सर्वप्रथम क्षिप्रा चे आणि नंदन चे आभार.
आभार दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे ह्या खेळात सहभागी केल्याबद्दल. दुसरं म्हणजे त्यानिमित्ताने माझाही एक ब्लॉग आहे ह्याची आठवण करुन दिल्याबद्दल.
खरंतर लिहिण्यासारखे इतके विषय असताना आणि लिहिण्याची इच्छा ही असताना न लिहिणे हा एक फार मोठा अपराध मानायला हवा. वेळ नसणे वगैरे सबबींना काही अर्थ नसतो कारण दिवसचे दिवस आपण असंख्य निरुपयोगी गोष्टींमधे बिनदिक्कत वेळ वाया घालवत असतो.
आता दसर्याच्या निमित्ताने पुन्हा एक ब्लॉगारंभ.
लिहिण्याची गोष्ट मनात आल्यावर वाचण्याची येणार नाही असं होणार नाही. तेव्हा 'जे जे उत्तम' उपक्रमात द्यायचा परिच्छेद ह्या वाचनाच्याच संदर्भात द्यायचं मनात आलं.
अरुण टिकेकरांच एक छोटेखानी पण अत्यंत वाचनीय पुस्तक अक्षरनिष्ठांची मांदियाळी नुकतच मॅजेस्टिकमधे गवसलं. टिकेकर उत्तम व्यासंगी. त्यांनी लोकमुद्रा ह्या पुरवणीत त्यांच्या ग्रंथ-संग्रह आणि इतर वाचन-सफ़रीबद्दल लिहिलेले मनोज्ञ लेखन आपल्या कुणाच्याच स्मरणातून जाणारे नाही. त्या लेखांचा संग्रह म्हणजेच हे पुस्तक.
------------------------------------------------------------------------------------------------
काव्य, कथा, कादंबर्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पयर्या आहेत, असं मला वाटतं. यौवनात काव्याची मोहिनी पडावी यात काही नवल नाही. जीवनानुभवाचे चटके जेव्हा बसू लागतात तेव्हा कथा-कादंबर्या आपल्याला जवळच्या वाटू लागतात. आणि त्या चटक्यांनी जेव्हा आपल्याला समाधान मिळत नसेल, तेव्हा अमुक अमुक मोठी व्यक्ती अमुक क्षणी कशी वागली असेल यासंबंधी आपल्याला उत्सुकता वाटायला लागते. तेव्हा प्रत्येक वाचक चरित्र-आत्मचरित्र या वाड्ग्मयप्रकापर्यन्त येतो. चरित्र-आत्मचरित्राची गोडी लागली की आपण प्रगत वाचनाची एक तरी पायरी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. आज मराठीमधे जे थोडेफार वाचक आहेत, त्यातल्या बहुतेकांची अवस्था इथपर्यंत आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मराठीमधे चरित्र-आत्मचरित्रं आज बर्यापैकी खपतात. यापुढची पायरी म्हणजे तत्वचर्चेची आणि ती वाचनाची प्रगतावस्था म्हणायला पाहिजे. ही प्रगतावस्था किती लोकांनी गाठलेली आहे हे आपणच ठरवावं. फारशा लोकांनी ती गाठली असेल असं वाटत नाही. कारण तसं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. इतिहास हा जर माझा विषय असेल तर वाचक म्हणून मला कधीतरी असे प्रश्न पडलेच पाहिजेत की, इतिहास कशासाठी लिहायचा? कसा लिहायचा? जे राष्ट्र पुरुष आहेत त्यांच स्तुतीपठण करणारं लेखन करणं किंवा सनावळ्या देणं ही इथल्या इतिहास लेखनाची संकल्पना आहे. पण तळागाळातल्या लोकांना त्या काळी समजात काय स्थान होतं याचा कोणी इतिहासात उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज या गडावरुन त्या गडावर चढाई करत होते, तेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी काय पेरत होता, कुठली पिकं घेत होता, त्यावेळी कामगार वर्ग होता की नाही, उत्पादनं कोणती होती, त्यावेळचं खाद्यजीवन कशा प्रकारचं होतं. संतसाहित्य जर मी वाचत असेन तर जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून मला मिळतं की नाही? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, असं मला वाटतं. माझं वाचन धडपडत झालं. आपल्यापैकी बहुतेकांचही तसंच झालं असेल. आपल्या सर्वांना बर्यापैकी मर्गदर्शन मिळत गेले तर आपला बराचसा वेळ वाचेल आणि तो जर वाचला तर आपल्या सर्वांच्या दष्टिकोनातून ते बरं होईल असं मला वाटतं.
----------------------------- ------------------------------------------------------------------
मी कुणाला टॅग करत नाही कारण मी बर्याच उशिरा उतारा लिहिला आहे. त्यामुळे कल्पना नाही कोणाकोणचे आधीच खेळून झालेले आहे.
सर्वांना दसर्याच्या निमित्ताने 'मनोल्लंघनाच्या' शुभेच्छा.
परत भेटूच.
4 comments:
weglach utara. ya nimittane kharach te sadar parat aathawal. keep writing..
hi shama, agadi samarpak utara. atishay aavadala. dasaryachya aani naveen lekhanasathi anek shubhechchhaa. Lihit raha.
shama, utara aavaDala.
manolaMghanachya shubheChaa aavaDalya.
blog punha suru kelyabaddal abhinandan. Utara theek watala pan sahmat nahi.
Dhananjay
Post a Comment