Wednesday, November 24, 2010

चायना पोस्ट-तीन (श्यूच्या घरी.पीच फार्मवर)

या आठवड्यात मधे एक चिनी सण होता.ड्रॅगन फेस्टीवल.सुझन म्हणजे श्यूचा एसेमेस आला की ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे.तुला यायचय कां?मी एका पायावर तयार झाले.
श्यूचे वडिल होंगियानपासून जरा लांब लिन हाय नावाच्या शहराजवळ रहात होते.त्यांच्या पीचच्या बागा होत्या.ताज्या,तयार पीचची नुकतीच तोडणी झाली होती.श्यूच्या आईचा आग्रह होता की पीच खायला श्यूने घरी यायलाच हवय.
श्यू आणि मी त्या दिवशीच्या शॉपिंगनंतर खूप भटकलो होतो.चायनिज ब्यूटी सलूनमधे,सुपरमार्केटमधे,बागेत वगैरे अनेक ठिकाणी.इंग्लिश आणि चायनिज बोलू शकणारी श्यू सारखी लोकल मुलगी बरोबर असल्याने मला खूप निर्धास्त वाटायचं.शिवाय ती बार्गेनही मस्त करायची.एका कन्फ्युशियस टेम्पलबाहेर असणार्‍या जेडच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून मला हवी असणारी जेडची बांगडी तिने त्या दुकानदाराने आठशे युआन किंमत सांगितल्यावर बराच चिनी कलकलाट करुन तिने मला ती शंभर युआनला मिळवून दिल्यापासून माझा तिच्याबद्दलचा आदर फारच वाढला होता.श्यूजवळ भयंकर पेशन्सही होता.माझ्या निरुद्देश भटकत रहाण्याचा,चालताना असंख्य अडाणी,बारिकसारिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा,सारखं थांबून काही ना काही गोष्टींचे फोटो काढण्याच्या टिपिकल टुरिस्टी उत्साहाचा तिला कधी कंटाळा येत नाही.
श्यूच्या घरी जाण्यासाठी आम्ही भल्या सकाळी सहा वाजता होंगियानच्या बसस्टेशनवर गेलो.बसस्टेशन चकचकीत आणि एअरपोर्टसारखं सजलेलं.सुरक्षाव्यवस्था सुद्धा तशीच.सामानाचं स्कॅनिंग,चेकइन अगदी साग्रसंगीत.काडीवर आईसफ्रूटसारखे लांबट लालसर मासाचे तुकडे लावून ते विकायला अनेक जण येत होते.
श्यूने आम्ही गेल्यावेळी घेतलेला ड्रेस घातला होता.खरं तर हा पार्टीफ्रॉक.त्यामुळे बरंच अंग उघडं टाकणारा आणि अगदी तोकडा.श्यूला छान दिसत होता पण तरी बसप्रवासाच्या दृष्टीने अगदि अयोग्य असं मला वाटून गेलं.पण ती बिनधास्त होती.इथे जनरलीच अत्यंत शॉर्ट ड्रेसेस घालायची फॅशन आहे.मात्र रस्त्यांवर,बसमधे किंवा कुठेही कधिच इव्हटिझिंगचा त्रास नसतो.चीनमधे रात्रीबेरात्रीही मुली बिनधास्त एकेकट्या फिरु शकतात.अतिशय सेफ आहे त्यादृष्टीने संपूर्ण चायना.
या बसचा पाऊण तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही लिनहाय शहरात पोचलो.तिथून एक दुसरी बस घेतली.त्यातून अर्धा तास प्रवास.आता डोंगराळ,खेड्यांमधून प्रवास सुरु झाला.हवा कमालीची गार झाली.एका अगदी साध्या,धुळीने भरलेल्या खडबडीत रस्त्यावरच्या स्टॉपवर आम्ही उतरलो.श्यूचं गाव अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.पण आम्ही इथे उतरलो कारण इथे भाज्यांच मार्केट आहे.मी शाकाहारी असल्याने श्यू माझ्यासाठी भाज्या,टोफू वगैरे घेऊन घरी जाणार आहे.तिच्या गावात ताज्या भाज्या रोज येत नाहीत.
भाज्या आणि मास इथे शेजारी शेजारीच हारीने लावून ठेवलेलं होतं.आख्खे सोलून ठेवलेले विविध आकारांचे अगम्य प्राणी,अ‍ॅल्युमिनियमच्या टोपांमधले समुद्री जीव,प्लास्टीकवर मांडून ठेवलेले रांगते,सरपटते जीव यांच्यामधून मी जीव मुठीत धरुन कशीतरी भाज्यांच्या एका स्टॉलवर श्यूचा हात धरुन पोचले.चिनी भाजीवाले आणि वाल्या प्रचंड कुतूहलाने माझ्या भारतीय अवताराकडे पहात होत्या.इंदू इंदू करत मधूनच हाका मारत खुदूखुदू हसत होत्या.स्टॉलवर बांबूचे कोंब,चायनिज कॅबेज,गाजरे,फरसबी,समुद्र वनस्पती,सोयाबिनच्या हिरव्या शेंगा,ताजे टोफूचे स्लॅब्स,टोमॅटो,मश्रूम्स यांचे जीव हरखवून टाकणारे ताजे,टवटवीत ढीग होते.श्यूने प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं.




मग जवळच्या टपरीवरुन कोकचा मोठा चार लिटरचा कॅन घेतला आणि आम्ही एका सायकल रिक्षात बसलो.अगदी डगमगती सायकलरिक्षा.ओढणारा चिनी दणकट बांध्याचा.या सगळ्या सायकलरिक्षा चालवणार्‍यांची कपड्यांची स्टाईल अगदी एकसारखी.गुडघ्यापर्यंत पोचणार्‍या अर्ध्या चड्ड्या आणि अर्ध्या बाह्यांचा रंगित शर्ट पोटावरुन गुंडाळत छातीपर्यंत दुमडून घेतलेला.बरेचसे चिनी दुकानदार,रस्त्यावरचे विक्रेते वगैरे हे असे पोटं उघडी टाकून फ़िरत असताना इतकी विचित्र दिसतात.
श्यूच्या गावात पोचेपर्यंत तो सायकलरिक्षावाला मागे वळून अखंड बडबडत होता.श्यू मधून मधून त्याचं बोलणं अनुवाद करत मला सांगत होती.यावर्षी पाउस जास्त झाला त्यामुळे पीचच्या फ़ळांचं नुकसान झालं आहे.फ़ळांच्या साली काळ्या पडल्या त्यामुळे भाव कमी आला.नुकसान झालं.सरकारी मदत मिळाली तरच निभाव लागणार यावर्षी वगैरे.मला एकदम मी नाशिकजवळच्या द्राक्षांच्या मळेवाल्यांची गार्‍हाणी ऐकतेय असा भास झाला.
लिनहाय आणि आजूबाजूचा हा सारा भाग पीचच्या बागांसाठी प्रसिद्ध.बहुतेकांच्या बागा आहेत.उरलेले सारे तोडणीच्या कामाचे मजूर.गाव बर्‍यापैकी गरीब.रस्ते मातीचे.पण आजूबाजूला कमालीची स्वच्छता.कुठेही कचराकुंड्यांमधून बाहेर वहाणारा कचरा नाही,प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे नाही की गावातला टिपिकल बकालपणा नाही.चीनमधे आपल्याकडे असतात तशाच प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर आहे.पण त्या पिशव्यांचा कचरा किंवा प्रदुषण दिसलं नाही.एकंदरीतच चीनमधे कचरा समस्या कशी हाताळतात हा एक स्वतंत्र,इंटरेस्टींग विषय आहे.बिजिंगसारख्या मोठ्या शहरात कित्येक टन कचरा उचलण्याचा बॅकलॉग रोज शिल्लक रहातो अशा तर्‍हेच्या बातम्या चीनी सीसीटीव्ही या(एकमेव)चॅनेलवरुन कानावर पडायच्या.पण इतर मध्यम,लहान आकारांच्या शहरांमधे चिनी रोजच्यारोज प्रचंड संख्येने कचरा पैदा करत असतात.स्टायरोफ़ोमचे डिस्पोजेबल कप,प्लेट्स,पॅकिंग मटेरियल,प्लास्टिकच्या बाटल्या,चॉपस्टिक्स,खाण्यापिण्याचे ऑरगॅनिक वेस्ट यांचे ढिगारेच्या ढिगारे रात्री उशिरा दुकाने बंद आणि रस्त्याकडेची रेस्टॉरन्ट्स बंद झाल्यावर फ़ूटपाथच्या कडेला गार्बेज बॅग्जमधे भरुन लावून ठेवलेले असतात.ओला-सुका, रिसायकलिंगसाठीचा वगैरे कचर्‍याचं वर्गिकरण वगैरे काहीही केलेलं नसतं.मग त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावतात हे जाणून घेणं इंटरेस्टींग आहे शहर व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून.पण ते नंतर.
लिनहायमधे घरं दगडांनी बांधलेली.काहींना बाहेरुन गिलावाही दिलेला नाही.


