सुभाष अवचटचं 'स्टुडिओ' वाचत होते. मेट्रोपॉलिटन म्यूझियम मधे व्हन गॉगची चित्रे तो बघत असतानाचा अनुभव वाचताना अचानकच खूप वर्षांपूर्वीची ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी मधली दुपार आठवली.
B.Sc. ला माझ बॉटनी होतं. taxonomy वरची ब्रिटिश संशोधकांची पुस्तके संदर्भ पुस्तकं म्हणून खूप उपयोगी पडायची. ती हमखास मिळण्याचं ठिकाण म्हणजे BCL. एका दुपारी खूप पाऊस पडत असताना आम्ही काही मुलेमुली तिथे गेलो होतो. नरिमन पॉईंटला पोचेपर्यंत धुआंधार पाऊस सुरु झाला होता. चर्चगेटहून चालत चालत मरीनड्राइव्ह वरुन कडेकडेने चालत, उसळणार्या लाटांचे तुषार अंगावर झेलत आम्ही लायब्ररीमधे पोचलो. तिथे अगदी शांतता होती. जाडीजाडी पुस्तके ह्या पावसात घेऊन जाऊन ती भिजवण्यापेक्षा इथेच बसून आवश्यक त्या नोट्स काढाव्यात, तोपर्यंत पाऊसही कमी होईल अशा विचाराने आम्ही तिथल्या शांत, प्रशस्त रीडींगरुम मधे गेलो. मधोमध एक गोलाकार काचेचे टेबल होते. त्याच्या भोवती ठेवलेल्या खूर्च्यांवर आम्ही टेकलो. नोट्स काढण्यात बराच वेळ गेला आणि अचानक माझं लक्ष समोरच्या टेबलावरचा एका उघड्या खूप मोठ्या आकाराच्या जुन्या कापडी बांधणीच्या एका पुस्तकाकडे गेलं. थोड पुढे झुकतं सहज त्या पुस्तकाच्या रंगित पानांवर नजर टाकली. नामवंत चित्रकारांच्या चित्रांची रिप्रिन्ट्स छापलेलं ते एक चित्रकारांचं संदर्भ पुस्तकं होतं.
व्हिन्सेन्टगॉग, मोने, मायकेलेन्जेलो चित्रकारांची चित्रे त्या दिवशी खर्या अर्थाने पाहिली. ते वेगळेच रंग, आकार, रेषा ह्यांचा सहवास आणि बाहेर कोसळता पाऊस, लायब्ररीमधलं प्रशांत गंभिर वातावरणं. मनावरं त्या चित्रांचा एक वेगळाच अमिट ठसा उमटला गेला. इतका की अगदी B.Sc. ची परिक्षा झाली की भरभरुन चित्रेचं काढावीत आपणं असा पक्का निश्चय होण्याइतका. मोहिनीचं जबरदस्त होती त्या चित्रांची.
आजं किती वर्षे उलटून गेली त्या दुपारनंतर. सुभाष अवचटच्या पुस्तकातील एका उल्लेखाने अचानक ती रीप्रिन्ट्स डोळ्यांपुढे आली. पुढे मी कधी तशी चित्रे काढायचा प्रयत्न वगैरे नाही केला पण जहांगीर मधे जाऊन वेगवेगळ्या चित्रकारांची प्रदर्शने पहायचा नाद मात्र जडला तो अजूनपर्यंत. पुढे चिन्ह दिवाळी अंकासाठी लिहायची संधी मिळाली. चित्रकार सतीश नाईकने केवळ चित्रकलेच्या प्रेमापोटी काढलेला हा दर्जेदार दिवाळी अंक अतिशय सुरेख असतो. एका वर्षी त्यांनी छापलेल्या भास्कर कुलकर्णींच्या डायर्या तर केवळ ग्रेट होत्या. भास्कर कुलकर्णी म्हणजे ज्यांनी वारली चित्रकला जगापुढे आणली ते तरुण, अवलिये आणि अकाली निधन पावलेले चित्रकार. प्रभाकर बरवेंचा त्यांच्यावर भारी जीव होता. ह्या चित्रकाराच्या त्या डायर्यांमधले जगं केवळ अदभूत, आणि सर्वस्वी अपरिचित असेच.
चिन्ह च्या निमित्ताने प्रत्यक्ष चित्रकारांच्या दुनियेशी खूप जवळून संबंध आला. आर्ट, आर्ट डिलर्स, त्यांची भलीबुरी व्यावसायिकता, कलेचे बाजारीकरण, आर्ट च्या क्षेत्रातले गॉसिप्स वगैरे सगळेच विषय काही सुखावह नसतात तरी पण काही assignments मनाला खूप आनंद देऊन गेल्या. आर्ट डिलर आशिष बलराम नागपाल ची मुलाखत, चित्रकार अतुल दोढिया, जहांगिर जानी, उषा मिरचंदानी ची मुलाखत मनाला आनंद देऊन गेली. JJ मधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका तरुण होतकरू चित्रकाराने अचानक केलेली आत्महत्या आणि त्यावर चिन्हं साठी केलेली स्टोरी मात्र मनाला फार यातना देऊन गेली.
ह्या वर्षी म्हणजे 2007 साठी रविवर्मांच्या त्या सुप्रसिद्ध मॉडेलवर फ़िचर करायच आहे. खूप आनंददायी अशीच ही assignement ठरणार ह्यात काहीच शंका नाही.
चित्रकलेशी माझा संबंध इतकाच. पण आवड मात्र मनापासून अणि त्याचे सर्व श्रेय त्या पावसाळी दुपारी पाहिलेल्या प्रख्यात चित्रकारांच्या रीप्रिन्ट्सच्या पुस्तकांशी हे मात्रं नक्की.
I owe this to BCL.
Sunday, July 29, 2012
मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच!
मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.
मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.
व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.
हजार वेळा वाटतं की काश रस्किन बॉन्डसारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रोज इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहावं...
हजार वेळा वाटतं की काश रस्किन बॉन्डसारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रोज इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहावं...
Tuesday, July 24, 2012
तुम्हारा इंतजार है..
’खामोशी’ बघण्याआधी माहीत झाला होता त्यातल्या मोहक
गाण्यांमुळे.
’तुम पुकार लो.. तुम्हारा इंतजार
है’, ’वो शाम कुछ अजीब थी.. ये शाम भी अजीब है’, आणि अर्थातच ’हमने देखी है इन
आंखोंकी महकती खुशबू..’
गुलझारचे शब्द काळजाच्या आतल्या
पडद्यापर्यंत जाऊन रुतून बसण्याचं वय येईपर्यंतच्या काळात ही गाणी लक्षात राहिली
होती त्यांच्या हॉन्टींग सुरावटीमुळे.
कधीतरी लहानपणी टीव्हीवर
’खामोशी’ नक्कीच पाहिलेलाही असणार. तेव्हा तो काही कळला असण्याची शक्यता शून्यच.
मात्र आपण तो पाहिलेला आहे याची खात्री असण्याचे कारण गाणी ऐकत असताना
प्रत्येकवेळी दोन-तीन दृश्ये मनावर ठळक कोरल्यासारखी उमटून यायची. चेक्सचा शर्ट
घातलेला पाठमोरा धर्मेन्द्र बाल्कनीतल्या रेलिंगला टेकून उभा आहे, भारुन टाकणारे
स्वर रुंद जिन्यावरुन हलकेच खालती ओघळून येत आहेत, आणि विकल नजरेची वहिदा रेहमान
हातातलं पत्र वाचत वर चढते आहे, भिंतींवर छायाप्रकाशाचा खेळ.. किंवा नदीतल्या
नौकेवर स्वप्नाळू चेह-याने गाणं गुणगुणणारा राजेश खन्ना, वहिदाच्या चेह-यावर
उडणारं पाणी, गालावर थप्पड बसल्यावरही जराही न ढळलेला तिचा काम्पोज्ड लूक..
प्रसंगांमधली गुंतागुंत समजण्याइतकी मॅच्युरिटी तेव्हा नव्हती, पण तरी त्यातलं
दृश्यात्मक सौंदर्य आतवर पोचलेलं होतं.
नंतर कधीतरी खामोशी दुसर्यांदा,
मग तिसर्यांदाही पाहीला. दृश्यांचे मागचे पुढचे संदर्भ समजले. आणि प्रत्येक
दृश्य, आख्खा सिनेमाच कायमचा लक्षात राहीला.
मानवी भावभावनांचा विलक्षण नाजूक
गुंता पडद्यावर तितक्याच तरलतेनं उलगडू शकलेले दिग्दर्शक हिंदी चित्रपटक्षेत्रात
फार नाहीत. इथे तर प्रमुख व्यक्तिरेखा चक्क मानसिक आजाराने ग्रस्त. त्यांच्यावरचे
उपचार, भावना आणि व्यावसायिक कर्तव्यातली ओढाताण, प्रेम आणि आकर्षणाच्या
सीमारेषा..’खामोशी’ मधे हे सारं समर्थपणे हाताळलं गेलं. तो लक्षात राहीला
त्यातल्या काळाच्या पुढे असणा-या धाडसी आणि तरिही अत्यंत कलात्मक, हळुवार
हाताळणीमुळे.
श्रेयाचे मानकरी होते- दिग्दर्शक
असित सेन, सिनेमॅटोग्राफ़र कमल बोस, संगितकार हेमंतदा, लता-किशोर-हेमंतदांचा आवाज,
गुलझारची गीते-संवाद, आणि अर्थातच वहिदा रेहमान, राजेश खन्ना यांचा अत्यंत
संवेदनशिल, लॅन्डमार्क अभिनय.
मुळ ’नर्स मित्र’ नावाची कथा
बंगाली साहित्यिक आशुतोष मुखर्जींची होती. १९५९ मधे त्यावर आधारीत ’दीप ज्वले जाई’
नावाचा बंगाली सिनेमा आला, आणि मग १९६९ मधे ’खामोशी’ प्रदर्शित झाला. कृष्ण-धवल
रंगात. खरं तर तोपर्यंत रंगीत सिनेमा पुरता स्थिरावलेला होता. इस्टमन कलर्स
प्रेक्षकांच्या नजरेला सवयीच्या झाल्या होत्या. पण ’खामोशी’ रंगीत हवा होता अशी
’तक्रार’ (आजवर) एकानेही केलेली नाही, इतकं काव्यमय कृष्ण-धवल दृश्य सौंदर्य
सिनेमातून दिसलं. गुरुदत्तच्या सिनेमांच्या फ़्रेम्स जितक्या देखण्या असायच्या
तितक्याच ’खामोशी’च्याही होत्या. सिनेमाचा विषय आणि मूड, वहिदाचं सावळं आणि
क्लासिक रुप कृष्ण-धवल रंगात विलक्षण खुललं.
---------------------
सिनेमा पहिल्या दृश्यापासूनच
काळजाचा ठाव घेतो. उंच इमारतीच्या वरुन खालचं दृश्य दिसतं आहे. एक कारमधे बसून
कोणीतरी निघून जात आहे. आपल्यासोबत हे दृश्य बघणारी वहिदा रेहमानही आहे. तिचा
उदास, खिन्न चेहरा. गप्प, मिटलेले ओठ. कुणाच्यातरी निघून जाण्याने ती व्याकुळ
झालेली आहे हे तिच्या डोळ्यांमधून स्प्ष्ट वाचता येते आहे. डायरीत ती ’देव’च्या
जाण्याबद्दल लिहिते. काळीज तुटत असतानाही देवला हस-या चेह-याने आज तिने निरोप दिला
आहे.
इकडे त्या उंच इमारतीच्या एका
मानसिक रुग्ण विभागात मेट्रन ललिता पवार रुग्णांचे नंबर हातातल्या हजेरीपटावर बघून
पुकारताना दिसते. रुम नंबर २१, मग २२, २३.. वहिदाच्या चेह-यावरचा तणाव आपल्याला
बघतानाही झेपत नाही. आणि मग नंबर २४. त्या रुग्णाची रिकामी खोली, रिकामा बेड आणि
झुलती खुर्ची. मोकळ्या भिंतीवरच्या काही सावल्या.. आणि त्यातून उमटत, वहिदाच्या
कानांपर्यंत येऊन पोचणारे सूर, त्यात शब्द नाहीयेत आत्ता. पण आपल्याला आणि वहिदाला
ते ओळखू येतात.. तुम्हारा इंतजार है.. ख्वाब चुन रही है रात, बेकरार सी.. तुम
पुकार लो.. त्या सुरावटीने झपाटून जात आपण पडद्यावरची टायटल्स वाचत असतो, आणि
वहिदा रेहमान त्या सुरावटीला आणि भिंतीवरच्या सावल्यांना आतच कोंडून रुमचे दार
बाहेरुन बंद करत निघून जाते.
