Friday, August 26, 2016

रझा: काळ्या सूर्यासोबतचा प्रवास

चित्रकार सैय्यद हैदर रझा यांची एक प्रदीर्घ मुलाखत लोकमत दीपोत्सव’ करता मी तीन वर्षांपूर्वी घेतली होती. त्यांच्या स्टुडिओतले ते पाच तास कायम स्मरणात रहातील. आपल्या उमेदीच्या दिवसांबद्दलसहकारी चित्रकारांबद्दलप्रोग्रेसिवच्या दिवसांबद्दलफ़्रान्समधल्या वास्तव्याबद्दल आणि त्यांच्या मनात सतत वसत असलेल्या भारताबद्दल ते भरभरुन बोलले होते. 

"मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमधे २० नोव्हें.ला माझं नव्या चित्रांचं प्रदर्शन आहे. फ़्रान्समधून भारतात कायमसाठी परतल्यावरचं हे माझं मुंबईतलं पहिलंच प्रदर्शन. 
मनात प्रचंड उत्सुकता आणि आनंद भरला आहे. साठ वर्ष मी फ़्रान्सला होतो. 
खूप मोठा, प्रदीर्घ काळ आहे हा. 
मात्र आता मुंबईला चित्रप्रदर्शन भरवण्याची तयारी करत आहे तेव्हा मला असं वाटत आहे की मी देशाबाहेर कधी गेलोच नाही. माझं पहिलं चित्रप्रदर्शन भरलं होतं मुंबईत, त्यावेळी मनाला वाटत होती तशी उत्सुकता, अधीरता आजही वाटतेय. नव्या प्रदर्शनाकरता वीस नवी पेंटींग्ज बनवली आहेत. अजून चार बनतील. भारतात कायमचं परतल्यावर माझ्या मनात ज्या भावना उचंबळून आल्या आहेत त्या या पेंटींग्जमधून साकारल्या आहेत कदाचित.
मुंबईला माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं स्थान आहे. माझ्यातल्या चित्रकाराला घडवण्याचं काम मुंबईत झालं,माझ्या बौद्धिक, वैचारिक,कलासंवेदनांना जागवण्याचं काम मुंबईने केलं.मुंबईतच माझं कलाशिक्षण झालं आणि पहिलं चित्रप्रदर्शनही. इथेच आम्ही सहाजणांनी मिळून प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपची स्थापना केली आणि संपूर्ण भारतातल्या कलाजगताला वेगळं वळण मिळालं. इथल्या कलाविश्वात क्रांतीकारी बदल घडवून आणायला ’प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ कारणीभूत ठरला.

कलेच्या बाबतीत किंवा एकंदरीतच ’बदल’ हा शब्द मला फ़ारसा मान्य नाही. संपूर्ण मुळासकट असे कधीच काही बदलत नाही. मी त्याकरता ’उत्क्रान्ती’ हा शब्द वापरीन. मानवी संस्कृतीचा विकास उत्क्रान्तीतून झाला. कलेचा विकासही तसाच होत गेला. प्रत्येक पिढीचे त्यात योगदान आहे आणि जोबदल घडत गेला, किंवा जो बदल झाला असे आपण म्हणतो त्याकरताही कोणती एखादी विशिष्ट   घटना किंवा प्रसंग फ़क्त निमित्तमात्र ठरतो. भारतीय कलाजगत बदलाकरता संपूर्ण तयार होतं.  प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपची स्थापना, त्यातल्या आम्ही सहा जणांनी काढलेली आमच्या खास, स्वतंत्र शैलीची चित्रं, त्यांची भरवलेली प्रदर्शनं, आमच्या चर्चा हे सगळं आधीच्या घटनांना,आधीच्या साचेबद्ध ऍकेडेमिक शैलीला दिलेलं प्रतिक्रियात्मक उत्तर होतं. भारतीय आधुनिक कलेच्या प्रांतात जे घडलं ती उत्क्रान्ती होती.

वैयक्तिक पातळीवर सांगायचं तर माझ्या चित्रकलेच्या शैलीत जे बदल घडत गेले ते अचानक एका रात्रीत झालेले नाहीत. किंवा आधीची सगळी मुळं उखडून टाकून, त्यात नवीन बीज रुजवल्यासारखी माझी पेंटींग्ज नव्याने जन्मली नाहीत. एक्स्प्रेशनिस्ट लॅन्डस्केप्स पासून ते जॉमेट्रीक ऍब्सट्रॅक्शनपर्यंत माझ्या चित्रशैलीत घडत गेलेले बदल,त्यानंतरचं माझ्या चित्रांमधे झालेलं बिंदूचं आगमन. हे महत्वाचे बदल काही टप्प्यांनंतर जाणीवपूर्वक आणि काही आंतरिक चिंतनातून सहजतेनं घडत गेले. चित्राच्या संरचनेत कधी जास्त पक्क्या चौकटी आल्या, कधी त्यात झळाळते रंग भरले गेले,कधी त्यात अध्यात्मिक एलेमेन्ट्सची भर पडत गेली. ’बिंदू’ माझ्या चित्रांच्या संरचनेत उमटला तो तिथे बीजासारखा रुजला आणि त्यानंतर माझ्या चित्रांना नवा बहर आला. हा बिंदू एक गर्भ होता जो माझ्या पेंटींग्जमधल्या रंगांवर, आकारांवर,भौमितिक आकृत्यांवर पोसला,त्यातून नवे जीवन निर्माण झाले. हा बिंदू पहिल्या विरामचिन्हासारखा होता,ज्यातून पुढचे नवे श्लोक लिहिले गेले. हा बिंदू म्हणजे मी माझ्या जीवनात झालेले काळ्या सूर्याचे संक्रमण मानतो. एका एलेमेन्टपासून 
अनेक एलेमेन्ट्सपर्यंत झालेले हे इव्होल्यूशन आहे.
