Monday, April 06, 2015

शहरातली ’समोवार’ जेव्हा बंद होत जातात-

समोवारहे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतात. मुंबईसारख्या गजबजाटी, कोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव समोवारअसतं.
--
सकाळचे अकरा वाजले की एक परदेशी तरुण मुलगी आपल्या लहान मुलीला प्रॅममधे घालून रोज त्या रेस्टॉरन्टमधे यायची, पॉट टी मागवायची आणि तिथल्या टेबलावर बसून पुस्तक वाचायची किंवा पत्र लिहायची. लिहिताना काहीवेळा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे. चेहराही अनेकदा दमलेला दिसायचा. रेस्टॉरन्टच्या मालकिणीच्या ते लक्षात आलं तेव्हा तिने ऑर्डर दिलेली नसतानाच त्या टेबलावर ऑमलेट आणि ज्यूसही पाठवायला सुरुवात केली. पत्र लिहिणारी सावकाश ते संपवायची. मग बिल देऊन मुलीला घेऊन निघून जायची. जाताना रेस्टॉरन्टच्या मालकिणीचे आभार मानायला विसरायची नाही. मग हळू हळू गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की ती तरुण मुलगी आपल्या इंग्लंडमधल्या नातेवाईकांना खूप मिस करतेय. भारतात रहाण्याची, इथल्या आयुष्याशी जुळवून घेण्याची सवय करण्याची धडपड करताना थकून जातेय. आपल्या लहान मुलांचं आवरुन, घरातलं काम करुन, नव-याचं खाणंपिणं करुन तो कामावर गेला की ती इथे येते आणि इथेच फ़क्त तिला निवांत वेळ मिळतो घरच्यांना पत्र लिहून खुशाली कळवण्याचा, तिकडच्या मित्र-मैत्रिणींना इथल्या गमती जमती कळवायला. काही दिवसांनंतर एका संध्याकाळी ती आपल्या नव-यासोबत तिथे आली. तेव्हा रेस्टॉरन्टच्या मालकिणीला कळलं की तरुणी शशी कपूरची बायको, जेनिफ़र केन्डल कपूर आहे. प्रॅममधली ती चिमुरडी होती संजाना कपूर. ते रेस्टॉरन्ट होतं नुकतंच बंद झालेलं सामोवार.

सामोवार बंद होणार हे कळल्यावर संजाना कपूरने ही आठवण सांगीतली. ती जेव्हा सांगते की ती अक्षरश: या जागेत वाढली आहे, लहानपणापासूनचे अनेक आनंदाचे क्षण या जागेत साठून आहेत तेव्हा त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

एकटा, एकाकी आरा, कॅनव्हासचं ओझं घेऊन हिंडणारा, समोवारमधे बिनदुधाचा चहा पित गप्पा मारणारा. कधी समोवारमधे न खाणारा. त्याला वांग्याचं भरीत खावसं वाटलं तेव्हा त्याने समोवारमधूनच तेरा रुपये घेतले वांगी, टोमॅटो, मिरच्या आणायला आणि मग तिथल्या किचनमधे ते बनवलं.

मुंबईतून फ़्रान्सला गेलेले आणि तिथून पुन्हा पुन्हा मुंबईत येत राहिलेले, परत जात राहिलेले रझा जहांगिरमधे झालेल्या त्यांच्या एका चित्रप्रदर्शनानंतर खूप उशिरा, सगळी गर्दी ओसरल्यावर सामोवारमधे चहा प्यायला आले आणि जाताना टेबलावरच्या पेपर नॅपकिनमधे लिहून गेले- “किप मी बॅक, डोन्ट लेट मी लिव्ह, क्लास्प मी टू दिज शोरस- मुझे आप यहां रोक लिजिए-”.

लक्ष्मण श्रेष्ठ नेपाळवरुन जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकायला आले चित्रकलेच्या ओढीने. घरच्यांचा विरोध होता त्यामुळे जवळ पैसे नसायचेच. होस्टेलवर जेमतेम रात्री झोपण्यापुरता आसरा. अशात जे जे मधून पास आऊट होत असतानाच त्यांचं प्रेम जडलं एका सुंदर, श्रीमंत घरातल्या मुलीवर. जहांगिर आर्ट गॅलरीच्या पाय-यांवर ते तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत बसायचे. सामोवारच्या उषा खन्नांनी बरेच दिवस ते पाहिलं आणि त्याला आत रेस्टॉरन्टमधे येऊन बसत जा असं सुचवलं. तो मुलगा संकोचला. त्याच्याजवळ तिथे रोज चहा प्यायला पैसे नव्हते. पण सामोवारमधे चालत होतं जमेल तेव्हा पैसे दिलेले. तो मुलगा हळू हळू तिथे इतका रमला की एकदा त्याने विचारलं की मूली का आचारका बनवत नाही तुम्ही इथे? हा खास नेपाळी पदार्थ त्याला त्याच्या मैत्रिणीला खिलवायचा होता. तेव्हा त्याच्याकडूनच रेसिपी घेऊन ते बनवलं गेलं. मग तो पदार्थ मेनू कार्डावर आला. लक्ष्मण श्रेष्ठांचं पुढे त्या मुलीशी म्हणजे सुनिता परळकरांशी लग्न झाल्यावर सामोवारच्या स्टाफ़ने त्यांना पार्टी दिली. लक्ष्मण आणि त्यांची बायको सामोवारमधे नियमित येत राहिले, अगदी परवा सामोवार बंद होईपर्यंत. लक्ष्मण आवर्जून सांगतात की गरज होती तेव्हा पेंटींगची मोठी कामं त्यांना मिळाली हुसेनसारख्या इथेच मिळालेल्या मित्रांनी करुन दिलेल्या इथल्या ओळखींमधून.

लक्ष्मण श्रेष्ठ, आरा, जेनिफ़र कपूरसारखे अनेक जन असतात या अवाढव्य, गजबजलेल्या शहरात पण समोवारसारख्या जागा मात्र अगदीच मोजक्या, शेवटच्या काही उरलेल्या.

मुंबईसारख्या शहरात असं एखादं रेस्टॉरन्ट अशा या अनेकांकरता काय असतं नेमकं?

जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकणारे, तिथून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेले आर्टिस्ट, थिएटर, सिनेमामधे काही नवं करु पहाणारे, लिहू पहाणारे, कविता करणारे, स्वप्न पहाणारे हजारो तरुण आणि तरुणी.
काय हवं असतं त्यांना शहरात?

जवळ पैसे नसतात तेव्हा त्यांना उधारीवर खाण्याची मुभा, काम मिळवायला फोन करायला लागतो म्हणून कॅश काउन्टरजवळच पब्लिक बूथची सोय, चित्रकारांना त्यांची चित्र विकत घेऊ शकतील अशांशी ओळखी, लेखकांना लिहायला एक निवांत टेबल, कार्टुनिस्टकरता समोर अनेक इंतरेस्तींग चेहरे, एकंदरीत अनेकांना दिवससभर हवी तितकी, हवा तितका वेळ बसता येईल अशी जागा, ज्यांच्याकडे परमनन्ट अड्रेस नाही अशांना पत्रव्यवहार करण्याकरता एक पत्ता. कवी, पत्रकार, उभरते लेखक, जाहिरात व्यावसायिक, सिनेमा नाटकांमधे काम करणारे सगळेच एका ठिकाणी जमा होणार, मग त्यातून अनेक पुढील काळात दंतकथांचं स्थान मिळालेल्या गोष्टी घडणार. पत्रकारांना शहरातल्या सांस्कृतिक घडामोडी टिपायला वाव.. ताज्या बातम्या कळण्याचं, बातम्या घडण्याचं एक ठिकाण.

