Monday, March 05, 2012

ओफेलिया

"It is not the language of painters but the language of nature which one should listen to.... The feeling for the things themselves, for reality, is more important than the feeling for pictures."- Vincenr Van Goghजॉन एव्हरेट मिलेस या ब्रिटिश चित्रकाराने १८५१-५२ साली काढलेलं हे पेंटींग ओफेलिया. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ना या चित्रकाराची काही माहिती होती, ना ओफेलिया नावाच्या पार्श्वभूमीची. इंग्रजी क्लासिकल साहित्याशी फारसा संबंध नव्हता.
मात्र ओफेलियाचं पेंटींग पहाताना मनाला एक विलक्षण अस्वस्थता आली होती. रंगांचं एक अद्भूत, देखणं रसायन चित्रात होतं, त्याशिवाय अजूनही काही होतं.
पाण्याकाठच्या गर्द झाडो-याचा एक हिरवा घुमटाकार आणि त्यात साचलेला निस्तब्ध, निश्चल कोंडलेपणा. दाट, हिरव्या झाडा-फ़ुलांचं त्यातलं अस्त्तित्व एरवीसारखं मनाला सुखद, प्रसन्न अनुभव देत नव्हतं, कारण खालच्या शेवाळलेल्या हिरव्या पाण्यात ती होती. अर्धवट बुडालेली, तरंगती ओफेलिया. दोन्ही बाजूला पसरलेले तिचे हात, अर्धमिटली वर पहाणारी दृष्टी, उघडे ओठ, आणि चेह-यावरचे गोठून राहीलेले तणावग्रस्त भाव, पायातळी पाण्याने भरुन वर उचलल्या गेलेल्या पोशाखाची स्थिरावलेली वर्तुळं.. आणि सर्वात थरारुन टाकत होती तिच्या स्तब्ध शरिराला लगटून तरंगणारी फ़ुलं, काठावरुन तिच्या दिशेने खाली झेपावणारी फ़ुलं.. ओफेलिया आता जिवंत नाही हे कोणी सांगण्याची गरजच नव्हती.
काही वर्षांपूर्वी कुवेशीच्या जंगलातला एक ट्रेक केला होता. दांडेलीचं अभयारण्य पार करुन कॅसलरॉककडे जाताना एक घनगर्द डोह अचानक समोर आला. नदीचं पाणी काठावरच्या दाट, हिरव्या झाडो-याच्या गचपणातून वाहता, वाहता मधेच एका ठिकाणी खोल थबकून राहीलं होतं. काठावर वेलींची आणि झाडांच्या मुळांची इतकी दाट गुंतागुंत की नजर चुकली तर पाय अडकून थेट त्या डोहातच पडायला होईल. वर्षारण्यातला एरवी असणारा उष्ण, दमटपणा तिथे होताच आजूबाजूला आणि डोहात मात्र काळसर, थंड हिरवा गारवा. आतल्या खोल पाण्याकडे वरुन क्षणभरच वाकून बघताना मनावर एक अस्वस्थ दडपण आलं होतं, किती सोपं आहे इथे खोल बुडून जाणं. न जाणो, काय तरंगताना दिसेल त्या पाण्यावर...
ओफेलियाच्या त्या पेंटींगमधे मला ते सगळं दिसलं जे त्या डोहात दिसू नये असं वाटलं होतं.
मृत्यूच्या थंड निश्चलतेचं जे अस्त्तित्व ओफेलियाच्या पेंटींगमधल्या देखण्या, बंदिस्त अवकाशात काजळी धरुन होते, ते आता शांत नव्हते. काहीतरी अस्वस्थ, खळबळलेपण त्या शेवाळलेल्या पाण्यातून, तरंगत्या फ़ुलांतून, दाट हिरव्या झाडांतून उसळी मारुन वर येत होते. अजून तरंगत असणारी, आता काही क्षणांतच पाण्यात बुडून नाहिशी होऊ पहाणारी ओफेलिया तिची गोष्ट सांगू पहात होती.
शेक्सपियरच्या हॅम्लेट या सुप्रसिद्ध नाटकातली ही ओफेलिया. वडिल, भाऊ, प्रियकर या तिच्या आयुष्यातल्या तिन्ही पुरुषांकडून धिक्कारली गेलेली, प्रतारणा, नाकारलेपण, फ़सवणूक पदरात पडलेली, वडिलांच्या हातून झालेला हॅमेल्टचा, स्वत:च्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सैरभैर झालेली, रोमॅन्टिक वेदनेचे प्रतिक ओफेलिया. आपल्या भ्रमिष्टपणात नदीच्या काठावर फुले गोळा करत, गाणं गुणगुणत असताना झाडाची फांदी तुटते आणि ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावरही ती जीव वाचवायचा कोणताही प्रयत्न करत नाही, कदाचित तिची तशी इच्छाही नसावी, किंवा धोक्याची पुरेशी जाणीवच तिच्या सैरभैर मनाला नसावी. ती गाण गात रहाते. तिच्या घोळदार झग्यात हवा भरते त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ ती पृष्ठभागावर तरंगते पण मग पाण्याने कपडे भिजतात, जड होतात आणि तिला पाण्याच्या आत खेचून नेतात. शेवाळलेल्या पाण्यात ती शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन होते.
ओफेलियाचा मृत्यू साहित्य जगतातला सर्वात काव्यात्म, सुंदर मृत्यू समजला जातो. हॅम्लेट नाटकाच्या प्रयोगात तो प्रत्यक्ष घडताना दाखवलेला नाही. क्वीन गरट्रूड नंतर एका गाण्यातून ओफेलियाच्या मृत्यूचे वर्णन करते. साहजिकच कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव. त्यामुळेच त्या काळातल्या व्हिक्टोरियन पेंटर्सपासून आजतागायत अनेकांनी ओफेलियाचा मृत्यू कॅनव्हासवर चितारला.
जेमतेम २२/२३ वर्षांचं वय असलेल्या तरुण मिलेसलाही कोवळ्या, उमलत्या वयातल्या ओफेलियाचं जीवनाकडून नाकारलं जाणं आणि त्यातून तिने शांतपणे, गाणं गात, निसर्गरम्य नदीच्या पात्रात मृत्यूच्या स्वाधीन स्वत:ला करणं चटका लावून गेलं. ओफेलियाला कॅनव्हासवर उतरवण्याचा त्याने ध्यास घेतला. मिलेस हा प्रतिभावान, तांत्रिकदृष्ट्या हुषार चित्रकार. प्रीराफ़ेलाईट ब्रदरहूड या ग्रूपची स्थापना केलेल्या तिघा सदस्यांपैकी तो एक (उरलेले दोघे- डांटे गॅब्रिएल रोझेटी आणि विल्यम हॉलमन हंट).
१८५१ च्या उन्हाळ्यात मिलेसने या पेंटींगवर काम करायला सुरुवात केली. यातले लॅन्डस्केप त्याने आधी रंगवायला घेतले. योग्य लोकेशन मिळवण्याकरता तो भरपूर हिंडला. सरे परगण्यात किंगस्टन अपॉन थेम्स जवळच्या एवेल नदीकाठी त्याला हवी तशी दाट वनस्पतींनी वेढलेली जागा सापडली. डोक्यावर जेमतेम सावली देणारी छत्री उभारुन मिलेसने तासनतास एका जागी उभे राहून नदीकाठची झाडे, फ़ुले बारकाईने, कौशल्याने रंगवली. कित्येकदा सलग अकरा तास तो उभा असे. उन्हाळ्याचे दिवस. डोक्यावर रणरणतं उन आणि नदीकाठचा सोसाट्याचा वारा. मिलेस त्याच्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात लिहितो की, "इतका भणाणता वारा. मी कॅनव्हाससकट उडून पाण्यात जाऊन पडीन आणि मला ओफेलियाच्या वेदनांशी समरस होण्याचा अनुभव घेता येईल." अर्थातच तसं झालं नाही. मिलेस पाच महिने पेंटींग करत राहीला. एवेलच्या नदीकिना-यावरच्या रानफ़ुलांपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण फ़ुलेच त्याने निवडली ज्याला काही सांकेतिक अर्थ आहेत. ओफेलियाच्या उजव्या हाताजवळून वहाणारी डेझी- तिच्या निष्पापपणाचं प्रतिक, लाल गुलाब- तारुण्य, प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिक, गळ्याजवळचे व्हायोलेट्स- गुंतणं, अडकणं, गुदमरुन मृत्यूचं सूचन करणारे, तिच्यावर झुकलेले विपिंग विलोज- हरवलेल्या प्रेमाचं प्रतिक, नेटल्सची फ़ुले- वेदनांचं प्रतिक, क्रो-फ़्लॉवर्स- कृतघ्नतेचं प्रतिक, लाल गर्द, मधे काळ्या बिय असलेली पॉपीची फ़ुले- काळझोपेचे प्रतिक. इत्यादी. निसर्गाचे इतके प्रतिकात्मक आणि अचून चित्रण मिलेसने केले ते केवळ अद्वितिय.
त्यानंतरच्या हिवाळ्यात लंडनमधे मिलेसने प्रत्यक्ष ओफेलिया रंगवली. एलिझाबेथ सिडाल नावाची १९ वर्षांची मॉडेल त्याला मिळाली. ओफेलियाला शोभून दिसेल असा ऍंन्टिक गाऊन त्याने चार पौंडांना आणला आणि मग आपल्या लहानशा जागेतला बाथ पाण्याने भरुन त्याने एलिझाबेथला त्यात झोपवले. लंडनचा कडाक्याचा हिवाळा. एलिझाबेथला पाण्याचा थंडपणा झेपेना. तेव्हा त्या बाथखाली त्याने मेणबत्या, काही तेलाचे दिवे लावले. आणि मग मिलेस त्याच्या सवयीप्रमाणे चित्र रंगवण्यात गढून गेला. ते मिणमिणते दिवे केव्हाच विझून गेले. हे मग रोजचंच झालं. एलिझाबेथ तशीच गारठलेल्या अवस्थेत तासनतास झोपून रहायची. मिलेसला चित्र पूर्ण करायला चार महिने लागले. चित्र पूर्ण झालं खरं पण एलिझाबेथ न्यूमोनियाने आजारी पडली. त्यात तिचा मृत्यू झाल्याची अफवा नंतरच्या काळात पसरली पण त्यात तथ्य नव्हते. एलिझाबेथने मिलेसचा सहकारी रोझेटीसोबत लग्न केले. एलिझाबेथच्या वडिलांनी तिच्या उपचारार्थ पन्नास पौंडाची रक्कम मात्र मिलेसकडून वसूल केली.
मिलेसचं सर्वात प्रसिद्ध आणि कौतुकास पात्र ठरलेलं हे चित्र. ओफेलियाचा निष्पापणा, भ्रमिष्टता, बुडून मरण्यातली भीषणता, आणि आजूबाजूच्या निसर्गातला देखणेपणा हे त्याने इतक्या अचूकतेनं दाखवलं की आजही ते त्याबाबतीत एकमेवद्वितीय ठरतं.
१८५२ साली रॉयल ऍकेडेमीच्या प्रदर्शनात पहिल्यांदा हे चित्र प्रदर्शित झालं तेव्हा प्रेक्षकांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया व्यक्त करायचंच नाकारलं. साहजिकच आहे. मृत्यूचा हा देखणा, भीषण आणि निश्चल आविष्कार त्यांनी इतक्या जिवंतपणाने आधी कधीच पाहिलेला नव्हता. तो स्वीकारणे त्यांच्या दृष्टीने फार कठीण होते. मात्र आर्ट जर्नल्समधून समीक्षकांनी मिलेसने घेतलेल्या कष्टांची आवर्जून दखल घेतली.
चित्रं तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला उलट स्वत:शी बोलायला लावतात.
ओफेलिया हे त्यापैकी महत्वाचे चित्र.
आपल्यासमोर चित्र असतं. चित्राचा प्रकाश, रंग, पोत सगळं सुंदर..पण चित्र पाहून झाल्यावर मनात रेंगाळत रहात ते यापैकी काही नसतं. मनावर चित्राचा जो ठसा उमटलेला असतो, त्याला या तांत्रिक बाबींशी काहीच देणंघेणं नसतं. झाडांची पानं, फ़ुले किती सुंदर, हुबेहूब रंगवली आहेत याच्याशीही नसतं. ओफेलियामधे हे सगळं आहे आणि याव्यतिरिक्तही अजून एक स्ट्रॉन्ग एलेमेन्ट आहे. जो आपल्याला अस्वस्थ करतो. चित्र त्याकरताच आपल्याशी संवाद साधायला धडपडत रहातं. बुडणा-या तरुणीची गोष्ट सांगू पहातं, ती गोष्ट काय असेल ते आजूबाजूच्या निसर्गातून सुचवू पहातं.
चित्रभाषा ऐकायची, समजून घ्यायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय याचा नेमका धडा मिलेसच्या ओफेलियातून मिळतो.
चित्र जे सांगू पहातय ते नीट ऐकायचं.
कळलं नाही तर प्रश्न विचारायचे. स्वत:ला आणि चित्रालाही.
मित्र बोलत नसला तर काय करतो आपण?
कविता समजली नाही तर काय करतो?
तेच करायचं.
पुन्हा पुन्हा वाचायची. मुक्कामापर्यंत पोहोचवणा-या सगळ्या वाटा, शक्यता धुंडाळायच्या.
चित्रकाराकडे त्याला जे सांगायचे आहे त्याकरता रंग-रेषा-आकार असतात. चित्र ही त्याची संहिता. त्याला काही संदर्भ असतात. त्यातला बंध जाणून घ्यायचा.
ओफेलियाचं चित्रं पहिल्यांदा पाहीलं तेव्हाची माझी पहिली प्रतिक्रिया मला आजही जशीच्या तशी आठवते. तेव्हा मला चित्रकाराबद्दल, ओफेलिया नावाबद्दल काहीही ठाऊक नव्हते. आज जेव्हा बुडणा-या ओफेलियाला पुन्हा पाहीलं तेव्हा तिची गोष्ट मला माहीत होती. चित्रकाराबद्दलही माहीत होतं. तरीही माझी प्रतिक्रिया पहिल्यांदा चित्र पहाताना होती तशीच झाली. चित्राच्या देखणेपणापेक्षाही त्यातल्या अस्वस्थतेनं भारुन टाकणारी.
==============================================================
शर्मिला फडके
ओफेलियाची असंख्य पेंटींग्ज आजतागायत रंगवली जात आहेत. मिलेसचं हे पेंटींग आता लंडनच्या टेट गॅलरीत आहे आणि त्याची अंदाजे किंमत ३० मिलियन डॉलर्स आहे.

3 comments:

दिप्ती जोशी said...

khup sundar mahitipurna lekh, aavadla

Samved said...

Bhishan Sundar! It was very interesting and new to me.

स्वाती आंबोळे said...

kaay sundar lihilays!
aaNi painting hee.. haunting aahe!
khoop khoop dhanyavaad! :)