Wednesday, November 24, 2010

चायना पोस्ट- एक

प्रवासात असतानाच एक इंटरेस्टींग ट्रॅव्हलोग लिहायची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती.म्हणजे कसं की बॅकपॅक ट्रॅव्हलिंग करताना अनेक जण पाठीवरच्या सॅकमधे लॅपटॉप घेऊन फिरतात आणि आज काय पाहिलं,काय खाल्लं,कोण भेटलं याबद्दल आपल्या ब्लॉगवर टाकतात.वगैरे वगैरे..वाचणार्‍यांच्या पेशन्सची फारशी फिकीर न करता लिहिलेले असे ट्रॅव्हलोग आधी इतके उगीचच वाचून झाले होते की आता निदान सूड म्हणून तरी इतरांना असलं वाचायला लावायचंच असाही एक खुनशी विचार यामागे असू शकत होता.)
ते असो.
पण या आधी अशा संधी आल्या तेव्हा प्रवासात एकतर लॅपटॉपचे ओझे वहायचे,संध्याकाळी थकून आल्यावर कंटाळा झटकून लिहित बसायचे हे काही जमलेलं नव्हतं.चीनमधे ते जमायला अजिबातच हरकत नव्हती.मोकळा वेळ हाताशी होता आणि हवं तसं भटकायलाही मिळणार होतं.अगदी रोज ट्रॅव्हलोग लिहिता आला असता.ब्लॉगवर रोज एक पोस्ट:पण हाय रे दैवा..देशात येऊन पर्यटकांना मुक्तपणे भटकायची मुभा आता चीनी सरकारने बर्‍यापैकी उदारपणे दिलेली असली तरी त्यांचे प्रसारमाध्यमं,इंटरनेट इत्यादींवरील निर्बंध मी विसरूनच गेले होते.ब्लॉगरसाईट्स तिथे उघडतच नव्हत्या तर पोस्टणार काय कप्पाळ?
पण आता इथे लिहायच्या निमित्ताने एकेक करुन नोंदी वाचत असताना लक्षात येतय किती आणि काय काय पाहिलं मी चीनमधे असताना.
मुंबईतल्या सततच्या धावपळीच्या,कामाच्या,डेडलाईन्सच्या टेन्शन्सच्या पार्श्वभूमीवर चीनमधे मिळालेला निवांत वेळ मला तापलेल्या मरुभूमीवर सापडलेल्या पाण्याच्या साठ्यासारखा होता.तीव्रतेने हवासा.नवर्‍याच्या खेपा चीनमधे कामाच्या निमित्ताने नेहमीच होत असतात.आत्ता त्याच्याबरोबर मी गेले होते खरी पण कामातून सुट्टी काढून माझ्यासोबत फिरत बसायला त्याला कितपत वेळ काढता येईल याबद्दल तो स्वतःही साशंक होता.पण माझी काही तक्रार नव्हती.अमुकच स्थळ बघायलाच हवं असा माझा आग्रह कधीच नसतो.फिरणं महत्वाचं.मग असं फिरत असताना वाटेत आलंच सामोरं एखादं महत्वाचं पर्यटन स्थळ तर ते बघायला आवडणार निश्चित.पण त्यासाठी आटापिटा करुन तिथपर्यंत पोचावसं फारसं वाटत नाही.
-------------------------------
चीनमधे सलग काही महिने राहून आल्यावर अनेकांनी तु'हे'बघीतलस कां?'ते'बघीतलस का?असे प्रश्न विचारले.विशेषतःपर्यटन कंपन्यांसोबत जे चीनची सफर करुन आले होते त्यांच्याकडे मी काय काय बघीतलं हे तपासून पहाण्याची एक मोठी यादीच होती.बहुतेकवेळा मी गप्पच होते.'हे','ते'वगैरे ज्यांच्याबद्दलचे त्यांनी प्रश्न विचारले ती सर्व चीनमधली सुप्रसिद्ध पर्यटनस्थळे होती.ती'बघायलाच हवी'वर्गवारीतलीच होती यात काहीच शंका नाही.त्यातली बरीचशी मी सुद्धा पाहून आले होते.माझ्या कॅमेर्‍यात त्या पर्यटनस्थळांचे फोटोग्राफ्सही होते.पण'काय पाहिलं?'बद्दल बोलताना मला फारसं त्या स्थळांविषयी बोलावसं का वाटत नव्हतं याचं मग मलाही जरा आश्चर्यच वाटलं.चीनबद्दलचं माझं आकर्षण जुनं होतं.परदेशांमधे आजवर अनेकदा दीर्घकाळ राहून,फिरुन आल्यावरही मनातलं चीनबद्दलचं गूढ-पौर्वात्य आकर्षण जराही फिकं झालेलं नव्हतं उलट जास्त जास्त खोल जात होतं.
पण हे आकर्षण तिथल्या पर्यटनस्थळांविषयीचं नव्हतंच कदाचित असं आता लक्षात येतय.
