Saturday, January 12, 2013

रंग-रेषांचे रौद्र रुप..


प्रोटेस्ट आर्ट
कलेचा आविष्कार हा कलावंताच्या अस्वस्थ मनात उमटलेल्या प्रतिक्रियेचा हुंकार असतो- अल्बर्ट कामू( रिबेल)

कोची-मुझिरीसमधे गेल्या महिन्यात सुरु झालेल्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय आर्ट बिएनालेत २०१३ या नव्या वर्षाचे स्वागत एका अत्यंत अस्वस्थ करुन सोडणा-या फ़्रेस्को पेंटींगच्या प्रदर्शनाने झाले. बिएनालेच्या प्रमुख कार्यक्रमाच्या ठिकाणी, आस्पिनवॉल हाऊसच्या भिंतीवर नुकत्याच जन्माला आलेल्या एका तान्ह्या बालिकेचे चित्र होते. त्या बालिकेच्या नग्न, कोवळ्या देहावर असंख्य अत्याचारांच्या क्रूर खूणा उमटल्या होत्या. आईच्या गर्भाशयातून नुकत्याच बाहेर पडलेल्या त्या तान्हुलीच्या मुखावाटे एक आक्रोश फ़ुटतो आहे. जगातला पहिला श्वास छातीत भरुन घेण्याकरता उमटलेली ती नैसर्गिक किंकाळी नाही. जन्मत: जगातील क्रौर्य, असुरक्षिततेचा अनुभव आल्यामुळे त्या अर्भकाने भयावह होऊन मांडलेला तो आक्रोशाचा काळोखी चित्कार आहे, जगाने तो कधीही विसरता कामा नये म्हणून मी तो रंगवला आहे- चित्रकार पी.एस.जलाजा, ज्याने हे भित्तीचित्र रंगवले तो त्याबद्दल बोलताना म्हणाला. देशाच्या राजधानीत सामुहिक बलात्काराला बळी पडलेल्या निरपराध तरुणीने भोगलेल्या यातना, तिच्यासोबतच देशातल्या प्रत्येक स्त्रीची झालेली मानहानी या कलाकृतीतून ढळढळीतरित्या सामोरी आली. वृत्तपत्रांमधे रोज रकानेच्या रकाने भरून येत असलेल्या वृत्तांतापेक्षाही कितीतरी जास्त पटीने मनाला अंतर्बाह्य हलवून, हादरवून सोडण्याची ताकद त्यात होती.


