Thursday, March 25, 2010

..

अभिजीत देसाई गेला याबातमीवर विश्वास ठेऊ म्हणता ठेवताच येत नाहीये. नुकतंच आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा कॉल आहे बघीतलं की मुद्दाम तो मिस करायचे आणि उलटा त्याला कॉल लावायचे.कारण एकच त्याची ’पुकारता चला हुं मैं..’ ची कॉलर ट्यून. त्याला ते माहित होतं त्यामुळे तो ती पूर्ण वाजू दिल्याशिवाय कॉल उचलायचा नाही. ते गाणं त्याच्या सेलवर एकलं की अभिजीत देसाईचं सगळं व्यक्तिमत्व समोर उभं रहायचं. त्याच्या फ़िल्म्सच्या, गाण्यांच्या आवडींसकट.तसाच होता तो अगदी. अभिजीतच्या बाबतीत ’होता..’ हे शब्द लिहिताना इतकं अस्वस्थ वाटतय.

अभिजीतच्या लोकप्रभामधल्या लिखाणाची मी प्रचंड चाहती होते. मला सिक्सटिजचं व्यसन लागायला तुझे लेख कारणीभुत असं सांगितलं की तो खुश व्हायचा.आणि ते खरंच होतं. जुन्या फ़िल्म्स त्याचं ऑब्सेशन होतं. रेग्युलर लिही गं रिलॅक्ससाठी म्हणून तो खूप कळकळीने सारखा सांगायचा. पण मला नियमित लिहायला जमायचं नाही. पण अमुक एक विषयावर लिहायचं डोक्यात आहे असं म्हटलं की त्याचा आवर्जून आठवण करुन द्यायला, लवकर लिही म्हणायला, काही संदर्भ हवे आहेत का तुला ते विचारायला फोन येणारच येणार.
त्याच्याकडचा संदर्भ अचाट होता. सिक्स्टीजच्या काळाचं त्याचं फ़ोटोकलेक्शन अफ़लातून होतं. ते त्याचं स्वत:च वैयक्तिक कलेक्शन होतं. कॉलेजात असल्यापासून मी हे फोटो जमवतोय सांगायचा. आणि अगदी अभिमानाने तो ते फोटो दाखवायचा. त्याच्याकडच्या फोटोंमुळे लेखाला शोभा यायची. कमालीची माहिती होती त्याच्याकडे त्या एकेक फोटोंसंदर्भात. एकदा निट बसून ऐकायच सगळं असं कितीदा म्हणाले त्याला.

भानूजींच्या लेखाबद्दल नेहमीप्रमाणेच मी देते रे, नक्की उद्या असा एक हवेत वायदा केल्यावर बघ हं पुन्हा फोन नाही करणार यासाठी तुला असं धमकावून त्याने फोन डिसकनेक्ट केला होता.आता पुन्हा त्याचा कॉल मिस करायची संधीच हा माणूस मला देणार नाहीये. इतकं हॉरिबल वाटतय अशा विचारांनी. इतकं भरभराटीला आलेलं करिअर, तो लिहिणार असलेली पुस्तकं.. सगळच अर्धवट. आणि त्याची गोड बायको आणि मुलगी.. बाप रे. त्यांचा तर विचारच करवत नाहीये. असं कोणी इतक्या सहज निघून जावू शकतं कायमचं?
अभिजीत.. इतक्या गप्पा अर्धवट राहिल्यात आपल्याही. आमच्यासारख्या तुझ्या इतक्या चाहत्यांना सांगण्यासारखं तुझ्याकडे इतकं सारं होतं ते न सांगताच असा अर्ध्यात निघून गेलास..
वी विल मिस यू ट्रिमेन्डसली!

Wednesday, March 10, 2010

मुंबई मोमेन्ट्स..