दमून भागून समोवारमधे येऊन टेकणं हे घरात येऊन टेकण्यासारखंच. रेस्टॉरन्ट अनेकांच्या लग्नाला साक्षीदार राहिलं, त्यांच्या डिव्होर्सलाही ते साक्षी होतंच. जतीन दासांनी आपलं लग्न सामोवारमधेच पंडिताला बोलावून इथल्या स्टाफ़च्या साक्षीने लावलं आणि मग त्याची आठवण म्हणून रेस्टॉरन्टच्या छतावर न्यूड काढलं. लग्न टिकलं नाही पण त्याने काढलेलं छतावरचं पेंटींग टिकलं अनेक वर्षं. मग एका पावसाळ्यात गळणा-या छतावरचं न्यूडही पुसलं गेलं. जतीन दासांनी नवं लग्न केलं. ते आणि त्यांची नवी बायको येत राहिले. नाती जमली, तुटली, पुन्हा जुळली इथे.

गीव्ह पटेल, अकबर पदमसी, जहांगिर सबावाला, अर्पना कौर, अंजोली इला मेनन, जोगेन चौधरी, अल्ताफ़, प्रोतिमा बेदी, रत्ना पाठक, नासिरुद्दीन शहा, शाम बेनेगल, अमोल पालेकर..  न्यू वेव्ह सिनेमाच्या जन्माला, बहराला, आधुनिक, समकालिन कला मुंबईत रुजत जाताना समोवार साक्षी होतं.
ज्ञानेश्वर नाडकर्णी, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, रणजित होस्कोटे, निस्सिम इझिकेल, अनिल धारकर, डॉम मोरेस, फ़्रॅन्क सिमोससारखे अनेक जण मुंबईच्या बदलांच्या, घडामोडींच्या नोंदी वृत्तपत्र, कविता, लेखांमधून वेध घेणारे इथे रमले, प्रसिद्ध झाले, अस्ताला गेले.
फ़ॅशन्स बदलल्या, बेल बॉटम आला, नाहिसा झाला, पुन्हा आला. बलराज सहानी पासुन आय एस जोहर पर्यंत, शोभा राजाध्यक्ष पासुन डॉली ठाकोर, पर्ल पदमसी, कबीर बेदी, शाम बेनेगल, लक्ष्मण श्रेष्ठ, परिक्षित सहानी, आरा, सत्यदेव दुबे अशांना यशाच्या उंबरठ्या अलिकडे झगडताना आणि मग तो ओलांडून जाताना पाहिलं.

जेव्हा खिसे रिकामे असलेले भणंग सृजनाच्या उर्मी मनात घेऊन शहरातल्या रस्त्यांवर, गल्ल्यांमधून भटकत असतात तेव्हा त्यांना अशा जागांची गरज असते. शहरातली कला-साहित्याची संस्कृती मग इथेच रुजते, फ़ोफ़ावत रहाते.  
समोवारसारख्या जागा गजबजलेल्या शहरातले सांस्कृतिक ओऎसिस असतात. अशा जागा फ़क्त भेटण्याच्या, खाण्यापिण्याच्या जागा नसतात. इथले खाद्यपदार्थ उकृष्ट असतीलच असं नाही पण ते त्यांच्या चवीला, खिशाला परवडणारे, रुचणारे बनत गेलेले असतात.
इथे येणारी माणसं घडतात, मोठी होतात आणि मग जागाही मोठी होते, प्रसिद्ध होते. ग्लॅमरसही होते. पण ती उर्मट होत नाही, स्नॉबिशही नाही. ती येणा-याला जिव्हाळा देत रहाते
  
हळू हळू शहर बदलत गेलं. बॉम्बेचं मुंबई झालं. रस्ते बदलले, नकाशे बदलायला लागले. इराणी कॅफ़े एकामागोमाग एक नाहिसे होत गेले, कॉफ़ी हाऊसेस बंद पडत गेली. स्ट्रॅन्ड सारखी घरगुती जिव्हाळ्यातून चालवलेली पुस्तकांची दुकाने बंद पडली. मिनर्व्हा, मेट्रो, रॉक्सी बंद पडलं, नाट्यगृह बंद पडली. एकेका फ़्लायओव्हरखाली अशी अनेक ठिकाणं जमिनदोस्त होत गेली. शहराच्या नकाशावरची निवांत बेटं होती जी हळू हळू खचत गेली, शहरातल्या वाढत्या चकचकाटात, झगमगाटात बुडून गेली.
तरी सामोवार होतं. ते होतं तोवर या बदलांची झळ लागली नाही. पण आता तेही नाही आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की आता यानंतर काय? अजून एखादी अशी जागा आहे का शहरात याचा विफ़ल शोध घ्यायचा की तशी निर्माण होईल अशी आशा करत रहायचं की आता काळ इतका बदललाच आहे तर अशा जागांची गरजही नसणार आपल्याला आणि कुणालाच असं समजत रहायचं?

शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो. आणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जात आणि ते शहराच्या इतिहासात फ़ेकलं जातं. अनेक जण हळहळतात. त्यात सामान्य असतात, नोकरी असलेले असतात,  नसलेले असतात. शिकणारे असतात, स्ट्रगलर्स असतात. सेलेब्रिटी असतात. स्थिरावलेले, नाव कमावलेले, स्थलांतरीत, पर्यटक, अगदी हायकोर्टातले वकिल, दलाल स्ट्रीटवरचे बनिये असे अनेक जण त्या हळहळणा-यांमधे असतात. त्या जागेत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. आठवणी अडकलेल्या असतात तिथल्या टेबलखुर्च्यांमधे. ते जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा त्यांना एक कप चहावर तासनतास बसून रहायला, सिगरेटच्या धुरात विचारांची वर्तुळं काढायला, चर्चा करायला, योजना आखायला, त्या कागदावर मांडायला, इतरांची मतं आजमावून बघायला, आपल्यासारख्या इतर काहींचं नेमकं काय चाललय काय चाललेलं नाही ते चाचपडायला इथे जागा मिळालेली असते. खिशात पन्नास रुपये असणा-याला आणि पाच हजार असणा-यालाही सामावून घेण्याची क्षमता अजून कुठे असणार?
इंच इंच जागेचा हिशेब लावणा-या महागड्या शहरात अशा बेहिशेबी जागांचं मोल करता येत नाही.

