Sunday, September 02, 2012

वेदनांचा सोहळा..


"कलेच्या इतिहासात आधी कोणीही रंगवली नसतील अशी चित्रं ती रंगवत आहे. सत्याला धैर्याने सामोरी जाणारी, क्रूर वास्तवाशी सामना करणारी, वेदनांना मिरवणारी तिची पेंटींग्ज आहेत. असं वेदनामय काव्य आधी कधीही, कोणत्याही बाईने कॅनव्हासवर लिहिलं नाही. फ़्रिडाने ते काम केलं."- डिएगो रिव्हेरा.
फ़्रिडा काहलोच्या नव-याने, ज्याने स्वत:ही तिच्याशी प्रतारणा करुन तिच्या शारिरीक वेदनांमधे मानसिक वेदनांची भर घातली त्याने तिच्या कलाकृतींबद्दल काढलेले हे उद्गार.
फ़्रिडाच्या कलाकृती म्हणजे तिची असंख्य सेल्फ़पोर्ट्रेट्स, ज्यात तिने तिच्या वैयक्तिक वेदनांचा सोहळा रंगवलेला आहे.


फ़्रिडाची सेल्फ़ पोर्टेट्स- निर्विकार, तटस्थतेचा मुखवटा लावलेला त्यातला तिचा चेहरा, कोरडी, एकटक नजर.. त्यात ना भावनांचा कल्लोळ, ना दु:खाचा अंश. तरीही गालावर ओलसर अश्रूंचा चमकता थर, किंवा एखादा टपोरा थेंब, वेदनेचा ठळक उच्चार करणारा. जुळलेल्या, दाट भुवया, ओठांवरची स्पष्ट लव.. पुरुषी उत्तेजनांना आकर्षून घेणारी सर्व कारणेच नाकारलेली, घातलेले कपडे मात्र सुंदर, पायघोळ गाऊन्स, फ़्रिल्सचे, त्यावर खास तिच्या हिस्पॅनिक वंशाची ओळख सांगणारे आकार आणि आकृत्या. नक्षीदार आकडे लावून केलेली केशरचना. नाजूक, फ़ेमिनाईन मोटिफ़्स.  तिचा चेहरा आणि देह .. आख्ख्या जगाला दाखवायला सजवून ठेवलेला, पण आतला आत्मा तिने सांभाळून ठेवला आहे. कधी ती हृदयही उपसून दाखवते, पण त्यातली वेदना स्वत:कडे सुरक्षित ठेवते.. अशी तिची पेंटींग असंख्य आहेत. ४७ वर्षांची तिची वेदनामय आत्मकहाणी लिहून ठेवलेली..

