Tuesday, March 08, 2011

चायना पोस्ट-आठ (फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड)

दुपारी चार वाजता हांगझोला पोचलो तर ते शहर अंगावर दाट धुक्याचं पांघरुण घेऊन मस्त गुडूप झोपलं होतं.शांघायहून आम्ही येत होतो आणि तिथल्या चकचकाटामुळे अक्षरश:दमून गेलेल्या आमच्या डोळ्यांना हांगझोतला तो निळाईची झाक पसरलेला धुकाळ राखाडी,काहीसा मंदावलेला प्रकाश खूपच शांतवणारा वाटला.बघताक्षणीच कोणीही प्रेमात पडावं असं ते शहर.तसं बघायला गेलं तर प्रथमदर्शनी इतर कोणत्याही हनिमूनर्स पॅरेडाईज म्हणून ओळखल्या जाणार्‍या निसर्गरम्य हिलस्टेशनसारखंच दिसणारं.ताजी,थंडगार हवा,धुक्यात लपेटलेल्या संध्याकाळच्या वेळा आणि दाट झाडीतून वाट काढत आपल्याला कोणत्यातरी अनपेक्षित सौंदर्यस्थळी नेऊन पोचवणारे वळणदार,उंचसखल पातळीवरचे छोटे,छोटे रस्ते.सिमला,माऊंट अबू,नैनिताल किंवा अगदी आपलं महाबळेश्वरही झाकावं आणि हांगझोला काढावं.
लिनबोला मी तसं म्हणताच तो जरा दुखावला.हांगझो सारखं तळं दुसर्‍या कोणत्याच शहरात नाहीये हे त्याचं पालुपद होतं.लिनबो हांगझोचा प्रचंड अभिमानी.त्याचं हांगझोमधे वडिलोपार्जित घर आहे.त्याच्या पणजोबांची हांगझोच्या राजवाड्यात तलावातल्या नौकांची देखभाल करण्याची नोकरी होती.
लिनबोलाही असाच आत्ताच्या काळातला कोणतातरी जॉब हांगझोलाच राहून करायची खूप इच्छा होती पण वडलांनी त्याला जबरदस्तीने बेजिंगला इंजिनियरिंग कॉलेजात घातलं होतं.त्याचा आता प्लास्टिक मोल्डिंग मशिनरी बनवायचा मोठा व्यवसाय होंगियानमधे होता.तिथेच त्याचं कुटुंबही रहातं पण त्याचा सगळा जीव हांगझोत अडकलेला असतो.दर आठवड्याला तो आवर्जून हांगझोला परतायचा.
होंगियान फ़क्त पैसे मिळवून देतं पण सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला हांगझोलाच यायला हवं असं दरवेळी भेटला की लिनबो एकदातरी हे वाक्य म्हणायचा.त्याचा आम्हाला सारखा आग्रह चाललेला असायचा तिथे जाऊन या म्हणून.पण जवळच आहे तर कधीही जाता येईल असं म्हणत आम्ही आपले लांबलांब अंतरावरच्या चिनी शहरांनाच भेटी देण्यात मग्न होऊन गेलो होतो.
लिनबोची मधल्या काही दिवसात काही खबरबातही नव्हती पण शांघायमधे भरलेल्या वर्ल्ड एक्स्पोला आमच्याच रांगेत बाहुलीसारख्या नाजूक बायकोला आणि गुबगुबीत सशासारख्या दिसणार्‍या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन उभा असलेला लिनबो अचानक भेटला आणि मग त्याने शांघायहून थेट हांगझोला जायचा आमचा प्लॅन स्वत:हून पक्का करुनही टाकला.
होंगियानपासून हांगझोचा रस्ता जेमतेम पाच-सहा किलोमिटर अंतराचा पण त्या दोन शहरांच्या वातावरणात,संस्कृतीतला फ़रक कित्येक योजनांचा.होंगियान संपूर्णपणे औद्योगिक वातावरण असलेलं शहर आहे.लिनबोच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या सगळ्या गोष्टी फ़क्त फ़ंक्शनल असतात.नुसतं बसून तलावाचं पाणी तास न तास निरखत बसण्यातलं सुख तिथल्या काय इतर कोणत्याच शहरातल्या लोकांना कळणारं नाही असं तो पुन्हा पुन्हा सांगतो.