काही काही फोटोंमधल्या ठिकाणांबद्दल तर मला तपशिलवार फारसं सांगताही आलं नाही.म्हणजे तिथे कसे,कुठून गेलो..त्याचा इतिहास वगैरे.चीनमधल्या पर्यटनस्थळांबद्दल बोलताना'इतिहास'फार महत्वाचा.सगळीच स्थळं ऐतिहासिक.हे अमुक एका सम्राटाच्या काळातलं..ते तमुक सम्राटाच्या ऐतिहासिक काळात बांधलेलं वगैरे.सम्राटांची चिंग,मिंग,यिंग वगैरे नावही मला सारखीच वाटली आणि त्याचा इतिहासही.तेव्हा कदाचित हे एक कारण असावं मला फारसं काही त्यांच्याविषयी न बोलावसं वाटण्यामागे.
पण तरीही चीनमधे मी पाहिलं खूप.
---------------------------------------------------------------
प्रवासात असताना मुक्कामाच्या अनोळखी शहरात पोचावं तर ते संध्याकाळीच.प्रवास संपल्यावर,शहरात शिरताना दिवसभराच्या धावपळीनंतर जरा संथावलेलं,घरी परतणार्‍या लोकांच्या गडबडीने जरा नादावलेलं शहर दूरस्थपणे पहिल्यांदाच निरखून बघायला मला आवडतं.वेंगझोच्या एअरपोर्ट पोचलो तेव्हा दुपार कलून बराच वेळ झाला होता.वेंगझो एअरपोर्ट छोटेखानी.गोव्यासारखा दिसणारा.तिथून तीन तासांच्या कारड्राइव्हच्या अंतरावर असणार्‍या होंगियान शहरात प्रवेशत असताना चीनमधली पहिली संध्याकाळ पाहिली.
प्रत्येक शहरातली संध्याकाळ वेगळी असते.प्रत्येक शहरात खुललेला सांजप्रकाश वेगळा असतो.वेंगझो ते होंगियान शहरापर्यंतचा द्रूतमार्ग दोन्ही बाजूंच्या गर्द झाडीने व्यापलेला.घरी परतायला अधीर झालेला तिथला सूर्य रस्त्यातच भेटला.तो दिलदारपणा दाखवायच्या मूडमधे.दिवसभर वाटूनही अजून शिल्लक राहिलेली,वरची लखलखती पांढर्‍या किरणांची शोभा उधळून झाल्यावर,तळाशी साचलेली सप्तरंगी किरणे मुठी मुठीने शहरावर भिरकावत आपली पोतडी रिकामी करुन टाकायची घाई त्याला झालेली.
रस्त्याच्या एका बाजूला डोंगरांच्या रांगा आणि दुसर्‍या बाजूला नक्की काय आहे ते झाडांपलीकडे नजर पोचू न शकल्याने नीटसे समजत नव्हते.रस्ता मधूनच कधीतरी जमिनीखालच्या एक एक दीड दीड किमी.लांबीच्या बोगद्यातून तर कधी उंचच उंच फ्लायओव्हरवरुन जाणारा.दुतर्फा गर्द हिरव्या झाडीची भव्य लॅन्ड्स्केप्स आणि स्वच्छ,गुळगुळीत रस्त्यांची ही मजा नंतर चीनमधे मनसोक्त अनुभवली खरी पण पहिल्यांदाच चीनमधल्या एका शहरात शिरत असतानाचा हा रस्त्याचा अनुभव सुखद आणि अनोखा वाटला.मला वाटतं ९९%भारतीय पर्यटक कधीही,कोणत्याही परक्या देशात गेले की त्यांचा त्या त्या देशातला सर्वात पहिला अनुभव या अशा गुळगुळीत,सुखद रस्त्यांवरच्या प्रवासाचाच असतो आणि तो नोंदवून ठेवण्याचा मोह त्यांना नाहीच आवरत.यामागचे लॉजिकल रिझनिंग विषद करुन सांगण्याची गरज अर्थातच नाही).
गडद गुलाबी,केशरी आभाळ.सिंदूरी रंगाची संध्याकाळ.घडीव,लाल दगडांनी बांधून काढलेले पर्वतांचे रस्त्यापर्यंत पोचलेले पायथे.पर्वतकडांवरुन दगड,गोटे,माती घरंगळून रस्यावर कोसळू नये म्हणून पायथ्याला गुंडाळलेल्या बेंगरुळ जाळ्यांच्या तुलनेत हे नक्कीच देखणं दिसत होतं.होंगियान शहरातून गाडी आत शिरली तेव्हा काळसर हिरवा रंग वरच्या झाडांमधून सावकाश पाझरत रस्त्याच्या दोन्ही किनार्‍यांवर साकळत होता.सर्वसामान्य चिन्यांच्या तुलनेत अजस्त्रच म्हणावी अशी साडेसहा फूट उंची लाभलेला आमचा ड्रायव्हर ली अखंड वेळ त्याच्या सेलफोनवरुन कुणाशी ना कुणाशीतरी भांडणार्‍या आवाजात बोलत होता.तो भांडत नाहीये तर चिन्यांचा नॉर्मल आवाजाचा टोनच तो आहे हे ज्ञान नवर्‍याने लगेच पुरवले.
----
चीनचा दक्षिण-पूर्व भागातला ताइझो प्रांत.त्यातले होंगियान हे छोटे औद्योगिक शहर.औद्योगिक कारखाने शहराबाहेर आणि शहर आधुनिक,सुखसोयींनी परिपूर्ण.शांघाय,बिजिंगसारख्या मोठ्या शहरांचा नोकझोक,नखरा होंगियानमधे नाही पण डोंगरांच्या पोटात वसल्याने हवा थंडगार,ताजी आणि शहरात भरपूर ताज्या पाण्याची तळी.शहराबाहेरच्या शेतजमिनीवर मोठ्या व्यासाचे प्लास्टिक पाईप्स अर्धे कापून जमिनीवर एका शेजारी एक रचून ठेवल्यासारखी दिसणारी लांबट,बुटकी,पांढरी पॉलीहाऊसेस.त्यांच्यामधे मश्रूम्स वाढवतात.
आमचं अपार्टमेन्ट एका प्रचंड मोठ्या कॉम्प्लेक्समधे दहाव्या मजल्यावर आहे.रस्त्याच्या पलीकडे थोड्या अंतरावर वाहणारी नदी आणि तिच्या काठावर गर्द झाडीने भरुन गेलेली बाग आमच्या अपार्टमेन्टच्या खिडकीतून दिसते.बागेच्या सुरुवातीला एक अर्धवर्तुळाकार लाकडी स्टेज जमिनीलगत आहे.एअरोबिक्स साठी.त्यावर रात्री उशिरापर्यंत संगीत चालू असते.चिनी तरुण मुलं-मुली आपापल्या सोयीने कामावरुन आल्यावर तिथे जाउन संगीताच्या तालावर नृत्याचा व्यायाम करतात.चीनमधे सर्वत्र फिटनेसचे प्रचंड वेड असल्यासारखे दिसते.जिकडे तिकडे जीमच्या पाट्या,जॉगर्स पार्क.
रात्री शहरात फेरफटका मारायला बाहेर पडलं की ठळकपणे नजरेस पडतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी,गर्दीने भरुन गेलेली छोटी,छोटी चिनी रेस्टॉरन्ट्स.प्रशस्त,स्वच्छ टाईल्स घातलेल्या फूटपाथवर खुर्च्या आणि टेबलं टाकून ऑफिसातून परतताना घरी जायच्या आधी जरा गप्पा-टप्पा,खाणी-पिणी करण्याच्या मूडमधले चिनी मोठमोठ्या आवाजात कलकलाट करत,हसत बसलेले.
रेस्टॉरन्ट्सच्या बाहेर भाज्या,नूडल्स,फळे कापून,रचून ठेवलेली.ग्रेव्हीत कसले कसले डंपलिंग्ज घातलेल्या चिनी कढया,उकळत्या सूप्सचे ब्लोस टेबलावर भरुन ठेवलेले.आणि या सार्‍याचा संमिश्र,नाकाला अनोळखी असा उग्र वास.
आम्ही कोपर्‍यावरच्या बेकरीतून ब्राऊन ब्रेड आणि तीळ लावलेले बन्स घेतो.बेकरी चकचकीत,स्वछ.होंगियानमधे एकमेव.मला तिचा पत्ता विसरुन चालणार नाहीये.मी शाकाहारी असल्याने मला चीनमधे असताना कायम पुढच्या जेवणाची भ्रांत पडण्याचा धोका आहे.इथे नूडल्स मधे कम्पल्सरी सिझनिंग घालतातच आणि ते म्हणजे माशांच्या पेस्ट्स किंवा बीफची सुकवलेली पावडर. तेव्हा शाकाहारी नूडल्स हा प्रकार फारसा अस्तित्वातच नाही.ब्रेड आणि बन्स चीनमधे निदान मिळायला लागलेत हे माझं सुदैव. होंगियानमधे आणि एकंदरच चीनमधे या ऋतूत भाज्या,फळे भरपूर असतात तेव्हा खाण्याची चिंता फारशी असणार नाही असं वाटतय.
रस्त्यांवर खूपच दुकाने होती.ड्रेसेस,चायना गोल्ड,शूज,केएफसी,मॅकडोनाल्ड्स(हेही गेल्या काही वर्षांतलं)होंगियानमधे एकुण सहा मोठे मॉल्स आहेत.पण एकंदर चीनमधे ही अशी लहान लहान रस्त्याच्या शेजारची दुकाने खूप दिसतात.हे भारताशी मोठंच साम्य.रस्त्याच्या एका बाजूला मोठा बाईकर्स वे.पूर्वी त्यातून फक्त सायकली जायच्या.आता त्यातून बहुतेक रिचार्जेबल इलेक्ट्रॉनिक बाइक्सच जाताना दिसतात.आवाज न करता झपकन मागून येतात.त्यांना स्पीडलिमिट ताशी तीस किमी.अशी ठरवून दिलेली आहे.पण ती कोणी पाळत नाही.
अपार्टमेन्टच्या खाली ई-बाईक्सची रांगच लागलेली असते.सोसायटी त्यांना चार्जिंग पॉइन्ट्स पुरवते.काहीजणं लिफ्टमधून बाईक्स आपल्या घरात घेऊन जातात आणि चार्ज करतात.दर दोन दिवसांनी चार्जिंग करावं लागतं.रस्त्यांवर सायकल रिक्षाही खूप दिसतात.पण सायकली फारच मोजक्या.
रस्त्याच्या कडांना ठराविक अंतरांवर झाडं होती त्यांच्या फांद्यांचा विस्तार एकसारखा डोक्यावर गोल.झाडे शिस्तीत वाढावी,रस्त्यांवर अस्ताव्यस्त फांद्या येऊन रहदारीत अडथळा येऊ नये म्हणून फांद्यांना खालून बांबूंचे टेकू लावून ठेवतात.कम्युनिस्ट शिस्त.माणसांमधून आता नाहिशी व्हायला लागलेली दिसत होती पण झाडांना मात्र होती.

रस्त्यावर अचानक एक पुरातन इमारत दिसली.सोबत असलेल्या इंग्रजी येणार्‍या चिनी मित्राने सांगितले की ही २००० वर्षं जुनी,हेरिटेज दर्जा दिलेली इमारत आहे.काळ्या लाकडाची,वर पॅगोडासारखं उतरतं,कोपर्‍यात दुमडलेल्या,खालून वर वळलेल्या लाल कडांचं छत.सर्व दारं,खिडक्या कडेकोट बंद.बाकी सार्‍या झगमगाटी आधुनिक चिनी रस्त्यावरचं हे एकच प्राचीन इतिहासाच्या खुणा वगवणारं घर एकाकी,अंधारात बुडून गेलेलं.
-----------------------------------------------------------------
कंटीन्यूड...

2 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

"दिवसभर वाटूनही अजून शिल्लक राहिलेली,वरची लखलखती पांढर्‍या किरणांची शोभा उधळून झाल्यावर, तळाशी साचलेली सप्तरंगी किरणे मुठी मुठीने शहरावर भिरकावत आपली पोतडी रिकामी करुन टाकायची घाई त्याला झालेली."

वा... काय वर्णन आहे. सुंदर.

सागर said...

खूप खूप दिवसापासून तुमच्या चीन विषयी च्या पोस्ट वाचायच्या आहेत अस ठरवतोय पण काही कारणाने जमत नव्हत.हि पोस्ट सुद्धा आधी अर्धी वाचून सोडली होती.आज रात्री वेळ मिळाला अन वाचून काढली.
अप्रतिम वर्णन केल आहे.आवडलं.लिहीत रहा मी नक्की वाचीन .आता दुसरा भाग वाचतो.