अजरामर पन्नास चित्रं, जी प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहिली, त्यांचा अल्बम पहात असताना देदिप्यमान, विलक्षण प्रतिभेची चुणूक प्रत्येक रेषेवर, रंगाच्या प्रत्येक फटका-यावर दिमाखानं मिरवणा-या मायकेल ऍन्जेलो, लिओनार्दोच्या भव्य चित्रांना मागे टाकून अचानक व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आर्ल्समधल्या बेडरुमचं साधसुधं चित्रं समोर येतं.
व्हॅन गॉघच्या सुप्रसिद्ध सूर्यफ़ुलांना, सोनेरी गव्हाच्या शेतांना, एकाकी पायवाटेवरच्या सायप्रस वृक्षांना मागे टाकून ही वर वर सामान्य दिसणारी खोली पुढे येते.
असं काय आहे या पिवळ्या रंगानी रंगवलेल्या खोलीत की जगभरातल्या लोकांना पुन्हा पुन्हा ही खोली न्याहाळाविशी वाटावी?
’द यलो रुम’ अत्यंत साधी आहे, कुणाची तरी वाट पहाणारी, तयारीत सज्ज असलेली ही खोली, सोबतीची अपेक्षा करणारी. दोन खुर्च्या, दोन उशा.. बंद खिडकी, विरुद्ध रंगांचे, जाडसर रंगवलेले ठळक पॅचेस, काहीसं विचित्र वाटणारं पर्स्पेक्टीव्ह कारण मागच्या भिंतीचा कोन जरासा तिरपा.
फ़्रान्सच्या दक्षिणेच्या आर्ल्स या खडकाळ, वैराण प्रदेशात चित्र काढण्याकरता व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ येऊन राहीला त्यावेळी तो यलो हाऊसमधे रहात होता. तो आर्ल्समधे होता त्यापैकी नऊ महिने त्याचा मित्र, जो स्वत: प्रतिभावंत चित्रकार होता, तो पॉल गोगॅं त्याच्या सोबत होता.
अस्वस्थ मनोवृत्तीचा, अशक्त कुडीचा व्हिन्सेन्ट आणि कणखर स्वभावाचा, बलदंड गोगॅं, त्यांची व्यक्तिमत्वे, स्वभाव वेगळे. मैत्री, आपुलकी, स्पर्धा, असूया यांचं एक विलक्षण स्फोटक रसायन त्या दोघांत होतं.
गोगॅंने आर्ल्सला यावं, यलो हाऊसमधे रहावं, दोघांनी उघड्या निसर्गात लांबवर भटकत जाऊन चित्रं रंगवावी, एकमेकांच्या सोबतीने रहावं याचा गॉघने आर्ल्समधे आल्यापासूनच ध्यास घेतला होता. गोगॅंला इकडे येण्याबद्दल आग्रह करणारी पत्रे तो आपला भाऊ, थिओला वारंवार पाठवत होता. गोगॅं अखेर यायला तयार झाला. त्याचं आगमनाची विलक्षण उत्कंठतेनं वाट पहाणा-या व्हिन्सेन्टच्या मनावर आता त्याच्या स्वभावानुसार तणाव आला. गोगॅंला आर्ल्स आवडेल का? त्याचा अपेक्षाभंग तर होणार नाही इकडे आल्यावर? हा वैराण प्रदेश पाहून तो चिडणार, वैतागणार तर नाही?
या अस्वस्थतेला मागे सारत त्याने यलो हाऊसमधली खोली सुसज्ज करायला सुरुवात केली. मनावरचा ताण कमी करायला त्याला काही वेगळे व्यवधान हवेच होते.
खोली सजवण्याकरता व्हिन्सेन्टने मनापासून कष्ट केले. ही खोली कलाकारांची वाटावी, त्यातल्या फ़र्निचरपासून भिंतीवर टांगलेल्या चित्रांपर्यंत प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असावे, खोलीत मनाला निवांतपणा मिळावा असं त्याला वाटत होतं. फ़िकट व्हायोलेट रंगाच्या भिंती, लालसर तपकिरी जमीन, ताज्या लोण्याच्या पिवळसर रंग असलेल्या लाकडाचे पलंग आणि खुर्च्या, पलंगावरची चादर आणि उशांचे अभ्रे लिंबाच्या पिवळसर हिरव्या रंगाचे, गडद लाल पांघरुण, हिरव्या खिडक्या, जांभळा दरवाजा. खोलीत फर्निचर फ़ार नाही. सदैव आर्थिक चणचण असणा-या व्हिन्सेन्टकडे खोलीत भपकेबाज फ़र्निचर आणण्याइतके पैसे अर्थातच नव्हते. लाकडी पलंग, दोन खुर्च्या, कपडे टांगायला स्टॅन्ड, लाकडी ड्रेसिंग टेबल, केस विंचरायला ब्रश, दाढीचे सामान, आरसा.. इतकंच. पण झळाळत्या रंगांनी ती भरुन गेली आहे. खोलीचं ऐश्वर्य आहे भिंतीवर टांगलेली व्हिन्सेन्टने स्वत: रंगवलेली चित्रं. त्यात त्याचं स्वत:चं व्यक्तिचित्र आहे आणि त्याची लाडकी सूर्यफ़ुलंही आहेत.
व्हिन्सेन्टच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी गोगॅ आर्ल्सच्या वास्तव्याबद्दल लिहिताना या चित्रांबद्दल लिहितो- "माझ्या पिवळ्या खोलीत, जांभळ्या डोळ्यांची सूर्यफ़ूलं, पिवळ्या पार्श्वभूमीवर झळाळत असायची, त्यांचे देठ पिवळ्या टेबलावरच्या, पिवळ्या फ़ुलदाणीत बुडालेले. चित्राच्या कोप-यात चित्रकाराची सही होती: व्हिन्सेन्ट. खोलीतल्या पिवळ्या पडद्याआडून सोनेरी सूर्यप्रकाश जेव्हा या फ़ुलांवर पडायचा तेव्हा संपूर्ण खोली सोन्यासारख्या झळझळीत स्फ़ुरदिप्तीने भरुन जायची; रोज सकाळी माझ्या पलंगावरुन उठताना मनात विचार यायचा, फ़ार सुंदर वास असणार या फ़ुलांना."
आर्ल्समधल्या यलो हाऊसमधल्या या खोलीत व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आयुष्यातला सर्वात वादळी, अस्वस्थ, वेदनादायी आणि सर्वात सर्जकही असा कालखंड कोंडलेला आहे. इथल्या वास्तव्यातच व्हिन्सेन्टने आपल्या मित्रावर, पॉल गोगॅंवर प्राणघातक हल्ला केला, नंतर आलेल्या मानसिक तणावाच्या झटक्यात स्वत:चा कान वस्त-याने कापला. वाहत्या रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहीला. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या एकाकी, वेदनामय आयुष्याच्या सगळ्या जखमा या खोलीत उघड्या पडल्या.
दोन सर्वस्वी भिन्न व्यक्तिमत्वाचे चित्रकार, दोघांनी काही काळ एकत्र राहून भरपूर चित्रं काढली, कल्पनांची देवाणघेवाण केली, त्यांच्यात वाद झाले, काही हिंसक पातळीवर पोचले. या सर्व दिवसांचे पोत, कधी मुलायम, कधी ठाशीव, अनेकदा खडबडीत असे या चित्राला आहेत. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघचं हे सिन्ग्युलर बायोग्राफ़िकल वर्क. त्याच्या आयुष्यासारखंच नाट्यपूर्ण, एकाकी आणि झळझळीत, प्रतिभावंतही.
आर्ल्समधल्या द यलो हाऊसची कहाणी जाणून घेतल्यावर साध्यासुध्या, कुणाची तरी वाट पहात असणा-या या पिवळ्या खोलीला विलक्षण करुण संदर्भ प्राप्त होतात. ‘एव्हरी आर्ट इज बायोग्राफ़िकल’ हे फ़ेलिनीचे वाक्य ’बेडरुम इन आर्ल्स’च्या बाबतीत आत्यंतिक खरे वाटते.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने चितारलेले गव्हाच्या शेतावरचे, आरती प्रभूंच्या काळ्या पक्ष्यांच्या तिरप्या भरारीची आठवण जागवणारे कावळे, रस्त्यावरचा एकाकी सायप्रस पहाताना कोणत्याही संदर्भांवाचूनही मनाला खिन्नता, उदासी येतेच पण जेव्हा संदर्भ कळतात तेव्हा मन जखमी होते. आपल्या भावनांची तीव्रता शतपटींने वाढते. मग त्याच्या अस्थिर, जलद रंगांच्या फ़टका-यांचे, पिवळ्या रंगाच्या अतिरिक्त वापराचे मूळ त्याच्या औदासिन्यात असू शकेल हे जाणवते.
कलाकृतीचा आस्वाद कलाकाराच्या कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय संदर्भांशिवाय स्वतंत्रपणे घेता यायला हवा हा काही समीक्षकांचा आग्रह असतो. पण जर चित्रकाराच्या वेदनेचे, जीवनसंघर्षाचे अवशेष त्या चित्राला चिकटून राहिलेले असले तर तेही जाणून घेणे चित्रांच्या बाबतीत आवश्यकच ठरते. तसं केलं नाही तर आर्टिस्ट्स इन्टेन्शनला ते नाकारणे ठरते आणि मग त्या चित्रकृतीवरही तो अन्याय ठरतो. माहीत असलेल्या, माहीत करुन घेतलेल्या जीवनसंदर्भांच्या खूणा चित्रांमधे शोधणे अपरिहार्य ठरते.