सुख वाटायला, दु:ख शेअर करायला, निराशा गिळून टाकायला अशा जागांची गरज असते. शहराच्या कॉस्मोपोलिटन संस्कृतीमधे संवाद निर्माण व्हायला, एकजिनसीपणा वाढवायलाही या जागा गरजेच्या असतात.
समोवार बंद पडतात तेव्हा भेटण्याच्या जागा हरवतात. गप्पांची ठिकाणं हरवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबांनी, मित्रमैत्रिणींनी एकत्रित घालवलेले अनेक क्षण ज्या जागांमधे भरलेले असतात त्या जागा शहरातल्या रस्त्यांवरुन अचानक नाहिशा होतात.
शहरातली लोकं मग आठवणी काढत रहातात. कधी वे साईड इनच्या, कधी भुलाभाई मेमोरियल सेंटरच्या, आर्टिस्ट सेंटरच्या, कोप-यावरच्या इराण्याच्या.
अशा जागेला त्याचं असं खास व्यक्तिमत्व असतं, जे इथे येणा-यांच्या व्यक्तिमत्वातून उत्क्रांत होत जातं, घडत जातं. तेही मग हरवतं.  
आणि मग शहर एकसुरी बनत जातं. जास्त यांत्रिक. मल्टीनॅशनल बॅन्क्स, ब्रॅन्डेड शॉप्स, चेन रेस्टॉरन्ट्सच्या साचेबद्ध सजावटीखाली शहर आपला चेहरा हरवत जातं. गुळगुळीत होत जातं शहराचं व्यक्तिमत्व. इतर चार आंतरराष्ट्रीय शहरांसारखंच ते एक.
शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. शहर थोडं थोडं झिजत जातं. थोडं थोडं पोकळ होत जातं.
शहरातला उबदारपणा, लोभसपणा थोडा थोडा हरवत जातो.
--
शहराला हवी असते एक जागा, जिथे गप्पा होतील निवांत, प्रेमात पडलेल्यांना नुसतंच बसता येईल एकमेकांच्या सहवासात संध्याकाळच्या सावल्या लांबेपर्यंत. स्ट्रगलर्सना आपली उमेद टिकवायला, निराशा लपवायला जागा मिळेल, भविष्याची स्वप्न रंगवायला, रंगवलेली कागदावर उतरवायला. कलाकारांना, लेखक-कवींना निवांतपणा मिळेल. एखाद्या वयस्कर, स्पर्धेत मागे पडलेल्या कलाकाराला आसपासच्या ताज्या, उमेदीच्या तरुण कलाकारांच्या सहवासात नवी उर्जा मिळेल. जागा नुसती निवांत असून चालत नाही. तशी तर अनेक एकट रहाणा-यांच्या फ़्लॅटमधेही ती असतेच. पण गरज असते वातावरणातून उर्जा मिळण्याची, इन्स्पायर होण्याची. सातत्याने येणा-या सर्जनशील व्यक्तींमुळे निर्माण झालेल्या सिनर्जीची. बिझिबीने आपले कॉलम मागून कॉलम समोवारच्या टेबलांवर बसून लिहिले ते अशा वातावरणामुळेच. नाहीतर निवांतपणाची त्याला काय कमी असणार?

मॉलच्या पाय-यांवर, फ़ूडकोर्टात, स्टारबक्स, सीसीडीमधे, टी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं


इतक्या जलद आणि मोठ्या प्रमाणावर नकाशे बदलत जात आहेत की लोकं विसरुनच जातील शहरात अशी बेटंही होती जिथे साधेपणा, आपलेपणा, उबदारपणासोबत सांस्कृतिक जिव्हाळा फ़ुकट मिळत होता
--
लेख लोकमतच्या 'मंथन' पुरवणीमधून पुनर्मुद्रित.

Sunday, February 02, 2014

ज्याचं त्याचं लिटफ़ेस्ट

जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.

गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?


लिटफ़ेस्ट मला नव्या नव्हत्या. अर्थात आजवर उपस्थित राहीलेल्या लिटफ़ेस्ट्स किस झाड की पत्ती वाटाव्या असा इथला प्रचंड पसारा. नोबेल, पुलित्झर, बुकर विनर, आंतरराष्ट्रीय साहित्यिक इथे आमंत्रण मिळावं म्हणून उत्सुक असतात. जगातली सर्वात मोठी विनामूल्य लिटरेचर फ़ेस्ट म्हणून लौकिक यांच्या खाती जमा आहे. पाऊण लाख लोकं यावर्षी भेट देतील असा अंदाज.
जयपूर लिटफ़ेस्टचं उद्घाटन सकाळीच अमर्त्य सेनांच्या भाषणाने झालं होतं. ते आणि नंतरचे जेवणाच्या वेळेपर्यंतचे कार्यक्रम सगळे मिस झालेले. आता दुपारच्या सत्रातले सगळे अटेंड करायचे हा विचार मनात. पण ते नेमके कुठे, कोणते ठरवताना गोंधळ उडत आहे.

हातातल्या भरगच्च प्रोग्रॅम शेड्यूल मधली दडपवून टाकणारी नावं, विषय वाचताना हे सगळं आपल्याला झेपणार आहे का, नेमकं कशाला आलो आहोत आपण इथे? वाटायला लागतं. आपण जागतिक साहित्य वाचनात खालच्या पायरीवरच अजून, काहीबाही लिहितो म्हणून रजिस्ट्रेशन टॅगवर नाव लेखिका लागले आहे इतकंच. पण प्रादेषिक भाषेला कोण विचारतय इथे? काही असेल आपल्याकरता मग इथे? असं काही ऐकण्याने जाणीवा अचानक समृद्ध वगैरे होतील, बौद्धिक पातळी उंचावेल अशा भ्रामक कल्पनाही सोबतीला नाहीत.
भारतीय लेखक माहीत आहेत, झुंपा लाहिरी, कॅथरिन बू, ग्लोरिया स्टाइन्मेनला ऐकायची, बघायची उत्सुकता आहे, पण बाकी?

इतक्यात बाजूच्या डेस्कवर कोणीतरी येतं. माझ्या अगदी शेजारी. सहा फ़ूट उंची, पांढरे-शुभ्र केस, भारतीय सावळा, हसरा, मृदू, देखणा चेहरा. मी उत्सुकतेनं गळ्यातल्या टॅगवर नजर टाकते. पार्थ मित्तर. पार्थ मित्तर? हे नाव कसं विसरले? ते वाचूनच रजिस्ट्रेशन केलं. प्रत्यक्ष पार्थ मित्तर त्यांच्या ’मच मलाइन्ड मॉन्स्टर’ पुस्तकाच्या नव्या आवृत्ती संदर्भात बोलणार, ते पुस्तकाचे वाचन करताना आपण ऐकणार ही कल्पनाच माझ्याकरता थ्रिलिंग. मी पार्थ मित्तर भाग घेणार असलेल्या एकंदर तीन कार्यक्रमांवर टीकमार्क करते. ती करतानाच मग ऍन्ड्रू ग्रॅहम डिक्सन नाव दिसते. कारव्हॅजियो वर पुस्तक लिहिणारा. मी त्याही नावावर खूण करते. अचानक बरीचशी ओळखीची नावं दिसायला लागतात. निकोलस शेक्सपियर, राणा दासगुप्ता, अनिता नायर, कविता सिंग, आर्शिया सत्तारही माहीत आहेत. विल्यम डॅलरेम्पल, मायकेल सान्डल, समान्था विनबर्गही माहीत आहेत. मी खूणा करत जाते. काहीतरी मिळेलच माझ्याकरता.

आज लिटफ़ेस्टवर लिहिताना मनात पुन्हा गोंधळ. इतकं मिळालं आहे, अनुभवलं आहे ते फ़क्त काही थोडक्या शब्दांमधे कसं बसवायचं?