नैराश्यात बुडालेल्या, मुलाच्या मृत्यूच्या दु:खातून कधीही सावरु न शकलेल्या आईच्या पोटी झालेला तिचा जन्म आणि त्यानंतर सदैव कोरडा दुरावा पचवत घालवलेलं बालपण, सहाव्या वर्षी झालेल्या पोलिओत अधू, वाढ खुंटलेला उजवा पाय, ते व्यंग बाळगत जीवनाला सामोरं जायला वडिलांनी शिकवलं. कला, क्रिडा यामधे ती रस घ्यायला लागली पण दैवाला तिचं असं दु:खाला विसरत जगणं नामंजूर होतं. १८व्या वर्षी, तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर बसचा अपघात झाला, जीवघेणा पण त्यात फ़क्त जीव गेला नाही, बाकी सर्व शरिर उध्वस्त झालं. पाठीचा कणा जायबंदी झाला, कमरेचं हाड मोडलं, पाय, पावलं.. सगळं दुखावलं. तीव्र वेदनेची सोबत त्यानंतर अहोरात्र. भग्न शरिर सांधण्याचा तब्बल ३० वेळा प्रयत्न झाला आणि त्यातून प्रत्येकवेळी पुन्हा नव्याने वेदना जन्मत राहिल्या. उजव्या पाय नंतर तोडावाच लागला. पाठीचा कणा जोडण्यापलिकडे गेल्याने फ़िरण्याकरता व्हीलचेअर आणि इतरवेळी पलंगाला जखडून. सरळ बसायचे तर एक जाडजूड, पोलादी कॉर्सेट मागे बांधूनच. झोपल्या झोपल्या चित्र रंगवता येईल असे इझल आईने बनवून दिले, छतावर तिने एक आरसा टांगून घेतला, स्वत:ची छबी कायम दिसावी म्हणून.
तिला स्वत:ची चित्रे रेखाटण्याचा शौक होताच, आता तो तिचा एकमेव ध्यास बनला. बाह्य रुपाला नटवून सजवून, केसांमधे प्राण्यापक्ष्यांचे अनोखे आकार असलेल्या पिना जडवून ती स्वत:ला रंगवत राहिली.. पायघोळ, रेशमी, रंगीबेरंगी फ़्रिल्स लावलेल्या गाऊन्समधून पाठीला बांधलेले वेदनादायी कॉर्सेट लपून जाई, पांगळा पाय दिसायचा नाही. पण तरी तिची असहाय्य, एकाकी वेदना लपायचीही नाही.
वेदनेच्या पिंज-यात सजवलेल्या गौरीसारखी एकाकी बसलेली फ़्रिडा. केसांत फ़ुलपाखरे, फ़ुलांच्या गुच्छ भोवती, खांद्यावर बसलेला भलामोठा विचित्र नाकतोडा, गळ्यात माकडांच्या हातांचा विळखा, छातीशी एक बिनकेसांचा कुत्रा बिलगलेला, कधी काळं मांजर, कधी डोक्याला कुरवाळणारा (की ओरबडणारा) माकडाचा पंजा.. अद्भूत सर्रिअल सृष्टीतली सर्रिअल फ़्रिडा.. गालांवर ओलसर अश्रू, टपोरा थेंब, कधी रक्ताळलेलं हृदय हातात घेऊन, कधी गर्भाशय, अर्धमृत गर्भ.. स्वत:च्या प्रतिमेचा हा असा उत्सव फ़्रिडाने सातत्याने मांडला. तिचं अंतर्बाह्य वेदनामय शरिरच तिची चित्रभाषा होतं, ते प्रतिक होतं तिच्या अपु-या इच्छांच, कधीही सांधू न शकलेल्या अधु-या शरिराचं. बघा, मी अजूनही जिंवत आहे, लसलसत्या जीवनेच्छेने भरलेली, अद्भूत प्राणीसृष्टीला आपल्या चुंबकीय आकर्षणाच्या कक्षेत घेऊन जगत आहे. फ़्रिडाचा मुक चित्कार तिच्या व्यक्तिचित्रांमधून ऐकू येतो.  
स्वत:तल्या स्त्रीत्वाच्या धडधाकट पण पांगळेपणामुळे पुरुषी दृष्टीत निरुपयोगी ठरवल्या गेलेल्या प्रतिकांवर चढवलेला हा तिचा हिंस्त्र हल्ला. हे अवयव आहेत पण त्यांचा ना मला उपयोग, ना तुम्हाला.

"ब्रोकन कॉलम" मधे तिचा मोडलेला पाठीचा कणा तिच्या शरिराच्या मधोमध ठळकपणे आहे. आत मज्जारज्जूंचा भक्कम स्तंभ घेऊन, त्यातून तिच्या सुदृढ संवेदनांचा स्त्रोत वहातो. या सगळ्या मोडक्या, निरुपयोगी अवयवांच्या पलीकडेही तिचं अस्त्तित्व होतं, तिचं स्त्रित्व होतं, फ़्रिडा होती.