हांगझो सोडताना आम्हीही त्याची री ओढायला लागलो होतो.
शहराच्या सर्व अस्तित्वालाच वेढून असलेल्या हांगझोच्या तलावाला'तलाव'म्हणणं म्हणजे त्याच्या आकारमानाचा अपमान करण्यासारखच होतं.अक्षरश:किनार्‍या थांगही न लागणारा विशाल समुद्राचा एक पाचूसारखा तुकडा असा तो हिरवट-निळ्या पाण्याचा प्रचंड मोठा जलाशय होता.विलो,चेरी,र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि अजून एका नाजूक पांढर्‍या फ़ुलांचा चांदण्यांसारखा सडा पाण्यावर पाडणार्‍या एका अनामिक झाडांच्या महिरपीने,छोट्या,छोट्या कमानींच्या पुलांनी,राजवाड्याच्या देखण्या,भव्य,नक्षिदार कमानींनी तलावाचे मुळातले सौंदर्य कमालीचं खुलत होतं.पहाटे,दुपारी,उतरत्या संध्याकाळी आणि मिट्ट काळोख्या रात्रीही तलाव पहावा आणि त्या प्रत्येक प्रहराचं अंगभूत सौंदर्य अंगावर निथळवत राहिलेला तो अद्भूत तलाव पाहून त्याच्या मोहकतेनं विस्मयचकित व्हावं.नौकाविहार करावा किंवा नुसतच काठावर बसून तलावातलं चांदणं निरखावं.पूर्वेचं व्हेनिस म्हणून दिमाख दाखवणार्‍या जवळच्या सुजौ शहरातल्या कालव्यांचं एकत्रित सौंदर्यही या तलावापुढे उणंच.
एका रात्री उशिरा तलावावरुन परतत असताना आम्ही जेवायला उघडी रेस्टॉरन्ट्स शोधत होतो तेव्हा एका सायकलरिक्षावाल्याने इंदू इंदू म्हणत आम्हाला थेट आणून सोडलं हांगझोमधल्या एका इंडियन रेस्टॉरन्टमधे.शुक्रवारची ती संध्याकाळ होती आणि रेस्टॉरन्ट्च्या मधोमध एका स्क्रीनवर हिंदी सिनेमातल्या गाण्यांनी धुमाकूळ घातलेला होता.त्याच्या खालच्या मोकळ्या जागेमधे त्या सगळ्या लेटेस्ट आयटेम नंबर्सवर बरंच तरुण,प्रौढ पब्लिक जोरदार नाचत होतं.त्यात बरेच भारतीय होते,चिनी होते,पाकिस्तानी,बांगलादेशी,श्रीलंकन,तुर्की होते आणि काही वेस्टर्न चेहरेही होते.हांगझोचं हे रेस्टॉरन्ट वीकेन्ड्सना असंच भरुन ओसंडत असतं असं तिथला केरळी मॅनेजर सांगत होता.लग्नांमधे असतो तसा भला मोठा बुफ़े स्प्रेड मांडून ठेवला होता.चिनी (भारतीय पद्धतीचं),पंजाबी,साऊथैंडियन,कॉन्टिनेन्टल,इटालियन असा आपल्याकडच्या लग्नांमधे असतो तसा सगळा मेनू बुफेमधे दिसत होता.पदार्थ चवदार होते.सगळेजण बशा भरभरुन घेऊन जात होते.
इतकी सगळी पब्लिक टुरिस्ट आहे?मला कळेना.
एकतर बरेच जण त्या रेस्टॉरन्टच्या वातावरणाला,तिथल्या जेवणाला सरावलेले वाटत होते.
नाही नाही,फक्त टुरिस्ट नाहीत.लिनबो म्हणाला.