दिवस दुसरा, संध्याकाळचे पाच-

डिग्गी पॅलेसच्या चार-बागेमधे ’स्टोरी टेलिंग अराउंड द ग्लोब’ चर्चासत्र चालू आहे.
कला इतिहासतज्ञ, सौंदर्यशास्त्राच्या आणि बंगाली आणि राजस्थानी लोककथांच्या अभ्यासक जे.एन.यूच्या कविता सिंग मिनिएचर पेंटींग्जचं पारंपरिक कथनशैलीतलं स्थान समजावून देत आहेत. त्यांच्या सोबत इंग्लिश-चायनिज चित्रपट लेखिका शिओलू ग्वो, ज्यांनी लहान मुलांकरता वेगळ्या धर्तीची गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत, हार्वर्ड स्कॉलर किकू अदात्तो ज्या स्टोरीटेलिंगच्या पारंपारिक पद्धतींवर संशोधन करतात, आहेत. विल्यम डॅलेरिम्पल चर्चेचा मेळ राखत आहेत. स्क्रीनवर शाहनामा, पर्शियन, मुघल पेंटींग्ज. आपण ऐकण्यात गुंग.

गार, बोचरा वारा वहातो. अंगावर शिरशिरी येते. चारबागेतला हा खुला मंडप, गर्द झाडीने वेढलेला. बाजूला कमानदार भिंत, खास जयपूरी गर्द गुलाबी रंगाचा दगड. गारठा वाढतो आहे. उद्यापासून अशा उघड्या टेन्टमधले कार्यक्रम संध्याकाळी मिस करायचे. कुल्हडमधल्या वाफ़ाळत्या चहाची उब पुरत नाही. मंदावलेला प्रकाश जाणवतो. स्क्रीनवर झुकलेलं बाजूचं डेरेदार झाडही मिनिएचर पेंटींगमधनं उठून आल्यासारखं वाटायला लागतं. अचानक कुठूनतरी तीन देखण्या लांडोरी उडत येऊन बाजूच्या दगडी कमानीवर विसावतात, लगेच भरारी घेत नाहीशा होतात, आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. आणि मग एक मोर येऊन कमानीवर बसतो. आपला निळा, जांभळा वैभवशाली पिसारा एकदा उलगडतो, मिटतो. आपण अवाक. पहात आहोत ते सत्य की दृष्टीभ्रम ठरवता येत नाही. आपण आजूबाजूला बघतो, प्रेक्षकांमधले अनेक तिकडेच बघत आहेत हे कळल्यावर दिलासा मिळतो, पण मनातली त्या मोराची नवलाई ओसरतच नाही. नजर पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच वळत रहाते.
जयपूर लिटफ़ेस्ट शैलीतली ही एक खास आपल्याकरता असलेली कहाणी समोर उलगडते आहे असं वाटत रहातं.


दिवस- बहुधा तिसरा
फ़्रन्ट-लॉन

रेझा अस्लन- इराणियन-अमेरिकन स्कॉलर, धर्म या संकल्पनेचा अभ्यासक. त्याच्या “Zealot- The Life and Times of Jesus of Nazaretha” पुस्तकाने जगभर खळबळ माजवली. त्याला सातत्याने विचारले गेले, तू स्वत: मुस्लिम असताना ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा तुला काय अधिकार? तुझा काय हेतू?
“एका तटस्थ धर्म-अभ्यासकाने एका मोठ्या धर्माची स्थापना करणा-या जीझसचा शोध घेण्याचा, अनेक अर्थ उलगडवण्याचा हा फ़क्त एक प्रामाणिक प्रयत्न होता.” रेझा अस्लन हे पुस्तक लिहिण्यामागची त्याची भूमिका सांगतो आहे. बहुतेक पहिल्यांदाच. धर्माचा अर्थ प्रत्येकाकरता वेगळा असतो. ओसामा बिन लादेनसारख्या कट्टर धर्मनिष्ठाकरता इस्लामचा अर्थ वेगळा. आणि माझ्यासारख्याला ज्याला श्रद्धा म्हणजे काय याची व्याख्याही धड मांडता आलेली नाही, त्याच्याकरता इस्लाम वेगळा. चौदाशेहून जास्त वर्ष या धर्माचा नेमका अर्थ मदरशांच्या चार भिंतींआड बंदिस्त होता, आता प्रत्येकजण स्वत:चा, वैयक्तिक अर्थ शोधू पहातो आहे ही चांगली गोष्ट आहे. काहीजणांना ती भविष्याकडे घेऊन जाण्याची सुरुवात वाटते, काहींना ती भविष्याची अखेर होण्याची सुरुवात वाटते. धर्माचा अर्थ काही शांतता, सहिष्णूता, समानता लावू पहातात, काही भिती, दहशत, अन्याय. धर्म हे मला मुक्कामापर्यंत घेऊन जाण्याचं फ़क्त एक साधन आहे. तो मार्ग आहे, मुक्कामाचे ठिकाण नाही. मला आज विचारतात तू इस्लामशी एकनिष्ठ आहेस का? मी सांगतो त्या सर्वांना याच व्यासपीठावरुन- I don’t believe in Islam, I believe in God.

रेझा अस्लनचे शब्द मंत्रमुग्ध करुन टाकतात. रेझाचं अजून एक सत्र ऐकलं आहे नुकतंच. Leaving Iran. इराण सोडून दुस-या देशात रहाताना काय अनुभव येतात? त्यात त्याच्यासोबत द एक्झाइल्डची लेखिका फ़रोबा हात्रुदी, जी फ़्रान्समधे स्थलांतरीत होती. त्यांना विचारलं, कुठे रहाणं सोपं आहे? अमेरिकेत की फ़्रान्समधे? रेझा अस्लन उत्तर देतो- इराणियन असताना जगात कुठेही रहाणं सोपं नाही.

मी बुकस्टॉलवर. राणा दासगुप्ताचं द कॅपिटल घ्यावं की रेझा अस्लनचं झेलट घ्यावं विचार ठरत नसतो. पुस्तकांची ओझी किती वहाणार? दोन्ही जाडजुड. एकच घ्यावं. कोणतं?

“तू हे पुस्तक घेतलस तर मी इथेच सही करुन देईन.” शेजारुन आवाज येतो. रेझा अस्लन स्वत:.
मी त्याला विचारते, “तुझं एकही पुस्तकं मी अजून वाचलेलं नाही. पहिल्यांदाच वाचायचं तर कोणतं घेऊ?”
“अर्थातच हे लेटेस्ट, ज्याकरता मी इथे आलो. प्रोमोशन फ़र्स्ट, नाही का?”
पुस्तकावर रेझा अस्लन सही करतो. “तू लिहितेस का?” माझ्या गळ्यातल्या टॅगवर तो नजर टाकतो. होय. मी मान डोलावते. “मग अभिप्राय लिहून पाठव प्रकाशकांना.”
“पण मी मराठीमधे लिहिते.”
“हे तर फ़ारच छान. मला अजून कोणतंही मराठी भाषेतलं मेल आलं नाहीये. माझा पोर्टफ़ोलिओ सुधारेल.”
रेझा अस्लन जातो. मी अजूनही चकित. इतका साधेपणा, प्रामाणिकपणा.. आणि आपण इतक्या सहज भेटतो आहोत जागतिक साहित्यिकाला, कोणतेही सुरक्षेचे कडे नाही, भोवती प्रशंसकांची गर्दी नाही. गेल्या वर्षी यायला हवं होतं. ओर्हान पामुकला असं भेटता आलं असतं तर?
मनाला अनेक आधीच्या चुकलेल्या लिटफ़ेस्ट्सची हुरहुर लागून रहाते. यापुढची एकही चुकवायची नाही.


