लॅन्ड-आर्ट
चित्र रंगवायला त्यांना कॅनव्हास, रंग, ब्रश लागत नाहीत, शिल्पांकरता छिन्नी, साचे लागत नाहीत, काम करताना त्यांना ना स्टुडिओची गरज भासते, ना बनवून झालेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाकरता, खरेदी-विक्रीकरता आर्ट गॅल-यांची. खुल्या निसर्गात ते त्यांची कलानिर्मिती करतात. वसुंधरा हाच त्यांचा कॅनव्हास, आणि दगड, गोटे, वाळू, पाणी, शेवाळ, चिखल, माती, फ़ुलं, पानं, मुळ्या, काटक्या, काटे.. हे त्यांचे रंग.
निसर्गातली प्रत्येक नैसर्गिक गोष्ट जी उगवते, उमलते, बहरते, सुकते, वाहून जाते, नष्ट होते त्यांचा वापर करुन ते त्यांच्या कलाकृती बनवतात, आणि त्यांना नाव देतात लॅन्ड आर्ट.. किंवा अर्थ आर्ट, नेचर आर्ट, एन्व्हायर्न्मेन्टल आर्टही.
निसर्गाचा तोल आणि ताल जराही ढळू न देता, आजूबाजूच्या वातावरणाशी एकजीव होणारी आणि तरीही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण, मोहक आकार-रचनांमुळे, संकल्पनेमुळे वेगळी उठून दिसणारी ही लॅन्ड आर्ट. संपूर्णपणे निसर्गाशी जोडली गेलेली, उत्पत्ती-लय-विनाशाच्या निसर्गचक्राचे भान राखणारी, चित्रकला-शिल्पकलेचा मनोरम संगम साधणारी, शहरी गजबजाटापासून, प्रदुषणापासून, कृत्रिम, अनैसर्गिक, व्यावसायिक, झगमगाटी जगापासून दूर खुल्या निसर्गात जोपासली गेलेली ही लॅन्ड आर्ट.
अमेरीकेतील रॉबर्ट स्मिथ्सनने ६०-७० च्या दशकात ग्रेट सॉल्ट लेकमधे खडक, माती, शैवालांचा वापर करुन १५०० फ़ूट लांबीची भव्य, सर्पाकृती स्पायरल जेट्टी बनवली. बहुतांश काळ ती पाण्याखालीच असते. फ़ार क्वचित लोकांना ती दिसू शकते. स्मिथ्सनने बनवलेली हीच स्पायरल जेट्टी कटेम्पररी कलाजगतात लॅन्ड आर्टचे पुनरुज्जीवन करण्यास कारणीभूत ठरली. मुळात त्याही आधी साधेपणा स्विकारलेल्या मिनिमल आणि कॉन्सेप्च्युअल आर्टमधून ही विकसित होत गेली. ब्राकुशीच्या कलाकृतींशीही याची नाळ जोडली गेली होती.
७० च्या दशका दरम्यान अमेरिकेत औद्योगिकीकरणाच्या जोशात जमिनीच्या पोटातून टनावारी माती, दगड उपसले जात होते. उपसलेल्या माती दगडांच्या त्या टेकड्या पहात असताना रॉबर्ट स्मिथ्सनच्या मनात लॅन्ड आर्टची संकल्पना रुजत गेली. त्याविषयी स्मिथ्सन म्हणाला होता," कारखाने, शहरीकरणाने उध्वस्त झालेली जमीन, नैसर्गिक-मानवनिर्मीत विध्वंसामुळे जखमी झालेली जमीन माझ्या अर्थ आर्ट मुळे थोडी जरी सुखावली तरी मी तिचे ऋण अंशत: फ़ेडले असं मला वाटते."
निसर्गातले उंचवटे, खळगे, कमानी, वळणं, रेषा यांच्या नैसर्गिक आकारात, नैसर्गिक घटकांचा वापर करुन कधी भव्य, नजरेला थक्क करणारी, कधी नाजूक, डेकोरेटीव्ह, कधी तरल.. अशी निसर्गात मिसळूनही स्वत:चे वेगळेपण जपणारी लॅन्ड आर्ट त्यानंतर अनेकांनी निर्माण केली.
अॅन्डी गोल्ड्सवर्थ स्कॉटलन्डच्या पर्वतराजींमधे रहातो आणि रोज उठून देखण्या मोहक रंगांची फ़ुलं, पानगळतीचे रंग ल्यायलेली पानं, आयसीकल्स, पाईनकोन्स, मऊ चिखल, बर्फ़ाचे धारदार तुकडे, दगड यांच्या एक किंवा अनेक कलात्मक राशी रचतो, अनवाणी हातापायांनी. आपली बोटं, नखं, तळवे, पावले यांना निसर्गाचा उघडा स्पर्श झाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.
त्याच्या या देखण्या रचना पाहील्यावर वाटतं की निसर्ग हीच एक उत्कृष्ट कलाकृती आहे हे खरं असलं तरी त्याला आणखी सुंदर बनवायला, परफ़ेक्शनच्या पुढची पायरी गाठायला या मानवी हातांचीच गरज आहे.
रिचर्ड लॉन्ग लंडन आर्ट स्कूलमधे शिकत असताना पासून रोज लांबवर भटकायला जायचा. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या कारणांनी. कधी ठरवून, कधी निरुद्देश. या भटकंतीतच त्याला त्याची लॅन्ड आर्ट गवसली. त्याच्या भटकंतीचा रस्ता हीच त्याची लॅन्ड आर्ट बनली. कॅनडा, मंगोलिया, बोलिव्हिया, हिमालय, राजस्थान, गोबी.. खेड्यांतून, जंगलांतून, माळरानांतून, गवतातून, वाळूतून, वाळवंटातून.. निसर्गाचा आदर राखून तो भटकतो आणि निसर्गाचा ताल जराही न ढळवता तो चालून आलेल्या मार्गावर आपला माग सोडतो. कधी दगड रचून ठेवतो, कधी गळलेल्या पानांच्या आकृत्या, काही खूणा. ’निळ्याशार, मंदार पाऊलवाटा..’ याच त्याची लॅन्ड आर्ट. जगभरातल्या आपण चालून आलेल्या या पाऊलवाटांचे त्याने घेतलेले फोटोग्राफ़्स कंटेंपररी आर्टमधले परफ़ॉर्मन्स, स्कल्प्चर यांच्यातला सूक्ष्म समतोल साधणारे माईलस्टोन ठरतात.
सुबोध केरकर गोव्यातील समुद्राच्या मऊशार रेतीचा कॅनव्हास बनवून, शंख, शिंपल्यांच्या साहाय्याने ’मून टाइड’ सारखी काव्यमय सीस्केप्स बनवतो, मच्छीमारांच्या जुन्या नौकांच्या लाकडावर उमटलेले फ़ेसाळत्या समुद्राचे पॅटर्न्स, दर क्षणाला नव्या सौंदर्याने किना-यावर फ़ुटणा-या लाटांच्या स्मृती जपणार्या
त्याच्या या कलाकृती. किना-यावर वाहून आलेले जैविक, निर्जीव घटक रोज गोळा करुन तो त्यांचे आगळे डॉक्युमेन्टेशन करतो. सुबोधची अद्भूत, तरल लॅन्ड आर्ट
जगभरातल्या कलारसिकांना मोहवते.
निसर्गात जन्मलेली कला आर्ट गॅल-यांच्या कृत्रिम अवकाशात बंदिस्त करणे या कोणत्याच कलाकारांना मान्य नाही. कॅनव्हासवर हुबेहुब लॅन्डस्केप रंगवण्यापेक्षा, ख-या निसर्गातील लॅन्डस्केपमधे काही आकार रचनांची भर घालणे त्यांनी पसंत केले.
मात्र जी कलाकृती वा-याच्या एका झोतामुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा समुद्राच्या लाटांमुळे बघता बघता नाहिशी होते, जी म्युझियम्समधे, प्रदर्शनांमधे विराजमान होऊ शकत नाही, जिची खरेदी-विक्री होऊ शकत नाही ती बनवण्याकरता नेमकी कोणती उर्मी या कलाकारांना उर्जा
पुरवते?
लॅन्ड आर्ट ही संकल्पना नवी अजिबात नाही. कला आणि निसर्गाचं अद्वैत हे कलेच्या उगमाइतकंच प्राचीन. अश्मयुगीन मानवाने गुहेच्या भिंतीवर रेखाटलेल्या चित्रप्रतिमा निसर्गातूनच प्रेरणा घेऊन बनवल्या. जगात जिथे जिथे प्राचीन संस्कृतीच्या खूणा अजूनही अस्तित्त्वात आहेत तिथे मानवाने शेकडो शतकांपूर्वी उभारलेली, नैसर्गिक साधनांचा, घटकांचा वापर करुन बनवलेली शिल्पे, कमानी, नकाशे, गोपुरे, लेणी.. अशा अनेक भव्य, अद्भूत लॅन्ड आर्टचे पुरावे आजही पहायला मिळतात. धार्मिक समारंभ, कृषी-देवतांचे पूजन, सृजनशक्तीचे कुतूहल, भयावर मात, अवकाशाचे संशोधन, भूगर्भाचे रहस्य, किंवा निव्वळ सौंदर्यानुभव अशा अनेक कारणांनी मानवी संस्कृतीत लॅन्ड आर्टची निर्मिती होत राहिली. भारतातील वेरुळची, एकसंध दगडात खोदलेली लेणी लॅन्ड आर्टचा उत्कृष्ट नमुना मानली जातात. भारतीय धार्मिक, सांस्कृतिक समारंभातील फ़ुलांची, रांगोळ्यांची कलात्मक रचना, श्रावणातली प्राजक्ताच्या कोमल मोती-पोवळ्याच्या फ़ुलांची लक्ष आरास, गंगेच्या वाहत्या पाण्यातले दीपदान, लुकलुकणा-या दिव्यांना सामावून घेणा-या पर्णफ़ुलांच्या परड्या, गोव्यात शांतादूर्गा देवीच्या मंदिरातली शुभ्र सुगंधी जाईच्या फ़ुलांची जात्रा, जाईच्या राशींनी सजलेला भवताल, दक्षिणेच्या मंदिर प्रांगणातले हळद-कुंकू-गुलाल-अबीरांचे कलात्मक मनोरे, उत्तर-पूर्व हिमालयाच्या द-या, पर्वतमाथ्यावर लहरणा-या रंगीबेरंगी प्रार्थनापताका.. लॅन्ड आर्ट आणि लॅन्ड इन्स्टॉलेशन्स भारतीय संस्कृतीच्या
हातात हात घालून रुजली.
मात्र आधुनिक जगात आपले निसर्गाशी असलेले द्वैत, निसर्ग आणि कलेचा एकेकाळी अतुट असणारा मेळ आता संपूर्णपणे हरपून गेला आहे याची खात्री पटावी इतका कंटेम्पररी लॅन्ड आर्टच्या क्षेत्रामधे भारतीय कलाकारांचा दुष्काळ आहे. असे का व्हावे?
नुसताच देखणेपणा, सौंदर्यानुभव देणे हा लॅन्ड आर्टचा उद्देश नाही. निसर्गाच्या भव्यतेतून, गहिराईतून, उत्पत्ती-लय-विनाशाच्या जीवनचक्रातून जो विचार, संकल्पना किंवा जे तत्त्वज्न्यान उपजते त्याचे प्रतिबिंब लॅन्ड आर्टमधे पडते. मानवाला निसर्गाच्या, कलेच्या समीप नेण्याचे, नैसर्गिक तत्त्वांच्या रक्षणाचे, जीवनाचे महत्व पुन्हा एकवार सांगण्याचे कामही लॅन्ड आर्ट करते. पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रेमात पाडण्याचे, आपल्यातल्या कल्पनाशक्तीला, सुप्त सृजनशक्तीला जागवण्याचे काम लॅन्ड आर्ट करते. त्यामुळेच निदान नव्या पिढीपर्यंत तरी ही कला पोहोचणे आवश्यक ठरावे.
(लोकमत-मंथनच्या 'चित्रभाषा' आर्ट कॉलम करता प्रथम प्रकाशित)
(लोकमत-मंथनच्या 'चित्रभाषा' आर्ट कॉलम करता प्रथम प्रकाशित)