अनोख्या, लखलखीत सूर्यप्रकाशात सदैव न्हाऊन निघालेल्या ताहिती बेटांवर राहून पॉल गोगॅंने अक्षरश: असंख्य चित्र काढली. नजरेला भुल घालणारा तिथला निसर्ग, दाट, पाचूसारखी हिरवी अरण्यं, उबदार समुद्र, निळेशार तलाव आणि सुंदर ताहिती स्त्रिया. त्यांच्या त्वचेवरची झळझळती सुवर्णआभा, चेह-यावरचे निरागस भाव त्याच्या पेंटींग्जमधे उमटले. मात्र गोगॅंच्या या पेंटींग्जमधे फक्त एव्हढेच नव्हते.
ताहिती बेटांवरच्या प्राचीन, पोलिनेशियन संस्कृतीच्या अस्तित्त्वखूणा, तिथल्या माओरी आदिवासींच्या चालीरिती, रिवाज, त्यांच्या देवदेवता, अंधश्रद्धा या सा-याचे चित्रण, इतकेच नव्हे तर कालांतराने एकेकाळच्या इथल्या अस्पर्शित निसर्गावर, निरागस आदिवासींच्या जगण्यावर उमटत गेलेल्या आधुनिक युरोपियन संस्कृतीच्या प्रदुषणाच्या खुणाही गोगॅंच्या पेटींग्जमधून स्पष्टपणे उमटल्या. ताहिती बेटावरच्या निसर्गाने गोगॅंमधल्या चित्रकाराला भुरळ पाडली होती आणि त्याचवेळी त्याच्यातल्या संवेदनशील माणुसकीने, बुद्धीवादी विचारसरणीने त्याला अंतर्मुखही केले होते. पॉल गोगॅंने काढलेली ताहिती तरुणींची पेंटींग्ज नंतरच्या काळात जितकी गाजली तितकीच त्याने तिथल्या वास्तव्यात लिहिलेली, माओरी संस्कृतीच्या झपाट्याने होत जाणा-या -हासाचे, युरोपियनांच्या उन्मत्त, बेफ़िकिर, स्वैर वागण्याचे डोळस डॉक्युमेन्टेशन करणारी ताहितीयन जर्नल्सही गाजली.
जून १८९१ मधे पॉल गोगॅं ताहिती बेटांवर पोचला. गोड गुलाबी, एंजेलिक चेह-यांच्या तरुणींची दिवाणखान्याला शोभेलशी पेंटींग्ज करणा-यांच्या आणि ती मोठ्या संख्येनी विकत घेणा-यांच्या पॅरिसमधे रहाण्याचा त्याला उबग आला होता. नवे प्रदेश शोधत, अपरिचित जगामधे आपल्या कलाविष्काराला पोषक वातावरण धुंडाळत भटकणारे चित्रकार अनेक आहेत. मात्र गोगॅं त्या सर्वांपेक्षा वेगळा होता.
बाह्यत: बेदरकार, उद्धट, स्पष्टवक्ता गोगॅं मनाने हळवा, संवेदनशील होता. स्वैराचारी म्हणून नंतरच्या काळात शिक्का बसलेला गोगॅं खरं तर त्याच्या पत्नीवर, मुलांवर जीवापाड प्रेम करणारा होता. मर्चंट बॅंकिंगच्या पैसे मिळवून देणा-या क्षेत्राला लाथ मारुन त्याने पूर्णवेळ पेंटींगला वाहून घेतलं होतं खरं पण त्याची वास्तववादी,आधुनिक शैलीतली पेंटींग्ज कोणालाही आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे मिळत नव्हतेच शिवाय टीका पदरी पडत होती. श्रीमंतीची सवय असणा-या बायकोने घटस्फ़ोटाची नोटीस दिली होती, मुलांचे हाल होत होते. युरोपमधे कुठेच त्याला पेंटींगच्या जीवावर जगता येईना. शेवटी तो या ’फ़िल्दी युरोप’ चा त्याग करुन ताहिती बेटांवर कायमचे रहाण्याकरता गेला.
इथे अपल्याला स्वर्ग सापडेल अशी त्याच्यातल्या चित्रकाराला भाबडी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष वास्तव्यात त्याला तिथे स्वर्गीय निसर्गसौंदर्याच्या जोडीला प्रदुषित सामाजिक जीवनही अनुभवायला मिळाले. त्यामुळे तो व्यथित झाला. ख्रिस्ती मिशन-यांनी जगभर धर्मप्रसाराकरता फ़िरताना आपल्यासोबत आणलेल्या आधुनिक युरोपियन जीवनशैलीचा विपरित परिणाम बेटांवर हळू हळू आणि निश्चितपणे होत होता.
इथे दिलेल्या गोगॅंच्या या दोन पेंटींग्जमधे त्याच्या या दोन्ही अनुभवांची आणि दृष्टीकोनांची झलक दिसते.
’गोल्ड ऑफ़ देअर बॉडीज’ पेंटींगमधे पुढील काळात गोगॅंची ओळख बनलेल्या त्वचेवर झळझळती सुवर्णआभा ल्यायलेल्या, निरागस चेह-याच्या माओरी तरुणी, पार्श्वभूमीवर ताहिती बेटावरचा अम्लान, देखणा निसर्ग, खास गोगॅंचे बोल्ड, कलरफ़ुल कॉम्पोझिशन आहे, आणि दुस-या पेंटींगमधे पश्चिमेकडून आलेल्या प्रगतीचे प्रतिक अशा खुर्चीवर बसलेली, मेलॉन्कलिक चेह-याची ताहिती स्त्री दिसते आहे. पेंटींगमधल्या भिंतीवर अजून एक पेंटींग आहे ज्यात ताहिती बेटांवरच्या आदीसंस्कृतीचे वैभव, तिथला एकेकाळचा स्वर्गीय म्हणून ओळखला जाणारा निसर्ग अजूनही अबाधित आहे. पेंटींग जितके साधे आहे तितकेच ट्रॅजिक आहे. खुर्चीवर बसलेली ही उदास स्त्री गोगॅंने अनुभवलेल्या प्राचीन आणि आधुनिक संस्कृतिच्या कात्रीत सापडलेल्या माओरी आदिवासींच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. कदाचित अशा द्विधा मनोवृत्तीत सापडलेल्या सगळ्या तिस-या जगातल्या संस्कृतीचेच हे प्रतिक आहे.
(दै.लोकमत 'मंथन' पुरवणीकरता लिहिलेला हा आर्ट कॉलम इथे पुनर्प्रकाशित)