सिनेमाची सुरवात साधी, आणि तरीही
मंत्रमुग्ध करुन टाकणारी. बाकी सिनेमाही तसाच.
--------------
मानसिक रुग्णाइतांवर उपचार
करणा-या एका मोठ्या हॉस्पिटलमधे राधा (वहिदा रेहमान) नर्स आहे. परदेशातून त्याकरता
विशेष शिक्षण घेऊन आलेली. एक कर्नल नावाने ओळखला जाणारा रिटायर्ड आर्मी डॉक्टर
(नाझिर हुसेन) हृदयभंगामुळे मानसिकरित्या कोलमडून पडलेल्या, मेंटल ब्रेक-डाऊन
झालेल्या पेशंट्सवर (ज्याला इथे ऍक्युट मॅनिया ही मेडिकल टर्म वापरली आहे) अभिनव
पद्धतीने इथे उपचार करतो. दुसरा एक सिनियर डॉक्टर (इफ़्तेकार), राधा, मेट्रन
(ललिता पवारच अर्थात) असे त्याचे सहकारी. ऍक्युट मॅनियाच्या पेशंट्सना पुन्हा
माणसात आणणे, विशेषत: स्त्रियांवरचा त्यांचा उडालेला विश्वास पुन्हा मिळवून देणे
कर्नलच्या उपचार पद्धतीमुळे शक्य होते. पेशंट्सना इलेक्ट्रिक शॉकच्या मरणयातना
भोगाव्या लागू नयेत याकरता त्याची ही धडपड. कर्नल आज अत्यंत खुश आहे कारण नुकताच
त्याचा पहिला पेशंट ’देव’ (धर्मेन्द्र) यशस्वीपणे, संपूर्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून
डिस्चार्ज घेऊन बाहेर पडलेला आहे. याचं श्रेय कर्नल संपूर्णपणे नर्स राधाला देतो.
तिच्या चिकाटीने, प्रेमळ, सहानुभूतीपूर्ण वागण्यामुळेच आपल्याला हे यश मिळू शकले
हे तो दिलदारपणे जाहिर करतो. मात्र मेडिकल सायन्स हिस्टरीमधे या उपचारपद्धतीची
नोंद होण्याकरता अजून निदान एका तरी अशा पेशंटवर उपचार व्हायला हवेत, तरच देवच्या
केसमधे मिळालेले यश फ़्लूक नव्हते हे मान्य होईल याची कर्नलला जाणीव आहे.
हॉस्पिटलमधली रुम नंबर २४ अशाच ऍक्युट मॅनियाच्या पेशंट्सकरता रिझर्व ठेवली जावी
असं तो सुचवतो.
असा एक पेशंट हॉस्पिटलच्या
वेटींग लिस्टवर असतोच. एक तरुण लेखक अरुण चौधरी (राजेश खन्ना). खानदानी श्रीमंत
आहे (बडी हवेली का मालिक), पण त्याचे आईबाप पूर्वीच निधन पावलेले आहेत आणि इतर
नातलगांच्या दृष्टीने लेखनबिखन करण्याचे ’फ़ालतू उद्योग’ करणारा अरुण फ़ुकट गेलेला
आहे. आपल्या बिहारी लाल नावाच्या मित्राकडे (अन्वर हुसेन) अरुण रहातो. बिहारी
त्याला समजून घेणारा, त्याचा बाप, भाऊ, मित्र सारे काही आहे. अरुण घरदार सोडून आला
हे कळल्यावर त्याची स्वार्थी मैत्रिण सुलेखा (स्नेहलता) त्याला टाळते, अरुणला ते
सहन होत नाही, तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे जातो, तेव्हा एकदा ती सगळ्या
मित्रमैत्रिणींसमोर त्याचा वाईट अपमान करुन घरातून बाहेर हाकलते. संवेदनशील अरुण
हे सहन करु शकत नाही, त्याचा नुसता प्रेमभंगच नाही तर त्याच्या सन्मानाच्याही
ठिक-या उडालेल्या असतात. दिवसेंदिवस तो जास्तच डीप्रेस्ड, सैरभैर होत जातो. बिहारी
हरप्रयत्नांनी त्याला या मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण आता
अरुणच्या स्वभावात हिंसक छ्टाही दिसू लागतात. भेटणा-या प्रत्येक मुलीमधे त्याला
सुलेखाचा स्वार्थी चेहरा, तिच्या मैत्रिणींचे कुचेष्टेने हसणारे चेहरे दिसायला
लागतात आणि तो त्यांना गळा दाबून ठार करण्याचा प्रयत्न करतो. बिहारी हैराण होतो,
काळजीपोटी त्याला मानसोपचार तज्ञांकडे नेतो. कर्नल-डॉक्टरच्या दृष्टीने तर ही गुड
न्यूजच. तो ताबडतोब त्याला ऍडमिट करुन घ्यायला सांगतो आणि उत्साहाने राधाला हाक
मारुन सांगतो की तिने देवला जशी ट्रीटमेन्ट देऊन बरं केलं तशाच प्रकारे आता अरुणला
तिला ट्रीट करायचं आहे. अरुणही बरा झाला तर त्यांच्या उपचार पद्धतीला मान्यता
मिळेल.
मात्र राधा हे सगळं ऐकून
घेतल्यावर या ट्रीटमेन्टमधे सहभागी व्हायचं साफ़ नाकारते. कर्नलला आश्चर्याचा
धक्का बसतो. तो दुखावतो. (कर्नल स्वत: मानसोपचार तज्ञ असूनही तो राधाच्या नकारामागचे
खरे कारण शोधण्याच्या भानगडीत शेवटपर्यंत पडत नाही हे आपल्याला सतत खटकत रहाते.
ऍकेडमिक संशोधन करताना काही वेळा किती असंवेदनशील विचार केला जातो, मानसिक
प्रयोगांवर संशोधन करणा-याच्या भावनिक पातळीमधे इतका कोरडेठाकपणा असू शकतो? असो.)
