Friday, August 26, 2016

पिवळ्या घरातील एकटेपण


व्हिन्सेन्टचे थिओला पत्र (१० ऑक्टो. १८८२) – “पाऊस रिपरिपतो आहे. पण हवा छान आहे. भोवती सुंदर निसर्ग आहे. अशा वेळी वाटतं जावं आणि एखाद्या मित्राला बरोबर घेऊन भटकावं किंवा मित्राने आपल्या घरी यावं गप्पा मारायला. आणि अशा वेळीच मन रिकाम्या भावनेनी भरुन जातं. आपल्याला कुठेच, कुणाहीबरोबर जाता येणार नाही, कारण आपल्या जवळ कोणीही नाही हे कळतं. एकाकीपणा माझ्या सर्व आयुष्याला व्यापून उरला आहे.”
--
व्हॅन गॉघच्या सुप्रसिद्ध सूर्यफ़ुलांना, सोनेरी गव्हाच्या शेतांना मागे टाकून सायप्रस वृक्षांमधून जाणा-या एकाकी पायवाटेवरुन पुढे पुढे चालत गेलं की आपण जमिनीवरच्या एका वैराण खडबडीत तुकड्यावर उभ्या असलेल्या साध्यासुध्या पिवळ्या घरापाशी पोचतो.
व्हिन्सेन्टने रंगवलेलं हे ’द यलो हाऊस’.


व्हिन्सेन्टने या घरातली एक खोली, त्यातल्या खूर्च्याही आपल्या कॅनव्हासवर अजरामर करुन ठेवलेले आहेत. “द यलो रुम’ नावाच्या पेंटींगमधून.


झळझळीत पिवळ्या छटेत रंगवलेल्या या घराकडे आपण मंत्रमुग्ध होऊन पहात रहातो.
जगभरातल्या लोकांनी पुन्हा पुन्हा न्याहाळलेल्या चित्रांमधे सर्वात वरच्या क्रमांकावर व्हॅन गॉघची यलो रुम पेंटींग्ज आहेत.  
द यलो रुम- कुणाची तरी वाट पहाणारी, तयारीत सज्ज असलेली एक अत्यंत साधी खोली आहे. सोबतीची अपेक्षा करणा-या खुर्च्या, दोन उशा. एक बंद खिडकी, जाडसर थर दिलेले, विरुद्ध रंगाचे ठळक पॅचेस असलेल्या या चित्रातलं पर्स्पेक्टीवही काहीसं विचित्र वाटणारं, मागच्या भिंतीचा कोन जरासा तिरपा, कललेला आहे.
असं काय आहे या एकाकी, निर्जन, सामान्य पिवळ्या घरातल्या पिवळ्या खोलीत ज्याचं व्हिन्सेन्टला इतकं आकर्षण वाटावं?
आणि आपणही पुन्हा पुन्हा त्याकडे पहात रहावं आज सव्वाशे वर्षांनंतरही?

फ़्रान्सच्या दक्षिणेला, मेडिटरेनियनच्या किना-यावरच्या लहानशा आर्ल्स गावात एका निर्जन रस्त्यावरचं एकमजली, जुनाट यलो हाऊस. त्यातल्या एका पिवळ्या खोलीत व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या आयुष्यातला सर्वात वादळी, अस्वस्थ, वेदनादायी, एकाकी आणि सर्वात सर्जकही असा नऊ महिन्यांचा कालखंड कोंडलेला आहे. इथेच व्हिन्सेन्टने त्याच्या सोबत रहाणा-या मित्रावर, पॉल गोगॅंवर प्राणघातक हल्ला केला, नंतर आलेल्या मानसिक तणावाच्या झटक्यात स्वत:चा कान वस्त-याने कापला. वाहत्या रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहीला. 
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या एकाकी, वेदनामय आयुष्याच्या सगळ्या जखमा या खोलीत उघड्या पडल्या.
दोन सर्वस्वी भिन्न व्यक्तिमत्वाचे चित्रकार, दोघांनी काही काळ एकत्र राहून भरपूर चित्रं काढली, कल्पनांची देवाणघेवाण केली, त्यांच्यात वाद झाले, काही हिंसक पातळीवर पोचले. या सर्व दिवसांचे पोत, कधी मुलायम, ठाशीव, अनेकदा खडबडीत, बोचरे आणि धारदारही.. हे घर अंगावर वागवत आहे. ’द यलो रुम’ हे व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघचं सिन्ग्युलर बायोग्राफ़िकल वर्क. त्याच्या आयुष्यासारखंच नाट्यपूर्ण, झळझळीत, प्रतिभावंत आणि एकाकी.
--व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ- त्याला जाऊन आता सव्वाशे वर्षं झाली.
तरुण वयात, ३७ व्या वर्षी आत्महत्या केलेल्या या डच चित्रकाराबद्दल, त्याच्या चित्रांबद्दल, चित्र काढण्याच्या शैलीबद्दल, रंगसंगती, फ़टकारे आणि चित्रविषय, त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याने आअपल्या भावाला लिहिलेली पत्रं, मानसिक अस्थिरतेतून येणारे औदासिन्याचे झटके, त्यात त्याने कापलेला आपला कान, आणि अखेर केलेली आत्महत्या.. याबद्दल गेली १२५ वर्षं सातत्याने लिहिलं, बोललं गेलं. अंदाज वर्तवले गेले, चर्चा- विश्लेषणं झाली, त्याच्या आयुष्यावर कविता झाल्या, सिनेमा निघाले, पुस्तकं लिहिली गेली. आणि तरी अजूनही त्याच्या भोवतालचं गूढ, कुतूहल यत्किंचितही कमी झालं नाही. असं काहीतरी शिल्लक असतंच जे त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला भाग पाडतं.

व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या व्यक्तिमत्वाचा शोध अनेकांनी अनेक त-हांनी घेतला तरी बहुतेक चरित्रकारांच्या मते तो एक अती-भावनाशील, अस्वस्थ वृत्तीचा, चिडखोर, लहरी आणि विलक्षण प्रतिभावान चित्रकार होता. झपाटलेल्या, उन्मादी अवस्थेत त्याने आपली बरीचशी अद्वितीय मास्टरपिस पेंटींग्ज रंगवली.
व्हिन्सेन्टची ही प्रतिमा बरीचशी एकारलेली आहे. अतिरंजीत आणि नकारात्मक आहे. व्हिन्सेन्टच्या स्वभावाचे इतरही अनेक पैलू होते जे या प्रतिमेखाली झाकोळून गेले.

व्हिन्सेन्ट संकोची, लाजाळू स्वभावाचा होता. चारचौघात, बाह्य समाजात वावरताना तो अवघडून जायचा. तो मोकळेपणानी व्यक्त होत असे फ़क्त रंगांमधून आणि शब्दांमधून. तो जितक्या संवेदनशीलतेनं चित्र रंगवे तितक्याच उत्कटतेनं भावाशी, थिओशी पत्रातून बोले. रंगवणे आणि लिहिणे या दोन्ही माध्यमांवर त्याचं मनापासुन प्रेम होतं. आपल्या कलेला, अंगच्या गुणांना समाजाची, मित्रपरिवाराची मान्यता लाभावी, प्रशंसा व्हावी, कौतुक लाभावं अशी चारचौघांची असते तशीच उत्कट इच्छा त्याने सदैव मनात बाळगली. त्याच्या अल्प-आयुष्यात काही ही इच्छा पूर्ण झाली नाही.
व्हिन्सेटच्या आयुष्याला एकाकीपण सदैव घेरुन होतं. आपल्याला कोणाचीतरी सोबत लाभावी, सुख-दु:खात सहभागी होणारी प्रेमळ सहचरी मिळावी, समवयस्क, समविचारी मित्र साथीला असावे ही त्याची अजून एक उत्कट इच्छा, जी कधीच पूर्ण झाली नाही. व्हिन्सेन्ट कायमच एकटा, एकाकी राहिला. एकटेपणाला घाबरुन सतत पळत राहिला आणि त्या प्रयत्नांत अजूनच एकाकी होत गेला.
व्हिन्सेन्ट मेल्यावर मात्र त्याला लाखो चित्र-रसिक लाभले ज्यांनी सुहुदाच्या आत्मियतेनं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा आजतागायत प्रयत्न केला, त्याची चित्रं आणि पत्रं या दोन दुव्यांच्या आधाराने त्यांनी त्याच्यापर्यंत पोचण्याचा निष्फ़ळ प्रयास करत राहिले.
पण अस्थिर, पा-यासारख्या चंचल आणि गूढ स्वभावाचा व्हिन्सेन्ट कुणालाच एकसंध असा सापडू शकला नाही. आजवर.
   
व्हिन्सेन्ट अगदी खोल मुळापर्यंत एकटा होता. सगळेच कलाकार अंतर्यामी एकटे असतात असं मानलं जातं. त्यांना आपल्या कलानिर्मितीकरता एकांत, एकाकीपणाची गरज असते असंही म्हणतात. व्हिन्सेन्टला मात्र असा एकटेपणा कधीही नको होता. एकटेपणाची त्याला भिती होती. दुर्दैव असं की त्याच्या स्वभावामुळेच त्याच्यावर हे एकाकीपण लादले गेले. व्हिन्सेन्टला माणसांच्या सहवासाची, मित्रांच्या सोबतिची, नात्यांतल्या उबदारपणाची तीव्र आस होती जी कधीही पूर्ण होऊ शकली नाही.
कदाचित म्हणूनच व्हिन्सेन्ट सातत्याने चित्र रंगवत राहिला. एकटेपणा, आजार, औदासिन्य, उपेक्षा, दारिद्र्य, अभावावर मात करत तो रंगवत राहिला.
रंगवत राहिला म्हणूनच त्याला एकटेपणावर मात करता आली. रंगांमधून तो सोबत शोधत राहिला. त्याचं एकाकीपण कॅनव्हासवरच्या रंग-रेषांमधून झिरपलं. ठिबकत राहिलं.
पिवळ्या घरातल्या लाकडी खूर्चीवर बसलेला, कोणी मित्र येईल सोबतीला म्हणून वाट बघत राहिलेला एकटा व्हिन्सेन्ट, गव्हाच्या शेतावर पहाटे पेटलेल्या शेकोटीसमोरचा एकटा व्हिन्सेन्ट, पॉप्लर वृक्षांच्या रांगांमधून जाणारी एकटी वाट, त्यावरचा एकाकी मुसाफ़िर व्हिन्सेन्ट होता. निळ्या, रत्नखचित ता-यांनी भरलेल्या आकाशगंगेत हरवून गेलेला तो एकाकी जीव होता. निसर्गाचा आणि माणसाचा एकमेकात मिसळून गेलेला आत्मा आपल्या चित्रांमधून तो शोधत राहिला.
आपली तीव्र भावनाशीलता, एकाकीपणाच्या भितीतून आलेली असुरक्षितता सोबत घेऊन व्हिन्सेन्ट कलेच्या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करायला धडपडत होता. आणि त्याचा हाच स्वभाव त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करत होता. तो जितका लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करी तितकेच लोक त्याच्यापासून दुर जात. त्या लोकांमधे बरेचसे त्याच्या चित्रांचे भावी ग्राहकही होते.

व्हिन्सेन्ट जन्मला होता तो एका मोठ्या, कुटुंबवत्सल घरात. आयुष्यभराला व्यापून राहिलेला हा एकटेपणा त्याच्या वाट्याला यायची खरं तर काहीच गरज नव्हती. त्याचे वडिल धर्मगुरु होते. काही काळ व्हिन्सेन्टलाही या क्षेत्रात रस वाटला होता, बेल्जियमच्या गरीब कोळशांच्या खाणींवर काम करणा-यांच्या वस्तीवर तो धर्मोपदेशक म्हणून गेला. तिथे गेल्यावर तिथली परिस्थिती पाहून त्याच्या संवेदनशील स्वभावावर इतका खोल परिणाम झाला की तो तिथे त्यांच्यातलाच एक बनून रहायला लागला, सहवेदना अनुभवता यावी म्हणून. कुटुंबातले सगळेच त्याच्या या कृत्यावर नाराज झाले. अखेर त्यांनी जेव्हा त्याला कोणतीही आर्थिक मदत पाठवायचं बंद केलं तेव्हा नाईलाजाने तो परत गेला. त्यानंतर आपल्या काकांच्या चित्रकलेच्या साहित्याची खरेदी-विक्री करण्याच्या व्यवसायात तो मदत करायला लागला. पण व्हिन्सेन्टच्या काहीशा अती-उत्कट, आग्रही स्वभावामुळे दुकानात येणारे ग्राहक बावचळून जात. व्हिन्सेन्टच्या स्वभावात एक विद्रोह होता. धर्माबाबत त्याची काही विशिष्ट आग्रही मतं होती, त्यांना घेऊन तो सतत सर्वांशी वाद घालत बसे. यामुळे त्याच्या संवेदनशील, प्रेम मिळवण्याच्या, जोडलं जाण्याच्या ओढीला प्रतिसाद मिळणं शक्यच नव्हतं. व्हिन्सेन्ट समाज, कुटुंबातून मिळणा-या प्रेम, आपुलकीच्या भावनांपासून दुरावत गेल. त्याच्या नाकारले जाण्याची ही सुरुवात होती. त्याच्या एकटेपणाची सुरुवात.
मग वडिलांचं निधन झालं. त्याच्या त-हेवाईक, वाद घालण्याच्या स्वभावाला कंटाळूनही असेल पण बहिणीने त्याला घरातून हाकलण्याचा चंगच बांधला. लहान गावात त्यामुळे बदनामी होत होती म्हणून आईही नाराज झाली.
व्हिन्सेन्टचा स्वभाव ना लोकांना झेपणारा होता, ना त्याला स्वत:ला.
शेवटी त्याला समजून घेणा-या कुटुंबातल्या एकमेव व्यक्तीने, त्याच्या मोठ्या भावाने, थिओने व्हिन्सेन्टला पॅरिसला जा असं सुचवलं. काकांच्या चित्रकलेच्या व्यवसायामुळे व्हिन्सेन्टलाही या कलेत ब-यापैकी रस निर्माण झाला होता. काव्यमय, भावनोत्कट चित्रं तो रंगवायचा. पॅरिसला गेला तर त्याला इतर कलाकारांना भेटता येईल, त्यांच्याकडून काही शिकता येईल, त्याच्या चित्रकलेला, आयुष्याला काही आकार येईल असा थिओचा हेतू. भावाकडून व्हिन्सेन्टला मिळालेला हा भावनिक आणि आर्थिक आधार शेवटपर्यंत टिकला.
पॅरिसला आल्यावर त्याच्या चित्रकलेला खरी सुरुवात झाली. व्हिन्सेन्ट सगळ्या समकालिन चित्रकारांना जाऊन भेटला. पिसारो, गोगॅं, माने, सूरा.. प्रत्येकाकडून काहीतरी शिकत, आत झिरपवत राहिला. त्यातून त्याची स्वत:ची शैली बनत गेली. जी अतिशय वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण होती, रंगांचे झळझळीत फ़टकारे आणि रेखाटनातला नाजूकपणा असलेले आजूबाजूच्या रोजच्या जगण्यातले विषय त्याच्या कॅनव्हासवर विलक्षण भावनीक तीव्रतेनं उमटत. मेहेनतीने, एकाग्रतेनं, मन लावून व्हिन्सेन्ट पॅरिसला आपली कला घडवत होता.  

व्हिन्सेन्टचा झगडा एका सर्जनशील, कलावंत मनाचा आपल्या सभोवतालाशी चाललेला झगडा होता. अंतर्मनातून उसळी मारुन वर आलेली भावना चित्रबद्ध करण्याकरता कलाकाराला स्वत:ची वेगळी स्पेस, एक वेगळं जग निर्माण करणं गरजेचं वाटतं. त्यात तो स्वत:सोबत असतो फ़क्त. स्वत:शी संवाद साधतच त्याला कलेची आराधना करता येते. अशावेळी आजूबाजूचा कोलाहल नकोसा असतो. माणसांपासून दूर रहावेसे वाटते. कलानिर्मितिची प्रक्रिया पूर्ण झाली की मात्र त्याला या एकांतातून उमटलेल्या अभिव्यक्तीला सादर करायची घाई होते. कलाकृतिचं कौतुक करायला कलाकाराला आपल्या सभोवती अशा वेळी माणसांची गरज भासते. निर्मिती करुन थकलेल्या मनाला आपुलकीची, ओलाव्याची, प्रेमाची तहानही तीव्रतेनं लागते. त्यातूनच त्याला पुढच्या निर्मितीचे श्रम झेलायची प्रेरणा मिळणार असते. एकाचवेळी दुराव्याची आणि प्रेमाची ओढ निर्माण करणारा हा विरोधाभास कलाकाराच्या संवेदनशील मनावर ताण निर्माण करतो अनेकदा. व्हिन्सेन्टला प्रेम हवं होतं, माणसं हवीशी होती पण त्यांना स्वत:शी जोडून ठेवण्याची कला, त्याकरता लागणारी सहनशीलता त्याच्यात नव्हती. तो अवघडलेपणातून जे प्रयत्न करायचा त्याचा उलट परिणाम होऊन माणसं उलट दूर जायची. अती-उत्कटतेची लोकांना भिती वाटते अनेकदा.

(व्हिन्सेन्टने थिओला लिहिलेलं एक पत्र).
“अनेकदा मला खूप एकटं वाटतं. सोबत मित्र असावासा वाटतो. असं वाटतं आपण आहोत त्यापेक्षा वेगळं असायला हवं होतं, जास्त आनंदी. एखादा मित्र असता तर तसं होता आलं असतं. त्याला: “हो हाच तो, मला जाणून घेणारा” असं म्हणता आलं असतं. कदाचित तू सुद्धा शिकशीलच की अशी मनाला लागलेली ओढ ही शेवटी स्वत:ची केलेली फ़सवणूक असते; आपण जितके या भावनेत वहावत जाऊ तितके आपल्या मार्गावरुन विचलीत होत जाऊ”-


--
१८८८ च्या फ़ेब्रुवारीमधे, थिओच्या, आपल्या लाडक्या भावाच्या लग्नानंतर अधिकच एकाकी झालेला व्हिन्सेन्ट स्वत:चं घर वसवण्याच्या, चित्रकलेकरता स्टुडिओ शोधण्याच्या प्रयत्नात भटकत फ़्रान्सच्या दक्षिणेला असलेल्या आर्ल्सला येऊन पोचला. त्याच्या या स्थलांतरामागे अजूनही अनेक कारणं होती. पॅरिसच्या उन्मादी उर्जेला तो कंटाळला होता, दीर्घ हिवाळ्याचे महिने तिथे काढल्यावर व्हिन्सेन्टला दक्षिणेकडचा, मेडिटरेनियन किना-यावरचा उबदार सूर्यप्रकाश हवासा वाटत होता.
अजून एक इच्छा होती, जी तिथे पोचल्यावर त्याच्या मनात जन्मली- आर्ल्समधे एक आर्टिस्ट्स कम्यून काढायचं, जिथे त्याचे पॅरिसमधले कलाकार मित्र एकत्र रहातील, मनासारखं काम करतील, एकमेकांना मदत करतील, चित्र काढण्याच्या एकाच ध्येयाने झपाटलेले सगळे असतील. त्यात आपला एकाकीपणा कायमचा संपेल.
आर्ल्स पॅरिसपेक्षा खूपच वेगळं होतंअनोखं होतं आणि अनोळखीहीइथे झळाळतालख्ख सूर्यप्रकाश होतात्यात भोवतालच्या प्रदेशातले रंग झगमगायचेव्हिन्सेन्टच्या आत खोलवर तो झळाळ पोचलाइथल्या वातावरणानेप्रकाशाने नादावलासमृद्ध भविष्यकाळाची स्वप्न नजरेत भरलेल्या व्हिन्सेन्टला आर्ल्सच्या उग्रखडबडीतनिर्जन निसर्गाने पहाताक्षणीच भुरळ घातलीइथे सगळंच टोकाचं होतंधोकादायकव्हिन्सेन्टच्या कलासक्त मनाला त्याची मोहिनी पडली
पण त्याची ही आनंदीउन्मादी अवस्था फ़ार काळ टिकली नाहीआर्ल्सच्या तीव्र हिवाळ्याचे शेवटचे काही दिवस अजून शिल्लक होतेकाही दिवसांनी अचानक हवा बदललीआसमंत गोठला आणि व्हिन्सेन्ट विलक्षण कंटाळलासूर्याच्या उबदारपणाच्यासोनेरी प्रकाशाच्या शोधात तो आला होताआपल्या परिचित प्रदेशाला मागे टाकूनएकाकी मनाच्या जखमा बुजवायला तो इथे आला होताआयुष्यभर मनाला घेरून राहिलेलं एकटेपणाचे कडे इथल्या उबदारपणात वितळून जाईल अशी आशा मनात घेऊन.

पण गोठलेल्याबर्फ़ाळ हवेत मनातला एकटेपणा अजून थिजलाव्हिन्सेन्टचा धीर खचला.
मार्च आला. तो भयाण गारठा हळू हळू वितळत गेला. हवा उबदार व्हायला लागली, व्हिन्सेन्टने वेळ फ़ुकट न घालवता बाहेर जाऊन रंगवायला सुरुवात केली. लॅन्डस्केप विथ पाथ ऎन्ड पोलार्ड ट्रीज, पाथ थ्रू अ फ़िल्ड विथ विलोज त्याने रंगवली. या पेंटींग्जमधे हिवाळ्याचे अवशेष अजूनही अंगावर बाळगणारा काहीसा उदास निसर्ग आहे.  


पुढच्या महिन्यात वसंत ऋतूतल्या पहिल्या कळ्या उमलल्या. व्हिन्सेन्टने उमललेल्या बागांची सिरिज रंगवली. ब्लॉसमिंग ओर्चार्ड्स. त्याच्या या काळातल्या अस्थिर, एकाकी प्रतिमेला छेद देणारं त्याचं हे काम आहे. व्हिन्सेन्टच्या आयुष्यातली ही सर्वोत्तम चित्रं.


आपल्या कामाच्या झपाट्याने तो खूष झाला. त्याच्याही शरिरात वसंतातलं नवं रक्त, उर्जा सळसळायला लागली. थिओला तो वेळोवेळी पत्र लिहित होता, आपली चित्रं पाठवत होता. पुढचे महिने आता नक्की आनंदात जातील याची त्याला खात्री होती.
या काही महिन्यांमधे त्याने नव्या ओळखी करायचा मनापासून प्रयत्न केला- सोबतीकरता आणि आपल्या चित्रांकरता मॉडेल मिळवायलाही. आसुसलेला होता तो मैत्रीकरता. काही मित्र मिळाले. पॉल युजिन मिल्ये, जोव सोल्जर.. त्यांची त्याने पोर्ट्रेट्स केली. आर्टिस्ट्स कम्यून स्थापण्याच्या स्वप्नाला तो विसरला नव्हता.
मे महिन्यात व्हिन्सेन्टने आपल्या रहात्या हॉटेलापासून जवळच्या रस्त्यावर असलेलं एक स्वस्तात मिळणारं घर भाड्याने घेतलं. चार खोल्यांचे हे घर भाड्याने घेताना त्याला वाटत होतं, आपण आलो तसं अजूनही कोणी चित्रकार इथे येऊन आपल्यासोबत काम करेल. असं कोणी जो इथल्या शांततेत त्याच्या सारखं झोकून देऊन काम करेल, साधं आयुष्य जगायला त्याला आवडेल. मनोरंजनाची गरज वाटलीच तर जवळ ब्रॉथेलही आहे. तिथे भेट देता येईल.
व्हिन्सेन्ट आर्ल्सच्या एकांतात नर्व्हसही झाला होता आणि इथे आपल्या हातून सलग काम होणार आहे या आशेने उत्साहीतही झाला होता. एक मित्र, एक सोबत मिळाली तर त्याची कसलीच तक्रार रहाणार नव्हती. 
सप्टेंबरपर्यंत तो नव्या घरात रहायला गेला नाही. त्या घरात त्याला स्टुडिओ आणि स्टोरेज रुम बनवायची होती. ’स्टुडिओ ऑफ़ द साऊथ’ नावाने पुढे ओळखली जाईल अशी एक जागा.
पूर्ण उन्हाळा त्याने या कामात झोकून दिला. 
त्याने या घराच्या बाह्य भागाला ताज्या, पिवळ्या लोण्यासारखा मऊसूत, टवटवीत रंग दिला. त्याची आवडती पिवळी रंगछटा. त्यानंतर ते ख-या अर्थाने व्हिन्सेन्टचं ’यलो हाऊस’ दिसायला लागलं. दोन खोल्या तळमजल्यावर, दोन वरच्या मजल्यावर होत्या. व्हिन्सेन्टने त्यातली एक स्वत:करता आणि दुसरी येणा-या पाहुण्याकरता सजवली.  
घरामधे व्हिन्सेन्ट एकटा, स्वतंत्र होता. कोणाही चित्रकाराला, कलावंताला आपल्या कलानिर्मितीकरता आदर्श वाटावं असं वातावरण. पण व्हिन्सेन्टला हा एकटेपणाच नकोसा होता. 
आयुष्यभर एकाकी राहिलेल्या व्हिन्सेन्टला या परक्या प्रदेशात कोणाचीतरी सोबत तीव्रतेनं हवीशी वाटायला लागली. कलानिर्मितीत त्याला कोणाची तरी साथ हवी होती. कोण आहे आपल्यासारखाच एखादा एकटा चित्रकार.. ज्याला आर्ल्समधल्या निवांत निसर्गात चित्र काढायला आवडेल, या घरात रहायला आवडेल..  
आणि मग त्याचे पॉल गोगॅंला इथे, दक्षिणेला बोलावण्याचे प्रयत्न सुरु झाले.
गोगॅंही रिबेलियस, त-हेवाईक स्वभावाचा. चित्रकलेच्या वेडामुळे झपाटून जाऊन त्याने आपली आर्थिक फ़ायद्यात असलेली करिअर सोडून दिली होती. त्यामुळे बायको-मुलांपासून दुरावलेला, मित्रांपासून तुटलेला, एकटा पडलेला गोगॅं. .
दक्षिणेकडे गोगॅं येण्याची शक्यता खूपच कमी होती, शिवाय तो आला तर थिओकडून जास्त आर्थिक मदत घ्यायला लागणार होती. ते फ़ारसं शक्य होईल असं वाटत नव्हतं.
व्हिन्सेन्टला मनापासून वाटत होतं गोगॅंने यावं. दोघांनी उघड्या निसर्गात लांबवर भटकत जाऊन चित्रं रंगवली असती. त्याने त्याच्या येण्याचा जणू ध्यास घेतला होता. गोगॅंला इकडे येण्याबद्दल आग्रह कर अशी पत्रे त्याने थिओला वारंवार पाठवली.  
थिओ गोगॅंचा पॅरिसमधला डीलर होता. गोगॅंने आर्ल्सला जाऊन व्हिन्सेन्टसोबत रहाण्याची कल्पना त्यालाही आवडली होती. अस्थिर व्हिन्सेन्टला गोगॅंसारख्याची भक्कम सोबत स्थैर्य देऊ शकेल, व्हिन्सेन्ट गोगॅंच्या सहवासात आनंदी होईल असं त्याला वाटलं. एक भाऊ म्हणून त्याला व्हिन्सेन्टची काळजी, प्रेम होतंच, शिवाय तो व्यावसायिकही होता. त्याला आशा वाटली गोगॅंकडून आपल्याला आर्थिक मदतीच्या बदल्यात काही पेंटींग्जही मिळू शकतील. आर्थिक फ़ायदा होईल. व्हिन्सेन्टच्या मानाने गोगॅंच्या चित्रांना बाजारात किंचित का होईना मागणी होती. शिवाय दोन चित्रकारांनी एकमेकांसोबत राहून काम करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे हे पिवळं घर, ’स्टुडिओ ऑफ़ द साउथ’ म्हणून प्रसिद्ध झालं असतं. आर्टिस्ट्सची इथे येऊन काम करायला रीघ लागली असती.
पण तसं काहीही झालं नाही. जे झालं ते विपरितच.

जुलै अखेरीला, व्हिन्सेन्टच्या काकांचा मृत्यू झाला आणि त्यांची काही संपत्ती थिओला मिळाली. आता गोगॅंला आर्ल्सला बोलवायला थिओकडून आर्थिक मदत मिळू शकणार होती.
व्हिन्सेन्टच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरु झाल्या म्हणून थिओने व्हिन्सेन्टला जास्त पैसे पाठवायला सुरुवात केली. पण व्हिन्सेन्टच्या परिथितीत काहीच सुधारणा झाली नाही. मिळालेले जास्तीचे पैसे चित्रकलेच्या साहित्यावरच खर्च करुन स्वत:चे अभावग्रस्त जगणे त्याने चालूच ठेवले. आपल्या अगदी आवश्यक गरजा भागवण्याइतकेही पैसे तो खर्च करत नव्हता. अपुरा आहार, अतोनात श्रम याचा परिणाम म्हणून त्याची तब्येत ऑक्टोबर सुरु होताना पूर्ण खालावली.
थिओला या काळात लिहिलेल्या पत्रांमधे “एकटं पडल्याची” त्याची तक्रार चालुच होती. एका बाजूला आपण कामात इतके गढून गेलो आहोत की कोणी मित्र नसल्याची खंतही वाटत नाही असेही तो लिहित होता आणि दुसरीकडे आर्ल्सला चित्रकारांची वसाहत वसवून तिथे सर्वांनी एकमेकांसोबत रहाण्याची, चित्रं रंगवण्याची स्वप्नही पहात होता. 
एका पत्रात तो लिहितो- “ढगाळलेल्या, अस्वस्थ आभाळाखाली अंतहीन पसरलेलं गव्हाचं शेत आहे, मला मनातलं दु:ख, तीव्र एकाकीपणा व्यक्त करायला फ़ार लांब कुठे जायची गरजच नाही. माझ्या कॅनव्हासवर ते उतरलेलं तुला लवकरच पहायला मिळेल. मी लगेचच ते पॅरिसला तुला दाखवायला घेऊन येईन. मला खात्री आहे जे मी शब्दांमधून तुला सांगू शकलो नाहीय ते हे कॅनव्हास तुला सांगतील.”

गोगॅंनी अखेर यायला होकार दिला. व्हिन्सेन्टला मनापासून आनंद झाला. आता तो नव्या उमेदीने मित्राच्या स्वागताकरता यलो हाऊस सज्ज करण्याच्या तयारीला लागला.
गोगॅंच्या आगमनाची व्हिन्सेन्टने इतक्या उत्कंठतेनं वाट पाहिली होती की त्याच्या मनावरचा ताणाने परिसिमा गाठली. गोगॅंला आर्ल्स आवडेल का? त्याचा अपेक्षाभंग तर होणार नाही आल्यावर? इथे आल्यावर तो चिडणार, वैतागणार तर नाही?
या अस्वस्थतेला मागे सारत त्याने यलो हाऊसमधली खोली सुसज्ज करायला सुरुवात केली. 
खोली सजवण्याकरता व्हिन्सेन्टने मनापासून कष्ट केले. ही खोली कलाकारांची वाटावी, तल्या फ़र्निचरपासून भिंतीवर टांगलेल्या चित्रांपर्यंत प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व असावे, खोलीत निवांतपणा मिळावा असं त्याला वाटत होतं. 
व्हिन्सेन्टने या दरम्यान रंगवलेल्या ’द यलो रुम’ पेंटींगमधे त्याने सजीव केलेल्या या खोलीचं व्यक्तिमत्व पहायला मिळतं. फ़िकट व्हायोलेट रंगाच्या भिंती, लालसर तपकिरी जमीन, ताज्या लोण्याचा पिवळसर रंग असलेल्या लाकडाचे पलंग आणि खुर्च्या. पलंगावरची चादर, उशांचे अभ्रे लिंबाच्या पिवळसर हिरव्या रंगात, गडद लाल पांघरुण, हिरव्या खिडक्या, जांभळा दरवाजा. खोलीत फर्निचर फ़ार नाही. आर्थिक चणचणीत असलेल्या व्हिन्सेन्टकडे खोलीकरता भपकेबाज फ़र्निचर आणण्याइतके पैसे नव्हतेच. त्यात एक लाकडी पलंग, दोन खुर्च्या, कपडे टांगायला स्टॅन्ड, लाकडी ड्रेसिंग टेबल, केस विंचरायला ब्रश, दाढीचे सामान, आरसा.. इतकंच होतं. पण पूर्ण खोली झळाळत्या रंगांनी भरुन गेली आहे. खोलीचं ऐश्वर्य आहे भिंतीवर टांगलेली व्हिन्सेन्टनी स्वत: रंगवलेली चित्रं. त्यात एक त्याचं सेल्फ़ पोर्ट्रेट आहे, दुस-यात त्याची लाडकी सूर्यफ़ुलं आहेत.
व्हिन्सेन्टच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी गोगॅ आर्ल्सच्या वास्तव्याबद्दल लिहिताना यलो रुमबद्दल लिहितो- "यलो हाऊसमधल्या माझ्या खोलीत, जांभळ्या डोळ्यांची सूर्यफ़ूलं, पिवळसर सोनेरी रंगामधे झळाळत असायची, त्यांचे देठ पिवळ्या टेबलावरच्या, पिवळ्या फ़ुलदाणीत बुडालेले. चित्राच्या कोप-यात चित्रकाराची सही होती: व्हिन्सेन्ट. खिडकीवरच्या पिवळ्या पडद्यातून गाळून आलेला सोनेरी सूर्यप्रकाश या फ़ुलांवर पडला की संपूर्ण अवकाश सोन्यासारख्या झळझळीत स्फ़ुरदिप्तीने भरुन जायचा; रोज सकाळी पलंगावरुन उठताना मनात विचार यायचा, फ़ार सुंदर वास असणार या फ़ुलांना."

गोगॅं रहायला यायच्या आधी व्हॅन गॉघने पिवळ्या घरातल्या बेडरुमचे हे चित्र रंगवले होते. नंतर त्याने तिथल्या खूर्च्यांचेही पेंटींग केले. व्हॅन गॉघच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीची प्रातिनिधीक अशी ही चित्रे आहेत. त्याच्या अंतर्मनातले विचार सुस्पष्टतेनं व्यक्त करणारी.


एक साधीसुधी, बिनहातांची बैठक असलेली खूर्ची खास त्याच्या आवडीच्या प्रसन्न, पिवळ्या रंगछटेत त्याने रंगवली. त्यावर सामान्य लोक वापरत असा तंबाकूचा पाईप ठेवला आहे. खूर्चीच्या मागे कांद्याची पात टांगलेली, फ़ुलत्या निसर्गाचं प्रतिक, कलेतून इथे जे नवं विश्व निर्माण होणार आहे त्याचं प्रतिक. गोगॅंकरता त्याने प्रशस्त, आरामशीर, लांब हातांची खूर्ची रंगवली. या खूर्चीच्या मागे गॅसलाईट आहे. त्याचा गूढ, धूसर प्रकाश रात्रीला अधोरेखित करणारा. खूर्चीच्या बैठकीवर दोन कादंब-या आणि एक मेणबत्ती ठेवली आहे. गोगॅंच्या चित्रांमधील वैचारिकता, प्रेरणांचं प्रतिक, त्याच्या बुद्धीमत्तेचंही. गोगॅंच्या विचारपुर्वक, बौद्धीक प्रेरणांना महत्व देऊन चित्र रंगवण्याच्या शैलीचा व्हिन्सेन्टने केलेला हा सन्मान होता.

इकडे गोगॅं आर्ल्सला येण्याची तारिख सारखी पुढे ढकलत होता. त्याची वाट पहाणा-या व्हॅन गॉघच्या मनावरचा प्रतिक्षेचा ताण वाढत होता.
ऑक्टोबरच्या शेवटी जेव्हा गोगॅं अखेरीला आर्ल्सला येऊन थडकला तेव्हा व्हॅन गॉघच्या मनातली अपेक्षांची घागर ओसंडून जायची बाकी होती. 

२३ ऑक्टोबरच्या पहाटे गोगॅं ट्रेनने आर्ल्सला आला.
पुढचे दोन महिने विलक्षण घडामोडींचे, विध्वंसक वादळाचे ठरणार होते, दोघांच्याही दृष्टीने.
यलो हाऊस लहान होतं. त्यात खूप गैरसोयी होत्या, वेगळ्या बाथरुम नव्हत्या. दोघांना एकच स्टुडिओ शेअर करायला लागत होता. पहिल्या दिवशी गोगॅं व्हॅन गॉघची अरुंद, लांबलचक बेडरुम पार करुन आपल्या खोलीत पोचला. भिंतीवर होती अत्यंत देखणी व्हिन्सेन्टची सूर्यफ़ुले आणि इतर पेंटींग्ज..लांबलचक प्रवासानी दमलेल्या गोगॅंचा शीण झटकन उतरला.

सुरुवातीला गोगॅंला हे सगळं खूपच आवडलं. दोघेही खूश होतेएकमेकांच्या सहवासाचा, मैत्रीचा आनंद लुटत होते, आर्ल्सच्या निसर्गरम्य परिसरात जाऊन रंगवत होते, आर्ट, टेक्निक बद्दल चर्चा होत होती.
गोगॅंचा मूड प्रसन्न होता. पिवळ्या घरात शांत वातावरण होत. गोगॅंने घरकामाची बरीचशी जबाबदारी उचलली, तो चवदार, पोटभरीचं जेवण बनवायचा आणि आपल्या प्रवासांच्या चित्तथरारक कथा, जहाजावरच्या खलाशांचे मजेशीर अनुभव व्हिन्सेन्टला सांगायचा. व्हिन्सेन्टही गोगॅंला आर्ल्समधल्या आपल्या आवडत्या निसर्गरम्य जागांवर घेऊन गेला, तिथे दोघांनी चित्र रंगवली. व्हिन्सेन्टच्या ओळखीच्या वेश्यांशी त्याचीही मैत्री झाली.
गोगॅंने ब्रिटनीमधे रंगवलेल्या व्हिजन आफ़्टर द सर्मन पेंटींगमधल्या शक्तिशाली अध्यात्मिक जाणीवेतून व्हिन्सेन्टला आपल्या पेंटींगमधे रंग, रचनांचा अधिक जोरकस वापर करण्याचा आत्मविश्वास आला. त्याच्या त्या काळात काढलेल्या पेरण्या करणा-या शेतक-यांच्या चित्रांमधून हा परिणाम ठळकपणे दिसतो.
दोन एकाकी माणसं काही काळ एकमेकांच्या सोबतीत दुकटी झाली.

काही आठवडे लोटले. हवेत गारठा साकळायला लागला. बाहेरचं वातावरण धुकाळ झालं. त्यांना जास्तीतजास्त घरातच राहून काम करणं भाग पडायला लागलं. आणि व्हिन्सेन्टच्या स्वभावातल्या चिडखोरपणाने उचल खाल्ली, मधूनच बाहेरच्या हवेला सुसंगत उदासपणाचे झटके यायचे. गोगॅंचाही स्वभाव तापट, उतावळा होताच. त्यामुळे लहानसहान गोष्टींवरुन खटके उडायला लागले.
व्हिन्सेन्ट अव्यवस्थित होतामानसिकदृष्ट्या अस्थिर होताकाम करताना सतत बोलत राहीगोगॅंला त्याचा त्रास होईएकेकाळी खलाशी असलेलानंतर यशस्वी व्यावसायिक असलेला गोगॅं ठामनीटनेटक्या स्वभावाचाएकांतप्रिय माणूस होतातोही एकटा होतापण त्याचे एकटेपण व्हिन्सेन्टच्या एकटेपणापेक्षा सर्वस्वी वेगळेगोगॅं स्वयंपूर्ण होतात्याच्यात आत्मविश्वास होताएकटं रहायला त्याला मनापासून आवडायचंलोकांमधे मिसळायलाही तितकंच आवडायचंमुख्य म्हणजे लोकांनाही त्याचा सहवास आवडायचागोगॅंचे सामाजिक संबंध उत्तम होतेमात्र त्याला उगीच सलगी वाढवणारे लोकं आवडत नसततो लगेच सावध व्हायचामित्रप्रेमाला आसुसलेला व्हिन्सेन्ट त्याच्या जास्तीत जास्त निकट जायचा प्रयत्न करत होतागोगॅं वैतागला नसता तरच नवल.
दोन एकटे जीव एकमेकांच्या सोबतीला आले पण त्यातून साहचर्य जन्माला आलं नाही.
गोगॅं चित्रकार म्हणून लहानसं का होईना नाव मिळवून होतास्वत:ला श्रेष्ठ समजण्याचा त्याचा स्वभाव होताव्हिन्सेन्टजवळ काहीच नाहीएकही धड काम हातून झालेलं नाहीनावयशपैसा जवळपासही फ़िरकलेलं नाहीत्यामुळे आत्मविश्वासाचा अभावदोघांची व्यक्तिमत्व एकत्र काम करता येण्यासारखी परस्पर पुरक तर नव्हतीचउलट पुर्ण विरोधीचित्रकलेचा सामायिक दुवा त्यांना इतपत एकत्र सांधू शकला कदाचित.
गोगॅं ४० वर्षांचा आणि व्हिन्सेन्ट ३५ वर्षांचा होताअस्वस्थ मनोवृत्तीचाअशक्त कुडीचा व्हिन्सेन्ट आणि कणखर स्वभावाचाबलदंड गोगॅंअडिच महिने ते एकत्र राहिलेएका घरात काम केलंइतका वेळ ते एकत्र राहू शकले हेच आश्चर्य वाटावं इतका त्यांच्या स्वभावात मुलभूत फ़रक होताजगण्यातअनुभवांमधेअपेक्षांमधे जमीन-आसमानाचं अंतरसमकालिन चित्रकार असण्यापलीकडे आणि आपापल्या जगात एकटे असण्यापलीकडे दोघांमधे काहीच साम्य नाही.

यलो हाऊसकाहीसं वेडवाकडंआतल्या खोल्या तिरक्यानीट कोन  सांधलेल्या भिंतीदोन मोठ्या व्यक्तींना जेमतेमच पुरेल असा आतला संकुचितअपुरा अवकाश१५ फ़ूट रुंद आणि २४ फ़ूट लांब आकारची एक खोलीतिथेच जेवणझोप आणि चित्र रंगवणेत्यात तंबाखूचा धूरदारुचा दर्प आणि रंगांचा तीव्र वास आत कोंदून राहिलेला असेहवा जेव्हा खराबगारठलेली असे तेव्हा आत कोंडून रहाण्यावाचून पर्यायही नसेचोवीस तास एकमेकांच्या नकोशा सहवासात.
दोघांपैकी एकमेकांशी मिळतं जुळतं घ्यायच्या स्वभावाचे नव्हतेचपण त्यातही व्हॅन गॉघशी जुळवून जास्तच कठिणतो दिवस रात्र काम करत राहीकाम करताना सतत बडबड करेआणि सतत पित असेतो थिओला लिहितो- “जेव्हा आत घोंगावणा-या वादळाचा जोर तीव्र होतोतेव्हा मी एक ग्लास भरुन घेतोत्याशिवाय ते शांत होणारच नाही हे मला माहित आहे.”
व्हिन्सेन्टच्या -हेवाईकझपाटलेल्या स्वभावाने अनेकदा गोगॅंही चकित होईत्याच्या मनावरचा ताण वाढत होतातीरस्कार निर्माण व्हायला लागला मनात.

मैत्रीआपुलकीस्पर्धाअसूया यांचं एक विलक्षण स्फोटक रसायन या सर्व काळात यलो हाऊसमधे खदखदत राहिलंआणि मग एक दिवस त्याचा स्फ़ोट होऊन व्हायचा तो विध्वंसही झाला.
अशाही परिस्थीत दोघं चित्र मात्र काढत राहिले. अनेक गोष्टी त्यांनी रंगवल्या- आर्ल्सची निसर्गरम्य पार्श्वभूमी, पिवळं घर, आतलं फ़र्निचर, बाहेरचा लहानसा चौकोनी अंगणाचा तुकडा.
गोगॅंने काढलेलं प्रत्येक चित्र व्हिन्सेन्टला आवडायचं, तो तसं बोलूनही दाखवे, कौतुक, स्तुती करे, मात्र गोगॅंमधे हे औदार्य नव्हतं. कौतुकाचे शब्द तर त्याच्या तोंडून क्वचितच उमटत, टीका मात्र तो भरभरुन करे. व्हिन्सेन्टला तो एकदा “तू रंग फ़ासण्यामधे फ़क्त पटाईत आहेस.” असंही म्हणाला.
तरीही नाऊमेद न होता त्याने डिसेंबर महिन्यात तब्बल २५ पेंटींग्ज रंगवली. तो थकून गेला होता. सतत दारु पित होता. त्याच्या मनात भिती होती की गोगॅं त्याला एकटं सोडून कधीही निघून जाईल.
आपण एकटं पडू ही भिती वाटण्याची त्याची ही पहिलीच वेळ नव्हती. फ़ार पूर्वीपासून एकटं पडण्याच्या भितीने त्याच्या अंतर्मनात ठाण मांडलेले होते. अनेक वर्षांपूर्वी हॉलंडला असताना त्याने थिओला लिहिलेल्या पत्रात विचारले होते: “एकटेपणाने जगण्याला जीवन कसं म्हणायचं?”
एकाकी जगणं हे जगणं नाहीच, तशी वेळ आली तर आपण तसं जगू शकणार नाही या धास्तीत तो कायम होता. दुर्दैवाने तो जितका काळ जिवंत होता तितका काळ एकाकीच राहीला, सोबतीवाचून जगला आणि मग ते असह्य झालं तेव्हा एकाकीच मरुन गेला.   
पूर्वायुष्यातली काही अर्धवट प्रेमप्रकरणं, नाकारल्या जाण्यातून आलेला न्यूनगंड, बराचसा अपराधी भाव, कामात यश मिळत नसल्यामुळे आलेलं नैराश्य आणि या सगळ्याच्या जोडीला औदासिन्याची सहज शिकार होणारं कमकुवत मन. व्हिन्सेन्टच्या एकटेपणाला हे सगळं घेरुन होतं.

व्हिन्सेन्टच्या स्वभावातल्या नैराश्याने उचल घेतली. तरीही तो परिश्रमपूर्वक त्यावर मात करत पेंटींग करतच राहिला. मानसिक आंदोलनांशी झगडत राहिला. सहन होत नव्हतं तरी बाहेरच्या गारठ्यात जाऊन काम करत राहिला. 
मी इथल्या एका कुटुंबातल्या लोकांचं पोर्ट्रेट रंगवत आहे, असं त्याने थिओला लिहिलं. ’द रुलिं फ़ॅमिली’ हे त्याने यावेळी केलेलं चित्र त्याच्या आवडत्या चित्रांपैकी एक आहे.
गोगॅं त्याला स्मरणाचा, कल्पनाशक्तीचा वापर करुन घरात राहून चित्र रंगव असं विनवत होता, पण व्हिन्सेन्ट अट्टाहासाने बाहेर, मोकळ्या हवेत जाऊनच रंगवत राहिला. मॉडेल प्रत्यक्ष समोर असतानाच रंगवायला त्याला आवडे.
खुल्या निसर्गात जाऊन रंगवायला त्याला मनापासून आवडे. आजूबाजूला उधळलेल्या नैसर्गिक रंगांमधूनच त्याला प्रेरणा मिळत होती हे एक आणि दुसरं महत्वाचं कारण डोक्यात सतत उधाणत असलेला सर्जनशील कल्पनांचा आवेगावर नियंत्रण मिळवायला, तो वेग शांत करायला आपल्याला बाहेरच्या मुक्त, मोकळ्या वातावरणातच जायला हवं ही आंतरिक जाणीव त्याला होती. बंद, कोंडलेल्या वातावरणात त्याच्यातला कलाकार घुसमटायचा.
चित्र काढण्याच्या एकमेकांच्या सवयीवरुन सुरु झालेले वाद शैलीवर, चित्रातल्या वैचारिकतेवर, रचनेवर घसरुन मग वैयक्तिक स्वरुपाचेही व्हायला लागले. एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम, सहानुभुतीची जागा हळू हळू संताप, तिरस्कार, मत्सर, हेटाळणी सारख्या नकारात्मक भावनांनी घेतली. यलो हाऊसमधे वादळ घोंगावायला लागलं.  
दोन व्यक्तींच्या एकटेपणातून सोबत निर्माण होतेच असं नाही. साथ न जुळलेल्या सोबतीमुळे अनेकदा एकटेपणा अजूनच तीव्र होतो.  
व्हिन्सेन्ट आणि गोगॅंमधील नातं डिसेंबरमधे विकोपाला गेलं. वाद, भांडणं सतत व्हायला लागली. व्हिन्सेन्टच्या भाषेत हे वाद ’वीजेसारखे तळपते’ होते. त्याची मानसिक स्थिती खालावत चालली.
डिसेंबरमधे गोगॅंने व्हॅन गॉघचं तो त्याची आवडती सूर्यफ़ुले रंगवत असतानाचं पोर्ट्रेट केलं.
व्हिन्सेन्टबद्दल मनात असणा-या सहानुभुती, मैत्रीच्या जाणीवेतून त्याने हे सुंदर पेंटींग मन लावून केलं. पण आता त्याला परतायचे वेध जास्तच तीव्रतेनं लागले होते. त्याने जाण्याचा विषय काढला की व्हिन्सेन्टच्या रागाचा स्फ़ोट व्हायचा, तो धुमसत रहायचा. परिस्थिती हाताळणं आपल्या आवाक्याबाहेर आहे याची जाणीव गोगॅंला होत होती.

डिसेंबर २३, १८८८ ला संध्याकाळी व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ हातात वस्तरा घेऊन गोगॅंच्या अंगावर धावून गेला, गोगॅंच्या मनात आर्ल्स सोडून जायचा विचार अजूनही घोळतो आहे का हे त्याला जाणून घ्यायचे होते. गोगॅंने ते नाकारले नाही. निराश झालेला व्हिन्सेन्ट घरातून निघूनच गेला अचानक. त्याच्या या वागणुकीने अस्वस्थ झालेला गोगॅंही घराबाहेर पडला. ती रात्र त्याने हॉटेलात काढली. 
दुस-या दिवशी सकाळी गोगॅं पुन्हा पिवळ्या घरात आला. तिथे रक्ताच्या थारोळं होतं. ते दृश्य प्रचंड धक्कादायक होतं. पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडूनच त्याला कळलं की भांडणानंतर सैरभैर झालेल्या व्हॅन गॉघने आपल्या डाव्या कानाची पाळी कापली होती. रक्ताळलेल्या अवस्थेत तो पहाटे जवळच्या ब्रॉथेलमधे पोचला, आपला कापलेला कान पेपरमधे गुंडाळून त्याने एका वेश्येच्या हातात सोपवला. व्हिन्सेन्टची अवस्था पाहून घाबरलेल्या लोकांनी त्याची रवानगी हॉस्पिटलात केली होती. पोलिसांकडून सुटका झाल्यावर गोगॅंनी झालेल्या घटनेची तार थिओला केली. दुस-याच दिवशी पहाटेच्या ट्रेनने थिओ आर्ल्सला आला. 
गोगॅं पॅरिसला निघून गेला होता. जायच्या आधी व्हिन्सेन्टला हॉस्पिटलात जाऊन भेटायचं त्याने टाळलं. त्यानंतर दोघे कधीही भेटले नाहीत. पत्रव्यवहार मात्र चालू राहिला.
हॉस्पिटलमधून व्हिन्सेन्ट पुन्हा पिवळ्या घरात रहायला आला. घडलेल्या घटनेतून तो आश्चर्यकारकरित्या लवकर सावरला. पुन्हा आपल्या चित्रांकडे वळण्याचा प्रयत्न करायल लागला, पण एकटेपणा त्याला हळू हळू संपवत होताच.
स्टारी नाइट्स सारखं अद्वितीय चित्र त्याने या एकटेपणातच काढलं. ते काढत असताना एकांतातली निरव शांतता त्याने पहिल्यांदाच अनुभवली. पण फ़ार काळ ती टिकली नाही. त्याला पुन्हा नैराश्याचा झटका आला. पुन्हा हॉस्पिटल. यावेळी तर त्याच्या सुरक्षिततेकरता डॉक्टरांनी त्याचे रंग, चित्रकलेचं साहित्यही हिरावून घेतलं. त्याचं सर्वस्व, एकमेव सोबतही आता गेली. बरा होण्या ऐवजी त्याचे नैराश्याचे झटके वाढतच गेले. शेवटी त्याला पुन्हा रंगवायला परवानगी देण्यावाचून डॉक्टरांसमोर पर्यायच राहिला नाही. हातात पुन्हा रंग आणि कॅनव्हास आल्यावर व्हिन्सेन्ट आपोआप शांत होत गेला.


त्यानंतर दोन महिने व्हिन्सेन्ट यलो हाऊसमधे एकटा राहिला. आयुष्यात प्रथमच त्याने आपला एकटेपणा स्विकारला. थिओला पत्र लिहिणे आणि चित्र रंगवणे या त्याच्या सर्वात आवडीच्या गोष्टी करत तो शांतपणे यलो हाऊसमधे रहात होता. पण ही अंतिम वादळापूर्वीची शांतता होती.
थिओच्या पत्रात त्याने लिहिलं- “गव्हाच्या शेतात गेलं की मला एकटेपणाचे ढग घेरुन टाकतात. ते इतके भयानक असतात की मी बाहेर पडायलाच घाबरतो.”
गव्हाच्या शेतावर घोंगावत आलेल्या कावळ्यांचं चित्र त्याने याच काळात काढलं. ते त्याचं शेवटचं चित्र ठरलं.


--
दोघांची गुंतागुंतीची व्यक्तिमत्व, कलंदर, कलाकार वृत्ती, भविष्याबद्दलची स्वप्न दोघांच्याही मनात असली तरी ती पूर्ण करण्याची वृत्ती वेगवेगळी होती. गतायुष्यातल्या अपयशांचं, चुकलेल्या निर्णयांचं ओझं दोघांच्याही पाठीवर होतं. यलो हाऊसमधल्या वास्तव्यात दोघांच्या मनामधे दोन भिन्न स्तरांवर चाललेले विचार, नाराजी, अस्वस्थतेचं कारण होते. स्फ़ोट अपरिहार्य होता.
गोगॅंने नंतर व्हिन्सेन्टबद्दल लिहिलं: “तो आणि मी, आमच्यातली भांडणाची पद्धतही वेगवेगळी, एकजण उसळत्या ज्वालामुखीसारखा आग ओकणारा, दुसरा आतल्या आत उकळत रहाणारा.. दोन्हींमधे स्फ़ोट आणि नंतरचा उध्वस्तपणा अनिवार्य होता.”
--
एकटेपणाच्या वेदनेचं प्रतिक आहे व्हिन्सेन्ट. त्याचा एकटेपणा कलावंताने आपणहून स्विकारलेला एकांत नव्हता. त्याच्या मानसिक स्थितीमुळे त्याच्यावर लादला गेलेला हा एकटेपणा. आपल्या बालपणाचे वर्णन त्याने ’उदास, थंडगार, निष्प्राण’ अशा शब्दांमधे केलं आहे. तारुण्यात प्रवेश करताना पहिल्याच एकतर्फ़ी प्रेमात झालेला उपहास, हेटाळणी, नंतर आयुष्याने दिलेले अपयशाचे फ़टकारे.. घाव सतत ओले राहिले. यलो हाऊसमधे त्याने आपल्या आयुष्यातले जे नऊ महिने घालवले त्याकाळात अनेकदा त्याने जीवापाड प्रयत्न केला मनात साचून राहिलेला एकाकीपणा दूर करायचा आणि नंतर स्विकारायचाही. पण तो हरला.
व्हिन्सेन्टच्या मानसिक अस्थिरतेमागे मनातली एकटेपणाची भिती हे मुख्य कारण होतं. आपल्याला एकटेपणा न झेपणारा आहे, आपण एकटं राहू शकत नाही असं त्याला सतत वाटण्यामागे काही शारिरीक कारणंही होती. व्हिन्सेन्टला ग्लोकोमा, म्हणजेच काचबिंदू होता. त्यामुळे त्याला आपल्या दृष्टीची खात्री वाटायची नव्हती. आपण अचानक, कधीही आंधळे झालो तर काय, ही भिती मनात खोल दडली होती. व्हिन्सेन्टला तीव्र उन्हाचा, सूर्यप्रकाशाचाही भयंकर त्रास होत असे, सतत सनस्ट्रोकने तो आजारी पडे. गुप्तरोगाचाही त्रास मागे लागला होता. व्हिन्सेन्ट बॉर्डरलाईन सिझोफ़्रेनिक होताच, त्यात अनेक वर्षं स्वस्तातली ऎबसिन्थे रिचवल्यामुळे त्याला चित्रविचित्र आभास होत रहात.
अशा शारिरीक-मानसिक व्याधींनी गांजलेल्या व्हिन्सेन्ट्ला एकटं रहाण्याचा आत्मविश्वास कधीच वाटू शकला नाही यात फ़ारसं नवल नाही.
--
आर्ल्समधल्या यलो हाऊसची कहाणी जाणून घेतल्यावर साध्यासुध्या, कुणाची तरी वाट पहात असणा-या पिवळ्या खोलीच्या चित्राला विलक्षण करुण संदर्भ प्राप्त होतात. ‘एव्हरी आर्ट इज बायोग्राफ़िकल’ हे फ़ेलिनीचे वाक्य यलो रुम इन आर्ल्सच्या बाबतीत आत्यंतिक खरे वाटते.
व्हॅनन गॉघने चितारलेले गव्हाच्या शेतावरच्या कावळ्यांचे चित्र पहाताना किंवा त्याने चितारलेला रस्त्यावरचा एकाकी सायप्रस पहाताना कोणत्याही संदर्भांवाचूनही मनाला खिन्नता, उदासी येते कारण त्यातला एकटेपणा मनाला घेरुन टाकतो. व्हिन्सेन्टच्या एकटेपणाचे संदर्भ कळतात, त्याच्या अस्थिर, जलद फ़टका-यांचे, पिवळ्या रंगाच्या अतिरिक्त वापराचे मूळ औदासिन्यात आहे आणि औदासिन्याचं कारण आयुष्यभराचा एकाकीपणा आहे हेही कळतं तेव्हा मन जखमी होतं.
माहीत असलेल्या, माहीत करुन घेतलेल्या जीवनसंदर्भांच्या खूणा चित्रांमधे शोधणे अपरिहार्य ठरते.
कलाकृतीचा आस्वाद कलाकाराच्या कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय संदर्भांशिवाय स्वतंत्रपणे घेता यायला हवा हा काही समीक्षकांचा आग्रह असतो. पण जर चित्रकाराच्या वेदनेचे, जीवनसंघर्षाचे अवशेष त्याच्या चित्रांना चिकटून राहिलेले असतील तर ते जाणून घेणं आवश्यकच ठरतं. तसं केलं नाही तर आर्टिस्ट्स इन्टेन्शनला ते नाकारणं ठरतं. त्या चित्रकृतीवर तो अन्याय ठरतो. 
--
हा लेख पद्मगंधा दिवाळी २०१५ या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. 


sharmilaphadke@gmail.com