Sunday, August 05, 2012

काम अभी खत्म नही हुवा..


रायबांची चित्रं पाहून झाल्यावर मनाला आलेला अस्वस्थपणा अजून गेलेला नाही.
मुंबईतल्या नाथालाल पारेख मार्गावरच्या क्लार्क हाऊसमधे कोणाचीही चित्रं पहाणे हा काही फ़ारसा सुखद अनुभव नसतो. जागा लहान आणि काहीशी जुनाट, कोंदट आहे. त्यात बाहेरही मलूल, पावसाळी वातावरण. मात्र रायबांची चित्रं प्रदर्शनामधे बघायला मिळत आहेत, कदाचित तेही तिथे भेटतील या उत्सुकतेपोटी क्लार्क हाऊसला पोचले.
तळमजल्यावर मागच्या बाजूचा जुनाट, बंद दरवाजा लोटून आत शिरल्यावर अंधारा, उदास पॅसेज. आतल्या लहानशा हॉलमधे पाऊल ठेवलं मात्र आणि काही क्षण आजूबाजूचं सगळं वातावरण, आपण कुठे आहोत सगळं विसरायला झालं. चारी भिंतींवरचे रायबांचे ते व्हायब्रन्ट, अनोख्या रंगसंगतीत, विस्तारलेल्या मिनिएचर शैलीतल्या अद्भूत, आकर्षक लॅन्डस्केप्सवर गोगॅंच्या चित्रांमधून थेट उठून आल्या आहेत असा भास करुन देणा-या तपकिरी-काळसर वर्णाच्या तरुणी, भोवती झाडे, प्राणी-पक्ष्यांचे कोनाकृती क्युबिस्ट आकार, जाड चारकोलच्या काळ्या रेघांच्या आतले बेसिक रंग.. रायबांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतली देखणी, फ़ार नाहीत -१० पेंटींग्ज.


दीड वर्षांपूर्वी नालासोपा-याला रायबांच्या या जागेपेक्षाही निम्म्या आकारातल्या आणि दुप्पट अंधारलेल्या खोलीमधे पाहीलेली तीन पेंटींग्जही त्यात होती.
"१९५० मधे अब्बांनी काश्मिरला असताना केलेल्या सिरिजमधली ही पेंटींग्ज आहेत. ती पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे अजून इथेच आहेत." रायबांचा इन्शुरन्स एजन्टचं काम करणारा ४०-४५ वयाचा मुलगा नजीब तेव्हा म्हणाला होता.
मी रायबांना भेटायला गेले होते, पण त्यांची तब्येत बरी नाही, ते आत झोपलेले आहेत असं तो म्हणाला. आपण एक तर आधी कळवता इथे येऊन थडकलो याचा संकोच मनात होता, रायबांचे वयही नव्वदीच्या आसपास. तेव्हा त्यांना आत्ता त्रास देणंच बरं असं म्हणत मी नजीबला पुन्हा येईन तेव्हा त्यांच्याशी बोलते, आत्ता फक्त त्यांचा स्टुडिओ पाहू का विचारल्यावर तो म्हणाला होता स्टुडिओ वेगळा नाही, इथेच काम करतात ते.
खरं तर आश्चर्याचा धक्का बसायला नको होता, पण बसलाच.
चिन्हकरता चित्रकारांच्या स्टुडिओवरती एक लेखमाला करायची होती. त्यानिमित्ताने काही चित्रकारांचे स्टुडिओ नुकतेच पाहीले होते. प्रशस्त, हवेशीर, अद्ययावत सुखसोयींनी युक्त, एक-दोन इझल्स, रंगांचे साहित्य, कॅनव्हासेस..
आणि हा रायबांचा लहानसा, एका बाजूला शिवणाची जुनी मशीन, त्यावर काही रंगांच्या ट्यूब्ज, जुन्या कापडाच्या चिंध्या, भिंतीवर एक ज्यूटचं जाड कापड ताणून बसवलेलं, त्यावर विटकरी, पांढ-या, सुकलेल्या लेपाच्या थरामुळे तयार झालेला काहीसा खडबडीत पृष्ठभाग, भिंतीला टेकवलेला एक मोठा पुठ्ठ्याचा खोका आणि त्यात जीर्ण शाळकरी वह्यांचा ढिगारा. नजीबच्या काहीशा नाराजीकडे दुर्लक्ष करुन मी त्यातल्या काही उघडून बघीतल्या. रायबांनी त्यांच्या काश्मिर, दक्षिण भारत, गोवा इथल्या प्रवासात केलेली हजारो स्केचेस, ड्रॉइंग्ज, नोट्स त्यात होत्या.

दोन वर्षांपूर्वी नेहरु सेंटरमधे भरलेल्या इंडिया आर्ट फ़ेअरमधे गॅलरी आर्ट ऍन्ड सोलने याच सगळ्याचा वापर करुन रायबांच्या गॅलरीची एक प्रतिकृती उभारली होती. ती किती एक्झॉटीक, आगळी वाटली होती. ती पाहूनच मी नालसोपा-याला त्यांचा हा कुणालाच माहीत नसलेला स्टुडिओ शोधत उत्साहाने येऊन पोचले होते.

आर्टिस्ट्स इम्प्रेशन आणि प्रत्यक्ष वातावरण यात किती ढळढळीत वास्तवाचा नजारा लपलेला असतो तो मला त्या दिवशी तिथे प्रत्यक्ष पहायला मिळाला. रायबांची आत्तापर्यंतची म्हणजे ६०-६५ वर्षांची दुर्लक्षित कलाकारकीर्द तिथे त्या अंधा-या, कोंदट जागेत उदास पसरलेली होती.

रायबा कोण असा प्रश्न काहींच्या मनात अजूनही येऊ शकतो. .. रायबा हे हुसेन, आरांचे समकालीन चित्रकार. त्यांच्यासमवेत काही काळ तेही प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपमधे सामील झाले होते, पण यात काही प्रोग्रेसिव्ह दिसत नाही असं म्हणत ते लगेच त्यातून बाहेरही पडले.
कोंकणी मुस्लिमांची वस्ती असलेल्या टेमकर स्ट्रीटवरच्या एका इमारतीत रायबांच्या वडिलांचा टेलरिंगचा धंदा, तिथेच रहायची लहानशी जागा, मोठं कुटूंब. जे.जे. स्कूलमधून शिकून बाहेर पडल्यावर टाइम्स ऑफ़ इंडियाच्या गुणग्राही ऑस्ट्रियन आर्ट क्रिटिक वॉल्टर लॅंगहॅमरने रायबांची अनोखी चित्रशैली हेरली. त्यांच्या प्रोत्साहनाने रायबा काश्मीरला गेले आणि त्या पहाडी हिवाळी प्रदेशात इतके रमले की तिथेच पुढची पाच वर्षे राहीले. तिथल्या पर्वतराजींमधे हिंडले, जवळ फारसा पैसा नव्हताच. तिथल्या गुज्जरांनी दिलेल्या दुधाच्या जीवावर त्यांनी दिवस काढले, आणि असंख्य चित्रं रंगवली. हे काश्मिरी लॅन्डस्केप रायबांच्या पुढच्या चित्रांचा एक अविभाज्य भागच बनले.
काश्मिरहून नंतर ते दक्षीण भारतात, गोव्यातही ते खूप फ़िरले. हे सगळे प्रदेश, तिथलं लोकजीवन बॉम्बे स्कूलच्या रिव्हायवलिस्ट शैलीत, मिनिएचर्स मोटीफ़्समधे त्यांनी अद्भूत पद्धतीने आपल्या पेंटींग्जमधे चितारले. कॅनव्हास परवडत नाहीत त्यामुळे ज्यूटच्या ताग्यांवर विटेची भुकटी, व्हाइट क्ले, फ़ेव्हिकॉल, कापडाच्या चिंध्या, यांच्या मिश्रणाचा थर देऊन त्यावर काढलेल्या त्यांच्या चित्रांना, त्यातल्या रंगांना जो खडबडीत, म्यूरल्सची आठवण करुन देणारा पोत प्राप्त झाला, जो झळाळ मिळाला ती रायबांची वैशिष्ट्यपूर्ण शैली ठरली.मुंबईला परतल्यावर रायबांनी अजूनही बरंच काही केलं. हुसेनच्या ओळखीने फ़िल्म कंपनीत काम केलं. आरासोबत फ़र्निचरच्या दुकानात काम केलं, प्रिन्टमेकिंग, एचिंगमधे काम केलं, जुन्या नकाशांचा, इतिहासाचा, गॅझेट्सचा अभ्यास करुन त्यांनी एक अठराव्या शतकाचा इमॅजिन्ड नॉस्टेल्जिया जागवणारे प्रदर्शन जहांगीरमधे भरवले होते.

शेकड्यांनी काढलेली रायबांची चित्रं त्या काळात विकलीही गेली. पण त्यांच्याकडे हुसेनसारखी लोकप्रियता नव्हती, सूझा, रझासारखे परदेशात राहील्याचे ग्लॅमर नव्हते. कलेची बाजारपेठही त्या काळात विस्कळीत होती. चित्रांना जेमतेम किंमत मिळू शकली. गुणवत्ता भरपूर पण बाजाराची गणितं जमवता आली नाही अशा भारताच्या स्वातंत्र्योत्तर आधुनिक चित्रकारितेच्या पिढीचे रायबा हे प्रातिनिधिक चित्रकार.
मात्र नंतर हळू हळू कलेला मोल यायला लागले. इतरांसोबतच रायबांच्या चित्रांनाही सेकंडरी सेलमधे लाखो रुपयांची किंमत मिळायला लागली. ऑक्शन हाऊसेस, कलेक्टर्स, डीलर्स, गॅलरीज यांनी त्यात भरपूर कमावले, पण चित्रकारांना त्याचा वैयक्तिक काहीही फ़ायदा मिळाला नाही. तय्यब मेहतांच्या काली पेंटींगला मिळालेली एक कोटीची किंमत आठवत असेलच. तय्यब मेहता त्यावेळी अगदी साधसुधं आयुष्य जगत होते, त्यांना आर्थिक फायदा काहीच होऊ शकला नव्हता.
रायबांसारखे अनेक चित्रकार अंधा-या, कोंदट खोल्यांमधे आयुष्य जगत राहीले. त्यांना त्यांच्या चित्रांना मिळालेल्या लाखो रुपयांमधला लहानसा हिस्साही मिळाला नाही. कारण भारतात तसं कोणतही नैतिक, कायदेशीर बंधन गॅलरी, डीलर्सवर नाही.
रायबांच्या चित्रांचे क्लार्क हाऊसमधे भरलेले हे प्रदर्शन आर्टिस्टस रिसेल राईट्सचा पाठपुरावा करण्याकरताच भरवले गेले होते.. जी पेंटींग्ज रिसेलमधे विकली जातील त्याचा २०% हिस्सा चित्रकाराला किंवा त्याच्या वारसांना मिळावा असा आग्रह धरुन क्यूरेटर झाशा कोला आणि क्लर्क हाऊसचा सुमेश शर्मा यांनी हे चित्रप्रदर्शन भरवले.
हे प्रदर्शन पहायला जाताना रायबांना कदाचित भेटता येऊ शकेल, त्यांच्या या सगळ्या कलाप्रवासाबद्दल, मनातल्या खंतीबद्दल त्यांच्याशी काही बोलता येऊ शकेल का अशी मनात इच्छा होती, पण रायबा यावेळीही भेटू शकले नाहीत.

दीड वर्षांपूर्वी नालासोपा-यातल्या त्यांच्या स्टुडिओतून निघताना नजीबला रायबांच्या त्या अपूर्ण चित्रांबद्दल विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की इतनी उम्र हो गयी, काम खत्म ही नही हुवा, अशी खंत ते मधून मधून व्यक्त करत असतात, करतील ते लवकरच पूर्ण.
आश्चर्य वाटलं होतं. नव्वदीच्या घरातल्या रायबांना जमू शकेल ही चित्रं पूर्ण करणं?
पण आता ती क्लार्क हाऊसच्या प्रदर्शनात भिंतीवर लावलेली होती.
रायबांची ही पेंटींग्ज कोणी विकत घेतली का, किती लाखांना, त्यातून ठरवल्याप्रमाणे २०% रक्कम रायबांना मिळू शकली का, हे प्रश्न, रायबांना प्रत्यक्ष भेटीत विचारायचे असलेले काही प्रश्न हे सगळं अनुत्तरीत आहे. न झालेल्या चित्रकाराच्या मुलाखतीची अनामिक अस्वस्थता.. इतनी उम्र हो गयी, काम खत्म ही नही हुवा.. या वाक्यातून जाणवणारी चित्रकाराच्या अपूर्ण चित्रप्रवासाबद्दलची खंत.. त्याबद्दल चित्रकाराशी बोलायलाच हवे आहे.  


'लोकमत-मंथन'- आर्ट कॉलम 'चित्रभाषा' मधून पुनर्प्रकाशन

No comments: