मातीतलं नाही म्हणूनच बकुळ, अमलताश (बहावा)चा असतो तसा याचा कुठलाच उल्लेख संस्कृत काव्यांत, चालिरीतींत, अगदी गुलमोहोराचा असतो तसा आधुनिक साहित्यामधेही नाही. त्यादृष्टीने इतक्या देखण्या फ़ुलांचं वैभव अंगावर वागवूनही हा उपेक्षितच. शिवाय अतिरेक करुन मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर याची लागवड करुन सर्वसामान्य करुन टाकलेला. मुंबईत एकेकाळी गुलमोहोर आणि बहाव्याच्या रोडऍव्हेन्य़ूसाठी असणा-या पॉप्युलॅरिटीवरही पेल्टोफ़ोरमच्या संख्येने मात केली. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा पण त्या बळकट नसतात, केबलच्या जाळ्यांना याचा अडथळाच होतो आणि तरी अगदी छोट्या गल्ल्यांमधूनही काही सेन्स न दाखवता मुन्सिपाल्टीने हा लावून टाकलेला. त्यामुळे अनेकांच्या रोषालाही हा पात्र.

माझ्या दृष्टीने मात्र माझ्या खिडकीबाहेर निसर्गाचं एक संपूर्ण चक्र फ़ुलत ठेवणारा हा पेल्टोफ़ोरम अगदी खास. माझ्या घरासाठीच फ़ुलणारा. फ़ुलेल आता. मग मी फोटो टाकीन :)


-------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 20, 2009

फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन? माय फ़ूट!!

आपल्या स्वत:च्या ’लिहिण्याशी’ आपण शंभर टक्के प्रामाणिक आहोत, आपल्याला पटेल तेच आपण लिहिले आहे असे एकदा गृहित धरल्यावर (आणि हे गृहित धरणे ही लेखनाच्या संदर्भातली मिनिमम रिक्वायरमेन्ट आहे) ते जे काही बरं/वाईट हातून उमटलं आहे ते आपलं ’क्रिएशन’ आहे ह्या भावनेतून इतर कोणाचीही पर्वा न करता त्या कलाकृतीच्या मागे ठामपणे उभे रहायला हवेच ना लेखकाने? किंवा कोणत्याही कलाकाराने?
लोकं कौतुक करतात, डोक्यावर घेतात तसेच कधी कधी प्रखर टीका करतात, वादळं उठवतात. प्रसंगी कलाकाराची ह्यात बदनामीही होते. मनस्वी कलाकाराच्या कलाकृती अनेकदा समाजातील सामान्यांना ’कळत’ नाहीत. त्याचे चुकीचे अर्थ लावले जातात किंवा कधी कधी लोकांच्या भावना दुखावल्या (?) म्हणून ते भडकतात.
आणि जर असे झाले तर कलाकाराने/लेखकाने काय करायचे?
लोकांच्या भावनेचा ’मान’ राखत कलाकृतीला वा-यावर सोडायचे? डिसओन करायचे?
जसे डॉ.आनंद यादवांनी केले?
’संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी त्यांनी ’मागे’ घेतली ही बातमी इतकी धक्कादायक वाटतेय मला. मी ती कादंबरी वाचलेली नाही. त्यात काय वादग्रस्त आहे माहीत नाही. पण समाज टीका करतोय त्याला घाबरुन, संमेलनाध्यक्षपद जाईल या भितीपोटी आपल्या प्रामाणिकपणाशी जी प्रतारणा केलीय, कातडीबचावूपणा केलाय तो कहर आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य,फ़्रीडम ऑफ़ एक्सप्रेशन वगैरे प्रकार मानणारा समाज तर अस्तंगत झालेला आहेच. आणि त्याची बूज राखणारा, त्यासाठी लढणारा कलावंतही म्युझियम पीस झाला आहे.

तेंडूलकर,तस्लिमा,रश्दी किंवा हुसेनचं कौतुक वाटतं मग अशा वेळी. खरंच मानलं त्यांना.
जिवावर उठणारी टीका/बदनामी/फ़तवे या सा-याला धुडकावून लावत, भलेही त्यासाठी परागंदा व्हावे लागले तरी बेहत्तर पण त्यांच्या कलाकृतीशी ते एकनिष्ठच राहिले. कलाकाराच्या स्वायत्ततेचा त्यांनी मान राखला.
डॉ.आनंद यादव निदान माझ्या मनातून साफ़ उतरलेत. त्यांच्या कादंबरीने कोणाची किती बदनामी झाली माहीत नाही पण ती ’मागे’ घेऊन त्यांनी मराठी साहित्याचा मात्र नक्किच अपमान केला आहे.

Friday, February 13, 2009

रस्किन, गुलझार आणि मी (:P)

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच! मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य (म्हणजे त्यात पैसा मिळतो आणि यात नाही हा सोडून) आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन सारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहिता यावं.
नाही जमत :(
असाईन्मेन्ट्सचं टेन्शन आणि उलटून गेलेल्या डेडलाईन्स नजरेसमोर दिसत असताना साध्या खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरम कडे नाही लक्ष जात भलेही त्यावर सोनेरी बुंदक्यांसारख्या फ़ुलांच्या राशी जमा झालेल्या असोत.
तर ते जाऊचदेत.
जिनियस क्रिएटिव्ह आणि आपल्यासारखे कुडमुडे क्रिएटिव्ह ह्यांत इतपत फरक तर असणारच. नाही कां?