Sunday, August 12, 2012

तेरा चेहरा..


पोस्टर पेंटिंग आर्ट

बान्द्र्याचा चॅपेल रोड म्हणजे खरं तर एक लहानशी गल्ली. एका बाजूला काही कौलारु घरं आणि समोरच्या बाजूला एक लांबलचक भिंत. अर्बन पब्लिक आर्ट प्रोजेक्टवाले त्या भिंतीवर मधून मधून काही ग्राफिटी रेखाटतात त्यामुळे तिथे आवर्जून लक्ष जात. गेल्या महिन्यात काही कामानिमित्ताने तिथे जाण झालं आणि भिंतीवरच्या विलोभनीय चित्रामुळे केवळ थक्क व्हायला झालं. 



अनारकली सिनेमाच्या पोस्टरचं एक भव्य, ११ बाय १५ फूटांचं देखणं म्यूरल. आर्टिस्ट रणजित दहिया याने भारतीय सिनेमाच्या शताब्दीनिमित्त ते तिथे रंगवलं होतं. आता तिथेच अजून एक पोस्टर म्यूरल रंगवलं आहे. अमिताभ बच्चनच्या ७० सालातल्या आयकॉनिक दीवार सिनेमाचे भव्य पोस्टर. 

बॉलिवुड आर्ट प्रोजेक्ट नावाच्या संस्थेतर्फे हिंदी सिनेमाच्या जुन्या पोस्टर्सना मुंबईतल्या सार्वजनिक भिंतींवर कलात्मक आणि मानाचे स्थान देणारा हा उपक्रम. सिनेमा आणि पेंटींग या दोन दृश्यकलांना एकत्रित जोडणारे माध्यम म्हणजे 'पोस्टर पेंटींग आर्ट'. त्यामुळे सिनेमा सेन्टीनरी वर्षात काही चित्रकारांनी आपली ट्रिब्यूट अशा या पोस्टर म्यूरल्स द्वारे देण्याचे ठरवले.


भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला त्या निमित्ताने मुंबईत एनजिएमए मधे काही समकालिन चित्रकारांचे प्रोजेक्ट सिनेमासिटी हे कलाप्रदर्शन पहात असताना जाणवून गेले की सिनेमाशी निगडीत अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या या नव्या सहस्त्रकात आपल्या नजरेसही पडलेल्या नाहीत. हाताने रंगवलेली पोस्टर्स, सिनेमांची गाणी लिहिलेली छोटी पुस्तके, लॉबी कार्डस, एलपी रेकॉर्डची कव्हर्सही..
  
मल्टीप्लेक्सच्या युगात सिंगलस्क्रिन सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी हरवल्या आणि गमतीची गोष्ट अशी की त्यांचे नसणे आपल्याला अशी मुद्दाम आठवण करवून दिल्याशिवाय जाणवतही नाही, इतक्या अलगदपणे त्यांचे अस्तित्त्व नाहीसे झाले.
सिनेमासिटीत हंटरवालीची आधुनिक युगाला साजेसी डिजिटाइज्ड पोस्टर्स पहाताना, अतुल दोडियांनी रंगवलेले व्हिलन्सचे चेहरे पहाताना साठ-सत्तरच्या दशकातली पोस्टर्स आठवून एक जबरदस्त नॉस्टेल्जिया अपरिहार्यपणे मनात जागवला गेला, मात्र लक्षात आलं की अस्तंगत झालीय असं वाटणार्‍या 'पोस्टर आर्ट'ने खरं तर आपली फक्त जागा बदललीय. रस्त्यांवरच्या, थिएटरवरच्या पोस्टर आर्टने आपले स्थान आता अशा आर्ट शोमधे, ऑक्शन हाऊसेस मधे, व्हिन्टेज आर्ट कलेक्टर्सच्या खाजगी संग्रहांमधे पक्के केले आहे.
कोणत्याही नॉस्टेल्जियाचे मार्केट करणार्‍यांनी पोस्टर आर्टला व्यवस्थितच जिवंत ठेवले आहे, नवे जास्त श्रीमंती, वरच्या वर्तुळातले पुनरुज्जीवन या कलेला बहाल झाले आहे. आता जुन्या हिंदी सिनेमांची पोस्टर्स अनपेक्षित ठिकाणी दिसतात. कधी शॉपिंग बॅग्जवर, कधी टीशर्टसवरओसियानच्या ऑक्शनमधे मोगले आझमच्या पोस्टरला दोन लाखांहून जास्त बोली लागते.
मुंबईच्या अपटाऊन रेस्टॉरन्ट्समधे इंटेरियर डेकोरेशनकरता साठच्या दशकातल्या हिंदी सिनेमा पोस्टर्सचा वापर करतात. लोखंडवालामधल्या बॉलिवुड कॅफेमधे काश्मिर की कलीचे जायन्ट साईझ पोस्टर आत शिरल्यावर लगेच नजरेत भरते आणि त्यातल्या शम्मी कपूरच्या निळ्या डोळ्यांना जरा जास्तच गडद निळ्या छटेत आणि शर्मिला टागोरच्या ओठांना जास्तच केशरी रंगवलेलं असलं तरी ते एकंदर पोस्टर इतकं बहारदार आणि नॉस्टेल्जिक दिसतं की कुणाचीच तक्रार नसते.
नॅशनल फिल्म आर्काइव्ह तर्फे गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टीवलला काही क्लासिक भारतीय चित्रपटांच्या पोस्टर्सचे  खास प्रदर्शन करण्यात आले. मदर इंडिया, गाईड, चारुलता, मेघे ढाक तारा, पाकिझा अशा सिनेमांच्या ओरिजिनल पोस्टर्सना भारतीय समृद्ध सेल्युलॉइड हेरिटेज म्हणून तिथे नावाजले गेले. एकेकाळी रस्त्यावरच्या कलाकारांची कला म्हणून हिणवण्यात आलेल्या या कलेला ती अस्तंगत झाल्यावर आलेले हे मूल्य आणि महत्व.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रावडी राठोड सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरता पोस्टर आर्टचा खुबीने वापर करुन घेतला गेला. अक्षयकुमार, सोनाक्षी चार तास त्याकरता 'पोझ'मधे उभे होते. चार पेंटर्सकडून ही पोस्टर रंगवून घेतली गेली. स्ट्रीट पेंटर्सना त्याकरता शोधून आणण्यात निर्माता संजय लिला भन्सालीचा दम निघाला .. वगैरे बातम्या प्रसिद्ध झाल्यानिघणारच. ऑथेन्टिक पोस्टर आर्टिस्ट ही जमातही आता दुर्मिळ झाली.  
सिनेमा कसाही असो, पोस्टर्स वेगळेपणाने उठून दिसली, देखणी वाटली. ही जादू पेन्टर्स स्ट्रोकची. रंगांची, ब्रशच्या हाताने मारलेल्या फटकार्‍यांची.
मात्र या सगळ्यामुळे आता पुन्हा या मृत कलेला संजीवनी वगैरे मिळाली असं समजण्याचे काहीच कारण नाही.
पब्लिसिटी कॅम्पेनमधे हॅन्डमेड पोस्टर्सचा वापर करण्याचा आग्रह भन्सालीने धरला त्यामागे नॉस्टेल्जिया जागवण्याचा हेतू किती, पोस्टर आर्टला आता प्राप्त झालेली व्हिन्टेज व्हॅल्यू कॅश करण्याचा हेतू किती हे नक्की सांगता येणार नाही.

एकंदरीतच पोस्टर आर्ट या गोष्टीला आज अचानक इतके महत्व का हा प्रश्न कोणाच्याही डोकावेल.
पोस्टर आर्ट ही कला अर्थातच नवी नाही. जगभरात सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरता पोस्टर्सचा वापर आजही होतच असतो. मात्र हातांनी रंगवलेली सिनमाची पोस्टर्स हा खास भारतीय वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकार.
विसाव्या शतकात, भारतीय सिनेमाउद्योगाची नुकती सुरुवात होत असतानाच जन्मलेलीबहरास आलेलीअगदी प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली पण एकविसाव्या शतकाची सुरुवात होण्याच्या आधीच अस्तंगतही झालेली ही कला.
या कलेचे वर्तमान तर आपल्या समोर आत्ता आहेच पण त्यानिमित्ताने तिचा भूतकाळही जाणून घेण्यात मजा आहे. आणि खरोखरच हा भूतकाळ 'सोनेरी' होता.
१९२० ते ९० या कालावधीत हिंदी सिनेमाची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण दृश्यभाषा विकसित झाली आणि त्यातून ज्या अद्भूत इमेजेसचा जन्म झाला त्यांना अधिक ठळकपणे लोकांसमोर आणण्याचे,  त्यांच्या दृश्यस्मृतीत त्यांना ठसवण्याचे काम केले या सिनेमांच्या पोस्टर्सने. चित्रपटांच्या प्रसिद्धीचे पोस्टर्स हे माध्यम सर्वात महत्वाचं आणि लोकप्रिय. 
प्रभात अथवा राजकमलचे सिनेमे पाहीलेली पिढी असो, के.आसिफ़चा मोगले आझम पहिल्यांदा मराठा मंदिरला झळकलेला पाहीलेली पिढी असो, नाहीतर अमिताभ बच्चनचा संतप्त चेहरा डोळ्यात साठवत तारुण्य पार केलेली पिढी असो, हिंदी सिनेमा आणि त्याची शहरभर झळकणारी पोस्टर्स हा सिनेमाविषयक नॉस्टाल्जियाचा अविभाज्य भाग.
चित्रपटांच्या प्रसिद्धीरता आजही प्रामुख्याने पोस्टर्सचाच वापर केला जात असला तरी आता ती हाताने रंगवली जात नाहीत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा फ़ायदा उठवत वेळपैसाश्रम वाचतात म्हणून गेल्या शतकाच्या अखेरीला ज्या अनेक अभिजात कलांचे प्रकार लयाला गेले त्यामधे पोस्टर आर्टची गणना होतेडिजिटल आर्टच्या स्वस्त आणि झटपट कारागिरीच्या झपाट्यापुढे हाताने पोस्टर पेंटिंग करणा-या कलाकारांचा तग लागणे अशक्यच होते.
आज सिनेमाच्या प्रमोशनकरता स्वतः स्टार्स मेहनत करतात, प्रीरिलिज प्रीव्ह्यूज प्रसिद्ध होतात, ट्रेलर्सचा, गाण्यांचा भडीमार कितीतरी महिने आधीपासून होतो, टीव्हीसारखे शक्तिशाली माध्यम सिनेमा प्रसिद्धीकरता आयते हाती उपलब्ध असते. पण हे सगळे नसतानाच्या काळात पोस्टर्स हेच एकमेव पूर्वप्रसिद्धी माध्यम उपलब्ध असताना ती रंगवण्याच्या कलेचे किती महत्व सिनेमा उद्योगामधे असेल हे सहज समजून घेता येऊ शकते. कसबी चित्रकाराच्या हातातल्या कौशल्यावर सिनेमाची, त्यातल्या अभिनेत्यांची इमेज पूर्णपणे अवलंबून असे. पोस्टर किती मनोरंजक, हिरोच्या चेहर्‍यावरचे भाव किती जोशिलेहिरॉइन्स किती ठसठशीत, लडिवाळ यावर सिनेमाची तिकिटे हातोहात विकली जात किंवा प्रदर्शित होण्याच्या आधीच सिनेमा बॉक्स ऑफिसवर मार खाई.

हिंदी सिनेमामधील लार्जर दॅन लाईफ़इमेजेस प्रत्येक पिढीच्या मनावर रुजवण्याचे श्रेय जाते पोस्टर पेंटींग्जना. चित्रपटांच मर्मच या पोस्टर्समधून प्रतीत होतेसुंदर चेहर्‍याच्या, ठळक, नाट्यपूर्णरित्या रंगवलेले ओठ आणि डोळ्यांच्या हिरॉइन्स, रुबाबदार, केसांची वैशिष्ट्यपूर्ण वळणं असलेले हिरो, क्रूर, खतरनाक, तोंडावर जखमांचे व्रण मिरवणारे व्हिलन, सिनेमातील प्रमुख प्रसंगक्लायमॅक्स यांचं रचनात्मक कौशल्यभावभावनांच्या तीव्रतेसह करण्यात कलेची कसोटी पणाला लागत होती. जाहीरात हा प्रमुख उद्देश असल्याने, रंगसंगती भडक असणे ही माध्यमाची गरज होती पण त्यातूनही काही कलावंतांनी त्यात चित्रकलेचा दर्जा सांभाळला.

सिनेमाच्या प्रेक्षकांना पोस्टरवरचे कलाकार बघण्यात इंटरेस्ट, पोस्टर डिझायनर किंवा होर्डिंग रंगवणारा आर्टिस्ट कोण याच्याशी त्याला कर्तव्य असण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळेच बरेच पोस्टर आर्टिस्ट गुमनामच राहीले.


मात्र आता जेव्हा आर्ट हिस्टरीमधले पोस्टर आर्टचे महत्व वाढले त्यावेळी साहजिकच पोस्टर आर्टिस्ट कोण होते हे जाणून घेण्यातलाही इंटरेस्ट वाढला. सिनेउद्योगापुरतेच नाव आणि महत्व मर्यादित राहिलेल्या या गुणी कलावंतांना उशिरा का होईना जाणून घेणे महत्वाचे वाटू लागले.

या पोस्टर आर्टिस्ट्सची माहिती करुन घेताना अग्रपूजेचा मान अर्थातच जातो कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्याकडे.  चित्रपटांच्या प्रदर्शनाआधी रंगवलेल्या पोस्टर्स किंवा होर्डिंग्जचा वापर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी करता पहिल्यांदा त्यांनीच केला.  बाबुरावांची पोस्टर्स बघायला तोबा गर्दी होई.
आज दुर्दैवाने १९३०-४० या दशकातले एकही पोस्टर आज उपलब्ध नाहीत्यामुळे बाबुराव पेंटर यांनी रंगवलेली पोस्टर्स आपल्याला आता बघता येत नाहीतमात्र सायलेन्ट सिनेमांच्या जमान्यातल्या (१९२४) कल्याण-खजिना या महाराष्ट्र फ़िल्म कंपनी, कोल्हापूरची निर्मिती असलेल्या सिनेमाचे एक पोस्टर (देवी भवानीसमोर नतमस्तक झाले शिवाजी महाराज) उपलब्ध आहे.
१९२३ साली बाबुरावांनी 'सिंहगड' सिनेमा मुंबईत प्रदर्शित केला त्यावेळी त्यांनी स्वतः मोठमोठी पोस्टर्स रंगविली आणि सिनेमा थिएटरवर लावली. इतकी मोठी आणि कलात्मक दर्जाची पोस्टर्स पूर्वी कुणी पाहिलीच नव्हती. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधील प्राध्यापक उन्हात उभे राहून ती पोस्टर्स पाहण्यासाठी जमत. डायरेक्टर सॉलोमन यांनीही मुद्दाम येऊन ती पोस्टर्स पाहिली आणि ते प्रभावित झाले. त्यांनी बाबुरावांना जे.जे.मधे बोलावून त्यांचा सत्कार केला. असा उल्लेख बाबुराव सडवेलकरांच्या 'महाराष्ट्रातले कलावंत'मधे आढळतो.
त्या काळात कोल्हापूरातल्या बहुतेक चित्रकारांवर बाबुरावांच्या कलेचे संस्कार रुजले. त्यांची महाराष्ट्र फ़िल्म कंपनी चित्रकलेचं विद्यापीठच होतं. कंपनीच्या पोस्टर डिपार्टमेन्टमधे अनेक होतकरु चित्रकार नोकरीला होते जे नंतरच्या काळात नावाजले गेले.
भारतातील सर्वश्रेष्ठ पोस्टर आर्टीस्ट गोपाळ बळवंत कांबळे उर्फ़ जी.कांबळे (जन्म- २२.७.१९१८) हे सुद्धा त्यापैकीच. रणजित स्टुडिओच्या १२ चित्रपटांची पोस्टर्स त्यांनी रंगवली आणि त्यांचं नाव मुंबईत प्रसिद्ध झालं. कंगन, बंधन, रोटी या सिनेमांची पोस्टर्स अमाप लोकप्रिय झाली. व्ही.शांतारामांच्या गुणग्राही नजरेतून कांबळेंची कला सुटणं अशक्यच होतं. कांबळेंच्या कलेवर खुश होऊन व्ही.शांतारामांनी त्यांना हिल्मन मोटार भेट दिली.
१९४३ मधे त्यांनी राजकमलमधे सन्मानानी प्रवेश केला. शकुंतला, पर्बत पे अपना डेरा, भक्तीचा मळा, राम जोशी, दहेज, दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, पिंजरा चित्रपटांच्या पोस्टर्सनी रसिकांना भुरळ घातली. शकुंतलाचे साडेबारा ते ६६ फ़ूट लांबीरुंदीचे वसंतऋतू साकारणारे भव्य पोस्टर पाहून रसिक चकीत झाले. दहेजची पोस्टर्स बघायला तर भारतभराहून लोक मुंबईला खेचले जात. दो आंखे बारह हाथ सिनेमाचे ३५० फ़ूट लांबीचे बॅनर कांबळेंनी मुंबईच्या ऑपेरा हाऊसवर १९५७ साली लावले होते.

जी.कांबळेंच्या कलाकर्तृत्वावर मानाचा तुरा खोवला गेला मोगले आझमया के.आसिफ़च्या महत्वाकांक्षी सिनेमाच्या अतिभव्य आणि प्रभावी पोस्टर्सनी. असं म्हणतात, के.आसिफ़ने मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास शहरातले विन्सर-न्यूटन कंपनीच्या रंगाचे सर्व स्टॉक सहा लाख रुपये खर्चून कांबळेंकरता खरेदी केले होते. मोगले आझमच्या पोस्टर्सनी त्या सिनेमासारखाच इतिहास घडवला. सिनेरसिकांचे डोळे दिपले. मराठा मंदिरमधे मोगले आझम प्रदर्शित व्हायच्या आदल्या दिवशी ६० फ़ूट उंचीच्या दिलीपकुमारची एकच फ़िगर असणा-या पोस्टर्सनी मुंबईत धूम माजवली. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितिय त्यावेळी भारताच्या दौर्‍यावर आली होती आणि मोगले आझमच्या या भव्य पोस्टर्सनी ती इतकी प्रभावित झाली की तिने स्वत:करता खास स्क्रिनिंगची मागणी करुन हा सिनेमा बघीतला.
जी.कांबळे यांच्या पोस्टर्सची जातकुळीच वेगळी असे. चित्रांच्या बाह्यरेषेवरचं त्यांचं प्रभुत्व, वेगवान, लयदार रेषेसोबतच योग्य आकाराचं भान, रंगावरील हुकूमत, विषयाला न्याय देणा-या वेगवेगळ्या रंगछटा आणि लेपन पद्धती ही जी.कांबळेंच्या पोस्टर्सची खास वैशिष्ट्ये. पोस्टर्सच्या भव्य आकारांमधे सर्व आवश्यक घटकांत सुसंवाद साधून, पुरेसा मोकळा अवकाश सोडण्याचे त्यांचे कौशल्य आगळे होते. इंग्लिश पोस्टर्सचा ते काळजीपूर्वक अभ्यास करीत, त्यातून नाविन्याचा शोध घेत. स्वत:ची स्वतंत्र शैली त्यांनी त्यातून विकसित केली. इंग्लिश पोस्टर्सची आज केली जाते तशी आंधळी नक्कल त्यांनी कधीही केली नाही. जी.कांबळेंच्या कालखंडात अरोलकर, पाटणकर हे पोस्टर आर्टिस्ट्सही त्यांच्या वेगळेपणाने गाजले.
डी.डी.नेरॉय, मुळगावकर, दिवाकर करकरे, ए.रौफ, पृथ्वी सोनी आदी कलाकारांनीही पोस्टरपेंटींग कलेत मोलाची भर टाकली.
प्रख्यात चित्रकार एम.एफ़.हुसेन कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात पोस्टर पेंटींगची कामे करायचे हे सर्वश्रूतच आहेत्यांच्या रंगलेपनाची सारी वैशिष्ट्य पोस्टर आर्टमधूनच विकसित झालेली आणि म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण होती
दिवाकर करकरेंनी केलेली नया दौरदागमेरा नाम जोकरची सिनेमांची पोस्टर्सही गाजली.
 मात्र राजकपूरचे आवडते पोस्टर आर्टिस्ट होते एस.एम.पंडीत. जेजे स्कूल ऑफ़ आर्टमधून आलेल्या पंडीतांनी केलेली आग, बरसात, आवारा सिनेमाची पोस्टर अत्यंत देखणी होती.
वसंत परचुरेंनी गुरुदत्तच्या कागझ के फ़ूल साठी पहिल्यांदा चोवीस शीट्सचं पोस्टर तयार केलं. डी.आर.भोसले यांचं कामही वेगळं होतं. काळ्या पार्श्वभूमीवर एकाच चेहर्‍याची पोस्टर रंगवणे हे त्यांचं वैशिष्ट्य.

पोस्टरवर कोणत्या स्टारचा चेहरा ठळक, मध्यवर्ती आहे यावरुन मल्टीस्टारर सिनेमात कोणाला जास्त फूटेज, दिग्दर्शकाची कोणावर जास्त मर्जी, भविष्यात कोण स्टार जास्त मोठा होणार अशी गणिते जाणकार प्रेक्षकाच्या मनात अचूक मांडली जात, राजेश खन्ना-अमिताभ बच्चन दोघे हिरो असण्याच्या काळातली पोस्टर नीट पाहिली तर एकाचा अस्त आणि दुसर्‍याचा उदय नक्की केव्हा झाला हे सहजपणे,कोणत्याही मजकुरावाचूनही समजू शकतो. कोणती हिरॉइन कोणत्या हिरोच्या अधिक जवळ दाखवलेली आहे यावरुनही सिनेमातल्या आणि पडद्यामागच्याही स्टोरीचा अंदाज बांधला जाई आणि शक्यतो तो बरोबरच असे. रंगाच्या माध्यमाची, कॉम्पोझिशनची,ब्रशच्या फटकार्‍यांची, पेंटरच्या पर्स्पेक्टिव्हची ही ताकद होती. सिनेमा बनवण्यात जितकी क्रिएटिव्हिटी खर्च होई तितकीच क्रिएटीव्हिटी पोस्टर डिझाईन करणार्‍या कलाकाराचीही.
पोस्टर आर्टच्या सर्जनशिलतेच्या बहराचा हा काळ होता.
एकेकाळी एकट्या मुंबई शहरात ३०० पोस्टर आर्टिस्ट होते आणि आता एकही नाही.
--------
ज्या पद्धतीने ही पोस्टर्स, बिलबोर्ड्स, होर्डिंग्ज, बॅनर्स इत्यादी भारतात तयार होत होती ती पद्धतही अत्यंत युनिक.
हॉलिवुडच्या स्टुडिओमधे सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरता कमिशन केलेल्या आर्टिस्टकडून पब्लिसिटी स्टिल्सकरता डिझाईन्स बनवून मग ती इतर सर्वत्र पाठवली जात. तिथे ती हुबेहूब त्याच पद्धतीने रिप्रोड्यूस होत. पण आपल्याकडे देशभरात खास पोस्टर पेंटींगकरता नावाजलेले गेलेले वेगवेगळे पेंटर्स असत, त्यांनी आपल्या हाताने रंगवलेले प्रत्येक पब्लिसिटी डिझाईन त्यांचे खास वैशिष्ट्य घेऊन पोस्टरवर अवतरे. त्यामुळे मग एकच दिलिप कुमार पण तो साऊथला वेगळा दिसे, मुंबईत वेगळा दिसे, उत्तरेला, पूर्वेला अजून वेगळा. हिरॉइन्सची चेहरेपटी, डोळ्यांची ठेवण, शरिरयष्टी त्या त्या प्रदेशानुसार ठळक किंवा नाजूक रेषांमधे, रंगांमधे रंगवली जाई.
डिझाईन्समधले इतके वैविध्य, इतकी समृद्धता इतर कोणत्याही देशातल्या सिनेउद्योगामधे अस्तित्त्वात नव्हती.
हॉलिवुडच्या पोस्टर्सचे इलस्ट्रेशन्स ते फोटोग्राफ्स हे स्थित्यंतर चाळीसच्या दशकातच झटपट आणि सहज झाले. तिथल्या प्रसिद्धीतंत्रात शब्दांचा, जाहिरातींच्या इतर तंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होता. पण भारतात याच्या अगदी विरुद्ध प्रकार होता. संपूर्ण विसाव्या शतकात सिनेमा प्रसिद्धीचा मुख्य फोकस रंगवलेल्या पोस्टर्सवरच राहीला. भारतीय सिनेमा उद्योगाच्या इतर अनेक वैशिष्ट्यांप्रमाणे हेही एक खास वैशिष्ट्य.
---------------
१९३१ मधे आर्देशिर इराणींचा आलम आरा हा पहिला बोलपट आला आणि पोस्टर डिझाईनमधे रंग भरायला सुरुवात झाली. तीस ते पन्नास हा काळ लिथोग्राफिक पोस्टर्सचा, नंतर ऑफसेटचे युग आले. सत्तरपर्यंतची सगळी पोस्टर्स ऑफसेटवर छापलेली. त्यानंतर डिजिटल प्रेसचे युग अवतरले आणि ऐंशीच्या अखेरीपर्यंत हॅन्डमेड पोस्टर्सचे प्रदीर्घ युग संपुष्टात आले ते कायमचे.
लिथो आणि ऑफसेट पोस्टर्स स्वस्तातल्या, कमी दर्जाच्या कागदांवर प्रिन्ट केली जात. जेमतेम महिना, दोन महिना टिकावीत इतकीच अपेक्षा. वापरलेले रंगही स्वस्त दर्जाचे, भडक असत. त्यात रस्त्यावर उन्हातान्हात ती प्रदर्शित केलेली, हाताळणी रफ, स्टोरेजची व्यवस्थाही धुळभरल्या, दमट गोदामांमधे. त्यामुळेच ३० ते ७० या संपूर्ण काळातील खूप कमी ओरिजिनल पोस्टर्स आता उपलब्ध आहेत यात काही आश्चर्य नाही. उलट ही काही पोस्टर्स आजतागायत टिकून राहिली हेच आश्चर्य.
जी पोस्टर्स वाचली, संग्राहकांच्या हाताला लागली ती त्यांनी साहजिकच व्यवस्थित जपून ठेवली. लखनौच्या इन्टॅक रिस्टोरेशन लॅबमधे पोस्टर प्रिझर्वेशनकरता खास टेक्निक डेव्हलप केले आहे. ऑक्शन हाऊसेस मधली बहुतेक पोस्टर्स तिथे रिस्टोर होऊन येतात. पहिल्यांदा सिनेमा प्रदर्शित होताना जी पोस्टर्स छापली गेली त्यांना सर्वाधिक मूल्य मिळते. रंग अजूनही झळझळीत, कागदाचे काही नुकसान झालेले नाही अशी पोस्टर्स ऑक्शनमधे आली की संग्राहकांच्या साहजिकच उड्या पडतात.
५० नंतरच्या ऑफसेट छपाई तंत्राने पोस्टर्सच्या गुणवत्तेमधे बर्‍यापैकी फरक पडायला लागला होता. रंगसंगती नव्या जमान्याला साजेशी, आकर्षक होऊ लागली. ऑफसेट छपाईची पोस्टर्स १९८० पर्यंत जोमात चालू होती.
त्यानंतर मात्र पोस्टर्स हाताने रंगवण्याची गरज राहिली नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास  झपाट्याने होत होता आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स सॉफ्टवेअरच्या मदतीने  पोस्टर्स व्हिनाईल वर छापली जाऊ लागली.
नवे टेक्निक झटपट, स्वस्त आणि अधिक वास्तव परिणाम साधणारे होते. नव्या, तरुण, तंत्रज्ञानप्रविण निर्माता दिग्दर्शकांनी सिनेमांमधे मुलभूत बदल घडवून आणायला सुरुवात केली होती, जे वास्तवदर्शी सिनेमे बनायला लागले होते, त्याला साजेसे हे नवे तंत्रज्ञान होते. प्रेक्षकांची अभिरुचीही बदलत होती. पोस्टर्स स्लीक, ग्लोबल बनायला लागली.
डिजिटाइज्ड माध्यमाच्या आगमनाने हॅन्डमेड पोस्टर्सची परंपरा संपुष्टात आली.
-------
मूकपटांच्या जमान्यापासून ते डिजिटायझेशनचे युग सुरु होईपर्यंत अंदाजे सत्तर वर्षांच्या कालावधीत पोस्टर आर्ट ही कला भारतीय सिनेमासृष्टीत रुजली, फोफावली आणि मग अस्तंगत झाली.

अस्तंगत झाली असं म्हणून खरं तर चालणार नाही.
पोस्टर्स हाताने रंगवणे थांबले आणि मग जसे नेहमी होते तसेच झाले. हाताने करायच्या कोणत्याही गोष्टीची जागा जेव्हा एखादे यंत्र घेते तेव्हा हे नेहमीच घडते.
डिजिटाइज्ड व्हिनाईल तंत्रामुळे हाताने पोस्टर्स रंगवणे बंद झाले, आणि जणू खास भारतीय शैलिची क्रिएटिव्हिटी संपली. सगळी पोस्टर्स एकसाची, गुळगुळीत दिसायला लागली. वैशिष्ट्यपूर्णतेचा र्‍हास झाला.
आणि अचानक हाताने रंगवलेल्या पोस्टरमधली 'आर्ट' लोकांना जाणवायला लागली.
जुन्या हॅन्डमेड पोस्टर्सना व्हिन्टेज आर्टचा दर्जा मिळाला. नव्वदीच्या दशकात ३०-४० सालातली जुनी पोस्टर्स जमा करण्याची आर्ट कलेक्टर्स, सिनेमारसिकांमधे क्रेझच निर्माण झाली. अनेकांनी जिथून मिळतील तिथून, अगदी  चोरबाजारातूनही ही जुनी, दुर्मिळ झालेली पोस्टर्स जमवायला सुरुवात केली.
त्या छंदामुळेच आज आपल्याला जुन्या पोस्टरकलेची  किमया काय होती ते कळू शकते.
आता नव्या सहस्त्रकात तर त्यांचे मूल्यही अमाप वाढले. आता आर्ट हाऊसेस, गॅलरीज, प्रिमियम ऑक्शन हाऊसेस मधे जागतिक स्तरावर या पोस्टर्सची खरेदी-विक्री व्यवहार घडून येतात. ऑक्शन हाऊसेसमधून जुन्या पोस्टर्सना लाखांपर्यंतची बोली लागली जाऊ लागली.  

पोस्टर पेंटींग्जचे गारुड लोकांच्या मनावरुन अजिबात उतरले नाही.  पोस्टर संग्राहक मोठ्या कष्टाने जुनी पोस्टर्स मिळवण्याकरता स्टुडिओगोडाउन्सजुने बाजार पालथे घालतातत्यांची प्रदर्शने भरवतातदुर्मिळ, नव्या-जुन्या, वैशिष्ट्यपूर्ण पोस्टर्सवर पुस्तके प्रसिद्ध करतात. पोस्टर आर्टला वाहिलेल्या असंख्य वेबसाईट्स असतात.
इंडियन हिप्पी या वेबसाईटवर हिंदी सिनेमा उद्योगाची खासियत असलेल्या हॅन्डमेड पोस्टर्स आणि बिलबोर्ड पेंटर्सना कायमस्वरुपी अत्यंत किफायती काम मिळण्याची व्यवस्था केली आहे. व्हिन्टेज पोस्टर्सच्या नव्या लिमिटेड एडिशन्सना जगभरातून कायम मागणी असते. वेडींग कार्ड्स पासून वॉल म्यूरल्स, होम आणि कमर्शियल डेकोरेशन्सकरता मोगले आझमपासून, दिलवाले दुल्हनिया, हम आपके है कौन, बॉबी इ. सिनेपोस्टर्सना सातत्याने असलेली मागणी या पोस्टर आर्टिस्ट्सकडून पुरी केली जाते. हवं असेल तर तुमचा फोटोही पोस्टर्समधल्या दिलीपकुमार नाहीतर मधुबालाच्या चेहर्‍याच्या जागी फोटोशॉपने पेस्ट केला जातो आणि पोस्टर छापले जाते.
-----------
खरं तर सिनेमाविषयक कलांनाअथवा तद्दन व्यावसायिक अंगाने विकसित झालेल्या कलांना अभिजाततेचा दर्जा फ़ारच क्वचित मिळू शकतोपोस्टर आर्टला हा दर्जा मिळू शकला कारण अगदी सुरुवातीपासून पोस्टर पेंटिंग करणारे कलाकार हे अभिजात चित्रकार होतेबाबुराव पेंटरांपासूनगोविंद कांबळीएस.एम.पंडीतएम.एफ़.हुसेन, बी.विश्वनाथांपर्यंत अनेक नामवंत चित्रकारांनी पोस्टर पेंटिंग कलेमधे आपापले जे योगदान दिले त्यामुळेच ही कला अभिजाततेच्या दर्जापर्यंत पोचू शकली
-------
हाताने रंगवलेली पोस्टर्स कालबाह्य झाली. त्याची जागा फोटो पेंटींग्जने घेतली. त्यानंतर डिजिटाइज्ड पोस्टर्सचा जमानाही आता येऊन स्थिरावला, जुना झाला. पाश्चात्य जगापेक्षा तो आपल्याकडे उशिराच आला, आता तर पोस्टरचेही महत्व सिनेमा प्रसिद्धीच्या संदर्भात कमी झाले. पण म्हणून पोस्टर आर्ट संपली नाही. उलट तिला आता अभिजात कलेच्या पंक्तीत स्थान मिळाले. नवनवीन व्यावसायिक परिमाणे या कलेला प्राप्त झाली. हॅन्डमेड पोस्टर आर्ट संपली म्हणून दु:ख करण्यात काहीच अर्थ नाही. जितकी गरज तितके आयुष्य हे तत्त्व या व्यावसायिक कलेला चपखल लागू पडलं इतकंच. हाताने घडवलेले दागिने, हातमागावरची खादी, रेशमाचे कपडे कितीही देखणं आणि हवसं वाटलं तरी ते कायम वापरणे परवडणारे नसते, सोयीचे तर नसतेच नसते. नॉस्टेल्जियाचे गोडवे गाण्यापुरतेच त्यांचे स्थान आपल्या दृष्टीने महत्वाचे.
आर्ट हिस्टोरियन्सच्या दृष्टीने मात्र पोस्टर आर्टला वेगळे महत्व आहे. मेकॅनिकल रिप्रॉडक्शन्स इन आर्टचा अभ्यास करताना त्यांना हिंदी सिनेमा पोस्टर्सच्या एका मोठ्या युगाला ओलांडून पुढे जाताच येणे शक्य नाही.
सिनेमांचा दृश्य रुपातला इतिहास पोस्टर आर्टच्या रुपाने जिवंत राहीलेला आहे.
==============================================================================
युनिक फिचर्सच्या 'अनुभव'-जुलै१२ मधे प्रकाशित.

शर्मिला फडके


No comments: