Wednesday, March 13, 2013

‘रिक्लायनिंग न्यूड’- व्हीनसचा विद्रोही प्रवास..१५१० साली जॉर्जिओनीने 'द स्लिपिंग व्हिनस' रंगवली आणि नग्न स्त्रीदेहाचा प्रदीर्घ प्रवास सुरु झाला. टिशियनच्या व्हिनस ऑफ़ अर्बिनो, रुबेन, गोया, मॅने, पिकासो पासून.. रविवर्मा ते सूझा, पदमसींपर्यंत..आणि नंतरही रिक्लायनिंग न्यूड अनेकांना मोहात पाडत राहिली..
चित्रांची रचना एकसारखीच. मंचकावर पहुडलेल, जवळून दिसणारं पौराणिक देवता व्हिनसचं निद्राधीन रुप. डोळे कधी अर्धोन्मिलित, कधी उघडे, चेहर्‍यावर सलज्जित, संकोची भाव. गौर गुलाबी स्त्रीदेहाचा मुलायमपणा, नाजूकपणा, डौल, पुष्टता काव्यमय.
शतके उलटली, चित्रकारांच्या अगणीत पिढ्या जन्मल्या आणि अस्तंगत झाल्या..
चित्रविषय तोच राहीला पण चित्रभाषेत लक्षणीय बदल घडत गेले.
जॉर्जिओनीच्या व्हिनसचे डोळे मिटलेले, प्रेक्षक बघताहेत याची तिला जाणीव नाहीये. लैंगिकता त्यात अभिप्रेत नाही. कारण ते दैवी नग्नतेचं रुप.
टिशियनने रंगवलेली व्हिनस जागी आहे, तिच्या नजरेत एक मोहक निमंत्रण आहे. 
गोयाने रंगवलेली न्यूड माजा (१८००) देवता नव्हती, राजकन्या नव्हती, उमरावाची सखी नव्हती, तिची ओळख निश्चित झाली नाही. ही अनोळखी नग्नता आक्षेपार्ह ठरली.
इन्ग्रेसने रंगवलेली ओडालिस्क (१८१४) पाठमोरी, शिल्पाकृतिशी साम्य असणारी होती, आणि ती चक्क प्रेक्षकांना खिजवतेय असा भास होतो.
मात्र सर्वात धाडसी होती ऑलिंपिया. एडवर्ड मॅने या फ़्रेन्च चित्रकाराने १८६३ साली रंगवलेल हे तैलचित्र. व्हिनसची विद्रोही आवृत्ती.

पॅरिसच्या उच्चभ्रू सलोनमधे हे चित्र १८६५ साली प्रदर्शित झाले तेव्हा गदारोळ उठला. पहिली प्रतिक्रिया उमटली ती "धक्कादायक". रुढीप्रिय, पारंपारिक फ़्रेन्च उमरावांनी एकमुखाने या चित्राला अनैतिक आणि बीभत्स ठरवले.
असं काय होतं नक्की या चित्रात की पॅरिस गॅलरीतल्या उच्चभ्रू प्रेक्षकांमधे नुसती खळबळच माजली नाही तर ते संतापले, दोन पोलिसांना खास तैनात केलं गेलं लोकांनी कॅनव्हास फाडू नये म्हणून.
शालीच्या थरांवर पहुडलेली नग्न ऑलिंपिया समोर, थेट बघत होती, तिच्यासोबत तिची कृष्णवर्णीय मेड आणि एक काळं मांजर.
आक्षेप चित्रविषयाला नव्हता, चित्रभाषेला होता. मॅनेने समाजातले सत्य ढळढळीतपणे सामोरे आणण्याचे धाडस केले होते.
ऑलिंपियाची नग्नता हा वादाचा विषय नव्हता. आधीही रोमन, क्लासिकल व्हिनससारख्या सौंदर्यवती नग्न साकारल्या गेल्या होत्या. पण त्या देवता होत्या आणि त्यामुळे त्यांची नग्नता पवित्र होती. मॅनेची ऑलिंपिया आधुनिक पॅरिशियन, सामान्य स्त्री, नुसती सामान्य नाही तर बदनाम वेश्यावर्गातली आहे हे उघड दिसत होते. तिच्या देहरेषा कोवळ्या, कौमार्य सूचित करणार्‍या नव्हत्या. तिच्या पायातल्या स्वस्त सॅन्डल्स, केसातली भडक फ़ुले तिची ओळख पटवायला पुरेशा होत्या. दोन स्त्रिया, भिन्न वंशाच्या, भिन्न सामाजिक वर्गातल्या, आणि भिन्न वर्णाच्या. जे खाजगी क्षण होते, ते असे उघडपणे सामोरे आले, आणि त्याबद्दल लज्जेचा लवलेशही नसावा? आणि नजरेतला निर्विकार उद्धटपणा? एका स्त्रीकडे, तेही अशा, एवढी हिंमत? 
धक्कादायक होतं ते हे की आपली ओळख ती लपवत तर नव्हतीच उलट उजळपणे ढळढळीतपणे मिरवत होती. नग्नतेबद्दलचा कोणताही संकोच तिच्या हावभावांमधे नव्हता, आपल्या हाताच्या पंजाने तिने आपली नग्नता झाकली होती तेही लज्जीत होऊन नाही. तर माझी मर्जी नाही म्हणून मी दाखवत नाही असा उद्धट आविष्कार त्या झाकण्यात होता.
ऑलिंपिया वेश्या, ग्राहकाची वाट बघणारी नव्हे, तर त्याला बाहेर खोळंबवून ठेवणारी. त्याने आत पाठवलेला फुलांचा गुच्छ स्विकारायलाही ती उत्सुक नाही फ़ारशी. धडधडीत अपमानच नव्हता का हा त्या सा-या उच्चभ्रू पुरुषांचा, तोही एका वेश्येकडून केला गेलेला? पॅरिसचा उच्चभ्रू पुरुषवर्गात सरसकट वेश्यागृहांत जाण्याची फ़ॅशन होती. पण त्या वेश्यांना अशा त-हेनं उच्च्भ्रूंच्या कलादालनांमधे स्थान?
पुरुषांवर लैंगिक वर्चस्व प्रस्थापित करणारा तिचा आविर्भाव.. टिशियनने रंगवलेल्या व्हिनसच्या शेजारी इमानदार, गुणी कुत्रा होता त्याचीही उचलबांगडी करुन त्याने तिथे आक्रमक लैंगिकतेचं, उघड व्यभिचाराचं प्रतिक काळी मांजर रंगवली.
खुपणा-या, धक्का पोचवणा-या अशा असंख्य गोष्टी त्या चित्रात मॅनेने बेधडक चितारल्या होत्या. हा उघड उघड विद्रोह, क्लासिकल, अभिजात कलेचा उपहास.
मॅनेने चित्र रंगवण्याच्या शैलीतही विद्रोह केला होता. ती परिचित, सर्वमान्य ऍकेडेमिक शैली नव्हती, स्वतंत्र होती, ठळक फ़टकारे, ऍग्रेसिव्ह, स्टुडिओतला प्रकाशही तीव्र, त्यात रंगछटांचा आविष्कार नाही, सपाटपणा, मागचा गडद अवकाश, आणि तिच्या शरिराचा त्या काळसर पार्श्वभूमीवर उठून दिसणारा पांढराधोप गोरेपणा. आतापर्यंत चितारल्या गेलेल्या नग्नतेच्या मृदू, लोभस रेषांचा, लडीवाळ, पुष्ट वळणांचा मागमूसही नाही. या नग्नतेमधे रोखठोक वास्तवता होती, आणि प्रखर उजेडात ती थेटपणे सामोरी येत होती.
कल्पनारम्यतेपासून वास्तवतेपर्यंतचा हा स्त्रीत्वाचा प्रवास होता