कर्नल राधावर चिडतो, तिला कर्तव्याची चाड नाही, व्यावसायिक निष्ठा नाही, वगैरे
सुनावतो, पण तरीही राधा आपल्या नकारावर ठाम आहे हे पाहिल्यावर तिचा नाद सोडून
दुस-या एका सहकारी नर्सवर, बीना, जी राधाची मैत्रिण आहे, आणि तिने राधा देववर कशी
’उपचार’ करत होती हे जवळून पाहिलेले आहे, तिच्यावर अरुणची केस सोपवतो.
ही उपचार पद्धती काय आहे हे
कर्नल जेव्हा बीनाला समजावून सांगत असतो, तेव्हा आपल्यालाही ती कळते (मुळ कथा
पन्नासच्या दशकात लिहिलेली असल्याने आपल्याला ती बाळबोध वाटू शकते. पण अलीकडेच
आलेल्या याच प्लॉटवर आधारीत ’क्यूं की’ नावाच्या एका सिनेमात ज्यांनी यापेक्षाही
बाळबोध संभाषण ऐकलेले असेल, त्यांना आदर वाटू शकतो). कर्नल बीनाला इडिपस,
इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सबद्दल आणि लहान मुल आणि प्रौढ यांच्यातल्या मुलभूत, समान
मानसिकतेबद्दल समजावून सांगतो. आणि मग ऍक्युट मॅनियाग्रस्त पेशंट्सना ट्रीट
करण्याची त्याची ती ’खास’ उपचार पद्धती आपल्याला कळते(!). देव किंवा अरुणसारखे
हृदयभंगामुळे मानसिकरित्या उध्वस्त झालेले जे तरुण आहेत, त्यांच्यासोबत जर कोणी
आईच्या ममतेने आणि प्रेयसीच्या आत्मियतनेने संवाद साधू शकलं तर त्यांची मानसिक
स्थिती मुळ पदावर येऊ शकते. राधाने देववर उपचार करताना असाच ’संवाद’ साधला, आता
बीनाला अरुणच्या बाबतीत तसेच करायचे आहे.
बीना प्रामाणिकपणे अरुणसोबत
संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पण तिला फ़ारसे यश मिळत नसते. ती बिचारी त्याची
आरडाओरड, हिंसक वागणे पाहून बावरते, एकदा तर घाबरुन किंचाळायला लागते. राधा तिच्या
मदतीला धावते आणि भानावर नसलेला अरुण तिला थाडकन थोबाडीत मारतो. राधा यत्किंचितही
बिचकत नाही, बीनासारखी घाबरुन किंचाळत नाही. तिचा त्याच्याकडे बघणारा शांत चेहरा,
समजावण्याचा सूर पाहून अरुणला आपल्या हातून काहीतरी चुकीचे झाले हे जाणवते, ओशाळून
तोही शांत होतो.
याच दरम्यान राधाला कळतं की
देवच्या मंथली चेक-अपची वेळ जवळ आली आहे. देव त्याकरता हॉस्पिटलमधे येतोय.
राधाच्या मनात नकळत आशेचा कोंब जागतो. देव येणार.. यावेळी त्याला नक्की मनातली
गोष्ट सांगायची. गप्प रहायचं नाही. राधा मनोमन ठरवते. प्राचीन प्रेमकाव्य ’मेघदूत’
देवला भेट देण्याकरता तिने आणलेलं असतं. अनंत योजने दूर असलेल्या प्रिय
व्यक्तीपर्यंत मनातला प्रेमसंदेश अचूक पोचवणारा हा मेघदूत आपल्याही मनातले गूज
देवपर्यंत पोचवेल.
पण देव येत नाही. बिझिनेस टूरवर
जावं लागल्याचा त्याचा निरोप आणि राधाकरता त्याने लिहिलेलं पत्र घेऊन त्याची आई
घरातल्या दुसर्या कोणालातरी पाठवते. राधा त्याच्याकडे देवच्या तब्येतीची चौकशी
करते.
’देव आता एकदम ठीक आहे.’ तो
राधाला आनंदाने सांगतो.
राधा पुन्हा विचारते, ’खरंच?
अगदी ठीक आहे? पूर्वीसारखं काही विस्मरण तर होत नाही ना त्याला?’
’नाही नाही, आता त्याला सगळं
व्यवस्थित लक्षात रहातं.’
’सगळं?’
’हो सगळं. इथली तर एकेक गोष्ट
लक्षात आहे त्याच्या. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींबद्दल तो आम्हाला सांगत असतो.
खूप प्रशंसा करतो तो हॉस्पिटलची.’
’हॉस्पिटलची? काय म्हणतो तो?’
"पेशंटकरता आजकाल इतके
प्रयत्न कोण करतं? देव मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देत असतो. इथले
डॉक्टर्स, नर्सेस किती मेहनती, प्रामाणिक आहेत.’
’नर्सेस?’
"हो ना. आणि हो. देवच्या
आइने विचारलय तुम्ही घरी कधी येणार?"
"घरी? देवच्या? हो नक्की
येणार आहे.." राधाचा चेहरा पहिल्यांदाच आनंदाने उजळतो. आशा पल्लवीत होतात.
देवने नक्की आईला सांगितलं असणार.
तो गेल्यावर राधा उत्साहाने
हातातलं देवचं पत्र उघडते. खास तिच्याकरता देवने लिहिलय.
-’ प्रिय राधा, अंधाराच्या
गर्तेतून बाहेर काढलं आहेस मला तु. तुझे उपकार आयुष्यभर विसरु शकणार नाही. आणखी एक
आनंदाची बातमी. तुझ्यामुळेच मला माझं हरवलेलं प्रेमही परत मिळालं. माझ्या
प्रेयसीने पुन्हा माझ्याजवळ यायचा निर्णय घेतला. तिला पश्चात्ताप झाला आहे. आम्ही
आता लग्न करत आहोत. तु यायलाच हवस. तुझ्याशिवाय हे लग्न होऊच शकणार नाही. नक्की
ये. येशील ना तु राधा?’
राधाचा विदीर्ण चेहरा बघवत नाही.
तिचं भावनिक घरटं वादळात उध्वस्त झालं आहे. तरीही एकदा तिला वाटतं की जावं आपण.
देवला बघता तरी येईल. मग सावरते. भानावर येते. देवला उत्तरादाखल पत्र लिहिते.
-’ देव बाबू, माणसाच्या मनातली
तीव्र इच्छा प्रत्येक वेळी पूर्ण होतेच असं नाही. मला खूप यावसं वाटत आहे. पण माझी
हॉस्पिटलमधे काही कर्तव्ये आहेत. ती सोडून देता येत नाहीत. मला येता येणार नाही
त्याबद्दल क्षमस्व. सुखी, वैवाहिक जीवनाकरता मन:पूर्वक शुभेच्छा.’
