Monday, October 29, 2012

द रेड स्टुडिओ..


मातिझची पेंटींग्ज म्हणजे रंग. दाट, शुद्ध, गडद रंग. त्याच्या पेंटींग्जमधले रंग आनंदाने नृत्य करतात, परस्परांशी गप्पा मारतात किंवा नुसतेच खोलीभर सैलावून पसरतात आणि उघड्या खिडक्यांबाहेर डोकावतात. इतका दाटपणा असूनही हे एकमेकांशेजारी मांडलेले रंग कोलाहल माजवत  नाहीत, त्यांचा गजबजाट नसतो. हे रंग छान संवाद साधत असतात परस्परांशी. पुरेसा अवकाश एकमेकांना देत-घेत. या रंगांमधूनच बाहेरच्या अवकाशात कधी अचानक काही खिडक्या उघडतात. त्यांनाही स्वत:चे रंग असतात. कधी निळे, कधी लाल, हिरवे. मातिझचा लाल म्हणजे लालभडक, हिरवा म्हणजे हिरवागार, निळा गर्द निळा. त्यात काहीही भेसळ नाही, मिसळण नाही. रंगांचा सर्वोच्च दाटपणा, विशुद्धता म्हणजे मातिझचे रंग. मातिझचं जग, त्याचे रंग, त्याच्या आकृत्या यांवर त्याचा स्वत:चा ठसा अत्यंत ठळक. रंगाची कॅनव्हासवर शिल्प बनवतो तो.
मातिझला पॅटर्न्स आवडायचे, पॅटर्नच्या आत अजून एक पॅटर्न, त्याच्या स्वत:च्या रचनेतले सुबक, डेकोरेटीव्ह पॅटर्न्स आणि टॅपेस्ट्रीवरचे डिझाईन, कशिदाकाम, भरतकाम, रेशमावरचे नक्षीकाम, उभेआडवे पट्टे, कुय-या, बुंदके, ठिपके, खडी, अतोनात सजवलेल्या दालनांमधला झगमगीत पसारा, पेंटींगच्या आत रचायला त्याला आवडे. स्पेनमधे असताना मातिझ इस्लामिक आर्टच्या प्रेमात पडला. इस्लामिक पॅटर्नमधे एका भरगच्च जगाचा आभास होतो, सर्व गोष्टी डोळ्यासमोर दाटीवाटीने गर्दी करुन उभ्या रहातात. विशुद्ध रंगाच्या भाषेत तो हे पॅटर्न्स पुन्हा रचण्याचा प्रयत्न करायचा. त्यातून जन्मला त्याचा रेड स्टुडिओ (१९११).
मातिझच्या रेड स्टुडिओमधला इन्टेन्स, झळाळता लाल रंग आपल्याला विलक्षण आकर्षुन घेतो. जणू तो तुम्हाला आपल्या पेंटींगमधे बोलवायचा प्रयत्न करतो. तुम्ही त्यात बुडी मारावी असं त्याला वाटतं. आणि एखाद्या पारदर्शक काचेतून जावे तसे आपण त्यात अचानक डुबकी मारतोही.
स्टुडिओत इतरही अनेक वस्तू आहेत. त्याचा इझल, क्रेयॉन्सचा खोका. अगदी आपल्या हाताखाली. किंवा तो त्याच्या हाताखाली आहे. हे लाल रंगातलं, सपाट, प्रवाही जग, हा लालही आपल्या नेहमिच्या अनुभवातला नाही, तो संपूर्ण खोलीमधे पसरलेला आहे, एका काल्पनिक जगाचा उच्चार ठळकपणे त्यातून होतो आहे. स्टुडिओतल्या इतर वस्तू हळू हळू लाल रंगात वितळून जातात, आपल्या कडा त्या स्वत:हून विरघळवून टाकतात त्या दाट लाल डोहात. उरतो फक्त लाल.
असं वाटतं आपण मातिझच्या स्टुडिओतल्या दाट, लाल रंगाच्या प्रवाहात आपली पावलं बुडवून चालत आहोत.
यात काही मोकळ्या खिडक्यांसारखे आकार आहेत, पण तेही सपाट पृष्ठभागच आहेत. फ़र्निचर, ड्रेसर, घड्याळ, शिल्प, मातिझचा त्यावर स्पष्ट छाप आहे. खरा वाटावा असा जिवंतपणा फक्त कुंडीतल्या शिस्तीत वाढणा-या झाडात आहे. ते आपल्या बाजूच्या वेताच्या खूर्चीचा आणि नग्न देहाच्या वळणाच्या लयीत वाढले आहे. रेड स्टुडिओची काव्यमय चित्रभाषा पेंटींग स्वत:चेच संदर्भ घेऊन कसे पुर्ण होत जाते याचे उत्कृष्ट उदाहरण.

