Showing posts with label पुस्तकांबद्दल. Show all posts
Showing posts with label पुस्तकांबद्दल. Show all posts

Monday, April 04, 2016

शर्वरीच्या कविता

गेले दोन-तीन दिवस ’शर्वरीच्या कविता’ आसपास आहेत. 'ऋतूरंग’च्या अरुण शेवतेंनी त्यांच्या मुलीवर, शर्वरीवर लिहिलेल्या कविता. बापाने मुलीवर, मुलीकरता लिहिलेल्या. फ़ार गोड, साध्यासुध्या, मनात खोलवर उतरणा-या लहान लहान ओळी. 
या आधी गुलझारांच्या ’बोस्कीच्या कविता’ वाचल्या होत्या. त्यातला लोभस कोवळेपणा कधीही जून न होणारच नाही असा. ’शर्वरीच्या कविता’ पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी गेले होते. गुलझार आले होते. त्यांनी त्यावेळी ’शर्वरीच्या कविता’ ऑन द स्पॉट त्यांच्या खास शैलीत हिंदीमधे अनुवादित केलेल्या ऐकतानाच जाणवलं जातकुळी किती सारखी आहे दोन्ही बापांच्या मनातल्या मुलीवरच्या प्रेमाची.
’फ़ादर्स डे’ च्या दिवशी लेकीला काय भेट द्यावी या विचारात असताना अचानक सुचलेली यातली पहिली कविता. “खरंच सांगतो तू जन्माला येणार म्हणून माझा जन्म झाला”.. आणि मग हा प्रवास “या जगात मी नसताना तुझी दुपार कशी असेल, तुझी संध्याकाळ कशी असेल या विचारानेच उन्मळून जातो..” इथवर येऊन पोचतो तेव्हा माझ्यातल्या मुलीचं मन गलबलून जातं. 

नुकत्याच हात सोडून एकट्यानेच निघून गेलेल्या माझ्या वडिलांच्या मनात कधीतरी असंच काहीसं आलेलं असणार..
जगातल्या सगळ्या मुलींच्या मनातली बापावरच्या प्रेमाची जातकुळीही एकच तर असणार.
     

Sunday, February 02, 2014

ज्याचं त्याचं लिटफ़ेस्ट

जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.

गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?


लिटफ़ेस्ट मला नव्या नव्हत्या. अर्थात आजवर उपस्थित राहीलेल्या लिटफ़ेस्ट्स किस झाड की पत्ती वाटाव्या असा इथला प्रचंड पसारा. नोबेल, पुलित्झर, बुकर विनर, आंतरराष्ट्रीय साहित्यिक इथे आमंत्रण मिळावं म्हणून उत्सुक असतात. जगातली सर्वात मोठी विनामूल्य लिटरेचर फ़ेस्ट म्हणून लौकिक यांच्या खाती जमा आहे. पाऊण लाख लोकं यावर्षी भेट देतील असा अंदाज.
जयपूर लिटफ़ेस्टचं उद्घाटन सकाळीच अमर्त्य सेनांच्या भाषणाने झालं होतं. ते आणि नंतरचे जेवणाच्या वेळेपर्यंतचे कार्यक्रम सगळे मिस झालेले. आता दुपारच्या सत्रातले सगळे अटेंड करायचे हा विचार मनात. पण ते नेमके कुठे, कोणते ठरवताना गोंधळ उडत आहे.

हातातल्या भरगच्च प्रोग्रॅम शेड्यूल मधली दडपवून टाकणारी नावं, विषय वाचताना हे सगळं आपल्याला झेपणार आहे का, नेमकं कशाला आलो आहोत आपण इथे? वाटायला लागतं. आपण जागतिक साहित्य वाचनात खालच्या पायरीवरच अजून, काहीबाही लिहितो म्हणून रजिस्ट्रेशन टॅगवर नाव लेखिका लागले आहे इतकंच. पण प्रादेषिक भाषेला कोण विचारतय इथे? काही असेल आपल्याकरता मग इथे? असं काही ऐकण्याने जाणीवा अचानक समृद्ध वगैरे होतील, बौद्धिक पातळी उंचावेल अशा भ्रामक कल्पनाही सोबतीला नाहीत.
भारतीय लेखक माहीत आहेत, झुंपा लाहिरी, कॅथरिन बू, ग्लोरिया स्टाइन्मेनला ऐकायची, बघायची उत्सुकता आहे, पण बाकी?

इतक्यात बाजूच्या डेस्कवर कोणीतरी येतं. माझ्या अगदी शेजारी. सहा फ़ूट उंची, पांढरे-शुभ्र केस, भारतीय सावळा, हसरा, मृदू, देखणा चेहरा. मी उत्सुकतेनं गळ्यातल्या टॅगवर नजर टाकते. पार्थ मित्तर. पार्थ मित्तर? हे नाव कसं विसरले? ते वाचूनच रजिस्ट्रेशन केलं. प्रत्यक्ष पार्थ मित्तर त्यांच्या ’मच मलाइन्ड मॉन्स्टर’ पुस्तकाच्या नव्या आवृत्ती संदर्भात बोलणार, ते पुस्तकाचे वाचन करताना आपण ऐकणार ही कल्पनाच माझ्याकरता थ्रिलिंग. मी पार्थ मित्तर भाग घेणार असलेल्या एकंदर तीन कार्यक्रमांवर टीकमार्क करते. ती करतानाच मग ऍन्ड्रू ग्रॅहम डिक्सन नाव दिसते. कारव्हॅजियो वर पुस्तक लिहिणारा. मी त्याही नावावर खूण करते. अचानक बरीचशी ओळखीची नावं दिसायला लागतात. निकोलस शेक्सपियर, राणा दासगुप्ता, अनिता नायर, कविता सिंग, आर्शिया सत्तारही माहीत आहेत. विल्यम डॅलरेम्पल, मायकेल सान्डल, समान्था विनबर्गही माहीत आहेत. मी खूणा करत जाते. काहीतरी मिळेलच माझ्याकरता.

आज लिटफ़ेस्टवर लिहिताना मनात पुन्हा गोंधळ. इतकं मिळालं आहे, अनुभवलं आहे ते फ़क्त काही थोडक्या शब्दांमधे कसं बसवायचं?



दिवस दुसरा, संध्याकाळचे पाच-

डिग्गी पॅलेसच्या चार-बागेमधे ’स्टोरी टेलिंग अराउंड द ग्लोब’ चर्चासत्र चालू आहे.
कला इतिहासतज्ञ, सौंदर्यशास्त्राच्या आणि बंगाली आणि राजस्थानी लोककथांच्या अभ्यासक जे.एन.यूच्या कविता सिंग मिनिएचर पेंटींग्जचं पारंपरिक कथनशैलीतलं स्थान समजावून देत आहेत. त्यांच्या सोबत इंग्लिश-चायनिज चित्रपट लेखिका शिओलू ग्वो, ज्यांनी लहान मुलांकरता वेगळ्या धर्तीची गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत, हार्वर्ड स्कॉलर किकू अदात्तो ज्या स्टोरीटेलिंगच्या पारंपारिक पद्धतींवर संशोधन करतात, आहेत. विल्यम डॅलेरिम्पल चर्चेचा मेळ राखत आहेत. स्क्रीनवर शाहनामा, पर्शियन, मुघल पेंटींग्ज. आपण ऐकण्यात गुंग.

गार, बोचरा वारा वहातो. अंगावर शिरशिरी येते. चारबागेतला हा खुला मंडप, गर्द झाडीने वेढलेला. बाजूला कमानदार भिंत, खास जयपूरी गर्द गुलाबी रंगाचा दगड. गारठा वाढतो आहे. उद्यापासून अशा उघड्या टेन्टमधले कार्यक्रम संध्याकाळी मिस करायचे. कुल्हडमधल्या वाफ़ाळत्या चहाची उब पुरत नाही. मंदावलेला प्रकाश जाणवतो. स्क्रीनवर झुकलेलं बाजूचं डेरेदार झाडही मिनिएचर पेंटींगमधनं उठून आल्यासारखं वाटायला लागतं. अचानक कुठूनतरी तीन देखण्या लांडोरी उडत येऊन बाजूच्या दगडी कमानीवर विसावतात, लगेच भरारी घेत नाहीशा होतात, आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. आणि मग एक मोर येऊन कमानीवर बसतो. आपला निळा, जांभळा वैभवशाली पिसारा एकदा उलगडतो, मिटतो. आपण अवाक. पहात आहोत ते सत्य की दृष्टीभ्रम ठरवता येत नाही. आपण आजूबाजूला बघतो, प्रेक्षकांमधले अनेक तिकडेच बघत आहेत हे कळल्यावर दिलासा मिळतो, पण मनातली त्या मोराची नवलाई ओसरतच नाही. नजर पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच वळत रहाते.
जयपूर लिटफ़ेस्ट शैलीतली ही एक खास आपल्याकरता असलेली कहाणी समोर उलगडते आहे असं वाटत रहातं.


दिवस- बहुधा तिसरा
फ़्रन्ट-लॉन

रेझा अस्लन- इराणियन-अमेरिकन स्कॉलर, धर्म या संकल्पनेचा अभ्यासक. त्याच्या “Zealot- The Life and Times of Jesus of Nazaretha” पुस्तकाने जगभर खळबळ माजवली. त्याला सातत्याने विचारले गेले, तू स्वत: मुस्लिम असताना ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकाच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा तुला काय अधिकार? तुझा काय हेतू?
“एका तटस्थ धर्म-अभ्यासकाने एका मोठ्या धर्माची स्थापना करणा-या जीझसचा शोध घेण्याचा, अनेक अर्थ उलगडवण्याचा हा फ़क्त एक प्रामाणिक प्रयत्न होता.” रेझा अस्लन हे पुस्तक लिहिण्यामागची त्याची भूमिका सांगतो आहे. बहुतेक पहिल्यांदाच. धर्माचा अर्थ प्रत्येकाकरता वेगळा असतो. ओसामा बिन लादेनसारख्या कट्टर धर्मनिष्ठाकरता इस्लामचा अर्थ वेगळा. आणि माझ्यासारख्याला ज्याला श्रद्धा म्हणजे काय याची व्याख्याही धड मांडता आलेली नाही, त्याच्याकरता इस्लाम वेगळा. चौदाशेहून जास्त वर्ष या धर्माचा नेमका अर्थ मदरशांच्या चार भिंतींआड बंदिस्त होता, आता प्रत्येकजण स्वत:चा, वैयक्तिक अर्थ शोधू पहातो आहे ही चांगली गोष्ट आहे. काहीजणांना ती भविष्याकडे घेऊन जाण्याची सुरुवात वाटते, काहींना ती भविष्याची अखेर होण्याची सुरुवात वाटते. धर्माचा अर्थ काही शांतता, सहिष्णूता, समानता लावू पहातात, काही भिती, दहशत, अन्याय. धर्म हे मला मुक्कामापर्यंत घेऊन जाण्याचं फ़क्त एक साधन आहे. तो मार्ग आहे, मुक्कामाचे ठिकाण नाही. मला आज विचारतात तू इस्लामशी एकनिष्ठ आहेस का? मी सांगतो त्या सर्वांना याच व्यासपीठावरुन- I don’t believe in Islam, I believe in God.

रेझा अस्लनचे शब्द मंत्रमुग्ध करुन टाकतात. रेझाचं अजून एक सत्र ऐकलं आहे नुकतंच. Leaving Iran. इराण सोडून दुस-या देशात रहाताना काय अनुभव येतात? त्यात त्याच्यासोबत द एक्झाइल्डची लेखिका फ़रोबा हात्रुदी, जी फ़्रान्समधे स्थलांतरीत होती. त्यांना विचारलं, कुठे रहाणं सोपं आहे? अमेरिकेत की फ़्रान्समधे? रेझा अस्लन उत्तर देतो- इराणियन असताना जगात कुठेही रहाणं सोपं नाही.

मी बुकस्टॉलवर. राणा दासगुप्ताचं द कॅपिटल घ्यावं की रेझा अस्लनचं झेलट घ्यावं विचार ठरत नसतो. पुस्तकांची ओझी किती वहाणार? दोन्ही जाडजुड. एकच घ्यावं. कोणतं?

“तू हे पुस्तक घेतलस तर मी इथेच सही करुन देईन.” शेजारुन आवाज येतो. रेझा अस्लन स्वत:.
मी त्याला विचारते, “तुझं एकही पुस्तकं मी अजून वाचलेलं नाही. पहिल्यांदाच वाचायचं तर कोणतं घेऊ?”
“अर्थातच हे लेटेस्ट, ज्याकरता मी इथे आलो. प्रोमोशन फ़र्स्ट, नाही का?”
पुस्तकावर रेझा अस्लन सही करतो. “तू लिहितेस का?” माझ्या गळ्यातल्या टॅगवर तो नजर टाकतो. होय. मी मान डोलावते. “मग अभिप्राय लिहून पाठव प्रकाशकांना.”
“पण मी मराठीमधे लिहिते.”
“हे तर फ़ारच छान. मला अजून कोणतंही मराठी भाषेतलं मेल आलं नाहीये. माझा पोर्टफ़ोलिओ सुधारेल.”
रेझा अस्लन जातो. मी अजूनही चकित. इतका साधेपणा, प्रामाणिकपणा.. आणि आपण इतक्या सहज भेटतो आहोत जागतिक साहित्यिकाला, कोणतेही सुरक्षेचे कडे नाही, भोवती प्रशंसकांची गर्दी नाही. गेल्या वर्षी यायला हवं होतं. ओर्हान पामुकला असं भेटता आलं असतं तर?
मनाला अनेक आधीच्या चुकलेल्या लिटफ़ेस्ट्सची हुरहुर लागून रहाते. यापुढची एकही चुकवायची नाही.


बर्डन्स ऑफ़ आयडेन्टिटी- वीमेन रायटर्स

नमिता गोखले सांगते मी जन्माने कुमाउं, पहाडी. लग्न करुन मराठी प्रागतिक, ब्राह्मण कुटुंबात आले. नाव बदलणं गृहित धरलं. मग मी लिहायला लागले. पहाडी पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा. अनेक भुवया उंचावल्या गेल्या. तू पहाडी लोकांच्या धैर्याच्या, कष्टांच्या कहाण्या लिहायला हव्यास. तू स्त्रियांच्या वेदनांवर, असामान्य जीवनावर लिहायला हवंस. तू स्त्री आहेस, स्त्रीची वेदना तू नाही मांडणार तर कोण? अशा जुनाट प्रेमकथा लिहिणं हा वेळेचा अपव्यय. ब-याच तेच करतात, पण तूही?

तमिळ-मुस्लिम कवयित्री सलमा म्हणाली, मुळात मी काही लिहिणंच अपेक्षित नाही, त्यातून कविता म्हणजे तर धर्माला बट्टा. त्यात स्त्री-पुरुष प्रेमाची, शारिरीक वर्णनं म्हणजे तर जगणंही मुश्किल. मग मी टोपण नाव घेतलं.
नव-याच्या शेजारी झोपताना, तो झोपला की मला कविता सुचते. मग मी बाथरुममधे जाउन एका कागदावर त्या खरडून टाकीच्या वर लपवून ठेवते.

इस्त्राएली लेखिका झरुर शालेम. हिच्या घरी सगळेच थोर लेखक. आईवडिल, भाऊ, चुलत भाऊ, नवरा, सासू-सासरे. सगळे धर्म-राजकारणावर अभ्यासपूर्ण लिहिणारे. मी लिहायला लागले मानवी भावनांच्या कादंब-या. हळव्या, वैयक्तिक. कुणालाच ते आवडत नाही. पण मी बॉर्डर ऑफ़ नेशन पेक्षा बॉर्डर ऑफ़ इमोशन्स महत्वाच्या मानते. मला वॉर ऑफ़ सेक्शुआलिटी जास्त महत्वाची वाटते वॉर ऑफ़ नेशन पेक्षा. माझ्यावर एकदा राजकीय अत्याचार घडला. माझा देश माझं आयुष्य ताब्यात घेऊ पहात होता. मी ते होऊ दिलं. पण माझ्या लेखनावर त्यांना ताबा नाही मिळवू दिला. या दारुण राजकीय अनुभवावर मी निदान एक लेखिका म्हणून लिहायला हवं असं माझ्या मित्र-मैत्रिणींनाही वाटलं. मला त्यातून बाहेर पडायला सहा महिने लागले होते. त्यानंतर मी जे पहिलं वाक्य लिहिलं ते माझ्या सहा महिन्यांपूर्वी अर्धवट सोडलेल्या कादंबरीतलंच पुढचं वाक्य होतं. एक लेखिका म्हणून मी कोणत्याही दडपणाला बळी पडले नाही याबद्दल मला माझा अभिमान वाटतो.