औपचारिक शब्द कागदावर उतरवले
जातात. पण मनावर ताबा रहात नाही. वर्षभरातल्या देवच्या सहवासातला प्रत्येक क्षण
तिला आठवत रहातो. बरा झालेला देव. नेहमीसारखीच त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत
नटूनसजून त्याला भेटायला ती जाते अहे. त्याच्या वाढदिवस असतो त्यादिवशी...
राधा हातात पत्र घेऊन सुन्नपणे
जीना चढते आहे. "तुम पुकार लो.. होठ पे लिये हुए दिल की बात हम, जागते रहेंगे
और कितनी रात हम.. मुक्तसरकी बात है.. तुमसे प्यार है.. तुम्हारा इंतजार
है.." पाठमोरा देव. बाल्कनीला रेलून वाट बघतो आहे. त्याच्या प्रेयसीची.
राधाचा इंतजार आता संपला आहे.
दिल की बात बाहेर आलीच नाही. तिचे पाणावलेले डोळे मुक्तपणे वहात रहातात. ती मागे
वळून जीना उतरायला लागते. आता परतीचा प्रवास किती लांबलचक, जड पावलांचा वाटतो
आहे..
’दिल बहल तो जायेगा, इस खयाल
से.. हाल मिल गया तुम्हारा, अपने हाल से.. रात ये करार की, बेकरार है..’
त्या रुंद जिन्याच्या पायर्या,
देवच्या खोलीतल्या हलत्या पडद्याच्या सावल्या, त्याची पाठमोरी आकृती.. आणि एकाकी,
पूर्ण मोडून पडलेल्या चेहर्याची ती.
वहिदाचा हा क्लोज अप आयुष्यभर न
विसरता येण्यासारखा.
अरुणची दिवसेंदिवस बिघडत चाललेली
मानसिक स्थिती, बीनाला न मिळणारा प्रतिसाद पाहून अरुणला इलेक्ट्रीक शॉक
देण्यावाचून गत्यंतर नाही असे इफ़्तेकार ठरवतो आणि त्याकरता त्याला थिएटरमधे आणतो.
राधाला हे कळतं तेव्हा ती धावत जाऊन हे थांबवते, घाबरुन थरथरणा-या अरुणला आईच्या
ममतेनें पोटाशी धरते, तोही लहान बाळासारखा तिच्या कुशीत शिरत शांत होतो. कळवळून
गेलेल्या राधाच्या मनाने ही ’केस’ स्विकारण्याचा निर्णय घेऊन टाकलेला असतो.
राधाच्या निर्णयाने तिला येता
जाता टोमणे मारणारी मेट्रन, तिच्याकडे चिडून दुर्लक्ष करणारा कर्नल खुश होतात.
कर्नलला खात्री वाटते की राधा आता आपल्या देववरच्या उपचारांच्या पूर्वानुभवामुळे
अरुणच्या प्रेयसीची ’ऍक्टींग’ सहज करेल, तिच्या प्रेमाचा, आपुलकीचा ओलावा मिळाला
की सैभैरतेच्या कोषात गेलेला अरुण पुन्हा माणसात येईल, देवसारखाच बरा होऊन
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून घरी जाईल. ऍक्टींग करणे राधासारख्या कसलेल्या
नर्सकरता काहीच कठीण गोष्ट नाही.
प्रत्यक्षात हे करणं किती कठिण
आहे, आणि यात आपले काय होणार आहे याची मनोमन जाणीव असणारी राधा काहीच बोलत नाही.
गप्प रहाते. तिला एकटीलाच माहित असतं की उपचार करत असताना देव तिच्या करता केवळ
एका ’क्लिनिकल सबजेक्ट’ च्या पलीकडे पोचलेला होता. देवला आंजारुन, गोंजारुन
समजावताना, त्याचे मूड्स सांभाळताना, त्याला पोटाशी धरताना, मिठीत घेताना,
त्याच्या तिच्यावर भावनिकदृष्ट्या अवंलबून असण्यातून निर्माण झालेल्या आकर्षणावर,
प्रेमावर ती ताबा मिळवू शकलेली नव्हती. आणि आता अरुणसोबत पुन्हा तोच प्रयोग?
अरुणसोबत वावरताना, त्याला समजावून घेताना, सांभाळताना क्षणोक्षणी येणार्या
देवच्या आठवणींचे काय करायचे आणि?
सिनेमामधे दिग्दर्शकाने ज्या
खुबीने राधाची ही मानसिक आंदोलने दाखवली आहेत, राधाचं देवच्या आठवणींच्या क्षणांना
सतत व्याकुळ होणारं मन ज्या दृश्यप्रतिमांमधून आपल्याला जाणवतं ते केवळ तरल आहे.
नेणीवेतून जाणीवेत परतणार्या अरुणलाही त्याच्या पातळीवर कुठेतरी राधाच्या या
मानसिक आंदोलनांचा सुगावा लागतच असतो. तो तिला त्याबद्दल विचारतोही काही वेळा. पण
राधा गप्पच रहाते.
अरुणच्या केसमधे राधा झपाट्याने
गुंतत जाते. त्याला लवकरात लवकर बरं केलं तर आपलीही या मानसिक ताणातून मुक्ती होईल
असं तिला वाटतं. अरुणच्या दुखावलेपणावर फ़ुंकर मारताना तिला त्याच्यातला संवेदनशील
लेखक जाणवलेला असतो. हळुवार मनोवृत्तीचा अरुण सुलेखाच्या नुसत्या उल्लेखानेही इतका
हिंसक होतो, निर्जिव सावल्यांमधेही त्याला सुलेखा दिसते आणि तो मनातली सारी चीड
त्यांच्यावर काढू पहातोय, सिगरेटच्या धुराच्या वलयांमधेही तो सुलेखाला शोधतोय, हे
पाहून राधा त्याचा भूतकाळ खणून काढण्याचं ठरवते. बिहारीला जाऊन भेटते.
बिहारी तिला सुलेखाने अरुणला
लिहिलेल्या प्रेमपत्रांचा गठ्ठा देतो. तिच्या मधात घोळलेल्या शब्दांची फोलकटं
पाहून राधा काय ते समजून चुकते.
