Monday, April 16, 2012

हमारी अमृता


उन्हाळा लखलखायला लागला की मला अमृता शेरगिलची चित्रं आठवतात.
एका एप्रिलमधे दिल्लीच्या एनजीएमएमधे मी तिची चित्रे पाहिली होती. त्यामुळेही असेल कदाचित.
वसंत ऋतूत फ़ुलणार्‍या अमलताश आणि पलाशांचे उष्ण उन्हाळी रंग मिरवणारे अमृता शेरगिलचे कॅनव्हास.
उबदार ज्वालाफ़ुलांच्या लाल-केशरी, हळद पिवळ्या आणि अम्लान हिरव्या छटांमधे लपेटलेल्या स्त्रियांच्या समुहानी भरलेले ते कॅनव्हास.


कधी त्यात तीन मुली, कधी दोन. झुल्यावर बसणार्‍या, सहेलीच्या लग्नात तिचा साजशृंगार करणार्‍या, काही लाल व्हरांड्यात फ़ुलकारीची चादर अंथरुन गप्पा करणार्‍या, कधी एकटी- बाजल्यावर विश्रांती घेत पहुडलेली, केशरी पडद्याआड संकोचाने नहाणारी, काही नोकराण्या, एखादी नवी नवरी, किंवा चारपाईवर पसरलेली एखादी नखशिखांत जर्द गुलाबी.. पांढर्‍या मशिदीच्या भिंतीपल्याडच्या अंगणात प्राचीन कहाण्या सांगणार्‍या फ़किराभोवती कोंडाळं केलेल्या.. बायका मुली. म्लान आणि अबोल.
पॅरिसमधे चित्रकलेचं शिक्षण संपवून भारतात परतलेली अमृता चित्रं काढण्याकरता जिथे राहिली त्या सिमला आणि सरायामधल्या, किंवा आजूबाजूच्या पहाडी गावांमधल्या, खास भारतीय काळ्यासावळ्या वर्णाच्या, अंगावरच्या कपड्यांमधील झळाळत्या रंगछटांच्या आड आपल्या चेहर्‍यावरची उदासी, अस्वस्थ मौन दडवू पहाणार्‍या स्त्रिया आणि मुली. दबलेली लैंगिकता आणि एक अनामिक घुसमट त्या गडद रंगसंगतीच्या थरांआड कुठेतरी. समवयस्कांसोबत असतानाही आपापल्या वाट्याचं दु:ख एकेकट्यानी, मुकाट भोगणार्‍या
स्त्रिया. कोणीही हसत नाहीत, एकही उत्फ़ुल्ल नाही. चेहर्‍यावरचे भाव चित्रविषयांना आणि रंगसंगतीला विपरीत.
अमृताच्या चित्रांमधला हा विरोधाभास तिच्या व्यक्तिमत्वातूनच आला होता का? संपूर्ण पाश्चात्य, अत्याधुनिक व्यक्तिमत्वाच्या अमृताच्या धमन्यांमधून भारतीय रक्त वहात होते, पॅरिसला चित्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमृताने चित्र काढली भारतातल्या लोकांची, गोगॅं आणि सेझांच्या चित्रशैलीचा प्रभाव असणार्‍या अमृताला मोहात पाडले अजिंठा-वेरुळच्या शिल्पांनी आणि भित्तीचित्रांनी.
युरोप सेझां आणि मातिझचा असेल, पण भारत माझ्या एकटीचा आहे असं उन्मत्त वाटू शकणारं, ठाशीव आत्मविश्वासू विधान करणारी अमृता शेरगिल. आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासातले पहिले प्रकरण स्वत:च्या नावाचे करुन तिने आपले हे उदगार सार्थही केले.
अमृताला सामान्य भारतीय स्त्रियांची दैवाधीन विवशतेची आंतरिक सहसंवेदना जाणवली होती. ही जाण चित्रांमधून दाखवणारी, सर्वार्थाने आधुनिक, वैविध्यपूर्ण, प्रयोगशील चित्रकार.
शिमला आर्ट ऍकेडमीने उत्कृष्ट स्त्री-चित्रकार म्हणून केलेला गौरव मी चित्रकार आहे त्याचा गौरव करा. स्त्री म्हणून नको. असं सांगून नाकारणारी अमृता.
