Wednesday, March 15, 2006

गृहिणी दीपशिखा

शरू रांगणेकरांनी आपल्या बहारदार आणी खुसखुशीत शैलीत भारतीय व्यवस्थापकांच केलेलं सुरस आणि चमत्कृतीपूर्ण वर्णन ( Ref. In the Wonderland Of Indian Managers ) वाचताना माझ्या डोळ्यांपुढे राहून राहून ज्यांना कौतुकानं (!!) आद्य व्यवस्थापक म्हणून संबोधल जातं, त्या घरोघरीच्या गृहव्यवस्थापिका उर्फ़ सामान्य भाषेत गृहिणी उभ्या राहत होत्या.

स्वत : शरू रांगणेकर तर नेहमीच कधी मिश्किलपणे तर कधी उपरोधिकपणे गृहिणींची उदाहरणं देत आले आहेत. त्यामुळंसुद्धा असेल कदाचित, पण भारतीय व्यवस्थापकांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त आणि मस्त अशा मनोवृत्तीचं त्यांनी केलेलं वर्णन मला गृहिणींसाठीच जास्त चपखल वाटलं.

सगळ्याच भारतीय बायका, मग त्या नोकरी करणार्‍या असोत वा नसोत, स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या असोत वा राजकारणात, कलावंत असोत वा खेळाडू, त्यांना स्वत : ला आपण कशा आधी छानशा गृहिणी आहोत आणि बाकी सगळं नंतर, म्हणजे गृहिणीपण सांभाळून मग, असं दाखवायला भारी आवडतं. दाखवायला शब्द महत्वाचा आहे. कारण खरं ते निभवायला किती कठीण असतं ते समजेपर्यंत आणि त्यांनी ते मान्य करेपर्यंत त्या ना धड गृहिणी राहिल्या असतात, ना इतर काही. पण आदर्श गृहिणीपणाचा देखावा करण्यात त्या मनापासून रमतात.

फ़ारसं काही वेगळ करुन दाखवावं, अशी त्यांची स्वत : कडून किंवा इतरांची त्यांच्याकडून अपेक्षाच नसल्यानं हा देखावा बहुतेक वेळा पुरेसा ठरतो.

मूळ मुद्दा असा की, सुस्त, व्यस्त, त्रस्त, मस्त हे भारतीय व्यवस्थापकांच्या स्वभावाचं चित्रण गृहव्यवस्थापिकांना चपखल का आणि कस बसतं? आपण जरा आजुबाजुला नजर टाकूया का?

सुस्त गृहव्यवस्थापिका

' बघू ' , नंतर, काय घाई आहे?, मला बाई कंटाळा .... ' हे यांचे परवलीचे शब्द. कामाची चालढकल, दिरंगाई करण्यात यांचा हातखंडा. नोकरी करणार्‍या गृहिणींना या विभागात बसवता येणार नाही असं कुणाला वाटत असेल, तर तो मोठाच गैरसमज आहे. सुस्तपणाला कामाच्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी तर भरपूर वाव. टेबलावरच्या बराच काळ न हललेल्या फ़ायली, लेडीज रुममध्ये जास्तीत जास्त घालवलेला वेळ, त्यांच्यावर महत्वाची कामं कधीच न सोपवण्याची त्यांच्या बॉसनं घेतलेली खबरदारी त्यांच्या 'सुस्त'पणाच द्योतक असतं. मुलांच्या शाळांची तयारी करताना यांना ऑफ़िसचं हजेरीपत्रक काठायला उशीर होतो म्हणून सहानुभूती दाखवावी, तर त्यांच्या मुलांचीही शाळेची पहिली घंटा कायम चुकलेलीच दिसते. गंमत म्हणजे घरात असताना बहुतेक वेळा त्यांचा सुस्तपणा छुपाच असतो. किंबहुना तो छुपा राखण्याइतकी चतुरता त्यांच्यात उपजतच असते. त्यांच्या मागं कुणी ऑफ़िसमधल्या सहकार्‍यांनी किंवा शेजारणींनी तगादा लावलाच तर उद्या, पुढच्या सोमवारी किंवा पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी असे वायदे करताना त्या जराही कचरत नाहीत.

