Sunday, July 29, 2012

मनामधे येईल ते लिहू शकू असं हे माध्यम हातात असताना इथे लिहायला वेळच मिळत नाही असं म्हणायचं आणि जिथे शब्दांची, भाषेची, अभिव्यक्तिची मर्यादा टाळता येऊ शकत नाही तिथे लेखन करण्यात शक्ती, वेळ आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवायची ह्याला खरतर काहीच अर्थ नाहीये. पण तसं वारंवार होतय हे तर खरच!

 मग आता काय करायचं? तर बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं आणि ब्लॉगच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला लागायचं.

व्यावसायिक लिखाण आणि स्वत:च्या निव्वळ आनंदासाठी असं केलं जाणारं लिखाण यात म्हटलं तर फारच मोठा आणि ठळक असा फरक आहे हे मान्य आणि म्हटल तर हा फरक धुडकावून देत व्यावसायिक तरीही स्वत:ला फक्त आनंदच देणारं लिखाण करणारेही आजूबाजूला काही कमी दिसत नसतात. गुलझार आहे, रस्किन बॉन्ड आहे, आणि लेखनाचेच क्षेत्र कशाला, फ़िल्म्स बनवणे, चित्र काढणे, संगित देणे, गाणे अशा कितीतरी क्रिएटिव्ह माध्यमांमधे व्यावसायिकता आणि स्वत:ची निव्वळ आवड असा उत्कृष्ट बॅलन्स साधू शकलेले अभिजात कलाकार असतात.

हजार वेळा वाटतं की काश रस्किन बॉन्डसारखं हातात नोटबुक घेऊन जंगलात, पहाडांवर, पाईन्सच्या निळ्या सावलीत बसून एखाद्या झ-याच्या काठावर खडकावर विसावलेलं जांभळं फ़ुलपाखरु पहात अवर ट्रीज स्टील ग्रोज इन देहरा किंवा टाईम स्टॉप्स ऍट शामली सारखं काहीतरी लिहावं...

1 comment:

Aishwarya Kokatay said...

Hi Sharmila
I can not access your email, can you please provide your email? I would like to invite you t send an article for our Diwali ank 2016
My email is kokatayash@gmail.com