असा अपघात झाल्यावर फक्त बाईच्याच वाट्याला हे भोग येऊ शकतात. तिच्या जागी एखादा पुरुष असता तर त्याच्या शारीर पांगळेपणाला हे परिमाण नसतं. अपघातामुळे मातृत्व नाकारलं गेल्याच्या, गर्भपात झाल्याच्या, आणि नंतर नव-याच्या प्रतारणेच्या वेदना फक्त बाईच्याच वाट्याच्या. ही तिची वेदना, हे तिचे भोग. शरिराच्या आतले, बाहेरचे. त्याचं तिने मांडलेलं प्रदर्शन. जगाने ते बघायलाच हवे या अट्टाहासाने. हा वेदनेचा मूक हुंकार नाही, बाईने आतल्या आत दडपलेला हुंदका नाही, हा चित्कार आहे, आक्रोश आहे. सा-या जगाने तो ऐकावा याकरता. मात्र तो मांडला गेला आहे विलक्षण तटस्थपणे, शरिराच्या पल्याड स्वत:ला नेऊन. कारण तो भोगून झाला आहे. एकटीने.

वेदनेशी झगडणा-या शरिराच्या आत आहे तिच्या मनात वावरणारं अद्भूत, अतींद्रीय विश्व, सररिअल दुनिया. भावनांचा गुंताडा आणि कल्पक सृजनही. मजबूत, अभंग आंतरमन फ़्रिडाने कायम जपलं.
तिच्या पेंटींग्जमधून वेदनांचा, मानसिक तणावांचा उच्चार होतो, पण सहानुभूतीची, कणवेची भीक तिची व्यक्तिचित्र मागत नाहीत. कदाचित हा विरोधाभासही असू शकतो. हेही एक द्वंद्व फ़्रिडाच्या दैवगतीत जन्मत:च होतं. मिश्रवंशाचे आईवडिल, त्यांच्या वागण्याचं कधी भरभरुन प्रेम, कधी पराकोटीच्या कोरडेपणाचाचे गाठलेले टोक यातून ते रुजलं होतं. कमालीच्या तरल कल्पनाशक्तीची देणगी आणि आयुष्यभर अंथरुणाला जखडून रहाण्याची शिक्षा, मातृप्रेमाला दुरावलेल्या तिच्या हृदयातली आई बनण्याची विलक्षण तीव्र आस, अपघातानंतर झालेल्या गर्भपातांमुळे कधीही पूर्ण होऊ न शकणारी. तिला एकेकाळी डॉक्टर बनायचे होते पण जन्मभराची पेशंट बनून रहाण्याची वेळ आलेली.
पाठीला आधार म्हणून कायमचे बांधावे लागलेल्या पोलादी कॉर्सेटमुळे आधारापेक्षा जास्त वेदना आणि गुदमर सहन करावी लागणारी.

शेवटची काही वर्षं फ़्रिडा अल्कोहोल, मॉर्फ़िनच्या आहारी गेली होती. वेदना किती सहन करणार? तिच्या एका चित्रात सर्व शरिरभर खिळे ठोकून मारल्याच्या खूणा आहेत. कधी गर्भाशयात खुपसलेली सळई, पोट फ़ाडून बाहेर आलेली
स्वत:च्या शरिराला, आतबाहेरच्या अवयवांना, वेदनेच्या खूणांना कॅनव्हासवर पुन्हा पुन्हा रंगवणारी फ़्रिडा त्या रंगांच्या, आकृत्यांच्या तुकड्यांमधून स्वत:ला सांधत राहिली, एकसंध शरिराला शोधत राहिली, अखेरपर्यंत.
फ़्रिडा स्वत:च्या चित्रामधून पूर्ण होत रहिली.

"तुमच्यासमोरच्या पेंटींगमधे मी असते तेव्हा शांत असते, वेदना भोगण्याकरता मला पेंटींगमधून बाहेर यावं लागतं. तेव्हढा अवधी मी स्वत:ला कमीतकमी देते."- फ़्रिडा एकदा स्वत:च्या लागोपाठ केलेल्या सेल्फ़पोर्ट्रेट्सबद्दल सांगताना म्हणाली.

