"To become truly immortal a work of art must escape
all human limits: logic and common sense will only interfere. But once these
barriers are broken it will enter the regions of childhood vision and
dream."- Georgio de Chiriko
निर्जन, एकाकी, तिरकस रस्ता.. त्यावरच्या लांबलचक, ठळक सावल्या. रस्त्यावरचा एकाकीपणा अजून गडद होतो आहे त्यांच्यामुळे. सूर्य अजून मावळलेला नाहीय पण दिवस लवकरच संपणार आहे हे निश्चित. रस्त्यावर जो प्रकाश आहे तो वेगळाच आहे, काहीसा कृत्रिम, झळझळीत.. अर्ध्याहून अधिक भाग तर काळोखातच बुडाला आहे. विचित्र, कोंडल्यासारखं वाटत आहे या रिकाम्या स्टेजसारख्या दृश्याकडे पहाताना. अघटीताची चाहूल लागावी तसं. काहीतरी घडून गेलं आहे किंवा घडणार आहे.. रात्रीच्या दाट सावल्या जवळ जवळ येताहेत. आणि अशावेळी ती स्वत:शीच रमल्यासारखी खेळत जाणारी मुलीची छायाकृती.. खेळता खेळता चुकून ती या रस्त्यावर आली असणार. ती पुढे पुढे जातेय. नक्की कुठे ते कळत नाहीये. कदाचित समोरच्या अंधारात बुडालेल्या आणि तरीही अंगावर येणा-या, तुरुंगासारख्या दिसणा-या इमारतीच्या दिशेने. इमारतीच्या मागून पोटात भितीचा गोळा उठवणारी सावली पुढे सरकते आहे. मुलीच्या दिशेने.. की हा भास आहे आपल्याच मनाचा? ती सावली मागच्या चौकातल्या पुतळ्याचीही असू शकेल किंवा ते तिचे वडिलही असू शकतील की.. पण समोरच उघडी, मोठ्या व्हॅनसारखी दिसणारी गाडी, तिचा पूर्ण रिकामा, काळोखा अंतर्भाग हे काही वेगळंच सुचवताहेत. मागच्या लांबलचक, पांढ-या इमारतीच्या असंख्य काळोख्या कमानींचे डोळे रस्त्यावर रोखल्यासारखे वाटताहेत. हे वाटणं भयाकारी आहे, हे खरं नाहीये.. हा मध्ययुगीन, इतिहासात असल्यासारखा रस्ता आणि हे गूढ, रहस्यमय वातावरण आभासी आहे. रात्री जागून पाहीलेल्या, अंगावर भितीचा काटा उमटवणा-या सिनेमामधलं एखादं दृश्य असू शकेल. भितीदायक स्वप्न आहे हे नक्की.
पण तरीही आपण नक्की गेलो आहोत या रस्त्यावर.. यातली कोणती तरी सावली आपलीच आहे असं का वाटतय?
जॉर्जिओ द किरिको या जन्माने इटालियन आणि बालपण ग्रीसमधे घालवलेल्या चित्रकाराने १९१४ साली काढलेलं हे ’मेलॉन्कली ऍन्ड मिस्टरी ऑफ अ स्ट्रीट’ मेटाफिजिकल पेंटींग. गूढ, अतींद्रीय मानसिक अनुभव देणा-या अशा पेंटींग्जची मालिकाच त्याने काढली. चौकातला लाल मनोरा, शेवटचा निरोप देणारं रेल्वेस्टेशन, हिवाळ्यातली गहिरी दुपार, हिरव्या झडपांचं घर.. किरिकोच्या कोणत्याही पेंटींगमधे तोच अस्वस्थ करणारा, विशादपूर्ण, मनावर अनाकलनीय दडपण आणणारा, दचकून जाग आणणा-या स्वप्नांची आठवण करुन देणारा अनुभव असतो. परिचयाच्या सगळ्या गोष्टी, खूणा समोर असल्या तरी वास्तव जगापासून आपण दूर आहोत, स्वप्नांची प्रतिमाचिन्हे ओळखीच्या आकारांवर उमटलेली आहेत हे आपल्याला कुठेतरी जाणवत रहातं.
ग्रीसमधल्या एका लहानशा, पण मध्ययुगीन वास्तुकला असणा-या गावातलं आपलं बालपण इटालीमधे मोठा झालेला किरिको कधीच विसरु शकला नव्हता. नक्की कोणत्या आठवणींचा ठसा त्याच्या कोवळ्या मनावर उमटला ते त्यालाही माहीत नव्हतं पण तरुणपणी एकदा पुन्हा भूतकाळात आयुष्यात डोकावून पहायला तो बाहेर पडला, जन्मदेशी गेला तेव्हा त्याला आलेला अनुभव- "माझ्याकडे प्रत्येक वस्तू रहस्यमय, प्रश्नांकित नजरेने रोखून बघत होती. आणि मग मला जाणवलं की त्या राजवाड्यासारख्या प्राचीन इमारतीचा प्रत्येक खांब, कमान आणि खिडक्यांमधे गतकाळातील आत्म्यांची वसाहत आहे. ते वातावरण गूढ शक्तीने भारलेले आहे." अशा शब्दांमधे त्याने वर्णन केला.