अल्पायुषी, वयाची तीन दशकंही न ओलांडू शकलेले, पण आत्यंतिक जिनियस असे काही कलाकार मनाच्या एक उदास कोप-यात कायमच अस्वस्थ हुरहूर जागवत ठाण मांडून बसून राहीलेले आहेत. त्यात मधुबाला, स्मिता पाटील, मेरिलिन मन्रो असते आणि व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ सोबत अमृता शेरगिल असते. अवघं अठ्ठावीस वर्ष आयुष्य लाभलेली अमृता जीवन जगली ते मात्र भरभरून, पॅशनेट, सर्व रंगांना आसुसलेपणाने स्वत:त शोषून घेत, निर्भिड, स्वच्छंदी.. म्हणूनच वादळी आणि वादग्रस्तही. गोगॅंच्या नुसत्या चित्रशैलीचाच नाही, त्याच्या बेदरकारपणे आयुष्य जगण्याच्या वृत्तीचाही तिला मोह होता बहुधा.
कसली अनामिक वेदना, उदास दु:ख तिच्या अंतर्यामी होतं, तिच्या वरवरच्या बेछूट, बेदरकार स्वभावामागे कोणता एकाकीपणा दडलेला होता जो तिच्या चित्रांमधल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांमधून उमटला? तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधले रंग हळवे आहेत, तरुण कोवळ्या वयातली उदास दु:ख त्यात प्रतिबिंबीत होतात. झुकलेले चेहरे, गहिर्‍या अनामिक दु:खाने भरलेले डोळे.
थ्री गर्ल्समधील गोलसर, तारुण्याचा गोडवा असलेले चेहरे, अंगावरच्या गडद रंगाच्या पोशाखांचा घोळदारपणा, त्यातून जाणवणारे मोहक सौष्ठव आणि भविष्यातील अनिश्चितता, वैवाहिक आयुष्य सुरु करण्याच्या आधीची हुंड्याची, न बघीतलेल्या नवर्‍याची, अनोळखी सासरची चिंता चेहर्‍यावर स्पष्ट उमटलेली.
झुल्यावर बसलेल्या तरुण मुलीच्या पायाचा तळवा अलगद जमिनीवर टेकलेला, दोन्ही हातांनी झुल्याच्या दोर्‍या हातात पकडलेल्या, पोशाखांचे आनंदी, सेन्शुअस रंग, चेहर्‍याचा नाजूकपणा, आता झुला हवेत उंच जाणार अशी अपेक्षा वातावरणात भरुन राहिली आहे, पण एरवी अशा चित्रांमधे मुलींच्या चेहर्‍यावर उतू जाणारा उत्फ़ुल्ल आनंद असतो, खट्याळ हास्य असतं ते मात्र कुठेही नाही. वयानुरुप उत्सुक, अधिर्‍या हालचालींना कोणते दडपण थोपवून धरत आहे?
झुल्यावर झुलण्याच्या आनंदापेक्षाही तीव्र आहे बांधलेपणाचे सूचन.. बाजूलाच पडलेल्या, घरात वापरायच्या लाकडी खडावांमधून व्यक्त होते.
टेकवलेल्या पायाच्या तळव्याची काव्यात्मकता, उच्च भावनीक तीव्रतेचं सूचन त्यानंतर असंच व्यक्त झाल रेंच्या चारुलतामधून.
नवधूचा शृंगार करणार्‍या मैत्रीणींचे समुह चित्र मोहक रंगसंगतीचे. चित्ररचनेमधे आनंद भरुन आहे. स्त्रियांच्या चेहर्‍यावर अनामिक गहिरे भाव आहेत, त्यातल्या गौरवर्णीय नववधूच्या शृंगारसोहळ्यातील सारे रंग, गंध उमलून येत आहेत असं वाटतं. वधूच्या समोर बसलेल्या गडद, रंगीबेरंगी चोळी घातलेल्या युवतीच्या स्निग्ध चेहर्‍यावर परिपक्व, विचारमग्न भाव.
