Tuesday, March 20, 2012

सूर्य, कमळे आणि संध्यामठ

यातला सूर्य 'इम्प्रेशनिझम' चा.

मी तो पहिल्यांदा पाहीला होता तेव्हा मला ते माहीत नव्हतं. पण तो अगदी गुलझारच्या शाम के पेडपर टंगा हुवा सूरज फ़लकसे पक कर गिरनेहीवाला..दिसत होता. त्यामुळे लक्षात राहीला.





पेंटींग क्लॉद मोने या विख्यात फ़्रेन्च इम्प्रेशनिस्ट चित्रकाराचं होतं. मोने माहीत होता त्याने काढलेल्या तलावातल्या कमळांच्या चित्रांमुळे. शाळेत असताना माझ्याकडे फ़िनलंडच्या पेनफ़्रेन्डने पाठवलेली वही होती. तिच्या कव्हरवर लंबगोल तळ्यात निळी हिरवी एकातएक गुंतलेल्या वर्तुळांसारखी, भोवती पानांची दाटी असलेली, नजर खिळवून ठेवणारी कमळफ़ुलं आणि त्यावर मधूनच पडलेले मऊ उन्हाचे कवडसे.. भोवतालच्या धूक्याच्या झिरझिरीत पडद्यातून पाण्याच्या आतपर्यंत पोचणारे. तो तलाव नुसता मोहक नव्हता, जिवंतपणे स्पंदन पावणारा होता. पाणी आणि त्यावरची कमळं थरथरताहेत असं काहीतरी




वाटायचं. आणि कितीही वेळा पहा, दिवसाच्या प्रत्येक वेळी ती कमळं वेगळी दिसायची. वहीच्या आत दर काही पानांनंतर पुन्हा कमळं, पण ती सुद्धा वेगळी, तलाव तोच. पण छाया प्रकाशाचा खेळ, रंगांचे विभ्रम वेगळेच.




१९२० साली मोने आपल्या गिव्हर्नीतल्या घरात रहायला गेल्यावर त्याने बागेतल्या तलावात फ़ुललेल्या वॉटरलिलीजची ही असंख्य ऑइल पेंटींग्ज रंगवलेली आहेत, असंख्य म्हणजे किती, तर तब्बल दोनशे. गिव्हर्नीच्या घरात रहायला आल्यावर मोनेची दृष्टी डोळ्यांच्या काही विकारामुळे मंदावत होती. तरीही दिवसाच्या प्रत्येक प्रहरात वेगळं दिसणारं तलावाचं रुप कॅनव्हासवर उतरवण्याचा त्याचा ध्यास आणि मंदावलेल्या दृष्टीतूनही त्याच्या हातून उतरलेल्या या उत्कृष्ट कलाकृती थक्क करुन सोडता.

ती नैसर्गिक उजेडातल्या निळ्या-हिरव्या रंगछटांच्या जिवंतपणाची कमाल, हलक्या रंगांच्या फटका-यांमुळे एकातएक मिसळल्यासारखी दिसणारी पानांची वर्तुळ, कमळांच्या कडा..आणि पाण्याचे तरंग, ही मोने ज्याचा मास्टर होता त्या इम्प्रेशनिस्ट शैलीची कमाल होती हे नंतर कळलं, जेव्हा मी त्याच्या त्या पिकल्या फळाप्रमाणे दिसणारा लाल-केशरी सूर्य पाहीला.
क्लॉद मोनेनी १८७४ साली आपल्या समविचारी, म्हणजे स्टुडिओबाहेर पडून नैसर्गिक सूर्यप्रकाशात बदलत्या छायाउजेडाच्या विभ्रमांमधे प्रत्यक्ष जीवनातले क्षण कॅनव्हासवर बंदिस्त करण्याच्या वेडाने झपाटलेल्या एडगर देगा, सिस्ले आणि ऑगस्त रेन्वा या तीन मित्रांसमवेत भरवलेल्या प्रदर्शनातले
"इम्प्रेशन: सनराईज" या नावाचे हे चित्र. समीक्षकांनी उपहासाने प्रदर्शनातल्या सगळ्याच चित्रांना आणि चित्रकारांना "इम्प्रेशनिस्ट" असे संबोधन दिले, आणि मग पुढील काळातल्या आधुनिक चित्रकारितेचा पाया रोवणारी महत्वाची "इम्प्रेशनिस्ट मूव्हमेन्ट उदयाला आली. मोनेनी या खास शैलीत रंगवलेली कुरणं, नद्यांवरचे पूल, चर्चेस, इमारती, पॉप्लरची शेतं सगळीच आकर्षक.
मोनेनी रंगवलेली गिव्हर्नीची कमळं बहुतेकांनी कुठे ना कुठे पाहीलेली असतातच. जगप्रसिद्ध म्युझियम्समधे ती व्यवस्थित ठेवलेली आहेत, फ़्रान्समधे तर मोनेच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ खाल म्युझियमधे लंबगोलाकृती दालने बांधली आणि त्यात मोनेच्या कमळांची म्यूरल्स जतन करुन ठेवली. सोथेबी, ख्रिस्टीजसारख्या ऑक्शन्समधे कित्येक मिलियन पौंडांना वॉटरलिलिजच्या बोली लागत असतात. कमर्शियली त्याच्या असंख्य प्रिन्ट्स, प्रतिकृती विविध माध्यमांमधून लोकांसमोर गेली कित्येक वर्षं येत असतात. मोनेची कमळं ही लोकांकडून सर्वात जास्त ओळखल्या जाणा-या चित्रांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत ते साहजिकच.
निसर्गाची नुसतीच नक्कल करणारे हजारो मिळतात, पण बाह्य निसर्गातली प्रत्येक वस्तू नैसर्गिक उजेडात कधी उजळून कधी मंदावून जात असते, प्रकशाच्या तीव्र-मध्यमतेनुसार वस्तूंमधले रंग स्पंदन पावत असतात हे ओळखून मग त्यांची आपल्या मनात उमटलेली रुपं अभिव्यक्त करणारे चित्रकार मोजकेच आणि म्हणूनच कायमचे लक्षात रहाणारे.
आणि अगदी अलीकडे आबालाल रेहमान (१८५६/६० ते १९३१) यांनी रंगवलेलं संध्यामठ चित्र पहायला मिळालं