ही ताकद दृश्यमाध्यमाची. संवेदनशील व्यक्तीला एकाच वेळी संताप, दु:खाने असहाय करुन सोडणा-या विदारक घटनेचे मूर्तिमंत प्रतिक, एका अत्यंत असंस्कृत सामाजिक घटनेचा प्रतिकात्मक निषेध करणारे हे भित्तीचित्र. म्हणजेच प्रोटेस्ट आर्ट.
प्रोटेस्ट आर्ट म्हणजे कलेच्या माध्यमातून समाजव्यवस्थेतील गैरकृत्यांना विचारला गेलेला जाब, केलेला निषेध. पेंटींग, शिल्प, पोस्टर्स, बॅनर्स, साईन्स, परफ़ॉर्मन्सेस, इन्स्टॉलेशन्स, स्ट्रीट आर्ट, ग्राफ़िटी, फोटोग्राफ़्स, व्हिडिओ-आर्ट अशा कलेच्या नव्या, जुन्या परिभाषांमधून लोकांशी साधलेला संवाद. लोकांच्या आंतरिक, सूप्त जाणीवांना, सामर्थ्याला चेतवण्याचा केलेला प्रयत्न. प्रोटेस्ट आर्ट म्हणजे कलाकाराची प्रातिनिधीक प्रतिक्रिया.
जेम्स जॉयस (युलिसिस) म्हणाला होता- कलेद्वारे आपल्याला कल्पना मिळतात, आत्मिक सौंदर्याची अनुभूती मिळते हे सगळं ठीक आहे, मात्र सर्वाधिक महत्वाचा प्रश्न हा की कला आपल्या वास्तव आयुष्याला किती खोलवर स्पर्श करु शकते.
कोची-मुझिरिस बिएनालेमधले ते भित्तीचित्र पहाताना गेल्या काही वर्षांत अनेकवेळा पहाण्यात आलेली प्रोटेस्ट आर्ट अपरिहार्यपणे आठवून गेली. हा कलाप्रकार आपल्या आजूबाजूच्या शहरात, जगात इतक्या झपाट्याने बहरत आहे, एक महत्वाचा कला-प्रकार म्हणून विकसित झाला आहे त्याबद्दल खेद मानावा की आनंद याचा गोंधळ उडाला.
मिथून दासगुप्ताचे रिपोर्टींग फ़्रॉम नो मॅन्स लॅन्ड- भारतीय सैनिकांनी मणीपूरमधल्या मनोरमावर केलेला सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर जाब विचारायला आलेल्या गावक-यांवर त्यांनी केलेला गोळीबार. अनेक महिलांनी नंतर याच्या निषेधार्थ नग्न मोर्चा काढला होता. अबनीन्द्रनाथांच्या भारतमातेच्या चित्राचे प्रतिक वापरुन मिथून दासगुप्तांनी केलेल हे पेंटींग.
प्रियान्का लाहिरीचे प्लीज हेल्प मी टू रेझ माय व्हॉइस- एका निरागस, अल्पवयीन मुलीच्या कपाळावर आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रिचे चिन्ह असणारा बारकोड आहे. दोन लहान, मळकट पावलांच्या मधे पडलेला एक मायक्रोफोन, तो उचलण्याचीही ताकद त्या लहान हातांमधे नाही. तो कधीतरी उचलला जाईल का, त्यातून उच्चारलेला आक्रोश, निष्पाप बालकांवर होणा-या लैंगिक अत्याचारांच्या वेदना समाजातल्या तथाकथीत सभ्य समाजाच्या कानापर्यंत पोचतील का असे अनेक अनुच्चारीत प्रश्न हे पेंटींग विचारत रहाते.
सुसान क्राइलचे गल्फ़मधल्या ऑइलस्पिलवर केलेले प्रचंड पेंटींग, तिचेच क्राउचिंग इन टेरर आणि हॅन्ड्स ऑफ़ पॉवर या जागतिक दहशतवादात सामान्य माणसाच्या झालेल्या ससेहोलपटीचे असहायतेचे चित्रण करणारी पांढ-या खडूने आणि कोळशाने चितारलेली काळी-पांढरी चित्रमालिका.

घटना वृत्तपत्रात येईनाशी झाली, तात्कालिक निषेधाचा उन्माद ओसरला की कालांतराने ती विसरली जाण्याची शक्यता असते. मात्र अशा कलाकृतींमुळे समाजाच्या अंतरंगावरचा जळता ठसा कायम रहातो. प्रोटेस्ट आर्टची ही ताकद.

जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर, कधी चळवळ, क्रांती, युद्ध झाली, राज्यव्यवस्थांची उलथापालथ झाली, दंगली झाल्या, सामाजिक, राजकीय चळवळी उभारल्या गेल्या. त्या प्रत्येक वेळी कलावंतांनी आपला हस्तिदंती मनोरा सोडून आपल्या कुंचल्याचे, छिन्नीचे, कला-सामर्थ्याचे सपासप मारलेले फटकारे कधी नोंदवले गेले, कधी त्यांच्या तात्कालिक स्वरुपामुळे ते अस्तंगतही झाले. मात्र त्या वेळेची, क्षणांची दहशत, भिती, उन्माद कलामाध्यमातून प्रत्यकारीकतेनं प्रकटल्या. कलावंत हा समाजाचाच एक अपरिहार्य हिस्सा आहे हे अधोरेखित केले गेले. कला हा केवळ वैयक्तिक अभिव्यक्तीचा, भरलेल्या पोटांना रिझवणारा प्रकार मानणा-यांना मिळालेले हे एक प्रकारचे चोख उत्तरही ठरले.

घटनेवरची तात्काळ प्रतिक्रिया हे प्रोटेस्ट आर्टचे बलस्थान. आर्ट गॅलरीतली कलाकृती कितीही परिणामकारक असली तरी ती तुलनेने खूप कमी लोकांपर्यंत पोचते, तिचा परिणाम हळू असतो.
स्ट्रीट आर्ट, ग्राफ़िटी, पोस्टर्स, साइन्स, परफ़ॉर्मन्सेस, मोर्चे यांना कलाकृतींचे कायमस्वरुपी स्थान नक्कीच नाही. हे तात्कालिक कलानिषेधाचे प्रकार आहेत पण जास्त परिणामकारक आहेत. कालांतराने परफ़ॉर्मन्सेसचा व्हिडिओ किंवा फोटोग्राफ़िक आल्बम प्रदर्शनांमधून मांडला जातो. त्याला डॉक्युमेन्टेशनचे महत्वही येते कारण एका महत्वाच्या सामाजिक घटनेचा हा तो साक्षीपुरावा असतो. गोयाची थर्ड ऑफ़ मे कलाकृती किंवा त्याची डिझॅस्टर्स ऑफ़ वॉर्स ही एचिंग्ज याच प्रकारच्या ऐतिहासिक नोंदींचे काम करते.
पाब्लो पिकासोची गेर्निका ही कलाकाराच्या युद्धविरोधी भूमिकेचे सर्वकालिन प्रतिकात्मक कलाकृती. स्पॅनिश यादवी युद्धात गेर्निका शहरावर झालेला बॉम्बवर्षाव, त्यात झालेला मानवी जीवनाचा, मूल्यांचा विध्वंस आणि कलावंत मनाने केलेला शांततेचा आक्रोश हा वैश्विक होता.
दिएगो रिव्हेराची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा निषेध करणारी महाप्रचंड म्यूरल्स, त्यातली शतकानुशतके अन्यायच्या जात्यात भरडली गेलेली सामान्य कामगार जनता समानतेच्या, न्यायाच्या स्वप्नमय जगताकडे वाटचाल करताना चित्रित केलेली असते.

आर्ट गॅल-यांच्या पांढ-या भिंती, व्हाइट क्यूबचा परिघ मोडून प्रोटेस्ट आर्ट थेट लोकांपर्यंत पोचते, वास्तव जीवनाला भिडते. यमुना नदीच्या काळवंडलेल्या, उदास तीरावर अतुल भल्ला, शीबा छाची, असिम वाकिफ़, गिगी स्कारिया या कलावंतांनी उभारलेले इन्स्टॉलेशन, ज्यात त्या नदीच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल बिघडवण्याकरता कारणीभूत ठरलेल्या असंख्य गोष्टींची प्रतिके रात्रीच्या अंधारात उजळवली गेली. मोठ्या प्लास्टीकच्या बाटल्यांमधल्या शिसाच्या फ़्लुरोसन्ट पेटत्या कांड्यांचा उजेड जेव्हा काळ्या यमुनेच्या पाण्यावर झगमगला तेव्हा लोकांना प्रथमच त्या प्रकाशातून सौंदर्याऐवजी कुरुपता दिसली.  
कराचीमधे टेन्टेटीव्ह कलेक्टीव्ह ग्रूपच्या कलाकारांचा मोठा समुह काळे फराटे उमटवलेल्या बागेत एका मोठ्या कुंपणाच्या भिंतीवरदिवस-रात्र मुकाट बसून होता. सामाजिक, राजकीय निर्बंधाच्या भिंती ओलांडून आपल्याला एक दिवस पलीकडे उडी मारता येईल या अपेक्षेत. वांशिक दंगली, स्थलांतरीतांवरचे अत्याचार यामुळे एकेकाळचे हे मुक्त, सुंदर शहर तारांची कुंपणे, विटांच्या भिंतींनी कुरुप झाले आहे. त्याचा या कलावंतांनी केलेला निषेध रात्रीतून दूरदूरवर पोचला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी शहरांमधल्या कुंपणांच्या भिंतींवर बसण्याकरता जमा झाला.