पेंटींगमधे दिसते ती फ़्रिडा तिचं आंतरिक जुळं व्यक्तिमत्व असतं. अभंग, सुदृढ शरिराची फ़्रिडा असते ती. फ़्रिडानेच रंगवलेली, तिच्या ओळखीची आणि तरीही परकी.
फ़्रिडाच्या भोवती अनेकदा निसर्ग असतो, झाडांच्या फ़ांद्या, मुळं.. वादळात झोडपली जाणारी, तडकलेली, भेगाळलेली जमीन.. तो निसर्गही तिच असते. कितीही विध्वंस झाला तरी स्वत:हून सांधून येणारा, पूर्ववत होऊ शकणारा निसर्ग फ़्रिडाच्या आंतरमनात उगवलेला असतो (द अर्थ इटसेल्फ़-१९४३).

आई माटिल्डा मृत्यूपंथाला लागली, तिने फ़्रिडाला भेटायचा ध्यास घेतला. न्यूयॉर्कला असलेली फ़्रिडा त्याकरता मेक्सिकोला आली, पण हॉस्पिटलात जाऊन आईला भेटली नाही. फ़्रिडाच्या दुभंग व्यक्तिमत्वाने ती भेट नाकारली. आईचा मृत्यू झाला आणि मग आर्टिस्ट फ़्रिडाने "माय बर्थ" चित्र रंगवलं. ज्यात अंतही आहे आणि प्रारंभही. मृत्यू आहे आणि जन्माचा सोहळाही. हॉस्पिटलच्या कॉटवर चेह-यावर कफ़न पांघरुन झोपलेली फ़्रिडा ज्या बाळाला जन्म देते आहे त्याचा चेहरा फ़्रिडाचाच आहे. मोठी, प्रौढ फ़्रिडा. फ़ार विलक्षण चित्र आहे ते.


फ़्रिडाच्या पेंटींग्जमधे वारंवार ही मृत्यूची प्रतिकं येतात. कधी तिच्या कपाळावर मृत्यूचा तिसरा डोळा असतो. या तिस-या डोळ्यात डिएगोचा, तिच्या नव-याचा चेहरा असतो. फ़्रिडा डायरीत लिहिते- "डिएगो माझ्या आत आहे, पण तो माझ्याजवळ नाही. त्याच्यावर मी जिवापाड प्रेम करते. माझ्याकडे जे आहे ते त्याचं आहे. माझ्याकडे जे नाही तेही त्याचं आहे, त्याच्याकरता आहे. आरोग्य, तारुण्य.. ते माझ्याकडे असतं तर दिएगोकरताच असतं. मी त्याची अई आहे आणि मला त्याच्या मुलाची आईही बनायचं आहे, त्याचं बीज माझ्या गर्भात रुजवायचं आहे. मी त्याची आहे, आदीमकाळापासून ते काळाच्या अंतापर्यंत त्याची आहे.".

प्रेम आणि मृत्यू दोन्हीकरता ती एकच प्रतिक वापरते तिच्या पेंटींगमधून. याच दिएगोने तिच्या बहिणीसोबत संबंध ठेवून तिची फ़सवणूक केली त्याला तिने कधीही माफ़ केलं नाही. "टू फ़्रिडाज" हे पेंटींग तेव्हाच रंगवलं तिने. त्यात दोन शरिरांमधला रक्ताचा बाहेरुन जोडला गेलेला प्रवाह
आपली वेदना, असहायता, अपंगत्व ज्या फ़्रिदाने प्रत्यक्षात कधीही लोकांना पाहू दिलं नसतं ते त्यांना दाखवण्याचं धैर्य तिच्या पेंटींग्जमधून तिला मिळालं. असं म्हणतात अनेक वर्ष हे पेंटींग फ़्रिडाने लपवून ठेवलं होतं आणि ती आपल्या रक्ताचे फ़राटे त्या चित्राच्या फ़्रेमवर उमटवत राहिली होती.
असंख्य ऑपरेशन्स, सततच्या वेदना, शारिरीक अपंगत्व यावर मात करुन शिल्लक राहिली ती तिची चित्रकला. वेदनेला पुरुन उरली ती तिची चित्रभाषा.

