Tuesday, May 22, 2012

द स्क्रीम

एडवर्ड मंच या नॉर्वेजियन इम्प्रेशनिस्ट चित्रकाराने १८९३ मधे पेंट केलेल्या द स्क्रीम चे पडसाद गेल्या आठवड्यात जगभरातल्या कलाक्षेत्रात जोरदार उमटले. न्यूयॉर्क येथे सदबीच्या जागतिक लिलावात हे चित्र कोणा अनामिक ग्राहकाने तब्बल सहाशे कोटींना विकत घेतले. सहाशे कोटी- आख्ख्या भारतीय कलाबाजाराची आजची अंदाजे किंमत साडेसातशे कोटींच्या आसपास आहे हे लक्षात घेतलं तर या एका पेंटींगच्या किंमतीचा प्रचंडपणा लक्षात येईल. पेंटींगला लिलावामधे मिळालेली ही आजवरची सर्वाधिक जागतिक किंमत.

द स्क्रीम चित्र नीट पाहिले तर लक्षात येईल की या चित्रातील इमेज आपण असंख्य वेळेला अनेक ठिकाणी पाहिलेली आहे.
खळबळलेल्या लाल, पिवळ्या पार्श्वभूमीवरचा भयग्रस्त चेहरा.
एका मानवसदृश आकृतीने कानांवर दोन हात घट्ट दाबून धरत भितीने फ़ोडलेली किंचाळी मंचने कॅनव्हासवर दृश्यरुपात चित्रित केली. आणि विसाव्या शतकात आधुनिक जगातील मानसिक तणावांचे, दडपणांचे, ऍन्क्झायटीचे प्रतिक म्हणून ती स्वीकारली गेली. १९६१ साली टाईम मासिकाने पहिल्यांदा आधुनिक जगातील मानसिक ताण-तणावांवर कव्हरस्टोरी केली तेव्हा मुखपृष्ठावर द स्क्रीम छापले. मग व्यावसायिक माध्यमांमधून, जाहीरातींमधून, कधी कार्टून, कधी डूडल म्हणून, टीशर्टवर, कॉफ़ी मग्जवर ही इमेज दिसली, हॉलिवूडच्या होम अलोन मधल्या मुलाने घरात शिरलेल्या दरोडेखोरांना घाबरवायला तिचा मुखवटा घातला, स्क्रीम या भयपट मालिकेत या चित्राला मध्यवर्ती पात्राइतकी महत्वाची भूमिका आहे. पॉप आर्टिस्ट ऍन्डी वॉरहॉलने केलेल्या पॉप्युलर कल्चरच्या घाऊक प्रतिमा चित्रणात मॅरलिन मन्रोसोबत द स्क्रीम आहे.
जगाच्या दृश्यस्मृतीत हे चित्र चांगलच ठसलेलं आहे.
मोनालिसाच्या चित्रानंतर सर्वाधिक सर्वपरिचित असलेली ही इमेज.
तिच्या हास्याप्रमाणेच या किंचाळीचे अर्थ लावले गेले, मानसिक, शास्त्रीय, सामाजिक विश्लेषणे केली गेली.
या गूढ चित्रामागची कथा त्यानेच सांगीतली आहे त्यामुळे खरं तर फ़ार काही रहस्य त्यात शिल्लक असायला नको. पण तसं झालं नाही.  
एडवर्ड मंचच्या मते हा निसर्गातून उमटलेला आक्रोश त्याला ऐकू आला आणि त्याने तो कॅनव्हासवर चित्रबद्ध केला. चित्राचे मूळ नाव द स्क्रीम ऑफ़ नेचर.
मंच ऍक्झायटी या मानसिक तणावातून उद्भवणा-या आजाराने ग्रस्त होता. मृत्यूच्या काळ्या सावलीत बालपण झाकोळून गेले. अगदी लहान वयात आईचा मृत्यू, लाडकी बहीण क्षयरोगामुळे गेली, एक बहिण मानसिक आजारी. वडलांना स्मृतीभ्रंश. किशोरवयात त्याला औदासिन्याने ग्रासले. त्यात भर पडली नॉर्वेतल्या मलूल सूर्यप्रकाशाच्या उदास नॉर्डिक वातावरणाची.
तारुण्यात प्रवेश करतानाच मंच नैराश्य, नकारात्मकता, अल्कोहोलिझमने ग्रस्त झाला.
आपल्या डायरीमधे तो लिहीतो, "आजार, वेडेपणा, मृत्यूच्या काळ्याकुट्ट खांबांनी माझ्या पाळण्याला आधार दिला."
एका संध्याकाळी ओस्लो नदीवरच्या पुलावरुन तो जात होता. मागे टेकडी, एका बाजूला शहराची गजबज, दुस-या बाजूला नदीचे पात्र, वर अथांग आकाश. एडवर्डची मानसिक, शारिरीक स्थिती त्यावेळी फ़ारशी काही बरी नव्हती. आजारी होता त्यामुळे चालताना थकल्यासारखं वाटत होतं. एका ठिकाणी तो थांबला. त्याची नजर आकाशाकडे गेली.
आकाश केशरी ज्वाळांनी वेढल्यासारखं. क्षितिजाचं पोट चिरत सूर्य मावळत होता, बघता बघता आकाश रक्ताळले. मंचला आजूबाजूच्या निसर्गातून एक भीषण किंचाळी उमटते आहे असा भास झाला. तो लिहितो -"मी भितीने कापत तिथे उभा होतो, निसर्गातून एक कर्णकटू, अमर्याद किंचाळी उमटते आहे असं माझ्या मनाला स्पष्ट जाणवलं."
घरी आल्यावर त्याने हे चित्र रंगवले. तो म्हणतो- आकाशातले ढग मी ख-याखु-या रक्तासारखे रंगवले, रंगवताना रंगांमधूनही किंचाळ्या ऐकू येत होत्या.
काहीच्या मते हे चित्र रंगवण्याच्या वेळी त्या टेकडिच्या पायथ्याशीच असलेल्या असायलममधे मंचची डीप्रेशनमधे असलेली बहिण उपचार घेत होती.
काहींच्या मते हे चित्र रंगवण्याच्या १० वर्षं आधी, १८८३ मधे युरोपात क्राकोटोच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे अनेक दिवस मंचने वर्णन केल्याप्रमाणे आकाशात वाजवीपेक्षा जास्त झळझळीत, ज्वालाग्राही रंग सूर्यास्ताच्या वेळी दिसत असत.
मंचने आपल्या एकाकी, उदास आयुष्याच्या सा-या खूणा, दु:खी बालपणाच्या सगळ्या स्मृती या चित्रात ओतल्या आहेत.
हताशा, संताप, असहायता, तणाव, भिती अशा नकारात्मक भावना, भडक रंगांची कोंडलेली खळबळ असलेले हे चित्र जगाची नयनरम्यता नाही, तर त्याचा अंत सूचित करतं असं अनेकांचं मत.