हांगझोच्या जवळपासची सगळी शहरं बहुतांशी औद्योगिक आहेत.शिवाय जवळच सुजौची सिल्क टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे.मोठं व्यापारी केन्द्र असल्याचा फायदा हांगझोला मिळतो.ही लोकं इथे सारखी येत जात असतात. बेजिंग,शांघायला बरेच भारतीय चेहरे दिसतात पण हांगझो सारख्या लहान शहरात इतके भारतीय एकत्र दिसू शकतील असं वाटलच नव्हतं.
मेनलॅन्ड चायनामधे भारतीयांची संख्या गेल्या दशकामधे नक्कीच वाढली आहे(अंदाजे ३०,०००)तरी युरोप,अमेरिका,मध्यपूर्वेला जाऊन रहाणारे जितके भारतीय असतात त्यापेक्षा ही संख्या कितीतरी कमी आहे.यापैकी काही विद्यार्थी,व्यापारव्यवसायातले आणि बरेचसे बहुराष्ट्रीय कंपन्या,बॅंकेमधील नोकर्‍याद्वारे इथे आलेले आहेत.चायनीज शाळांमधे किंवा बेजिंग युनिव्हर्सिटीमधे भारतीय शिक्षक,शिक्षिकांना खूप मान आणि मागणी असते.बेजिंग युनिव्हर्सिटीमधल्या हिंदी भाषा विभागातर्फ़े भारतीय इतिहास,संस्कृती बद्दल माहिती देणारे वर्गही चालवले जातात आणि त्या वर्गांना चिनी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.भारतात येऊन नोकर्‍यांची संधी घ्यायला अनेक चिनी तरुण तरुणी उत्सुक असतात आणि त्यामुळे या विभागाची लोकप्रियता खूप आहे.भारतीय फ़ॅशन्स,खाद्यपदार्थ यांची चीनमधली लोकप्रियता गेल्या काही वर्षांमधे सातत्याने वाढती आहे.
लिनबोचं हांगझोमधे जे जुनं घर होतं तिथे त्याच्या आईवडिलांना भेटायला आम्ही गेलो होतो.दोघांनाही इंग्रजी अजिबातच येत नसल्याने संभाषण लिनबो मार्फ़तच जे काही होईल ते.लिनबोच्या वडलांना घरी कंटाळा यायचा आणि मुलाच्या फ़ॅक्टरीमधे जाऊन काही काम करायची त्यांची इच्छा असायची पण लिनबोच्या मते वडिल जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांची मत वेगळी आहेत.लिनबोची आई जेव्हा माझ्या सुनेला संध्याकाळी घरी जेवण करायला वेळ नसतो आणि तिला तसं सांगितल्यावर ती तुमच्या मुलासारखीच मी सुद्धा आठ तास फॅक्टरीत जाते असं'उद्धट'उत्तर देते अशी तक्रार लिनबो मार्फत सांगत होती तेव्हा चिनी असोत किंवा भारतीय चुली सगळीकडे सारख्याच असं जाणवून मजा(!) वाटली.
चीनमधे पिढ्यांमधल्या अंतराचा हा प्रकार मात्र बराच आणि खूप तीव्रतेनं पहायला मिळाला.दोन पिढ्यांमधील विचारांची तफ़ावत चीनमधे प्रचंड आहे.चीनची विशीच्या आसपासची पिढी संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरला आपलीशी केलेली,इंग्रजी सफ़ाईने बोलू शकणारी.चीनच्या वन चाईल्ड पॉलिसीच्या कडक अंमलबजावणीच्या दरम्यान जन्माला आलेली ही एकुलती एक मुलं,ज्यांना लाडावलेले लिटल एम्परर्स म्हणून समाजशास्त्रज्ञांनी उपहासाने संबोधले.