आपल्या भग्न शरिराचं, दुभंग मनाचं वास्तव स्वत:ला पटवण्याकरता तिची सेल्फ़पोर्ट्रेट्स तिच्या मदतीला आली. जे वास्तव आहे त्याकडे आपण कसे बघतो? जगाला दाखवताना ते कसं दाखवतो?
फ़्रिडा स्वत:च्या वेदनांशी कसा सामना करत होती हे त्यातून दिसतं. या वेदना नसत्या तर ती नसती, तिची पेंटींग्ज नसती. तिच्या सेल्फ़पोर्ट्रेट्समधून तिने या वेदनांशी संघर्ष मांडला आहे, त्यातून तिचा झगडा दिसतो, प्रतिकार दिसतो. या सगळ्याला पुरुन उरलेली एक कणखर मनाची स्त्री दिसते.
वेदना नाट्यपूर्णरित्या मांडून तिने आपण त्यांचा सामना शौर्याने करु शकतोय हे दाखवलं. कदाचित स्वत:ला पटवलं.

फ़्रिडाची ही वेदना पुढे कलेच्या बाजारात विलक्षण खपली. त्यांना अमर्याद किंमत मिळाली. तिच्यावर सिनेमे निघाले, नाटके, ऑपेरा, तिच्या नावाने सौंदर्यस्पर्धाही झाल्या. तिचं वेदनामय आयुष्य, तिची प्रेमप्रकरणं, नव-याची प्रतारणा, तिचे लेस्बियन संबंध हा खास हॉलिवुड मसाला होता बाजाराच्या दृष्टीने.
कलेपेक्षा कलाकाराचं आयुष्य मोठं ठरणं हा कलेच्या दृष्टीने शाप आणि बाजारपेठेच्या दृष्टीने वरदान असतं.
फ़्रिडाच्या चित्रांमधे तिच्या वैयक्तिक वेदनेशिवाय अजूनही बरंच काही होतं. पॉपकल्चरच्या खूणा, ऍझटेक संस्कृतीच्या अभ्यासू वापर, सर्रिऍल्झम, पण हे सगळं मागे पडलं आणि तिच्या वेदनांचीम वैयक्तिक आयुष्याची चर्चा सर्वाधिक झाली. फ़्रिडामधल्या कलाकाराचा हा पराभव म्हणायचा.      
फ़्रिडा काहलो स्त्रीमुक्तीवादी होती का, तिच्या चित्रांमधून बाईच्या त्याच सनातन वेदनांचे सहन करणे प्रकटले की तिचा वेदनामय आयुष्यासोबत चाललेला झगडा त्यातून प्रतिबिंबित झाला यावर आत्तापर्यंत जगभरातल्या फ़ेमिनिस्ट आणि ऍन्टी-फ़ेमिनिस्ट अशा दोन्ही गटांतून अनेक वाद झाले, चर्चा रंगल्या. पण शेवटी मुक्ती असो, झगडा असो किंवा सहन करणे असो, फ़्रिडाच्या चित्रभाषेचे पहिले आणि अंतिम मुळाक्षर तिच्या वेदनेचेच होते हे सत्य तेव्हढे शिल्लक उरते.
----------------------------------------------------------------------------------------
"मी माझ्या स्वत:चच रुप कॅनव्हासवर पुन्हा पुन्हा रंगवते कारण माझ्यासोबत इतर कोणी नसतं, आणि मी माझ्याशिवाय दुस-या कोणालाच संपूर्णपणे ओळखू शकत नाही." - फ़्रिडा काहलो

5 comments:

Meghana Bhuskute said...

निव्वळ अप्रतिम.

Unknown said...

निशब्द
वाचताना.पहाताना नव रसांची अनभूति झाली
जीवनाचे अभिनव मांडनीकरण
धन्यवाद

my sculpture said...

अंतरंग ढवळून टाकणारे काम! सुंदर परिभाषा ! अभिनंदन शर्मिला!

Aruna said...

Sharmila, you have touched the heart of your subject and readers. Your style is not dry and technical but very sensitive, I had seen a film on the artist. After this piece I want to see it again.
Thanks for sharing your insights.
aruna.

Shilpa said...

निशब्द !!