बर्डन्स ऑफ़ आयडेन्टिटी- वीमेन रायटर्स

नमिता गोखले सांगते मी जन्माने कुमाउं, पहाडी. लग्न करुन मराठी प्रागतिक, ब्राह्मण कुटुंबात आले. नाव बदलणं गृहित धरलं. मग मी लिहायला लागले. पहाडी पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा. अनेक भुवया उंचावल्या गेल्या. तू पहाडी लोकांच्या धैर्याच्या, कष्टांच्या कहाण्या लिहायला हव्यास. तू स्त्रियांच्या वेदनांवर, असामान्य जीवनावर लिहायला हवंस. तू स्त्री आहेस, स्त्रीची वेदना तू नाही मांडणार तर कोण? अशा जुनाट प्रेमकथा लिहिणं हा वेळेचा अपव्यय. ब-याच तेच करतात, पण तूही?

तमिळ-मुस्लिम कवयित्री सलमा म्हणाली, मुळात मी काही लिहिणंच अपेक्षित नाही, त्यातून कविता म्हणजे तर धर्माला बट्टा. त्यात स्त्री-पुरुष प्रेमाची, शारिरीक वर्णनं म्हणजे तर जगणंही मुश्किल. मग मी टोपण नाव घेतलं.
नव-याच्या शेजारी झोपताना, तो झोपला की मला कविता सुचते. मग मी बाथरुममधे जाउन एका कागदावर त्या खरडून टाकीच्या वर लपवून ठेवते.

इस्त्राएली लेखिका झरुर शालेम. हिच्या घरी सगळेच थोर लेखक. आईवडिल, भाऊ, चुलत भाऊ, नवरा, सासू-सासरे. सगळे धर्म-राजकारणावर अभ्यासपूर्ण लिहिणारे. मी लिहायला लागले मानवी भावनांच्या कादंब-या. हळव्या, वैयक्तिक. कुणालाच ते आवडत नाही. पण मी बॉर्डर ऑफ़ नेशन पेक्षा बॉर्डर ऑफ़ इमोशन्स महत्वाच्या मानते. मला वॉर ऑफ़ सेक्शुआलिटी जास्त महत्वाची वाटते वॉर ऑफ़ नेशन पेक्षा. माझ्यावर एकदा राजकीय अत्याचार घडला. माझा देश माझं आयुष्य ताब्यात घेऊ पहात होता. मी ते होऊ दिलं. पण माझ्या लेखनावर त्यांना ताबा नाही मिळवू दिला. या दारुण राजकीय अनुभवावर मी निदान एक लेखिका म्हणून लिहायला हवं असं माझ्या मित्र-मैत्रिणींनाही वाटलं. मला त्यातून बाहेर पडायला सहा महिने लागले होते. त्यानंतर मी जे पहिलं वाक्य लिहिलं ते माझ्या सहा महिन्यांपूर्वी अर्धवट सोडलेल्या कादंबरीतलंच पुढचं वाक्य होतं. एक लेखिका म्हणून मी कोणत्याही दडपणाला बळी पडले नाही याबद्दल मला माझा अभिमान वाटतो.


सत्तर वर्षांची ग्लोरिया स्टाइन्मेन बोलत असताना खचाखच गर्दी. तिच्या वाक्या वाक्याला गर्दी उसळत होती. टाळ्यांचा कडकडाट, घोषणा. अजमेरच्या मेयो कॉलेजातून आलेल्या मुलींचा एक मोठा ग्रूप. त्यातली एक प्रश्न विचारते ग्लोरियाला- पन्नास वर्षं होऊन गेली स्त्री-वादी चळवळीला. अजूनही स्त्रिया घरगुती अत्याचारांमधूनही वाचलेल्या नाहीत. जगभरातून या तक्रारी येतच रहातात. स्त्री-वादी चळवळीचं हे अपयश नाही का?
ग्लोरिया शांतपणे उत्तर देते. एका अत्याचाराच्या घटनेचे परिणाम भरुन यायला चार पिढ्या जातात. मग हे तर हजारो वर्षांचे अत्याचार. नाही. पुढच्या निदान शंभर वर्षांमधे तरी जेन्डर इक्वालिटीची मी अपेक्षा करत नाही. पितृसत्ताक घरांमधून फ़क्त पितृसत्ताक पद्धतीतली मुलं आणि अन्यायाला बळी पडणा-या मुलीच जन्माला येत रहाणार. हे सत्य आहे.


एक आयरिश ग्रूप. पाच पुरुष, तीन स्त्रिया. त्यांचा रायटर्स ग्रूप आहे. दर वर्षी जयपूर लिटफ़ेस्टला येतात. हे त्यांचं पाचवं वर्षं. यावर्षी आम्हाला जोनाथन फ़्रान्झेनबद्दल उत्सुकता आहे. फ़िलिप हेन्शर आम्हाला लिहिण्यात मार्गदर्शन करतात. तेही यावर्षी इथे आहेत. अमर्त्य सेनचं भाषण आम्ही रेकॉर्ड करुन घेतलं इतकं ते आवडलं. आठही जण त्यांच्या नोट्सने भरलेल्या वह्या दाखवतात.
हिंदी कादंबरीकार ध्रूव शुक्ल भोपाळहून आले आहेत. ऑटोबायोग्राफ़िकल नॉव्हेल्स आणि ट्रॅव्हल रायटींगवरची चर्चासत्र ते अटेंड करतात फ़क्त. त्यांना गणेश देवींच्या प्रादेषिक भाषांच्या अस्तित्त्वाच्या संदर्भातल्या भाषणाची उत्सुकता आहे.

आयरा रॉबिन्सन पेंटर आणि म्युझिशियन. दर एक वर्षांनी तो इथे येतो. पूर्वी सगळे महाग खाण्याचे पदार्थ मिळायचे. पण आता वीस रुपयात उत्कृष्ट ब्रू कॉफ़ीही मिळते हे खूप छान झालं आहे. आयरा भारतीय खाद्यपदार्थ मात्र खात नाहीत. पोटाला झेपत नाहीत. आयराला एका चर्चासत्रातलं आर्टिस्ट सुबोध गुप्ताचं वाक्य- मला गेल्या पंचवीस वर्षांमधे एकाही कलामहाविद्यालयाने लेक्चरकरता बोलावलं नाही हे खूप खटकलं. मी स्वत: बनारसला एका लहान शाळेत पेंटींग शिकवायला जातो, विनामूल्य. त्या शाळेत, किंवा इतर कितीतरी लहान ठिकाणी अशा मोठ्या आर्टिस्ट्सना जायला वेळच कुठे असतो, ते स्वत: का नाही इन्स्टीट्यूशन उभारत केवळ सरकारला नावं ठेवण्यापेक्षा? आयरा विचारतो. सुबोध गुप्ताचं वाक्य माझं काम कला निर्मितीचं, मी आर्ट इन्स्टीट्यूशन मधे का लक्ष घालवू हे वाक्य मलाही खटकलेलं असल्याने मी आयराला दुजोरा देते.