सुलेखाकरता अरुणने लिहिलेली
कविता राधा गुणगुणते, त्या कवितेच्या गाण्याची रेकॉर्ड लावते, तेव्हा अरुण सैरभैर
होतो..
’प्यार कोई बोल नही, प्यार आवाज
नही, एक खामोशी है, सुनती है, कहा करती है..
सिर्फ एहसास है ये रुहसे महसुस
करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..
हमने देखी है इन आंखोंमे महकती
खुशबू..’
अरुणने त्याच्या प्रेयसीकरता
काळीज ओतून लिहिलेले कातर शब्द.. राधा कळवळून जाते. प्रेमातली आर्तता, खामोशी किती
जीवघेणी ठरु शकते हे तिच्याशिवाय कोण जास्त समजू शकणार? आणि आपलं अबोल प्रेम
समोरच्याला समजूच शकलं नाही, त्याच्यापर्यंत ते पोचूच शकलं नाही यातली वेदना? राधा
अरुणला नेमकं काय वाटतय हे अचूक समजून घेऊ शकतेय.
ती उठते आणि सुलेखाला भेटायला
जाते. सुलेखाने अरुणला नुसतं फ़सवलच नसतं, त्याची कविता गाऊन ती प्रसिद्धीही मिळवत
असते. सुलेखाच्या स्वार्थीपणाचा हा कळस असतो. अरुणच्या हृदयातून उमटलेले शब्द,
लाडीक, नाटकी नख-याने गाणारी सुलेखा राधाला पहावत नाही. राधा तिला अरुणला भेटायला
येण्याबद्दल विनवते, ती ऐकत नाही तेव्हा तिच्या प्रेमपत्रांचा गठ्ठा दाखवून
धमकावतेही.
सुलेखा अरुणसमोर नाईलाजाने येऊन
उभी रहाते, त्याची क्षमा मागण्यचं खोटं का होईना नाटक करते, आणि अरुणच्या मनात
दाबलेल्या संतापाचा उद्रेक होतो, सुलेखाचा गळा दाबण्याचा, तिच्यावर केलेल्या
आपल्याच प्रेमाला संपवून, मारुन टाकण्याचा निकराचा प्रयत्न करतो, हादरलेली सुलेखा
जीव वाचवून कशीबशी, थरथर कापत जीना उतरुन पळ काढते. राधा अरुणला सावरते. तो शांत होतो.
बेइज्जत, अपमानाचं मनात भरुन राहिलेलं तेजाब निचरा होऊन बाहेर पडतं.
आता त्याचं ठिकर्या झालेलं मन
आता हळू हळू नक्की सांधत जाणार याची राधाला मनोमन खात्री पटते.
कर्नल मात्र या घटनेमुळे नाराज
होतो. राधाने हॉस्पिटलबाहेर जाऊन आपल्या उपचाराकरता दुसर्याचा जीव धोक्यात घालावा
हे त्याला पटत नाही. तेव्हा राधा त्याला सुनावते, की असे रुग्ण येतच रहातील,
रोगाचे समुळ कारण नष्ट करायलाच पाहीजे कधीतरी. दुस-या कोणीतरी स्वार्थीपणाने
प्रेमाचा खेळ खेळायचा, कंटाळल्यावर खेळणे लाथादून द्यायचे आणि मग मोडतोड होऊन
हॉस्पिटलमधे आलेल्या मनावर उपचार करताना आपण आपल्या मनाचा बळी द्यायचा? कशाकरता?
राधाची उद्विग्नता, त्यातून उमटलेली तिच्या मनातली वेदना याहीवेळी कर्नलच्या बथ्थड
मनापर्यंत पोचत नाही.
अरुण सावरत असतो. त्याला पुन्हा
लिहिण्याकरता राधा उत्तेजना देते. पण आपल्या कहाणीचा अंत करण्याइतका आत्मविश्वास
आपल्यात आहे याचा अरुणला अजूनही आत्मविश्वास वाटत नसतो.
राधा त्याला धीर देते. ’आप शुरु
तो किजिये, अंत मै बता दुंगी.’
कहाणीची अखेर काय होणार हे तिला
स्पष्टपणे डोळ्यांपुढे दिसत असतंच.
कोमल आणि तरीही संपूर्ण उध्वस्त
करणारी ही प्रेम नावाची भावना.. आणि तिच्या ताकदीपुढे हतबल झालेले हे दोघे जीव.
अरुण आणि राधा. आपापल्या विखुरलेल्या प्रेमाचे तुकडे दोघेही कसेबसे गोळा करत
राहीलेले आहेत. अरुणला निदान राधाचा सहारा तरी आहे. राधा पूर्ण एकटी.
"सब खत्म हो गया है"
या मनोवृत्तीतून अरुण हळू हळू बाहेर येतोय. "तु लिही. तु लिहिलं नाहीस तर तु
आणि मी, दोघेही सुलेखापुढे हरुन जाऊ. " राधा त्याला आग्रह करत रहाते.
एकदा त्याने गिरवलेल्या रेघोट्या
पाहून ती त्याला,’ ये क्या लिखा है आपने? ’इश्क पर जोर नही..?’ असं मजेनी विचारते.
तो तिच्याकडे मिश्किलपणे पहात हसतो आणि म्हणतो, (डोळ्यांमधे खास राजेश खन्नाची
चमकती ट्विंकल) ’ ये मेरा लिखा हुवा तो नही है, क्या आपने लिखा है?’ ती संकोचते,
हसते, ’धत, मै कैसे लिख सकती हूं? लेखक तो आप है." (वहिदा आणि राजेशचा इतका
गोड अभिनय आहे यावेळी). दोघांमधली मैत्री, आपुलकी दाट होत जाते.
कर्नल तिला उपचारांच्या
प्रगतीबद्दल विचारतो. ’आपका तजुर्बा इस बार भी कामयाब होगा.’ राधा त्यांना ठाम
विश्वासाने सांगते. अरुण बरा होणार. मग भलेही त्याकरता तिला कितीही किंमत मोजावी
लागेल.
उपचाराच्या प्रत्येक यशस्वी
टप्प्यावर राधा कणाकणाने तुटत चाललेली आहे. देव आणि अरुणच्या हिंदोळ्यावर झुलणार
तिचं मन कडेलोटाच्या सीमेपर्यंत येऊन उभं आहे.
अरुण तिचा हात पकडून रात्री झोप
येईपर्यंत थांबायला विनवतो. "मै एक रात तो क्या, एक उम्र तुम्हारे लिये जाग
सकती हूं देव," राधाच्या तोंडातून हा कुणाचा उल्लेख मधूनच होत असतो? अरुण
संभ्रमित होतो. राधा गप्प रहाते. काही बोलत नाही.
आपली पावलं त्याच्या गहिर्या
खाईत पुन्हा आपल्याला घेऊन जात आहेत याबद्दल राधाला किंचितही शंका उरत नाही. पण
अरुणबद्दलचं प्रेम, देवच्या त्याच्यात दिसणा-या प्रतिमेला कवटाळण्याचा तिचा मोह
तिलाही आवरता येत नाहीच.
कहाणीचा अंत जाणून घ्यायची वेळ
शेवटी येतेच. अरुण तिला तू विचारतो. आता आपल्याला अलिप्त रहाणं अशक्य आहे याची
राधाला खात्री पटते.
आणि त्याच वेळी ते किशोरचं
अत्यंत सुंदर गाणं आपण अनुभवतो-
वो शाम कुछ अजीब थी.. ये शाम भी
अजीब है. वो कल भी आसपास थी.. वो आजभी करीब है.."
अरुण फ़क्त तिच्याकरताच गात
असतो, पण कधी अरुण, कधी देव अशा मानसिक आंदोलनांमधे हेलकावे घेणा-या राधापर्यंत
आता ते पोचत नाहीये. केवढी मोठी आयरनी आहे ही.
रुम नंबर २४ चा पेशंट आता पूर्ण
बरा झाला आहे. अरुण आता घरी जाऊ शकतो. परवाच जाईल तो. आम्हाला पुन्हा एकदा
राधामुळे ही कामयाबी मिळू शकली आहे. - कर्नल फोनवरुन अत्यानंदात कोणाला तरी सांगत
असतो.
राधा कसंबसं त्याला विनवते. मी
आता हे दोन दिवस अरुणला भेटणार नाही. माझी ही विनंती तुम्हाला ऐकायलाच हवी.
कर्नलला तरीही कळू शकत नाही. आपलं कर्तव्य चोख बजावलेली राधा आता श्रेय घ्यायची वेळ
आल्यावर का मागे रहातेय?
त्याच्या पुन्हा पुन्हा
विचारण्यावर अखेरीला राधा सहनशक्ती संपून किंचाळते- मैने ऍक्टींग नही की कर्नल, मै
कभीभी ऍक्टींग नही कर सकती.
अरुण तिला शोधतोय,
हॉस्पिटलमधल्या प्रत्येकाला विचारतोय. कुठेय राधा? तिला भेटल्यावाचून मी जाणार
नाही. ती बाहेरगावी गेली आहे? हरकत नाही. मी तिची वाट बघीन. नाहीतरी इथे रहाणं
मलाही आवडायलाच लागलय.
कर्नल हताश होतो. आणि वैतागून
(अत्यंत असंवेदनशिलतेने) अरुणला सांगून टाकतो की आता तु बरा आहेस. राधाची ऍक्टींग
यशस्वी झाली आहे. तिला आता तुला भेटण्याची इच्छा नाही. तिने तिचं व्यावसायिक
कर्तव्य पूर्ण केलय. तिला एकटं सोड.
अरुणला यावर किती धक्का बसला
असेल याची आपण कल्पनाच करु शकतो. पण कर्नल मख्ख.
त्याला न जुमानता अरुण राधाला
शोधत वर येतो. राधाने स्वत:ला देवच्या खोलीत बंद करुन घेतलं आहे. ती बाहेर यायचं
नाकारते. वास्तव जे असू शकेल असं तिला वाटतय त्याला सामोरं जायला तिची मानसिक
तयारी नाही. ती कोषात बंद झालेली आहे. अरुणची दरवाजाच्या बाहेरुन तिच्याकरता
चाललेली विनवणी तिच्यापर्यंत पोचत नाहीये. राधा, एकदाच्स आंग की तु ऍक्टींग केलेली
नाहीस. तो कळवळून ओरडतो. तिचा बांध फ़ुटतो. ओक्साबोक्शी रडताना ना तिला देव दिसतो,
ना अरुण.
रुम नंबर २४ मधे अजून एक ऍक्युट
मॅनियाचा पेशंट भरती होतो.
राधा, मी तुझी वाट पाहीन. कितीही
वेळ थांबीन तुझ्याकरता. अरुणचे हे शब्द राधापर्यंत पोचत नाही. पण निदान आपल्याला
दिलासा देऊन जातात.
आवडत्या हिंदी सिनेमांच्या
यादीवर नजर टाकताना अनेकदा लक्षात येतं की यातले बरेचसे सिनेमा हे एखाद्या
वैयक्तिक गुणवत्तेमुळे लक्षात राहिलेले किंवा आवडलेले आहेत. उदा. प्रमुख
व्यक्तिरेखांचा उत्कृष्ट अभिनय, कल्पक दिग्दर्शन, समर्थ कथानक, सुंदर संगीत.. अशा
काही सुट्या, दर्जेदार कामगिरीमुळे सिनेमांमधल्या इतर असंख्य त्रुटी नजरेआड केल्या
जातात आणि त्यावर ’आवडता’ शिक्का सरसकट मारला जातो.
मात्र भावनिकता, नॉस्टेल्जिया
अशी एरवीची कारणं सोडून चिकित्सक, परफ़ेक्शनची पट्टी लावायचीच असं ठरवलं तर
हातातल्या भल्यामोठ्या यादीतले असंख्य सिनेमा टपाटप गळून मोजकी नावंच शिल्लक
उरतात.
काही सिनेमा असेही निघतात जे
दोन्ही पातळ्यांवर आपल्यापर्यंत सारखेच पोचलेले असतात, भिडलेले असतात.
१९६९ साली प्रदर्शित झालेला
’खामोशी’ हा कृष्ण-धवल सिनेमा हा त्यापैकी एक. अभिनय, कथानक, संवाद, संगीत,
दिग्दर्शन, चित्रांकन.. कोणतीही पट्टी लावा. ’खामोशी’ तिथपर्यंत पोचलेला आहे.