ऍकेडेमिक चित्रशैलीच्या आहारी गेलेल्या भारतीय कलाजगताला मुळापासून हलवण्याचा, त्यात बदल घडवून आणण्याचा विचार आम्ही प्रोग्रेसिव्हच्या कलाकारांनी जाणीवपूर्वक केला हे मात्र खरं. इतरही अनेक चित्रकार त्या प्रवाहात सामिल झाले कारण ते या बदलाकरता मानसिकदृष्ट्या संपूर्ण तयार होते.
सूझा, हुसेन, गायतोंडे, अकबर पदमसी, तय्येब मेहता, क्रिशन खन्ना माझे नुसते सहकारी नव्हते,माझे जवळचे आप्त होते. त्यांचं आणि माझं नातं चित्रकलेच्याही पलिकडचं होतं. आमच्यात वैयक्तिक स्नेहबंध खूप दाट होते.
सूझा खूप बडबड करायचा,गायतोंडे त्याउलट कायम गप्प. पेंटींग दाखवायला घेऊन जायचा उत्साहाने पण त्यावर काहीच बोलायचा नाही. अगदी गप्प. मग आम्ही ते बघायचो आणि निघून यायचो.
ऍबस्ट्रॅक्शनबद्दल बोलणं हे खरंच खूप कठीण असतं. मला त्याचा अनुभव आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे, बोलण्याची नाही. त्यामुळे गायतोंडेला मी समजावून घेऊ शकतो.
रिऍलिझमकडून ऍबस्ट्रॅक्शनकडे जाणं म्हणजे आकृतीकडून अध्यात्माकडे जाणं. आतला आवाज तुम्हाला तिथे घेऊन जातो. हा आत्म्याचा प्रवास असतो, त्याची हाक ऐकू येते तुम्हाला.स्वत:लाच आश्चर्य वाटतं. जे पाहिलं, दिसलं ते खरंच आहे? मग ते आहे हे पटवण्याकरता रंगाची मदत घेतली जाते,काही आकार निर्माण होतात.
खूप गोष्टी मला आठवत आहेत. खरं तर काहीच विसरलो नाही. वयामुळे काही आठवणी सलग येत नाहीत. शारिरीकदृष्ट्या आता मी कमजोर झालो आहे. वयाची नव्वद वर्ष पार केल्यावर काही बंधनं नैसर्गिकपणे माझ्यावर पडली आहेत. आता मी स्वतंत्र फ़िरु शकत नाही. पण आजवर केलेले जगभरातले, भारतातले सगळे प्रवास मला जसेच्या तसे आठवतात. प्रत्येक प्रवासानंतर मी नव्याने घडत गेलो, नव्याने उत्क्रांत होत गेलो. माझ्या विचारधारणेत, जीवनधारणेत बदल होत गेले आणि ते पेंटींग्जमधे परावर्तित होत गेले.

माझा वैयक्तिक कलाप्रवास आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचा प्रवास समांतर झाला. माझी चित्रकला लॅन्डस्केप्स पासून सुरु झाली आणि मग एक्सप्रेशनिझम, क्युबिझम, ऍबस्ट्रॅक्शन, ऍब्सट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम.. कॅनव्हासवर अनेक वेगवेगळ्या प्रयोगांमधून मी चित्रकलेचा वेध घेत गेलो. हा कलेचा आणि त्यासोबतच माझा वैयक्तिक शोधही होता जो अजूनही, माझ्या वयाच्या नव्वदीतही चालूच आहे. जगभर फ़िरलो. नागपूर, मुंबई, पॅरिस आणि आता पुन्हा मुंबई असे मुक्काम या प्रवासा दरम्यान केले. 

मध्यप्रदेशातील बाबरिया नावाच्या लहानशा गावात जन्म झाला. माझे वडिल फ़ॉरेस्ट ऑफ़िसर होते. त्यांची सरकारी, बदलीची नोकरी. असंख्य गावं, जंगलं बघत बालपण गेलं. दर भ्रमंतीच्या वेळी आयुष्य थोडं थोडं बदलत राही. पण हा बदल माझं अनुभवविश्व संपन्न करत असे.
१९४३ साली वयाच्या २५व्या वर्षी मी मुंबईत आलो. नागपूरच्या आर्ट स्कूलमधे ड्रॉइंग टीचर्सचा डिप्लोमा घेतला होता. गोंदियाच्या एका शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली होती. पैसे कमवायला लागल्यावर आयुष्य स्थिरावले असे कोणालाही वाटेल. पण मला काहीतरी मोठा बदल हवासा वाटत होता. आयुष्य पूर्ण बदलवून टाकणारा क्षण मला नेहमीच मोहात टाकतो. त्या क्षणाच्या शोधात मी असतो.

चित्रकला शिकत असताना मुंबईतल्या प्रतिष्ठीत जे.जे.स्कूल ऑफ़ आर्टमधे स्कॉलरशिप मिळाली. 
मात्र प्रवेश लगेच मिळाला नाही. काही तरी अडचणी आल्या आणि मला वर्षभर थांबावं लागलं जेजे मधे जाण्याकरता. मुंबईत माझे कोणीही नातेवाईक नव्हते, जवळ फार पैसेही नव्हतेच. पण या उदार शहराने मला रहाण्या जेवण्याची कमी पडू दिली नाही. एका ब्लॉकमेकरच्या स्टुडिओमधे नोकरी मिळाली. तिथेच रहायलाही परवानगी मिळाली. मन लावून दिवसभर काम करायचो आणि मग संध्याकाळी पोर्तुगिज चर्चजवळच्या मोहन आर्ट्स क्लबमधे चित्रकला शिकायला जायचो. 
