Monday, March 08, 2010

काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्‍याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या, किंवा त्याकाळात पडावे लागलेल्या काही महिलांनी मतदानाचा हक्क, समान पगाराच्या, कामाच्या ठिकाणी किमान सोयीच्या मुळ मागणीपासून सुरु केलेला एक लढा बघता बघता स्त्रीमुक्तीच्या मागणीपाशी येऊन ठेपला आणि मग एक व्यक्ती म्हणून स्त्रीला समाजात समान अधिकार मिळावेत म्हणून पुढे चालवला गेला.
चळवळ सुरु झाली ती वेळ, तो काळच असा होता की स्त्रीमुक्तीचा शारिरीक आणि मानसिक पातळीवरचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची नितांत गरज होती. या गरजेतूनच १९१० साली कोपनहेगनला भरलेल्या एका आंतराराष्ट्रीय महिलांच्या मेळाव्यात क्लारा झेटकिन्स या जर्मनीतल्या स्त्रीवादी कार्यकर्तीने असा एखादा दिवस असावा ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करु शकतील अशी कल्पना पहिल्यांदा मांडली. एकत्रित जागतिक महिला दिनाच्या या कल्पनेला सतरा देशांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या शंभर महिलांनी त्यादिवशी जोरदार पाठिंबा देत उचलून धरले. त्या शंभर महिलांमधे जगात पहिल्यांदाच संसदेमधे निवडून येण्याचा मान मिळालेल्या तीन फिनिश संसद सदस्य महिला होत्या आणि इतर महिला कामगारांच्या प्रतिनिधी होत्या.
१९१० सालच्या महिलामेळाव्यात 'आंतराष्ट्रीय महिलादिनाची' कल्पना पहिल्यांदा मांडली गेली याअर्थाने आजचा २०१० सालातला महिला दिन शंभरावा होऊ शकतो. अर्थात याचे बीज याआधी दोन वर्षे म्हणजे १९०८ साली न्यूयॉर्क शहरामधे १५०० कामगार महिलांनी जो संतप्त मोर्चा काढला होता त्याचवेळी पडले होते तेव्हा शंभरावा महिला दिन २००८सालीच होऊन गेला असेही काही जण म्हणतात. तर काहीजण म्हणतात जरी कोपनहेगनला महिला दिनाचा संकल्प सोडला असला तरी तो अधिकृतरित्या साजरा झाला पुढच्या वर्षी म्हणजे १९११ साली ऑस्ट्रिया, जर्मनी येथे तब्बल दोन लाख महिलांच्या उपस्थितीत. तेव्हा शंभरावा वाढदिवस २०११ साली.
शंभरावा आंतरराष्ट्रीय महिला दिन नक्की कधी या वादाला अजिबात महत्त्व नाही कारण मानवमुक्तीच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात अशी एक दोन इकडची तिकडची वर्षे खरोखरच क्षुल्लक ठरतात. खरे महत्त्व आहे ते स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल नक्की कशी होत गेली ते जाणून घेण्याला.
स्त्रीवादी चळवळींची सुरुवात मूलतः झाली 'लैंगिक समानते'च्या विचारांमधून आणि ती व्यापक होत 'स्त्रीहक्का'च्या मागणीपर्यंत येऊन स्थिरावली. या चळवळींच्या वाटचालीत असंख्य वळणं, खाचखळगे, उंचवटे येत राहिले. त्यांना विरोध तर कायमच होत राहिला. 'फेमिनिझम' हा मुळचा फ्रेन्च शब्द १८९५ साली यूकेच्या 'डेली न्यूज' मधून पहिल्यांदा इंग्लिश भाषिकांच्या नजरेस पडला तेव्हापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. आणि ती सुद्धा क्वीन व्हिक्टोरियाकडून " mad, wicked folly of 'Woman's Rights" अशा शब्दांमधे!
मात्र या आधी बरीच वर्षे, अगदी अठराव्या शतकातच एका नव्या स्त्रीवादी विचारसरणीचा उदय झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट नावाच्या एका तत्वज्ञ विचारसरणीच्या लेखिकेने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकाद्वारे. फेमिनिस्ट विचारधारा रुजवणारी ही पहिली लेखिका. मेरीने आपल्या पुस्तकातून स्त्रियांची जडणघडण आणि शिक्षण लहानपणापासूनच पुरुषी दृष्टीकोनातून, त्यांना काय आवडेल या विचारांतूनच केले जात असल्याने स्त्रियांची स्वतःबद्दलची अपेक्षाच मर्यादित रहाते हा विचार मांडला तो त्याकाळाच्या मानाने धाडसाचा होता आणि त्याबद्दल तिला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले. मेरीच्या मते समाजातल्या भेदभावाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच जबाबदार असतात, पुरुषावर वर्चस्व गाजवण्याची प्रचंड ताकद स्त्रीमधे असूनही ती आपल्या शक्तीचा वापर करत नाही असे तिचे मत होते. अपुर्‍या आणि चुकीच्या शिक्षणामुळे बहुसंख्य प्रश्न निर्माण होतात हा विचारही तिच्या पुस्तकात होता. तिने मांडलेल्या काही प्रश्नांना आजही समाधानकारक उत्तरे मिळू शकत नाहीत.
एकोणिसाव्या शतकात जेन ऑस्टिन, एलिझाबेथ गॅस्केल, ब्रॉन्टे भगिनी, लुइझा मे अल्कॉट सारख्या लेखिका स्त्रियांचे प्रश्न, त्यांची दु:ख, निराशा याबरोबरच सशक्त स्त्रीवादी व्यक्तिरेखाही आपल्या कादंबर्‍यांमधून मांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आदर्श स्त्रीच्या 'व्हिक्टोरियन इमेज'मधे स्त्रियांना गुदमरवायला कारणीभूत ठरलेल्या 'द एंजल इन द हाऊस' सारख्या पुस्तकांच्या आकर्षणातून स्त्रियांना बाहेर काढणे फार कठीण होते. १८४३ साली मरियन रीड नावाच्या स्कॉटिश लेखिकेने A plea for women मधून पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्याच्या अन्यायाबद्दल लिहिले आणि आपल्याला काही सुप्त अधिकार आहेत ज्यांचा वापरच आपण अजून केला नाही हा विचार जोमाने काही जागरुक स्त्रियांच्या मनात पसरला. याच सुमारास आपल्या वैवाहिक जीवनातल्या अत्याचारांना बळी जायचे नाकारत घराबाहेर पडलेल्या कॅरोलिन नॉर्टन या ब्रिटिश महिलेला स्त्रियांना कायद्याचे पाठबळच नसल्याची जाणीव विदारकपणे झाली होती. पण तिने आवाज उठवला होता आणि अगदी राणी व्हिक्टोरियापर्यंत जाउन दाद मागितली होती. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे स्त्रिया आणि मुलांना किमान कायद्याचे संरक्षण तरी असावे हा विचार ब्रिटनमधे सुशिक्षितांमधे चर्चेला आला.
अर्थातच स्त्रियांचे हे प्रश्न सुटे सुटे चर्चेला येत होते आणि स्त्रियांचा परस्परांना पाठिंबा तर अजिबातच नव्हता. उलट अशा घरफोड्या आणि विद्रोही विचारधारेच्या स्त्रियांपासून आपण किती वेगळ्या आहोत हे दाखविण्याची चढाओढच समाजातल्या प्रतिष्ठित महिलांमधे होती. एखादीच फ्लोरेन्स नाईटिंगेल त्या काळात होती जिला आपल्यातल्या क्षमतेची जाणीव होती आणि त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत तिने आपल्याला हवी तीच करिअर निवडण्याचे धाडस तेव्हा दाखवले.
मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव हळूहळू होत होता आणि स्त्रियांचे वैवाहिक अधिकार, मालमत्तेवरचा अधिकार, कौटुंबिक अत्याचाराविरुद्ध आवज उठवण्याचे धाडस अशा विषयांना तोड फुटत होते. बार्बारा लिग स्मिथने ब्रिटनमधे स्त्रियांना एकत्र बोलावून, चर्चा करण्याचे, सभा घेण्याचे काम सुरु केले. त्यांच्या सभा लॅन्गहॅम पॅलेसमधे व्हायच्या आणि म्हणून या 'लेडिज ऑफ द लॅन्गहॅम पॅलेस'. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८५५ मधे विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेच्या अधिकारांसाठी कमिटी नेमली गेली. स्त्रिया निदान स्वतःचे प्रश्न मांडायला एकत्र जमायला लागल्या होत्या. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने हे फार मोठे पाऊल होते.
स्त्रीवादी चळवळींचा हा सुरुवातीचा इतिहास जेव्हा स्त्रियांचे प्रयत्न एकाकी, अपुरे होते. पण त्यातूनच पुढे शैक्षणिक क्षेत्रात, राजकिय, सामाजिक क्षेत्रांत स्त्रियांचा सहभाग वाढला. वाढतच गेला.
स्त्रीवादी चळवळींना नंतरच्या काळातही काही अतिरेकी, हटवादी स्त्रीकार्यकर्त्यांमुळे असेल किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या पक्क्या पारंपरिक पुरस्कर्त्यांच्या कडव्या भुमिकेतून आलेल्या विरोधामुळे असेल.. पण एक उपहासात्मक स्वरुप लाभत गेले. आजही त्यांची चेष्टा उडवणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. परंतु स्त्रियांनी शिकावे, त्यांचे राहणीमान उंचावावे, स्वत्व-सन्मानाची ओळख त्यांना व्हावी, आर्थिकदृष्ट्या त्या सबल व्हाव्यात, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, मतदानाचा अधिकार मिळावा, समाजात एक व्यक्ती म्हणून बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून तळमळीने ज्यांनी ज्यांनी काम केले होते त्यांचे जर स्मरण आज प्रत्येक स्त्रीने (आणि स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा) केले नाही तर तो मानवी कृतघ्नपणा ठरेल.
'संयुक्ता' तर्फे जागतिक महिला दिनाचे स्मरण याच कृतज्ञ भावनेतून ठेवले जात आहे. स्त्रीवादी चळवळींचा इतिहास, त्यातले महत्वाचे टप्पे,स्त्रीवादी चळवळींचे कार्यकर्ते या सार्‍यांबद्दल 'संयुक्ताच्या' व्यासपीठावरुन आपण जाणून घेऊया.
'फेमिनिस्ट' चळवळीला ज्यांचा हातभार लागला त्या सार्‍याच कार्यकर्त्यांची नोंद इतिहासही ठेवू शकला नाही. काही महत्वाची नावे मात्र कधीही विस्मृतीत जाऊ नयेत-कारण काल 'त्या' होत्या म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत.

एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन (१८१५ ते १९०२)- पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना हिने केली.
ग्रेस ग्रीनवूड (१८२३ ते १९०४)- पहिली महिला वार्ताहार.
मरियन हाईनिश( १८३९-१९३६)- स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला.
केट शेफर्ड (१८४७-१९३४)- स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून या न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला गेला. १८९३ साली तिथे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले.
एमिलिन पॅन्खर्स्ट (१८५८-१९२८)- ब्रिटनमधे हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली.
बिबी खानुम अस्तराबादी ( १८५९-१९२१)- इराणियन लेखिका. स्त्रीवादी चळवळीची बीजे इराणमधे रुजवण्याचे कार्य हिच्या हातून सुरु झाले.
इडा बी. वेल्स (१८६२-१९३१)- अमेरिकेत स्त्रियांना समान नागरी हक्क मिळावेत म्हणून लढा देणार्‍या महिलांमधे पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला म्हणून हिचे नाव महत्वाचे ठरते.
शिरीन इबादी(१९४७)- स्त्रिया आणि मुले यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हिने उभारलेली चळवळ फार महत्वाची ठरते. स्त्रीवादी चळवलींमधे नोबेल शांती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला.
कॅरोलिन एगान- मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची पहिली पुरस्कर्ती.
एमिली हॉवर्ड स्टोवे - व्यावसायिक वैद्यकिय संघटनांमधे स्त्रियांना सहभागी करुन घेतले जावे यासाठी प्रयत्न. कॅनडामधे स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ.
अन्सार बर्नी (१९५६)- पाकिस्तानमधे स्त्रीवादी चळवळीचे विचार पसरवण्यासाठीचे प्रयत्न जाहिररित्या सुरु करण्याचे धाडस हिने प्रथम दाखवले.

इराणियन-कुर्दिश महिलांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी रोया टोलुई, इजिप्त आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमधल्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी अ‍ॅन्जी गोझलान, केनिया मधल्या महिलांसाठी जागतिक पातळीवर मोर्चेबांधणी करणारी सोफी ओगुटू अशी अनेक नावे या यादीत समाविष्ट करायलाच हवीत. याव्यतिरिक्त अनेक फेमिनिस्ट लेखिका, कलाकार स्त्रीवादी चळवळीत वेळोवेळी सहभागी होत गेले. स्त्रीवादी विचार घरोघरी पोचविण्याच्या कामात त्यांचे योगदान शंभर टक्के महत्वाचे ठरते.

काही भारतीय नावे ज्यांनी काही ना काही प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व माजी आणि भावी कार्यकर्त्यांना समर्पित करुया.

4 comments:

Abhijit Bathe said...

Wait a minute. What exactly did these people do for you to be wherever you are?

"जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर..."

I know a bit about Phules and Karve - that they worked on the widow re-marriage and stuff, but I am havinng a hard time undertanding the role of others in shaping you!

The post in not an opinion, would appreciate some references to the facts mentioned.

शर्मिला said...

भारतीय स्त्रीवादी चळवळींचा प्रसार कसा होत गेला, त्यातले टप्पे कोणते, या उल्लेख केलेल्या व्यक्तींचा त्यातला नेमका रोल कोणता हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. युज्वली या व्यक्तींच्या कार्याबद्दल शाळांमधून काही ना काही स्वरुपात माहित हे झालेले असतेच उदा. रॉय यांनी सतीच्या चाली विरुद्ध केलेले काम.
फुले, कर्वे यांनी महाराष्ट्रात जे केले तेच ब्राह्मो समाजाच्या कार्यकर्त्यांनी, विद्यासागर, सेन, रॊय यांनी बंगालमधे केले. महाराष्ट्र तरी त्यामानाने प्रोग्रेसिव्हच म्हणायचा इतकी वाईट परिस्थिती बंगालमधे होती. ब्राह्मो समाजाच्या कार्यकर्त्यांना तथाकथीत कुलिन बंगाली ठाकूर घराण्यातील स्त्रियांवर लादले गेलेले कर्मठ रितीरिवाज, प्युबर्टी येण्यच्या आतच केले जाणारे बालविवाह, बहुपत्नीत्वाची चाल, विधवांचे भयानक जिणे यासर्वासाठी काम करणे प्रचंड कठिण गेले. विधवा लहान मुलींवर घरातूनच इतके अत्याचार होत की अर्धपोटी, कृश, हाडांचा सापळा झालेल्या मुली बाहेर पळून जात आणि मग त्यांना वेश्याव्यवसायात ओढणे समाजा्च्या दृष्टीने सोयीस्करच आणि सोपे होते.(१८५३ साली कलकत्त्यामधे वेश्यांची संख्या तब्बल १२,७१८ होती आणि त्यातल्या बहुतेक सगळ्या या अशा मुली होत्या ) यापेक्षा सती जाणे परवडले हा विचार यातूनच आला.
विद्यासागरांच्या प्रयत्नांनी विडो रिमॅरेज ऍक्ट १८५६ साली पहिल्यांदा मान्य केला गेला.
बंगालच्या रेनेसान्स कालखंडात स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करणारे, त्यांना कायद्याचे पाठबळ मिळावे म्हणून प्रयत्न करणारे हे सारे कार्यकर्ते सोशल रिफ़ॉर्ममधे फ़ार मोठी भुमिका बजावून आहेत.
चन्द्रमुखी बासू- कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून MA (१८८४)झालेली ही पहिली आणि एकमेव महिला. कदंबिनी गांगुली आणि चन्द्रमुखी बासू या दोघींनी त्याआधी १८८० साली देहराडून स्कूलमधून आर्ट्सची पदवी घेतली.महिलांमधे पहिल्यांदा. कोणत्याही हिन्दू मुलीला यासाठी आधी प्रवेश देण्यात आलेला नव्हता.चन्द्रमुखी त्यानंतर त्याच शाळेची मुख्याध्यापिका झाली. संपूर्ण आशिया खंडात त्याआधी कोणीही महिला ऍकेडेमिक हेड झालेली नव्हती. कदंबिनी गांगुली पहिली भारतीय महिला फिजिशियन जिने मेडिकल प्रॅक्टिस केली.
आगरकरांचे ’सुधारक’ हे बिरुद बालविवा्हाला,विधवा केशवपनाला विरोध करण्यातूनच आले. रानडेंनी विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, स्त्रियांवर लादलेल्या कर्मठ चालिरिती मोडून काढण्यासाठी मोठी जननागृती आणि काम केले.
मॅडम कामांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कर्तृत्वाबद्दल तर लिहावे तितके थोडे. लक्षात घ्या हा एकोणिसाव्या शतकाचा मध्याचा काळ जेव्हा स्त्रिया फ़ारशा घराबाहेरही पडत नसत.
सुचेता कृपलानी (मजुमदार)- फ़्रिडम फ़ायटर तर होत्याच पण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवडून येणारी ती पहिला महिला.
चित्तगांवला जन्मलेल्या प्रितीलता वाडदेकरने युरोपियन क्लबमधे जिथे भारतीयांना आणि कुत्र्यांना प्रवेश नसे तिथे प्रवेश करुन स्फ़ोट घडवून आणला होता. प्रचंड डेअरिंगबाज मुलगी होती ही. जेन्डर डिस्क्रिमिनेशला प्रत्येक पातळीवर भारतात जाणीवपूर्वक विरोध करणारी ही पहिली महिला.
continued..