शामियानाच्या फ़िल्मस्क्रीनिंगला खूप महिन्यांनंतर गेले.तेही यावेळी स्क्रीनिंग इरॉस प्रीव्ह्यू थिएटरला आहे असं सायरस म्हणाला म्हणूनच केवळ.दरवेळी त्यांचा व्हेन्यू असतो जाझ बाय द बे.ते जायला खूप ऑड पडतं.शिवाय तिथून रात्री ९ वाजता चर्चगेटला जाणं म्हणजे एक दिव्य असतं.एक तर टॅक्सी मिळता मिळत नाही.एरवी एनसिपिएला किंवा यशवंतरावला काही असलं की कितीही उशीर झाला तरी सोबत कोणी न कोणी असतं तरी.पण जाझला मुद्दाम उठून नवोदितांच्या डॉक्युमेन्टरीज पाह्यला यायला कोणाला फ़ारसा उत्साह नसतो.इतक्या उशिरापर्यन्त थांबून तर नाहीच नाही.मग एकटीने चालत येणंही इतक्या रात्रीचं त्या एरियातून शक्य होत नाही.सायरस किंवा त्याचे कोणी मित्र सोडायला येतातही पण म्हणजे त्यांच्या गप्पा आणि इतर आवरुन निघेपर्यन्त आणखी तासभर उशिर.
व्हेन्यू सोयीचा नाही या एका कारणासाठी मी बरीचशी स्क्रीनिंग्ज बुडवते यावरुन सायरस आणि इतर कट्टर शामियानावाले वैतागतात पण तरी निष्ठेने माहिती कळवत रहातातच.काही महिन्यांपूर्वी बान्द्र्याला झेन्जीमधे त्यांना स्क्रीनिंगला जागा मिळाली होती पण यांची जेमतेम दोन स्क्रीनिंग्ज झाली आणि ते रेस्टॉरन्टच बंद पडलं.सबर्ब्जवाल्यांना कलेची काही चाड नाही वगैरे टिपिकल साऊथबॉम्बे रिमार्क्स मारायला सायरस मोकळा.पण त्याचा वैताग जायझ होता.बिचारा इतका उत्साहाने,कळकळीने शॉर्टफ़िल्म्स दाखवायला धडपडतो आणि आमच्यासारखे आळशी टॅक्सी मिळत नाही उशिरा असल्या कारणांनी जायचं टाळतो.
अर्थात आम्हा सबर्ब्जवाल्यांसाठी आता पृथ्वीहाऊस किंवा सेन्ट ऍन्ड्र्य़ूज,भवन्स वगैरे अनेक जवळच्या ठिकाणीही मधून मधून इतर कोणी शॉर्टफ़िल्म्स दाखवत असतात.पण सायरसला हे कोण सांगणार?
सायरस माझा जुना मित्र.शामियाना शॉर्टफ़िल्म क्लब त्याचाच आहे आणि शामियानाशॉर्टस या जगभरातल्या डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सची खबरबात सांगणा-या न्यूजजर्नलचा तो एडिटरही आहे.शॉर्टफ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीजचं आमचं दोघांचं वेड सारखंच.पण मला त्या इतरांनी बनवलेल्या पाह्यलाच फक्त आवडतात(तेही जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या जागीच जाऊन) आणि त्याला मात्र आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स इतरांना आवर्जून दाखवण्याचा पहिल्यापासून शौकच आहे.दोन वर्षांपूर्वी त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर त्याने अशाच हौसेने जमा करुन ठेवलेल्या देशविदेशांमधील डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्टफ़िल्म्सच्या डिव्हिडिजचं एक स्क्रीनिंग असं सहज आपल्या सगळ्या दोस्तमंडळींसाठी अगदी भाड्याने प्रोजेक्टर वगैरे आणून केलं होतं.मस्त पार्टी झाली होती ती.ते स्क्रीनिंग प्रचंड पॉप्युलर झालं.इतकं की त्यातून शामियाना फ़िल्म क्लब उभा राहिला.
एक्स्क्लुजिवली शॉर्टफ़िल्म्स दाखवणारा हा मुंबईतला एकमेव क्लब.आता शामियाना पुणे,दिल्ली,अहमदाबाद,बंगलोर वगैरे शहरांतही पसरला आहे.शॉर्ट फ़िल्म्स आणि डॉक्युमेन्टरीज बनवण्याचं प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने घेणा-या यंगस्टर्सना स्क्रीनिंगसाठी प्लॅटफ़ॉर्म मिळण्याची खूप मारामार असते.फ़िल्म्स डिव्हिजनच्या डॉक्युमेन्टरीजही जिथे आजकाल कोणी दाखवायला उत्सुक नसतात तिथे या बिचा-यांना कोण विचारणार!बर सगळ्यांनाच काही इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधे,फ़ेस्टीवल्सना आपल्या फ़िल्म्स पाठवणं जमतं किंवा परवडतं असं नाही.सायरस आवर्जुन या फ़िल्म्स दाखवतो,सेशन इन्टरऍक्टिव करण्याकरता फ़िल्ममेकर्सनाही स्क्रीनिंगच्या वेळी बोलावतो,त्यांना त्यांच्या फ़िल्म्सविषयी बोलायला लावतो,प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सांगतो.यंग शॉर्टफ़िल्म मेकर्सना खूप छान एक्स्पोजर मिळतं शामियाना मुळे.
यावेळी इरॉसला गेले तर धक्काच बसला.दुस-या मजल्यावरचं प्रीव्ह्यू थिएटर खचाखच भरलं होतं.अगदी दोन वर्षांपूर्वी जेमतेम पंधरा डोकी असायची.त्यातली दहा केसी,सोफ़ाया किंवा झेवियर्सच्या फ़िल्ममेकिंग किंवा मासमिडिया शिकणा-या मुलांचीच असायची.कधी कधी आजूबाजूला रहाणा-या काही श्रीमंत म्हाता-या पारशी बायका त्यांचा लवाजमा घेऊन यायच्या,मोठ्या आवाजात बडबड करत अर्धा तास बसायच्या मग हे काही इन्टरेस्टींग दिसत नाही असं म्हणत निघून जायच्या.
यावेळी इतक्या महिन्यांनी गेले त्याचं अक्षरश: चीज झालं.ज्या पाच फ़िल्म्स पाहिल्या त्या केवळ आणि केवळ अप्रतिम होत्या.विशेष म्हणजे या सगळ्या फ़िल्म्स मुलींनी बनवलेल्या होत्या.
पहिली शॉर्ट फ़िल्म’लाल जुतो’श्वेता मर्चंट या कोलकात्याच्या सत्यजित रे फ़िल्म इन्स्टीट्युटमधून फ़िल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलीने बनवली होती.कमलकुमार मजुमदार या बंगाली कथालेखकाच्या अतिशय साध्या,सुंदर कथेवर आधारीत ही फ़िल्म होती.अ‍ॅडोलसन्ट प्रेमाचे फ़ार सुरेख चित्रण बंगाली मध्यमवर्गीय घराच्या वातावरणात या फ़िल्ममधून दिसले.२००७ सालासाठीचे राष्ट्रीय पारितोषिक या फ़िल्मला मिळाले आहे.
बाकी दोन फ़िल्म्स खूप छोट्या पण तितक्याच परिणामकारक होत्या.एल.व्ही.प्रसाद फ़िल्म मेकिंग इन्स्टीट्युट्मधल्या एका मुलीने बनवलेली’ओरे ओरु नाल’ओन्ली वन डे)नावाची नऊ मिनिटांची फ़िल्म आणि प्राग मधल्या फ़िल्म इन्स्टीट्युटमधून शिकलेल्या किम जोगतियानी या मुंबईकर मुलीची एक साडेचार मिनिटांची फ़िल्म’बॅक टु स्क्वेअर वन’.
चौथी शॉर्ट फ़िल्म इटालियन होती.’रिट्रीटींग’ नावाची.या फ़िल्मलाही खूप आंतराष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत.दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभुमीवर एक इटालियन मुलगी आणि त्यांच्या घरात लपून राहिलेला एक अमेरिकन सैनिक यांच्यात निर्माण झालेले कोवळे भावबंध खूप सुरेख दाखवले होते.ही फ़िल्मही बारा मिनिटांचीच होती.
इतक्या छोट्या कालावधीत एक कथा इतक्या परिणामकारकरित्या फ़ुलवणे किती कौशल्याचे काम असते!
डॉक्युमेन्टरी एकच होती.तिचा विषय होता वॉर विडोज.केसी कॉलेजमधे शिकणार्‍या सहा मुलींनी सातार्‍याला जाऊन ह्या डॉक्युमेन्टरीचे चित्रीकरण केले होते.साताराच का तर संपूर्ण महाराष्ट्रात सैन्यात भरती होणार्‍यांचे प्रमाण सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि तिथे सैनिक प्रशिक्षण संस्थाही आहे.सरकारने जाहीर केलेली मदत देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांपर्यंत न पोचणे,त्यांचे शिक्षण,नोकरी याबाबतीतली जबाबदारी घेण्याची शासनाची उदासिनता हे सर्व या डॉक्युमेन्टरीमधून नीट सामोरे आले आणि मन विषण्ण झाले.या पाचही फ़िल्म्स बनवणा-या मुलीही स्क्रीनिंगच्या वेळी आल्या होत्या.त्यांच्यासोबतचे इंटरऍक्शन सेशनही इन्टरेस्टींग होते.यानिमित्ताने जगात बनणा-या शॉर्ट फ़िल्म्सपैकी ६०% फ़िल्म्स स्त्रिया बनवतात ही माहितीही मिळाली.
यानिमित्ताने पुन्हा एकदा शामियानाशी नातं जुळलं याचा मनापासून आनंद वाटला.वे टु गो सायरस!