एम.के.कुलकर्णी आमचे प्रिन्सिपल होते. यंग टर्क ग्रूपचे ते सभासद होते. त्यांच्यामुळेच माझी ओळख श्यावक्ष चावडा आणि के.के.हेब्बर यांच्याशी ओळख झाली. जे.जे.मधे मी १९४८ पर्यंत होतो.

ज्या ब्लॉकमेकरच्या स्टुडिओत मी काम करायचो, तो खूप गजबजलेला, कमर्शियल एरिया होता मुंबईतला. खिडकीबाहेरचे गर्दीने ओथंबलेले रस्ते रंगवायला मला आवडायचे. त्यावेळी माझी ही वॉटरकलर्स बॉम्बे आर्ट सोसायटीच्या ग्रूपशो मधे प्रदर्शित झाली. कलासमीक्षक रुडी व्हॉन लेडनने टाइम्स ऑफ़ इंडियामधे त्यांची खूप स्तुती केली. त्यातून श्लेसिंजर आणि प्रोफ़ेसर लॅन्गहॅमर यांच्याशी परिचय झाला. मुंबईच्या कलावर्तुळातली ही प्रतिष्ठीत नावे होती. मी सुदैवी होतो हे नक्की. 
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनानंतर माझे आयुष्यच बदलून गेले. पेंटींग्ज चांगल्या किमतीला विकली गेली. नोकरी सोडून मी पूर्णवेळ पेंटींग करायचे ठरवले. लॅन्गहॅमर, रुडी, श्लेसिंजर या तिघांनीही माझ्यावर, माझ्या चित्रकलेवर भरभरुन प्रेम केले, प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडचा कलाविषयक युरोपियन पुस्तकांच्या खजिना माझ्याकरता चोवीस तास खुला होता. लॅन्गहॅमरच्या अपार्टमनेटमधे मी काम करत असे.
मी पूर्णवेळ पेंटींग करायचे ठरवले होते, पण माझं वय लहान होतं, फ़ारसा अनुभव गाठीशी नव्हता, बाहेरचं कलेचं जग खूप मोठं होतं. माझी त्या जगाशी ओळख नव्हती. लॅन्गहॅमर मला वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दाखवत- राजपूत, पर्शियन मिनिएचर्स, व्हॅन गॉघ, मोनेची पेंटींग्ज. 
प्रत्येक पेंटींग कसे वेगळे आहे, प्रत्येक चित्रकाराचे वेगळे वैशिष्ट्य काय याचा बारकाईने अभ्यास मला त्यांनी करायला शिकवला. मातिझ आणि पिकासो, मोने आणि सेझां यांची पेंटींग्ज तुला वेगवेगळी ओळखता यायलाच हवीत, त्यांची वैशिष्ट्ये तुझ्या मनावर ठसली पाहीजेत असं ते मला सांगत. 
आणि हळू हळू मला ते जमायला लागलं. मला पेंटींगमधले बारकावे फ़ार चांगल्या पद्धतीने कळू शकतात, माझी नजर त्याकरता तयार झालेली आहे. त्याचे श्रेय श्लेसिंजर आणि लॅन्गहॅमर यांचे.
मुंबई शहर- इथली श्रीमंती, आकाशाला भिडलेल्या इमारती आणि सोबत सततचा कोलाहल.. 
मला या शहराचं आकर्षण वाटायचं आणि तीटकाराही. लहान गावांमधली शांतता माझ्या सवयीची होती. पण हे शहर माझ्या बौद्धीक संवेदनांना जागवत होते. माझ्या सुरुवातीच्या सिटीस्केप पेंटींग्जमधे हा अनुभव दिसतो. शहरातले चिंचोळे रस्ते, गल्ल्या, भव्य इमारती, स्थळे.. (बझारगेट-वॉटर कलर). घरांचे, इमारतींचे आकार, रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांवरुन परावर्तित होणारा प्रकाश, लोकांची गर्दी, पावसात नहाणारं फ़्लोरा फ़ाउंटन हे सगळं त्या चित्रांमधे उतरलं. वेगवेगळ्या ऋतूंमधे. ऎकेडेमिक परंपरांपेक्षा काही वेगळं करण्याच्या कल्पनेने भारावलेले आम्ही काही जण एकत्र आलो आणि त्यातून जन्मला प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप. 
आखून दिलेल्या मार्गावरुन, पारंपारिक पद्धतीने ना कधी मी वैयक्तिक आयुष्य जगलो, ना माझ्या कलाजीवनाचा प्रवास तसा झाला.
देशाला स्वातंत्र्यप्राप्ती, फ़ाळणी, जातीय दंगली, म.गांधींची हत्या, देशावर धरलेली काजळी. वैयक्तिक नुकसानही खूप झालं या सगळ्यात. ४७ नंतरची ती तीन वर्ष दु:ख आणि ताटातूट यांनी भरलेली होती. माझी आई आणि वडील दोघांचंही लागोपाठ निधन झालं. काही वेदनादायी निर्णय घ्यावे लागले. आमच्या सर्वांच्याच आयुष्यातला हा मोठा बदल. माझे चारही भाऊ आणि बहिण चौघांनीही पाकिस्तानात जाऊन रहायचा निर्णय घेतला. दंगली, द्वेश, हत्या यांनी बाहेर वातावरण भरलेलं होतं आणि घरात दु:ख, वियोग, ताटातुटीने..
मी मात्र घट्ट पाय रोवून राहिलो मुंबईतच त्यावेळी. हे जे सगळं अनुभवलं त्याचा परिणाम माझ्या चित्रांमधून दिसून आला नाही तरच नवल.
४८ साली मी के.ए.अब्बास आणि बलराज सहानींसोबत काश्मिरला गेलो होतो. तिथल्या परिस्थितीचाही परिणाम माझ्यावर तीव्रतेनं झाला. आल्यावर मला माझ्या मित्रांनी विचारलं की कसा आहे तिथला निसर्ग? 
मी उत्तर दिल, ’जखमी आहे.’ त्याचं चित्रण करणारी काही वॉटरकलर्स मी केली. त्याचा शो दिल्लीमधे झाला.
श्रीनगरमधे माझी भेट सुप्रसिद्ध, जागतिक किर्तीचे फोटोग्राफ़र हेन्री कार्टिअर ब्रेसन यांच्याशी झाली. हा एक टर्निंग पॉइन्ट. माझ्या पेंटींग्जमधे कन्सट्रक्शनची कमी आहे, पेंटींग हे तयार होत जातं, त्याला त्याकरता वाव द्यायला हवा. तु तो देत नाहीस. सेझांचं पेंटींग बघ, तुझ्या पेंटींगमधे तु स्ट्रक्चर आणू शकलास तर कुठच्या कुठे जाशील. बदल तुझा तुलाच कळेल. लॅन्गहॅमर, ब्रेसनच्या मतांचा मी खूप गांभीर्याने विचार केला.
माझ्या चित्रशैलीत त्यानंतर मी जाणीवपूर्वक काही बदल केले. आणि ४९-५० साली माझ्या चित्रांमधे भौमितिक स्ट्रक्चर्स दिसायला लागली.
त्यानंतरचा माझा मुंबईमधला सगळा काळ प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपच्या आठवणींनी व्यापलेला आहे. ग्रूपच्या वादळी चर्चा, वेगवेगळ्या कलाविषयक पुस्तकांच वाचन, त्यावर चर्चा, पेंटींग्जबद्दल बोलणं. आमच्यापैकी प्रत्येकजण आपली स्वत:ची वेगळी भाषा शोधण्याची धडपड करत होते. संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच बदलवून टाकणारं काहीतरी आमच्या चर्चांमधून जन्म घेते आहे याची जाणीव प्रत्येकाच्याच अंतर्मनात होती बहुधा. कलासमीक्षकांनाही ती होती.
सूझा आमचा पुढारी. त्याने आमच्या प्रोग्रेसिव्ह ग्रूपचा मॅनिफ़ेस्टो लिहिला होता. सूझा, मी, हुसेन, हरी अंबादास गाडे, सदानंद बाक्रेम आणि आरा असे सगळे आम्ही आमच्या ग्रूपमधे एकमेकांना पुरक होतो. विचारांची देवाणघेवाण हा मुख्य हेतू. कल्पना, पुस्तकांच्या चर्चा, आणि भरपूर, ओसंडून वहाणारा उत्साह, चित्र काढण्याची आतून आलेली तीव्र इच्छा. एक कलाकार म्हणून काम करताना आम्हाला संपूर्ण मुक्तपणा, कोणतेही प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य आमच्या दृष्तीने सर्वात महत्वाचं होतं. आमची प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी, दृष्टीकोन वेगळे पण कॉमन होती वैशिष्ट्यपूर्ण आकार शोधण्याची इच्छा. न्यूड काढताना प्रत्येकाची व्हिजन वेगळी, सेन्सिबिलिटी वेगळी. पेंट लावण्याची पद्धतही वेगळी.
आम्ही एकेकटे काम करायचो, स्वतंत्रपणे पेंटींग करायचो, आणि मग आर्टिस्ट्स सेन्टर मधे किंवा चेतना आर्ट गॅलरीत, पूर्वी तिथे रेस्टॉरन्ट होतं, तिथे जमून त्यावर बोलायचो. खूप सुंदर दिवस होते ते. आणि महत्वाचेही.
चित्रांच्या किंमती आम्ही मुद्दाम कमी ठेवल्या होत्या कारण लोकांना ती विकत घेता यावीत. आम्ही काढलेल्या चित्रांना विकत घेणारे पार्शी कलासंग्राहक त्या काळी होते. त्यामुळे आर्थिक पाठबळ आम्हाला मिळू शकलं. फ़ार पैसे मिळायचे नाहीत. पण आम्हाला त्याची पर्व नव्हती. नवं काहीतरी घडवण्याची धुंदी मनात होती. ती पुढच्याही आयुष्यात कायम सोबत राहिली. आता ७०-८० लाख माझ्या चित्राला सहज मिळतात, सर्वात जास्त किंमत माझ्या पेंटींगला मिळते. आणि त्याचं कारण आम्ही आमचं आर्टिस्टिक एक्स्प्रेशन सर्वात जास्त महत्वाचं मानलं. त्याच्या मागे धावलो आम्ही, पैशाच्या मागे नाही.
ग्रूप बनवण्याची गरज होती तशीच एक दिवस ग्रूपमधून बाहेर पडण्याचीही होती. ग्रूप फ़ुटला नाही. ग्रूपचं उद्दीष्ट साध्य झाल्यावर स्वत:चा शोध स्वतंत्रपणे घ्यायला सर्वजण आपापल्या मार्गाने आपल्या प्रवासाकरता बाहेर पडले.
याच सुमारास मुंबईतल्या फ़्रेन्च कॉन्सुलेटतर्फ़े पिकासो, ब्राक, माटिझ यांच्या चित्रांच्या प्रिन्ट्सचं एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं. ते पाहून मी प्रचंड प्रभावी झालो. फ़्रान्समधे जायलाच हवं असा ध्यास माझ्या मनाने घेतला. काहीही करुन ही मुळ चित्र मला बघायचीच होती. फ़्रान्सची टूर करण्याकरता माझ्याकडे पैसा नव्हता. फ़्रेन्च कॉन्स्युलेटने सल्ला दिला की फ़्रेन्च शिक आणि त्यावर स्कॉलरशिप मिळाली की तुला पॅरिसला जाता येईल. दोन वर्षं मी परिश्रमाने फ़्रेन्च शिकलो. मला स्कॉलरशिप मिळाली. पॅरिसमधल्या प्रतिष्ठीत एकॉल द बोझार्त आर्टस्कूलमधे शिकायची संधीही मिळाली. मी पॅरिसला गेलो. 
बोटीचा तो प्रवास करुन मार्सेलस पोचलो तेव्हा तिथे गोठवणारा हिवाळा होता. माझे संपूर्ण आयुष्य आता बदलणार आहे हा विचार पॅरिसमधे पाय ठेवताना तीव्रतेनं मनात आला. हॉटेलात बॅग टाकली आणि आधी बाहेर पडलो. शहर बघण्याकरता. पहिल्याच क्रॉसिंगवर रोदॅंने केलेला बाल्झॅकचा स्टॅच्यू होता. आणि समोर समोर एक पोस्टर होतं, माटिझच्या चित्रांचं प्रदर्शन सुरु असल्याचं. फ़्रान्सला येणं सार्थकी लागल्याची ती खूण. आल्या आल्या शुभशकून झाल्याची भावना मनात आली.
व्हॅन गॉघ, सेझांच्या म्युझियमधल्या पेटींग्जसमोर मी तासचेतास उभा असे. एक अनामिक शांती मनात भरुन राही. परक्या देशात आपण असल्याचं, एकटेपणाचे विचार मनातून निघून जात.
तिथे रुजणं सोपं नव्हतं. तिथली थंड हवा, सुरुवातीला माणसांमधला उबदारपणा जाणवला नव्हता. घरं परकी वाटायची. थंडगार आकाशातला सूर्यही मलूल वाटायचा. तिथे असताना पहिल्यांदा काळा सूर्य माझ्या चित्रांमधे उमटला. माझी पर्सनल स्पेस बदलली होती. माझ्या जीवनात आमुलाग्र बदल होत होता. आयुष्याचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या रंगांमधे तीव्रता आली, रंगांच्या भडकपणात, त्यांच्या तीव्र संवेदनांमधे माझा परक्या देशातला एकटेपणा मी बुडवू पहात होतो. गडद रंगाच्या अवकाशात माझ्या पेंटींगमधे उगवलेल्या काळ्या सूर्याने त्यानंतर मला आजवर सोबत केली. अनेक बदल, स्थित्यंतरं त्यानंतरही आयुष्यात आली, पण काळ्या सूर्याने साथ सोडली नाही.
पॅरिससारख्या महागड्या शहरात जगणं सोपं नव्हतं. बुक इलस्ट्रेशन्स केली त्यातून चरितार्थ चाले 
आणि पेंटींगकरता रंग विकत घेता येत.
त्यानंतर स्वत:ची जागा घेतली, लग्न केलं. माझी बायको फ़्रेन्च होती. जॅनिन आणि मी, तीन खोल्यांच्या माझ्या लहानशा जागेत रहाताना सुखी होतो, भारतातून अनेक जण यायचे, चित्रकार, मित्र, सर्वांचं माझ्या घरी स्वागत व्हायचं. त्यांची दुसरी काहीही सोय होईपर्यंत ते हक्काने माझ्या घरी रहात. अकबर पदमसी, रामकुमार, क्रिशन खन्ना, लक्ष्मण श्रेष्ठा, सूझा.. मित्र आले की त्यांच्याशी चित्रकलेवर, भारतातल्या कलाजगतातील घडामोडींवर बोलण्यात, गप्पा मारण्यात, चर्चा करण्यात आमचे तासनतास जायचे.
६४ साली माझ्या स्वत:चा पहिला स्टुडिओ मी पॅरिसमधे घेतला. स्वत:चा स्टुडिओ असण्याचा आनंद इतका की मी बारा बारा तास तिथेच रहायचो.
पुढची पंधरा वर्ष मी कठोर परिश्रम केले. गॉघ आणि सेझांच्या चित्रांमधे त्यांना सापडलेले रंग, रेषा, आकार यांच्या स्त्रोतापर्यंत मला जावून पोचायचं होतं आणि तिथून माझा रस्ता शोधायचा होता. 
सेझां, मातिझच्या चित्रांमधली फ़्रेन्च लॅन्डस्केप्स मी शोधली, तिथे गेलो, वेगवेगळ्या ऋतूंमधले तिथले रंग पाहिले, या मास्टर आर्टिस्ट्सने ते रंगम टेक्स्चर्स त्यांच्या पेंटींग्जमधे कसे उतरवले याचा अभ्यास केला. हा माझा स्वत:चा अभ्यास होता. मला कोणीही तसं करायला सुचवलं नव्हतं. मी जुने बंध तोडून, नव्याचा पुरस्कार करणारा प्रोग्रेसिव्हचा चित्रकार होतो. आधीच मळवलेल्या पायवाटेवरुन, मग ती कितीही किर्तीशिखरावर पोचवणारी असली, तरी त्या रस्त्यावरुन मी चालणं शक्यच नव्हतं. 
मला माझा रस्ता शोधायचा होता. आणि या परक्या देशात तो मी तसा शोधल्यावरच त्या देशाने 
मला आपलंसं केलं.
स्पष्ट विचार, तर्कशुद्ध विचार करायला मी फ़्रान्समधे शिकलो.
सूझा आणि पदमसी सोबत मी गॅलरी सेंट प्लासाईद मधे भरवलेलं प्रदर्शन खूप गाजलं. आमची 
सगळी पेंटींग्ज विकली गेली. या प्रदर्शनानंतर पॅरिसमधल्या मोठ्या, प्रतिष्ठीत गॅलरीजनी माझी दखल घेतली. त्यानंतर मग माझी प्रदर्शनं गॅलेरी ला फ़्रान्स, सेक्रूझ, म्युझियम ऑफ़ मॉडर्न आर्टमधे व्हायला लागली. जगभरातून, व्हेनिस बिएनाले, ब्रसेल्स, न्यूयॉर्क, ब्रिटन, टोकियोमधून मला प्रदर्शनांची निमंत्रणे यायला लागली.
पॅरिसमधे माझ्या चित्रांची स्तुती होत होती, विक्रीही होत होती, पण माझं असंतुष्ट मन अजून काहीतरी वेगळेपणाची मागणी करत होतं. एरवीच्या आयुष्यात असंतुष्ट असणं, स्थैर्य नकोसं वाटणं या गोष्टींना सुखी जीवनाच्या आड येणारा शाप समजतात पण चित्रकाराच्या किंवा कोणत्याही कलावंताच्या बाबतीत असंतुष्टता हे वरदान असतं असं मला वाटतं. मला पुन्हा एकदा बदल हवासा वाटत होता. एकोल द पॅरिसचा एक भाग म्हणून काम करण्यापेक्षा काही वेगळं मला हवसं वाटत होतं. माझी चित्र तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट होती, सगळं चांगलं चाललं होतं पण मला एक आंतरिक अस्वस्थता जाणवत होती.
मला अगदी तरुण वयापासून अध्यात्मिक गोष्टींची ओढ होती. लहानपणापासून सतत लाभलेला निसर्गाचा सहवास कदाचित मला आधी चिंतनाशी आणि मग अध्यात्माशी जोडत असेल. पण मला त्याची गोडी आणि उमज कायमच होती, ती कधीही कमी झाली नाही. उलट प्रौढ वयात त्याचं प्रतिबिंब माझ्या चित्रांमधूनही उमटलं. माझी भारताशी घट्ट जोडली गेलेली नाळ कदाचित मला माझ्या पेंटींग्जमधून उमटललेल्या बिंदू, श्लोकवचन, स्पंदन, बीज, शांती अशा गोष्टींशी संबंध असू शकतो. द्न्यानेश्वरीचं वाचन मी अनेकदा केलं होतं. आळंदीलाही जाऊन आलो होतो. मन अस्वस्थ असलं की मला अनेक संतवचनं आठवायला लागतात. माझी पेंटींग्ज हे माझ्या आयुष्याचं, माझ्या विचारांचं प्रतिबिंब होतं. पण माझ्या लक्षात आलं की मी करत असलेलं चिंतन माझ्या चित्रांमधून दिसत नाहीये. माझी चित्रं बाह्य संरचना भक्कमपणे वागवत आहेत पण आता गरज आहे ती गाभ्यात शिरण्याची. आत डोकावून पहाण्याची. बीजाकडे जाण्याची. तसं केल्यावरच 
मला माझ्या वरचा विस्तार तटस्थपणे पहाण्याची संधी मिळणार होती.
७० च्या आसपास मी भारतात आलो होतो तेव्हा जो प्रवास केला त्याप्रवासात मला पहिल्यांदा 
माथ्यावर काळा सूर्य दिसला. 
अजिंठा-वेरुळची शिल्परचना, बनारस, गुजरात, राजस्थान असं मी खूप फ़िरलो.. भारतीय लोक संस्कृती, लोकजीवनाचे, त्यात रुजलेल्या अध्यात्माचे रंग मी त्यावेळी खूप जवळून पाहीले. आणि ते जेव्हा माझ्या पेंटींगमधून उमटलं तेव्हा परदेशात मला माझी स्वत;ची भारतीय ओळख मिळाली. 
माझ्या चित्रशैलीमधे पुन्हा एक बदल आपोआप झाला. बिंदूचं आगमन माझ्या चित्रामधे झालं. 
काळा सूर्य उगवला होता.
डिस्कव्हरी ऑफ़ बिंदू.. मला लगलेला बिंदूचा शोध हा माझ्या आयुष्यातला, कलाकारकिर्दी्तला सर्वात मोठा बदल.
बिंदू म्हणजे महासागर आहे, नवनिर्मितिचे केन्द्र आहे, गर्भ आहे, तो पूर्णविराम नाही, ती नव्याची 
सुरुवात आहे.
जॅक्सन पोलॉक, कूनिंगसारख्या ऍबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिस्ट आर्टिस्ट्समुळे जागतिक चित्रकलेमधे फ़ार मोठे क्रांतिकारी बदल घडून आले होते. पेंटींग्जच्या कोणत्याही संरचनेला महत्व न देता केवळ रंग लावणे या एकाच प्रक्रियेतून पेंटींग्जच्या संकल्पनेचा विचार करणे चित्रकारांना आव्हानात्मक वाटत होते. नवनवे प्रयोग, बदल चित्रकलेत झपाट्याने घडून येत होते. माझ्या विचारांची बदललेली दिशा याला पुरक अशीच होती. बदल अपरिहार्य होता. रंगांचा अधिक मुक्त वापर मी करायला लागलो. ऑइल कडून ऍक्रिलिककडे वळलो.
हा झाला वरवरचा बदल. पण आंतरिक विचारपद्धतीत होत असलेला मुलभूत बदल जास्त महत्वाचा होता.
मी जितकं स्वत:च्या आत डोकावून पहात होतो तितकेच स्वत:च्या मुळांशी नव्याने जोडला जात होतो. मला मेवाड, माळव्यातल्या मिनिएचर्सची आठवण सातत्याने येत होती. माझ्या चित्रांमधले रंग माझ्या आठवणींची तीव्रता दाखवून देत होते. लहानपणी पाहिलेल्या दाट, गर्द जंगलातील अग्नीज्वालांसारखे झळाळते पलाश, गुलमोहोर आणि काळ्या, हिरव्या पर्णसंभारांच्या खूणाही चित्रांमधे येत होत्या.
आम्ही नर्मदा नदीच्या तीरावर, मंडल्याला बरीच वर्षं रहात होतो. तिथल्या घनदाट जंगलांचं आकर्षण आणि भिती एकाचवेळी वाटायची. कान्हाच्या जंगलातल्या अगदी आतल्या भागात अनेकदा रहायची वेळ येई. तेव्हा संध्याकाळी, रात्री जंगलांमधे दूरवर चित्रविचित्र प्रकाश दिसायचे. कुठेतरी वणवा पेटला असायचा किंवा अंतर्भागातल्या गोंड आदिवासींच्या पलित्यांचा तो प्रकाश असे. पहाटेचा सोनेरी प्रकाश पडला की सुरक्षित वाटायचं. पण रात्रीच्या जंगलातले झळाळते रंग नजरेसमोरुन हलायचे नाहीत. 
बाजाराच्या दिवशीही मला बाजारात जावसं वाटायचं त्याचं कारण तिथली रंगांची उधळण हेच. या गोष्टी मी कधी विसरलोच नव्हतो. पॅरिसच्या कृत्रिम वातावरणात, एकरंगी हिवाळी दिवसांमधे मला सोबत केली ती या रंगांनीच.
तम शून्य. अंधार बिंदू. काळा सूर्य. या संकल्पनेशी मी गेली कित्येक वर्षं खेळतो आहे. वेगवेगळ्या 
रुपांमधून तो माझ्या चित्रांमधे डोकावतो. माझ्या मनाच्या, जीवनाच्या सगळ्या स्थित्यंतरांमधे स्थिर आहे तो हा काळा बिंदू. हा काळा बिंदू उर्जा प्रसवतो, रंग पसरवतो. हे बीज आहे नवनिर्मितीचे. हा काळा बिंदू आता नव्याने माझ्या जवळ आला होता खरा पण त्याचे अस्तित्व माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून होते.

बाबरीयाला प्राथमिक शाळेत शिकत असताना माझं लक्ष वर्गात कधीच स्थिर नसे. मन सारखं जंगलात, झर्याच्या काठावर रेंगाळत असे. तिथे हुंदडायला जाण्याकरता माझी चलबिचल चालू असायची. 
माझी अस्थिर मनोवृत्ती माझ्या शिक्षकांनी बरोबर हेरली. त्यांनी एक दिवस शाळा संपल्यावर मला थांबवून घेतले आणि वर्गातल्या पांढरा चूना लावलेल्या भिंतीच्या समोर मला बसायला लावून त्या भिंतीवर त्यांनी हातातल्या पेन्सिलीने एक काळा बिंदू काढला आणि मग मला त्या बिंदूकडे टक लावून बघत बसायला सांगीतले. सुरुवातीला मला काही सेकंदही त्या बिंदूकडे बघणे शक्य होईना. पण मग हळू हळू तो त्या बिंदूवर नजर स्थिरावली. तो काळा बिंदू माझ्या मनात, अंतर्मनात घुसला. किती दिवस त्या शिक्षकांनी हा प्रयोग केला ते मला आत्ता आठवत नाही. पण तो काळा बिंदू माझ्या अंतर्मनात स्थिरावला तो कायमचा. भोवतालचा कोलाहल, शहरी ताण तणाव, गजबजाट असह्य होतो तेव्हा मी आतल्या काळ्या बिंदूवर मन स्थिर करतो. माझं मन नवऊर्जेने भरुन जातं. या बिंदूतून रंग, रेषा, आकार, पोत, रचना माझ्या समोरच्या कॅनव्हासवर आपोआप जन्म घेतात.

एक काळ असाही आला जेव्हा सगळं रिकामं झालं होतं. मी आत डोकावलो पण आतही काही सापडेना. प्रत्येक सर्जक कलावंताच्या जीवनात असे अंधारे क्षण कधीतरी येतातच. जेव्हा कोणतीही नवी निर्मिती शक्य होत नाही. जमीन बंजर होऊन जाते. हे अंधारे, रिकामे क्षण सुन्न करणारे असतात. मी धीर सोडला नाही. काळा सूर्य मला दिशा दाखवेल, काळा बिंदू नवनिर्मिती करेल ही मला खात्री होती. आणि एक दिवस नर्मदामैय्याचं पाणी माझ्या नसांमधून पुन्हा वहाताना मला जाणवलं. मी कोण आहे? माझ्या अंतर्मनातली खळबळ कशाकरता चालली आहे? हे विचार स्थिरावत गेले आणि नदीच्या खोल, संथ पात्राप्रमाणे माझ्यातल्या कलानिर्मितीचा ओघ पुन्हा वहायला लागला. 
दिव्य शक्तीयोंके बिना चित्र नही बनते हे मी कायम म्हणत आलो आहे हे या अनुभवामुळेच.

फ़्रान्समधे रहात असलो तरी भारताच्या माझ्या भेटी वारंवार चालू होत्या. अगदी सुरुवातीला आर्थिक स्थैर्य नव्हते तेव्हा येणं व्हायचं नाही, पण सत्तरनंतर मी नियमित भारतामधे येत राहीलो. भारतातील चित्रकार, कवी, लेखक, विचारवंतांच्या भेटींचे मला आकर्षण असायचे. मी खूप फ़िरायचो भारतात आल्यावर. भोपाळला असताना मुक्तीबोध, अग्नेय, निराला, केदारनाथ सिंग यांच्यासारख्या महान कवींचा परिचय झाला. त्यांच्या कविता मला स्फ़ुर्ती पुरवतात.
भारतीय तंत्रशास्त्र, प्रतिकं, श्रीचिन्ह यांचा वापर बिंदूसोबत माझ्या चित्रांमधून नंतरच्या काळात वारंवार केला गेला तो या भारतभेटींदरम्यान मी घेत असलेल्या तत्वद्न्यानाच्या शोधामुळेच. 
निओतांत्रिक भाषेत बिंदूचा अर्थ स्त्रीसर्जनाशी संबंधित आहे. विश्वाचे बीज, मध्यवर्ती उर्जाकेन्द्र. बिंदूसोबत त्रिकोणही जोडलेला आहे. कुंडलिनीच्या संकल्पनेचेही मला आकर्षण आहे. सुप्त उर्जा जागृत केल्यावर नवनिर्मितीचा जो विस्फ़ोट होतो तो कल्पनातीत असतो. आपल्या वेदांमधे हे द्न्यान लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहे. माझ्या चित्रांमधून त्याचे फ़क्त काही कण मी चितारले. 
विश्व स्थिर नाही, सतत बदलते आहे त्याचे कारण ही उर्जा आहे. माझ्या अंकुरण या चित्रमालिकेमधे मी या संकल्पनेचा वेध घ्यायचा प्रयत्न केला.

मी अनेकदा स्वत:शी विचार केला की माझ्या चित्रांमधे हे बिंदू, वर्तुळं, झळाळते रंग कुठून येतात? 
लाल रंग तर भारतीय संस्कृतीच्या केन्द्रस्थानी आहे. सिंदूराचा रंग, रक्ताचा रंग, सूर्योदय सूर्यास्ताचा हा रंग.
फ़्रान्समधे सहा दशकं घर करुन राहीलो तरी मी इथे अधून मधून नेहमी येत होतो, इथल्या कलावर्तुळाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध कायमच होते, मात्र आता इथे कायमचे परतून आल्यावर मला नेमके काय बदल जाणवतात, आमची पिढी आणि आत्ताची पिढी यादरम्यान चित्रकलेमधे नेमके काय बदल झाले, दृष्टीकोनांमधे काय बदल झाले आहेत हे सर्व मी आता जाणून घेण्याच्या प्रक्रियेमधे आहे. इथे परतल्यावर लोकांनी खूप प्रेमानी, उबदारपणानी मला जवळ घेतलं, मी कधी दूर गेलोच नव्हतो असं समजून मला आपल्यात सामवून घेतलं, लोकांच्या या प्रेमानी, जिव्हाळ्यानी मी भारावून गेलो आहे. अनेक तरुण चित्रकार मला भेटायला या स्टुडिओत येत असतात, रझा फ़ाउंडेशनतर्फ़े आम्ही अनेक कार्यक्रमही आयोजित करत आहोत. त्यानिमित्ताने मला कलाक्षेत्रातले बदल समजावून घेता येत आहेत. खूप वेगवेगळ्या दिशांनी आजचे तरुण चित्रकार पुढे जात आहेत. नवी माध्यमं हाताळत आहेत. जागतिकीकरणाचा परिणाम कलाक्षेत्रावर चांगला, वाईट दोन्ही प्रकारे झाला आहे असं वाटतं. जास्त संधी मिळत आहेत, स्पर्धा वाढली आहे पण काही वेळा वेगळेपणा दाखवताना त्यात एकसुरीपणाही येतो आहे. नवे प्रयोग होत आहेत, नवे बदल घडवायला नवी पिढी उत्सुक आहे हे 
आशादायी आहे.
आजच्या चित्रकारांमधे परस्परांमधे संवाद कमी आहे, त्यांना त्याकरता काही कॉमन प्लॅटफ़ॉर्म फ़ारसा मिळत नाही असं वाटतं. 
पाश्चात्य जगात भारतीय कलेला आज स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळालेली आहे, पण तरीही ती काही चित्रकारांपर्यंतच मर्यादित आहे. नव्या पिढीच्या चित्रकारांना अजून स्वत:ची स्वतंत्र ओळख जागतिक चित्रकलेच्या प्रांतात निर्माण करता आलेली नाही असं वाटतं.
--
देशाबाहेर जाणे म्हणजे तुमच्या आईला सोडून जाणे. ते मी केलं. हा प्रवास आवश्यक होता. मी फ़्रान्सशी कृतद्न्य आहे पण इथे परतलो याचा आनंद सर्वाधिक आहे, पॅरिसमधे मी रमलो होतो पण मला कधीतरी मी माझ्या मुळांकडे परतणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. तसेच झाले. 
दोन वर्षांपूर्वी मी कायम भारतात रहाण्याकरता परतलो. पुनरागमनायच असं आपल्या हिंदू संस्कृतीने मला पॅरिसमधे जाताना बजावलं होतं बहुधा. त्याकरताच दिल्लीला मी इथे आल्यानंतरचं पहिलं प्रदर्शन भरवलं ते याच नावाने.
फ़्रान्समधे, चित्रकलेच्या पंढरीमधे एका भारतीय चित्रकाराचे रहाणे, स्वत:ची भारतीय ओळख चित्रांमधून टिकवणे सोपे नाही. मला ही ओळख निर्माण करणे, टिकवणे अत्यंत कठीण गेले. पण मी माझ्या अंगभूत चिवटपणामुळे, घट्ट मुळांशी जोडलेले रहाण्यातून, भारतीय तत्वद्न्यानाचा, अध्यात्माचा सखोल अभ्यास केल्यामुळे हे साध्य करु शकलो. पण त्याहीपेक्षा जास्त माझ्यातल्या बदलांना सकारात्मकरित्या सामोरे जाण्याच्या आंतरिक शक्तीमुळेच. बदल घडवून आणण्याच्या तीव्र आकांक्षेतून. -शब्दांकन: शर्मिला फडके
पूर्वप्रकाशन- लोकमत ’दीपोत्सव’

No comments: