Sunday, August 15, 2010

पीपली लाईव्ह

पीपली लाईव्ह पाहून ६३वा स्वातंत्र्यदिन'साजरा'केला.त्यातल्या ज्या प्रत्येक विनोदावर थिएटर हसत होतं त्या प्रत्येक विनोदानंतर मन जास्त जास्त खिन्न होत गेलं.खूप वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर सत्यजित रेंचा सद्गतीमधे तो पोट आणि पाठ एकत्र झालेला ओम पुरीचा शेतकरी..त्याचं ते मुकाट मरुन जाणे पाहिलं होतं.हादरुन जायला झालं होतं मनातून.
आज पीपली लाईव्ह बघताना त्या मरण्याचा तमाशा झालेला आपण पाहत आहोत इतकाच फरक जाणवून गेला.आणि हे होतच रहाणार अशा मनाच्या निर्लज्ज स्वीकारामुळे आपली हादरुन जाण्याची संवेदनशिलता सुद्धा संपली आहे हाही एक फरक!
बाकी शेतकरी अजूनही तसाच आहे.

4 comments:

रोहन चौधरी ... said...

काही दिवसात भारतात परत आलो की बघायचा आहे हा पिच्चर... :)

Innocent Warrior said...

अगदी खरे आहे. मी हा चित्रपट अमेरिकेत पाहिला मला वाटले इथले अमेरिकन भारतिय ज्यांनी भारतिय ग्रामिण जीवन पाहिले नाही त्यांना हे सर्व हसायला लावणारे आहे. त्या हशांमुळे संताप अनावर झाला होता, देश म्हणजे मी, मी म्हणजे देश ही भावना कुठेच उरली नाही. आपण आपल्यावर केलेल्या विनोदावर हसत आहोत एवढे ही कळत नाही.

लाज वाटते मला!!!

Abhijit Bathe said...

अर्थार्थी ’पीप्ली’ शी काही संबंध नाही - पण तरी हा ब्लॉग वाच : http://gangadharmute.blogspot.com/

वीकेन्डभर विचार करुन झाल्यावर मला बरेच मुद्दे सुचताहेत यावर, पण शेती असुनही ती कधी न केलेल्या शेतकऱ्याने शेतीबद्दल काही लिहावं तर ’किस खुशीमें?’ प्रकार होतो. न लिहावं तर नसलेली इनसेन्सिटिव्हिटी त्रास देते. इकडे आड नि तिकडे विहीर - त्यात परत पीप्ली पाहिला ही नाहिए! :(

पण तसे हसणारे ’life is beautiful' ला ही हसतातच कि....

शर्मिला said...

शेती असुनही ती कधी न केलेल्या शेतकऱ्याने शेतीबद्दल काही लिहावं तर ’किस खुशीमें?’ प्रकार होतो. न लिहावं तर नसलेली इनसेन्सिटिव्हिटी त्रास देते. >>>>>

पी. साईनाथ नावाच्या हिंदुस्तान टाईम्सच्या पत्रकाराचे एक 'एव्हरीबडी लव्ह्ज अ गुड ड्रॉट' नावाचे पुस्तक जमले तर वाच. खरं तर वाचच.

तुझी कमेन्ट वाचल्यावर माझ्याही मनात सिनेमासंबंधाने पुन्हा काही प्रश्न नव्याने डोकावून गेले. नक्की काय खटकत होतं ते बर्‍यापैकी स्पष्ट झालं. वैयक्तिकदृष्ट्या एक टिपिकल शहरी म्हणून विचार केला तर माझी नाळच शेती आणि त्यासंबंधीत कोणत्याही प्रश्नाशी आजपर्यंत कधी जोडलीच गेली नाहीय. सिनेमे पाहून, बातम्या वाचूनही त्यात खूप फरक पडत नाही. सहवेदनेची नाळ जी मला शहरी समस्यांवरचं काही बघताना, वाचताना जाणवते ती शेतीसंबंधात नाही हे नैसर्गिकच असा एक माझा समज होता. मुटेंना जे खटकलं त्याला मी त्यांना ब्लॅक ह्युमरचा अर्थच कळला नाही असं हणून निकालात काढू शकते. पण मग सीमेवरच्या जवानांच्या विधवांची दुर्दशा, अफगाणीस्तानातले युद्धग्रस्त, लहान बालकांवरचे लैंगिक अत्याचार, बांगला निर्वासित, फाळणी/दंगली सापडलेल्या लोकांच्या वेदना यासगळ्यांबाबतही मला असेच म्हणायला नको कां? पण ते तसे नाहीय. ह्या कोणाशी संबंधित जर पीपली लाइव्ह सारखा ब्लॅक ह्युमर, सटायर चित्रपट कोणी काढला तर त्यातल्या विनोदांना (!) अगदी इंटेलेक्चुअल पातळीवरही दाद देणे, ती ऐकणे मला नाहीच पटणार.
पीपली लाईव्हमधल्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या मनोवृत्तीला समजून घेण्यास अनुषा रिझवी कदाचित कमी पडली आहे. ब्लॅक ह्युमर हा सिस्टिम, राज्यकर्ते यांच्यापर्यंतच मर्यादित रहायला हवा होता. सिनेमा आमिरच्या स्टँडर्डचाच आहे, चांगलाच काढला आहे पण तो चांगला म्हणतानाही हे काही मुद्दे नजरेआड करु नयेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
पीपली लाइव्ह मधे नासिरुद्दीनचा शेतकी मंत्री मुलाखतीत एक धक्कादायक विधान करतो की शेतीने आर्थिक स्तर उंचावत नाही. त्यासाठी औद्योगिकीकरण हाच एक उपाय आहे. सिनेमाच्या शेवटीही नथ्थू पीपलीमधून पळून जातो आणि कॅमेरा त्याच्यामागे जात शहरातल्या एका बांधकामावर तो मजुरी करणार्‍यांमधे बसलेला दाखवतात. म्हणजे एकंदरीतच शहरी लोकांच्या विचारांची धारा गेल्या अनेक दशकांमधे पीपलीच्या शेतकी मंत्र्यासारखीच झालेली आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही. पण हे घातक आहे. एकुण लोकसंख्येच्या सत्तर टक्केपेक्षा जास्त शेतकरी आणि शेतीवर आधारीत उद्योग करणारे लोक ज्या देशात आहेत त्या देशात अशा तर्‍हेचे सुतोवाच होणे, ते बरोबर वाटणे हे सारेच कुठेतरी फार चुकल्यासारखे वाटतेय.