मातिझला सर्वोत्कृष्ट कलरिस्ट का मानतात हे ज्याला कळून घ्यायचय त्याने त्याचं लाल, निळ्या, हिरव्या अशा फ़क्त तीन बेसिक रंगांमधलं डान्स हे पेंटींग पहावं. विलक्षण उत्कट लयीतलं हे चित्रं चकित करतं. केवळ रंगांच्या वापराने चित्राचा मुळ भाव किती आमुलाग्र बदलून जाऊ शकतो याचे हे अतिशय प्रभावी उदाहरण.
डान्सच्या दोन आवृत्त्या आहेत. पहिलं निळ्या मानवी आकृत्यांचं, तरल, फ़िकट. आपण स्वप्नात बघतो आहोत का हे नृत्याचं दृश्य असंही वाटून जातं. आनंद, उत्साह हा फ़ॉव्ह पेंटींग्जचा मूळभाव त्यात आहेच. या मानवी आकृत्या अगदी अलगद एकमेकांसोबत जोडलेल्या आहेत. जणू कधीही, कोणीही हात सोडून जाऊ शकतं. हे नृत्य स्वत:करता आहे फ़क्त. त्यात एकमेकांना सहभागी करुन घेतलय पण त्यांच्या अस्तित्त्वाच्या अपेक्षा, ओझी नाहीयेत.
मात्र दुस-या अंतिम आवृत्तीतला आवेग तितकाच भयचकीत करुन सोडणारा. ठाशीव. लालभडक आकृत्यांचा त्यातला आदीम नृत्याविष्कार आपली नजर खिळवून ठेवतो. त्यातल्या रेषांची लय आकर्षक आहे आणि तितकीच दमदार आहे. गडद निळं आकाश प्रवाही होऊन या लाल आकृत्यांवर कोसळत असतं. पायाखालच्या हिरव्यागर्द भूप्रदेशावर पावलं रोवून या आकृत्या आपले उन्मत्त, मनसोक्त नृत्य भान हरपून करत आहेत. आदीम, पौराणिक नृत्य. काहीतरी धार्मिक संस्कारातून त्यांच्या रक्तात रुजलेलं. यात फ़क्त स्वैर आनंद नाही. काहीतरी रुढीबद्ध श्रद्धाही आहे. सगळ्या आकृत्या ठाशिव, एकाच आकाराच्या. प्राचीन वाद्यांचा, घुमणा-या ढोलाच्या नादांची स्पंदनही जाणवतात.
शारिरीक अत्यानंदाचे इतके प्रत्ययकारी चित्रण विसाव्या शतकातल्या कोणत्याच पेंटींगमधून होत नाही. कोलियरच्या समुद्र किना-यावरच्या स्थानिक मच्छीमारांचे नृत्य मातिझच्या मनावर ठसा उमटवून होते. डान्समधले नृत्य उत्कट आहे. ठेका, नृत्यात वाकणारी लवचिक शरीरे, आपल्याला मागे मागे खेचून नेतात, भूमध्य समुद्राच्याही पलीकडे, प्राचीन गुहांमधे. या नृत्यातला वेग, लय आदीम, मुलभूत आहे. आजही जवळपास एका शतकानंतर पहाताना या प्रचंड मोठ्या पेंटींग्जचा प्रिमिटिव्ह लूक अस्वस्थ करुन सोडतो.

मातिझच्या ओपन विंडो द्वारे मॉडर्न आर्टची कवाडे उघडली. लहानसं पण आशयाने ठासून भरलेलं हे चित्र फ़ॉव्ह शैलीमधलं अगदी सुरुवातीच्या काळात (१९०४) चितारलेलं. मातिझ फ़ॉव्हिझम या अगदी कमी काळ प्रचलीत असलेल्या चित्रशैलीचा जन्मदाता. त्याचे बाकीचे फ़ॉव्हिस्ट सहकारी होते- आन्द्रे डेरेन, व्लामिन्क आणि ब्राक.
प्रवाही रेखाटन, दाट, गडद रंगांचं पॅलेट, जाड ब्रशस्ट्रोक्स, आकारांचा विलय हे फ़ॉव्हिझमचं वैशिष्ट्य अर्थातच मातिझच्या स्वत:च्या वैशिष्ट्यातून विकसित झालं होतं. त्याच्या पेंटींग्जमधे उत्स्फ़ुर्तता होती मात्र त्यातूनही त्याची तंत्राची अचूकता, पोस्ट आणि निओ इम्प्रेशनिझमचा अचूक मेळ साधण्याचा प्रयत्न लपून रहात नाही.