गारठलेल्या या गुलाबी शहरात साहित्याचा हा महाकुंभमेळा ओसंडून वहात असतो.

सायन्स, गणित, अनुवाद, प्रादेषिक भाषा, लोकसाहित्य, स्थलांतरित, धर्म, कला, राजकारण, सिनेमा, इतिहास अनेक विषय. ऐकणारे कोणी नवोदित, कोणी प्रस्थापित, कोणी वाचक, कोणी लेखकराव, कोणी प्रकाशक, कोणी भाषाप्रेमी, काही स्त्री-वादी, विद्रोही, अनेक इतिहासप्रेमी. चित्रकार, संगीतप्रेमी, काही पत्रकार, काही पहिली कादंबरी लिहू पहाणारे, काही ब्लॉगर्स, काही नुसतेच ट्वीटर्स. पण प्रत्येकाला लिटफ़ेस्ट काहीतरी देतं आहे. लिटफ़ेस्टने अनेकांना आपल्यात सामावून घेतले. आधीच्याही लिटफ़ेस्टने अनेकांना हे मिळाले म्हणूनच ते पुढच्या वर्षीही येत राहीले.

साहित्यिक प्रस्थापित असो, सुप्रसिद्ध असो, जग गाजवणारे असोत.. ते इतके सौजन्यशील, हसरे, नम्र प्रतिसाद, उत्तरे देणारे, वाचकाला न विसरलेले, अभ्यासूपणे इतरांचंही ऐकणारे, रांगेत उभं रहाणारे, आपल्या टेबलावर बसून खाणारे, पुस्तकं विकत घेत फ़िरणारे असू शकतात हा अनुभव मला लिटफ़ेस्ट देत आहे. किती चांगले लेखक, किती वेगवेगळ्या विषयांवर लिहित आहेत, ते क्लिष्टतेचा जराही बडिवार न माजवता बोलू शकतात, या अनुभवासकट.

वाचकांच्या आवडी किती टोकाच्या असू शकतात. आपल्या शेजारचा ज्यावर खूणा करतो आहे त्यातलं एकही आपल्याशी कॉमन नाही, आणि फ़िक्शन, नॉन फ़िक्शन दोन्हीनाही तुडुंब प्रतिसाद मिळतो अजूनही हेही या लिटफ़ेस्टला कळले.


पुरेशी आसन व्यवस्था, खाण्या-पिण्याच्या सहज सोयी, स्वच्छ टॉयलेट्स, उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, वेळेची तत्परता, स्वयंसेवकांची योग्य कामगिरी हे सगळं सहजतेनं पार पडत आहे इथे. लिटफ़ेस्टचा अजून एक महत्वाचा अनुभव.  


पण मराठी साहित्यिक, बुद्धीमान लेखक इथे क्वचितच फ़िरकतात. आपल्याला काही मिळेल यातून असं त्यांना वाटत नाही.
त्यात काय? मार्केटींगचा जमाना आहे. स्वत:च्या बुक प्रमोशनकरता ही नावाजलेली मंडळी इथे येतात. बिग डिल. काही म्हणतात. असूदेत ना. बुक प्रोमोशन, मार्केटींग या आजच्या जगातल्या आवश्यक गोष्टी ही मंडळी किती सफ़ाईने, व्यावसायिकतेनं करतात, आपण लिहिलेल्यातलं, त्यातल्या त्यात कमी वेळेतही वाचकांच्या कानावर पडावं म्हणून धडपडतात. निदान ही कौशल्य शिकून घ्यायला, निरखायला तरी यावं की..


पार्थ मित्तरने किती सहज त्याचा खाजगी इमेल आयडी देऊन म्हटलं, कलेच्या प्रांतातलं मराठीत नेमकं काय काय लिहून येतं, कोणत्या विषयांवर ते वाचायला मला नक्की आवडेल. खूप मोठी मराठी नावं आहेत कलेच्या इतिहासात. मला आदर आहे मराठीबद्दल. जास्तीतजास्त लिंक्स मेल कर.

आधी कधीच माहीत नसलेले लेखक, आता त्यांच्या तीन-तीन चर्चासत्रांनंतर इतका माहितीचा, जवळचा होतो, मग तोही बाहेर लॉनवर वगैरे भेटतो तेव्हा ओळखीचं हसतो, मग तुम्ही लगेच त्याची जाडजाड पुस्तकं विकत घेऊन टाकता. एखादी आपली आवडती कादंबरी लिहिणारी लेखिका बोलताना अगदी आपल्यासारखाच विचार करते हे जाणवून देणारा एखादाच क्षण लिटफ़ेस्टमधे तुमच्या वाट्याला येतो आणि तुमचं सेल्फ़ एस्टीम हजार पटींने वाढतं.

जयपूर लिटफ़ेस्ट या अशा अनुभवांकरता प्रत्येकाला घडावा. लिटफ़ेस्टला तोवर जावं, जात रहावं जोवर आपल्याला अजूनही हे सगळं अनुभवता येतय याची खात्री वाटते.


आपण लेखक बनलो कारण आपल्याला लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला खूप आवडतं याची आठवण पुन्हा एकदा लिटफ़ेस्टने करुन दिली. नवे लेखविषय, कथाविषय डोक्यात घोळायला लागले, त्याकरता संशोधन करायला, अभ्यास करायला अमाप उत्साह अंगात भरला.
कोणीतरी भेटतच जे सांगतं आता लिटफ़ेस्टला पूर्वीसारखी मजा नाही. वैयक्तिक जिव्हाळा कमी झाला आहे. फ़क्त व्यावसायिकतेला जास्त महत्व दिलं जात आहे.


एक ब्रिटिश रायटर सांगत होती कोणत्यातरी सेशनला शेजारी बसली असताना- इथे खूप तरुण चेहरे दिसतात. त्यात मजा करायलाच आलेले जास्त असू शकतात, पण ते दिसतात हे मला महत्वाचं वाटतं. लिटफ़ेस्ट आपलाही चेहरा तरुण करुन टाकतं.


चटकन संपूनही गेलेलं, पण मनाला हुरहूर लावून जाणारं उत्कट प्रेमप्रकरण असावं तसं वाटलं लिटफ़ेस्ट. पाच दिवसांमधला प्रत्येक क्षण त्याच्याच विचारांनी व्यापलेला. आणि नंतरही खूप काही शिल्लक ठेवून गेलेला.

* लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ’संवाद’ पुरवणीमधे प्रकाशित झालेला आहे.

