Sunday, July 29, 2012

स्टुडिओ, बीसीएल आणि चिन्हं

सुभाष अवचटचं 'स्टुडिओ' वाचत होते. मेट्रोपॉलिटन म्यूझियम मधे व्हन गॉगची चित्रे तो बघत असतानाचा अनुभव वाचताना अचानकच खूप वर्षांपूर्वीची ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी मधली दुपार आठवली.


B.Sc. ला माझ बॉटनी होतं. taxonomy वरची ब्रिटिश संशोधकांची पुस्तके संदर्भ पुस्तकं म्हणून खूप उपयोगी पडायची. ती हमखास मिळण्याचं ठिकाण म्हणजे BCL. एका दुपारी खूप पाऊस पडत असताना आम्ही काही मुलेमुली तिथे गेलो होतो. नरिमन पॉईंटला पोचेपर्यंत धुआंधार पाऊस सुरु झाला होता. चर्चगेटहून चालत चालत मरीनड्राइव्ह वरुन कडेकडेने चालत, उसळणार्‍या लाटांचे तुषार अंगावर झेलत आम्ही लायब्ररीमधे पोचलो. तिथे अगदी शांतता होती. जाडीजाडी पुस्तके ह्या पावसात घेऊन जाऊन ती भिजवण्यापेक्षा इथेच बसून आवश्यक त्या नोट्स काढाव्यात, तोपर्यंत पाऊसही कमी होईल अशा विचाराने आम्ही तिथल्या शांत, प्रशस्त रीडींगरुम मधे गेलो. मधोमध एक गोलाकार काचेचे टेबल होते. त्याच्या भोवती ठेवलेल्या खूर्च्यांवर आम्ही टेकलो. नोट्स काढण्यात बराच वेळ गेला आणि अचानक माझं लक्ष समोरच्या टेबलावरचा एका उघड्या खूप मोठ्या आकाराच्या जुन्या कापडी बांधणीच्या एका पुस्तकाकडे गेलं. थोड पुढे झुकतं सहज त्या पुस्तकाच्या रंगित पानांवर नजर टाकली. नामवंत चित्रकारांच्या चित्रांची रिप्रिन्ट्स छापलेलं ते एक चित्रकारांचं संदर्भ पुस्तकं होतं.
व्हिन्सेन्टगॉग, मोने, मायकेलेन्जेलो चित्रकारांची चित्रे त्या दिवशी खर्‍या अर्थाने पाहिली. ते वेगळेच रंग, आकार, रेषा ह्यांचा सहवास आणि बाहेर कोसळता पाऊस, लायब्ररीमधलं प्रशांत गंभिर वातावरणं. मनावरं त्या चित्रांचा एक वेगळाच अमिट ठसा उमटला गेला. इतका की अगदी B.Sc. ची परिक्षा झाली की भरभरुन चित्रेचं काढावीत आपणं असा पक्का निश्चय होण्याइतका. मोहिनीचं जबरदस्त होती त्या चित्रांची.

आजं किती वर्षे उलटून गेली त्या दुपारनंतर. सुभाष अवचटच्या पुस्तकातील एका उल्लेखाने अचानक ती रीप्रिन्ट्स डोळ्यांपुढे आली. पुढे मी कधी तशी चित्रे काढायचा प्रयत्न वगैरे नाही केला पण जहांगीर मधे जाऊन वेगवेगळ्या चित्रकारांची प्रदर्शने पहायचा नाद मात्र जडला तो अजूनपर्यंत. पुढे चिन्ह  दिवाळी अंकासाठी लिहायची संधी मिळाली. चित्रकार सतीश नाईकने केवळ चित्रकलेच्या प्रेमापोटी काढलेला हा दर्जेदार दिवाळी अंक अतिशय सुरेख असतो. एका वर्षी त्यांनी छापलेल्या भास्कर कुलकर्णींच्या डायर्‍या तर केवळ ग्रेट होत्या. भास्कर कुलकर्णी म्हणजे ज्यांनी वारली चित्रकला जगापुढे आणली ते तरुण, अवलिये आणि अकाली निधन पावलेले चित्रकार. प्रभाकर बरवेंचा त्यांच्यावर भारी जीव होता. ह्या चित्रकाराच्या त्या डायर्‍यांमधले जगं केवळ अदभूत, आणि सर्वस्वी अपरिचित असेच.


चिन्ह च्या निमित्ताने प्रत्यक्ष चित्रकारांच्या दुनियेशी खूप जवळून संबंध आला. आर्ट, आर्ट डिलर्स, त्यांची भलीबुरी व्यावसायिकता, कलेचे बाजारीकरण, आर्ट च्या क्षेत्रातले गॉसिप्स वगैरे सगळेच विषय काही सुखावह नसतात तरी पण काही assignments मनाला खूप आनंद देऊन गेल्या. आर्ट डिलर आशिष बलराम नागपाल ची मुलाखत, चित्रकार अतुल दोढिया, जहांगिर जानी, उषा मिरचंदानी ची मुलाखत मनाला आनंद देऊन गेली. JJ मधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका तरुण होतकरू चित्रकाराने अचानक केलेली आत्महत्या आणि त्यावर चिन्हं साठी केलेली स्टोरी मात्र मनाला फार यातना देऊन गेली.

ह्या वर्षी म्हणजे 2007 साठी रविवर्मांच्या त्या सुप्रसिद्ध मॉडेलवर फ़िचर करायच आहे. खूप आनंददायी अशीच ही assignement ठरणार ह्यात काहीच शंका नाही.

चित्रकलेशी माझा संबंध इतकाच. पण आवड मात्र मनापासून अणि त्याचे सर्व श्रेय त्या पावसाळी दुपारी पाहिलेल्या प्रख्यात चित्रकारांच्या रीप्रिन्ट्सच्या पुस्तकांशी हे मात्रं नक्की.
I owe this to BCL.

1 comment:

Askinstoo said...

Very nice! I found a place where you can
make some nice extra cash secret shopping. Just go to the site below
and put in your zip to see what's available in your area.
I made over $900 last month having fun!
make extra money