Monday, March 08, 2010

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या, किंवा त्याकाळात पडावे लागलेल्या काही महिलांनी मतदानाचा हक्क, समान पगाराच्या, कामाच्या ठिकाणी किमान सोयीच्या मुळ मागणीपासून सुरु केलेला एक लढा बघता बघता स्त्रीमुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे चालवला गेला.
चळवळ सुरु झाली ती वेळ, तो काळच असा होता की स्त्रीमुक्तीचा शारिरीक आणि मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची नितांत गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगनला भरलेल्या एका आंतराराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात क्लारा झेटकिन्स या जर्मनीतल्या स्त्रीवादी कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करु शकतील अशी कल्पना पहिल्यांदा मांडली. एकत्रित जागतिक महिला दिनाच्या या कल्पनेला सतरा देशांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शंभर महिलांनी त्यादिवशी जोरदार पाठिंबा देत उचलून धरले. त्या शंभर महिलांमधे जगात पहिल्यांदाच संसदेमधे निवडून येण्याचा मान मिळालेल्या तीन फिनिश संसद सदस्य महिला होत्या आणि इतर महिला कामगारांच्या प्रतिनिधी होत्या.
१९१० सालच्या महिलामेळाव्यात 'आंतराष्ट्रीय महिलादिनाची' कल्पना पहिल्यांदा मांडली गेली याअर्थाने आजचा २०१० सालातला महिला दिन शंभरावा होऊ शकतो. अर्थात याचे बीज याआधी दोन वर्षे म्हणजे १९०८ साली न्यूयॉर्क शहरामधे १५०० कामगार महिलांनी जो संतप्त मोर्चा काढला होता त्याचवेळी पडले होते तेव्हा शंभरावा महिला दिन २००८सालीच होऊन गेला असेही काही जण म्हणतात. तर काहीजण म्हणतात जरी कोपनहेगनला महिला दिनाचा संकल्प सोडला असला तरी तो अधिकृतरित्या साजरा झाला पुढच्या वर्षी म्हणजे १९११ साली ऑस्ट्रिया, जर्मनी येथे तब्बल दोन लाख महिलांच्या उपस्थितीत. तेव्हा शंभरावा वाढदिवस २०११ साली.
शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला दिन नक्की कधी या वादाला अजिबात महत्त्व नाही कारण मानवमुक्तीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात अशी एक दोन इकडची तिकडची वर्षे खरोखरच क्षुल्लक ठरतात. खरे महत्त्व आहे ते स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल नक्की कशी होत गेली ते जाणून घेण्याला.
स्त्रीवादी चळवळींची सुरुवात मूलतः झाली 'लैंगिक समानते'च्या विचारांमधून आणि ती व्यापक होत 'स्त्रीहक्का'च्या मागणीपर्यंत येऊन स्थिरावली. या चळवळींच्या वाटचालीत असंख्य वळणं, खाचखळगे, उंचवटे येत राहिले. त्यांना विरोध तर कायमच होत राहिला. 'फेमिनिझम' हा मुळचा फ्रेन्च शब्द १८९५ साली यूकेच्या 'डेली न्यूज' मधून पहिल्यांदा इंग्लिश भाषिकांच्या नजरेस पडला तेव्हापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. आणि ती सुद्धा क्वीन व्हिक्टोरियाकडून " mad, wicked folly of 'Woman's Rights" अशा शब्दांमधे!
मात्र या आधी बरीच वर्षे, अगदी अठराव्या शतकातच एका नव्या स्त्रीवादी विचारसरणीचा उदय झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट नावाच्या एका तत्वज्ञ विचारसरणीच्या लेखिकेने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकाद्वारे. फेमिनिस्ट विचारधारा रुजवणारी ही पहिली लेखिका. मेरीने आपल्या पुस्तकातून स्त्रियांची जडणघडण आणि शिक्षण लहानपणापासूनच पुरुषी दृष्टीकोनातून, त्यांना काय आवडेल या विचारांतूनच केले जात असल्याने स्त्रियांची स्वतःबद्दलची अपेक्षाच मर्यादित रहाते हा विचार मांडला तो त्याकाळाच्या मानाने धाडसाचा होता आणि त्याबद्दल तिला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. मेरीच्या मते समाजातल्या भेदभावाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच जबाबदार असतात, पुरुषावर वर्चस्व गाजवण्याची प्रचंड ताकद स्त्रीमधे असूनही ती आपल्या शक्तीचा वापर करत नाही असे तिचे मत होते. अपुर्‍या आणि चुकीच्या शिक्षणामुळे बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात हा विचारही तिच्या पुस्तकात होता. तिने मांडलेल्या काही प्रश्नांना आजही समाधानकारक उत्तरे मिळू शकत नाहीत.
एकोणिसाव्या शतकात जेन ऑस्टिन, एलिझाबेथ गॅस्केल, ब्रॉन्टे भगिनी, लुइझा मे अल्कॉट सारख्या लेखिका स्त्रियांचे प्रश्न, त्यांची दु:ख, निराशा याबरोबरच सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखाही आपल्या कादंबर्‍यांमधून मांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आदर्श स्त्रीच्या 'व्हिक्टोरियन इमेज'मधे स्त्रियांना गुदमरवायला कारणीभूत ठरलेल्या 'द एंजल इन द हाऊस' सारख्या पुस्तकांच्या आकर्षणातून स्त्रियांना बाहेर काढणे फार कठीण होते. १८४३ साली मरियन रीड नावाच्या स्कॉटिश लेखिकेने A plea for women मधून पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्याच्या अन्यायाबद्दल लिहिले आणि आपल्याला काही सुप्त अधिकार आहेत ज्यांचा वापरच आपण अजून केला नाही हा विचार जोमाने काही जागरुक स्त्रियांच्या मनात पसरला. याच सुमारास आपल्या वैवाहिक जीवनातल्या अत्याचारांना बळी जायचे नाकारत घराबाहेर पडलेल्या कॅरोलिन नॉर्टन या ब्रिटिश महिलेला स्त्रियांना कायद्याचे पाठबळच नसल्याची जाणीव विदारकपणे झाली होती. पण तिने आवाज उठवला होता आणि अगदी राणी व्हिक्टोरियापर्यंत जाउन दाद मागितली होती. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना किमान कायद्याचे संरक्षण तरी असावे हा विचार ब्रिटनमधे सुशिक्षितांमधे चर्चेला आला.
अर्थातच स्त्रियांचे हे प्रश्न सुटे सुटे चर्चेला येत होते आणि स्त्रियांचा परस्परांना पाठिंबा तर अजिबातच नव्हता. उलट अशा घरफोड्या आणि विद्रोही विचारधारेच्या स्त्रियांपासून आपण किती वेगळ्या आहोत हे दाखविण्याची चढाओढच समाजातल्या प्रतिष्ठित महिलांमधे होती. एखादीच फ्लोरेन्स नाईटिंगेल त्या काळात होती जिला आपल्यातल्या क्षमतेची जाणीव होती आणि त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत तिने आपल्याला हवी तीच करिअर निवडण्याचे धाडस तेव्हा दाखवले.
मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव हळूहळू होत होता आणि स्त्रियांचे वैवाहिक अधिकार, मालमत्तेवरचा अधिकार, कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवज उठवण्याचे धाडस अशा विषयांना तोड फुटत होते. बार्बारा लिग स्मिथने ब्रिटनमधे स्त्रियांना एकत्र बोलावून, चर्चा करण्याचे, सभा घेण्याचे काम सुरु केले. त्यांच्या सभा लॅन्गहॅम पॅलेसमधे व्हायच्या आणि म्हणून या 'लेडिज ऑफ द लॅन्गहॅम पॅलेस'. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८५५ मधे विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकारांसाठी कमिटी नेमली गेली. स्त्रिया निदान स्वतःचे प्रश्न मांडायला एकत्र जमायला लागल्या होत्या. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल होते.
स्त्रीवादी चळवळींचा हा सुरुवातीचा इतिहास जेव्हा स्त्रियांचे प्रयत्न एकाकी, अपुरे होते. पण त्यातूनच पुढे शैक्षणिक क्षेत्रात, राजकिय, सामाजिक क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढला. वाढतच गेला.
स्त्रीवादी चळवळींना नंतरच्या काळातही काही अतिरेकी, हटवादी स्त्रीकार्यकर्त्यांमुळे असेल किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या पक्क्या पारंपरिक पुरस्कर्त्यांच्या कडव्या भुमिकेतून आलेल्या विरोधामुळे असेल.. पण एक उपहासात्मक स्वरुप लाभत गेले. आजही त्यांची चेष्टा उडवणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. परंतु स्त्रियांनी शिकावे, त्यांचे राहणीमान उंचावावे, स्वत्व-सन्मानाची ओळख त्यांना व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्या सबल व्हाव्यात, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, मतदानाचा अधिकार मिळावा, समाजात एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून तळमळीने ज्यांनी ज्यांनी काम केले होते त्यांचे जर स्मरण आज प्रत्येक स्त्रीने (आणि स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा) केले नाही तर तो मानवी कृतघ्नपणा ठरेल.
'संयुक्ता' तर्फे जागतिक महिला दिनाचे स्मरण याच कृतज्ञ भावनेतून ठेवले जात आहे. स्त्रीवादी चळवळींचा इतिहास, त्यातले महत्वाचे टप्पे,स्त्रीवादी चळवळींचे कार्यकर्ते या सार्‍यांबद्दल 'संयुक्ताच्या' व्यासपीठावरुन आपण जाणून घेऊया.
'फेमिनिस्ट' चळवळीला ज्यांचा हातभार लागला त्या सार्‍याच कार्यकर्त्यांची नोंद इतिहासही ठेवू शकला नाही. काही महत्वाची नावे मात्र कधीही विस्मृतीत जाऊ नयेत-कारण काल 'त्या' होत्या म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत.

एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन (१८१५ ते १९०२)- पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना हिने केली.
ग्रेस ग्रीनवूड (१८२३ ते १९०४)- पहिली महिला वार्ताहार.
मरियन हाईनिश( १८३९-१९३६)- स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला.
केट शेफर्ड (१८४७-१९३४)- स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून या न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला गेला. १८९३ साली तिथे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले.
एमिलिन पॅन्खर्स्ट (१८५८-१९२८)- ब्रिटनमधे हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली.
बिबी खानुम अस्तराबादी ( १८५९-१९२१)- इराणियन लेखिका. स्त्रीवादी चळवळीची बीजे इराणमधे रुजवण्याचे कार्य हिच्या हातून सुरु झाले.
इडा बी. वेल्स (१८६२-१९३१)- अमेरिकेत स्त्रियांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून लढा देणार्‍या महिलांमधे पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला म्हणून हिचे नाव महत्वाचे ठरते.
शिरीन इबादी(१९४७)- स्त्रिया आणि मुले यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हिने उभारलेली चळवळ फार महत्वाची ठरते. स्त्रीवादी चळवलींमधे नोबेल शांती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला.
कॅरोलिन एगान- मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची पहिली पुरस्कर्ती.
एमिली हॉवर्ड स्टोवे - व्यावसायिक वैद्यकिय संघटनांमधे स्त्रियांना सहभागी करुन घेतले जावे यासाठी प्रयत्न. कॅनडामधे स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ.
अन्सार बर्नी (१९५६)- पाकिस्तानमधे स्त्रीवादी चळवळीचे विचार पसरवण्यासाठीचे प्रयत्न जाहिररित्या सुरु करण्याचे धाडस हिने प्रथम दाखवले.

इराणियन-कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई, इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान, केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत. याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका, कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले. स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते.

काही भारतीय नावे ज्यांनी काही ना काही प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व माजी आणि भावी कार्यकर्त्यांना समर्पित करुया.

Monday, March 01, 2010

रेल अफ़ेअर

खूप वर्षांनी सलग आणि मोठा प्रवास ट्रेनने करण्याची संधी आली.नाहीतर'वेळ वाचतो'या एका अपरिहार्य कारणामुळे दरवेळी फ्लाईटचाच पर्याय माझ्याकडून स्विकारला जातो.तरी ट्रेनने जाणार म्हटल्यावर-२०/२२ तासांचा प्रवास..अगं किती बोर होशील?आणि किती वेळ फुकट जाणार प्रवासात.शिवाय ट्रेन पोचणारही अवेळी पहाटे.खूप त्रासाचं आहे टॅक्सीने शहरात जाणं..मिळालेले एक नाही सतरा सल्ले आणि टीका चक्क कानाआड केल्या.
मला हे सगळं माहित होत आणि कबूलही होत.पण मला ट्रेननेच जायच होतं.एकतर यावेळी खरच मला एरवी असते तशी कमी वेळेची कटकट डोक्याशी नव्हती,वाचायच्या पुस्तकांचा बॅकलॉग खूप राहिला होता,काही कामाच्या नोट्स काढायच्या होत्या,काही महत्वाच्या इश्यूजवर शांतपणे विचार करण्याइतका निवांत वेळ हवासा वाटत होता आणि हे सगळं फक्त ट्रेनमधेच एकट्याने प्रवास करत असतानाच शक्य झाल असतं याची खात्री होती.
आणि मग खरंच ट्रेन अंगात अगदी भिनून गेली.प्रवास दोन रात्रींचा होता.सेकंड एसीचा डबा स्वच्छ,शांत होता.समोर एक जमशेदपूरला उतरणार असलेलं छोटं कुटूंब काही'नॉर्मल'चौकशा सोडल्या तर फारसं नाकखुपसं नव्हतं.त्यांची आपापसातली मैथिली भाषा कानाला खूप गोड वाटत होती.दोन लहान मुलं पत्ते,उनो खेळायची,चित्र काढायची,थोडं भांडायची आणि उरलेला वेळ त्यांच्या बाबाच्या लॅपटॉपवर सिनेमा बघायची.त्यांची आई त्यांना सारखी मधून्मधून खायला द्यायची.इतर वेळी झोपायची.राहिलेली सांसरिक झोप पूर्ण करायला तिलाही ट्रेनइतकी निवांत जागा मिळाली नसावी.नवरा रिडर्स डायजेस्ट वाचायचा आणि सारखा बाजूच्या एका मोठ्ठ्या प्लास्टिकच्या पिशवीतल्या छोट्या,चकचकीत पाकिटांमधला पानमसाला खात तंद्री लावून बसायचा.
मी अगदी सुखाने पुस्तकं वाचली,गाणी ऐकली,थोडं लिहिलं आणि बाकी अख्खा वेळ नुसतंच खिडकीबाहेर बघत,प्रत्येक थांबणार्‍या स्टेशनवरची खास संस्कृती बघत निवांत मग्न राहिले.धावणार्‍या रुळांकडे बघत राहिलं की मनातले सगळे इकडे तिकडे विस्कटून राहिलेले विचार कसे छान ओळीत मनात आपोआप लय धरतात.
-------------------------------------------------------------------------------
ट्रेन पहाटे पाचच्या सुमारास पोचणार होती.समोरचं कुटूंब अडीच वाजता उतरुन गेल्यावर मला झोपच आली नव्हती.खिडकीतून बाहेरचा मिट्ट अंधार आणि त्यात मिसळून गेलेलं काचेतलं माझच प्रतिबिंब पहात मी कधीपासूनच आवरुन बसले होते.डोळ्यांवर अर्धवट झोप होती आणि अंगात गेल्या दोन दिवसांच्या ट्रेनच्या प्रवासाची गुंगी शीण धरुन होती.मधेच कधीतरी डुलकी लागली असणार बहुतेक.एकदम दचकून जाग आली तेव्हा मंद हिसका देत ट्रेन मंद गतीने पुन्हा लय पकडत होती.आता डुलकी लागली तर तिचे गाढ झोपेत रुपांतर होणार या भितीने थोड्यावेळाने मी उठून दरवाजात जाऊन उभी राहिले.
मधे कुठेही उंचवट्याचा अडथळा नसलेला पश्चिम बंगालचा दाट,काळसर हिरव्या रंगातला सलग मोकळा माळरानासारखा प्रदेश,छोटीशी घरे,मधे चौकोनी,लंबगोल तलावांचे चमकते आरसे आणि बाकी क्षितिजापर्यंत फक्त उंच,लवलवत्या पाणगवताच्या टोकावरच्या शुभ्रसफेद काशफुलांच्या झुबक्यांचा समुद्र.पहाटेच्या अस्प्ष्ट अंधार-उजेडात वाहत्या वार्‍याच्या झुळकांवर लाटालाटांनी लहरत असणारा..
कुठे पाहिलं आहे मी हे या आधी?मनातली काही रिळं उलगडली.
[माझ्या मनात सिनेमाच्या पडद्यावरच्या काही दृष्यांची रिळं अगदी खोलवर रुतून बसलेली असतात.वेळी अवेळी ही रिळं नजरेसमोर प्रोजेक्ट होत रहातात.कोणतही निमित्त, कोणताही ऋतू त्यासाठी पुरेसा असतो.मला त्यात काही नवल वाटत नाही.आपल्या फिल्मी फॅसिनेशनचा हा एक अपरिहार्य भाग हे मी गृहित धरलेलं आहे.या रिळांतली बहुसंख्य दृष्य ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट सिनेमांमधलीच आहेत,काही इस्टमन कलर्ड आहेत,काही नुसतेच आवाज आहेत,काही ओझरते क्लोज अप्स आहेत,काही ठळक लॅन्डस्केप्स आहेत..]
वार्‍याच्या झोतावर डुलणार्‍या या पांढर्‍याशुभ्र काशफुलांचा पसारा..त्यातून दोन मुलं धावत येत आहेत.खांबाला कान लावून क्षितिजापलीकडून येणार्‍या आगगाडीचा कानोसा घेणारी त्यातली ती सावळी,कृश, टपोर्‍या डोळ्यांची मुलगी आणि तिच्याकडे कुतुहलाने पहाणारा,कपाळावर कागदी चांदीचा मुकुट बांधलेला तो तिचा मस्तीखोर धाकटा भाऊ!मग कधीतरी निळ्या आकाशात काळ्या धुराचा लांबलचक पट्टा उमटवत एक ट्रेन धडधडत येते.वाफेच्या इंजिनाची शिट्टी मोकळ्या आसमंतात घुमते.ती दोघे त्या काशफुलांच्या समुद्रातून वाट काढत जीव खाऊन धावत जेमतेम रेल्वेट्रॅकजवळ पोचतात तोपर्यंत क्षितिजाच्या पार पुन्हा दिसेनाशीही होते.धुराचा पट्टा आणि एक लांबलचक शिट्टी मागे सोडत.
नजरेसमोरुन ते दृष्य इतकं स्पष्ट सरकत गेलं..वाटलं आत्ता त्याच ट्रेनच्या दरवाजात मी उभी आहे कां?स्टेशन जवळ आलं आणि काशफुले दिसेनाशी झाली.माझ्या डोळ्यांसमोरुन उलगडत गेलेल्या त्या दृष्याची रिळंही संपली.
उंच लवलवत्या गवताच्या टोकावरच्या काशफुलांच्या पसार्‍यामधून मान वर करुन ट्रेनकडे अचंबित नजरेने पहाणारा तो मुलगा.. अप्पू त्याचं नाव.त्याच्यामागून धावत आलेल्या त्याच्या दिदीला,तिचं नाव दुर्गा;मात्र ती ट्रेन दिसलीच नव्हती.तिच्या आयुष्याचा पुढचा खंडित प्रवास सूचित करणारे रेंच्या पाथेर पांचालीतले हे अविस्मरणीय दृष्य.अनेकांनी अनेक प्रकारे पुढच्या काळात इंटरप्रिट केलेलं.जिथे ते चित्रित झालं त्या पश्चिम बंगालमधल्याच एका काशफुलांच्या माळरानावरुन माझी ट्रेन जात असताना या अंधार-उजेडाच्या ट्वायलाईटमधे मला ट्रेनमधून जाताना समोर काशफुले होती म्हणून पाथेर पांचालीतलं ते दृष्य आठवलं.पण समजा धुआंधार पाऊस असता तर ट्रेनमधल्या मला इजाजत आठवला असता.