. आबालाल रेहमान हे कोल्हापूरचे आद्य चित्रकार. जे जे स्कूल ऑफ़ आर्ट मधे शिक्षण घेतलेले कोल्हापूरचे ते पहिले चित्रकार. त्यांच्याबद्दल खूप कुतूहल मनात होतं. पण त्यांची छापलेली चित्रही अस्पष्ट, लहान आकारांतली त्यामुळे कधी नीट पाहिलीही गेली नव्हती.
संध्यामठ या त्यांच्या चित्रात तसाच पाण्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचा तरल खेळ, वाहत्या वार्‍याचा आभास, रंगांचा तजेला, मन मोहून टाकणारं निर्दोष तंत्रकौशल्य.. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर नव्याने दिसणारा रंगांचा, प्रकाशाचा खेळ. मन थक्क झालं. जगाच्या दोन टोकांवर साधारण (कारण चित्र नक्की कोणत्या साली काढलं त्याची तारीख उपलब्ध नाही) एकाच सुमारास एकच चित्रभाषा वापरली जावी हे खरंच थोर, आणि इतकंच नव्हे तर आबालाल रेहमानांनीही संध्यामठाचं हे एकच नाही तर दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे, बदलत्या सूर्यप्रकाशात या वास्तूचं बदलतं रुप चित्रित केलेलं होतं, इतकंच नाही तर त्यांनी कोल्हापूर जवळच्या कोटीतीर्थ या ठिकाणी जाऊन तिथल्या निसर्गरम्य एकांतात तिथल्या तलावात पसरलेल्या कमलपुष्पांचा आणि पाण्याचा मनोहारी गालिचाही अशाच त-हेने दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे चित्रित केला होता असंही समजलं. नुसतंच समजलं. कारण मोनेची जशी २००/२५० वॉटरलिलीज चित्रांची सिरिज जतन करुन म्युझियम्समधे जपून ठेवल्या आहेत तशा प्रकारचं सुदैव आबालाल रेहमानांचं नाही. म्हणतात की आबालाल रेहमानांनीही एकुण सुमारे पंधरा ते वीस हजार चित्रे काढली होती, पण त्यांच्या चित्रांचा संग्रह कुठेही एकत्रितपणे नाही, देशाच्या कोणत्याही महत्वाच्या म्युझियममधे त्यांची चित्रं सामान्य लोकांना बघायला मिळत नाहीत. इतक्या प्रचंड संख्येने काढलेली त्यांची बरीचशी चित्रं काळाच्या ओघात नष्ट झाली, खराब झाली.
आबालाल रेहमानांबद्दल वाचायचा, माहिती मिळवायचा प्रयत्न केला तेव्हा जे वाचलं त्यातले किस्से कोणते आणि ख-या कहाण्या कोणत्या कळणार नाही इतकं सगळं मोघम लिहिलेलं. बाबुराव सडवेलकरांनी त्यांच्या महाराष्ट्रातले कलावंत या पुस्तकात आबालाल रेहमान यांच्यावर लिहिलेला उत्कृष्ट लेख मात्र अपवाद. त्यात त्यांनी आबालाल रेहमानांकडे झालेल्या दुर्लक्षाची, आपल्याकडे कलाकारांच्या कलावस्तूंची नीट जतन न करण्याच्या मनोवृत्तीची, नसललेल्या कलासंस्कृतीबाबतची खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात-" आमच्या पिढीला आबालाल मास्तरांच्या कलागुणांचा साक्षात्कार कुणीही घडवला नाही. त्यांच्याबद्दलच्या अद्भूतरम्य गोष्टी ऐकल्या पण ते चित्रकार म्हणून क श्रेष्ठ, त्यांच्या चित्रात नेमके कोणते गुण, तंत्रदृष्ट्या त्यातून काय शिकण्यासारखं याचा कोणी विचारच केला नाही. आजही तो कुणी करत नाही. त्यांच्या चित्रांचा संग्रहही कुठे उपलब्ध नाही, त्यामुळे अभ्यासाची इच्छा असणा-यांनाही ती संधी मिळत नाही. आजच्या पिढीला मोने, मॅने, पिसारो माहीत असतात पण आबालाल नाहीत."
चित्रकाराची चित्रभाषा कितीही समर्थ, भावनांना हात घालणारी, अद्वितीय असली तरी जर ती लोकांपर्यंत पोचलीच नाही तर ते दुर्दैव त्या चित्रकाराच्या कलेचे तर आहेच पण त्याहून जास्त चित्ररसिकांचे. कलाकाराच्या आयुष्यातल्या दंतकहाण्याच जास्त प्रसृत झाल्या तर कलाकाराची चित्रभाषा, कलाकृती लोकांपर्यंत पोचत नाही, पोचली तरी त्याचे महत्व त्यांना उमगत नाही.
मोने म्हणाला होता," समुद्राचं खरं सौंदर्य दाखवायचं तर त्याची प्रत्येक लाट रोज, प्रत्येक प्रहरात त्याच जागी जाऊन रंगवायला हवी, तास न तास निरखत रहायला हवी." मोनेच्या जगप्रसिद्ध झालेल्या चित्रांच्या शैलीचं मर्म, त्याचे परिश्रम यातून आपल्याला कळतात, आबालाल रेहमानही कोटीतीर्थाच्या त्यांच्या वास्तव्यात मनन चिंतन करत असताना, संध्यामठाची चित्रं रंगवत असंच काही नक्की म्हणाले असतील. पण आपल्यापर्यंत ते पोचणार नाही. त्यांनी कोटीतीर्थाच्या वास्तव्यात सविस्तर डायरीही लिहिली होती असं म्हणतात, त्यातून त्यांच्या शैलीचं मर्म, परिश्रम पोचू शकले असते कदाचित, पण त्यांच्या असंख्य चित्रांप्रमाणे ती सुद्धा गहाळ आहे. तेव्हा आबालाल रेहमानांची चित्रभाषा या अर्थानी कायम अबोधच रहाणार.
==============================================================================

4 comments:

Gouri said...

आबालाल रहमानांचं ‘रावणेश्वर’ नावाचं चित्र बालभारतीमध्ये होतं तेवढीच त्यांची ओळख. सुंदर माहिती दिली आहे तुम्ही. मोनेच्या चित्रांसारखं कौतुक रहमानांच्या चित्रांना कधी मिळणार?

Nandan said...

लेख आवडला. (शीर्षक आणि ते ज्यावर बेतले आहे ती चित्रं पाहून - 'कमळापरि मिटती दिवस उमलुनि तळ्यात' ही ओळ आठवली). रहमानांच्या चित्रांविषयीची अनास्था वाचून आश्चर्य वाटलं नाही, पण पुन्हा एकदा खेद वाटला.

Mints! said...

bhaarataatlee kalaakaranchi upekshaa yaavar ek maalikaa hou shakel ashi paristhithee aahe :( vaaIT vaaTate ...

lekh Chaan aahe.

Unknown said...

दोन्ही चित्रकारांचा परिचय आवडला. किती साम्य आहे, चित्रशैलीत तरी एकाची चळवळ उभी राहते, आणि दुसरी कडे नि:संशय गहाळ मालिका,. कधी वाटते, संपूर्ण जगभरात जन प्रवाह सारखाच वाहत असतो, पण त्याचे कुठे प्रवाहात खंडन होते आणि कुठे मार्गक्रमण.. स्वर्गाची कल्पना या मार्गक्रमणातून आपल्याकडे आलेली दिसते. पाश्चिमात्य संस्कृतीत आपला स्वर्ग लपला आहे.