'ऑलिंपिया'नंतर स्त्रीत्वाची नग्न रुपं अधिकाधिक धाडसी आणि विद्रोही बनत गेली.
१९२८ साली माटिझने ब्ल्यू न्यूड रंगवलं. त्यात बोल्ड, फॉव्हिस्ट शैली होती. मुक्त आणि स्वैर. रंगही व्हायब्रन्ट, काहीसे कृत्रिम.

आणि मग पिकासोची विद्रोहीपणाचा कडेलोट करणारी चित्रभाषा. संपूर्णपणे आधुनिक.
ऑलिंपिया आणि ले देमॉजेल्समधे ४४ वर्षांचा काळ गेला. औद्योगिक उलथापालथीचा, अस्वस्थ काळ, महायुद्धाचे वारे घोंगावू लागलेले.
पिकासोने पारंपारिकतेला नुसता छेद दिला नाही, त्याने चौकटी उध्वस्त केल्या. विरुपीकरण केलेले संपूर्ण भावनाविहीन चेहरे, क्युबिझमची सुरुवात. शार्प, उध्वस्त आकार, धोकादायक, काचेच्या फुटक्या, तीक्ष्ण तुकड्यासारखी धारदार शरिर, त्यांचे हात वर, शरीरं उघडी, मात्र चेहरे कठीण, काहीसे हिंसक, हल्ला करतील केव्हाही अशी भिती वाटवणारे. पिकासो आदीम प्रेरणांकडे वळला.
स्त्रीच्या कातडीखाली जाऊन बघण्याचे त्याने आव्हान दिले. बार्सिलोनातल्या ऍव्हिनॉन नावाच्या रस्त्यावरच्या, बदनाम वस्तीतल्या या पाच वेश्या.

जॉर्जिओनीच्या स्लिपिंग व्हिनसनंतर ५०० वर्षांनी, १९२० साली पहिल्यांदा पोलिश आर्टिस्ट तमारा लेम्पिका या स्त्री चित्रकाराने रिक्लायनिंग न्यूड अभिव्यक्त केली. नाट्यमय, अ‍ॅथलेटीक हातांची, बळकट पायांची ही स्त्री आरामात पहुडलेली नाही. तिच्या आविर्भावात तणाव आहे. रंगही झळाळते नाहीत, म्यूटेड आहेत, कोणी तिची नग्नता बघते आहे का याच्याशी काही कर्तव्य नसल्यासारखी ती दिसते.
ही स्त्री कोण आहे हे नक्की समजत नाही. पुन्हा एकदा तिची ओळख अनभिज्ञ.  
स्रीदेहाचा हा कॅनव्हासवरचा उत्क्रांत होत गेलेला प्रवास. 
  

1 comment:

kanak said...

उत्तम !!!
दृष्याकालेचा सोज्वळ सात्विक अशा स्वरूपापासून ते आदिम प्रेरणांचा मुक्त आविष्कार होण्यापर्यंतचा प्रवास आपण उत्तम रीतीने समजून सांगितला आहे. मात्र आपल्याकडे अजूनही या भेदक दृष्याकालेला उघड मान्यता मिळते कि नाही हि शंकाच आहे.