एका पायवाटेवरुन बरच आत चालत गेल्यावर श्यूचं घर आलं.घराला बाहेर मोठा दरवाजा आणि आत एक रिकामा मोठा हॉल.त्यात पीचतोडणीला लागणा-या बांबूच्या टोपल्या,मोठ्या कात्र्या,आणि इतर अवजारे,टोपल्या वगैरे भिंतीला अडकवून,टेकवून ठेवलेले.तीनचार सायकली आणि एक लाकडी बसायचा बाक.चिनी सिनेमांमधल्या शेतकरी चिनीलोकांच्या डोक्यांवर ह्मखास दिसणार्‍या त्या टिपिकल बांबूच्या कामट्यांच्या विणलेल्या मोठ्या कडांच्या हॅट्सही टांगलेल्या.




भिंतीवर चेअरमन माओचा फ़ोटो.एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअर.त्यावर चाललेला चिनी सिनेमा श्यूची मावशी आणि म्हातारी आजी टक लावून पहात बसलेल्या.श्यूची आई बाहेर गेली होती ती नंतर आली.श्यूचे वडिल.त्यांच नाव सॉंग.अगदी गरीब,लाजाळू स्वभावाचे,डोळ्याच्या कडांना सुरकुत्या पाडत हसणारे,घोट्याच्या वर दुमडलेल्या ढगळ पॅन्ट घातलेले मध्यमवयिन शेतकरी गृहस्थ.श्यू आपल्या आईवडिलांबद्दल बसमधून येताना खूप काही आदराने सांगत होती.अगदी अभावग्रस्त परिस्थितीत श्यू आणि तिच्या बहिणीला त्यांनी मोठं केलं,शिक्षण दिलं,कर्ज झालं तरी मुलींना काही कमी पडू दिलं नाही.साँग कुटुंबिय आणि लिनहाय गाव पर्ल बकच्या कादंबरीतून उचलून आणल्यासारखं वाटायला लागलय मला एकंदरीत.

श्यूच्या बाबांनी कोकचे ग्लास भरुन बाहेर आणले आणि आम्ही स्थिरस्थावर होतोय इतक्यात वीज गेली.टिव्ही बंद झाला.श्यूची आजी दु:खाने काहीतरी पुटपुटली आणि बाहेर निघून गेली.आता संध्याकाळपर्यंत पॉवर येणार नाही.श्यू म्हणाली.चीनच्या मोठ्या शहरांमधे जरी वीजेचा झगमगाट असला तरी उर्वरीत चीनमधे,विशेषत:अशा गावांमधे वीजेचा तुटवडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजूनही आहे.बिजिंग ऑलिम्पिकनंतर तर पॉवरकटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे.सहा सात तास वीज जाणं हे नेहमीचंच आहे असं श्यू म्हणाली.
श्यूची मावशी हॉलच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरात गेली आणि श्यू आणि मी बाकी घर बघायला जिन्यावरुन चढून वर गेलो.वर तीन बेडरुम्स आणि टॉयलेट.ते मात्र चकचकीत,पाश्चात्य पद्धतीचे.चीनमधे गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केलेल्या सुधारणांमधे ही एक म्हणजे पाश्चात्य टॉयलेट्स सर्वत्र,सार्वजनिक ठिकाणांवर सुद्धा अतिशय स्वच्छतेने मेन्टेन केलेली.काही ठिकाणी पौर्वात्य पद्धतीची म्हणजे भारतात असतात तशी टॉयलेट्स अजूनही आहेत पण त्यांचं प्रमाण जवळपास नाहीच.खेड्यांमधे सुद्धा स्वच्छता दिसण्याचं कारण हेही एक.

घराच्या मागे छोट्या पॅचमधे चिनी हर्ब्जचं गार्डन.आपल्याकडच्या तुळशींसारखी रोपटी.कोरफ़ड आणि एक विशिष्ट गुलाबी छटेची लहान फ़ुलं येणारी रोपं.चिनी लोकं अजूनही पारंपारिक चिनी वैद्यकाला खूप मानतात.चिनी हर्ब्ज,फ़ुलं घातलेलं गरम पाणी दिवसभर कधीही पितात.हिरव्या पानांचा चहा पिणं पूर्वीपासून प्रतिष्ठित लोकांमधेच जास्त प्रचलित.सामान्य,गरिब चिनी जनतेला ग्रीन टी परवडत नाही.हर्ब्ज,सुकवलेली मोग-याची,जिरॅनियमची फ़ुलं घातलेल्या गरम पाण्यालाही ते चहाच म्हणतात.चिनी भाषेतला चहाचा उच्चार आपल्या चाय च्या जवळचा.
श्यूची मावशी मला काहीतरी हातवारे करुन विचारत होती.मला काही केल्या कळेना.श्यू आसपास नव्हती.इतक्यात श्यूची लहान मावसबहिण शाळेतून आली.तेरा चौदा वर्षांची.तिने उत्साहाने दप्तरातून इंग्रजीचं पाठ्यपुस्तक काढलं.तिला इंग्रजी वाचता येत होतं पण बोलता येत नव्हतं.सराव नाही म्हणून.पुस्तकातल्या इंग्रजी शब्दांवर बोट टेकवत तिने मावशीचं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं.मावशी म्हणत होती तिला चिनी पद्धतीचा ब्रेड करता येतो तो मला चालेल कां?आणि आज सण होता त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन कां?शाकाहारी असेल तर मला काहीही चालण्यासारखं होतच.
मावशीने पांढर्‍या पिठाचे गोळे फ़्रीजमधून काढले.लाकडी ओट्यावर एक खोलगट वोक आतमधे बसवला होता.दुसर्‍या बाजूला जरासा उथळ तवा बसवलेला होता.लाकडी ओट्यामागे चुलीला असते तशी आत लाकडं टाकून पेटवायची सोय होती.गॅसचं सिलिंडर होतं पण ते महाग पडतं त्यामुळे रोजचा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवरच होतो असं श्यूने सांगितलं.मावशीने उथळ तव्यावर झाकण ठेवून पांढर्‍या पिठाचे गोळे भाजत ठेवले.आणि भाज्या चिरायला लागली.तिचं सटासट बारिक तुकडे करत भाज्या चिरण्याचं कौशल्य बघण्यासारखं होतं.


भाज्या चिरुन होईपर्यंत श्यूची आई आली.हसरी,गोड आणि जेमतेम पंचविशीची वाटेल अशी.भाषा येत नव्हती त्यामुळे माझ्या खांद्यांवर हात टेकवून,हसून बघत तिनं बिनभाषेचं उबदार स्वागत करत मला स्वयंपाकघरातच ये असं खुणावलं.
त्यानंतरच्या अर्ध्या तासात मला चिनी पाककला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पहायला मिळाला.एकामागून एक चिनी भाज्या,नूडल्स,टोफ़ू,भाताचे प्रकार श्यूची आई इतक्या झटपट बनवत होती आणि सगळं त्या एकाच खोलगट वोकमधे.नुसतं थोडं तेल टाकून त्यावर आलं,लसणाचे काप टाकून कधी गजर-मटार-सिमला मिरची,कधी समुद्र वनस्पती,कधी टोफ़ू-टोमॆटो,चायनिज कोबी-बटाटे असं सगळं एका मागून एक परतत ती डिशेस भरत होती.काही भाज्यांवर घरगुती राईस वाईनचा शिपकारा मारुन स्मोकी चव आणत होती.बाजूच्या शेगडीवर एका वाडग्यात खास चिनी जातीचा बुटका तांदूळ रटरटत होता.त्यात घरगुती गुळ घालून त्याचा खिरीसारखा पदार्थ बनवला होता.



सणासाठी त्रिकोणी सामोश्यासारखे मोमो बनवून त्यात समुद्र वनस्पती-शैवालांपासून बनवलेले सारण भरले होते.हे मोमो समुद्रात अर्पण करतात ड्रॅगन फ़ेस्टीवलच्या दिवशी.या सणामागची कथा इंटरेस्टींग होती.
फ़ार प्राचीन काळी म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्य आजच्यासारखे मलूल नव्हते,तेजस्वी होते आणि लोक दयाळू होते तेव्हा एका गावात एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन प्रेमी रहात होते.समुद्रात जाऊन मासे मारुन आणताना एकदा एक अजस्त्र राक्षसी लाट गावावर चाल करुन येताना त्यांनी पाहिली.गावाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रॅगन देवाचा धावा केला.ड्रॅगनने त्यांना पाठीवर बसायला सांगितले आणि मग ते त्या लाटेचा मुकाबला करायला समुद्रात शिरले.ड्रॅगनने त्या लाटेला अडवायचा खूप प्रयत्न केला.लाट मागे गेली पण ते दोघे प्रेमी समुद्रात बुडाले.गावकर्‍यांनी त्यांना खूप शोधलं पण त्यांची प्रेत मिळाली नाहीत.त्यांचा समज आहे की ड्रॅगनच्या आशीर्वादामुळे ते दोघे जिवंतच आहेत समुद्रात म्हणून त्यांना या दिवशी हे गोड जेवण समुद्रात अर्पण करुन देतात.मोमोमधे भरायचे सारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असते.
श्यूच्याआईने त्यादिवशी तब्बल चौदा भाज्यांचे प्रकार,तांदूळाचीखीर,चिनी ब्रेड,मोमो,नूडल्स,पीचचा मुरंबा,ताजी फळे असे भरगच्च प्रकार बनवून जेवायचे टेबल भरुन टाकले.अत्यंत चवदार.त्यानंतर बिजिंग,शांघाय,होंगझो वगैरे ठिकाणी खास चिनी शाकाहारी पदार्थ मोठमोठ्या हॉटेल्समधून शेफ़ला सूचना देऊन बनवून घेतलेले सुद्धा खायला मिळाले.पण या प्रेमळ चिनी कुटुंबातील घरगुती आदरातिथ्यात ज्या अप्रतिम चिनी जेवणाचा अनुभव घेतला तो केवळ अशक्य.जेवताना श्यूच्या वडिलांनी घरगुती वाईनने बशा भरल्या.चिनी कुटुंबात मुली,बायकांनी बिअर पिणे उथळपणाचे लक्षण मानतात.पण वाइन प्यायलेली चालते.नव्हे तसा आग्रहच असतो.फ़क्त ती वाईन घरी बनवलेलीच हवी.आम्ही प्यायली ती वाईन यामे आणि प्लम या दोन फ़ळांच्या आणि तांदळाच्या मिश्रणातून बनवल्याची माहिती श्यूने दिली.




जेवणानंतर आमचा फ़ोटोंचा कार्यक्रम झाला.श्यूच्या आईला फ़ोटो काढून घ्यायचा खूप उत्साह होता आणि वडिल लाजत होते.

आमची जायची वेळ झाली तेव्हा आम्हाला पोचवायला बस्टस्टॉपपर्यंत सारं कुटुंब आलं.श्यूच्या वडिलांच्या खांद्यावर एक मोठी पेटी आणि हातात एक करंडी होती.ओझं खूपच जड वाटत होतं म्हणून मी कुतूहलाने चौकशी केली.श्यू हसली आणि काही बोलली नाही.बसस्टॉपवर उभी असलेली तमाम चिनी मंडळी माझ्या भोवती गोळा झाली.’नी हाव’म्हणजे चिनी हाय हॅलोचा कलकलाट झाला.माझ्या गालांना काही चिनी काकूंनी हात लावला.मी फ़ोटो काढायला गेले तेव्हा सगळे ओळीत उभे राहिले.मला त्यांचा उत्साह,कुतूहल मजेशिर वाटले.श्यू म्हणली आमच्या खेड्यात येणारी तु पहिलीच भारतीय.म्हणून सगळे खुश आहेत.मी सुद्धा हे ऐकून खूशच झाले.




बस आली तेव्हा लगबगीने श्यूच्या वडिलांनी हातातला खोका आणि करंडी आमच्या पायाशी रचून ठेवले आणि तेही बाजूच्या सीटवर बसले.पुढच्या बसस्टॉपवर पुन्हा त्यांनी ते सामान उचलले आणि आमच्या दुसर्‍या बसमधे ठेवले.श्यूला काही सूचना दिल्या आणि ते उतरले.
होंगियान स्टेशनवर तो जड खोका आणि करंडी उचलून टॅक्सीत ठेवताना आमच्या नाकीनऊ आले.त्यात झिमझिम पाऊस सुरू झाला.टॅक्सीत बसल्यावर मी वैतागतच श्यूला विचारले काय इतकं घेऊन घरी चालली आहेस?श्यू म्हणाली हे तुझं सामान आहे.माझं नाही.मी थक्क.म्हटलं आहे काय यात?पीच.आणि प्लम.मी अवाक.
इतके?हो.पीच एकुण नव्वद आहेत आणि प्लम पन्नास.आणि वडिल म्हणाले एका आठवड्यात संपवायला लागतील.
नव्वद पीच आणि पन्नास प्लम.जेवणाच्या टेबलावरच्या चौदा भाज्या.चिनी आदरतिथ्याने थकून जात मी टॅक्सीच्या सिटवर मान टेकवून झोपी गेले.
---------------------------------
होंगियानमधे परतलो तेव्हा काळोख गडद झाला होता.जॉगर्स पार्कमधे चिनी मुली संगिताच्या तालावर मोहक नाचत होत्या.अतिशय तालबद्ध आणि सिन्क्रोनाईज्ड हातापायांच्या हालचाली.बागेमागच्या नदीत काहीजण गळ टाकून मासेमारी करत बसले होते.मध्यमवयीन चिनि पुरुष तायकान्डोचे व्यायाम करत होते.चिनी आज्या सफ़रचंदी गालांच्या नातवंडांना फ़िरवत होत्या.पाण्याच्या काठावरच्या दिव्यांचा झगमगाट नदीवर पसरला होता.
नदीच्या दुसर्‍या तीरावर मोठमोठी सरकारी चिनी होर्डिंग्ज होती.त्यापलीकडचे काहीही दिसत नव्हते इतक्या जवळजवळ आणि उंच होर्डिंग्ज.शहरांबाहेरच्या हायवेच्या किंवा फ़्लायओव्हरच्याही एका बाजूला अशीच उंचच उंच साउंड बॅरिकेड्स आणि होर्डिंग्ज असतात.पलिकडचं काही दिसूनच नये याची दक्षता घेत उभारल्यासारखी.
नदीपलीकडच्या तीरावरच्या या होर्डिंग्जमागे जुनं होंगियान शहर आहे.
तिथे काय आहे?ते असं लपवलं कां आहे?तिथे असाच झगमगाट आहे की वीजतुटवडा आहे?स्वच्छता आहे की कचर्‍याचे इथून उचललेले ढीग तिथे विल्हेवाटीला नेऊन टाकतात?समृद्धी आहे की अभाव?
चीनमधे असे प्रश्न विचारायची मुभा नाही आणि सोयही नाही.पर्यटकांना तर नाहीच नाही.त्यांनी असे प्रश्न विचारले तरी उत्तरे मिळत नाहीत.स्थानिक लोकं इतर बाबतीत भरपूर बोलतात.चिनी प्रगतीबद्दल बोलताना त्यांचं तोंड थकत नाही.पण त्यापलीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांना वेळ नसतो.अचानक त्यांना इंग्रजी कळेनासं होतं.
--------------------------------
परवा रविवारी जवळच्या डोंगरावर आपण सगळे ट्रेकिंगला जाऊया.तुम्ही दोघं आणि मी आणि ज्यो.खूप प्रसिद्ध आहेत इथले ट्रेकिंग रुट्स.श्यू म्हणाली.मला आवडलं असतं.पण पुढचे सलग दोन आठवडे आम्ही चिनी पर्यटनाला जाणार होतो.शांघाय,बिजिंग बघायला.चीनची भिंत,फ़ॉरबिडन सीटी,तियान्मेन स्क्वेअर,समर पॅलेस,शियांचं टेराकोटा वॉरियर वगैरे.होर्डिंग्जपलीकडची जुनी चिनी शहरं काही बघायला मिळणार नव्हती पण शतकांपूर्वीचे प्राचीन राजवाडे,भिंती,चिनी साम्राज्याचे अवशेष येत्या दोन आठवड्यांमधे दिसणार होते.ते बघायला हवेच होते.
बिजिंग शहरातल्या प्रशस्त,भव्य रस्त्यांच्या जाळ्यापलीकडे समांतर अशा जुन्या बिजिंग शहरातल्या अनेक गल्ल्या आहेत.हुटॉंग्ज नावाने त्या प्रसिद्ध आहेत.गेल्या काही दशकांतल्या,विशेषत:ऑलिम्पिकच्या काळात बिजिंगमधे झालेल्या कायापालटामधे नवं,अत्याधुनिक बिजिंग शहर वसवलं गेलं,स्कायस्क्रॅपर्सनी बिजिंगचं आकाश भरुन गेलं.पण या हुटॉंग्जमधून अजूनही पारंपारिक,जुन्या चिनी पद्धतीची घरं,संस्कृती पहायला मिळते.
अत्याधुनिक,झगमगाटी नवं बिजिंग आणि हजारो वर्षांपूर्वीची फ़ॉरबिडन सीटी अजूनही जशीच्या तशी आपल्या पोटात ठेवलेलं प्राचीन बिजिंग.यांच्या मधला एक फ़ार मोठा काळाचा तुकडा या हुटाँग्जमधे अजूनही शिल्लक आहे.सगळ्याच हुटाँग्ज होर्डींग्ज मागे आणि मॉल्सच्या लखलखाटामागे दडवून ठेवणं चिनी सरकारला जमलेलं नाहीच.
बिजिंगमधे असताना या हुटाँग्जमधून फ़ेरफ़टका मारण्याची संधी अनेकदा घेतली.त्यासगळ्या अनुभवांवर पुन्हा कधीतरी.

2 comments:

Maithili said...

tतुमच्या चीन प्रवासा वरच्या पोस्ट्स वाचल्या..काय सही लिहिले आहेत हो तुम्ही.
बरीच प्रवास वर्णने 'Me, My, Mine...' types असतात...पण it is really awesome...
खूप मज्जा आली वाचताना... :-) :-) :-)

Samved said...

छानच झालय. कुठल्याही भांडखोर शेजाऱ्याविषयी जे कुतुहल असतं ते अजून निमालं नाही. चिन्यांना भारतीयांविषयी काय वाटतं? दोन्ही संस्कृत्या खुप पुरातन आहेत पण संबंध बरेच मर्यादित होते. हुआन चांग नंतर लक्षात राहाणारा एकमेव चिनी म्हणजे जॅकी चांग(!). जोक अपार्ट पण काय वाटतं त्यांना?