Wednesday, March 27, 2013

पेंटर ऑफ़ डार्कनेस- गणेश पाईन-


चाळीस वर्षांपूर्वी इलस्ट्रेटेड वीकलीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमधे एम.एफ़. हुसेननी तुमचा आजचा सर्वात आवडता आजचा चित्रकार कोण या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात कोणा एकागणेश पाईनया तरुण चित्रकाराचे नाव घेतले होते. सूझा, रझा, तैयब मेहता असे एकाहून एक नाव कमावलेले चित्रकार आजूबाजूला असताना हुसेननी या तुलनेने अनोळखी असणा-या गणेश पाईन यांचे नाव घेतल्यावर अनेकांच्या भुवया वर चढल्या होत्या. गणेश पाईन हा बंगाली चित्रकार त्यावेळी वयाच्या पस्तिशीत होताआणि आता नुकतिच १२ मार्चला जेव्हा चित्रकार गणेश पाईन यांचे निधन अशी बातमी आली तेव्हा जरी त्यांच्या चित्रांचे चाहते, समीक्षक, संग्राहक हळहळले, एक प्रतिभावान, वेगळ्या, स्वतंत्र शैलीचा, काळाच्या पुढे असणारा चित्रकार आपल्यातून गेला म्हणून त्या सर्वांनाच वाईट वाटलं, तरी चित्रजगताबाहेरच्या लोकांची प्रतिक्रिया मात्र  ’कोण हे चित्रकार गणेश पाईन? कधी ऐकलं नाही फ़ारसं नाव.. अशीच होती

गणेश पाईन यांच्या संदर्भात ही प्रतिक्रिया नवीन नाही. ते स्वत:ही जिवंत असताना अशा अनुभवामधून अनेकदा गेले होते. प्रसिद्धीपासून दूर राहून चित्रकारितेत रमणारा हा आत्ममग्न चित्रकार त्यामुळे कधी खंतावला नाही किंवा आपल्या चित्रांना जगात मिळणा-या मोठ्या किमतीमुळे तो कधी हुरळून गेला नाही. त्यांची सकस गुणवत्ता त्यामुळे कुठेही कमी ठरली नाही.

चित्रकलेच्या वर्तुळातल्या मान्यवरांनी, जगभरातल्या चित्रकला संग्राहकांनी मात्र गणेश पाईन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांना आदराने गौरविले, त्यांच्या चित्रांमधील अद्भूत चित्रसृष्टीचा गौरव केला, पुढच्या पिढीतल्या चित्रकारांनीही त्यांच्या अनोख्या चित्रशैलीवरुन प्रेरणा घेतल्या. जगभरातून अनेक चित्ररसिक त्यांना लाभले. गणेश पाईन यांची चित्रे जागतिक कलाबाजारात कायमच चढ्या किंमतीला विकली जातात. स्वत:हून कधीही प्रसिद्धी, लोकप्रियतेच्या मागे धावता गणेश पाईन यांच्या बाबतीत ही किमया कशी काय साध्य झाली हे अनेकांच्या दृष्टीने गूढ राहीले. त्यांच्या कॅनव्हासवरील गूढ चित्रसृष्टीसारखेच हेही एक रहस्य असे म्हणता येईल
अर्थात गणेश पाईन यांच्या पेंटींग्जच्या चाहत्यांना मात्र हा प्रश्न कधीही पडला नाही. गणेश पाईन यांनीही कधी अशा कोणत्या गोष्टींची ना कधी चर्चा केली ना पर्वा केली. आपल्या चित्रांच्या गुणांबद्दल, वैशिष्ट्यांबद्दल बोलून, चमकदारस्टेटमेन्ट्सकरुन माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आपल्याला जे आवडतं ते प्रेमाने रंगवत रहाणं त्यांनी महत्वाचं मानलं.


गणेश पाईन यांना चित्ररसिकमास्टर फ़ॅन्टसिस्टम्हणून प्रेमाने संबोधत. कॅनव्हासवर कल्पनाशक्ती आणि वास्तवतेचं एक अदभूत विश्व ते उभं करत. गणेश पाईन यांची चित्र पहाताना आपण एखादी गूढ, रहस्यमय कथा वाचतो आहोत किंवा अद्भूत, कल्पनारम्य आणि तरीही वास्तवाशी घट्ट नातं जोडणारा चित्रपट पहातो आहोत असा अनुभव येतो. त्यांच्या चित्रांमधून ते जन्म-मृत्यू, निसर्ग, संस्कृती, अध्यात्म याबद्दल काही विधाने करत, काही सांगू पहात. त्याकरता त्यांची काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमाचिन्हे होती, खास विकसित केलेली रंगसंगती होती. कथाकथनाची विलक्षण ताकद त्यांनी आपल्या चित्राकृतींमधून विकसित केली होती. जबरदस्त कल्पनाशक्ती असणारा हा चित्रकार होता. वास्तवता आणि अद्भूतता यांची अशी विलक्षण सरमिसळ पहाताना नजर खिळून रहाते. जन्म-मृत्यूचं चक्र, त्यासंदर्भातली नॅरेशन्स, मिथ्यकथा, स्वप्न, मानसिक आंदोलने, इतिहास, पुराण, अध्यात्म हे विषय गणेश पाईन यांनी वारंवार हाताळले. महाभारतातल्या महत्वाच्या प्रसंगांवरची त्यांची चित्रमालिका प्रसिद्ध आहे.


गणेश पाईन यांचा जन्म १९३७ साली कलकत्ता येथे झाला. लहानपणापासून असलेल्या चित्रकलेच्या आवडीमुळे पुढचे शिक्षण चित्रकलेतच घ्यायचे हे त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं. शाळेत शिकत असतानाही वर्गात बसून ते हातातल्या दगडी, काळ्या पाटीवर सतत रेखाटने करत रहात. वेड्यावाकड्या रेघोट्याही असत. पाटी पुसायची आणि पुन्हा पुन्हा रेघा ओढायच्या. ’माझं ड्रॉइंग आणि रेषा पक्की होण्यात, त्यांना घाट, आकार येण्यात पाटीवरच्या या रेघोट्यांचा अभ्यास कारणीभूत ठरला असं ते सांगत. पुढे गणेशदांनी कलकत्त्याच्या गव्हर्मेन्ट कॉलेज ऑफ़ आर्ट ऍन्ड क्राफ़्ट मधून ड्रॉइंग आणि पेंटींगमधे डिप्लोमा घेतला.
 
गणेश पाईन हे बंगाल स्कूलचे चित्रकार. बंगाल स्कूलच्या चित्रवैशिष्ट्यांचा पारंपरिक पगडा त्यांच्या चित्रशैलीवरही होताच. सुरुवातीच्या काळात अबनीन्द्रनाथ आणि गगनेन्द्रनाथ या विख्यात टागोर चित्रकार बंधूंचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. सुरुवातीला रंग विकत घ्यायला पैसे नसत त्यामुळे पेन आणि शाईची रेखाटने लहानशा कागदावर ते करत. मग हळू हळू बंगाली चित्रकारांच्या जलरंगाच्या परंपरेनुसार ते जलरंगाकडे वळले. अबनीनद्रनाथांइतकाच रेम्ब्रा, पॉल क्ली यांचाही त्या काळात त्यांच्यावर खूप प्रभाव होता. याच काळात पैसे मिळवण्याकरता ते एका स्टुडिओत अ‍ॅनिमेशनकरता स्केचिंग करत असत. आणि तेव्हा त्यांची ओळख अ‍ॅनिमेशनच्या अद्भूत आणि मनोरंजक सृष्टीचा बादशहा वॉल्ट डिस्ने याच्या चित्रदुनियेशी झाली. वॉल्ट डिस्नेच्या ऍनिमेशनच्या प्रभावाखाली आपली शैली घडली असं ते स्वत:च सांगत. वॉल्ट डिस्नेमुळे मी भारावून गेलो होतो. चित्रकलेकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीकोनातच बदल घडला असं म्हणत

चित्र रंगवण्याच्या तंत्रामधेही गणेश पाईन यांनी अनेक प्रयोग केले. जलरंग, गुवाश आणि त्यानंतर अनेक प्रयोगाअंती त्यांची चित्रशैली टेम्पेरा तंत्रावर स्थिरावली. त्यांची गुढ टेम्पेरा पेंटींग्ज जगप्रसिद्ध आहेत. रंगांचे एकावर एक अनेक पारदर्शक थर हे त्यांचं वैशिष्ट्य आणि हे थरही असे की रंगाचा पहिला थरही शेवटच्या रंगातून दिसू शकतो.