एका अंधारुन आलेल्या दिवशी पावसाचा दाट पडदा बाजूला सारत ट्रेनमधून उतरणारा आणि मग वेटिंगरुममधे दिवसभर बसून एकेकाळच्या पत्नीसोबत आयुष्यातल्या चुकलेल्या आणि निघून गेलेल्या वेळांचा जमाखर्च मांडत बसलेला त्यातला नासिरचा महेन आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या नव्या जीवनसाथीसोबत त्याच स्टेशनात येणार्‍या ट्रेनमधे बसून एका नव्या प्रवासाचे प्रस्थान ठेवताना आधीचं सार आयुष्य त्यातल्या आठवणींसकट कायमचं तिथल्या वेटिंगरुममधेच सोडून निघून जाणारी सुधा आठवली असती.
मध्यरात्रीचा गडद अंधार असता तर कदाचित लांबून दिसणार्‍या एखाद्या दुसर्‍या ट्रेनच्या आवाजात मला..'यूंही कोई मिल गया था..सरे राह चलते चलते...'असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या पाकिझातल्या साहेबजानच्या नजरेत उमटलेली,रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी,न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी त्यातली ती ट्रेनची शिट्टी ऐकू आली असती.त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्ट्मधे ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकातीची सारी दास्तान उमटत असते.आपली नाजूक,गोरी पावले जर्दलाल पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान..त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला..न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीतून तसे बजावलेले असते म्हणून केवळ!
नुसत्या एका ट्रेनशी निगडित अशी सिनेमांची रिळं नक्की आहेत तरी किती आपल्या मनात?मला कुतुहल वाटलं!
सत्यजित रेंप्रमाणेच धावत्या ट्रेनचा मेटाफर वापरुन त्याला समांतर असा आयुष्याच्या सुखदु:खांचा,बदलत्या ऋतूंचा,दुरावत गेलेल्या आणि पुन्हा जवळ आलेल्या नातेसंबंधांचा लेखाजोखा सिनेमाच्या पडद्यावर कलात्मकरित्या मांडणारे कितीतरी दिग्दर्शक देशी विदेशी चित्रपटांच्या दुनियेत आहेत.
अगदी ब्रीफ एन्काउन्टर,ब्रीज ऑन द रिव्हर क्वाय आणि डॉ.झिवागो सारख्या एकाहून एक भव्य चित्रपटांमधे ट्रेनला महत्वाची भुमिका देणार्‍या डेव्हिड लिनपासून ते सुटलेली ट्रेन पकडू शकण्याच्या किंवा न शकण्याच्या शक्यतेद्वारे मनातला प्रेमाचा गोंधळ-गुंता सोडवू पहाणार्‍या इम्तियाझ अलीपर्यंत अनेकजण. डेव्हिड लिनच्या ब्रीफ एन्काउन्टरमधलं द मिलफोर्ड जन्क्शन स्टेशन जिथे अ‍ॅलेक आणि लॉरा चोरुन भेटत असतात किंवा जब वी मेटमधली गीत चुकून उतरते ते स्टेशन.. रेल आणि रिलचं एक अजब अफेअरच या स्टेशनांवरुन सुटणार्‍या,तिथे थांबणार्‍या ट्रेनमधे जन्माला येत असतं.
चित्तथरारक साहसे,स्फोट,दरोडे,खून याबरोबरच हळुवार प्रेमप्रसंग,भेटी,ताटातुटींचीही दृष्यं,दोस्तीच्या कहाण्या,आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारं तत्वज्ञान किंवा स्टेशनं एकदा मागे पडली की त्याकडे वळून पाहण्याचा काहीच उपयोग नाही,आयुष्यात पुन्हा ते मुक्काम परतून येत नाहीत,त्यावेळी भेटलेली माणसं पुन्हा भेटत नाहीत अशा अर्थांची..आयुष्यातली प्रत्येक भावना जिला दृष्यात्मक परिमाण आहे ती प्रत्येक या पडद्यावरच्या रेलदुनियेमधे मौजुद आहे.
१९०३ मधे एडविन पोर्टरचा'द ग्रेट ट्रेन रॉबरी'आला आणि पडद्यावरचं हे रेल-रिल अफेअर खर्‍या अर्थाने सुरु झालं.त्यानंतर मग आगगाडीवर पडलेल्या दरोड्यांना सिनेमामधे दाखवायची लाटच आली.बुच कॅसिडी आणि द सन डान्स किड -१९६९),मायकेल क्रिश्टनने १९७९ मधे पुन्हा त्याच नावाचा सिनेमा काढून पोर्टरच्या कामगिरीला जणू सलाम केला.मात्र हे कोणतेच मी पाहिलेले नाहीत.७४ला आलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारीत'मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस'ची डिव्हिडी मात्र मिळाली.हा सिनेमा मस्त होता.त्यातली रात्री कंपार्टमेन्ट्स बाहेरच्या पॅसेजमधून जाणारी ती स्कार्लेट किमोनो घातलेली पाठमोरी बाई! एखाद्या कोसळत्या पावसाच्या किंवा हुडहुडी भरवणारी थंडी पडलेल्या रात्री मस्त उबदार ब्लॅन्केट पांघरुन,गरम कॉफीचे कप संपवत बघावा हा मुव्ही!१९३२ साली झालेल्या एका खर्‍याखुर्‍या किडनॅपिंग केसवरुन अ‍ॅगाथाने ही कादंबरी लिहिली होती. इस्तंबूलची ती ओरिएन्ट एक्स्प्रेसही खरीखुरी.स्वतः अ‍ॅगाथाने कादंबरी लिहिण्याच्या काही वर्षं आधी त्यातून प्रवास केला होता. तेव्हा एका बर्फाच्या वादळामुळे तुर्कस्थानातल्या शेर्केस्को स्टेशनच्या आधी तब्बल सहा दिवस ती ट्रेन आणि त्यातले प्रवासी,ज्यात अ‍ॅगाथाही होती अडकून पडले.हे झालं १९२८ साली.त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ३१ साली आपल्या आर्किऑलॉजिस्ट नवर्‍याला भेटून निन्वे गावातून परतताना पुन्हा एकदा अ‍ॅगाथाने ओरिएन्ट एक्स्प्रेसमधून प्रवास केला आणि यावेळी ती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात रेल्वेलाईनच वाहून गेल्यामुळे पुन्हा २४ तास त्या ट्रेनमधे अडकून पडली. अ‍ॅगाथाच्या कादंबरीत आलेले प्रत्येक पात्र म्हणजे तिला या दोन प्रसंगी ओरिएन्ट एक्स्प्रेसमधे भेटलेले खरेखुरे सहप्रवासी.अ‍ॅगाथाने १९३४ साली ही कादंबरी लिहिली आणि अर्थातच ती प्रचंड गाजली.१९७४ साली त्यावर हा सिनेमा काढला गेला तो मुळ साहित्य कलाकृतीशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहूनही उत्कृष्ट सिनेमा कसा बनू शकतो हे सिद्ध करणार्‍या अगदी काही मोजक्या सिनेमांपैकी एक ठरतो.याचे श्रेय दिग्दर्शक सिडनी ल्युमेटचं.१९२०-३० या काळातलं वातावरण इतकं हुबेहुब नैसर्गिक वाटतं यात.यातली मर्डर मिस्टरी जबरदस्त आहेच शिवाय ग्लॅमरस कॉस्च्युम्स,कॅरेक्टर्सचा एलेगन्स,स्टाईल,देखणी सिनेमॅटोग्राफी,त्यातले ते एक से एक स्टार्स-शॉन कॉनेरी,अ‍ॅन्थनी पर्किन्स,लॉरेन बॅकाल,जॉन गिलगुड,व्हॅनेसा रेडग्रेव्ह आणि इन्ग्रिड बर्गमन!अशा कितीतरी कारणांनी हा सिनेमा माझ्या आवडत्या ट्रेन मुव्हीजपैकी सर्वात बेस्ट ठरतो.