साठीच्या पुढचे चीनी सध्याच्या झपाट्याने बदललेल्या चीनच्या संस्कृतीशी अजिबातच सांधा जुळवू न शकलेले.त्यांना इंग्रजी अजिबातच येत नाही आणि समजतही नाही.त्यांना नव्या पिढीचं के एफ़ सी,मॅकला सारखं भेटी देणं,कोक,बिअर पिणं,फ़ॅशन्स,बोलणं-चालणं काहीच आवडत नाही.चीनमधला वृद्ध वर्ग हा संपूर्णपणे तुटल्यासारखा बाजूला पडलेला वाटला.
चीनी मधल्या पिढीला म्हणजे साधारण पन्नाशीतल्या चिन्यांना आत्ताच्या तरुण पिढीमधील लिव्हईन रिलेशन्शिप्सचे आकर्षण,डीव्होर्सच्या झपाट्याने वाढत जाणार्‍या प्रमाणाबद्दल खूप चिंता वाटते पण त्यांनी या गोष्टी अपरिहार्य म्हणून स्विकारायचे ठरवल्यासारखी त्यांची वागणूक असते.या वयोगटाच्या चिन्यांनी खूप मेहनतीने आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे.तरुण पिढीची भारतात काय परिस्थिती आहे याची उत्सुकता त्यांना वाटते.
सुजौच्या सिल्क फ़ॅक्टर्‍यांमधे फार सुरेख मशिनवर बनवलेले रेशमचे तागेच्या तागे आपल्या डोळ्यांपुढे उलगडत जाताना बघण्याचं दृष्य फार सुरेख दिसतं पण मला आवडलं ते बेजिंगच्या भेटीदरम्यान बघितलेलं रेशमाच्या किड्यांच्या पैदाशीपासून ते त्या किड्यांनी बनवलेल्या रेशमाच्या कोशाला चारी बाजूने हाताने ताणून मग त्यापासून रेशमाच्या रजया बनवण्याचं केन्द्र.ती पद्धत ग्रेटच होती. एका रजईसाठी दहा ते बारा रेशमाचे कोष ताणून ते एकमेकांवर ठेवतात आणि मग त्याची रजई बनवतात.अद्भूत एअरकंडिशन्ड अशी शुद्ध ऑरगॅनिक रजई असते ती.उन्हाळ्यात थंडगार आणि हिवाळ्यात उबदार.त्यावर सुंदर,चिनी पद्धतीचं भरतकाम केलेल्या रेशमांच्या खोळीही मिळतात.
सुजौला सिल्कचे स्टोल्स,शाली,स्कार्फ़,सिल्क कार्पेट्स खूप सुंदर आणि अती महागडे होते.पण सिल्क स्टोल्सच्य खरेदीचा मोह आवरण्याच्या भानगडीत मी अजिबातच पडले नाही.लिनबो बार्गेन करायला होताच त्यामुळे भरपूर खरेदी केली.भारतात परतल्यावर मैत्रिणींनी पहिला डल्ला मारला आणि माझी बॅग रिकामी करुन टाकली ती या स्टोल्सनीच.मऊ जेडच्या बारीक बारीक कपच्या घालून बनवलेली रजईसुद्धा इथे बघीतली.
चीनमधे अशा फ़ॅक्टर्‍यांमधून ज्यापद्धतीने डायरेक्ट मार्केटींग चालतं ते बघण्यासारखं असतं.तुमच्यासमोर संपूर्ण मॅन्युफ़ॅक्चरिंग प्रोसेस दाखवून एखादी वस्तू बनवली की साहजिकच त्या वस्तूंच्या ऑथेन्टिसिटीसाठी वेगळ्या सर्टीफिकेशनची गरजच लागत नाही.लोक मग अशा वस्तू वाटेल त्या चढ्या भावानेही घेतात. बरेचदा गरज नसतानाही घेतात.मग ती पारंपरिक चिनी औषधं असोत,सौंदर्यप्रसाधनं असोत,सिल्कच्या रजया असोत,जेडच्या महागड्या वस्तू असोत नाहीतर मोत्यांचे दागिने असोत.पर्ल फ़ॅक्टरीमधे तुम्हाला टॅन्कमधून कोणताही शिंपला उचलायला सांगतात.मग तो तुम्हीच फोडायचा आणि त्यात मोती मिळाला तर तो तुमचा.मात्र तो अंगठीत किंवा पेन्डन्टमधे सेट तिथेच करवून घ्यायचा.शिंपल्यामधे कधी कधी अनोख्या गुलाबी नाहीतर राखाडी काळ्या छटेतलेही जे मोती मिळतात ते दिसतात मात्र अत्यंत विलोभनीय.अंगठीत सेट करुन घ्यायचा मोह नाहीच आवरत.तुमच्या शिंपल्यात मोती नाही मिळाल तरी नाराज व्हायचं कारण नसतं.तिथे तयार दागिने किंवा मोतीही मिळतात.शिवाय त्या मोत्यांचं चूर्ण घातलेली तुमच्या त्वचेचं तारुण्य टिकवणारी,खुलवणारी क्रीम्सही मिळतात.
सौंदर्य,ऐषोआराम,आरोग्य,प्राचीनता,फ़ॅशन्स,आधुनिकता..प्रत्येक गोष्टींच्या फॅक्टर्‍या चीनमधे आहेत.
चीनी फ़ॅक्टर्‍यांचा कारभार किंवा एकंदरीतच चीनमधल्या औद्योगिक विभागांचा पसारा बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो हे मात्र नक्की.या फॅक्टर्‍यांचा पसारा आणि उलाढाल इतकी प्रचंड असते.
सुजौ जवळच्या टेक्स्टाईल विभागात तिथल्या सेझमधे एकेका लहान विभागात१५दशलक्ष बटणं,२००मिल्यन मिटर्सच्या झिपर्स,३ बिलियन मोज्यांच्या जोड्या असे उत्पादनांचे आकडे तिथल्या बोर्डांवर वाचल्यावर हा काय अफ़ाट पसारा असू शकतो याचा अंदाज येतो.
होंगियानजवळच्या एका दुसर्‍या औद्योगिक शहरात वू लिनची लाईफ़स्टाईल प्रॉडक्ट्सची फ़ॅक्टरी आम्ही बघायला गेलो होतो.चहा-कॉफ़ीच्या कपांपासून,टोस्टर्स,कृत्रिम,शोभेची फ़ुलं,कीचेन्सपासून घरगुती सजावटीच्या वस्तू ज्या नंतर वॉलमार्ट किंवा इकेआमधे’मेड इन चायना’लेबलांना मिरवत विराजमान होतात त्याचं उत्पादन तिथे अजस्त्र प्रमाणात होत असताना बघितलं.शब्दांमधे ते वर्णनच करता येणार नाही.
आणि मग आम्ही यीवूच्या होलसेल मार्केटलाही भेट दिली.फ़ॉरबिडन पॅलेस किंवा शिआच्या टेराकोटा आर्मीला पाहून जितकं आश्चर्य वाटलं त्यापेक्षा हजारो पटींनी जास्त आश्चर्य यिवूला आल्यावर,तिथली ती अजस्त्र उलाढाल पाहून वाटलं.यीवू इंटरनॅशनल ट्रेड सिटी म्हणजे जगातलं सर्वात मोठं होलसेल मार्केट.२.६मिलियन स्क्वे.फ़ुटांइतक्या प्रचंड विस्तारावर पन्नास हजार स्टॉल्स आहेत आणि तिथे चार लाख विविध प्रकारच्या वस्तूंची उलाढाल होते.अक्षरश:कोणत्याही प्रकारच्या वस्तू आख्ख्या चीनमधे बनून इथे येतात आणि इथून मोठमोठ्या कंटेनर्समधे त्या भरुन जगभर विक्रीकरता रवाना होतात.आफ़्रिकन आर्टचे नमुने असोत की गणपतीच्या,कृष्णाच्या झळझळीत निळ्या रंगातल्या मुर्ती सगळ्या इथे दिसतात. मोठे मेगामॉल एकापुढे एक बांधल्यासारखं हे मार्केट आहे.त्यांचे वेगवेगळे विभाग.म्हणजे एक आख्ख मॉलच.उदाहरणार्थ हार्डवेअर टूल्स आणि फ़िटिंग्जचं एक मॉल,दुसरं पतंग,फ़ुगे,हॅन्गिन्ग टॉईज वगैरेचं,तिसरं घरगुती सजावटीच्या वस्तुंच,एक भलंमोठं मॉल तर फ़क्त ख्रिसमससाठी लागणार्‍या सजावटीच्या वस्तुंचं होतं आणि तिथे सगळीकडे सॅन्टाच सॅन्टा.जगातल्या७०% ख्रिसमसच्या वस्तू इथून जातात.