’ओपन विन्डो’मधे मातिझने हुकूमत मिळवलेल्या या शैलीची रुजूवात झालेली दिसते. फ़्रान्सच्या भूमध्य किना-यावरील एका लहान गावात कोलियरमधे मातिझने हे चित्र काढले. जेव्हा हे पहिल्यांदा प्रदर्शित झालं तेव्हा लोकांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र, नकारात्मक होती. ’द फ़ॉव्ह्ज (रानटी श्वापदे), लुई व्हॉक्सेल्स या आर्ट क्रिटिकने आपल्या रिव्ह्यूमधे टीका करताना हे जहाल शब्द वापरले. आणि या चित्रकारांच्या शैलीला नाव मिळाले
कोल्यरला त्याचे रंग मुक्त झाले, पुढे सर्वपरिचित झालेल्या मातिझ मोटिफ़्सचे पहिले दर्शन याच खिडकीतून झाले.
मातिझ, पिकासो आणि मार्शल डुशाम्प- या तीन शिलेदारांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रांतिकारी, मॉडर्न आर्टच्या चित्रभाषेची मुळाक्षरं लिहिली. मात्र या तिघांमधला मातिझ एकटाच असा ज्याने परंपरागत फ़्रेन्च चित्रशैलीची आद्याक्षरे कायम आपल्या चित्रभाषेत जपून ठेवली. मातिझ ओल्ड मास्टर ऑफ़ मॉडर्न आर्ट होता.
भूतकाळाला फ़टकारुन टाकण्यानेच आधुनिक काळातील मोठमोठ्या शोधांचा, नव्या निर्मितीचा जन्म झाला हा समज मातिझने खोटा ठरवला. वैचारिकता, सातत्यपूर्ण विकास, प्रवाहीपणा, वैविध्यपूर्ण ऐतिहासिक संदर्भ यांचा त्याने सातत्याने आपल्या कामात वापर केला त्यामुळे. त्याची चित्रे परंपरेला घट्ट जोडलेली होती. पिकासोच्या कामातला अस्वस्थपणा, उपहास त्यात नव्हता.  
मातिझ ज्या काळात आपली कलाकारकिर्द घडवत होता, तो काळ राजकीयदृष्ट्या भयंकर उलथापालथ असलेला. पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा विस्फ़ोट, महायुद्धे, वांशिक विद्वेषातून घडून आलेली क्रूर हत्याकांडे.. असे सगळे उत्पात त्याने पचविले. मात्र त्याचा लवलेशही आपल्या चित्रांमधे त्याने उमटू दिला नाही. त्याच्या स्टुडिओतले जग बाह्य जगापासून अलग असलेले एक वेगळेच जग होते. आपले मानसिक संतुलन अबाधीत राखणारे. सतत साठ वर्षे तो त्या जगात आराम, आश्रय, समाधानाचा आभास निर्माण करणारी चित्रे रंगवत राहीला. विद्रोह, जो विसाव्या शतकातल्या अस्थिरतेचा आरसा असणा-या मॉडर्न आर्टमधून सातत्याने प्रतिबिंबित होत होता तो त्याच्या चित्रांमधे जराही नव्हता. त्याची चित्रे म्हणजे जणू आदर्श विश्रामस्थान जे लढाया, हल्ले, इतिहास नष्ट करणा-या जगापासून लांब कुठतरी बांधले होते. त्याच्या स्वत:च्या स्टुडिओप्रमाणे, किंवा बॉदलेअरच्या कवितेतल्या त्या जागेप्रमाणे, जिथे प्राचीन काळाची चमक वागवणारे फ़र्निचर बेडरुमची शोभा वाढवेल, सुगंधी, दैवी दरवळ असणारी फ़ुले बहुमोल फ़ुलदाण्यांमधे विसावतील, रंगवलेले देखणे छत, चमकदार आरसे, पौर्वात्य सौंदर्य.. आपल्या आत्म्याशी हे सारे मूक संवाद साधेल, हळूवारपणे. प्रत्येक गोष्ट देखणी, योग्य आकाराची, ऐश्वर्य, आनंद, समाधानाने ओतप्रोत भरलेली."
मातिझचे द ग्रेट इनडोअर्स म्हणजे त्याचा स्टुडिओ. दमलेला उद्योगपती आरामखूर्चीवर विसावताना सुखावतो तसा परिणाम माझ्या चित्रांमधून मिळायला हवा असं तो एकदा म्हणाला. १९६० मधे कला जगाला बदलवून टाकण्याची ताकद आहे असा विचार सर्वत्र प्रबळ असताना हा विचार फ़ारच मर्यादित वाटू शकतो. पण मातिझला आपल्या रसिकांच्या अपेक्षांबद्दल काही गैरसमज नव्हते. सुशिक्षित धनाढ्य हेच कलेचे आश्रयदाते असणार हे त्याला माहीत होतं आणि इतिहासाने त्याचा समज खरा ठरवला.