Sunday, July 25, 2010

वाचायच्या आधीच..

हिंदू हातात आलं आणि अगदी गार गार वाटलं. येताना टॅक्सीत पुरेसा प्रकाश मिळेना बाहेर काळे ढग दाटून आलेले म्हणून, तर मी अगदी खिडकीच्या बाहेर तिरकं काढून वाचायचा प्रयत्न करत होते आणि तशी जेमतेम दोन पाने वाचली मग मिटवून टाकलं. अशा पुस्तकांना रात्रच हवी वाचायला. निरव रात्र. बाहेर पावसाचा आवाज आणि गच्च काळोख. आपल्यापुरत्या प्रकाशाच्या चौकोनात आपल्या आवडणारच याची खात्री असणारं पुस्तक. फार कमी वेळा अशी पुस्तकं हातात येतात.
हिंदू प्रकाशित वगैरे झाली पण खरं तर का कोणास ठाऊक पण मला अजिबात घाई गडबडीने ती वाचायची उत्सुकता वाटत नव्हती. म्हणजे आहे मी नेमाडे किंवा कोसला म्हणूयात तर कोसलाप्रेमी गटातलीच तेव्हा कादंबरीबद्दल उत्सुकता जरुर होती. पण एक तर ती काही मी प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आगाऊ नोंदणी वगैरे केलेली नव्हती. त्याबद्दल रोज बातम्या वाचल्या जात होत्या की अमुक जणांनी नोंदवली वगैरे पण मी पडले अशा बाबतीत आळशी. मग ती प्रकाशित झाली तेव्हाही काही मी त्या समारंभाला गेले नाही. मग पार्ल्याच्या मॅजेस्टिकमधे डोकावले तर तिथल्या हिंदूच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती फक्त आगाऊ नोंदणीदारांसाठी आहेत वगैरे कळल्यावर मला वैताग. म्हटलं जाऊचदे. तरी वाटलं पुढे जवाहरमधे विचारावं. निघाले आणि पाऊस सुरु झाला जोरदार. कशाला हिंदूला भिजवा आता. बघू उद्या म्हणत मी तशीच घरी. बरं अजून कोणी काही झाली बुवा आमची वाचून. आवडलीय नाही आवडली काहीच बोलेना. अर्थात मला त्याने फरक पडणाराच नव्हता. मला ती आवडणारच हे मला माहित होत. एक तर मला पुस्तकं, सिनेमे वगैरेबाबत अगदी सिक्स्थ सेन असल्यासारखं आधी कळतच की आपल्याला हे आवडणार. हे नाही आवडणार. आणि हा अंदाज एरीली ९०% वेळा बरोबर ठरतो. मिथिला म्हणते की आता आवडणार म्हटलय ना म्हणून आवडतच. तर त्यात काही अर्थ नाही. १०% वेळा नाही आवडत त्याचं काय? एक तर आधीच वाचलेलं की या पुस्तकात पुरातन मोहन्जोदडो संस्कृतीतल्या उत्खननाची वगैरे थ्रिलिंग पार्श्वभूमी आणि नेमाडे लिहिणार म्हणजे पुरेसा विस्तृत पट घेऊन याची खात्रीच.
तर हिंदू काही त्यादिवशी हातात आली नाही. दुसर्‍या दिवसापासून मुंबईत धुआंधार पाऊस. काल म्हणजे शनिवारी दादरला आयडियल, मॅजेस्टिकवर धाड घालायचं ठरवलं पण पाऊस काही थांबला नाही. पण आज सकाळी प्रहार मधे प्रभा गणोरकरांनी हिंदूबद्दल लिहिलेलं वाचलं आणि ताडकन उठलेच. सही दिसतय आणि हे लगेच अगदी लगेच वाचण मस्ट आहे आणि आपण काय पाऊस, सवलत करतोय मूर्खासारखं असं म्हणत गेले रविवारची दुपार विसरुन दादरच्या शिवाजी मंदिर मॅजेस्टिकमधे. तिथे पुन्हा तेच. प्रती फक्त आगाऊ नोंदणीधारकांकरता. बुक केलय कां? म्हटलं नाही पण हवय आत्ताच. त्या काऊंटरमागच्याला काय वाटलं काय माहीत. तो तिथल्या मुलाला म्हणाला त्या काल सही करुन आलेल्या पंधरा प्रती आहेत त्यातली एक आण. आणि माझ्या हातात प्रत. अगदी नेमाडेंच्या सहीची वगैरे. मग मी असं एखादंच पुस्तक घेणं बरं नसतं म्हणत अजून तीन घेतली. त्यातलं एक अजित हरिसिंघानींचं बाईकवरचं बिर्‍हाड.सानियाचं अशी वेळ, मिलिंद बोकिलचं समुद्रापारचे समाज. सॉरी चार घेतली. तारा वनारसेंचं तिळा तिळा दार उघड. मग वाढलेल्या टॅरिफची वगैरे किरकोळ चिंता न करता टॅक्सी. पुस्तकांना असं बसमधून वगैरे नेणंही बरोबर नाही. मग टॅक्सीत बसल्या बसल्या पहिलं पान उघडलं.
प्रस्तावना-

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरुन जगण्याची समृद्ध अडगळ

सुरुवात-
कोण आहे?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तु कोण?
मी तु आहे, खंडेराव.
अंमळ चुळबुळात्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वतःलाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
ही तर मोठीच आफत आली आपल्यासारख्या माणसावर. हल्ली सांगायला गोष्टच तेव्हढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं. असं म्हणून मी वरच्या तंबूच्या कापडावरचे काळेपांढरे ठिपके पाहत पुन्हा झोपी जातो. पुन्हा दिसायला लागतो मी मोठ्या मेहनतीने तयार केलेला सप्तसिंधू भुप्रदेशाचा नकाशा. आकाशातून खूप उंचीवरुन अफगाणीस्तानातल्या शरयू नदीपासून राजस्थानातल्या सरस्वती नदीपर्यंतच्या या नव्या नकाशामुळेच माझं संशोधन सर्वचर्चित झालं.


आवडलं. आवडलं हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ. मला कळतं वाचायच्या आधीच बरोबर.

4 comments:

sharayu said...

या कादंबरीत नेमाड्यानी आपल्याला उमगलेला हिंदू धर्म सांगितलेला नाही. अशा परिस्थितीत केल्या गेलेल्या विचारमंथनाला बडबड म्हणतात.

HAREKRISHNAJI said...

Must read the book

Anonymous said...

लेखनावर कोणी उशीरा कॉमेंट करेल तर मागे परत बघतेस का माहित नाही. हिंदु वाचण्याअगोदर मधील anticipated उत्साह एका अनोख्या भावविश्वाचा निदर्शक आहे.अशी
असोशी उर्मी क्वचितच कोणाठायी असते.मलातर
मैत्रेय उपनिषदातिल आत्मनस्तुकामायची आठवण
होते.पण मग पुस्तक वाचल्यानंतरचे काय?..

..त्या माडीया गोंड बाईचे..लाडीबाई नवरा मारायचे औशिद देऊ का?...इत्यादी इत्यादी.
उत्सुकता आहे एका सहानुभवाची...

शर्मिला said...

हो, मागे वळून बघते. कोणत्याही जुन्या पोस्टवर केलेली कमेन्ट माझ्या मेलबॉक्समधे येत असल्याने ती पुन्हा ब्लॉगवर वाचायला म्हणून मी येते त्या जुन्या पोस्टवर. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपलंच काही जुनं वाचलं जाऊन गंमत येते म्हणूनही.
तर सर्वात आधी तुमचे मनःपूर्वक आभार. खूप मनापासून वाचून प्रतिसाद दिला आहेत. नव्या पोस्टवरच्या तुमच्या आधीच्या कमेन्टला उत्तर नाही दिले अजून. ते देईनच. पण या कमेन्टमधले सहानुभावाबद्दलचे तुमचे उद्गार वाचले आणि लगेच आभार लिहायला घेतले. सहानुभावाची उत्सुकता ही हल्ली दुर्मिळ झालेली गोष्ट.
हिंदू वाचनानंतरची माझी प्रतिक्रिया ही आवडली अशीच आहे. अनेक, वेगवेगळया कारणांनी ती आवडली. टीकाकारांना ज्या कारणास्तव ती आवडली नाही, नेमक्या त्याच कारणास्तव ती मला आवडली आहे.