Showing posts with label प्रवास. Show all posts
Showing posts with label प्रवास. Show all posts

Sunday, February 02, 2014

ज्याचं त्याचं लिटफ़ेस्ट

जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.

गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?


लिटफ़ेस्ट मला नव्या नव्हत्या. अर्थात आजवर उपस्थित राहीलेल्या लिटफ़ेस्ट्स किस झाड की पत्ती वाटाव्या असा इथला प्रचंड पसारा. नोबेल, पुलित्झर, बुकर विनर, आंतरराष्ट्रीय साहित्यिक इथे आमंत्रण मिळावं म्हणून उत्सुक असतात. जगातली सर्वात मोठी विनामूल्य लिटरेचर फ़ेस्ट म्हणून लौकिक यांच्या खाती जमा आहे. पाऊण लाख लोकं यावर्षी भेट देतील असा अंदाज.
जयपूर लिटफ़ेस्टचं उद्घाटन सकाळीच अमर्त्य सेनांच्या भाषणाने झालं होतं. ते आणि नंतरचे जेवणाच्या वेळेपर्यंतचे कार्यक्रम सगळे मिस झालेले. आता दुपारच्या सत्रातले सगळे अटेंड करायचे हा विचार मनात. पण ते नेमके कुठे, कोणते ठरवताना गोंधळ उडत आहे.

हातातल्या भरगच्च प्रोग्रॅम शेड्यूल मधली दडपवून टाकणारी नावं, विषय वाचताना हे सगळं आपल्याला झेपणार आहे का, नेमकं कशाला आलो आहोत आपण इथे? वाटायला लागतं. आपण जागतिक साहित्य वाचनात खालच्या पायरीवरच अजून, काहीबाही लिहितो म्हणून रजिस्ट्रेशन टॅगवर नाव लेखिका लागले आहे इतकंच. पण प्रादेषिक भाषेला कोण विचारतय इथे? काही असेल आपल्याकरता मग इथे? असं काही ऐकण्याने जाणीवा अचानक समृद्ध वगैरे होतील, बौद्धिक पातळी उंचावेल अशा भ्रामक कल्पनाही सोबतीला नाहीत.
भारतीय लेखक माहीत आहेत, झुंपा लाहिरी, कॅथरिन बू, ग्लोरिया स्टाइन्मेनला ऐकायची, बघायची उत्सुकता आहे, पण बाकी?

इतक्यात बाजूच्या डेस्कवर कोणीतरी येतं. माझ्या अगदी शेजारी. सहा फ़ूट उंची, पांढरे-शुभ्र केस, भारतीय सावळा, हसरा, मृदू, देखणा चेहरा. मी उत्सुकतेनं गळ्यातल्या टॅगवर नजर टाकते. पार्थ मित्तर. पार्थ मित्तर? हे नाव कसं विसरले? ते वाचूनच रजिस्ट्रेशन केलं. प्रत्यक्ष पार्थ मित्तर त्यांच्या ’मच मलाइन्ड मॉन्स्टर’ पुस्तकाच्या नव्या आवृत्ती संदर्भात बोलणार, ते पुस्तकाचे वाचन करताना आपण ऐकणार ही कल्पनाच माझ्याकरता थ्रिलिंग. मी पार्थ मित्तर भाग घेणार असलेल्या एकंदर तीन कार्यक्रमांवर टीकमार्क करते. ती करतानाच मग ऍन्ड्रू ग्रॅहम डिक्सन नाव दिसते. कारव्हॅजियो वर पुस्तक लिहिणारा. मी त्याही नावावर खूण करते. अचानक बरीचशी ओळखीची नावं दिसायला लागतात. निकोलस शेक्सपियर, राणा दासगुप्ता, अनिता नायर, कविता सिंग, आर्शिया सत्तारही माहीत आहेत. विल्यम डॅलरेम्पल, मायकेल सान्डल, समान्था विनबर्गही माहीत आहेत. मी खूणा करत जाते. काहीतरी मिळेलच माझ्याकरता.

आज लिटफ़ेस्टवर लिहिताना मनात पुन्हा गोंधळ. इतकं मिळालं आहे, अनुभवलं आहे ते फ़क्त काही थोडक्या शब्दांमधे कसं बसवायचं?



दिवस दुसरा, संध्याकाळचे पाच-

डिग्गी पॅलेसच्या चार-बागेमधे ’स्टोरी टेलिंग अराउंड द ग्लोब’ चर्चासत्र चालू आहे.
कला इतिहासतज्ञ, सौंदर्यशास्त्राच्या आणि बंगाली आणि राजस्थानी लोककथांच्या अभ्यासक जे.एन.यूच्या कविता सिंग मिनिएचर पेंटींग्जचं पारंपरिक कथनशैलीतलं स्थान समजावून देत आहेत. त्यांच्या सोबत इंग्लिश-चायनिज चित्रपट लेखिका शिओलू ग्वो, ज्यांनी लहान मुलांकरता वेगळ्या धर्तीची गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत, हार्वर्ड स्कॉलर किकू अदात्तो ज्या स्टोरीटेलिंगच्या पारंपारिक पद्धतींवर संशोधन करतात, आहेत. विल्यम डॅलेरिम्पल चर्चेचा मेळ राखत आहेत. स्क्रीनवर शाहनामा, पर्शियन, मुघल पेंटींग्ज. आपण ऐकण्यात गुंग.

गार, बोचरा वारा वहातो. अंगावर शिरशिरी येते. चारबागेतला हा खुला मंडप, गर्द झाडीने वेढलेला. बाजूला कमानदार भिंत, खास जयपूरी गर्द गुलाबी रंगाचा दगड. गारठा वाढतो आहे. उद्यापासून अशा उघड्या टेन्टमधले कार्यक्रम संध्याकाळी मिस करायचे. कुल्हडमधल्या वाफ़ाळत्या चहाची उब पुरत नाही. मंदावलेला प्रकाश जाणवतो. स्क्रीनवर झुकलेलं बाजूचं डेरेदार झाडही मिनिएचर पेंटींगमधनं उठून आल्यासारखं वाटायला लागतं. अचानक कुठूनतरी तीन देखण्या लांडोरी उडत येऊन बाजूच्या दगडी कमानीवर विसावतात, लगेच भरारी घेत नाहीशा होतात, आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. आणि मग एक मोर येऊन कमानीवर बसतो. आपला निळा, जांभळा वैभवशाली पिसारा एकदा उलगडतो, मिटतो. आपण अवाक. पहात आहोत ते सत्य की दृष्टीभ्रम ठरवता येत नाही. आपण आजूबाजूला बघतो, प्रेक्षकांमधले अनेक तिकडेच बघत आहेत हे कळल्यावर दिलासा मिळतो, पण मनातली त्या मोराची नवलाई ओसरतच नाही. नजर पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच वळत रहाते.
जयपूर लिटफ़ेस्ट शैलीतली ही एक खास आपल्याकरता असलेली कहाणी समोर उलगडते आहे असं वाटत रहातं.


दिवस- बहुधा तिसरा
फ़्रन्ट-लॉन

रेझा अस्लन- इराणियन-अमेरिकन स्कॉलर, धर्म या संकल्पनेचा अभ्यासक. त्याच्या “Zealot- The Life and Times of Jesus of Nazaretha” पुस्तकाने जगभर खळबळ माजवली. त्याला सातत्याने विचारले गेले, तू स्वत: मुस्लिम असताना ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा तुला काय अधिकार? तुझा काय हेतू?
“एका तटस्थ धर्म-अभ्यासकाने एका मोठ्या धर्माची स्थापना करणा-या जीझसचा शोध घेण्याचा, अनेक अर्थ उलगडवण्याचा हा फ़क्त एक प्रामाणिक प्रयत्न होता.” रेझा अस्लन हे पुस्तक लिहिण्यामागची त्याची भूमिका सांगतो आहे. बहुतेक पहिल्यांदाच. धर्माचा अर्थ प्रत्येकाकरता वेगळा असतो. ओसामा बिन लादेनसारख्या कट्टर धर्मनिष्ठाकरता इस्लामचा अर्थ वेगळा. आणि माझ्यासारख्याला ज्याला श्रद्धा म्हणजे काय याची व्याख्याही धड मांडता आलेली नाही, त्याच्याकरता इस्लाम वेगळा. चौदाशेहून जास्त वर्ष या धर्माचा नेमका अर्थ मदरशांच्या चार भिंतींआड बंदिस्त होता, आता प्रत्येकजण स्वत:चा, वैयक्तिक अर्थ शोधू पहातो आहे ही चांगली गोष्ट आहे. काहीजणांना ती भविष्याकडे घेऊन जाण्याची सुरुवात वाटते, काहींना ती भविष्याची अखेर होण्याची सुरुवात वाटते. धर्माचा अर्थ काही शांतता, सहिष्णूता, समानता लावू पहातात, काही भिती, दहशत, अन्याय. धर्म हे मला मुक्कामापर्यंत घेऊन जाण्याचं फ़क्त एक साधन आहे. तो मार्ग आहे, मुक्कामाचे ठिकाण नाही. मला आज विचारतात तू इस्लामशी एकनिष्ठ आहेस का? मी सांगतो त्या सर्वांना याच व्यासपीठावरुन- I don’t believe in Islam, I believe in God.

रेझा अस्लनचे शब्द मंत्रमुग्ध करुन टाकतात. रेझाचं अजून एक सत्र ऐकलं आहे नुकतंच. Leaving Iran. इराण सोडून दुस-या देशात रहाताना काय अनुभव येतात? त्यात त्याच्यासोबत द एक्झाइल्डची लेखिका फ़रोबा हात्रुदी, जी फ़्रान्समधे स्थलांतरीत होती. त्यांना विचारलं, कुठे रहाणं सोपं आहे? अमेरिकेत की फ़्रान्समधे? रेझा अस्लन उत्तर देतो- इराणियन असताना जगात कुठेही रहाणं सोपं नाही.

मी बुकस्टॉलवर. राणा दासगुप्ताचं द कॅपिटल घ्यावं की रेझा अस्लनचं झेलट घ्यावं विचार ठरत नसतो. पुस्तकांची ओझी किती वहाणार? दोन्ही जाडजुड. एकच घ्यावं. कोणतं?

“तू हे पुस्तक घेतलस तर मी इथेच सही करुन देईन.” शेजारुन आवाज येतो. रेझा अस्लन स्वत:.
मी त्याला विचारते, “तुझं एकही पुस्तकं मी अजून वाचलेलं नाही. पहिल्यांदाच वाचायचं तर कोणतं घेऊ?”
“अर्थातच हे लेटेस्ट, ज्याकरता मी इथे आलो. प्रोमोशन फ़र्स्ट, नाही का?”
पुस्तकावर रेझा अस्लन सही करतो. “तू लिहितेस का?” माझ्या गळ्यातल्या टॅगवर तो नजर टाकतो. होय. मी मान डोलावते. “मग अभिप्राय लिहून पाठव प्रकाशकांना.”
“पण मी मराठीमधे लिहिते.”
“हे तर फ़ारच छान. मला अजून कोणतंही मराठी भाषेतलं मेल आलं नाहीये. माझा पोर्टफ़ोलिओ सुधारेल.”
रेझा अस्लन जातो. मी अजूनही चकित. इतका साधेपणा, प्रामाणिकपणा.. आणि आपण इतक्या सहज भेटतो आहोत जागतिक साहित्यिकाला, कोणतेही सुरक्षेचे कडे नाही, भोवती प्रशंसकांची गर्दी नाही. गेल्या वर्षी यायला हवं होतं. ओर्हान पामुकला असं भेटता आलं असतं तर?
मनाला अनेक आधीच्या चुकलेल्या लिटफ़ेस्ट्सची हुरहुर लागून रहाते. यापुढची एकही चुकवायची नाही.


बर्डन्स ऑफ़ आयडेन्टिटी- वीमेन रायटर्स

नमिता गोखले सांगते मी जन्माने कुमाउं, पहाडी. लग्न करुन मराठी प्रागतिक, ब्राह्मण कुटुंबात आले. नाव बदलणं गृहित धरलं. मग मी लिहायला लागले. पहाडी पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा. अनेक भुवया उंचावल्या गेल्या. तू पहाडी लोकांच्या धैर्याच्या, कष्टांच्या कहाण्या लिहायला हव्यास. तू स्त्रियांच्या वेदनांवर, असामान्य जीवनावर लिहायला हवंस. तू स्त्री आहेस, स्त्रीची वेदना तू नाही मांडणार तर कोण? अशा जुनाट प्रेमकथा लिहिणं हा वेळेचा अपव्यय. ब-याच तेच करतात, पण तूही?

तमिळ-मुस्लिम कवयित्री सलमा म्हणाली, मुळात मी काही लिहिणंच अपेक्षित नाही, त्यातून कविता म्हणजे तर धर्माला बट्टा. त्यात स्त्री-पुरुष प्रेमाची, शारिरीक वर्णनं म्हणजे तर जगणंही मुश्किल. मग मी टोपण नाव घेतलं.
नव-याच्या शेजारी झोपताना, तो झोपला की मला कविता सुचते. मग मी बाथरुममधे जाउन एका कागदावर त्या खरडून टाकीच्या वर लपवून ठेवते.

इस्त्राएली लेखिका झरुर शालेम. हिच्या घरी सगळेच थोर लेखक. आईवडिल, भाऊ, चुलत भाऊ, नवरा, सासू-सासरे. सगळे धर्म-राजकारणावर अभ्यासपूर्ण लिहिणारे. मी लिहायला लागले मानवी भावनांच्या कादंब-या. हळव्या, वैयक्तिक. कुणालाच ते आवडत नाही. पण मी बॉर्डर ऑफ़ नेशन पेक्षा बॉर्डर ऑफ़ इमोशन्स महत्वाच्या मानते. मला वॉर ऑफ़ सेक्शुआलिटी जास्त महत्वाची वाटते वॉर ऑफ़ नेशन पेक्षा. माझ्यावर एकदा राजकीय अत्याचार घडला. माझा देश माझं आयुष्य ताब्यात घेऊ पहात होता. मी ते होऊ दिलं. पण माझ्या लेखनावर त्यांना ताबा नाही मिळवू दिला. या दारुण राजकीय अनुभवावर मी निदान एक लेखिका म्हणून लिहायला हवं असं माझ्या मित्र-मैत्रिणींनाही वाटलं. मला त्यातून बाहेर पडायला सहा महिने लागले होते. त्यानंतर मी जे पहिलं वाक्य लिहिलं ते माझ्या सहा महिन्यांपूर्वी अर्धवट सोडलेल्या कादंबरीतलंच पुढचं वाक्य होतं. एक लेखिका म्हणून मी कोणत्याही दडपणाला बळी पडले नाही याबद्दल मला माझा अभिमान वाटतो.


सत्तर वर्षांची ग्लोरिया स्टाइन्मेन बोलत असताना खचाखच गर्दी. तिच्या वाक्या वाक्याला गर्दी उसळत होती. टाळ्यांचा कडकडाट, घोषणा. अजमेरच्या मेयो कॉलेजातून आलेल्या मुलींचा एक मोठा ग्रूप. त्यातली एक प्रश्न विचारते ग्लोरियाला- पन्नास वर्षं होऊन गेली स्त्री-वादी चळवळीला. अजूनही स्त्रिया घरगुती अत्याचारांमधूनही वाचलेल्या नाहीत. जगभरातून या तक्रारी येतच रहातात. स्त्री-वादी चळवळीचं हे अपयश नाही का?
ग्लोरिया शांतपणे उत्तर देते. एका अत्याचाराच्या घटनेचे परिणाम भरुन यायला चार पिढ्या जातात. मग हे तर हजारो वर्षांचे अत्याचार. नाही. पुढच्या निदान शंभर वर्षांमधे तरी जेन्डर इक्वालिटीची मी अपेक्षा करत नाही. पितृसत्ताक घरांमधून फ़क्त पितृसत्ताक पद्धतीतली मुलं आणि अन्यायाला बळी पडणा-या मुलीच जन्माला येत रहाणार. हे सत्य आहे.


एक आयरिश ग्रूप. पाच पुरुष, तीन स्त्रिया. त्यांचा रायटर्स ग्रूप आहे. दर वर्षी जयपूर लिटफ़ेस्टला येतात. हे त्यांचं पाचवं वर्षं. यावर्षी आम्हाला जोनाथन फ़्रान्झेनबद्दल उत्सुकता आहे. फ़िलिप हेन्शर आम्हाला लिहिण्यात मार्गदर्शन करतात. तेही यावर्षी इथे आहेत. अमर्त्य सेनचं भाषण आम्ही रेकॉर्ड करुन घेतलं इतकं ते आवडलं. आठही जण त्यांच्या नोट्सने भरलेल्या वह्या दाखवतात.
हिंदी कादंबरीकार ध्रूव शुक्ल भोपाळहून आले आहेत. ऑटोबायोग्राफ़िकल नॉव्हेल्स आणि ट्रॅव्हल रायटींगवरची चर्चासत्र ते अटेंड करतात फ़क्त. त्यांना गणेश देवींच्या प्रादेषिक भाषांच्या अस्तित्त्वाच्या संदर्भातल्या भाषणाची उत्सुकता आहे.

आयरा रॉबिन्सन पेंटर आणि म्युझिशियन. दर एक वर्षांनी तो इथे येतो. पूर्वी सगळे महाग खाण्याचे पदार्थ मिळायचे. पण आता वीस रुपयात उत्कृष्ट ब्रू कॉफ़ीही मिळते हे खूप छान झालं आहे. आयरा भारतीय खाद्यपदार्थ मात्र खात नाहीत. पोटाला झेपत नाहीत. आयराला एका चर्चासत्रातलं आर्टिस्ट सुबोध गुप्ताचं वाक्य- मला गेल्या पंचवीस वर्षांमधे एकाही कलामहाविद्यालयाने लेक्चरकरता बोलावलं नाही हे खूप खटकलं. मी स्वत: बनारसला एका लहान शाळेत पेंटींग शिकवायला जातो, विनामूल्य. त्या शाळेत, किंवा इतर कितीतरी लहान ठिकाणी अशा मोठ्या आर्टिस्ट्सना जायला वेळच कुठे असतो, ते स्वत: का नाही इन्स्टीट्यूशन उभारत केवळ सरकारला नावं ठेवण्यापेक्षा? आयरा विचारतो. सुबोध गुप्ताचं वाक्य माझं काम कला निर्मितीचं, मी आर्ट इन्स्टीट्यूशन मधे का लक्ष घालवू हे वाक्य मलाही खटकलेलं असल्याने मी आयराला दुजोरा देते.


गारठलेल्या या गुलाबी शहरात साहित्याचा हा महाकुंभमेळा ओसंडून वहात असतो.

सायन्स, गणित, अनुवाद, प्रादेषिक भाषा, लोकसाहित्य, स्थलांतरित, धर्म, कला, राजकारण, सिनेमा, इतिहास अनेक विषय. ऐकणारे कोणी नवोदित, कोणी प्रस्थापित, कोणी वाचक, कोणी लेखकराव, कोणी प्रकाशक, कोणी भाषाप्रेमी, काही स्त्री-वादी, विद्रोही, अनेक इतिहासप्रेमी. चित्रकार, संगीतप्रेमी, काही पत्रकार, काही पहिली कादंबरी लिहू पहाणारे, काही ब्लॉगर्स, काही नुसतेच ट्वीटर्स. पण प्रत्येकाला लिटफ़ेस्ट काहीतरी देतं आहे. लिटफ़ेस्टने अनेकांना आपल्यात सामावून घेतले. आधीच्याही लिटफ़ेस्टने अनेकांना हे मिळाले म्हणूनच ते पुढच्या वर्षीही येत राहीले.

साहित्यिक प्रस्थापित असो, सुप्रसिद्ध असो, जग गाजवणारे असोत.. ते इतके सौजन्यशील, हसरे, नम्र प्रतिसाद, उत्तरे देणारे, वाचकाला न विसरलेले, अभ्यासूपणे इतरांचंही ऐकणारे, रांगेत उभं रहाणारे, आपल्या टेबलावर बसून खाणारे, पुस्तकं विकत घेत फ़िरणारे असू शकतात हा अनुभव मला लिटफ़ेस्ट देत आहे. किती चांगले लेखक, किती वेगवेगळ्या विषयांवर लिहित आहेत, ते क्लिष्टतेचा जराही बडिवार न माजवता बोलू शकतात, या अनुभवासकट.

वाचकांच्या आवडी किती टोकाच्या असू शकतात. आपल्या शेजारचा ज्यावर खूणा करतो आहे त्यातलं एकही आपल्याशी कॉमन नाही, आणि फ़िक्शन, नॉन फ़िक्शन दोन्हीनाही तुडुंब प्रतिसाद मिळतो अजूनही हेही या लिटफ़ेस्टला कळले.


पुरेशी आसन व्यवस्था, खाण्या-पिण्याच्या सहज सोयी, स्वच्छ टॉयलेट्स, उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, वेळेची तत्परता, स्वयंसेवकांची योग्य कामगिरी हे सगळं सहजतेनं पार पडत आहे इथे. लिटफ़ेस्टचा अजून एक महत्वाचा अनुभव.  


पण मराठी साहित्यिक, बुद्धीमान लेखक इथे क्वचितच फ़िरकतात. आपल्याला काही मिळेल यातून असं त्यांना वाटत नाही.
त्यात काय? मार्केटींगचा जमाना आहे. स्वत:च्या बुक प्रमोशनकरता ही नावाजलेली मंडळी इथे येतात. बिग डिल. काही म्हणतात. असूदेत ना. बुक प्रोमोशन, मार्केटींग या आजच्या जगातल्या आवश्यक गोष्टी ही मंडळी किती सफ़ाईने, व्यावसायिकतेनं करतात, आपण लिहिलेल्यातलं, त्यातल्या त्यात कमी वेळेतही वाचकांच्या कानावर पडावं म्हणून धडपडतात. निदान ही कौशल्य शिकून घ्यायला, निरखायला तरी यावं की..


पार्थ मित्तरने किती सहज त्याचा खाजगी इमेल आयडी देऊन म्हटलं, कलेच्या प्रांतातलं मराठीत नेमकं काय काय लिहून येतं, कोणत्या विषयांवर ते वाचायला मला नक्की आवडेल. खूप मोठी मराठी नावं आहेत कलेच्या इतिहासात. मला आदर आहे मराठीबद्दल. जास्तीतजास्त लिंक्स मेल कर.

आधी कधीच माहीत नसलेले लेखक, आता त्यांच्या तीन-तीन चर्चासत्रांनंतर इतका माहितीचा, जवळचा होतो, मग तोही बाहेर लॉनवर वगैरे भेटतो तेव्हा ओळखीचं हसतो, मग तुम्ही लगेच त्याची जाडजाड पुस्तकं विकत घेऊन टाकता. एखादी आपली आवडती कादंबरी लिहिणारी लेखिका बोलताना अगदी आपल्यासारखाच विचार करते हे जाणवून देणारा एखादाच क्षण लिटफ़ेस्टमधे तुमच्या वाट्याला येतो आणि तुमचं सेल्फ़ एस्टीम हजार पटींने वाढतं.

जयपूर लिटफ़ेस्ट या अशा अनुभवांकरता प्रत्येकाला घडावा. लिटफ़ेस्टला तोवर जावं, जात रहावं जोवर आपल्याला अजूनही हे सगळं अनुभवता येतय याची खात्री वाटते.


आपण लेखक बनलो कारण आपल्याला लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला खूप आवडतं याची आठवण पुन्हा एकदा लिटफ़ेस्टने करुन दिली. नवे लेखविषय, कथाविषय डोक्यात घोळायला लागले, त्याकरता संशोधन करायला, अभ्यास करायला अमाप उत्साह अंगात भरला.
कोणीतरी भेटतच जे सांगतं आता लिटफ़ेस्टला पूर्वीसारखी मजा नाही. वैयक्तिक जिव्हाळा कमी झाला आहे. फ़क्त व्यावसायिकतेला जास्त महत्व दिलं जात आहे.


एक ब्रिटिश रायटर सांगत होती कोणत्यातरी सेशनला शेजारी बसली असताना- इथे खूप तरुण चेहरे दिसतात. त्यात मजा करायलाच आलेले जास्त असू शकतात, पण ते दिसतात हे मला महत्वाचं वाटतं. लिटफ़ेस्ट आपलाही चेहरा तरुण करुन टाकतं.


चटकन संपूनही गेलेलं, पण मनाला हुरहूर लावून जाणारं उत्कट प्रेमप्रकरण असावं तसं वाटलं लिटफ़ेस्ट. पाच दिवसांमधला प्रत्येक क्षण त्याच्याच विचारांनी व्यापलेला. आणि नंतरही खूप काही शिल्लक ठेवून गेलेला.

* लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ’संवाद’ पुरवणीमधे प्रकाशित झालेला आहे.

Tuesday, March 08, 2011

चायना पोस्ट-आठ (फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड)

दुपारी चार वाजता हांगझोला पोचलो तर ते शहर अंगावर दाट धुक्याचं पांघरुण घेऊन मस्त गुडूप झोपलं होतं.शांघायहून आम्ही येत होतो आणि तिथल्या चकचकाटामुळे अक्षरश:दमून गेलेल्या आमच्या डोळ्यांना हांगझोतला तो निळाईची झाक पसरलेला धुकाळ राखाडी,काहीसा मंदावलेला प्रकाश खूपच शांतवणारा वाटला.बघताक्षणीच कोणीही प्रेमात पडावं असं ते शहर.तसं बघायला गेलं तर प्रथमदर्शनी इतर कोणत्याही हनिमूनर्स पॅरेडाईज म्हणून ओळखल्या जाणार्‍या निसर्गरम्य हिलस्टेशनसारखंच दिसणारं.ताजी,थंडगार हवा,धुक्यात लपेटलेल्या संध्याकाळच्या वेळा आणि दाट झाडीतून वाट काढत आपल्याला कोणत्यातरी अनपेक्षित सौंदर्यस्थळी नेऊन पोचवणारे वळणदार,उंचसखल पातळीवरचे छोटे,छोटे रस्ते.सिमला,माऊंट अबू,नैनिताल किंवा अगदी आपलं महाबळेश्वरही झाकावं आणि हांगझोला काढावं.
लिनबोला मी तसं म्हणताच तो जरा दुखावला.हांगझो सारखं तळं दुसर्‍या कोणत्याच शहरात नाहीये हे त्याचं पालुपद होतं.लिनबो हांगझोचा प्रचंड अभिमानी.त्याचं हांगझोमधे वडिलोपार्जित घर आहे.त्याच्या पणजोबांची हांगझोच्या राजवाड्यात तलावातल्या नौकांची देखभाल करण्याची नोकरी होती.
लिनबोलाही असाच आत्ताच्या काळातला कोणतातरी जॉब हांगझोलाच राहून करायची खूप इच्छा होती पण वडलांनी त्याला जबरदस्तीने बेजिंगला इंजिनियरिंग कॉलेजात घातलं होतं.त्याचा आता प्लास्टिक मोल्डिंग मशिनरी बनवायचा मोठा व्यवसाय होंगियानमधे होता.तिथेच त्याचं कुटुंबही रहातं पण त्याचा सगळा जीव हांगझोत अडकलेला असतो.दर आठवड्याला तो आवर्जून हांगझोला परतायचा.
होंगियान फ़क्त पैसे मिळवून देतं पण सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला हांगझोलाच यायला हवं असं दरवेळी भेटला की लिनबो एकदातरी हे वाक्य म्हणायचा.त्याचा आम्हाला सारखा आग्रह चाललेला असायचा तिथे जाऊन या म्हणून.पण जवळच आहे तर कधीही जाता येईल असं म्हणत आम्ही आपले लांबलांब अंतरावरच्या चिनी शहरांनाच भेटी देण्यात मग्न होऊन गेलो होतो.
लिनबोची मधल्या काही दिवसात काही खबरबातही नव्हती पण शांघायमधे भरलेल्या वर्ल्ड एक्स्पोला आमच्याच रांगेत बाहुलीसारख्या नाजूक बायकोला आणि गुबगुबीत सशासारख्या दिसणार्‍या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन उभा असलेला लिनबो अचानक भेटला आणि मग त्याने शांघायहून थेट हांगझोला जायचा आमचा प्लॅन स्वत:हून पक्का करुनही टाकला.
होंगियानपासून हांगझोचा रस्ता जेमतेम पाच-सहा किलोमिटर अंतराचा पण त्या दोन शहरांच्या वातावरणात,संस्कृतीतला फ़रक कित्येक योजनांचा.होंगियान संपूर्णपणे औद्योगिक वातावरण असलेलं शहर आहे.लिनबोच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या सगळ्या गोष्टी फ़क्त फ़ंक्शनल असतात.नुसतं बसून तलावाचं पाणी तास न तास निरखत बसण्यातलं सुख तिथल्या काय इतर कोणत्याच शहरातल्या लोकांना कळणारं नाही असं तो पुन्हा पुन्हा सांगतो.
हांगझो सोडताना आम्हीही त्याची री ओढायला लागलो होतो.
शहराच्या सर्व अस्तित्वालाच वेढून असलेल्या हांगझोच्या तलावाला'तलाव'म्हणणं म्हणजे त्याच्या आकारमानाचा अपमान करण्यासारखच होतं.अक्षरश:किनार्‍या थांगही न लागणारा विशाल समुद्राचा एक पाचूसारखा तुकडा असा तो हिरवट-निळ्या पाण्याचा प्रचंड मोठा जलाशय होता.विलो,चेरी,र्‍होडोडेन्ड्रॉन्स आणि अजून एका नाजूक पांढर्‍या फ़ुलांचा चांदण्यांसारखा सडा पाण्यावर पाडणार्‍या एका अनामिक झाडांच्या महिरपीने,छोट्या,छोट्या कमानींच्या पुलांनी,राजवाड्याच्या देखण्या,भव्य,नक्षिदार कमानींनी तलावाचे मुळातले सौंदर्य कमालीचं खुलत होतं.पहाटे,दुपारी,उतरत्या संध्याकाळी आणि मिट्ट काळोख्या रात्रीही तलाव पहावा आणि त्या प्रत्येक प्रहराचं अंगभूत सौंदर्य अंगावर निथळवत राहिलेला तो अद्भूत तलाव पाहून त्याच्या मोहकतेनं विस्मयचकित व्हावं.नौकाविहार करावा किंवा नुसतच काठावर बसून तलावातलं चांदणं निरखावं.पूर्वेचं व्हेनिस म्हणून दिमाख दाखवणार्‍या जवळच्या सुजौ शहरातल्या कालव्यांचं एकत्रित सौंदर्यही या तलावापुढे उणंच.
एका रात्री उशिरा तलावावरुन परतत असताना आम्ही जेवायला उघडी रेस्टॉरन्ट्स शोधत होतो तेव्हा एका सायकलरिक्षावाल्याने इंदू इंदू म्हणत आम्हाला थेट आणून सोडलं हांगझोमधल्या एका इंडियन रेस्टॉरन्टमधे.शुक्रवारची ती संध्याकाळ होती आणि रेस्टॉरन्ट्च्या मधोमध एका स्क्रीनवर हिंदी सिनेमातल्या गाण्यांनी धुमाकूळ घातलेला होता.त्याच्या खालच्या मोकळ्या जागेमधे त्या सगळ्या लेटेस्ट आयटेम नंबर्सवर बरंच तरुण,प्रौढ पब्लिक जोरदार नाचत होतं.त्यात बरेच भारतीय होते,चिनी होते,पाकिस्तानी,बांगलादेशी,श्रीलंकन,तुर्की होते आणि काही वेस्टर्न चेहरेही होते.हांगझोचं हे रेस्टॉरन्ट वीकेन्ड्सना असंच भरुन ओसंडत असतं असं तिथला केरळी मॅनेजर सांगत होता.लग्नांमधे असतो तसा भला मोठा बुफ़े स्प्रेड मांडून ठेवला होता.चिनी (भारतीय पद्धतीचं),पंजाबी,साऊथैंडियन,कॉन्टिनेन्टल,इटालियन असा आपल्याकडच्या लग्नांमधे असतो तसा सगळा मेनू बुफेमधे दिसत होता.पदार्थ चवदार होते.सगळेजण बशा भरभरुन घेऊन जात होते.
इतकी सगळी पब्लिक टुरिस्ट आहे?मला कळेना.
एकतर बरेच जण त्या रेस्टॉरन्टच्या वातावरणाला,तिथल्या जेवणाला सरावलेले वाटत होते.
नाही नाही,फक्त टुरिस्ट नाहीत.लिनबो म्हणाला.
हांगझोच्या जवळपासची सगळी शहरं बहुतांशी औद्योगिक आहेत.शिवाय जवळच सुजौची सिल्क टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे.मोठं व्यापारी केन्द्र असल्याचा फायदा हांगझोला मिळतो.ही लोकं इथे सारखी येत जात असतात. बेजिंग,शांघायला बरेच भारतीय चेहरे दिसतात पण हांगझो सारख्या लहान शहरात इतके भारतीय एकत्र दिसू शकतील असं वाटलच नव्हतं.
मेनलॅन्ड चायनामधे भारतीयांची संख्या गेल्या दशकामधे नक्कीच वाढली आहे(अंदाजे ३०,०००)तरी युरोप,अमेरिका,मध्यपूर्वेला जाऊन रहाणारे जितके भारतीय असतात त्यापेक्षा ही संख्या कितीतरी कमी आहे.यापैकी काही विद्यार्थी,व्यापारव्यवसायातले आणि बरेचसे बहुराष्ट्रीय कंपन्या,बॅंकेमधील नोकर्‍याद्वारे इथे आलेले आहेत.चायनीज शाळांमधे किंवा बेजिंग युनिव्हर्सिटीमधे भारतीय शिक्षक,शिक्षिकांना खूप मान आणि मागणी असते.बेजिंग युनिव्हर्सिटीमधल्या हिंदी भाषा विभागातर्फ़े भारतीय इतिहास,संस्कृती बद्दल माहिती देणारे वर्गही चालवले जातात आणि त्या वर्गांना चिनी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.भारतात येऊन नोकर्‍यांची संधी घ्यायला अनेक चिनी तरुण तरुणी उत्सुक असतात आणि त्यामुळे या विभागाची लोकप्रियता खूप आहे.भारतीय फ़ॅशन्स,खाद्यपदार्थ यांची चीनमधली लोकप्रियता गेल्या काही वर्षांमधे सातत्याने वाढती आहे.
लिनबोचं हांगझोमधे जे जुनं घर होतं तिथे त्याच्या आईवडिलांना भेटायला आम्ही गेलो होतो.दोघांनाही इंग्रजी अजिबातच येत नसल्याने संभाषण लिनबो मार्फ़तच जे काही होईल ते.लिनबोच्या वडलांना घरी कंटाळा यायचा आणि मुलाच्या फ़ॅक्टरीमधे जाऊन काही काम करायची त्यांची इच्छा असायची पण लिनबोच्या मते वडिल जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांची मत वेगळी आहेत.लिनबोची आई जेव्हा माझ्या सुनेला संध्याकाळी घरी जेवण करायला वेळ नसतो आणि तिला तसं सांगितल्यावर ती तुमच्या मुलासारखीच मी सुद्धा आठ तास फॅक्टरीत जाते असं'उद्धट'उत्तर देते अशी तक्रार लिनबो मार्फत सांगत होती तेव्हा चिनी असोत किंवा भारतीय चुली सगळीकडे सारख्याच असं जाणवून मजा(!) वाटली.
चीनमधे पिढ्यांमधल्या अंतराचा हा प्रकार मात्र बराच आणि खूप तीव्रतेनं पहायला मिळाला.दोन पिढ्यांमधील विचारांची तफ़ावत चीनमधे प्रचंड आहे.चीनची विशीच्या आसपासची पिढी संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरला आपलीशी केलेली,इंग्रजी सफ़ाईने बोलू शकणारी.चीनच्या वन चाईल्ड पॉलिसीच्या कडक अंमलबजावणीच्या दरम्यान जन्माला आलेली ही एकुलती एक मुलं,ज्यांना लाडावलेले लिटल एम्परर्स म्हणून समाजशास्त्रज्ञांनी उपहासाने संबोधले.
साठीच्या पुढचे चीनी सध्याच्या झपाट्याने बदललेल्या चीनच्या संस्कृतीशी अजिबातच सांधा जुळवू न शकलेले.त्यांना इंग्रजी अजिबातच येत नाही आणि समजतही नाही.त्यांना नव्या पिढीचं के एफ़ सी,मॅकला सारखं भेटी देणं,कोक,बिअर पिणं,फ़ॅशन्स,बोलणं-चालणं काहीच आवडत नाही.चीनमधला वृद्ध वर्ग हा संपूर्णपणे तुटल्यासारखा बाजूला पडलेला वाटला.
चीनी मधल्या पिढीला म्हणजे साधारण पन्नाशीतल्या चिन्यांना आत्ताच्या तरुण पिढीमधील लिव्हईन रिलेशन्शिप्सचे आकर्षण,डीव्होर्सच्या झपाट्याने वाढत जाणार्‍या प्रमाणाबद्दल खूप चिंता वाटते पण त्यांनी या गोष्टी अपरिहार्य म्हणून स्विकारायचे ठरवल्यासारखी त्यांची वागणूक असते.या वयोगटाच्या चिन्यांनी खूप मेहनतीने आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमानही आहे.तरुण पिढीची भारतात काय परिस्थिती आहे याची उत्सुकता त्यांना वाटते.
सुजौच्या सिल्क फ़ॅक्टर्‍यांमधे फार सुरेख मशिनवर बनवलेले रेशमचे तागेच्या तागे आपल्या डोळ्यांपुढे उलगडत जाताना बघण्याचं दृष्य फार सुरेख दिसतं पण मला आवडलं ते बेजिंगच्या भेटीदरम्यान बघितलेलं रेशमाच्या किड्यांच्या पैदाशीपासून ते त्या किड्यांनी बनवलेल्या रेशमाच्या कोशाला चारी बाजूने हाताने ताणून मग त्यापासून रेशमाच्या रजया बनवण्याचं केन्द्र.ती पद्धत ग्रेटच होती. एका रजईसाठी दहा ते बारा रेशमाचे कोष ताणून ते एकमेकांवर ठेवतात आणि मग त्याची रजई बनवतात.अद्भूत एअरकंडिशन्ड अशी शुद्ध ऑरगॅनिक रजई असते ती.उन्हाळ्यात थंडगार आणि हिवाळ्यात उबदार.त्यावर सुंदर,चिनी पद्धतीचं भरतकाम केलेल्या रेशमांच्या खोळीही मिळतात.
सुजौला सिल्कचे स्टोल्स,शाली,स्कार्फ़,सिल्क कार्पेट्स खूप सुंदर आणि अती महागडे होते.पण सिल्क स्टोल्सच्य खरेदीचा मोह आवरण्याच्या भानगडीत मी अजिबातच पडले नाही.लिनबो बार्गेन करायला होताच त्यामुळे भरपूर खरेदी केली.भारतात परतल्यावर मैत्रिणींनी पहिला डल्ला मारला आणि माझी बॅग रिकामी करुन टाकली ती या स्टोल्सनीच.मऊ जेडच्या बारीक बारीक कपच्या घालून बनवलेली रजईसुद्धा इथे बघीतली.
चीनमधे अशा फ़ॅक्टर्‍यांमधून ज्यापद्धतीने डायरेक्ट मार्केटींग चालतं ते बघण्यासारखं असतं.तुमच्यासमोर संपूर्ण मॅन्युफ़ॅक्चरिंग प्रोसेस दाखवून एखादी वस्तू बनवली की साहजिकच त्या वस्तूंच्या ऑथेन्टिसिटीसाठी वेगळ्या सर्टीफिकेशनची गरजच लागत नाही.लोक मग अशा वस्तू वाटेल त्या चढ्या भावानेही घेतात. बरेचदा गरज नसतानाही घेतात.मग ती पारंपरिक चिनी औषधं असोत,सौंदर्यप्रसाधनं असोत,सिल्कच्या रजया असोत,जेडच्या महागड्या वस्तू असोत नाहीतर मोत्यांचे दागिने असोत.पर्ल फ़ॅक्टरीमधे तुम्हाला टॅन्कमधून कोणताही शिंपला उचलायला सांगतात.मग तो तुम्हीच फोडायचा आणि त्यात मोती मिळाला तर तो तुमचा.मात्र तो अंगठीत किंवा पेन्डन्टमधे सेट तिथेच करवून घ्यायचा.शिंपल्यामधे कधी कधी अनोख्या गुलाबी नाहीतर राखाडी काळ्या छटेतलेही जे मोती मिळतात ते दिसतात मात्र अत्यंत विलोभनीय.अंगठीत सेट करुन घ्यायचा मोह नाहीच आवरत.तुमच्या शिंपल्यात मोती नाही मिळाल तरी नाराज व्हायचं कारण नसतं.तिथे तयार दागिने किंवा मोतीही मिळतात.शिवाय त्या मोत्यांचं चूर्ण घातलेली तुमच्या त्वचेचं तारुण्य टिकवणारी,खुलवणारी क्रीम्सही मिळतात.
सौंदर्य,ऐषोआराम,आरोग्य,प्राचीनता,फ़ॅशन्स,आधुनिकता..प्रत्येक गोष्टींच्या फॅक्टर्‍या चीनमधे आहेत.
चीनी फ़ॅक्टर्‍यांचा कारभार किंवा एकंदरीतच चीनमधल्या औद्योगिक विभागांचा पसारा बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो हे मात्र नक्की.या फॅक्टर्‍यांचा पसारा आणि उलाढाल इतकी प्रचंड असते.
सुजौ जवळच्या टेक्स्टाईल विभागात तिथल्या सेझमधे एकेका लहान विभागात१५दशलक्ष बटणं,२००मिल्यन मिटर्सच्या झिपर्स,३ बिलियन मोज्यांच्या जोड्या असे उत्पादनांचे आकडे तिथल्या बोर्डांवर वाचल्यावर हा काय अफ़ाट पसारा असू शकतो याचा अंदाज येतो.
होंगियानजवळच्या एका दुसर्‍या औद्योगिक शहरात वू लिनची लाईफ़स्टाईल प्रॉडक्ट्सची फ़ॅक्टरी आम्ही बघायला गेलो होतो.चहा-कॉफ़ीच्या कपांपासून,टोस्टर्स,कृत्रिम,शोभेची फ़ुलं,कीचेन्सपासून घरगुती सजावटीच्या वस्तू ज्या नंतर वॉलमार्ट किंवा इकेआमधे’मेड इन चायना’लेबलांना मिरवत विराजमान होतात त्याचं उत्पादन तिथे अजस्त्र प्रमाणात होत असताना बघितलं.शब्दांमधे ते वर्णनच करता येणार नाही.
आणि मग आम्ही यीवूच्या होलसेल मार्केटलाही भेट दिली.फ़ॉरबिडन पॅलेस किंवा शिआच्या टेराकोटा आर्मीला पाहून जितकं आश्चर्य वाटलं त्यापेक्षा हजारो पटींनी जास्त आश्चर्य यिवूला आल्यावर,तिथली ती अजस्त्र उलाढाल पाहून वाटलं.यीवू इंटरनॅशनल ट्रेड सिटी म्हणजे जगातलं सर्वात मोठं होलसेल मार्केट.२.६मिलियन स्क्वे.फ़ुटांइतक्या प्रचंड विस्तारावर पन्नास हजार स्टॉल्स आहेत आणि तिथे चार लाख विविध प्रकारच्या वस्तूंची उलाढाल होते.अक्षरश:कोणत्याही प्रकारच्या वस्तू आख्ख्या चीनमधे बनून इथे येतात आणि इथून मोठमोठ्या कंटेनर्समधे त्या भरुन जगभर विक्रीकरता रवाना होतात.आफ़्रिकन आर्टचे नमुने असोत की गणपतीच्या,कृष्णाच्या झळझळीत निळ्या रंगातल्या मुर्ती सगळ्या इथे दिसतात. मोठे मेगामॉल एकापुढे एक बांधल्यासारखं हे मार्केट आहे.त्यांचे वेगवेगळे विभाग.म्हणजे एक आख्ख मॉलच.उदाहरणार्थ हार्डवेअर टूल्स आणि फ़िटिंग्जचं एक मॉल,दुसरं पतंग,फ़ुगे,हॅन्गिन्ग टॉईज वगैरेचं,तिसरं घरगुती सजावटीच्या वस्तुंच,एक भलंमोठं मॉल तर फ़क्त ख्रिसमससाठी लागणार्‍या सजावटीच्या वस्तुंचं होतं आणि तिथे सगळीकडे सॅन्टाच सॅन्टा.जगातल्या७०% ख्रिसमसच्या वस्तू इथून जातात.
यीवूला भारतीय व्यापार्‍यांची खूप गर्दी होती.आम्हाला तिथल्या कॅफ़ेटेरियामधे भेटलेल्या महेन्द्रचा मुंबईला क्रॉफ़र्ड मार्केटमधे होलसेल वस्तू पुरवण्याचा व्यवसाय आहे.त्याचं स्वतःच एक दुकानही तिथे आहे.महेन्द्रच्या यीवूला वर्षातून चार खेपा होतात.प्रत्येकवेळी तो एक कंटेनर भरुन गार्मेन्ट ऍक्सेसरीज इथून घेऊन जातो.शोभेची बटणं,लेस,वगैरे.इथल्या वस्तू त्याला तीनपट जास्त भावाने(तेही होलसेलमधला भाव म्हणून.आपण वस्तू विकत घेतो तेव्हा दहापट अधिक किंमत मोजतो)क्रॉफ़र्ड मार्केटमधे विकता येतात.महेन्द्रच्या मते इथे वस्तू स्वस्त तर मिळतात पण हेच फक्त कारण नाही.इथे एकेका वस्तूंमधे प्रचंड व्हरायटी बघायला मिळू शकते हे मुख्य आकर्षण.बटणाच्या एका पॅटर्नचे दहा हजार वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात हे महेन्द्रचं बोलणं मला एरवी ऐकताना अतिशयोक्ती असलेलं वाटू शकलं असतं पण यीवू ट्रेडींग सेन्टरला भेट दिल्यावर नाही.लुशानचं इलेक्ट्रॉनिक मार्केटही असंच अजस्त्र विस्ताराचं आहे.
-----------------------------------------------------------
शेवटचे २ दिवस राहीले आणि आता वाटायला लागलं की अजून किती गोष्टी पाहून झाल्याच नाहीयेत.अजून किती ठिकाणी पुन्हा जाऊन यावसं वाटतय.
अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या खालीच असलेल्या युबिसी कॉफ़ी हाऊसमधे बसून गेल्या अडीच महिन्यांच्या चिनी दौर्‍याचा मनातल्या मनात आढावा घेताना खूप काही बघायचं राहून गेल्याही हुरहुर मनाला वाटतेय.
युबिसी कॉफ़ी हाऊसमधल्या हसर्‍या चीनी वेट्रेसेस माझ्या आता खूप ओळखीच्या झाल्या आहेत.
तिथे पिआनो वाजवणारी मुलगीही मी आले की आता लगेच भारतीय सुरावट छेडते.भारतीय सुरावट म्हणजे तिच्यामते करण जोहरच्या फिल्ममधली गाणी.पण मला चालतं.
मला नव्या नव्या व्हेज डिशेस सुचवायलाही तिथल्या मुलींना खूप आवडतं.तीळ लावलेले बनाना फ़्राय,व्हेज बार्बेक्यू स्टिक्स,फ़्रूट सॅन्डविच,व्हेज टोफ़ू स्टरफ़्राय आणि अप्रतिम चवीचा,अत्यंत देखणा दिसणारा काचेच्या मोठ्या किटलीतला फ़्रूट टी.त्यात मोसंबी,अननस,सफ़रचंद,किवी वगैरे फ़ळांचे तुकडे,मोगरा आणि इतर सुकवलेली फ़ुलं ठेवून वर लागेल तसं गरम पाणी ओतल्यावर तयार होणारं ते सुगंधी,केशरी रसायन चिमुकल्या देखण्या कपांतून थोडं थोडं पिताना स्वर्गीय चवीचा अनुभव येतो.
मी युबिसीमधे येऊन बसले आणि बाहेर पाऊस सुरु झाला.आपलं नाव स्टेला सांगणार्‍या गोड चिनी मुलीने एका मोठ्या बोलमधे गरम वाफ़ाळलेला पातळसर भात,त्यात मश्रूम्स,चायनीज कॅबेज,नूडल्स,ऍस्पेरेगस घालून समोर आणून ठेवला.बाजूला व्हेज सलाडची बशी.पिआनोवरच्या मुलीने उठून माझ्या शेजारी मासिकांचा गठ्ठा आणून ठेवला.मला त्या चिनी लिपीतल्या फ़ॅशन्स मॅगेझिन्सचा खरं तर काहीच उपयोग नाही पण मला तिचं मन मोडवत नाही.
मी काचेतून बाहेर पडणार्‍या पावसाकडे बघते.पावसांच्या सरींच्या पलीकडे समोरच्या फ़ुटपाथवरच्या दुकानांवरची मधूनच चमकून उठणारी लाल,सोनेरी देखणी चिनी अक्षरं मला नेहमीच बघायला आवडतात.त्यांचा अर्थ काय हे कळण्याची सुतराम शक्यता मला नाही.पण त्यांचं देखणं वळण मी पुन्हा पुन्हा पहात रहाते.ती पहाताना मला फ़ॉरबिडन सिटीमधली निळी,सोनेरी रंगसंगती आठवते आहे,बेजिंगच्या देखण्या प्राचीन हुटॉन्ग्ज आठवताहेत,तिथले गुलाबांचे वेल,मोगर्‍याच्या आणि क्रिसेन्थेममच्या कळ्यांचा तिथल्या सिहुयानमधे प्यायलेला चहा आणि त्या चहाचे चिमुकले निळे कप आठवताहेत,पोर्सेलिनची भांडी, देखणी नाजूक चिनी कटलरी आठवते आहे,टेराकोटाच्या सैनिकांच्या चेहर्‍यावरचे भाव आठवताहेत,श्यूच्या घरच्या पीचचा जाम आणि तिच्या आईच्या हातच्या भाज्या आठवत आहेत,बेजिंगचा फूटमसाज आठवतो आहे,बेजिंग वॉलवर जाताना रोपवेचा आलेला खतरनाक अनुभव आठवतो आहे,चहाचे अजस्त्र वृक्ष,गाठाळलेल्या खोडांचा स्पर्श आठवतो आहे,यॉंगनिंग पार्कातली रंगित,नाचरी फ़ुलपाखरं,हांगझोचं विलोंच्या जाळ्यांतून दिसणारं तलावाचं पाचूसारखं चमकतं पाणी,मुटियान व्हिलेजमधला सुकवलेल्या फ़ळांचा बाजार,दाट झाडांनी व्यापलेले रस्ते,शांघायच्या स्कायस्क्रॅपर्स,यीवूची बाजारपेठ,फ़ुजियानमधला कोसळता पाऊस,बेजिंगमधले चिनी उत्साही मित्र,तिथलं बुकमॉल..
बाहेरचा पाऊस थांबला.मला घरी जाऊन पॅकिंग आवरतं घ्यायलाच हवं आहे.युबिसी कॉफ़ी शॉपमधल्या त्या सर्व हसर्‍या चिनी मुलींचा आणि माझी राहीलेली छत्री परत करायला मागून धावत येणार्‍या प्रामाणिक चिनी मॅनेजरचा एक प्रातिनिधीक निरोप घेऊन मी बाहेर पडते.
जाताना मी त्यांना सांगते की येईन परत पुन्हा.अजून बरंच बघायचं राहीलय माझं.

Sunday, January 23, 2011

चायना पोस्ट-सहा


आपल्या नेहमीच्या परिचयातली झाडं नव्या प्रदेशात विशेषतःअनोळखी परदेशात उगवलेली पाहिली की सुरुवातीला त्यांची ओळखच पटत नाही.त्यांचं रुपरंग खूप अनोखं,अपरिचित वाटतं.पानांचे रंग वेगळे असतात,फुलांचे बहर कधी जास्त गडद कधी खूप फिके असतात,फांद्यांचा विस्तार आपल्या इथे असतो त्यापेक्षा जास्त भव्य तर कधी अगदी आखुडलेला असतो.हवामान,पाणी,माती,प्रदुषणाचं प्रमाण अशा घटकांमुळे वेगवेगळ्या दूरच्या प्रदेशांतली झाडं एकाच कुलातली असली तरी वेगळ्या संस्कारांची असल्यागत वाढतात.
सिक्किमला तळहाताएव्हढ्या सोनचाफ्याच्या फुलानी आमची अशीच दिशाभूल केली होती.आपल्याकडच्या चाफ्याच्या फुलाच्या पाकळ्याही स्पर्शाला नाजूक,मऊ असणार्‍या आणि त्या चाफ्याच्या पाकळ्या ऑर्किडच्या मोठ्या फुलासारख्या बाहेरच्या बाजूला वळलेल्या,जाड आणि स्पर्शाला लेदरी.बिजिंगच्या हुटॉन्ग्जच्या भिंतींवर सोडलेल्या चिनी गुलाबांच्या वेलीही आपल्याइथल्या बागेतल्या जमिनीवर पसरलेल्या चिनी गुलाबांपेक्षा दिसायला कितीतरी वेगळ्या.फुलंही आकाराने खूपच मोठी,जास्त दाट पाकळ्यांची आणि रंगांमधे लाल,गुलाबी पासून जांभळी,केशरी छटा वागवणारी.
होंगियानच्या आम्ही रहात होतो त्या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या सिक्युरिटी केबिनशेजारी एक जेमतेम फांद्यांचं बुटकं झाड होतं.त्याच्या फांद्या वरच्या दिशेने गोल वाढत गेलेल्या.त्या झाडाची काही ओळख असल्याचं चिन्हही नव्हतं.एक दिवस केबिनबाहेरच्या लाकडी बाकावर बसायला गेले तर तिथे नाजूक गुलाबी तंतुंचं आपल्याइथे सहज येता जाताही नजरेला पडणार्‍या रेनट्रीचं फुलं माझ्या आधीच जागा पकडून बसलेलं.मजाच वाटली.आपल्याइथे रस्त्यांच्या कडांना भव्य विस्ताराचे हे पर्जन्यवृक्ष किती वेगळे दिसतात आणि इथे हा असा एखाद्या अंग आक्रसून हात वर केलेल्या अवस्थेत कसा वेगळा दिसतोय!पण मग लक्षात आलं की रस्त्याच्या कडांवर जिथे बाईकर्सवे वेगळा करायचा असतो तिथल्या आसूपालवांची आणि जंगली बदामांची रांग सुद्धा अशीच हात वर करायची शिक्षा दिलेल्या मुलासांरखी रांग करुन उभी असतात.त्यातल्या काही नुकत्याच लावलेल्या झाडांना खालून बांबूचे टेकू दिलेले पाहीले तेव्हा या हात वर केलेल्या फांद्यांचं रहस्य उलगडलं..
रस्त्यावरच्या वाहतुकीला वेड्यावाकड्या वाढणार्‍या फांद्यांमुळे अडथळा येऊ नये म्हणून ही झाडांना लावलेली कम्युनिस्ट शिस्त.त्यांची उंचीही वरच्या केबल्सच्या खाली वावभर अंतरावर असताना शिस्तीत थबकलेली पाहून तर भलताच आदर वाटला.चिनी शहरांमधली दिसलेली ही झाडं बाकी फार काही आगळीवेगळी,मनावर छाप पाडून जाणारी वाटत नव्हती.
एखाद्या प्रदेशासंदर्भातली काही नाती मनात पक्की झालेली असतात.चीन आणि झाडं किंवा निसर्ग असलं काही नातं कधिही माझ्या मनात नव्हतं.आणि चीनमधे राहून बराच काळ उलटून गेल्यावरही तिथल्या निसर्गाचा किंवा झाडांचा काही वेगळा असा ठसा मनात उमटला नव्हता.
होंगियान काय किंवा बिजिंग,हांगझो काय इथे सगळीकडे झाडं,हिरवाई यांची खरं तर काहीच कमतरता नाही.बिजिंग तर आता पोस्ट ऑलिम्पिक काळात सौंदर्यपूर्ण बागा,फुलझाडांची बेटं,ताटवे,गर्द झाडांच्या शिस्तशीर रांगा यांनी बहरुन गेलं होतं.त्याची प्रसन्न,टवटवीत छाप मनावर उमटत होती.बिजिंगच्या हुटॉन्ग्जमधल्या वेली,लहानशा उंचीची पण फुलांनी डवरुन गेलेली झाडं मनाला मोहून टाकत होती.हांगझोच्या तलावाभोवतालची विलोंची जाळी,कोणत्यातरी अनामिक शुभ्र फुलांनी लगडून गेलेल्या वृक्षाची त्या तलावातल्या पाण्यात पडलेली चांदण्यासारखी प्रतिबिंबंही न विसरण्याजोगी होतं पण ते तितकंच.
एकंदरीत चीनच्या मुख्य शहरांमधल्या अत्याधुनिक स्टील,काचा,कॉन्क्रिटयुक्त बंधकामांच्या अजस्त्रतेमुळेही असेल पण तिथला निसर्ग,तिथली झाडं मनावर सुरुवातीला काही वेगळा ठसा उमटवून गेली नव्हती हे खरं.
पण मग बिजिंगमधे असताना हळू हळू या सगळ्या अत्याधुनिकतेमागे आक्रसून मिटून गेल्याप्रमाणे झालेल्या जुन्या बिजिंगचा वेध लागत गेला आणि त्या जगात कोणे एके काळच्या तिथल्या समृद्ध निसर्गाचं शिल्लक अस्तित्व अकस्मातपणे दिसून आलं.त्या निसर्गाची भव्यता,देखणेपणा,प्राचीनता थक्क करुन टाकणारं होतं.आगळं होतं कारण ते उन्मुक्त होतं.बिजिंगच्या आत्ताच्या देखण्या शिस्तबद्ध हिरवाईची शान निसर्गाच्या त्या उन्मुक्त आविष्कारापुढे फारच फिकी वाटली.
फॉरबिडन सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत जातानाच दिसत रहातात तिथल्या लाल-निळ्या-सोनेरी प्रासादांच्या पार्श्वभूमीवरचे प्रांगणातले विराट आणि वेडेवाकडे वाढत गेलेले लाल-तपकिरी गाठाळलेल्या वृद्ध खोडांचे सायप्रस वृक्ष.
काही वृक्ष वाढता वाढता मुळं एकमेकांमधे गुंतून एकत्र वाढत गेलेली.ही जिवंत झाडं नसून काष्ठशिल्प जागोजागी मांडून ठेवलेली आहेत असा भास होण्याइतपत त्यांचे आकार आणि त्यांच्या जिवंतपणावर शतकनुशतकाच्या काळाचे थर जमा झालेले.इथल्या इतिहासापेक्षाही या वृक्षांची प्राचीनता जास्त आहे.
कोणे एके काळी इथे अस्तित्वात असणार्‍या सायप्रस,रेडवूड,सेडारच्या जंगलाला साफ करुनच या प्रासाद नगरीची वाढ टप्प्या टप्प्याने होत गेली.सम्राटाच्या प्रत्येक आवडत्या राणीच्या महालासाठी काही शेकडो वृक्ष बळी जात राहिले.उरलेले वृक्ष त्या राण्यांच्या आणि अंगवस्त्रांच्या करुण कहाण्यांचे मुक साक्षिदार बनत तिथेच वाढत राहिले. शतकं लोटली.
बघता बघता साम्राज्ये लयाला गेली.चीनमधे सांस्कृतिक क्रांती झाली आणि मग फॉरबिडन सिटीमधे घुसलेल्या संतप्त रेड आर्मीनी आपल्या नासधुसीची पहिली सुरुवात या सम्राटनगरीचं एकप्रकारे प्रतिकच बनलेल्या इथल्या झाडांवर घाव घालून केली.मग बिजिंग शहराच्या पुनर्बांधणीसाठीही तिथले हजारो वृक्ष तोडले गेले.फॉरबिडन सिटीमधले देखणे प्रासाद नागरिकांच्या नजरेला पहिल्यांदाच पडत होते.त्यांनी आपापल्या वाड्यांची,सिहुयानची रचना त्या प्रासादांच्या धर्तीच्या लाकडी बांधकामावर आधारीत केली.
या सगळ्याकरता अमाप लाकडाची आवश्यकता होती.बिजिंग शहराच्या आसपासची जंगलं क्रमाक्रमाने नाहिशी होत गेली.इतर शहरांनीही त्याचं अनुकरण केलं.नागरिकांनीही शेतासाठी जंगलांची तोड केली.
आधुनिक काळात उरली सुरली झाडं फ्लायओव्हर्स,स्कायस्क्रॅपर्सच्या उभारणीसाठी जागा करुन द्यायला मुकाट्याने मागे हटली.या सगळ्यावर मात करुनही काही झाडं शिल्लक राहिली ती इथे आणि बाकी टेम्पल ऑफ हेवन,टेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या परिसरात.देवळांच्या आधाराने आपल्याकडे जशी वडा,उंबरांची झाडं निर्धोक वाढतात तशीच ही झाडं.मान वर करुन त्या झाडांच्या आकाशात पसरलेल्या विस्ताराकडे पहाताना लक्षात येतं त्या वृद्ध वृक्षांच्या नसानसांमधून अजूनही वहात असणारा जिजिविषु रस अजून किती जिवंत सळसळता आहे ते.एकमेकांमधे गुंतलेल्या त्या दमदार फांद्या,त्यांवरची पानं अजून हिरवीगार,काही लालसर तपकिरी.सेडार,सायप्रसच्या झाडांची खोडं त्यांची शंभराच्या पटीतल्या वयनिदर्शक लाल पट्ट्या अभिमानानं मिरवत होती.संपूर्ण बिजिंग आणि आसपासच्या परिसरात मिळून एकुण चाळीस हजार प्राचीन वृक्ष अजून शिल्लक आहेत.टेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या आजूबाजूलाही असेच सुंदर,प्राचीन सायप्रस,स्कोलर वृक्ष आहेत.त्यांच्या अंगावरुन निरव शांतता पाझरत रहाते.इतकी निरव की बाजूलाच तियान्मेन चौकात हजारोंची झुंड आहे यावर विश्वासही बसू नये.इथल्या एका वृद्ध सायप्रसचं वय तर लॉन्जिटेविटी टेम्पलपेक्षाही जास्त आहे असं त्यावरची लाल पट्टी सांगते.
शतकांचे उदयास्त अनुभवलेल्या अशा वृद्ध वृक्षांच्या खोडांवरुन हात फिरवायला मला अतिशय आवडतं.त्यांची एकेकाळची मजबूत,चिलखती खोडं आता भेगाळलेली,जीर्ण झालेली असतात.पण त्यांचं जिवंत स्पंदन आपल्या हातांना जाणवतं.सोबतच्या गाईडला बाजूला सारुन या वृक्षांच्या खोडांना कान लावून ऐकलं तर कदाचित खर्‍या कहाण्या समजतीलही याची खात्री पटते.चिनी सरकारने म्हणूनच बहुधा काही जास्त वृद्ध झाडांभोवती कुंपणं घालून ठेवली आहेत.गाईड सांगतो की या झाडांना मिठी मारल्याने आपलंही आयुष्य वाढतं असा चिन्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे या जीर्ण वृक्षांना धोका संभवतो म्हणून ही कुंपणं.माझा फारसा विश्वास बसत नाही.

चीनमधे डोंगरांच्या उतारावरची किंवा प्रवासात मधेच कुठेही दिसणारी बांबूची जंगलं मात्र अफाट सुंदर. त्या जंगलांमधे बांबूचा सुंदर हिरवा,पोपटी कधी चमकता पिवळा रंग एखाद्या अंगभुत प्रकाशासारखा कोंदून गेलेला दिसतो आपल्याला लांबून पहात असताना.मुद्दाम थांबून निरखावीत अशी ही बांबूची अनोखी जंगलं. लहानशी आणि सुबक.
चीनची भिंत चढत असतानाही दोन्ही बाजूला फार सुंदर वृक्षसंपदा नजरेला पडली.विशेषत:मंगोलियाच्या बाजूला घनदाट जंगलाची भिंतच आहे.मात्र ही जंगलही नंतर निर्माण केलेली.मानवनिर्मित.
पन्नास वर्षांहून अधिक काळ चीनच्या पुनर्निर्माणासाठी बेसुमार जंगलतोडीचे दुषपरिणाम रेताड जमिनीच्या नाहीतर सततच्या पुराच्या स्वरुपात चीनमधल्या अनेक भागांमधे दिसायला लागले तरी ते सर्वात पहिल्यांदा आणि जास्त तीव्रतेने जाणवले ते उत्तर-पश्चिम प्रांतात ज्याला लगटूनच अफाट गोबीचं वाळवंट पसरलेलं आहे तिथे.तिथून सुसाटत येणार्‍या वाळूच्या वादळाला थेट बिजिंगपर्यंत येण्यापासून अटकाव करायला आता जंगलच शिल्लक उरलेलं नव्हतं.वाळूच्या वादळांच्या तडाख्याचा धोका चीन सरकारला खडबडून जागं करुन गेला.२००१ मधे त्यांनी ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्ट सुरु केला आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रांताला गवसणी घालणारी तब्बल २८०० मैलाची झाडांची एक भिंत उभारायाला सुरुवात झाली.लाखो झपाट्यानं वाढणारी झाडं लावली गेली.जंगलाच्या या पुनर्निमाणाचे चांगले परिणाम आत्ता दिसायला लागले आहेत.
मात्र या ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्टमधे काही मुळची चिनी मातीतली नसणारी कॉटनवुडसारखी झाडं होती त्यांच्या झपाट्याने होणार्‍या परागीभवनामुळे आणि बीजप्रसारणामुळे चीनची शान असणार्‍या औषधी जिन्को वृक्षांना फार मोठा धोका निर्माण झाला.असंख्य नागरिकांना अ‍ॅलर्जीचा त्रासही सुरु झाला.आता त्या झाडांच्या जागी पुन्हा जिन्कोची लागवड सुरु झाली आहे.एकंदर कहाणी आपल्या इथल्या झपाट्याने वनीकरणाच्या नादात लावल्या गेलेल्या सुभाबूळ, निलगिरीच्या जवळपास जाणारिच.
शियाला चीनचा जुना वृक्ष जिन्को मोठ्या प्रमाणावर अजूनही शिल्लक आहे.शिया सोडलं तर जिन्को फारसा कुठे दिसला नाही.बाकी बिजिंगमधे रोड अ‍ॅव्हेन्यूसाठी सर्वात जास्त लावले गेलेले वृक्ष आहेत स्कोलर (sophora japonica) रेड बड किंवा कॉटनवुड.
चीनच्या भिंतीच्या इस्टर्न गांसू भागात दक्षिणेकडे खाली झुकत गेलेला आणि झिजल्यामुळे फार थोडा भिंतीचा भाग शिल्लक राहिलेला होता त्यामधून कदाचित त्या भिंतीइतकंच वय सांगणारं एक पुरातन झाड अकस्मात समोर आलं.चीनच्या भिंतीचं पुनर्वसन करताना चिनी सरकारने भिंतीच्या चिर्‍यांमधून वाढत गेलेली अनेक जुनी झाडं मुळापासून उपटून काढली आहेत.त्यांच्या नजरेतून सुटून गेलेलं कदाचित हे झाड होतं.
चीनमधे जंगलं झपाट्याने नाहिशी होण्यामागे त्यांचा पूर्वापार लाकडी बांधकामांचा हव्यास जसा कारणीभूत तसाच आणखी एक महत्वाचा वापर कारणीभूत ठरला वृक्षतोडीला तो म्हणजे चॉपस्टीकचा वापर.एक आकडेवारी सांगते की चीनमधे एका वर्षात ४५ बिलियन चॉपस्टिक्सच्या जोड्या वापरल्या जातात अणि त्यासाठी २५ मिलियन झाडांचा बळी जातो.अशा औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या लाकडामधलं फायबरचं प्रमाण कमी करण्यासाठी चीनी सरकारने झाडांवर काही जेनेटिक मॉडिफिकेशन्सचा प्रयोग केला.फायबर कमी झालं की पल्पनिर्मितीसाठी फारसे कष्ट पडत नाहीत.पण त्याच्या दुष्परिणामामुळे झाडांची खोडं कमकुवत झाली आणि ती झपाट्याने कोसळायला लागली.शु बिंग नावाच्या एका अत्यंत लोकप्रिय चिनी चित्रकाराने यावर प्रतिकात्मक उभारलेलं एक कोसळून पडलेल्या झाडाचं,चॉपस्टिक्सचा वापर करुन बनवलेलं शिल्प बिजिंग शहरात आहे.लोकांना लाकडी चॉपस्टिक्स वापरु नका असा संदेश देणारं हे शिल्प नक्कीच खूप परिणामकारक वाटतं.
या शु बिंगचीही एक आधुनिक कहाणीच आहे.अठरा वर्षं न्यूयॉर्कमधे राहिलेला हा चित्रकार नुकताच चीनला परतला तोच चीनमधल्या पर्यावरण रक्षणाचा ध्यास मनाशी घेऊन. २००५ साली शु बिंग एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे केनियाला गेला होता.यूएन लिस्टेड नॅशनल हेरिटेज स्थळांची देशोदेशी जाऊन चित्रं काढायचा कार्यक्रम त्यांनी आखला होता.केनियाच्या दुष्काळी भागातून प्रवास करताना शु बिंगला जाणलं की सर्वात जास्त जपणूक करण्यासारखी गोष्ट म्हणजे वृक्ष.त्यांची तोड हाच सर्वनाशाच्या दिशेचा प्रवास.माणसांची,प्राण्यांची सगळ्या पर्यावरणाची संस्कृती अवलंबून आहे झाडांवर.शु बिंगने मग एक अभिनव योजना आखली.त्याने लहान मुलांच्या कार्यशाळा भरवल्या आणि त्यात चिनी लोककथेतल्या एका मुलाची कथा सांगायला सुरुवात केली. या मुलाकडे एक जादूचा ब्रश असतो.त्या ब्रशने तो जे काढेल ते प्रत्यक्षात खरंखुरं बनतं.त्याने मुलांना आपल्या ब्रशने झाडं काढायला शिकवलं आणि त्यांन वचन दिलं की त्यांच्या कागदावरची ही झाडं प्रत्यक्षात खरी खुरी जमिनीवर लागतील.मग शु बिंगने एक वेबसाइट या चित्रांच्या विक्रीकरता उघडली.मुलांनी काढलेल्या या चित्रांची किंमत त्याने ठेवली प्रत्येकी दोन यूएस डॉलर्स.ही किंमत केनियामधे दहा झाडं लावण्याकरता पुरेशी होती.
वेबसाइटवरच्या चित्रांच्या लिलावाला भरघोस प्रतिसाद मिळाला.शु बिंगने कागदावरची झाडं प्रत्यक्षात उतरवली. पुरेसा निधी जमा झाल्यावर मग शु बिंग आपल्या मायदेशात परतला.चिनी लोकांनी त्याचं भरघोस स्वागत केलं.शु बिंगने चीनच्या लहानमोठ्या शहरांमधे सात ते चौदा वयोगटातल्या मुलांच्या कार्यशाळा भरवायला सुरुवात केली.शु बिंग म्हणतो एक लहान मुल दहा मोठ्या माणसांशी जोडलेले असते.ते खरेच आहे कारण म्हणूनच शु बिंगचा हा जंगल प्रकल्प आता प्रचंड प्रमाणावर विस्तारला आहे.चीनमधली वृक्षसंपदा पुन्हा नव्याने बहरु लागली ती या अशा शु बिंगसारख्यांच्या प्रयत्नांमुळेच.

चीनच्या निसर्गात भौगोलिक परिस्थितीनुसार आश्चर्यकारक विविधता आहे पण तिथल्या नैसर्गिक,समृद्ध पर्यावरणासमोर कायमच कोणत्या ना कोणत्यातरी मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आव्हानांचं संकट उभं ठाकलेलं असतं.शतकानुशतकं या संकटांशी सामना करताना चीनमधल्या नैसर्गिक पर्यावरणामधे कधी मुलभूत बदल होत गेले,कधी निसर्गाने हार पत्करली आणि बरेचदा तीव्र,उलटा वार करत यशस्वी प्रतिकारही केला.अफाट लोकसंख्या आणि बेफिकिर औद्योगिक प्रदुषण तर तिथल्या पर्यावरणाचे कायमस्वरुपी शत्रूच.त्यांच्यामुळे तिथल्या निसर्गाची,वन्यजीवनाची न भरुन येणारी हानी झालेली आहे. वाघ, पांडा, हत्ती, अनेकविध क्रौन्च जातींसारखे पक्षी त्यांची नैसर्गिक परिसंस्थाच नाहिशी झाल्यामुळे चीनमधून जवळपास नामशेष झाले आहेत.
चीनी पर्यावरण,तिथल्या नैसर्गिक परिसंस्था आणि वन्यजीवन यांचं परस्परांशी असणारं नात काहीसं गुंतागुंतीचं.ते समजून घेताना चीनची आगळा भूगोल समजावून घेणं गरजेच होतंच.'द ग्रेट वॉल ऑफ चायना' चढून जात असताना आजूबाजूला सुंदर वृक्षराजीने भरलेल्या दर्‍या आणि धुकं असं सुरेख दृश्य दिसत होतं.
एका टप्प्यावर रोपवे होता तिथे कुतूहलाने आम्ही गेलो.फारशी कोणी माणसं नव्हती.आता केबल कार येईल आणि त्यात बसून जाऊ, फोटो काढू,व्हिडिओ शूटिंग करु अशा अपेक्षेने आम्ही दोन्ही हातांमधे कॅमेरे,चढत असताना मिळालेले काही सुंदर दगड घेतलेले,खांद्यावर ट्रॅव्हलसॅक लटकलेली अशा अवस्थेत उभे होतो.आणि अचानक एक मोकळं बाकडं आलं.मागच्या युनिफॉर्ममधल्या चिनी गार्डनी झपकन आम्हाला त्या बाकड्यावर लोटलं, वरचं उघडं झाकण लावून टाकलं आणि ते बाकडं दिलं खालच्या दरीत लोटून.आम्हाला श्वास घ्यायचीही उसंत नाही आणि बाकड्याच्या समोर असलेल्या गजाला धरण्याकरता हातही रिकामे नाहीत.पाय टेकवायला जागा कुठे आहे हे शोधत असताना ते अधांतरीच लटकलेले आणि ते बाकडं चाललय पाताळासारख्या खोल दरीतून वरच्या कभिन्न कड्याच्या दिशेने.त्यावर कुठेतरी चिनी भिंतीचे कंगोरे अस्पष्टपणे धुक्यातून दिसणारे.भितीने ब्रम्हांड आठवलं.जराही हालचाल करुन सावरुन बसायचीही मुभा नाही.ते बाकडं असं जोरात हिंदकळायचं की पोटात गोळाच यायचा. हॅन्डीकॅमची कॅप काढायला हात हलवला तर डोक्यावरुन संथपणे जाणार्‍या घारीची सावली अंगावरुन सरकत गेली आणि मी अजून घाबरुन गेले.जेमतेम दहा मिनिटांच्या त्या थरकाप उडवणार्‍या प्रवासात एकच सुख की खाली नजर टाकल्यावर नितांतसुंदर वृक्षांचं दर्शन डोळ्यांना व्हायचं.काही झाडांच्या फांद्या, शेंडे पायाच्या तळव्यांना गुदगुल्या करायचे.चिनी निसर्गाचं ते रुद्रभिषण आणि इतक्या जवळून पाहिलेलं दृश्य केवळ अवर्णनीय.चीनच्या भिंतीच्या दिशेने वर जाणारा तो लाकडी पाळणा मंगोलियाच्या बाजूचा निसर्गही मधेच दाखवून जायचा.खोल दर्‍या, मधेच वाळवंट, काळसर हिरवी जंगलं आणि बर्फासारखे थंडगार वारे त्यावरुन येत आणि आमच्या अंगावरुन जाताना आमचं ते लाकडी बाकडं हिंदकळवून टाकत.अजून आठवलं तरी पायांना घाबरुन मुंग्या येतात.पण निसर्गदृश्य अविस्मरणीय.
चीनच्या भिंतीवरुन दिसणारं ते दृश्य पाहिल्यावरच ठरवून टाकलं या आगळ्यावेगळ्या चिनी भूगोलावरच्या पर्यावरणाचा वेध घ्यायचाच.
मग परतल्यावर झाली आमच्या चिनी मित्राच्या लिनच्या मागे माझी भुणभुण सुरु की मला चिनी वाईल्डलाईफची माहिती मिळेल अशा ठिकाणी घेऊन चल.त्याने मला बिजिंगच्या एका सहा मजली पुस्तकांच्या दुकानात नेऊन सोडलं.तिथे चिनी पानाफुलांची काही पुस्तकं होती पण ती बहुतेक सगळी चिनी भाषेतलीच.जी इंग्रजी पुस्तकं होती ती कॉफी टेबल पुस्तकांसारखी फोटोंनी भरलेली आणि प्रचंड महाग.शिवाय ती कॅरी करताही आली नसतीच.निराशाजनक प्रकार होता पण तिथेच मला बीबीसीने काढलेल्या वाईल्ड चायनाच्या दोन अप्रतिम डिव्हीडिजचा सेट मिळाला.
लिनने त्याच्या युनिव्हर्सिटीमधल्या काही मुलांना विचारलं.त्यांच्याकडून मग युनिव्हर्सिटी एन्व्हायर्नेम्टल क्लबतर्फे चालणार्‍या पर्यावरणासंदर्भातल्या अवेरनेस कॅम्पेनमधे सहभागी असणार्‍या वॅन आणि लुई या दोन मित्रांचे फोननंबर मिळाले.त्यांनी आनंदाने मला त्यांच्या क्लबवर नेऊन माहिती द्यायचे कबूल केले.
त्यांचा क्लब म्हणजे एखाद्या एनजिओच्या स्वरुपाचा होता.खूपसे नकाशे,आलेख,आकडेवारीचे तक्ते आणि काही पुस्तकं असलेल्या शेल्फ.पॉवरपॉइन्टवर एक दोन मुली कसल्यातरी प्रेझेन्टेशनची तयारी करण्यात मग्न असलेल्या.
वॅनला अजिबात इंग्रजी येत नव्हतं.लुई शिकत असताना गाईडचं कामही करायचा त्यामुळे त्याचं इंग्रजी बर्‍यापैकी.त्याने मला चीनचा भौगोलिक नकाशा दाखवला.मला का ही ही कळलं नाही.त्यावर हिरवा रंग म्हणजे जंगल एव्हढं सोडून.शिवाय तो पर्यावरण प्रदुषणाची पातळी किती कमी झालीय,नद्यांमधलं लेडचं प्रमाण किती कमी झालय वगैरे जी माहिती आकडेवारीच्या स्वरुपात देत होता ती अगदिच कंटाळवाणी आणि माझ्या काहीच उपयोगाची नाही.
त्याच्याही बहुतेक ते लक्षात आलं.मग त्याने मी दुसर्‍या दिवशी तुमच्या हॉटेलवर येतो असं म्हणून मला परत पोचवून टाकलं.दुसर्‍या दिवशी वँग्सोबत एक हसरी चिनी मुलगी.अ‍ॅना.ती शाळेत शिक्षिका होती.तिने तिच्या चिनी उच्चारांच्या इंग्रजीत माझ्याशी चिनी भूगोल,पर्यावरण संदर्भात बर्‍यापैकी गप्पा मारल्या.त्या गप्पा आणि बीबीसीच्या वाईल्ड चायनाच्या डिव्हीडिजमधून चिनी निसर्गाची थोडी थोडी ओळख व्हायला मदत झाली.
आकारमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर असणार्‍या चीनची भौगोलिक रचना तीन पायर्‍यांच्या स्वरुपात आहे.सर्वात वरच्या पायरीवर म्हणजे पश्चिमेला माउंट एव्हरेस्टसारखी उत्तुंग पर्वतराजी(या पर्वतराजीच्या दुसर्‍या बाजूला भारत).तिबेटही याच पायरीवर.ही पायरी जगावरचं आच्छादन(रुफ ऑफ द वर्ल्ड)म्हणून ओळखली जाते.अतीतीव्र हिवाळा(-४०डिग्री सेल्शियस)आणि तितकाच तीव्र उन्हाळा(४०डिग्री सेल्शियस)या प्रदेशातल्या तुरळक,विरळ पर्यावरणाला कारणीभूत ठरणारा.या प्रदेशात दक्षिणेला पांडा अस्वलांचं निवासस्थान.
चीनचा मधला भाग म्हणजे दुसरी पायरी-हा भागही उंचसखल असा टेकड्यांचा बनलेला पण आता इथे बर्फ पडत नाही.चीनचा हा मध्यभाग बहुतांशी वाळवंटी आहे.गोबीचे सुप्रसिद्ध वाळवंट इथेच.काही भाग गवताळ कुरणांचा आहे ज्यात याक रहातात.इथे शेती होऊ शकत नाही.मंगोलिया याच भागात आहे.इथेही हवामान अत्यंत टोकाचं.
पूर्व चीनमधे म्हणजे जिन्याच्या तिसर्‍या पायरीवर चीनमधल्या अजस्त्र नद्यांचे पॅसिफिक महासागरापर्यंत जाणारे जाळे आहे.यांगत्से आणि यलो रिव्हर त्यापैकी महत्वाच्या.चीनमधली सर्वात जास्त लोकसंख्या दाटीवाटीने या नद्यांच्या भोवताली स्थायिक आहे.शेती हा प्रमुख व्यवसाय.(उत्तरेला गहू आणि दक्षिणेला तांदूळ अशी विभागणी).इथलं हवामान मध्यम असतं.नद्यांना सतत पुर येतो त्यामुळे जमिन सुपीक.इथे उत्तरेला चीनमधली घनदाट जंगले आहेत.त्यात हरण,रेनडिअरचे कळप,इतरही वन्यजीवन भरपूर आहे. वाघही त्यात अजून आपलं अस्तित्व टिकवून आहेत(कसं बसं अर्थात).चीनच्या दक्षिणेच्या वर्षारण्यातलं हवामान उन्हाळ्यात दमट आणि उष्ण.इथे मोठ्या प्रमाणात वादळेही होत असतात.या अरण्यांमधे जिन्सेन्ग ही चीनच्या पारंपरिक वन्य औषधीमधली महत्वाची आणि बहुमूल्य वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते.इथलं वन्यजीवनही समृद्ध आहे.
चीनचा आर्थिक महासत्ता म्हणून होत असलेला उदय आणि तिथल्या समृद्ध पर्यावरणाचा र्‍हास यांचा आलेख समांतर जातो.चीनमधे फक्त२०% वन आच्छादन शिल्लक राहिल्यानंतर प्रदुषण विरोधक कायद्यांची,जंगलांच्या पुनर्मितीसंबंधातल्या कार्यवाहीची काटेकोर अंमलबजावणी चीनी सरकारने सुरु केली खरी पण जंगलाची प्राचीनता आणि त्यानुषंगाने मिळणारे नैसर्गिक फायदे याचं कायमस्वरुपी जे नुकसान या देशाचं झालं आहे ते भरुन निघणं केवळ अशक्य.याची जाणीव चीनमधल्या अनेकांना आहे.
त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की भौगोलिक दुर्गमतेमुळे अजूनही काही प्रमाणात ज्याला क्लोज्ड फॉरेस्ट किंवा अस्पर्शित जंगल म्हणतात ते तिथे शिल्लक राहू शकलं आहे.वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकीकरणाच्या दबावाचा धोका कायमच या जंगलांना राहणार आहे तरी पण युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेन्ट प्रोग्रॅम(UNEP)द्वारा या क्लोज्ड फॉरेस्टच्या रक्षणाकरता फार मोठे प्रयत्न चालू आहेत.वाढत्या वाळवंटीकरणाला(प्रतिवर्षी ७० किमी.इतका वाळवंटीकरणाचा वेग अजूनही आहे),पुर,वादळांच्या तडाख्यांना घाबरुन का होईना त्याला सकारात्मक प्रतिसाद चीनी सरकारकडून मिळत आहे हेही कमी नाही.
फ्रेन्ड्स ऑफ नेचर सारख्या बिजिंगमधल्या काही एनजिओजचे सातत्याने चाललेले प्रयत्नही त्यांना हातभार लावतात.पातळ प्लास्टीक पिशव्यांवर संपूर्ण चीनमधे २००८ पासून कायद्याने बंदी आहे आणि कापडी पिशव्या,शॉपिंग बास्केट्सच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणार्‍या कॅम्पेन्स ठिकठिकाणी चालू असतात.कायद्याच्या अंमलबजावणीचा कडकपणा चीनमधे भारतापेक्षा कितीतरी जास्त असूनही मोठी शहरे सोडली तर इतर छोट्या शहरांत प्लास्टिक पिशव्या सर्रास दिल्या घेतल्या जातात हे पाहून मला चांगलीच गंमत वाटली.
फ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे तिबेटन अ‍ॅन्टेलोप्स, वाघ,काही दुर्मिळ जातींची माकडे,पर्वतांवरील जंगले वाचवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांमधे काही प्राचीन,पारंपरिक चिनी चित्रकारीतेमधे आढळणार्‍या निसर्ग,प्राण्यांच्या प्रतिकांचा वापर करुन घेणारी एक अभिनव मोहिम आहे.चीनी जनतेला दीर्घायुष्य,आरोग्य आणि एकंदरीतच निरामय आयुष्यासाठी आपल्या पूर्वपरंपरेत सतत डोकावून पाहण्याचे एक टिपिकल पौर्वात्य म्हणता येइल असे वेड आहे.त्यांच्यातल्या या भावनिकतेला आव्हान करण्यासाठी जुन्या,पारंपरिक चित्रकलेला पुनरुज्जिवित करुन,ती शिकवण्याच्या कार्यशाळा भरवून त्यातून जंगल,निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश पसरवण्याचे हे प्रयत्न मला खूपच आवडले.चित्रकला काय किंवा कोणतीही कला ही यानिमित्ताने अशी सामाजिकतेला जोडली गेल्याने खूप काही साध्य होऊ शकते हे निश्चित.

बिजिंगमधल्या फ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे एक लघुपट महोत्सव मी तिथे होते त्या दिवसात भरवला गेला होता.त्यातला एक लघुपट तु बघायलाच हवा असा लिनचा आग्रह होता.खरं तर त्या दिवशीच आम्हाला हांगझोला परतायचे होते.हातात फक्त आठ तास होते.बिजिंगमधून शॉपिंग काहीच केलं नव्हतं.काही पुस्तकं खरेदी करायला पुन्हा त्या सहा मजली दुकानात चक्कर मारायची होती.पण लिनचा आग्रह पाहून आम्ही दोघांनी या सगळ्यावर पाणी सोडायचं ठरवलं.लिनने आपला वेळ खर्च करुन माझ्या हुटॉन्ग्जमधल्या अवांतर भटकंतीसाठी आणि(त्याच्या भाषेत)पानाफुलांच्या माहितीसाठी खूप मदत केली होती तेव्हा त्याचा आग्रह मोडवत नव्हता.
लघुपट केवळ अप्रतिम होता.एक युरोपियन बोटॅनिस्ट आणि बिजिंगमधल्या वनस्पतीशास्त्र विभागातले दोन विद्यार्थी यांनी मिळून चीनमधल्या युनान प्रांतातल्या काही पवित्र,अस्पर्शित जंगलाच्या राखीव तुकड्यांच्या शोधासाठी(आपल्याकडच्या देवराया असतात तशा)एक मोहिम दोन वर्षांपूर्वी आखली होती.त्या मोहिमेवर आधारीत हा लघुपट होता.या जंगलात चीनी चहाची खूप प्राचीन अशी झाडं(wild tea tree: camellia senensis)अस्तित्वात आहेत अशी माहिति फ्रान्झला म्हणजे त्या युरोपियन बोटॅनिस्टला होती.जिन्कोचीही सर्वात प्राचीन म्हणजे फॉरबिडन सिटीमधे होती त्या१५०० वर्ष जुन्या झाडांहूनही प्राचीन झाडं त्या देवरायांमधे आहेत.
शोध घेत घेत हे तिथे युन्नान मधल्या बादा गावात येतात.तिथे मुक्काम ठोकतात.बादामधले आदीवासी गावकरी या देवरायांच्या रक्षणासाठी खूप पझेसिव्ह असतात.सगळ्या जगातला तांदूळ आणि चहा एक दिवस नष्ट होणार आहे अशी त्यांच्या तिथल्या देवळामधे भविष्यवाणी झालेली असते.आणि मग तांदूळ आणि चहाच्या झाडांचं मूळ वाण आपल्या जंगलात जपून ठेवण्यासाठी हे गावकरी आपले प्राणही पणाला लावायला तयार असतात.गावात आलेल्या परक्यांना तर ते ही माहिती देणंच अशक्य.हे तिथे वनस्पती संशोधक त्या चहाच्या झाडांचे आणि जिन्कोचे फोटो काढून नेण्यात शेवटी यशस्वी होतात त्याचा हा लघुपट.चहाचं झाड म्हणजे छोट झुडूप बघीतलेल्या मला चहाचा वीस मीटर उंचीचा आणि दीड मीटर घेराचा प्रचंड वृक्ष बघून धक्काच बसला.
युनानमधे इतक्या प्राचीन नाहीत पण तरी बर्‍याच जुन्या चहाच्या झाडांच्या काही बागाही आहेत ज्या सगळ्यांना बघता येतात.पुढच्या वेळी आपण त्या बघायला नक्की जाऊया असं लिनकडून वदवून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मग बिजिंगमधे काहीच शॉपिंग न झाल्याची खंत जरा कमी होऊ शकली
















Sunday, January 02, 2011

चायना पोस्ट - ५

बिजिंग शहराचा इतिहास खूप जुना.सहा प्रदीर्घ साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिलेले हे शहर.इथल्या प्रत्येक गोष्टीला आहे तसाच बिजिंगच्या या गल्ल्यांना म्हणजेच हुटॉन्ग्जनाही एक मोठा इतिहास आहे.हुटॉन्ग्जची स्वत:ची अशी एक संस्कृती आहे.
फ़ॉरबिडन पॅलेसमधे सम्राट आणि त्याच्या जवळचे अधिकारी,सरदार वगैरेंची निवासस्थाने होती.त्यापासून दूर अंतरावर,उत्तर आणि दक्षिण दिशेला बिजिंगमधली सामान्य,कष्टकरी,मध्यम व्यापारी,कलाकारांची वस्ती पसरलेली होती.हे जुनं बिजिंग शहर.इथल्या चिनी नागरिकांची घरं वैशिष्ट्यपूर्ण होती.या सिहुयान किंवा पारंपरिक वाड्यांची अंगणे बंदिस्त चौकांसारखी असतात.वाडे एकालगत एक असे बांधलेले असल्याने त्यांच्या बंदिस्त अंगणांना लगटून जाणारे चिंचोळे बोळ एकत्र होऊन एक लांबलचक गल्ली तयार व्हायची त्यांना हुटॉन्ग्ज म्हणतात.या हुटॉन्ग्ज एकमेकांना जोडल्या गेलेल्या असल्याने त्यांचे एक मोठे जाळेच शहरामधे पसरलेले असायचे.चांगल्या उजेडासाठी किंवा पारंपारिक चिनी वास्तूशास्त्रानुसार वाड्यांची दारे शक्यतो दक्षिणाभिमुख होती त्यामुळे या हुटॉन्ग्ज बहुतेककरुन बिजिंग शहराच्या पूर्व पश्चिम दिशेमधून जातात.
हुटॉन्ग्जच्या दोन्ही बाजूंना वाड्यांचे दरवाजे उघडतात.चिनी शेजार्‍यांची त्या दरवाजांमधे बसून आपापसात गप्पा,सुखदु:खांची देवाणघेवाण व्हायची.चिनी गृहिणी कलाकुसरीची कामं,खाद्यपदार्थांची देवाणघेवाण एकमेकींमधे करायच्या.हुटॉन्ग्जची शेजारसंस्कृती खूप भक्कम होती.खरी चिनी संस्कृती या हुटॉन्ग्जमधूनच विकसित होत गेली.प्रत्येक हुटॉन्ग्जची स्वत:ची अशी एक स्वतंत्र कथा आहे.अनेक नंतरच्या काळात चीनमधे प्रसिद्धीला आलेले लेखक,कवी,चित्रकार,कलाकार,ऑपेरा गायक या हुटॉन्ग्जमधे जन्मले,मोठे झाले.साध्या,सामान्य बिजिंगवासियांच्या या हुटॉन्ग्ज चिनी संस्कृतीच्या खूणा आत्ता आत्तापर्यंत जपत राहिल्या होत्या.मात्र विसाव्या शतकाच्या अखेरीस जुन्या बिजिंगचा कायापालट करताना,नवे रस्ते,नव्या इमारतींची बांधणी करताना,बिजिंगचं पुर्वसन होत असताना पहिला घाला पडला तो या हुटॉन्ग्जवर.जुन्या वाड्यांवर बुलडोझर फ़िरला तेव्हा त्यांन लगटून असणार्‍या या हुटॉन्ग्जही नामशेष होत गेल्या.२००० ते २००४या वर्षात बिजिंगमधले२०,०००जुने वाडे पाडले गेले.
चीनमधल्या नव्या पिढीला या जुनाट सिहुयान आणि हुटॉन्ग्जमधे रहाण्यात काहीच रस नव्हता.त्यांना अत्याधुनिक बिजिंगचं स्वच्छ,चकचकीत रुपडं खुणावत होतं.ते साहजिकच होतं.पण तरी काही जुन्या हुटॉन्ग्ज चिवटपणे शिल्लक राहिल्या.मुळ चिनी संस्कृतीचं उगमस्थान असणार्‍या या हुटॉन्ग्जचं अस्तित्त्व नाहीसं होत गेलं तेव्हा काही शहाण्या चिनी समजशास्त्रज्ञांना,नागरिकांना याहुटॉन्ग्ज जपण्याचं महत्व वाटायला लागलं.मग शिल्लक असणार्‍या हुटॉन्ग्ज लोक जपायला लागले.लिन सारखे विद्यार्थी एकत्र ग्रूप स्थापन करुन जुन्या हुटॉन्ग्जचा शोध घेत त्यांची नोंद करण्याचं काम स्वत:हून करतात.
हुटॉन्ग्जमधले सिहुयान आता टीहाऊस,पिझ्झापार्लर्स,संग्रहालयं,हॉटेल्स अशा नव्या रुपांमधे जतन केले जातात.सिहुयान म्हणजेच वाड्यांची शान असणारे बंदिस्त चौक किंवा अंगणांमधले सुंदर बगिचे आहे त्या जुन्या स्वरुपातच शक्यतो राखलेले आहेत.हुटॉन्ग्जमधून फ़क्त सायकल रिक्षा जाऊ शकतात त्यामुळे इथे प्रदुषण नसते.गल्ल्यांतून निरव शांतता अनुभवता येते.वाड्यांच्या दरवाजांवर लाल,कागदी चिनी कंदिल लटकवलेले असतात,सुंदर नक्षी चितारलेली असते.चहा, नूडल्स,मोमो,डंपलिंग्ज यांचा आस्वाद घेत हुटॉन्गच्या एखाद्या सिहुयानमधे तासन तास बसून रहाण्यासारखं सुख नाही.हिरव्यागार वेली,चिनी गुलाबांच्या माळांनी सजलेल्या सिहुयानच्या भिंतींमधून शांतता पाझरत रहाते.हुटॉन्ग्जची नावंही वैशिष्ट्यपूर्ण असतात.काही तिथल्या झाडांवरुन उदा.लिशू म्हणजे विलो हुटॉन्ग,काही दिशादर्शक,काही तिथे पूर्वी चालणार्‍या व्यवसायांवरुन उदा.साबण गल्ल्या,कापड गल्ल्या किंवा मेंढी गल्ल्या,भावदर्शक म्हणजे आनंदी,उत्साही गल्ल्या इत्यादी.हुटॉन्ग्जमधे शेजारपरंपरा अजूनही खूप जपली जाते.घराण्याच्या जशा पिढ्या असतात तशा शेजा-यांच्याही असतात.वंशावळीमधे शेजार्‍यांची नावंही आवर्जून लिहिली जातात.हुटॉन्ग्जमधे अजूनही काही नांदते वाडे आहेत. मात्र दर वर्षी नव्या स्कायस्क्रॅपर्सच्या,रिंगरोडच्या,फ़्लायओव्हरच्या रेट्यात हुटॉन्ग्जचा नष्ट होण्याचा वेग वाढत आहे.चीनमधली एक समृद्ध संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असलेली लिन आणि त्याच्या मित्रांसारखी काही मोजकी लोकं अजून आहेत हे त्या हुटॉन्ग्जचं नशीबच म्हणायच!
पहिल्या दिवशी हुटॉन्ग्जची सैर करुन झाल्यावर लिन आम्हाला तिथल्याच एका हुटॉन्गमधल्या त्याच्या आजीच्या ओळखीच्या एका चिनी कुटुंबामधे घेऊन गेला.तिथल्या चिनी आजी ९२ वर्षांच्या होत्या.चौकातल्या एका झाडाखाली खाट टाकून संध्याकाळच्या उतरत्या उन्हामधे अंग शेकत बसल्या होत्या.त्यांची सतरा वर्षांची पणती शिकायला त्यांच्याजवळ रहात होती आणि बाकी कुटुंबीय शांघायला स्थायीक झाले होते.आजीबाईंनी आपल्या अर्ध्या वाड्याचं रुपांतर टीहाऊस मधे केलं होतं.छोटी छोटी गोल टेबलं,त्यावर चिनी कशिदाकारी केलेले रुमाल,सुंदर निळ्या काचांचे चिमुकले कप आणि किटली,गरम पाण्याचा जार,मोगर्‍याच्या कळ्या,क्रिसेन्थेमम,कॅमोमाईल आणि इतरही अनेक चवींचा ग्रीन टी प्रत्येक टेबलावर सुबकपणे सजवून ठेवलेला.यावं,चहा प्यावा,चौकातल्या फ़ुलांनी बहरलेल्या वेली,झाडांच्या सावलीखाली वाचावं,गाणी ऐकावी आणि जाताना आपण प्यायलेल्या चहाचे पैसे आजीबाईंनी खाटल्याशेजारी ठेवलेल्या एका लाकडी खोक्यात टाकून निघून जावे.हवं असेल तर आजींशी गप्पा माराव्या.
आजींना आजूबाजूच्या सर्व सिहुयानमधे रहाणार्‍या लोकांची इत्यंभुत माहिती होती.कोणाच्या घरात किती माणसं आहेत,मुलं कुठे काय शिकत आहेत,लग्न झालेल्या मुली कुठे दिल्या आहेत..आपल्या गल्लीमधल्या शेजा-यांबद्दल पुरेशी माहिती आपल्याला नसली तर तो एक मोठा शेजारधर्माचा अपराध समजला जातो असं लिन आजींची बडबड ऐकून झाल्यावर आणि मला त्याचा थोडक्यात आशय सांगून झाल्यावर म्हणाला.
हुटॉन्ग्जचं वैशिष्ट्य असणार्‍या सिहुयानभोवतालच्या बंदिस्त चौकात आवर्जून राखल्या जाणार्‍या बागांमधे कोणती झाडं लावायची याचंही एक शास्त्र चिनी परंपरेमधे आहे आणि अजूनही ते काटेकोरपणे जपलं जातं.काही झाडं जी आयुर्मान वाढवतात ती चौकाच्या मध्यभागी असायलाच हवीत असा आग्रह चिनी आजोबा आजींचा असतो.घरासमोरच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनासारखीच ही संस्कृती आपल्या भारतीय मनाला अर्थातच जवळची वाटते.
नुसतं तुळशी वृंदावनच कशाला?बिजिंगच्या या गल्ल्या,त्यातले हे पुरातन वाडे,त्यांचे चौक,चौकातल्या फ़ुलांच्या झाडांखालच्या खाटेवर पहुडलेल्या आजीबाई,त्यांचं हे चिमुकलं टीहाऊस,आजींची आसपास चिवचिवणारी नात,टीहाऊसमधे पिझ्झा पण ठेवायला हवा असा तिचा टिपिकल तरुण आग्रह या सगळ्यामधून वाहत जाणारा संस्कृतीचा सगळाच प्रवाह मला माझ्यातल्या भारतीयपणाला अगदी जवळचा वाटत होता.पौर्वात्य संस्कॄतीची सारी वैशिष्ट्य जपणारी एक अखंड परंपराच या हुटॉन्ग्जमधून वाहते आहे.
बिजिंगमधल्या पारंपारिक हुटॉन्ग्जच्या दोन्ही बाजू हिरव्यागार वेली-वृक्षांनी वर्षातले बाराही महिने बहरलेल्या असतात.त्यामुळे त्यांच्यातून जाताना जीवाला थंडावा,शांतता मिळतो जी आजूबाजूला पसरलेल्या अत्याधुनिक बिजिंगमधे क्वचितच मिळू शकते.मात्र हिरव्या वृक्षराजीची बिजिंगमधे इतरत्रही अजिबात कमतरता नाही हे मान्य करायलाच हवं.बिजिंग अत्याधुनिक करण्याच्या नादात तिथली अनेक प्राचीन वृक्षराजी तोडली गेली होती.त्याचे परिणाम बिजिंगच्या नागरिकांना भोगावे लागले.प्रचंड कोरडी धूळ, टोकाचे तापमान,प्रदुषणाचे प्रमाण पहाता इथे ऑलिम्पिक सुरळीतपणे पार पडण्याची शक्यता क्रीडातज्ञांना फ़ारशी वाटत नव्हती.पण ऑलिम्पिकच्या काळात बिजिंग महानगरपालिकेने आठ वर्षे अगोदर पद्धतशीर नियोजन करुन २००८ च्या नववर्ष स्वागताला बिजिंग धूळमुक्त करुन दाखवले.प्रत्येक मीटरवर एक सदहरित वृक्ष असे असंख्य वृक्ष शास्त्रीय पद्धतीने लावून शहराचे तापमान सहा ते आठ अंश कमी करुन दाखवले.फ़ुलांचे ताटवे पावलापावलांवर बहरले.आज बिजिंगमधे सर्वत्र धूळविरहित सहा-आठ पदरी सुरेख रस्ते,दुतर्फ़ा दाट वृक्षराजी,रस्त्यांच्या कडेला रंगित फ़ुलांची पखरण,मखमली हिरवळ,रस्त्यापलीकडच्या कालव्यांमधली निळी गुलाबी लिलीची फ़ुलं,पाणवनस्पती ज्या पाणी शुद्ध राखण्याचं काम करतात असं विलोभनीय दृश्य दिसत आहे ते बिजिंग महानगरपालिकेच्या त्या कष्टांचं फ़ळ.बिजिंग हे जवळपास दोन कोटी लोकसंख्येचं शहर आज अडीचकोटी हिरव्यागार वृक्षांनी आणि त्याच्या दुपट्ट संखेत फ़ुलांच्या रोपांनी बहरुन गेलं आहे.सगळे वृक्ष,वेली,फ़ुलांची झाडं,गुलाब तजेलदार रंगरुपात,आकर्षक ताज्या टवटवीत रुपात दिसतात.
बिजिंगमधल्या वृक्षराजीचंच नाही तर मी जितकं चीन पाहू शकले त्यापैकी बहुतेक ठिकाणच्या वृक्षसंपदेवर एक स्वतंत्र लेखच लिहिण्यासारखा आहे.चीनी पारंपरिक वैद्यक वृक्षसंपदेवरच प्रामुख्याने आधारलेलं आहे.आधुनिक रंगारुपातलं चीन आपली पारंपारिक वृक्षसंपत्ती जपण्यातलं हित पुरेपुर ओळखून आहे ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटली.चीनमधले पाच हजार वर्षांचे पुरातन वृक्ष सहज पहायला मिळतात,त्यांना राष्ट्रीय संपत्ती मानून जपलं जातं.चिनी नागरिकांच्या मनातही या हिरव्या वृक्षराजीबद्दल अपार आपुलकी असते.चीनी वृक्षराजीबद्दल,तिथल्या एकंदरीतच वाईल्डलाईफ़ बद्दल,जंगलांबद्दल पुढच्या भागात-

Saturday, January 01, 2011

चायना पोस्ट - ४

बिजिंगमधे पाऊल ठेवल्यावर पहिला ठसा उमटतो तो भव्यतेचा.आणि जर संध्याकाळ होऊन गेल्यावर आपण शहरात प्रवेश केला असेल तर लखलखाटाचाही.मात्र शहराला पुरेसं सरावल्यावर रोजच्या रोज ही अशी अतिरेकी दिव्यांची रोषणाई,निऑन्सची आरास गरजेची आहे का हा एक टिपिकल मध्यमवर्गीय विचार मुंबईसारख्या शहरातून येऊनही मनात डोकावल्यावाचून राहिला नाही.
खरं तर बिजिंग शहराला एक प्राचीन असा इतिहास आहे.असा इतिहास असणार्‍या शहरांना वेगळा काही नखरा करायची गरज नसते.त्यांचा इतिहासात,जुनेपणातच त्यांचं स्वतःच असं एक अंगभूत सौंदर्य असतं.बिजिंग शहराच्या आधुनिकीकरणात(बहुतेक ऑलिम्पिकच्या काळात)शहराच्या या अंगभूत सौंदर्याला कुठेतरी बाधा आल्याची एक भावना मनात सारखी डोकावून जात होती.

बिजिंग शहरामधे मोठमोठे चौक आहेत,अनेकपदरी रस्ते आहेत,अनेक मजली फ्लायओव्हर्स आहेत आणि त्याला न जुमानता भरुन वाहणारी,वाहता वाहता ठप्प होणारी वाहतुक आहे.ट्रॅफिक जॅम बिजिंग शहराची इतर कोणत्याही मेट्रो शहरासारखीच अपरिहार्य डोकेदुखी आहे.त्याला तोंड देत वैतागून जात,आकाशात टोकं खुपसून जमिनीवर पसरलेल्या प्रचंड आधुनिक इमारतींच्या जाळ्यामधून वाट काढत आपण पुढे सरकत रहातो,आधुनिक बिजिंगची आता शान झालेलं बर्डनेस्ट स्टेडियम,शहराच्या मधोमध बर्फाचा महाकाय क्यूब कोणीतरी आणून ठेवलेला असावा तसं वितळत्या निळ्या रंगातलं,संपूर्णपणे टेट्राफ्लुरोएथीलीन वापरुन बांधलेले विलोभनीय वॉटरक्यूब स्टेडियम वगैरे पहात फोटो काढत आपण रमलेलो असतो आणि एका क्षणी अचानक एका पुरातन नगराच्या वेशीवर येऊन थडकतो.
बिजिंग शहराच्या अत्याधुनिक परिघाच्या मधोमध असणार्‍या फॉरबिडन सिटीमधला आपला प्रवेश इतका अकस्मात असतो की तिथल्या उत्तुंग,नक्षीदार प्रवेशद्वारामधून आत शिरेपर्यंत आपल्याला आपण एकविसाव्या शतकातून थेट चौदाव्या शतकात प्रवेश करत आहोत हे उमगलेलेही नसते नीटसे.
पण आत पाय ठेवल्यावर मात्र समोर पाताळातून एकदम उगवून वर आल्यासारखे अजस्त्र,खडबडीत,वेडेवाकडे वाढलेले वृद्ध खोडांचे वृक्ष दिसायला लागतात.त्यामागे निळे सोनेरी,आकाशात वळलेल्या छतांचे एका मागोमाग एक लाकडी प्रासाद असतात.त्यांच्या समोर पाषाणांची शिल्पे असतात,गूढ चिनी प्रतिके मांडून सजवलेले प्रासादांच्या पुढचे बगिचे असतात.या सगळ्याची निगा कसोशीने राखण्याचा प्रयत्न करुनही त्यांचे जुनेपण लपलेले नसते.त्यांच्यामधून पाझरणारी शांतता कित्येक शतकांपूर्वीचं जुनेपण अंगावर घेऊन आपल्यापर्यंत पोचते.
फॉरबिडन सिटीचा परिसर काहीच्या काही मोठा आहे.एकुण ३००० प्रासाद आहेत या जागेत.चीनच्या विविध राजघराण्यातल्या सम्राटांचं हे निवासस्थान.सामान्य चिनी जनतेला या प्रासादनगरीच्या दिशेने मान वर करुन पहाण्याचीही मुभा नव्हती.प्रवेश तर पुढची गोष्ट.
गरीब,सामान्य प्रजेला प्रवेश निषिद्ध असला तरी या प्रासादांमधे रहाणार्‍या वयस्क चिनी सम्राटांना त्यांच्या घरी जन्मलेल्या मुली अजिबातच निषिद्ध नसायच्या.दरिद्री चिनी घरातली मुलगी वयात आली की नगरातले चित्रकार त्या मुलीचं जलरंगात चित्रं रंगवत.मग अशी चार पाच चित्रं राजप्रासादत रवाना होतं.सूर्यास्तानंतर सम्राटांपुढे ती चित्रं सादर केली जात.मग सम्राट त्यातल्या त्याला आवडलेल्या एखाद्या चित्रावर बोट टेकवणार.सम्राटांना ही मुलगी आवडली आहे हे कळलं की तिच्या घरच्या लोकांना सात स्वर्ग मिळाल्यासारखा आनंद.कारण त्यांचं घर मग धनधान्याने भरलं जाई.सम्राटांची रात्र या मुलीसोबत घालवून झाल्यावर मग मुलीची रवानगी थेट राजवैद्यांसमोर.अ‍ॅक्युपंक्चरचा वापर करुन त्या मुलीची गर्भधारणेची शक्यता आधी निकालात काढली जाई.
सम्राटांना मुलगी आवडली असेल तर तिच्या रहाण्याची व्यवस्था प्रासादनगरीतल्या असंख्य महालांपैकी एकामधे केली जायची.सम्राटांच्या मुख्य प्रासादाभोवती असा तर्‍हेने बांधत गेलेले,संख्येने वाढत गेलेले हे सगळे'रखेल्यांचे महाल.'किंवा'काँकुबाईन्स पॅलेस'.यथावकाश जर या मुलीला पुत्रप्राप्ती झाली तर तो सम्राटांचा वारस.
पुत्र होवो अथवा न होवो..त्या मुलीचे आयुष्य त्या महालाच्या चार भिंतीच्या आडच जाणार.पुन्हा तिला ना सम्राटांचे दर्शन,ना बाहेरच्या जगाचे.तिच्या महालाभोवती सदैव तृतियपंथियांचा पहारा.हे हिजडे किंवा तृतियपंथिय म्हणजे सामान्य चिनी घरांमधूनच जन्मलेली मुलं.दरिद्री चिनी जनता घरातल्या मुलींना पैशांच्या लोभाने जशी स्वखुशीने सम्राटांच्या हवाली करत तसं घरच्या मुलांनाही करत.त्यांचं खच्चीकरण करुन त्यांना महालाचे पहारेकरी बनवलं जाई.
फॉरबिडन सिटीची एकातएक गुंतलेली असंख्य महालांची वर्तुळं,प्रासादांच्या समोरच्या बागांमधे सम्राटांचं तारुण्य टिकवणार्‍या औषधी वनस्पतींची लागवड,कासव,करकोचे वगैरे दीर्घ आयुष्यमानाची चिनी प्रतिके जागोजाग मांडलेली,सम्राटाच्या निधनानंतर त्याच्या रखेल्यांना त्याच्यासोबत जिवंत पुरण्यासाठी ज्या मार्गांवरुन नेण्यात येई ते मार्ग..हे सगळं पहात हिंडताना,फॉरबिडन सिटीमधे फिरताना माझा जीव गुदमरुन गेला.इंपिरियल पॅलेसचं नक्षीकाम दाखवण्यात आमचा गाईड रमून गेला पण तिथले काढले त्यापेक्षा जास्त फोटो काढण्याचीही मला इच्छा राहिली नाही.
फॉरबिडन सिटीमधे फिरताना आमच्यासोबत लिन होता.तिथल्या युनिव्हर्सिटीमधे समाजशास्त्र शिकवणारा तरुण प्राध्यापक.लिनसोबत त्याचा एक कॅनेडियन मित्र मार्कही होता.लिन बरीच वर्षं परदेशात राहून मग आपल्या आता वय झालेल्या आईवडिलांना सांभाळण्यासाठी पुन्हा चीनमधे परतला होता.मार्कला जेड फॅक्टरी बघण्यात जास्त इंटरेस्ट होता.आपण ती बघायला जाऊया अशी सारखी भुणभुण त्याने लावली होती.त्याच्या कॅनडातल्या गर्लफ़्रेन्डने त्याला जेडची ज्युवेलरी घेऊन यायची विनंती केली होती.त्याच्या चला जाऊया ला वैतागून किंवा तिथल्या त्या सम्राटांच्या क्रूर कहाण्यांचा कंटाळा येऊन तिथून शेवटी आम्ही काढता पाय घेतलाच.
आम्ही तिथून निघता निघता चीनमधल्या एका प्रवासी कंपनीच्या लागोपाठ चार बस फॉरबिडन सिटी बघण्यासाठी येऊन थडकल्या.त्यातून मुंग्यांचं वारुळ फुटावं तशी अनेक चिनी माणसं फॉरबिडन सिटीच्या गेटातून आत शिरली.हे ठिकाण चिनी लोकांच्या आवडत्या पर्यटन स्थळांच्या यादीतलं सर्वात वरच्या क्रमांकावर आहे असं लिन आम्हाला म्हणाला.इतकी असंख्य शतकं जिथे प्रवेशाला परवानगी नाकारली गेली,जिथल्या सम्राटांनी सामान्य जनतेवर फ़क्त जुलूमच लादला,ज्यांच्या घरच्या मुलामुलींना जिथे रखेली आणि हिजडे बनवून नजरकैदेत ठेवलं गेलं त्या प्रासाद साम्राज्याचं आता लयाला गेलेलं रुप असं पुन्हा पुन्हा येऊन न्याहाळण्यात चिनी जनतेला नक्की कोणतं समाधान मिळत असेल काय माहित?लिनकडेही याचं उत्तर नव्हतं.
फॉरबिडन सिटीचा शेवटचा दरवाजा तियानमेन स्क्वेअरमधे उघडतो.निघे निघेपर्यंतही फ़ॉरबिडन सिटीमधल्या दरवाजांचं,प्रासादांचं आणि आतल्या रस्त्यांचं दिशामाहात्म्य आम्हाला समजावून सांगण्याचा आमचा गाईड अतोनात प्रयत्न करत होता पण आम्ही त्याला चांगल्या रेस्टॉरन्टची दिशा दाखवायची विनंती तितक्याच कळकळीने केली.मग त्याने आमचा मोर्चा शेवटी तिआनमेन चौकात वळवला.
दुपारची दोनची वेळ.ऐन माध्यान्हीच्या लखलखीत सूर्यप्रकाशात तो प्रचंड विस्ताराचा राजेशाही चौक न्हाउन निघाला होता.त्या चौकाच्या भव्यतेने पुन्हा एकदा आम्हाला प्रभावित केलं.खूप छान,उत्साही दर्शन होतं त्या प्रशस्त चौकाचं.चेअरमन माओच्या भव्य तैलचित्राखाली उभं राहून फोटो काढून घ्यायची पर्यटकांची झुंबड उडाली होती.
तिआनमेन चौकातल्या विद्यार्थ्यांच्या उद्रेक आणि तो चिरडून टाकण्याच्या तेव्हाच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल,तिथे सांडलेल्या शेकडो कोवळ्या तरुण विद्यार्थ्यांच्या रक्ताबद्दल आमच्या गाईडने’नक्की काय झालं माहित नाही’असं एक निर्विकार चेहर्‍याचं उत्तर देऊन टाकलं.लिन सुद्धा फ़ारसं काही बोलायला उत्सुक दिसला नाही तिथे.जेवताना बोलू असं मात्र म्हणाला.
लिनने तिआनमेन चौकापासून जवळच असलेल्या निवडलेल्या रेस्टॉरन्टमधे आम्हाला जेवायला नेलं तर ते फ़ुल भरलेलं.बाहेर उभ्या असलेल्या लोकांची गर्दी पाहून अजून दोन तास तरी आम्हाला आत प्रवेशाची काहीच शक्यता नव्हती.या रेस्टॉरन्टमधे मिळणारं पेकिंग डक आख्ख्या बिजिंगमधे मशहूर असल्याने लिन आम्हाला खास इथे घेऊन आला होता.आम्ही बाहेरच्या लाकडी बाकावर बसलो.आतून आमच्यासाठी लाकडी उंच कपांमधे गरम रेडटी आला.बशांमधून हिरव्या सोयाबिनचे उकडलेले दाणे,उकडलेल्या शेंगा,व्हिनेगरमधली काकडी,चायनीज कॅबेज,लोण्यावर परतलेली छोटी गाजरे,मक्याची लहान कणसे वगैरे आणून ठेवले गेले.लहान गोल बशांमधे अजून एक पांढर्‍या मुळ्याच्या लांबट चकत्यांप्रमाणे दिसणारा पदार्थ होता.शंका आली की त्या पदार्थाचं कुळ जाणून घेतल्याशिवाय हात लावायचा नाही असा माझ्यापुरता मी चीनमधे नियम घालून घेतला होता.त्या पांढर्‍या मुळ्याच्या चकत्या नसून बदकांच्या जीभा आहेत असं सांगून लिनने माझी शंका खरी असल्याचे सिद्ध केले.
पेकिंग डक खाण्यात तसाही मला इंटरेस्ट नव्हता आणि प्रत्यक्ष जेवणाआधी आणून ठेवलेल्या इतर गोष्टी खाऊनच माझं पोट भरलं म्हणून मी कॅमेरा हातात घेऊन गजबजलेल्या तिआनमेन चौकाच्या आसपासचा परिसर धुंडाळायला निघाले.पण लिन जाऊ देईना.रस्ता विसरुन भरकटत जाण्याच्या आणि कितीही समजावून सांगीतलेला पत्ता सुद्धा सहज विसरुन जाण्याच्या माझ्या अंगभूत वैशिष्ट्याबद्दल माझ्या नवर्‍याने लिनला इतकं सावध करुन ठेवलेलं होतं की तो मला अजिबातच एकट्याने भटकायला जाऊ देईना.बिजिंग शहराचा हा जुना भाग आणि इथलं गल्ल्यांचं जाळ इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यात हरवायला होतं तेव्हा तु निदान इथे तरी एकटं जाऊ नकोस असं लिन मला इतकं कळवळून बजावत होता की आता मला त्या गल्ल्यांचंच आकर्षण वाटायला लागलं.
आम्ही रहात होतो त्या होंगियान शहरातल्या काही गल्ल्या मी श्यूसोबत शॉपिंगला जाताना पाहिल्या होत्या.तिथलं रंगीबेरंगी,सळसळतं चिनी लोकजीवन इतकं वैशिष्ट्यपूर्ण पौर्वात्य होतं की कुणालाही त्याचा मोह पडावा.बिजिंगच्या अत्याधुनिक,भव्य,प्रचंड वास्तू नाहीतर मग प्राचीन,शतकांपूर्वीचे प्रासाद सारखं सारखं बघून तसाही मला पुरेसा कंटाळा आला होता.थक्क होऊन तरी कितीवेळा व्हायचं अशातला सगळा प्रकार.बिजिंगचं दर्शन बिजिंगमधे येणार्‍या पर्यटकांना दिपवूनच टाकायचा असा एक अट्टाहास त्या सगळ्यात होता आणि आता दिपून जाण्याची माझी कपॅसिटी संपली होती म्हणूनही असेल पण मला बिजिंगच्या गल्ल्यांमधून फ़िरायची ओढच लागल्यासारखी झाली होती.
शेवटी मी एकटं जाऊ नये,त्या तिघांचं जेवण होईपर्यंत चौकातल्याच सुव्हेनियर शॉपमधे वेळ काढावा आणि मग दुपारी समर पॅलेस(पुन्हा एकदा सम्राटांचे प्राचीन प्रासाद-यावेळी उन्हाळी)बघण्याचा कार्यक्रम होता त्याऐवजी बिजिंगच्या हुटॉन्ग्जमधली सैर करवून आणण्याचं लिनने कबूल केलं.आणि त्याप्रमाणे त्यादिवशी सायकल रिक्षा करुन आम्ही त्या हुटॉन्ग्जमधे उरलेला संपूर्ण दिवस भटकलो.
बिजिंगच्या हुटॉन्ग्जची सैर हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.इतका की मग दुस-या दिवशी आणि त्यानंतर बिजिंगमधे आम्ही होतो त्या दिवसांत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधी आम्ही दोघं,कधी मी आणि लिन,कधी मी एकटी सुद्धा त्या हुटॉन्ग्ज मधून फ़िरत राहिले.
-- continued..

Wednesday, November 24, 2010

चायना पोस्ट-तीन (श्यूच्या घरी.पीच फार्मवर)

या आठवड्यात मधे एक चिनी सण होता.ड्रॅगन फेस्टीवल.सुझन म्हणजे श्यूचा एसेमेस आला की ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे.तुला यायचय कां?मी एका पायावर तयार झाले.
श्यूचे वडिल होंगियानपासून जरा लांब लिन हाय नावाच्या शहराजवळ रहात होते.त्यांच्या पीचच्या बागा होत्या.ताज्या,तयार पीचची नुकतीच तोडणी झाली होती.श्यूच्या आईचा आग्रह होता की पीच खायला श्यूने घरी यायलाच हवय.
श्यू आणि मी त्या दिवशीच्या शॉपिंगनंतर खूप भटकलो होतो.चायनिज ब्यूटी सलूनमधे,सुपरमार्केटमधे,बागेत वगैरे अनेक ठिकाणी.इंग्लिश आणि चायनिज बोलू शकणारी श्यू सारखी लोकल मुलगी बरोबर असल्याने मला खूप निर्धास्त वाटायचं.शिवाय ती बार्गेनही मस्त करायची.एका कन्फ्युशियस टेम्पलबाहेर असणार्‍या जेडच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून मला हवी असणारी जेडची बांगडी तिने त्या दुकानदाराने आठशे युआन किंमत सांगितल्यावर बराच चिनी कलकलाट करुन तिने मला ती शंभर युआनला मिळवून दिल्यापासून माझा तिच्याबद्दलचा आदर फारच वाढला होता.श्यूजवळ भयंकर पेशन्सही होता.माझ्या निरुद्देश भटकत रहाण्याचा,चालताना असंख्य अडाणी,बारिकसारिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा,सारखं थांबून काही ना काही गोष्टींचे फोटो काढण्याच्या टिपिकल टुरिस्टी उत्साहाचा तिला कधी कंटाळा येत नाही.
श्यूच्या घरी जाण्यासाठी आम्ही भल्या सकाळी सहा वाजता होंगियानच्या बसस्टेशनवर गेलो.बसस्टेशन चकचकीत आणि एअरपोर्टसारखं सजलेलं.सुरक्षाव्यवस्था सुद्धा तशीच.सामानाचं स्कॅनिंग,चेकइन अगदी साग्रसंगीत.काडीवर आईसफ्रूटसारखे लांबट लालसर मासाचे तुकडे लावून ते विकायला अनेक जण येत होते.
श्यूने आम्ही गेल्यावेळी घेतलेला ड्रेस घातला होता.खरं तर हा पार्टीफ्रॉक.त्यामुळे बरंच अंग उघडं टाकणारा आणि अगदी तोकडा.श्यूला छान दिसत होता पण तरी बसप्रवासाच्या दृष्टीने अगदि अयोग्य असं मला वाटून गेलं.पण ती बिनधास्त होती.इथे जनरलीच अत्यंत शॉर्ट ड्रेसेस घालायची फॅशन आहे.मात्र रस्त्यांवर,बसमधे किंवा कुठेही कधिच इव्हटिझिंगचा त्रास नसतो.चीनमधे रात्रीबेरात्रीही मुली बिनधास्त एकेकट्या फिरु शकतात.अतिशय सेफ आहे त्यादृष्टीने संपूर्ण चायना.
या बसचा पाऊण तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही लिनहाय शहरात पोचलो.तिथून एक दुसरी बस घेतली.त्यातून अर्धा तास प्रवास.आता डोंगराळ,खेड्यांमधून प्रवास सुरु झाला.हवा कमालीची गार झाली.एका अगदी साध्या,धुळीने भरलेल्या खडबडीत रस्त्यावरच्या स्टॉपवर आम्ही उतरलो.श्यूचं गाव अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.पण आम्ही इथे उतरलो कारण इथे भाज्यांच मार्केट आहे.मी शाकाहारी असल्याने श्यू माझ्यासाठी भाज्या,टोफू वगैरे घेऊन घरी जाणार आहे.तिच्या गावात ताज्या भाज्या रोज येत नाहीत.
भाज्या आणि मास इथे शेजारी शेजारीच हारीने लावून ठेवलेलं होतं.आख्खे सोलून ठेवलेले विविध आकारांचे अगम्य प्राणी,अ‍ॅल्युमिनियमच्या टोपांमधले समुद्री जीव,प्लास्टीकवर मांडून ठेवलेले रांगते,सरपटते जीव यांच्यामधून मी जीव मुठीत धरुन कशीतरी भाज्यांच्या एका स्टॉलवर श्यूचा हात धरुन पोचले.चिनी भाजीवाले आणि वाल्या प्रचंड कुतूहलाने माझ्या भारतीय अवताराकडे पहात होत्या.इंदू इंदू करत मधूनच हाका मारत खुदूखुदू हसत होत्या.स्टॉलवर बांबूचे कोंब,चायनिज कॅबेज,गाजरे,फरसबी,समुद्र वनस्पती,सोयाबिनच्या हिरव्या शेंगा,ताजे टोफूचे स्लॅब्स,टोमॅटो,मश्रूम्स यांचे जीव हरखवून टाकणारे ताजे,टवटवीत ढीग होते.श्यूने प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं.




मग जवळच्या टपरीवरुन कोकचा मोठा चार लिटरचा कॅन घेतला आणि आम्ही एका सायकल रिक्षात बसलो.अगदी डगमगती सायकलरिक्षा.ओढणारा चिनी दणकट बांध्याचा.या सगळ्या सायकलरिक्षा चालवणार्‍यांची कपड्यांची स्टाईल अगदी एकसारखी.गुडघ्यापर्यंत पोचणार्‍या अर्ध्या चड्ड्या आणि अर्ध्या बाह्यांचा रंगित शर्ट पोटावरुन गुंडाळत छातीपर्यंत दुमडून घेतलेला.बरेचसे चिनी दुकानदार,रस्त्यावरचे विक्रेते वगैरे हे असे पोटं उघडी टाकून फ़िरत असताना इतकी विचित्र दिसतात.
श्यूच्या गावात पोचेपर्यंत तो सायकलरिक्षावाला मागे वळून अखंड बडबडत होता.श्यू मधून मधून त्याचं बोलणं अनुवाद करत मला सांगत होती.यावर्षी पाउस जास्त झाला त्यामुळे पीचच्या फ़ळांचं नुकसान झालं आहे.फ़ळांच्या साली काळ्या पडल्या त्यामुळे भाव कमी आला.नुकसान झालं.सरकारी मदत मिळाली तरच निभाव लागणार यावर्षी वगैरे.मला एकदम मी नाशिकजवळच्या द्राक्षांच्या मळेवाल्यांची गार्‍हाणी ऐकतेय असा भास झाला.
लिनहाय आणि आजूबाजूचा हा सारा भाग पीचच्या बागांसाठी प्रसिद्ध.बहुतेकांच्या बागा आहेत.उरलेले सारे तोडणीच्या कामाचे मजूर.गाव बर्‍यापैकी गरीब.रस्ते मातीचे.पण आजूबाजूला कमालीची स्वच्छता.कुठेही कचराकुंड्यांमधून बाहेर वहाणारा कचरा नाही,प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे नाही की गावातला टिपिकल बकालपणा नाही.चीनमधे आपल्याकडे असतात तशाच प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर आहे.पण त्या पिशव्यांचा कचरा किंवा प्रदुषण दिसलं नाही.एकंदरीतच चीनमधे कचरा समस्या कशी हाताळतात हा एक स्वतंत्र,इंटरेस्टींग विषय आहे.बिजिंगसारख्या मोठ्या शहरात कित्येक टन कचरा उचलण्याचा बॅकलॉग रोज शिल्लक रहातो अशा तर्‍हेच्या बातम्या चीनी सीसीटीव्ही या(एकमेव)चॅनेलवरुन कानावर पडायच्या.पण इतर मध्यम,लहान आकारांच्या शहरांमधे चिनी रोजच्यारोज प्रचंड संख्येने कचरा पैदा करत असतात.स्टायरोफ़ोमचे डिस्पोजेबल कप,प्लेट्स,पॅकिंग मटेरियल,प्लास्टिकच्या बाटल्या,चॉपस्टिक्स,खाण्यापिण्याचे ऑरगॅनिक वेस्ट यांचे ढिगारेच्या ढिगारे रात्री उशिरा दुकाने बंद आणि रस्त्याकडेची रेस्टॉरन्ट्स बंद झाल्यावर फ़ूटपाथच्या कडेला गार्बेज बॅग्जमधे भरुन लावून ठेवलेले असतात.ओला-सुका, रिसायकलिंगसाठीचा वगैरे कचर्‍याचं वर्गिकरण वगैरे काहीही केलेलं नसतं.मग त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावतात हे जाणून घेणं इंटरेस्टींग आहे शहर व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून.पण ते नंतर.
लिनहायमधे घरं दगडांनी बांधलेली.काहींना बाहेरुन गिलावाही दिलेला नाही.


एका पायवाटेवरुन बरच आत चालत गेल्यावर श्यूचं घर आलं.घराला बाहेर मोठा दरवाजा आणि आत एक रिकामा मोठा हॉल.त्यात पीचतोडणीला लागणा-या बांबूच्या टोपल्या,मोठ्या कात्र्या,आणि इतर अवजारे,टोपल्या वगैरे भिंतीला अडकवून,टेकवून ठेवलेले.तीनचार सायकली आणि एक लाकडी बसायचा बाक.चिनी सिनेमांमधल्या शेतकरी चिनीलोकांच्या डोक्यांवर ह्मखास दिसणार्‍या त्या टिपिकल बांबूच्या कामट्यांच्या विणलेल्या मोठ्या कडांच्या हॅट्सही टांगलेल्या.




भिंतीवर चेअरमन माओचा फ़ोटो.एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअर.त्यावर चाललेला चिनी सिनेमा श्यूची मावशी आणि म्हातारी आजी टक लावून पहात बसलेल्या.श्यूची आई बाहेर गेली होती ती नंतर आली.श्यूचे वडिल.त्यांच नाव सॉंग.अगदी गरीब,लाजाळू स्वभावाचे,डोळ्याच्या कडांना सुरकुत्या पाडत हसणारे,घोट्याच्या वर दुमडलेल्या ढगळ पॅन्ट घातलेले मध्यमवयिन शेतकरी गृहस्थ.श्यू आपल्या आईवडिलांबद्दल बसमधून येताना खूप काही आदराने सांगत होती.अगदी अभावग्रस्त परिस्थितीत श्यू आणि तिच्या बहिणीला त्यांनी मोठं केलं,शिक्षण दिलं,कर्ज झालं तरी मुलींना काही कमी पडू दिलं नाही.साँग कुटुंबिय आणि लिनहाय गाव पर्ल बकच्या कादंबरीतून उचलून आणल्यासारखं वाटायला लागलय मला एकंदरीत.

श्यूच्या बाबांनी कोकचे ग्लास भरुन बाहेर आणले आणि आम्ही स्थिरस्थावर होतोय इतक्यात वीज गेली.टिव्ही बंद झाला.श्यूची आजी दु:खाने काहीतरी पुटपुटली आणि बाहेर निघून गेली.आता संध्याकाळपर्यंत पॉवर येणार नाही.श्यू म्हणाली.चीनच्या मोठ्या शहरांमधे जरी वीजेचा झगमगाट असला तरी उर्वरीत चीनमधे,विशेषत:अशा गावांमधे वीजेचा तुटवडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजूनही आहे.बिजिंग ऑलिम्पिकनंतर तर पॉवरकटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे.सहा सात तास वीज जाणं हे नेहमीचंच आहे असं श्यू म्हणाली.
श्यूची मावशी हॉलच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरात गेली आणि श्यू आणि मी बाकी घर बघायला जिन्यावरुन चढून वर गेलो.वर तीन बेडरुम्स आणि टॉयलेट.ते मात्र चकचकीत,पाश्चात्य पद्धतीचे.चीनमधे गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केलेल्या सुधारणांमधे ही एक म्हणजे पाश्चात्य टॉयलेट्स सर्वत्र,सार्वजनिक ठिकाणांवर सुद्धा अतिशय स्वच्छतेने मेन्टेन केलेली.काही ठिकाणी पौर्वात्य पद्धतीची म्हणजे भारतात असतात तशी टॉयलेट्स अजूनही आहेत पण त्यांचं प्रमाण जवळपास नाहीच.खेड्यांमधे सुद्धा स्वच्छता दिसण्याचं कारण हेही एक.

घराच्या मागे छोट्या पॅचमधे चिनी हर्ब्जचं गार्डन.आपल्याकडच्या तुळशींसारखी रोपटी.कोरफ़ड आणि एक विशिष्ट गुलाबी छटेची लहान फ़ुलं येणारी रोपं.चिनी लोकं अजूनही पारंपारिक चिनी वैद्यकाला खूप मानतात.चिनी हर्ब्ज,फ़ुलं घातलेलं गरम पाणी दिवसभर कधीही पितात.हिरव्या पानांचा चहा पिणं पूर्वीपासून प्रतिष्ठित लोकांमधेच जास्त प्रचलित.सामान्य,गरिब चिनी जनतेला ग्रीन टी परवडत नाही.हर्ब्ज,सुकवलेली मोग-याची,जिरॅनियमची फ़ुलं घातलेल्या गरम पाण्यालाही ते चहाच म्हणतात.चिनी भाषेतला चहाचा उच्चार आपल्या चाय च्या जवळचा.
श्यूची मावशी मला काहीतरी हातवारे करुन विचारत होती.मला काही केल्या कळेना.श्यू आसपास नव्हती.इतक्यात श्यूची लहान मावसबहिण शाळेतून आली.तेरा चौदा वर्षांची.तिने उत्साहाने दप्तरातून इंग्रजीचं पाठ्यपुस्तक काढलं.तिला इंग्रजी वाचता येत होतं पण बोलता येत नव्हतं.सराव नाही म्हणून.पुस्तकातल्या इंग्रजी शब्दांवर बोट टेकवत तिने मावशीचं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं.मावशी म्हणत होती तिला चिनी पद्धतीचा ब्रेड करता येतो तो मला चालेल कां?आणि आज सण होता त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन कां?शाकाहारी असेल तर मला काहीही चालण्यासारखं होतच.
मावशीने पांढर्‍या पिठाचे गोळे फ़्रीजमधून काढले.लाकडी ओट्यावर एक खोलगट वोक आतमधे बसवला होता.दुसर्‍या बाजूला जरासा उथळ तवा बसवलेला होता.लाकडी ओट्यामागे चुलीला असते तशी आत लाकडं टाकून पेटवायची सोय होती.गॅसचं सिलिंडर होतं पण ते महाग पडतं त्यामुळे रोजचा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवरच होतो असं श्यूने सांगितलं.मावशीने उथळ तव्यावर झाकण ठेवून पांढर्‍या पिठाचे गोळे भाजत ठेवले.आणि भाज्या चिरायला लागली.तिचं सटासट बारिक तुकडे करत भाज्या चिरण्याचं कौशल्य बघण्यासारखं होतं.


भाज्या चिरुन होईपर्यंत श्यूची आई आली.हसरी,गोड आणि जेमतेम पंचविशीची वाटेल अशी.भाषा येत नव्हती त्यामुळे माझ्या खांद्यांवर हात टेकवून,हसून बघत तिनं बिनभाषेचं उबदार स्वागत करत मला स्वयंपाकघरातच ये असं खुणावलं.
त्यानंतरच्या अर्ध्या तासात मला चिनी पाककला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पहायला मिळाला.एकामागून एक चिनी भाज्या,नूडल्स,टोफ़ू,भाताचे प्रकार श्यूची आई इतक्या झटपट बनवत होती आणि सगळं त्या एकाच खोलगट वोकमधे.नुसतं थोडं तेल टाकून त्यावर आलं,लसणाचे काप टाकून कधी गजर-मटार-सिमला मिरची,कधी समुद्र वनस्पती,कधी टोफ़ू-टोमॆटो,चायनिज कोबी-बटाटे असं सगळं एका मागून एक परतत ती डिशेस भरत होती.काही भाज्यांवर घरगुती राईस वाईनचा शिपकारा मारुन स्मोकी चव आणत होती.बाजूच्या शेगडीवर एका वाडग्यात खास चिनी जातीचा बुटका तांदूळ रटरटत होता.त्यात घरगुती गुळ घालून त्याचा खिरीसारखा पदार्थ बनवला होता.



सणासाठी त्रिकोणी सामोश्यासारखे मोमो बनवून त्यात समुद्र वनस्पती-शैवालांपासून बनवलेले सारण भरले होते.हे मोमो समुद्रात अर्पण करतात ड्रॅगन फ़ेस्टीवलच्या दिवशी.या सणामागची कथा इंटरेस्टींग होती.
फ़ार प्राचीन काळी म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्य आजच्यासारखे मलूल नव्हते,तेजस्वी होते आणि लोक दयाळू होते तेव्हा एका गावात एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन प्रेमी रहात होते.समुद्रात जाऊन मासे मारुन आणताना एकदा एक अजस्त्र राक्षसी लाट गावावर चाल करुन येताना त्यांनी पाहिली.गावाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रॅगन देवाचा धावा केला.ड्रॅगनने त्यांना पाठीवर बसायला सांगितले आणि मग ते त्या लाटेचा मुकाबला करायला समुद्रात शिरले.ड्रॅगनने त्या लाटेला अडवायचा खूप प्रयत्न केला.लाट मागे गेली पण ते दोघे प्रेमी समुद्रात बुडाले.गावकर्‍यांनी त्यांना खूप शोधलं पण त्यांची प्रेत मिळाली नाहीत.त्यांचा समज आहे की ड्रॅगनच्या आशीर्वादामुळे ते दोघे जिवंतच आहेत समुद्रात म्हणून त्यांना या दिवशी हे गोड जेवण समुद्रात अर्पण करुन देतात.मोमोमधे भरायचे सारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असते.
श्यूच्याआईने त्यादिवशी तब्बल चौदा भाज्यांचे प्रकार,तांदूळाचीखीर,चिनी ब्रेड,मोमो,नूडल्स,पीचचा मुरंबा,ताजी फळे असे भरगच्च प्रकार बनवून जेवायचे टेबल भरुन टाकले.अत्यंत चवदार.त्यानंतर बिजिंग,शांघाय,होंगझो वगैरे ठिकाणी खास चिनी शाकाहारी पदार्थ मोठमोठ्या हॉटेल्समधून शेफ़ला सूचना देऊन बनवून घेतलेले सुद्धा खायला मिळाले.पण या प्रेमळ चिनी कुटुंबातील घरगुती आदरातिथ्यात ज्या अप्रतिम चिनी जेवणाचा अनुभव घेतला तो केवळ अशक्य.जेवताना श्यूच्या वडिलांनी घरगुती वाईनने बशा भरल्या.चिनी कुटुंबात मुली,बायकांनी बिअर पिणे उथळपणाचे लक्षण मानतात.पण वाइन प्यायलेली चालते.नव्हे तसा आग्रहच असतो.फ़क्त ती वाईन घरी बनवलेलीच हवी.आम्ही प्यायली ती वाईन यामे आणि प्लम या दोन फ़ळांच्या आणि तांदळाच्या मिश्रणातून बनवल्याची माहिती श्यूने दिली.




जेवणानंतर आमचा फ़ोटोंचा कार्यक्रम झाला.श्यूच्या आईला फ़ोटो काढून घ्यायचा खूप उत्साह होता आणि वडिल लाजत होते.

आमची जायची वेळ झाली तेव्हा आम्हाला पोचवायला बस्टस्टॉपपर्यंत सारं कुटुंब आलं.श्यूच्या वडिलांच्या खांद्यावर एक मोठी पेटी आणि हातात एक करंडी होती.ओझं खूपच जड वाटत होतं म्हणून मी कुतूहलाने चौकशी केली.श्यू हसली आणि काही बोलली नाही.बसस्टॉपवर उभी असलेली तमाम चिनी मंडळी माझ्या भोवती गोळा झाली.’नी हाव’म्हणजे चिनी हाय हॅलोचा कलकलाट झाला.माझ्या गालांना काही चिनी काकूंनी हात लावला.मी फ़ोटो काढायला गेले तेव्हा सगळे ओळीत उभे राहिले.मला त्यांचा उत्साह,कुतूहल मजेशिर वाटले.श्यू म्हणली आमच्या खेड्यात येणारी तु पहिलीच भारतीय.म्हणून सगळे खुश आहेत.मी सुद्धा हे ऐकून खूशच झाले.




बस आली तेव्हा लगबगीने श्यूच्या वडिलांनी हातातला खोका आणि करंडी आमच्या पायाशी रचून ठेवले आणि तेही बाजूच्या सीटवर बसले.पुढच्या बसस्टॉपवर पुन्हा त्यांनी ते सामान उचलले आणि आमच्या दुसर्‍या बसमधे ठेवले.श्यूला काही सूचना दिल्या आणि ते उतरले.
होंगियान स्टेशनवर तो जड खोका आणि करंडी उचलून टॅक्सीत ठेवताना आमच्या नाकीनऊ आले.त्यात झिमझिम पाऊस सुरू झाला.टॅक्सीत बसल्यावर मी वैतागतच श्यूला विचारले काय इतकं घेऊन घरी चालली आहेस?श्यू म्हणाली हे तुझं सामान आहे.माझं नाही.मी थक्क.म्हटलं आहे काय यात?पीच.आणि प्लम.मी अवाक.
इतके?हो.पीच एकुण नव्वद आहेत आणि प्लम पन्नास.आणि वडिल म्हणाले एका आठवड्यात संपवायला लागतील.
नव्वद पीच आणि पन्नास प्लम.जेवणाच्या टेबलावरच्या चौदा भाज्या.चिनी आदरतिथ्याने थकून जात मी टॅक्सीच्या सिटवर मान टेकवून झोपी गेले.
---------------------------------
होंगियानमधे परतलो तेव्हा काळोख गडद झाला होता.जॉगर्स पार्कमधे चिनी मुली संगिताच्या तालावर मोहक नाचत होत्या.अतिशय तालबद्ध आणि सिन्क्रोनाईज्ड हातापायांच्या हालचाली.बागेमागच्या नदीत काहीजण गळ टाकून मासेमारी करत बसले होते.मध्यमवयीन चिनि पुरुष तायकान्डोचे व्यायाम करत होते.चिनी आज्या सफ़रचंदी गालांच्या नातवंडांना फ़िरवत होत्या.पाण्याच्या काठावरच्या दिव्यांचा झगमगाट नदीवर पसरला होता.
नदीच्या दुसर्‍या तीरावर मोठमोठी सरकारी चिनी होर्डिंग्ज होती.त्यापलीकडचे काहीही दिसत नव्हते इतक्या जवळजवळ आणि उंच होर्डिंग्ज.शहरांबाहेरच्या हायवेच्या किंवा फ़्लायओव्हरच्याही एका बाजूला अशीच उंचच उंच साउंड बॅरिकेड्स आणि होर्डिंग्ज असतात.पलिकडचं काही दिसूनच नये याची दक्षता घेत उभारल्यासारखी.
नदीपलीकडच्या तीरावरच्या या होर्डिंग्जमागे जुनं होंगियान शहर आहे.
तिथे काय आहे?ते असं लपवलं कां आहे?तिथे असाच झगमगाट आहे की वीजतुटवडा आहे?स्वच्छता आहे की कचर्‍याचे इथून उचललेले ढीग तिथे विल्हेवाटीला नेऊन टाकतात?समृद्धी आहे की अभाव?
चीनमधे असे प्रश्न विचारायची मुभा नाही आणि सोयही नाही.पर्यटकांना तर नाहीच नाही.त्यांनी असे प्रश्न विचारले तरी उत्तरे मिळत नाहीत.स्थानिक लोकं इतर बाबतीत भरपूर बोलतात.चिनी प्रगतीबद्दल बोलताना त्यांचं तोंड थकत नाही.पण त्यापलीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांना वेळ नसतो.अचानक त्यांना इंग्रजी कळेनासं होतं.
--------------------------------
परवा रविवारी जवळच्या डोंगरावर आपण सगळे ट्रेकिंगला जाऊया.तुम्ही दोघं आणि मी आणि ज्यो.खूप प्रसिद्ध आहेत इथले ट्रेकिंग रुट्स.श्यू म्हणाली.मला आवडलं असतं.पण पुढचे सलग दोन आठवडे आम्ही चिनी पर्यटनाला जाणार होतो.शांघाय,बिजिंग बघायला.चीनची भिंत,फ़ॉरबिडन सीटी,तियान्मेन स्क्वेअर,समर पॅलेस,शियांचं टेराकोटा वॉरियर वगैरे.होर्डिंग्जपलीकडची जुनी चिनी शहरं काही बघायला मिळणार नव्हती पण शतकांपूर्वीचे प्राचीन राजवाडे,भिंती,चिनी साम्राज्याचे अवशेष येत्या दोन आठवड्यांमधे दिसणार होते.ते बघायला हवेच होते.
बिजिंग शहरातल्या प्रशस्त,भव्य रस्त्यांच्या जाळ्यापलीकडे समांतर अशा जुन्या बिजिंग शहरातल्या अनेक गल्ल्या आहेत.हुटॉंग्ज नावाने त्या प्रसिद्ध आहेत.गेल्या काही दशकांतल्या,विशेषत:ऑलिम्पिकच्या काळात बिजिंगमधे झालेल्या कायापालटामधे नवं,अत्याधुनिक बिजिंग शहर वसवलं गेलं,स्कायस्क्रॅपर्सनी बिजिंगचं आकाश भरुन गेलं.पण या हुटॉंग्जमधून अजूनही पारंपारिक,जुन्या चिनी पद्धतीची घरं,संस्कृती पहायला मिळते.
अत्याधुनिक,झगमगाटी नवं बिजिंग आणि हजारो वर्षांपूर्वीची फ़ॉरबिडन सीटी अजूनही जशीच्या तशी आपल्या पोटात ठेवलेलं प्राचीन बिजिंग.यांच्या मधला एक फ़ार मोठा काळाचा तुकडा या हुटाँग्जमधे अजूनही शिल्लक आहे.सगळ्याच हुटाँग्ज होर्डींग्ज मागे आणि मॉल्सच्या लखलखाटामागे दडवून ठेवणं चिनी सरकारला जमलेलं नाहीच.
बिजिंगमधे असताना या हुटाँग्जमधून फ़ेरफ़टका मारण्याची संधी अनेकदा घेतली.त्यासगळ्या अनुभवांवर पुन्हा कधीतरी.

चायना पोस्ट-दोन

सुझन आणि चिनी बाजार

रविवारी सकाळी साडेआठलाच सुझनचा फोन आला की आपण शॉपिंगला जाऊया कां?मी एका पायावर तयार.शॉपिंगच्या निमित्ताने शहरात भटकता आले असते.
सुझन विशीतली हसरी,खेळकर चिनी मुलगी आहे.इथे जॉब करते आणि एक लहान अपार्टमेन्ट भाड्याने घेउन दोन मैत्रिणींसोबत शेअर करुन रहाते.सुझनची आणि माझी ओळख जॉगर्सपार्कमधे झाली.माझ्या नवर्‍याच्या ऑफिसात ती बरेचदा इंटरप्रिटर म्हणून यायची त्यामुळे त्याची आणि तिची ओळखही होती.
सुझनला बर्‍यापैकी इंग्रजी येतं.पण तिला शांघायला जॉब करायचाय आणि आत्ता येतय तितकं इंग्रजी तिथे पुरेसं नाही म्हणून तिला शक्यतो जास्तीतजास्त इंग्रजी बोलण्याचा सराव हवाय.प्रोफेशनल क्लासेसची फी परवडत नाही.म्हणूनही ती माझ्याशी मैत्री करत आहे असं तिने बर्‍यापैकी स्पष्टपणे सांगून टाकलं.माझी काहीच हरकत नव्हती.
होंगियान औद्योगिक शहर असल्याने इथे नोकरीच्या निमित्ताने एकट्या रहाणार्‍या खूप मुली आहेत.त्यांची एक वेगळीच दुनिया आहे.कामांचे प्रचंड तास आणि फक्त रविवारी सुट्टी असल्याने सुझनला मला भेटायला जास्त वेळ येता येत नाही पण तिचे सारखे फोन आणि एसेमेस सुरु असतात.
सुझन बरोबर वेळेवर आली.तिच्यासोबत एक मित्र होता.ज्यो.तिने ओळख करुन दिली.त्याला इंग्रजी काही बोलता येत नव्हते त्यामुळे तो फक्त सारखा डोळे अजून बारीक करत हसत होता.कॉफी पिऊन तो गेला.ज्यो आपल्याबरोबर शॉपिंगला का नाही येणार असं मी सहज सुझनला म्हणाले तर ती लगेच उत्तरली.कशाला येईल?तो काही माझा बॉयफ्रेन्ड नाही.आता यामागे काय लॉजिक मला कळलं नाही.म्हटल मित्र तर आहे ना?तर म्हणाली नाही.त्याचं लग्न झालय आणि त्याची मुलगी आणि बायको दुसर्‍या शहरात असतात.जेमतेम विशीच्या दिसणार्‍या ज्योला मुलं वगैरे आहे हा धक्काच होता.
चीनमधे असे धक्के सारखे बसतात.तिथल्या लोकांची वयच कळत नाहीत.एकतर सगळे एकजात स्लीम आणि त्वचा कमालीची नितळ.शिवाय तलम,काळ्याभोर,चमकदार केसांचं वरदानच सगळ्यांना.चिनी मुलींचे ते मोकळे ठेवलेले,सळसळीत सुंदर केस हेवा वाटायला लावणारे असतात.काही वेळा बीड्सचे रबरबॅन्ड्स किंवा पिना लावून त्या ते अनोख्या पद्धतीने मागे वळवून बांधतात.मात्र कसेही बांधले तरी कपाळावर रुळणार्‍या बटा हव्यातच.चिनी मुलींची ही लेटेस्ट फॅशन.सुझनच्या कपाळावरच्या बटाही अगदी डोळ्यांवर झुकलेल्या.
टॅक्सी न घेता आम्ही चालतच रस्त्यावरुन निघालो.आम्ही रात्री ज्या कॉफीहाऊसच्या रस्त्यावरुन फिरायचो त्याच रस्त्यावरुन थोडच पुढे जाउन सुझन एका लहानशा गल्लीतून आत वळली.चीनच्या भव्य रस्त्यांवरुन पटकन आत वळणार्‍या ह्या गल्ल्या खूप डिस्क्रिट असतात.आपल्याला तर दिसतच नाहीत.कुठल्या तरी दुकानाच्या शोकेसच्या बाजूने ही गल्ली आत वळली होती.
आत वळलो आणि एकदम बाजाराची गजबजच अंगावर आली.पाश्चात्य संस्कृतीतून एकदम पौर्वात्य संस्कृतीत पाय ठेवल्यासारखं झालं.गोंधळ,गजबजाट आणि गडबड.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने दुकाने.सेलचे कपडे बाहेर टांगलेले.रस्त्यांवरही कपड्यांचे ढीग.आपल्या फॅशनस्ट्रीट किंवा लिंकिंग रोडसारखाच प्रकार.काही चिनी वयस्कार बायका कडेला बसून घट्ट भिजवलेल्या डोशासारख्या पिठाचे तापलेल्या मोठ्या तव्यावरुन पातळ,पापुद्र्यासारखे डोसे काढत होत्या.घट्ट गोळा डायरेक्ट तव्यावरच फिरवायच्या.मग ते पातळ डोसे एकावर एक ठेवून,चार-पाच डोशांची गुंडाळी करुन विकायच्या.काही बायका खुर्च्यांवर बसून शर्टांवर नाहीतर जीन्सवर बारीक भरतकाम करत होत्या.काही कडधान्य निवडत गप्पा मारत होत्या.हातगाडीवर उकडलेली मक्याची कणसं,रताळी,बटाटे,शिंगाडे विकत होते.यामे,चेरी,सफरचंदाचे ढीग होते.
आम्ही दुकानांमागून दुकानं बघत जात होतो.सुझनला काहीच पसंत पडत नव्हतं.तिला एक छान पार्टीफ्रॉक हवा होता.आणि मॅचिंग शूज आणि बॅग.होंगझो नावाच्या दुसर्‍या शहरात त्यांच्या कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींच गेटटुगेदर होतं पुढच्या वीकेन्डला.तिच्या बजेटमधे बसणारा फ्रॉक शेवटी एकदाचा मिळाला.माझ्याकडे खूप छान कपडे नाहीयेत.फक्त जीन्स आहेत.त्यामुळे मला एकही बॉयफ्रेन्ड अजून मिळालेला नाही असं नंतर ज्यूस पिताना सुझन म्हणाली तेव्हा मला मजाच वाटली.
पण सुझन गंभीर होती.कॉलेजात असताना एकही बॉयफ्रेन्ड नसणं म्हणजे आमच्याकडे खूप हसतात सगळे.एकटं पडायला होतं. कुठे जाताना जोडीदार कोणीतरी लागतोच सोबत.म्हणून मग मी ज्यो बरोबर मैत्री ठेवलीय.सुझन सांगत होती.
म्हटल कसा हवाय तुला बॉयफ्रेन्ड?तर म्हणाली मला चीनी दिसणारी मुलं आवडत नाहीत.भारतीय सुद्धा नाही.मला लिओनार्दो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट सारखा दिसणारा बॉयफ्रेन्ड हवा आहे.म्हणूनच मला शांघायला जायचय.तिकडे खूप वेस्टर्नर्स असतात. मी पुन्हा थक्क.मला आपलं वाटलेलं सुझनला शांघायला जॉब करायचाय म्हणजे करिअर पुढे न्यायच्या दृष्टीने तिला ते महत्वाचं वाटत असणार.तर हे वेगळंच.
सुझनच्या इतर मित्रमैत्रिणींशीही नंतरच्या काळात बर्‍यापैकी ओळख झाली.सगळ्या वीस ते तेवीस वयोगटातल्या.वेगवेगळ्या लहान गावांहून होंगियानमधे नोकरीसाठी आलेल्या.स्वतंत्र, अनिर्बंध आयुष्य.पाश्चात्य संस्कृतिची कमालीची ओढ.फॅशन्स, कपडे,मेकप,ब्यूटी ट्रीटमेन्ट्स यात बराचसा पगार खर्च होतो.घरी जेवण कोणीच बनवत नव्हत्या.वेळच नसतो आणि येतही नाही.दुपारचे जेवण फॅक्टरीमधे मिळते.सकाळी इथे सगळीकडे रस्त्यावर कुठेही सहज मऊ,पेजेसारखा चिकट भात आणि त्यात भाज्या,बीफ घातलेले,किंवा सूपसारख्या पातळ पदार्थात राईसनूडल्स घालून वाडगे तयार ठेवलेले असतात.जॉबला जाताना बहुतेक तेच खाऊन जातात.बाकी इतरवेळी सूर्यफुलाच्या,कलिंगडाच्या भाजलेल्या बिया सोलून किंवा सोयाबिनचे भाजलेले दाणे खात रहायचे.स्मोकिंगचं प्रमाण प्रचंड.मुलगे-मुली दोन्हींमधे.सुझनची मैत्रिण म्हणाली स्मोकिंगमुळे वजन वाढत नाही.कमी वजन असण्याचं इतकं कमालीच ऑब्सेशन चीनी तरुणींना आहे.अक्षरश:वीतभर कंबर आणि पेन्सिलसारखी फिगर असली तरी मी जाडी दिसतेय असं म्हणणार्‍या चिनी मुली बघितल्यावर मला आपल्याकडच्या झिरो फिगर क्रेझचं आश्चर्य वाटेनासं झालं.जेवताना स्टरफ्राईड भाज्या समोर आल्या की,त्यातली फरसबीची शेंग किंवा कोबीचा तुकडा चॉपस्टिकमधे धरुन सुझन तो बाजूला ठेवलेल्या गरम पाण्याच्या ग्लासमधे बुचकळायची आणि मग तोंडात टाकायची.असं कां विचारलं तर म्हणाली.खूप तेलकट आहे.गरम पाण्यात बुडवलं की तेल निघून जातं.धन्य!.
सुझनला माझ्या नावाचा उच्चार करणं फारच अवघड जायचं.तुझं दुसरं एखादं सोपं नाव नाहीये कां असं तिने मला दोनतीनदा विचारलं.म्हटलं माझं नाही.पण तुझं नक्कीच असणार.चिनी लोकांच स्वतःच नाव वेगळं आणि बाहेरच्या लोकांसाठी इंग्लिश नाव वेगळं असतं.तर म्हणाली आहे.पण तुला सांगितलं तर तु हसशील.बर्‍याच आग्रहानंतर तिने नाव सांगितल.श्यू टिंग.खूपच क्यूट वाटलं मला हे.सुझनपेक्षा खूपच गोड.तिला म्हटलं आता मी तुला श्यू म्हणणार.
---------------------------------------------------------------

कंटीन्यूड...