’खामोशी’मधे एक लिरिकल क्वालिटी
आहे, त्याचं श्रेय संपूर्णपणे सिनेमॅटोग्रफ़ार कमल बोस यांचं. तरीही या सिनेमाला
रोमॅन्टिक स्वप्नाळूपणापेक्षाही काळ्या-पांढर्या वास्तवाची असलेली किनार जास्त
ठळक आहे. कारण दिग्दर्शनातली परिपक्वता.
धर्मेन्द्रचा यातला नि:शब्द
वावर, त्याचं नसतानाही सिनेमाच्या प्रत्येक फ़्रेममधे असलेलं अस्तित्व, त्याच्या
पाठमो-या प्रोफ़ाइलमधूनही त्याच्यातलं मॅग्नेटीक आकर्षण आपल्यापर्यंत पोचतं आणि मग
राधासारख्या व्यावसायिक निष्ठेच्या असूनही, स्वत:मधलं संवेदनशील मन अभंग ठेवणार्या
स्त्रीचं त्याच्या प्रेमात पडून त्यात असहाय्यपणे स्वत:ला वहात जाताना बघणं
अतिशयोक्त वाटत नाही जराही.
हेमंतदांच्या यातल्या
संगीताबद्दल भारावून टाकणा-या जादुई संगीताबद्दल काय बोलावं?
गुलझारचे शब्द तर सोन्यामधे
बुडवून काढल्यासारखे लखलखीत, श्रीमंत.
प्रत्येक फ़्रेममधलं प्रत्येक
दृश्यं मनावर ठळक उमटून राहू शकेल असे जे काही मोजके हिंदी सिनेमा गेल्या शंभर
वर्षांच्या इतिहासात निर्माण झाले त्यात १९६९ मधे प्रदर्शित झालेल्या ’खामोशी’चं
नाव निश्चितच वरच्या ओळीतलं आहे.
----
या सिनेमावर आत्ता इतक्या
तीव्रपणे का लिहावसं वाटलं? राजेश खन्ना नुकताच गेलाय, त्याच्या चित्रपटांमधली
दृश्य वेगवेगळ्या वाहिन्यांवर दिसताहेत, ती बघत असताना खामोशीची आठवण येणं
अपरिहार्य आहे.
खरं तर जी दृश्य दाखवताहेत ती
त्याच्या झळाळत्या, ’सुपरस्टार’ अभिनयाचे मानदंड असलेल्या ’आनंद’, ’आराधना’,
’अमरप्रेम’, ’सफ़र’.. इत्यादी सिनेमांमधलीच आहेत प्रामुख्याने. ’खामोशी’चा उल्लेख
क्वचित कुणीतरी करतय, याचं जरासं आश्चर्य आणि खेदही वाटतो आहे.
तसंही ६० चं दशक जवळपास संपलेलं
असताना, रंगीत, इस्टमन कलरने प्रेक्षकांच्या नजरेचा पूर्ण ताबा घेतलेला असताना
अचानक कृष्ण-धवल रंगात प्रदर्शित झालेला हा सिनेमा. आपल्या वेगळेपणामुळे तो काही
चिकित्सक प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या नजरेत भरला खरा, पण तरी तो होता त्या
दशकातल्या इतर झगमगीत, ग्लॅमरस, रंगिबेरंगी सिनेमांमधल्या साध्यासुध्या काळ्या
बदकाच्या पिल्लाप्रमाणेच ऑड वन आउट.
शिवाय हा सिनेमा संपूर्णपणे
स्त्री-व्यक्तिरेखाप्रधान. त्यात राजेश खन्ना होता खरा पण वहिदा रेहमानच्या
देदिप्यमान अभिनय कारकिर्दीतला झळाळता हिरा म्हणजे ’खामोशी’. कदाचित त्यामुळेच
राजेश खन्नाच्या सुरुवातीच्या अप्रतिम, सहज आणि संवेदनशील अभिनयाचा देखणा आविष्कार
असणारा हा सिनेमा फ़ार कोणी ’त्याचा’ म्हणून मानत नसावेत.
वहिदा रेहमान नि:संशयपणे अप्रतिम
आहेच, मात्र सिनेमा बघताना पुन्हा पुन्हा जाणवतो यातला राजेश खन्नाचा विलक्षण सहज
वावर. नदीच्या पात्रातल्या संथ, वाहत्या धारेसारखा त्याचा यातला आवाज. राजेश खन्नाच्या
पुढच्या चित्रपटांमधे प्रकर्षाने दिसलेली रोमॅन्टिक, मिश्किल अशी नजरेतली चमक यात
नाही.
मात्र एक अत्यंत मॅच्युअर्ड असं
उदास, गहिरं कारुण्य त्यात दिसतं. त्याचा एकटेपणा, सोबतीची ओढ दिसते.
शेवटच्या संपूर्ण खामोशीमधे
कायमचं मिटून जाण्याच्या आधीपर्यंत ती तशीच त्याच्या डोळ्यांमधे शिल्लक होती
बहुधा.
----
Sunday, July 01, 2012
'गँग्ज ऑफ वासेपूर'
'गँग्ज ऑफ वासेपूर' ची अठरा रिळं पहात थिएटरमधे बसणं हा जबरी अनुभव!!
यात रक्तपात, हिंसाचाराचं पिढ्यानपिढ्यांचं सूडनाट्य आहे(च) आणि त्याच्याही पलीकडे मानवी भावनांचा विलक्षण, अंगावर येणारा खेळ आहे, किडामुंगीप्रमाणे मेलेली माणसं आहेत, आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून पुन्हा तोच सूड, तेच कारुण्य, तेच एक्स्प्लॉयटेशन नशिबी घेऊन जन्मलेले नवे जीव आहेत, जगण्यातला मलूल उत्सव आहे, कोळशासारखा काळा विनोद आहे, पॅशन आहे, सेक्स आहे आणि पुन्हा अपरिहार्य रक्ताचा सडाही आहेच.. सूडाचं आणि आयुष्याचं सूत्र अखंडीत आहे.
धनबादच्या कोळसा खाणीत काम करणारे कामगार आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन काला पत्थरमधे पाहीलं होतं. आणि आता गँग्ज ऑफ वासेपूरमधेही.
काय फरक आहे?
यश चोप्रा (आणि तत्सम दिग्दर्शक) यांच्यामधे आणि अनुराग काश्यपमधे नेमका काय फरक आहे हे ज्यांना जाणून घ्यायचय त्यांनी हा सिनेमा बघावा.
Subscribe to:
Posts (Atom)