यीवूला भारतीय व्यापार्‍यांची खूप गर्दी होती.आम्हाला तिथल्या कॅफ़ेटेरियामधे भेटलेल्या महेन्द्रचा मुंबईला क्रॉफ़र्ड मार्केटमधे होलसेल वस्तू पुरवण्याचा व्यवसाय आहे.त्याचं स्वतःच एक दुकानही तिथे आहे.महेन्द्रच्या यीवूला वर्षातून चार खेपा होतात.प्रत्येकवेळी तो एक कंटेनर भरुन गार्मेन्ट ऍक्सेसरीज इथून घेऊन जातो.शोभेची बटणं,लेस,वगैरे.इथल्या वस्तू त्याला तीनपट जास्त भावाने(तेही होलसेलमधला भाव म्हणून.आपण वस्तू विकत घेतो तेव्हा दहापट अधिक किंमत मोजतो)क्रॉफ़र्ड मार्केटमधे विकता येतात.महेन्द्रच्या मते इथे वस्तू स्वस्त तर मिळतात पण हेच फक्त कारण नाही.इथे एकेका वस्तूंमधे प्रचंड व्हरायटी बघायला मिळू शकते हे मुख्य आकर्षण.बटणाच्या एका पॅटर्नचे दहा हजार वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात हे महेन्द्रचं बोलणं मला एरवी ऐकताना अतिशयोक्ती असलेलं वाटू शकलं असतं पण यीवू ट्रेडींग सेन्टरला भेट दिल्यावर नाही.लुशानचं इलेक्ट्रॉनिक मार्केटही असंच अजस्त्र विस्ताराचं आहे.
-----------------------------------------------------------
शेवटचे २ दिवस राहीले आणि आता वाटायला लागलं की अजून किती गोष्टी पाहून झाल्याच नाहीयेत.अजून किती ठिकाणी पुन्हा जाऊन यावसं वाटतय.
अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या खालीच असलेल्या युबिसी कॉफ़ी हाऊसमधे बसून गेल्या अडीच महिन्यांच्या चिनी दौर्‍याचा मनातल्या मनात आढावा घेताना खूप काही बघायचं राहून गेल्याही हुरहुर मनाला वाटतेय.
युबिसी कॉफ़ी हाऊसमधल्या हसर्‍या चीनी वेट्रेसेस माझ्या आता खूप ओळखीच्या झाल्या आहेत.
तिथे पिआनो वाजवणारी मुलगीही मी आले की आता लगेच भारतीय सुरावट छेडते.भारतीय सुरावट म्हणजे तिच्यामते करण जोहरच्या फिल्ममधली गाणी.पण मला चालतं.
मला नव्या नव्या व्हेज डिशेस सुचवायलाही तिथल्या मुलींना खूप आवडतं.तीळ लावलेले बनाना फ़्राय,व्हेज बार्बेक्यू स्टिक्स,फ़्रूट सॅन्डविच,व्हेज टोफ़ू स्टरफ़्राय आणि अप्रतिम चवीचा,अत्यंत देखणा दिसणारा काचेच्या मोठ्या किटलीतला फ़्रूट टी.त्यात मोसंबी,अननस,सफ़रचंद,किवी वगैरे फ़ळांचे तुकडे,मोगरा आणि इतर सुकवलेली फ़ुलं ठेवून वर लागेल तसं गरम पाणी ओतल्यावर तयार होणारं ते सुगंधी,केशरी रसायन चिमुकल्या देखण्या कपांतून थोडं थोडं पिताना स्वर्गीय चवीचा अनुभव येतो.