रहस्यपटांचा अजून एक सम्राट आल्फ्रेड हिचकॉक सुद्धा या रेलदुनियेच्या इतक्या प्रेमात होता की असं म्हणतात त्याला रेल्वे टाइमटेबलही तोंडपाठ असायचं.'कंपार्टमेन्ट्स सीन्स'हे त्याच्या अनेक सस्पेन्स फिल्म्सचं महत्वाचं अंग.आठवून पहा-३९ स्टेप्स,स्ट्रेन्जर्स ऑन अ ट्रेन,नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट.त्याचा द लेडी व्हॅनिशेस हा सिनेमा तर संपूर्णपणे ट्रान्स-युरोपियन ट्रेनमधे सेट केला होता.ट्रेन कंपार्टमेन्टमधल्या मर्यादित,बंदिस्त जागेचा,गतीचा वापर करुन दृष्यांमधली रहस्यमयता,उत्कंठा,थरार विलक्षण उंचीपर्यंत नेऊन पोचवण्याचे हिचकॉकचे कौशल्य अचाट होते.
हॉलिवुडमधे बनलेल्या टिपिकल रोमॅन्टिक ट्रेन मुव्हीजची तर जंत्रीच डोळ्यापुढे येते.त्यातला द फ्रेन्च कनेक्शन लक्षात ठेवण्यासारखा.मात्र ट्रेनमधे भेटून नंतर नातं फुलत गेलेल्यांपैकी मला सर्वात आवडलेला सिनेमा म्हणजे ९५ला आलेला रिचर्ड लिन्कलेटरचा'बिफोर सनराईझ'..एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे,आयुष्याला नुकते सुरुवात करणारे तरुण जेसी आणि सेलिन. तो अमेरिकन,पुढे जाऊन नक्की काय करायचय याचा काहीच विचार मनात पक्का नाही,असाच भटकायला बाहेर पडलेला.ती फ्रेन्च आर्टिस्ट..शिक्षण संपवून करिअर सुरु करायच्या आधी प्रवासाला बाहेर पडलेली.आजीला भेटायला जाणार असते.दोघांची ओळख होते,गप्पा जमतात.इतक्या जमतात की दोघे ट्रेनमधून मधेच एका स्टेशनवर,व्हिएन्नाला उतरतात.परतायची ट्रेन ठरलेली असते.पहाटेची.त्या वेळेपर्यंत,ती पूर्ण रात्र दोघे शहरातल्या रस्त्यांवरुन निरुद्देश गप्पा मारत भटकतात...अखंड गप्पा. आवडीची पुस्तकं,सिनेमे,संस्कृती,सेक्स,भाषा,न सुटणारे प्रश्न,क्रायसिसवर शोधलेली उत्तरं असं काहीही.त्यातून एकमेकांची अंतर्बाह्य ओळख होते.आयुष्यातल्या संकल्पना स्पष्ट होत जातात...खूप अजब मैत्री जमते दोघांची आणि मग पहाटे सूर्य उगवत असताना दोघे एकमेकांचा फोन नंबरही न घेता आपापल्या ठरलेल्या ट्रेनने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात.एक बेफिकिरी मनात असते कदाचित.आयुष्य इतकं मोठं आहे,गोलही आहे असं म्हणतात.भेटू नक्की असंच स्टेशनवर पुन्हा कधीतरी. कदाचित दोनेक वर्षांतच?त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लोटतात.नऊ वर्षांनी दिग्दर्शकाने याचा सिक्वेल काढला.तो'बिफोर सनसेट'.ज्यात जेसी आणि सेलिन पुन्हा भेटतात.नऊ वर्षांनीच.असंच अचानक.यावेळी दोघे जास्त मॅच्युअर्ड,अनेक अनुभव दोघांच्या गाठीशी.आपल्या तेव्हाच्या गप्पांचा,त्यावेळी व्यक्त केलेया मतांचा,तेव्हाच्या मनातल्या स्वप्नांचा लेखाजोखा आता ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकमेकांशी ते मांडतात तेव्हा मजा येते.ट्रेनमधे सुरु झालेल्या मैत्रीचा असा पुढचा अनोखा प्रवास फार उत्कटतेने यात साकार केला आहे.कोणत्याही हिंदी सिनेमामधे अशी म्हटलं तर औपचारिक पण तरी प्रवासात काही काळाकरता का होईना जमलेल्या नात्यांमधली उत्कटता दाखवली गेली नाही.
भारतीय रेल्वे संपूर्ण जगात सर्वात जास्त लांबीचं जाळ असणारी म्हणून सुप्रसिद्धच आहे.इथली समाजसंस्कृती रेल्वेशी इतकी एकरुप झालेली त्यामुळेच कदाचित पण अगदी नियम केल्यासारखा रेल्वेशी संबंधित निदान एक तरी सीन हिंदी सिनेमांमधे असतोच असतो.हिंदी सिनेमाच्या इतिहासात अगदी सुरुवातीच्या काळात तर अशा रेल-सिनेमांची रांगच होती.१९३०मधे तुफान मेल,डेक्कन क्वीन,फ्रॉन्टियर मेल.ह्यातले ट्रेनच्या टपावरचे फियरलेस नादियाचे स्टंटसीन्स खूप गाजलेले होते म्हणे)सिनेमाच्या शेवटी सुटणार्‍या ट्रेनमधून निघून जाणार्‍या,डब्याच्या दारात उभ्या असणार्‍या हिरो किंवा हिरॉईनला भेटायला आख्खा प्लॅटफॉर्म संपेपर्यंत धावून मग शेवटी बाहेर आलेल्या हाताला पकडून वर ट्रेनमधे अलगद उडी मारणार्‍यांचे क्लायमॅक्स तर शेकड्यांनी सापडतील.अगदी जब जब फुल खिले पासून डिडिएलजे पर्यंत.(धावणार्‍या बहुतेकवेळा हिरॉइनीच आणि हात देऊन वर खेचून घेणारे मात्र हिरो-ही एक टिपिकल हिंदी फिल्मीगिरी).
मात्र एखाद्या डोर सारख्या सिनेमामधे अशाच तर्‍हेच्या क्लायमॅक्सला चालत्या ट्रेनच्या डब्यातून एका स्त्रीचा हात आधार द्यायला बाहेर येतो आणि तो पकडून आपल्या आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात करायला ट्रेनमधे चढणारीही दुसरी एक स्त्रीच असते तेव्हा असा वेगळा शेवट नक्कीच लक्षात रहातो.
मात्र हॉलिवुडच्या तुलनेत रेल्वेवर आधारीत भव्य,थरारक दृष्ये साकारण्यातही हिंदी सिनेमा फारच कमी पडला.रवी चोप्राचा महत्वाकांक्षी द बर्निंग ट्रेन हॉलिवुडच्या द कॅसान्ड्रा क्रॉसिंग आणि द टॉवरिंग इन्फर्नोचं कडबोळं करुन बनवला गेला.त्यात ८०च्या दशकातला प्रत्येक मोठा स्टार होता,बर्‍यापैकी कुशलतेने केलेले स्टंटसीन्स होते पण पडद्यावर बात कुछ जमीं नही.माझ्या दृष्टीने अपवाद एकच-शोलेतला तो घोड्यांवरच्या दरोडेखोरांचा आणि संजिव कुमार,जय-विरूचा मुकाबला,त्यात कोळशांच ते धगधगते निखारे असलेलं इंजिन,तो गोळॉ लागलेला मोटरमन आणि फावड्याने इंजिनात कोळसे लोटत असणारा धरम,टपावरुन उलटी कोलांटी मारत गोळ्या उदवणारा अमिताभ..सॉल्लिड मजा येते अजून प्रत्येक वेळी तो सीन बघताना.धूम २ मधेही ट्र्नमधली हाय प्रोफाईल रॉबरी दाखवली गेली पण सिनेमाच्या शेवटी लक्षात राहिला तो फक्त हॅन्डसम ऋतिकच.
पण हिंदी सिनेमांमधल्या ट्रेन्सच्या डब्यांमधून,खिडक्यांमधून रोमान्स मात्र असंख्य फुलले.त्यांची सुरेल गाणी बनली.ट्रेनमधे चित्रित झालेली ही सर्वच्या सर्व गाणी अगदी बिनचूकपणे मेलोडियसच आहेत.यातल्या अनेक गाण्यांमधे दार्जिलिंगची वळणदार रस्त्यांच्या कडेवरुन हळूवारपणे धावणारी छोटीशी ट्रेन फार महत्वाची रोमॅन्टिक वाहकाची भुमिका बजावते.बतासिया लुपला त्यामुळे अगदी ऐतिहासिकच महत्व प्राप्त झालय.या दार्जिलिंग ट्रेनच्या मोहातून अमेरिकन दिग्दर्शक वेस अ‍ॅन्डरसनही सुटला नाही.त्याने तर'द दार्जिलिंग लिमिटेड'नावाचाच सिनेमा काढला.यातून प्रवास करताना आपल्यातले गैरसमज,भांडणं सोडवू पहाणार्‍या तीन भावांची कहाणी कुछ खास जमी नही.
मात्र हिंदी सिनेमाचा खरा प्रेक्षक खुश होतो तो या दार्जिलिंग ट्रेनच्या टपावर बसून त्यांचा लाडका देव आनंद जेव्हा जिया हो.. जिया हो जिया कुछ बोल दो..'अशी प्रेयसीला मनवणारी गाणी म्हणतो तेव्हा.कधी तो ट्रेनच्या डब्यात बसून बेफिकिरपणे'है अपना दिल तो आवारा..न जाने किसपे आयेगा..'गातो,किंवा वरच्या बर्थवर झोपलेल्या वहिदाला उद्देशून'अपनी तो हर आह इक तुफान है..उपरवाला जानकर अंजान हैं..'असं खट्याळपणे छेडतो,'फुलोंकी रंग से दिलकी कलमसे तुझको लिखी रोज पाती..'अशा काव्यमय प्रेमाची बेहतरीन गाणी गातो तेव्हा हिंदी सिनेमातल्या ट्रेन्स खर्‍या अर्थने लयबद्ध धावायला लागतात.
हिंदी सिनेमांच्या पडद्यांवर असे अनेक अविस्मरणिय रेल-रोमान्स आले आहेत.ट्रेनच्या खिडकीत पुस्तक वाचण्याचा बहाणा करणार्‍या पण सारं लक्ष रस्त्यावरुन जाणार्‍या जीपमधे बसून'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तु..'हे किशोरचं सर्वात प्रसन्न गाणं गाणार्‍या रुबाबदार राजेश खन्नाकडे असलेली,प्रत्येक वेळावलेल्या मानेच्या लाडिक झटक्यातून आणि गालावरची खळी दाखवणार्‍या खट्याळ हसण्यातून फुलटू फ्लर्टींग करणारी आराधनातली शर्मिला टागोर(आणि त्याच ट्रेनमधून ३६ वर्षांनंतर आलेल्या परिणितामधे'कस्तो मजा..'गाणारा तिचा मुलगा सैफ),टपावर बसून रडणार्‍या उदास पद्मिनीला'होगा तुमसे प्यारा कौन..हमको तो तुमसे है प्यार..ओ कांची'गात समजावणारा गोड ऋषी,'झोंका हवाका आजभी जुल्फें उडाता होगा नां..'असं हळुवारपणे आठवणारा हम दिल दे चुके मधला सलमान,टपावर बेभानपणे 'छैंया छैंया..'नाचणारा आणि डिडिएलजेच्या सुरुवातीला आणि शेवटी क्लायमॅक्सलाही ट्रेन पकडण्यासाठी जीव तोडत धावत येणार्‍या काजोलला आश्वासकतेने हात देऊन वर खेचून घेणारा,किंवा'और मै चाहता हूं ये ट्रेन बार बार छुटे'म्हणणारा शाहरुख..तिसरी मंझिलच्या ओपनिंग सीनमधेच ट्रेनच्या डब्यात आशा पारेखला सतावणारा शम्मी आणि त्याच्यासोबतचा तो गोलमटोल शेटजी,अशा कितीकांना सोबत घेत,प्रत्येक पिढीतल्या सिनेमाप्रेमींसाठी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर ही रोमॅन्टिक रेल्वे अखंड धावत राहिली आहे.
प्रेम,मैत्री,वियोग,पुनर्भेटीची हळुवार स्टेशन्स घेत पुढे जाणारी हीच रेल्वे इतिहासातल्या काही काळ्या मानवी कृत्यांनाही पोटात घेऊन धावली आहे.विसाव्या शतकातल्या मानवी क्रौर्याची आणि सहनशिलतेची परिसीमा गाठणार्‍या,मानवी संस्कृतीचा सारा नक्षाच उतरवून टाकणार्‍या दोन घटना-एक ज्यूंचे सामुहिकरित्या केले गेलेले भयानक शिरकाण आणि दुसरी भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत दोन्ही देशांतल्या निरपराध नागरिकांची झालेली कत्तल.फक्त मानवच जबाबदार असलेल्या या दोन भयंकर क्रूर घटनांवर आधारीत सिनेमे जखमेवरची खपली मुद्दाम उचकटून काढण्याचा शापच मिळाल्यासारखे पुन्हा पुन्हा येत रहातात.स्टिव्हन स्पीलबर्गच्या द शिन्डलर्स लिस्टमधला हृदय पिळवटून टाकणारा,ज्यूंचा तो ट्रेनमधला शेवटचा प्रवास,पामेला रुक्सचा'ट्रेन टु पाकिस्तान',दीपा मेहताचा १९४७-अर्थ,अनिल शर्मांचा गदर-यातल्या प्रत्येक सिनेमातली ती निरपराध नागरिकांच्या रक्तबंबाळ देहांनी भरुन ओसंडणार्‍या ट्रेन्सची दृष्ये काळीज थिजवून टाकतात.
२८ डिसेबर १८९५ हा जागतिक सिनेमाचा जन्मदिवस.ल्युमिएर बंधूंनी पॅरिसमधल्या ग्रॅन्ड कॅफेमधे'सिनेमातोग्राफ'चं प्रथम प्रात्यक्षिक करताना जो'चित्रपट'दाखवला त्यात स्टेशनात शिरणारी एक ट्रेन होती.स्टेशनवर ट्रेनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले प्रवासी होते.दूर जाणारे रुळ होते.कोळशाच्या इंजिनाचा धूर सोडणारी आगगाडी स्टेशनवर येताच प्रवाशांची लगबग उडते असं त्यात दाखवलं होतं.सिनेमा पहिल्यांदाच बघणारे प्रेक्षक ती स्टेशनात शिरणारी ट्रेन बघून आधी प्रचंड घाबरले,मग विस्मयचकित झाले आणि त्यानंतर ते जे त्या स्टेशनावरच्या ट्रेनच्या विलक्षण मोहात पडले,ते आजपर्यंत..एक शतक उलटून गेल्यानंतरही त्या झुकझुक आवाज करत,निळ्या आकाशात काळ्या धुराची रेघ सोडत जाणार्‍या पडद्यावरच्या आगगाडीचे आकर्षण यत्किंचितही उणावलेले नाही.
सिनेमाच्या पडद्यावरचा हा प्रवास अविरत चालूच रहाणार आहे.;कारण Like diamonds.. Trains are Forever!
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)