Wednesday, March 26, 2008

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः एक शोध

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते. त्यातला काळ खूप जुना म्हणजे निदान शंभर वर्षांपूर्वीचा तरी वाटत होता. पुस्तकातले काही काही अनुवादित शब्दही निटसे समजत नव्हते. पण तरी त्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. पुस्तकाची नायिका लॉरा माझ्याच त्यावेळच्या वयाच्या आसपासची होती म्हणूनही असेल कदाचित पण ती मला इतक्या वेगळ्या काळातली, वातावरणातली असूनही विलक्षण जवळची वाटली.
'वसंत फार..' मधून मला भेटलेली ती लॉरा साधी, सरळ, निष्पाप आणि आनंदी, खोडकर होती. पुस्तक संपता संपता ती प्रगल्भ, समजुतदार होत गेली. तिच्या स्वभावातला हा बदल तिच्या पुस्तकातल्या प्रवासादरम्यान घडत गेलेल्या घटनांशी सुसंगत असाच होता. लॉराची त्या पुस्तकातली दुनिया, अमेरिकेच्या इतक्या जुन्या काळातले त्यांचे तिथले राहणीमान, लॉरा, तिच्या बहिणी आणि त्यांचा कुत्रा तिच्या मा आणि पा सोबत एका बंद घोडागाडीमधून करतात तो प्रवास हे सारच माझ्या दृष्टीने खूप जितकं अनोळखी तितकच अद्भूत होतं. मात्र अंबादास अग्निहोत्रींनी अनुवादित केलेले हे पुस्तक कोणतेतरी मधलेच असल्याने लॉराचे याआधीचे आयुष्य आणि नंतर तिच्या आयुष्यात काय काय होते याबद्दल तेव्हा काहीच कळू शकले नाही. तिच्या दीर्घ प्रवासादरम्यानचा एक कोणतातरी मधलाच तुकडा माझ्या हाती लागलेला होता आणि बाकी कथानकाबद्दल मनात विलक्षण उत्सुकता दाटून राहिली. मिनेसोटा प्रांतातली ती गवताळ कुरणे, बर्फाची वादळे, तिथली लाकडी ओंडक्यांची घरे, साजरे केले जाणारे नाताळ आणि त्यावेळी माने घरी बनवलेली 'गुडदाणी', चर्चमधला पहाटेचा घंटानाद, टोळधाडीमुळे उध्वस्त झालेलं पांच गव्हाच शेत, लॉराच्या मैत्रिणी, स्वार्थी नेली, मदत करणारे ओल्सन, पायांना चिकटलेल्या जळवा, अलुबुखारच्या जाळ्यांमधून वाहणारे झरे, पांनी मध्यरात्री वाजवलेलं फिडल, लॉराच्या मेरी, कॅरी या बहिणी, त्यांची भांडणं, प्रेम हे सारच त्या पुस्तकातून माझ्या खूप ओळखीच झालं कारण मी अनेकदा, वारंवार ते पुस्तक वाचल होत. मी वाचलं आणि मग माझ्या त्यावेळच्या मित्र-मैत्रिणींनाही वाचायला दिलं. माझ्या आईला आणि बहिणीला सुद्धा पुस्तक विलक्षण आवडलं. म्हणायला किशोरवयीन मुलांसाठी असणार्‍या त्या पुस्तकाची अशी सर्वांना पडलेली मोहिनी चकित करुन जाते आजही विचार केला की.
त्यानंतर बरीच वर्षं ते पुस्तक माझ्या आसपासच होतं. पुस्तकाची प्रत आधीच जुनी होती. सतत वाचून, कुणाला न कुणाला वाचायला देऊन ती आणखीनच जीर्ण झाली. बाईंडिंग करुनही पाने एकत्र राहीनात. पुढे वर्ष उलटली. शाळकरी वय मागे पडले. दरम्यानच्या काळात 'लिटिल विमेन' अर्थातच 'चौघीजणी' मधली ज्यो जास्त जवळची झाली. 'लिटल हाऊस' कुठेतरी हरवूनच गेले. लॉरा कुठेतरी मागेच राहिल्यासारखी झाली. एकदा अचानक आठवण झाली तेव्हा बरीच शोधाशोध केली पण पुस्तक कुठेतरी निट जपून असे ठेवले होते तेच मिळेना. लॉरा हरवल्याची चुटपुट बरेच दिवस मनात राहिली. त्या इतक्या जुन्या अनुवादित पुस्तकाची प्रत कुठल्याच दुकानात तेव्हा उपलब्ध नव्हती. 'लॉरा' हा समान आवडीचा दुवा असलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे याच 'लिटल हाऊस'च्या अजून एका पुस्तकाचा 'एका तळ्याकाठी.. नावाने केलेला अनुवाद मात्र मधल्या काळात वाचायला मिळाला ही खूप खुशीची गोष्ट होती. पण बाकी लॉराची साथ सुटली ती सुटलीच.पुढे अनेक वर्षांनी रविन्द्र पिंगेंशी बोलताना मी या पुस्तकाची आठवण काढली. त्यांनी अंबादास अग्निहोत्रींच्या काही ओझरत्या आठवणी काढल्या पण या दोन पुस्तकाबद्दल बाकी काहीच त्यांनाही आठवत नव्हते. बर्‍याच वर्षांपूर्वी युसिसने अनेक अमेरिकन पुस्तके मराठी लेखकांकडून अनुवादित करुन घेतली होती त्यापैकी ही पुस्तके असावी असे त्यांनी सांगितले.
मग एक खूप मोठा काळ उलटून गेला. माझ्या स्वतःचा प्रवास शिक्षण पूर्ण केल्यावर मग नोकरी-लग्न-मुल हे टप्पे घेत घेत या काळादरम्यान सुरुच होता. आणि मग एकदा युसिसमधे कपाट धुंडाळताना अचानक समोर 'लॉरा' भेटली. अनुवादित नाही तर तिच्या मुळ इंग्रजी स्वरुपातच. आणि एक दोन नाही तर चक्क आठ पुस्तके. लॉरा इन्गाल्स वाईल्डर या अमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या 'लिटल हाऊस' पुस्तकाचे आठ सुबक आणि अत्यंत देखणे भाग कपाटात ओळीने लावून ठेवलेले होते. हिरव्यागार गवताळ कुरणावर, डोक्यावर उन्हाळी टोपी, अंगात झालरीचा लांब पोशाख, पायात कातडी बूट घातलेली कव्हरवरची लॉरा माझ्याकडे पाहून तिचं ते मिश्किल, खोडकर हसू हसत होती. तिच्या मागे लाकडी ओंडक्यांचे घर होते, बाजूला बंद वॅगन होती.
मी अधाशासारखे ते आठही भाग वाचून काढले. यावेळी जास्तच आवडले. लॉराची मूळ इंग्रजी भाषा अत्यंत सोपी, साधीसुधी आहे. शिवाय आता बरेचसे संदर्भ सुसंगत लागत होते. अग्निहोत्रींच्या अनुवादात लॉरा आणि मेरी गुडदाणी खात म्हणजे काय नक्की कळत नसे. आता गुडदाणी म्हणजे कॅन्डी समजल्यावर खूप गंमतही वाटली.
आता पुन्हा लॉराच्या आयुष्यात डोकावून पाहताना मला पुस्तकाच्या पलिकडच्या लॉरा इन्गाल्स वाईल्डरबद्दल अमाप कुतुहल वाटायला लागलं. लॉराची ही कहाणी तिची आत्मकहाणीच आहे हे माहित होतं. लॉराची, तिच्या कुटुंबियांची, ती रहात होती त्या ठिकाणांची, प्रदेशाची खरी ओळख व्हावी म्हणून मग मी नेट धुंडाळलं, अमेरिकन लायब्ररीमधे लॉरा इन्गाल्सवर इतरांनी लिहिलेली असंख्य पुस्तक होती. तिचं आख्ख वास्तव आयुष्य पुस्तकांमधे होतं त्यापेक्षा यत्किंचितही कमी रंजक नव्हतं.
विस्कॉनसिनच्या घनदाट जंगलांमधे लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या एका छोट्याशा घरात लॉरा एलिझाबेथ इन्गाल्स जन्माला आली ७ फेब्रुवारी १८६७ साली. त्यानंतर १९३० साली म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी तिने मॅन्सफिल्ड मिसुरीमधील शेतातल्या रॉकी रिज या घरात बसून लिटल हाऊस या नंतरच्या काळात 'क्लासिक' गणल्या गेलेल्या आठ पुस्तकांच्या मालिकेतले आपले पहिले पुस्तक 'लिटिल हाऊस इन दी बिग वुड्स' लिहिले तेव्हा आपण अमेरिकेच्या इतिहासातील 'पायोनियर पिरियड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मिडवेस्टर्न फ्रॉन्टियरचा १८७० ते १८८० दरम्यानचा सामाजिक आणि सांस्कृतिक कालखंडच शब्दबद्ध करुन ठेवत आहोत याची यत्किंचितही कल्पना तिला नव्हती. ती फक्त आपण ज्या प्रदेशात लहानाच्या मोठ्या झालो त्या विस्कॉन्सिन, मिनेसोटा, कॅन्सास आणि साऊथ डाकोटा येथील आठवणी आपली मुलगी रोझाच्या आग्रहावरुन लिहून काढत होती.
लॉराच्या वडिलांना- चार्ल्स फिलिपना साहसाचे, वेगळे काही करण्याचे विलक्षण आकर्षण. त्यांच्या अंगात सतत सळसळणारे पायोनियर स्पिरिट त्यांना पश्चिम दिशेकडे 'लॅन्ड ऑफ प्रॉमिस अ‍ॅन्ड होप ' कडे जायला आयुष्यभर खुणावत राहिले. लॉराच्या वयाच्या चौथ्या वर्षी इन्गाल्स कुटुंबाने म्हणजे पा चार्ल्स, मा कॅरोलिन, मोठी बहिण मेरी, धाकटी बहिण कॅरी आणि त्यांचा कुत्रा जॅक या सर्वांनी बंद घोडागाडीमधे बसून दूध व मधाचे प्रवाह जिथे वाहतात त्या पश्चिम दिशेकडे कूच केले. मिसुरी-कॅन्सास-विस्कॉनसिन-मिनेसोटा-आयोवा या प्रांतामधला तो प्रवास मग पुढे लॉराचे बालपण, किशोरवय संपून तिने तारुण्यात प्रवेश केल्यानंतरही सुरुच राहिला. याच प्रवासात डाकोटामधे तिला आल्मांझो वाईल्डर भेटला, ज्याच्याशी तिने प्रेमविवाह केला आणि तोही इन्गाल्स कुटुंबाचा एक भाग बनून गेला.
इन्गाल्स कुटुंबाने केलेले हे प्रवास सोपे नव्हते. ते खडतर, रोमांचकारी आणि असंख्य साहसांनी भरलेले होते. रेडइंडियन्सच्या प्रदेशातील त्यांचे मुक्काम, मिनेसोटात असताना सामोरे जावे लागलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी, बलाढ्य मिसिसिपी नदीचे ओलांडावे लागलेले पूर, घनघोर बर्फाची वादळे, संकटांवर त्यांनी एकत्रितपणे, जिद्दीने आणि चातुर्याने केलेली मात, प्रवासात भेटलेली माणसे आणि सर्वात मनोरम असे इन्गाल्स कुटुंबियांचे आपापसातील चिवट, जिव्हाळ्याचे बंध असे सारे एकत्र गुंफलेल्या लॉराच्या मनातील आठवणी गोष्टींच्या स्वरुपात एकतच लॉराची मुलगी रोझा मोठी झाली. आपल्या मनावर लोभस ठसा उमटवणार्‍या आईच्या या विलक्षण गोष्टी जगभरातील सर्वांनाच वाचायला मिळाव्यात म्हणून रोझा सतत लॉराच्या मागे लकडा लावून असे की त्या लिहून काढ. लॉराला सुरुवातीला लिहिण्याचा सराव नसल्याने कंटाळा यायचा तेव्हा तिने लेखनिकाची भुमिकाही बजावली. आणि मग १९३० ते १९४० या कालावधीत 'लिटल हाऊस सिरिज'ची आठ पुस्तके प्रकाशित झाली. अल्पावधीतच या पुस्तकांनी जगाला वेड लावलं. इन्गाल्स फॅमिलीसोबतच्या घनदाट जंगलांमधल्या, लांबलचक सोनेरी गवताळ कुरणांमधल्या, अजस्त्र मिसिसिपी नदीच्या पुरामधल्या. गोठलेल्या हिमनद्यांवरच्या त्या बंद वॅगनमधल्या प्रवासात हे वाचकही सहप्रवासी बनले. त्यांच्यासोबत तेही लॉगकेबिन्समधे राहिले. ४० देशांमधे वेगवेगळ्या २८ भाषांत ही पुस्तके वाचली गेली. या पुस्तकांवर अनेकांनी पुस्तके लिहिली. ती सुद्धा गाजली. इन्गाल्स आणि वाईल्डर कुटुंबे आता फक्त लॉराची राहिली नाहीत. तिच्या वाचकांनी, वाचकांच्या पुढल्या पिढ्यांनीही ती आपली मानली.
लॉराचे आणि तिच्या बहिणींच्या शालेय शिक्षणात या सततच्या प्रवासामुळे आणि कायमच असलेल्या आर्थिक विवंचनेमुळे खंड पडत होता. कुटुंबासोबतचा प्रवास पुढच्या प्रांतात गेल्यावर लॉराला आपल्या आधीच्या इयत्तेमधे पुन्हा एकदा बसून तोच अभ्यास करावा लागे. कधी कधी तर त्या प्रांतांमधे जवळपास शाळाही नसे. लॉराच्या आईने तिच्या वडिलांकडून वचन घेतले की मुलींचे शिक्षण पूर्ण करीन. लॉरा तेरा वर्षांची असताना पांना ते वचन पूर्ण करण्याची संधी मिळाली. लॉरा सोळा वर्षांची होईपर्यंत तिला सलग शालेय शिक्षण घेता आले. घरच्या आर्थिक जबाबदार्‍या उचलून वडिलांचा भार हलका करण्यासाठी लॉरा स्वतः शिकत असतानाच मुलांना शिकवायचेही काम करी. त्यासाठी तिला २० मैलांचा प्रवास करुन जावे लागे. तो तिचा प्रवासही मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पुढे आल्मांझोच्या लाभलेल्या कणखर हातभारामुळे इन्गाल्स कुटुंबाला थोडेफार आर्थिक स्थैर्य लाभू शकले.
अमेरिकेच्या पायोनियर पिरियडमधली जीवनपद्धती, राहणीमान, वृत्ती, तेव्हाची संकटे, आव्हाने सारेच लॉराच्या या साध्यासुध्या अत्मकथनामधून जिवंत झाले. चिरंतन जतन करुन ठेवले गेले. लोकांनीही पुस्तकाला अजरामर केले. लॉराला पुढे असंख्य मानसन्मान मिळाले. तिच्या पुस्तकांमधील ठिकाणांवर, व्यक्तिरेखांवर, त्या कालातल्या तिने वर्णन केलेल्या वस्तूंवर, इन्गाल्स कुटुंब जिथे जिथे राहिली त्या घरांवर कायमस्वरुपी म्युझियम्स उभारली गेली. लिटल हाउस पुस्तकांवर अनेक सिझन्स चाललेली, अत्यंत लोकप्रिय टिव्ही मालिका निघालेली आहे.
पुस्तकांमधे तिने वर्णन केलेल्या ठिकाणांचा, घरांचा वेध तिच्याच प्रवासाच्या मार्गाने घेतला जावा या वाचकांच्या इच्छेपोटी एक ट्रेक आखला जातो. जगभरातले असंख्य पर्यटक उन्हाळी सुट्ट्यांमधे हा ट्रेक करतात आणि लॉराच्या बालपणाच्या प्रवासात आपणही प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा आनंद लुटतात. 'द वाईल्डर ट्रेक' असे या रोमांचकारी प्रवासाचे नाव आहे. तो सुरु होतो पेपिन-विस्कॉन्सिन पासून (लॉराचे पहिले पुस्तक: लिटल हाउस इन द बिग वुड्स), मग तो इंडिपेन्डन्स, कॅन्सासच्या दिशेने (लिटल हाऊस ऑन द प्रेअरी) पुढे उत्तरेला मिनेसोटातील वॉलनट ग्रोव्हपर्यन्त जातो (ऑन द बॅन्क्स ऑफ प्लम क्रीकः लिटल हाऊसचे चौथे पुस्तक) तिथून मग पश्चिमेला द स्मेल्ट, द. डाकोटा प्रांतात पुढे जातो. लॉरा आणि आल्मांझो वाईल्डरच्या ओझार्क माउंटन्समधील घराकडे तिच्या चाहत्यांच्या भेटीचा ओघ तर सतत वाहता असतो. लॉरा इन्गाल्स वाईल्डर मेमोरियल सोसायटीही स्थापन झाली. 'आजपर्यन्तचे सर्वाधिक वाचले गेलेले पुस्तक' अशी मानाची नोंद तिच्या नावे अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने केली आहे. तिच्या सन्मानार्थ उत्कृष्ट साहित्यिक कारकीर्द असणार्‍या लेखिकेला पुरस्कार दिला जातो.

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः द फ्रॉन्टियर गर्ल-
किशोरवयीन वाड्मय म्हणून लिहिल्या गेलेल्या लॉराच्या वैयक्तिक आठवणींचा धांडोळा घेणार्‍या या 'लिटल हाऊस' सीरिजमधील आठही पुस्तकांचे ऐतिहासिक महत्व विल्यम अ‍ॅन्डरसनसारख्या इतिहासकाराच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. खरं तर ते सर्वात आधी लक्षात आले ते त्याच्याच. बिल अ‍ॅन्डरसनची इतिहासकार म्हणून कारकीर्द सुरुच झाली मुळात त्याला लॉराच्या या पुस्तकांच्या बालपणापासून वाटणार्‍या अनिवार आकर्षणामुळे. प्राथमिक शाळेत तिसरीत असताना त्याच्या शिक्षकाने 'लिटल हाऊस ऑन द प्रेअरी' पुस्तकातला काही भाग वर्गात वाचून दाखवला. त्याच्या मोहात तो इतका पडला की त्याने झपाटल्यासारखे सर्व भाग वाचून काढले. त्याला जेव्हा कळलं की ही कुठली ऐतिहासिक कादंबरी नाही, तर लॉरा इन्गाल्सने खरेखुरे जगलेले आयुष्य आहे तेव्हापासून त्याच्या मनात कायम एकच प्रश्न घोळत राहिल,' पुढे काय झाले असेल?'
बिल अ‍ॅन्डरसनचे आई वडिल मग त्याला उन्हाळी सुट्ट्यांमधे लिटल हाऊसमधल्या लॉराच्या कुटुंबांच्या मुक्कामांच्या ठिकाणी घेऊन गेले. त्याने उत्सुकतेपोटी लॉराच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, परिचितांना अनेक भेटी दिल्या आणि त्यातूनच पुढे त्याने अमेरिकन इतिहासाच्या त्या पायोनियर पिरियडचे डॉक्युमेन्टेशन करणारी अनेक इतिहासाची पुस्तके लिहिली. बिल अ‍ॅन्डरसन आज लॉरा इन्गाल्स वाईल्डर होम असोसिएशनच्या संचालक पदावर मोठ्या अभिमानाने विराजमान आहे.
पुस्तकांच्या सहाय्याने इतिहासाचा मागोवा कसा घेता येतो हे बिल अ‍ॅन्डरसने दाखवून दिले आणि वैयक्तिक आठवणींच्या नोंदी ही इतिहासाकडे घेऊन जाणारी पावले ठरु शकतात, हे दाखवण्याचे श्रेय लॉराचे.आठ पुस्तकांमधे वाचकांच्या समोर ठेवलेले आपले सततच्या प्रवासातील आयुष्य जगून झाल्यावर लॉरा आणि आल्मांझो त्यांच्या आयुष्यातील संध्याकाळी विसावले ते मॅन्सफिल्ड मिसोरी येथील रॉकी रिज फार्महाऊसमधे. आल्मांझोने ते आपल्या हाताने लॉरासाठी बांधले. इथेच बसून लॉराने आपली पुस्तके लिहिली. तिच्या पुस्तकांमधे उल्लेख नसलेले हे एकमेव घर. तरीही लॉराच्या चाहत्यांची रीघ सतत वर्षभर या घराकडे असते. लॉराच्या मृत्यूसमयी होते तसेच ते अजूनही आहे.
लॉराची कहाणी वाचत असताना, इतक्या वर्षांनंतर लॉराला खर्‍या अर्थाने जाणून घेत असताना आता मनाला भिडली ती लॉराची आणि तिच्या सार्‍याच कुटुंबियांची चिवट, आनंदी, जीवनाला सामोरी जाणारी आवेगी, विजिगीषु वृत्ती, जी तिने शेवटपर्यंत जपली. आपल्या प्रवासातल्या स्थळांचा उल्लेख लॉराने नंतर' The Land Of Used-to-be' असा केला होता. गतकाळातली ठिकाणे! वर्षे लोटली. शतक संपले, पिढ्या बदलल्या, पण प्रत्येक पिढीच्या शैशवातल्या, कुमार वयातल्या भावभावना त्याच राहिल्या. लॉरा त्या सर्वांसाठी कायमच A girl not only someone we like but someone who is like us अशीच राहणार.
१० फेब्रुवारी १९५८ साली वयाची ९० वर्षे पूर्ण झाल्यावर ओझार्क्स मिसुरी येथून लॉरा अंतिम प्रवासासाठी निघून गेली. त्याला २०१०च्या फेब्रुवारी महिन्यात ५२ वर्षे झाली.लॉराचा हा एकमेव प्रवास, जो तिच्या कोणत्याच वाचकाचे मन रिझवू शकला नाही.