शर्मिला said...

ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली स्वत: छापून प्रसिद्ध केलेल्या ’स्त्री पुरुष तुलना’ नावाच्या पुस्तकातले त्यांचे पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेवरचे आणि जातीसंस्थेच्या विरोधातले विचार आजही थक्क करुन सोडतील इतके जहाल आहेत. हे पहिले ’मॉडर्न फ़ेमिनिस्ट टेक्स्ट’ म्हणावे लागेल. हिंदू कर्मठ, धार्मिक, ब्राह्मणी पोथी पुराणांतील विचारांना तिने थेट आव्हानच दिले होते. फ़ुलेंची सत्यशोधक समाजाची परंपरा तिने खंबिरपणे निभावली.
जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना यांनी राज्य उभारणे, ते सांभाळणे, राजकिय स्ट्रॅटेजीज आखणे यात त्याकाळात (पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत)जे काम केले आहे ते तर पुरुषालाही लाजवणारे. कोणत्याही स्त्रीला त्यापासून फ़क्त स्फ़ुर्तीच मिळावी.
संसदेमधे स्थान मिळवणा-या विजयालक्ष्मी पंडित पहिल्या भारतीय महिला. यूएन ह्यूमन राईट्स कमिशन्मधे भारतातर्फ़े प्रतिनिधित्व करणा-या त्या पहिल्या (नुसत्या महिला नव्हे तर पहिल्या भारतीय). सरोजिनी नायडू इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा, आणि राज्याच्या गर्व्हनरपदी येणा-या पहिल्या महिला. सरोजिनी साहू, कुसुम अन्सल काही पहिल्या इन्डियन फ़ेमिनिस्ट रायटर पैकी एक. (एक और पंचवटी सारख्या) अप्रतिम स्त्रीवादी कथा त्यांनी लिहिल्या. पंजाबीतून लिखाण करणा-या अमृता प्रीतमना तर त्यांच्या खुल्या, निर्भय, संवेदनशील स्त्रीवादी विचार आणि आचारांसाठी आदर्श प्रत्येक भारतीय स्त्रीने आदर्श बनवावे. साहित्य अकादमी पुरस्कार (आणि नंतर ज्ञानपीठ) मिळवणा-या त्या पहिला स्त्रीलेखिका. मधू किश्वरच्या ’मानुषी’चे कार्य जरी घेतले तरी त्यांच्या इतर कर्तृत्वाची दखल नाही घेतली तरी चालेल.
आपला वैयक्तिक परिघ सोडून कला, सामाजिक, राजकिय क्षेत्रात काम केलेली प्रत्येक स्त्री, सोशल रिफ़ॉर्ममधे सहभागी झालेला प्रत्येक पुरुष खरतर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात स्त्रीवादी चळवळीला जोडला जातो. त्याचा इथे सन्मानाने उल्लेख करायलाच हवा.लेख पसरट होईल वगैरे कारणे देत तसे करणे टाळ्णे हा माझा कर्मदरिद्रीपणा होता.

शर्मिला said...

वैयक्तिकरित्या या सा-यांनी आपल्यासाठी काय केलं, आत्ताच्या माझ्या जडणघडणीत या सर्वांचं काय योगदान, मी सेल्फ़मेड आहे वगैरे.. असा मूर्खासारखा विचार कोणतीही स्त्री नक्कीच करणार नाही. रक्तातून वाहणा-या गुणसूत्रांचे व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत जे योगदान असते अगदी तसेच यांचे योगदान आज मला एक व्यक्ती म्हणून समाजात स्वतंत्रपणे, सन्मानाने जगताना लाभते. माझ्या आजच्या जगण्याला काळाकडून, या व्यक्तिंच्या कार्यातून मिळालेला पाठिंबा, सपोर्ट महत्वाचा आहे.