मी युबिसीमधे येऊन बसले आणि बाहेर पाऊस सुरु झाला.आपलं नाव स्टेला सांगणार्‍या गोड चिनी मुलीने एका मोठ्या बोलमधे गरम वाफ़ाळलेला पातळसर भात,त्यात मश्रूम्स,चायनीज कॅबेज,नूडल्स,ऍस्पेरेगस घालून समोर आणून ठेवला.बाजूला व्हेज सलाडची बशी.पिआनोवरच्या मुलीने उठून माझ्या शेजारी मासिकांचा गठ्ठा आणून ठेवला.मला त्या चिनी लिपीतल्या फ़ॅशन्स मॅगेझिन्सचा खरं तर काहीच उपयोग नाही पण मला तिचं मन मोडवत नाही.
मी काचेतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघते.पावसांच्या सरींच्या पलीकडे समोरच्या फ़ुटपाथवरच्या दुकानांवरची मधूनच चमकून उठणारी लाल,सोनेरी देखणी चिनी अक्षरं मला नेहमीच बघायला आवडतात.त्यांचा अर्थ काय हे कळण्याची सुतराम शक्यता मला नाही.पण त्यांचं देखणं वळण मी पुन्हा पुन्हा पहात रहाते.ती पहाताना मला फ़ॉरबिडन सिटीमधली निळी,सोनेरी रंगसंगती आठवते आहे,बेजिंगच्या देखण्या प्राचीन हुटॉन्ग्ज आठवताहेत,तिथले गुलाबांचे वेल,मोगर्‍याच्या आणि क्रिसेन्थेममच्या कळ्यांचा तिथल्या सिहुयानमधे प्यायलेला चहा आणि त्या चहाचे चिमुकले निळे कप आठवताहेत,पोर्सेलिनची भांडी, देखणी नाजूक चिनी कटलरी आठवते आहे,टेराकोटाच्या सैनिकांच्या चेहर्‍यावरचे भाव आठवताहेत,श्यूच्या घरच्या पीचचा जाम आणि तिच्या आईच्या हातच्या भाज्या आठवत आहेत,बेजिंगचा फूटमसाज आठवतो आहे,बेजिंग वॉलवर जाताना रोपवेचा आलेला खतरनाक अनुभव आठवतो आहे,चहाचे अजस्त्र वृक्ष,गाठाळलेल्या खोडांचा स्पर्श आठवतो आहे,यॉंगनिंग पार्कातली रंगित,नाचरी फ़ुलपाखरं,हांगझोचं विलोंच्या जाळ्यांतून दिसणारं तलावाचं पाचूसारखं चमकतं पाणी,मुटियान व्हिलेजमधला सुकवलेल्या फ़ळांचा बाजार,दाट झाडांनी व्यापलेले रस्ते,शांघायच्या स्कायस्क्रॅपर्स,यीवूची बाजारपेठ,फ़ुजियानमधला कोसळता पाऊस,बेजिंगमधले चिनी उत्साही मित्र,तिथलं बुकमॉल..
बाहेरचा पाऊस थांबला.मला घरी जाऊन पॅकिंग आवरतं घ्यायलाच हवं आहे.युबिसी कॉफ़ी शॉपमधल्या त्या सर्व हसर्‍या चिनी मुलींचा आणि माझी राहीलेली छत्री परत करायला मागून धावत येणार्‍या प्रामाणिक चिनी मॅनेजरचा एक प्रातिनिधीक निरोप घेऊन मी बाहेर पडते.
जाताना मी त्यांना सांगते की येईन परत पुन्हा.अजून बरंच बघायचं राहीलय माझं.

4 comments:

Gouri said...

मस्त चीनची सफर झाली तुमच्या पोस्टमधून!

शर्मिला said...

Thanks Gauri!

Samved said...

झकास...

A said...

Your blog posts are always good, but the China posts have been exceptional...It's a delight to read them...