यांचा दुसरा गुण म्हणजे दुसर्‍यांकडून कामं वेळेत करवू घेणं यांना व्यवस्थित जमतं. त्यात त्या जराही सुस्तपणा दाखवत नाहीत. यांचे नवरे आणि मुलं साहजिकच स्वावलंबी असतात. याच कारण त्यांचा सुस्तपणा असं चुकूनही मनात आणू नका. कारण आपण नोकरी करुन घर सांभाळतो आणी घराला कशी योग्य शिस्त लावली आहे, याबद्दल आपली पाठ वरचेवर थोपटून घेण्यात त्या सर्वात पुढे असतात. यांची मोलकरीण शक्यतो दांडीच मारत नाही. कारण जितक्या दिवसांची दांडी, तितक्या दिवसांच साठलेलं कामं हे समीकरण त्यांना महागातच पडतं. छे, छे, पगार कापण्याच चुकीच धोरण त्या कधीच अवलंबत नाहीत. तुम्ही दुर्दैवाने कामसू आहात आणि त्यांची शेजारीण आहात, तुम्ही तुमच्या मोलकरणीला इतकं सारंकाही देता, पण तुमच्या घरी दांडी मारून तुमची मोलकरीण सुस्त शेजारणीचं कामं हळूच संध्याकाळी येऊन करूण टाकते. याचं कारणं तुमचा मूर्ख कामसूपणा. सिंकमधे चमचा सुद्धा राहिलेला चालत नाही तुम्हाला. मग भांड्यांचा ढिगारा न घासता तुम्ही राहूच देणार नाही, हे तुमच्या मोलकरणीला बरोबर माहीत असतं.

गृहिणीच्या भूमिकेत घरात वावरताना या जशा आपल्या घरातल्या पसार्‍याबद्दल संकोच बाळगत नाहीत, तसच ऑफ़िसात टेबलभर पसरलेल्या कागदांचाही बाऊ करत नाहीत. पसारे आवरत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घेणं महत्वाचं, असं त्या ठणकावून सांगतात. पण ऑफ़िसातही उगाच घाईगर्दी करुन चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा वेळ लागला तरी चालेल अस बजावतात.

सुस्त गृहव्यवस्थापिका बहुतेकदा वजनदार असतात, त्यामुळं उगाचच त्या आनंदी असल्याचा आभासही उत्पन्न होतो. ऑफ़िसचा, कामाचा ताण पदतो म्हणून वरचेवर हॉटेलातून पार्सलं मागवावी लागतात, फ़ास्ट फ़ूड खाल्लं जातं, असं त्या अगदी दु : खी चेहर्‍यानं सांगतात, तेव्हा तुमचा लगेचच विश्वास बसतो. स्वयंपाकचा व्याप उगाचच वाढवत बसण्यापेक्षा इतर चार 'क्रिएटिव्ह' कामं करावीत असं त्या वारंवार सांगत असल्या, तरी ती इतर चार कामं कायम गुलदस्त्यातच राहतात.

एकंदरीत काय, तर 'संथ वाहते कृष्णामाई' च्या धर्तीवर त्यांच कार्य चालतं. फ़क्त एक लक्षात ठेवा, कधी काळी एखाद्या बॅंकेत कर्जमंजुरीसाठीचा तुमचा अर्ज या व्यक्तिमत्वाच्या स्त्री अधिकार्‍यांच्या हातात गेला, तर पुढची तीन चार आर्थिक वर्षं तुमचं कर्ज मंजूर व्हायला लागणारं हे नक्की.

व्यस्त गृहव्यस्थापिका

सुस्त गृहिणींच्या अगदी उलटा यांचा स्वभाव. सदैव घाईत. कामत अतिव्यग्र. हातात तीन पिशव्या, शिवाय खांद्यावर एक लटकवलेली, अशा त्या या दुकानातून त्या दुकानात, घरातून शाळेत, शाळेतून बॅंकेत अशा धावत असतात. एका फ़ेरीत अनेक कामे होऊ शकतात, यावर मुळी त्यांचा विश्वासच नसतो. मी आहे म्हणून ... हे त्यांचे पालुपद. भरपूर कामात असल्याचा देखावा करण्यात यांचा हातखंडा. कुणाकडच्या लग्नकर्यात वा समारंभात यांचा 'नारायणी' अवतार पाहून भलेभले भुलतात. ऑफ़िसात कधी या चुकून खुर्चीवर आढळल्याच, तर त्या फ़ोनवर बोलण्यात गुंग असतात. कुठल्या चर्चेकरता किंवा कामाकरता त्यांना अजिबात वेळ नसतो. भरपूर काम आधीच शिल्लक आहे आणि आख्ख्या ऑफ़िसात त्या एकट्याच काम करणार्‍या आहेत, असं त्यांच्या वरिष्ठांना पटवण्यात त्या यशस्वी असल्यानं त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर अधिक काम सोपवायला नेहमीच कचरतात.त्रस्त गृहव्यवस्थापिकायांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या कामात या व्यस्त असतात, त्याविषयी त्यांची सतत तक्रार असते. यांची मोलकरीण भांडी कधीच स्वछ घासत नाही, यांच विजेच बील इतरांपेक्षा नेहमीच जास्त येतं, असं त्यांना खात्रीपूर्वक वाटतं. 'माझी घरात कुणाला कदर नाही' असं त्यांच वाक्य वारंवार कानावर पडल्यानं बर्‍याचदा खरोखरच तशी परिस्थिती निर्माण होते. ऑफ़िसात काम यांना करावं लागतं, पण सवलती इतर नटमोगर्‍यांना असं त्या कायम तणतणत राहतात. ऑफ़िसात सहकार्‍यांशी आणि घरी सासूशी, नणंदेशी यांचे कायम खटके उडतात. यांची कटकट ऐकण्यापेक्षा फ़ायली स्वत : च बघणं योग्य असा निर्णय वरिष्ठ स्वत : हूनच घेतात. शिवाय यांचा त्रस्तपणा आजुबाजुला एखाद्या संसर्गजन्य रोगासारखा सहजी पसरतो. त्यांच्या सहवासात राहिल्यावर तुमच्याही कपाळावर आठ्यांच जाळं पसरलं, तर नवल नाही.मस्त गृहव्यवस्थापिकाइथं मस्तं शब्द गुणवत्तादर्शक आहे. या जिथं जातील, तिथलं जग जणू त्या उजळून टाकतात. आदर्शपणाचा आव आणण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. वेळच्या वेळी कामं आटोपून इतर चार छंद जोपसण्याइतका उत्साह त्यांच्यात नेहमीच असतो. ऑफ़िसात सुद्धा तक्रारीला त्या वावच ठेवत नाहीत. हे सगळं त्यांना सहजी जमतं, उपजतच असतं असं जरी आजुबाजूचे समजत असले, तरी त्या मागं त्यांची मेहनत, नियोजन, जीवनाकडं पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याची जाणीव कुणालाच नसते. यांची मुलं गुणी निघतात, यशस्वी होतात, यांना बढती चटकन मिळते, याबद्दल हेवात्मक चर्चा त्यांच्या सुस्त, व्यस्त, त्रस्त मैत्रीणी नेहमीच करतात. पण शंभरात एखादीच अशी मस्तं हे त्याही मान्य करतातच.
शरु रांगणेकर 'मस्त' व्यक्तिमत्वाच्या व्यवस्थापकाला 'दीपशिखा' म्हणून संबोधतात. दीपशिखेची ही उपमा अशा एखाद्याच गृहव्यवस्थापिकेला देता येईल, जिच्यामुळं सारं घरदार उजळून निघतं.

1 comment:

hemant_surat said...

classic analysis! But males do fall in the parallel categories. Give males a pinch too!