१८९३ ते १९१० या काळात मंचने या इमेजची २ ऑइल पेंटींग्ज आणि २ पेस्टल्स रंगवली. लिलावात सर्वोच्च जागतिक बोली लागलेलं पेंटींग खाजगी संग्रहातले आहे. पेंटींगच्या फ़्रेमवर मंचने चित्र रंगवताना आपली जी मनोवस्था होती तिचे वर्णन करणारे काव्य रंगवले आहे.
बाकीच्या तीन आवृत्त्या नॉर्वेजियन म्युझियममधे आहेत.
पुढील ११९ वर्षांच्या काळात एडवर्डने दृश्यरुपात अजरामर करुन ठेवलेल्या किंचाळीचे पडसाद म्युझियम्सच्या, कलापुस्तकांच्या बाहेर उमटले.
आपली अस्थिर मानसिक अवस्था ढासळून आपण पूर्णपणे वेडे बनू की काय अशी दहशत मंचच्या मनावर होती हे खरं पण पुढील म्हणजे विसाव्या शतकाला साजेसा एक शहाणपणाही त्याच्याकडे होता. आपल्या मानसिक असमतोलाला त्याने सर्जकतेकडे नुसते वळवलेच नाही तर आयुष्यातल्या वेदनेला एका शक्तिशाली कला-प्रतिकाच्या रुपात मिरवले. नैराश्यातही तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने आपल्यातल्या असमतोलाला कॅनव्हासवर रंगांच्या माध्यमातून ओतले.
याचा एक दूरगामी परिणाम झाला. मॉडर्न कल्चरमधे मानसिक असमतोल कलावंताच्या मनाचा एक पैलू म्हणून स्वीकारला जायला लागला. ज्याला एलेमेन्ट ऑफ़ मॅडनेस म्हणतात तो कलेतून डोकावणे सर्वमान्य झाले. इतके की ज्यांच्यात कसलाच असमतोल नव्हता तेही चित्रकार, कलावंत एलएसडी सारख्या ड्र्ग्जचा वापर करुन असंतुलित, भ्रमिष्ट मानसिक जग असते तरी कसे याचा अनुभव घेऊ लागले. सायकॉटीक कविता, साहित्य निर्माण व्हायला लागण्याचा हाच काळ.

ऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एडवर्ड मंचचे आयुष्य खरोखरच उध्वस्त होते.
मात्र त्याची चित्र काढण्याची उर्मी थक्क करणारी होती. हजारांहून जास्त ऑइल पेंटींग्ज त्याने केली, तितकीच वॉटर कलर्स. लिथोचा वापर करुन चित्रांच्या असंख्य प्रिन्ट्स त्याने बाजारात आणल्या.
एकेकाळी, असं वेडविद्र ध्यान रंगवून जगासमोर आणलं त्यामुळे देशाची बदनामी झाली असं म्हणणा-या नॉर्वे सरकारने त्याला राष्ट्रीय हिरोचा दर्जा दिला. २००१ पासून एडवर्ड मंचचा चेहरा एक हजार क्रोनरच्या नोटेवर झळकला. पॅरिसच्या लुव्रमधे मोनालिसाचं जे स्थान, ते ओस्लोच्या नॉर्वेजियन नॅशनल गॅलरीत द स्क्रीम पेंटींगचं.  

अभिजात चित्रांच्या अनेक प्रतिमा कलेच्या इतिहासातून, शतकांचा प्रवास पार करुन आधुनिक जगात सर्वपरिचित झाल्या आहेत. मोनालिसा, सूर्यफ़ुले, वॉटरलिलीज.. नजरेला सुखावणा-या या चित्रप्रतिमा. मात्र आधुनिक युगाची प्रतिमा हे स्थान द स्क्रीम ने पटकावले हे आश्चर्याचे पण तितकेच बोलके
या किंचाळीचे कायमच एक अनाम आकर्षण जगभरातल्या लोकांना वाटत राहीले. असंख्य वेळा पॅरडी होऊनही तिच्यातील ताकद जशीच्या तशी राहिली. आधुनिक जगाचा कोलाहल वाढला, असमतोल वाढला तशी ती वाढतच गेली, तीव्र, कर्कश बनत गेली.
ही किंचाळी म्हणजे आधुनिक जगातील नकारांचे विशुद्ध, प्रामाणिक चित्रण.
चित्रं काही वेळा व्यावसायिकरित्या अतीपरिचित झाली की मुळात ते एक अभिजात चित्र आहे, मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप खोलवरचा काही अर्थ त्या चित्रातून अभिप्रेत आहे हेही विसरलं जातं.
आता तर सर्वोच्च किंमतीचा टॅग 'द स्क्रीम'वर लागला आहे.
कलेपेक्षा किमतीचे महत्व जास्त असणार्‍या जगात मंचची किंचाळी कलाजगतात यापुढेही पडसाद उमटवत राहील ती किमतीचीच. 

1 comment:

A said...

Love reading your blog entries! This one was even better than usual. Thanks!