कलाकाराला आपल्या आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय वास्तवाचे पुरेपूर भान असणे आवश्यक आहे, त्याच्या संवेदनशील मनाचा भावनिक उद्रेक हा रॅशनल विचाराच्या पायावर आधारीत असावा, त्याला परिस्थितिचे योग्य विश्लेषण करता यावे, त्याने कलाकृतीद्वारे केलेला निषेध, प्रतिकार अथवा विद्रोह हा पूर्वग्रहदुषीत नसावा, वैयक्तिक परिमाणे कमीतकमी असावी- प्रोटेस्ट आर्ट -या अर्थाने वास्तव जीवनावरचे प्रतिक्रियात्मक भाष्य ठरण्याकरता आवश्यक असणा-या या गोष्टी.   
प्रोटेस्ट आर्टला कायमच सेन्सॉरशिपचा, कडव्या विरोधाचा सामना करावा लागतो. अर्थात ते आवश्यकच असते लोकांपर्यंत पोचण्याकरता. अन्यथा सुंदर आहे किंवा वेगळी आहे असं म्हणत तिच्या -या अपेक्षित परिणामाकडे दुर्लक्ष झाले, किंवा ती अनुल्लेखाने नाकारलीच गेली तर ते जास्त वाईट.

युद्धोत्तर काळात युरोपमधे उदयास आलेली डाडा ही कलाचळवळ हा निषेध कलेचा जगासमोर अभिव्यक्त झालेला पहीला महत्वाचा सामुहिक आविष्कार मानला जात असला तरी त्याही आधीपासून कलावंतांनी आपल्या कलेद्वारे सामाजिक राजकिय गैरव्यवस्थेवर कुंचल्यांचे कोरडे ओढलेले आहेत. अराजकतेतून जन्माला आलेला सामाजिक अन्याय, वर्ण-लिंगभेदातून जन्मणा-या हिंसक घटना, दारिद्र्य, बालकांवरील, स्त्रियांवरील अत्याचार कलाकृतींमधे बंदिस्त झाले आहेत. एडवर्ड मंच या नॉर्वेजियन चित्रकाराचे स्क्रीम हे पेंटींग प्रोटेस्ट आर्टचे प्रतिकचिन्च जणू.
 
साठच्या दशकात कलेमागच्या संकल्पनेच्या संदर्भात अमेरिका, यूरोपमधल्या कलाकार, कला-समिक्षक, कलेचे आश्रयदाते, कला-रसिक या सर्वांच्याच मनात काही मुलभूत प्रश्न उपस्थित झाले. सामाजिक-आर्थिक उलथापालथीचा, विद्यार्थी, कामगारांच्या अस्वस्थ राजकीय जाणीवांचा हा काळ. कलेच्या आवश्यकतेवर प्रश्न विचारले जाणे, उत्तरांची अपेक्षा करणे हे अपरिहार्य होते. बंडखोर विचारसरणीचे कलाकार कलेच्या अभिव्यक्तीची पारंपारिक माध्यमे झुगारुन बॉडी आर्ट, परफ़ॉर्मन्सेस, व्हिडिओ, ग्राफ़िटी, स्ट्रीट आर्टकडे वळत होते. कलेची नवी मूल्ये, नवे वाद, नवे विचार यातून जन्माला आले. साचेबद्ध परिघात गुदमरलेली कला एका परीने मुक्त झाली. लोकांपर्यंत पोचली. लोकांच्या प्रतिक्रिया, अन्याय, निषेधाला कलेच्या भाषेत वाचा फ़ुटली.
१९६५ मधे डोनाल्ड जुडचे- "कलेचे मुख्य ध्येय तीव्र सामाजिक संवेदना जागवणा-या कलाकृती निर्माण करणे हे आहे, त्या कलाकाराची सामाजिक-राजकीय जाणीव किती सखोल आहे आणि कलाकृती कोणत्या वातावरणात प्रदर्शित केली जाते यावर तिची परिणामकारकता अवलंबून असते." हे उद्गार प्रोटेस्ट आर्टच्या संदर्भात महत्वाचे आहेत. मार्शल डुशाम्प या उत्तर-आधुनिक काळातील महत्वाच्या चित्रकाराचे-"कलेमागची संकल्पना ही कलाकृतीपेक्षा जास्त महत्वाची मानायला हवी." हे उद्गारही प्रोटेस्ट आर्ट या संकल्पनात्मक कला-प्रकाराला मान्यता मिळवून देण्याकरता महत्वाचे ठरले.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या फ़ेमिनिस्ट चळवळीलाही प्रोटेस्ट आर्टच्या माध्यमातून महत्वाचे परिमाण मिळाले, आधार मिळाला. स्त्री-मुक्तीची संकल्पना जगभरात पसरवण्यात प्रोटेस्ट आर्टचा फार मोठा वाटा आहे. समानता, लैंगिक विषमतेवर आधारीत अन्यायाला परिष्कृत करणारी बॉडी आर्ट, लाईव्ह आर्ट परफ़ॉर्मन्सेसच्या माध्यमातून जगभरातल्या स्त्रिया फ़ेमिनिस्ट चळवळीशी जोडल्या गेल्या. कॅलिफ़ोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ़ आर्टचा वुमनहाऊस हे जागतिक पातळीवरचे इन्स्टॉलेशन, त्यातले किचनमधे जाण्याकरता जिन्यावरुन उतरणारी नववधू, जिना उतरताना तिचा मळत जाणारा लांबलचक नक्षीदार पदर, तिचे रंगवलेले, सजवलेले स्तन किचनमधल्या फ़्राइंग पॅनमधे गळून पडतात आणि त्यांना फ़्राइंग एग्जचा आकार प्राप्त होतो हे दृश्य किंवा कपड्यांच्या कपाटामधे वेडीवाकडी अडकून पडलेली नग्न तरुणी अशी दृश्ये प्रचंड परिणामकारक ठरली. स्त्री-कलावंतांचा सर्व निषेध या वुमनहाऊसच्या माध्यमातून व्यक्त झाला. ज्युडी शिकागोची डिनर पार्टी हे इन्स्टॉलेशनही याच प्रोट्स्ट आर्ट चळवळीतला दुसरा महत्वाचा टप्पा. त्यात तिने चायना प्लेट्स, वीणकामाच्या सूयांचा केलेला वापर फ़ार अस्वस्थ करुन टाकणारा होता.

जेन अलेक्झांडरच्या कामात द.आफ़्रिकेतील वांशिक चळवळीवर तिने केलेली विधाने, तिची खोल राजकीय, सामाजिक जाणीव दिसते, बास्कियाने प्रचलित सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर, कॅपिटलिझमच्या विरोधात केलेली धाडसी, निर्भिड विधाने त्याच्या उपहासात्मक ग्राफ़िटी, स्ट्रीट आर्टमधून दिसतात, अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातल्या स्थानिक कलावंतांचा ऑब्जेक्ट ऑरेंज हा खिळखिळ्या झालेल्या, दुर्लक्षित स्थितीत असलेल्या घरांना नजरेला खुपणा-या झळझळीत ऑरेंज रंगात रंगवण्याचा प्रोजेक्ट, रशियन वास्तववादी कलावंतांचा पेरेझिह्न्की सामुहिक  कलानिषेध ज्यात कलावंतांवर घातल्या गेलेल्या राजकीय संस्थात्मक निर्बंधांचा निषेध करण्याकरता १८७० ते १८९० या काळात जगभर प्रवासी कला प्रदर्शने भरवली गेली. प्रेम, तीरस्कार, वेदना, प्रतारणा या वैयक्तिक भावनांना कलेद्वारे वैश्विक स्पर्श देणारी मेक्सिकन कलाकार फ़्रिदा काहलो.. गेल्या शतकभरात प्रोटेस्ट आर्ट जगाच्या प्रत्येक काजळलेल्या कानाकोप-याला उजळवत राहिली. कलेचा हा असा एक प्रकार जो नको असतानाही बहरत राहीला.

भारतीय आधुनिक कला-इतिहासात गगनेन्द्रनाथ, अबनीन्द्रनाथ टागोर सामाजिक बदलांना आपल्या कलेच्या माध्यमातून चितारण्याची संवेदनशीलता दाखवणारे आद्य कलाकार. मात्र त्यात राजकीय घटनांवरची, अथवा सामाजिक गैरकृत्यांचा निषेध करणारी भाष्य नाहीत. ४०-५० च्या दशकातले कलाकार मात्र याबाबतीत जास्त सजग होते. १९४३ सालातल्या बंगालमधील मानवनिर्मित दुष्काळाची भीषणता, दुस-या महायुद्धानंतरची जगभरातली विदारक, अस्थिर वास्तवता, मानवी मूल्यांचा संहार चित्तोप्रसाद, रामकिंकर बैज यांच्या कलेतून उमटला.
६० च्या दशकात सामाजिक-राजकीय प्रतिक्रियांचे रंग आणि रेषा भारतीय चित्रकलेतून जास्त ठळकरित्या दिसू लागले. ते साहजिकही होते. ३०-४०च्या दशकात जन्माला आलेल्या या कलावंतांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांची दडपशाही लहानवयात अनुभवली होती. तरुणवयात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला राजकीय लढा पाहीला होता, त्यातून निर्माण झालेली जीवनविषयक आदर्शवादी मूल्ये, स्वप्ने हळू हळू पायदळी तुडवली जाणे, धार्मिक, जातीय दंगली, फ़ाळणीचे चटके, स्वतंत्र भारतातील लोकशाहीतून उदयास आलेला भ्रष्टाचार, बेकारी, दारिद्र्य अनुभवत तारुण्यात प्रवेश केलेले हे साठ-सत्तरच्या दशकातले चित्रकार-कलावंत.
बिकाश भट्टाचार्य (फ़ेमिन फ़ॅमिली, गेम), .रामचंद्रन (व्हिजन ऑफ़ वॉर), शुवा प्रसन्ना (रेड टेरर), निखिल बिश्वास, गुलाम मोहम्मद शेख, भूपेन खक्कर, जोगेन चौधरी (स्वोलन अग्ली ह्यूमन बॉडी), श्यामल दत्ता (ब्रोकन बाऊल), गणेश पाईन ( असॅसिन, अश्वत्थामा ऑफ़ महाभारत, सुनिल दास, एम.एफ़.हुसेन ( ट्रीब्यूट टू सफ़दर हाश्मी), अर्पिता सिंग (फ़ेमिनाईन फ़ेबल्स), मनू पारेख, अंजोली इला मेनन, के.लक्ष्मा गौड, सुधीर पटवर्धन अशा अनेकांनी आधुनिक भारतीय चित्रकलेत प्रोटेस्ट आर्टचे विद्रोही रंग भरले
कलेमधला हा थेट वास्तव जीवनाला भिडणारा, सामाजिक-राजकीय भान असणारा विद्रोहाचा, निषेधाचा नकारात्मक रंग.
कलेची भाषा ही वैश्विक असते आणि कोणताही सामाजिक अन्याय हा कधीही फ़क्त स्थानिक नसतो. जाती-भाषा-वर्ग आणि वर्णभेदाच्या भौगोलिक सीमा ओलांडून अन्याय, असमानतेला जागतिक पातळीवर वाचा फ़ोडण्याचे, दाद मागण्याचे सामर्थ्य फ़क्त कलेमधेच असू शकते. प्रोटेस्ट आर्ट हा पोस्ट-मॉडर्न काळातील एक स्वतंत्र, महत्वाचा कला-प्रकार. वेगवेगळ्या व्याख्या, प्रकारांनी वर्णन करता येत असला तरी मुळात हा असतो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवस्थेतल्या गैरप्रकारांच्या विरोधातला कलावंत मनाचा विद्रोह.