आधुनिकता आणि पारंपारिकतेचा अनोखा मिलाफ़ गणेश पाईन यांच्या चित्रशैलीत होता. दृश्यात्मकता आणि कथनात्मकता यांचा जबरदस्त मेळ त्यांच्या चित्रशैलीत होता. त्यांची चित्रसृष्टी गूढ, अद्भूत होती. काहीशी उदास करणारी. पाश्चात्य चित्रसमीक्षक गणेश पाईन यांनापेंटर ऑफ़ डार्कनेसया नावाने संबोधत. त्यांच्या चित्रांकडे, चित्रशैलीकडे नव्या पिढीतले चित्रकार, कलेचे विद्यार्थीही आकर्षित होत असतात यात काही नवल नाही.

गणेश पाईन यांनी आधुनिकतेला एक वेगळे परिमाण दिले. त्यांचे चित्रविषय, शैली ही खास त्यांची अशी वैशिष्ट्यपूर्ण होती. गरीबीतलं बालपण, सुरुवातीला केलेला स्ट्रगल यांच्या खूणा त्यांच्या सुरुवातीच्या चित्रातून उमटल्या होत्याच मात्र ६० च्या मध्यात त्यांच्या चित्रांच्या रंगसंगतीत, शैलीत, चित्रविषयांत आमुलाग्र बदल झाले. त्यांची चित्रे सर्रिअल शैलीकडे झुकली. अस्थी, हाडांचा सापळा, गूढ, काळसर अवकाश, बोटी, अजस्त्र पक्षी, सुळे परजणारे हिंस्त्र प्राणी त्यांच्या चित्रांमधून दिसायला लागले. सोनेरी छटा, काळ्या सावल्या यामुळे त्यांचे कॅनव्हास अद्भूत दिसत. झाडांची वठलेली खोडं, काटक्यांचा, पाचोळ्याचा ढिगारा, गूढ, काळ्या लाकडांचे बंद दरवाजे, रहस्यमय खिडक्या, पक्षीमानव, तांत्रिक प्रतिके, साधू, जन्म-मृत्यूची, जीवनाची, विनाशची प्रतिके. धुकं, एकांत जागी असणारी मंदिरं, दुर्लक्षित, जुनाट घरं.. आणि हे सगळं ठळक, स्पष्ट रेषाकृतींमधून, पार्श्वभूमीवर काळे, निळे रंग, गडद शेवाळी,पिवळ्या छटा असतात.

कुठून आली ही प्रतिके, हे रंग त्यांच्या चित्रांमधे? एका मुलाखतीत ते सांगतात- ४६ च्या जातीत दंगलीत जे मृत्यूचे, क्रौर्याचे थैमान पाहीले त्यामुळे मी दीर्घकाळ उदास मन:स्थितीत होतो. मी मुळापासून हादरलो होतो. औदासिन्याचा तो खोल परिणाम मला मनावरुन -या अर्थाने कधीच पुसून टाकता आला नाही. या दंगलीत त्यांनी पाहीलेला एका वृद्ध स्त्रीचा उघडा मृतदेह, तिच्या छातीतून रक्ताचे ओघळ वहात होते, गळ्यात चमकदार मण्यांची माळ होती हे दृश्य त्यांच्या मन:पटलावर कायमचे कोरुन राहीले. या काळोख्या जगाने त्यांचा जणू पिच्छा पुरवला. आणि मग अशी दु:खाची, जीवनाची काळी बाजू दाखवणारी प्रतिके प्रकर्षाने त्यांच्या चित्रात उमटत राहिली. गणेश पाईन यांचे बालपणातले अगदी सुरुवातीचे दिवस नॉर्थ कलकत्त्यामधल्या एका जुनाट हवेलीत गेले होते. आजीकडून गूढ लोककथा ऐकत ते मोठे झाले. या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून माझा अंत:चक्षू कायम जगण्यातल्या गूढतेचा वेध घेत राहीला असं ते म्हणत.

चित्रकलेवरील प्रेम ही गणेश पाईन यांच्या चित्रनिर्मितीमागची एकमेव प्रेरणा होती जी त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांची स्वत:ची स्वतंत्र प्रदर्शनेही गॅल-यांमधून फ़ारशी भरली नाहीत. सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचण असताना चित्रे विकली जाणे हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते, कारण पुढची चित्रे रंगवायला पैसा आवश्यक होता, त्यात स्वत:च्या प्रेरणेवर विसंबून चित्र काढण्याची वृत्ती त्यामुळे गॅल-यांमधे स्वतंत्र शो करण्याऐवढी भाराभर चित्रं माझ्याजवळ कधी जमलीच नाहीत असे ते प्रांजळपणाने सांगत. मात्र नंतरच्या काळात, म्हणजे ७० च्या दशकानंतर जेव्हा या चित्रकारच्या अद्भूत, वेगळ्या शैलीची ओळख जगभरातल्या चित्ररसिकांना, समीक्षकांना, संग्राहकांना पटली त्यानंतर त्यांच्या चित्रांना स्वत;च्या प्रतिष्ठीत गॅल-यांमधे प्रदर्शित करण्याची चढाओढच सुरु झाली. जगातल्या नामवंत गॅल-यांनी ग्रूप-शो करता त्यांना आमंत्रित केले. अनेक पारितोषिकेही त्यांना प्राप्त झाली.

बंगाल चित्रकारितेच्या सन्माननीय परंपरेतले गणेश पाईन हे एक महत्वाचे, जगप्रसिद्ध चित्रकार. स्वत:च्या दुनियेत मग्न, स्वत:ला आवडतील ती आणि तेव्हढिच चित्र काढणारा, अबोल, अंतर्मुख, स्वत:च्या चित्रांच्या दुनियेत रमणारा चित्रकार. सोसायटी ऑफ़ कंटेम्पररी आर्टिस्ट्सचे ते संस्थापक सदस्य. सुनील दास, बिकाश भट्टाचार्य, जोगेन चौधुरी हे त्यांचे समकालीन अत्यंत आदराने आणि आत्मियतेनं त्यांच्याबद्दल बोलतात.आज त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. प्रचंड किंमतींना ती विकली जातात. मात्र सामान्य चित्ररसिकांना त्यांच्याबद्दल फ़ारशी माहिती आजही नाही. हुसेननी नाव घेतलं तेव्हा गणेश पाईन अप्रसिद्ध होते आणि आज २०१३ साली त्यांच्या मृत्यूसमयीही ते इतर अनेक नावलौकिक, यश संपादन केलेल्या दिग्गज भारतीय चित्रकारांच्या तुलनेत अप्रसिद्धच राहिलेले आहेत

*(पूर्वप्रकाशित-कृषिवल)