चित्राची पिवळसर हिरवी पार्श्वभूमी, बैंगणी, गुलाबी, हिरव्या अशा शुभ रंगांचा सुखद सोहळा, त्यातून उठून दिसणारा शुभ्र वर्ण, आजूबाजूच्या अविवाहित सख्या, त्यांचे सावळे वर्ण विरोधाभासाकरता, कदाचित जात-आर्थिक उच्चनीचतेचा भेदही असेल, पण या सर्वांमधून एक स्नेहमय प्रवाह वाहतो आहे.
अमृता शेरगिलची सगळीच चित्रं म्हणजे काही अद्वितीय मास्टरपीसेस नाहीत, तिच्या चित्रांना लाभलेलं यश हे तिच्या स्वत:च्या दृष्टीने अनेकदा अपयशही होतं. पण ती सातत्याने नवे प्रयोग करु पहात होती, पाश्चात्य प्रभावातून मुक्त होत स्वत:ची शैली शोधू पहात होती, स्वत:ला त्या चित्रांमधून शोधत होती, कधी अपयशाने खंतावत होती, कठोरपणे आत्मपरिक्षण करत होती.
भारतात आल्यावर तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधे न्यूड्स, पोर्ट्रेट्स, निसर्गचित्रे, स्टील लाइफ़ वगैरे विषय आहेत. या चित्रांमधली रचना अचूक आहे, पाश्चात्य कलाशिक्षणातून ती अर्थातच तिला साध्य झाली आहे, पण तिची चित्रं पुन्हा पुन्हा बघाविशी वाटतात कारण त्यांच्यातली इमोशनल इन्टेन्सिटी.
आपल्या थोडक्या आयुष्यातही लिजन्ड बनलेल्या अमृताच्या रसरसत्या जीवनेच्छेचे उन्मादी रंग कॅनव्हासवर पसरलेले आपल्याला दिसतात. तिच्या चित्रांवर नजर मंतरल्यासारखी खिळून रहाते.
जिनियस जन्मत नाही, तो घडतो. व्यक्ती आपल्या मेहनतीने आणि कष्टाने जिनियस बनते. अमृता जिनियस होती. आणि त्यामागे तिची मेहनत, अभ्यास, चिकाटी होती. मात्र अमृताच्या खाजगी आयुष्याची, तिच्या मुक्त, बेफ़िकिर लैंगिक आयुष्याची, गर्भपातांची चवीने चर्चा करुन, तिच्या फटकळ, उर्मट स्वभावाच्या वर्णनांनी आपल्या पुस्तकाची पानच्या पानं खर्च करुन तिच्या तथाकथीत मित्रांनी, समीक्षकांनी आणि नातलगांनीही तिच्या या मेहनतीची, परिश्रमांची दखल घेतली नाही. चित्रकला, चित्रकार, कलेमागच्या प्रेरणा, मानवी जीवन, तत्त्वज्ञान यावर सखोल चिंतन करणारी तिची पत्रे वाचली गेली ती केवळ तिच्या आयुष्यात येऊन गेलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी तिला खाजगी पत्रांतून काय लिहिले हे जाणून घेण्याकरता.
मनस्वी अमृताच्या खाजगी आयुष्याची चर्चा तिच्या चित्रांपेक्षा जास्त केली गेली हे दुर्दैव. तिचे आणि चित्ररसिकांचेही.
अमृता शेर-गिलच्या चित्रांमधल्या झळाळत्या रंगांमधे लपेटलेल्या, समुहात राहूनही एकाकी असलेल्या स्त्रियांच्या चेहर्‍यांवरचे अबोध भाव कधी कधी फार स्पष्टपणे उलगडतात.

4 comments:

श्रिया (मोनिका) said...

सुंदर लेख....

Mints! said...

khupach Chaan lihile aahes Sharmila.

ninaad ajgaonkar said...

अप्रतिम ...!!!

Sanhita / Aditi said...

>> अमृता शेरगिलची सगळीच चित्रं म्हणजे काही अद्वितीय मास्टरपीसेस नाहीत, तिच्या चित्रांना लाभलेलं यश हे तिच्या स्वत:च्या दृष्टीने अनेकदा अपयशही होतं. <<
या वाक्याचा उत्तरार्ध समजला नाही.