कदाचित तो अनुभव शब्दांमधे मावणारा नसावा म्हणून मग नंतर त्याने ती सगळी चित्रं काढली जी किरिकोची ’मेटाफिजिकल पेंटींग्ज’ म्हणून कला-इतिहासात प्रख्यात झाली. सर्रिअलिझमचा निर्माता आन्द्रे ब्रेतॉंने एकदा ही पेंटींग्ज पाहिली आणि तो थरारुन गेला. किरिकोच्या मेटाफिजिकल पेंटींग्जच्या पायावरच सर्रिअलिझमचं अद्भूत युग निर्माण झालं. अर्थात सर्रिअलिस्ट सृष्टी किरिकोच्या मेटाफिजिकल अनुभवांच्याही पलीकडली. अशक्य सृष्टीतील तितकाच अशक्य आशय त्यात आहे. केवळ स्वप्नातच शक्य असणारे अनुभव त्यातही आहेतच. रेने मॅग्राइट, साल्व्हादोर दाली, अर्न्स, टॅन्ग्वे, मायरो.. पुढच्या पिढीतल्या प्रत्येक सर्रिअलिस्ट पेंटरने आपल्यावरचा किरिकोच्या मेटाफिजिकल पेंटींग्जचा प्रभाव मान्य केला.
किरिकोच्या ’डिलाइट ऑफ़ अ पोएट’ मधे तिरकस, अनोळखी रस्त्यावरच्या मधोमध आडवा पडलेला रोमन पुतळा, बाजूचं कारंज, कमानी, जुने बंद पडलेलं घड्याळ, दूरवरुन जाणारी आगगाडी, निरभ्र आकाशाचा घुमट पहाताना बर्गमनच्या ’वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ची आठवण अपरिहार्यपणे येते. सर्जन कलेच्या विश्वात फक्त चित्रकलाच नाही, सिनेमा, शिल्प, साहित्य, नाट्य, कविता.. दृश्यकलांच्या सर्व प्रांतात रंजक, स्वप्नांकित सर्रिअलिझमने शिरकाव केला.. ते आजही आपलं अस्तित्त्व अबाधित राखून आहे.
असं काय होतं नक्की किरिकोच्या त्या पेंटींग्जमधे की ती बघताना भिती आणि आकर्षणाचं अजब रसायन मनात तयार होतं?
सावल्यांचा खेळ, छाया-प्रकाशाचा, तिरपेपणाचा, आगळ्या पर्स्पेक्टी्वचा, एकाचवेळी आधुनिक शहरी आणि क्लासिकल पुराण्या आर्किटेक्चरच्या एकत्रितपणाचा, गडद, ठळक, मोजक्या रंगसंगतीचा, कमीतकमी रचना, नेमक्या रेषांचा हा सगळा एकत्रित परिणाम असतो. परस्पर विरोधी, एकमेकांशी काही नातं नसणा-या गोष्टींची अशक्य सांगड बघताना आपण चकीत होतो, थरारुन जातो. हे अतीवास्तव आहे हे अंतर्मनाला जाणवतं आणि त्याची भुरळ पडते. शरीराला, बाह्य दृष्टीला दिसणा-या वास्तव जगापेक्षा अंतर्मनात जागलेले अतिवास्तव जगच खरे आहे असं वाटायला लागतं.
त्याचबरोबर जी स्वप्न आपण विसरु पहातो, मनावर अनामिक दडपण आणणारा एखादा खाजगी अनुभव, जो एरवी अंतर्मनात तळाशी खोलवर बुडवून टाकलेला असतो, तो ही पेंटींग्ज पहाताना तरंगत वर येतो आणि असा अनुभव येणारे आपण एकटेच नाही, हे पेंटींग बनवणा-याला, ते बघणा-या अनेकांना तो आलेला आहे, येणार आहे या जाणीवेने मनावरचे दडपण अचानक उचलले जाण्याचेही समाधान मिळत असेल का? माहीत नाही. उत्तर कदाचित फ़्रॉइडने केलेल्या मेटाफिजिकल आणि सर्रिअल पेंटींग्जच्या विश्लेषणामधे सापडूही शकेल. स्वप्नसृष्टीतल्या प्रतिमा म्हणजे मनाच्या जाणिवेत सुप्तपणे रुजलेले विचार असतात आणि त्या अर्थपूर्ण आणि ख-या अर्थाने वास्तव असतात असं त्यानेच लिहून ठेवलं आहे.
स्वप्नांमधल्या वितळत्या प्रदेशांमधे फ़िरताना अचानक पाय फ्रेमबाहेर पडावा आणि खाडकन जाग यावी तसं वाटतं किरिकोच्या पेंटींगवरुन नजर हटवताना.
-----------