सत्तर वर्षांची ग्लोरिया स्टाइन्मेन बोलत असताना खचाखच गर्दी. तिच्या वाक्या वाक्याला गर्दी उसळत होती. टाळ्यांचा कडकडाट, घोषणा. अजमेरच्या मेयो कॉलेजातून आलेल्या मुलींचा एक मोठा ग्रूप. त्यातली एक प्रश्न विचारते ग्लोरियाला- पन्नास वर्षं होऊन गेली स्त्री-वादी चळवळीला. अजूनही स्त्रिया घरगुती अत्याचारांमधूनही वाचलेल्या नाहीत. जगभरातून या तक्रारी येतच रहातात. स्त्री-वादी चळवळीचं हे अपयश नाही का?
ग्लोरिया शांतपणे उत्तर देते. एका अत्याचाराच्या घटनेचे परिणाम भरुन यायला चार पिढ्या जातात. मग हे तर हजारो वर्षांचे अत्याचार. नाही. पुढच्या निदान शंभर वर्षांमधे तरी जेन्डर इक्वालिटीची मी अपेक्षा करत नाही. पितृसत्ताक घरांमधून फ़क्त पितृसत्ताक पद्धतीतली मुलं आणि अन्यायाला बळी पडणा-या मुलीच जन्माला येत रहाणार. हे सत्य आहे.


एक आयरिश ग्रूप. पाच पुरुष, तीन स्त्रिया. त्यांचा रायटर्स ग्रूप आहे. दर वर्षी जयपूर लिटफ़ेस्टला येतात. हे त्यांचं पाचवं वर्षं. यावर्षी आम्हाला जोनाथन फ़्रान्झेनबद्दल उत्सुकता आहे. फ़िलिप हेन्शर आम्हाला लिहिण्यात मार्गदर्शन करतात. तेही यावर्षी इथे आहेत. अमर्त्य सेनचं भाषण आम्ही रेकॉर्ड करुन घेतलं इतकं ते आवडलं. आठही जण त्यांच्या नोट्सने भरलेल्या वह्या दाखवतात.
हिंदी कादंबरीकार ध्रूव शुक्ल भोपाळहून आले आहेत. ऑटोबायोग्राफ़िकल नॉव्हेल्स आणि ट्रॅव्हल रायटींगवरची चर्चासत्र ते अटेंड करतात फ़क्त. त्यांना गणेश देवींच्या प्रादेषिक भाषांच्या अस्तित्त्वाच्या संदर्भातल्या भाषणाची उत्सुकता आहे.

आयरा रॉबिन्सन पेंटर आणि म्युझिशियन. दर एक वर्षांनी तो इथे येतो. पूर्वी सगळे महाग खाण्याचे पदार्थ मिळायचे. पण आता वीस रुपयात उत्कृष्ट ब्रू कॉफ़ीही मिळते हे खूप छान झालं आहे. आयरा भारतीय खाद्यपदार्थ मात्र खात नाहीत. पोटाला झेपत नाहीत. आयराला एका चर्चासत्रातलं आर्टिस्ट सुबोध गुप्ताचं वाक्य- मला गेल्या पंचवीस वर्षांमधे एकाही कलामहाविद्यालयाने लेक्चरकरता बोलावलं नाही हे खूप खटकलं. मी स्वत: बनारसला एका लहान शाळेत पेंटींग शिकवायला जातो, विनामूल्य. त्या शाळेत, किंवा इतर कितीतरी लहान ठिकाणी अशा मोठ्या आर्टिस्ट्सना जायला वेळच कुठे असतो, ते स्वत: का नाही इन्स्टीट्यूशन उभारत केवळ सरकारला नावं ठेवण्यापेक्षा? आयरा विचारतो. सुबोध गुप्ताचं वाक्य माझं काम कला निर्मितीचं, मी आर्ट इन्स्टीट्यूशन मधे का लक्ष घालवू हे वाक्य मलाही खटकलेलं असल्याने मी आयराला दुजोरा देते.


गारठलेल्या या गुलाबी शहरात साहित्याचा हा महाकुंभमेळा ओसंडून वहात असतो.

सायन्स, गणित, अनुवाद, प्रादेषिक भाषा, लोकसाहित्य, स्थलांतरित, धर्म, कला, राजकारण, सिनेमा, इतिहास अनेक विषय. ऐकणारे कोणी नवोदित, कोणी प्रस्थापित, कोणी वाचक, कोणी लेखकराव, कोणी प्रकाशक, कोणी भाषाप्रेमी, काही स्त्री-वादी, विद्रोही, अनेक इतिहासप्रेमी. चित्रकार, संगीतप्रेमी, काही पत्रकार, काही पहिली कादंबरी लिहू पहाणारे, काही ब्लॉगर्स, काही नुसतेच ट्वीटर्स. पण प्रत्येकाला लिटफ़ेस्ट काहीतरी देतं आहे. लिटफ़ेस्टने अनेकांना आपल्यात सामावून घेतले. आधीच्याही लिटफ़ेस्टने अनेकांना हे मिळाले म्हणूनच ते पुढच्या वर्षीही येत राहीले.

साहित्यिक प्रस्थापित असो, सुप्रसिद्ध असो, जग गाजवणारे असोत.. ते इतके सौजन्यशील, हसरे, नम्र प्रतिसाद, उत्तरे देणारे, वाचकाला न विसरलेले, अभ्यासूपणे इतरांचंही ऐकणारे, रांगेत उभं रहाणारे, आपल्या टेबलावर बसून खाणारे, पुस्तकं विकत घेत फ़िरणारे असू शकतात हा अनुभव मला लिटफ़ेस्ट देत आहे. किती चांगले लेखक, किती वेगवेगळ्या विषयांवर लिहित आहेत, ते क्लिष्टतेचा जराही बडिवार न माजवता बोलू शकतात, या अनुभवासकट.

वाचकांच्या आवडी किती टोकाच्या असू शकतात. आपल्या शेजारचा ज्यावर खूणा करतो आहे त्यातलं एकही आपल्याशी कॉमन नाही, आणि फ़िक्शन, नॉन फ़िक्शन दोन्हीनाही तुडुंब प्रतिसाद मिळतो अजूनही हेही या लिटफ़ेस्टला कळले.


पुरेशी आसन व्यवस्था, खाण्या-पिण्याच्या सहज सोयी, स्वच्छ टॉयलेट्स, उत्कृष्ट संयोजन, अचूक नियोजन, वेळेची तत्परता, स्वयंसेवकांची योग्य कामगिरी हे सगळं सहजतेनं पार पडत आहे इथे. लिटफ़ेस्टचा अजून एक महत्वाचा अनुभव.  


पण मराठी साहित्यिक, बुद्धीमान लेखक इथे क्वचितच फ़िरकतात. आपल्याला काही मिळेल यातून असं त्यांना वाटत नाही.
त्यात काय? मार्केटींगचा जमाना आहे. स्वत:च्या बुक प्रमोशनकरता ही नावाजलेली मंडळी इथे येतात. बिग डिल. काही म्हणतात. असूदेत ना. बुक प्रोमोशन, मार्केटींग या आजच्या जगातल्या आवश्यक गोष्टी ही मंडळी किती सफ़ाईने, व्यावसायिकतेनं करतात, आपण लिहिलेल्यातलं, त्यातल्या त्यात कमी वेळेतही वाचकांच्या कानावर पडावं म्हणून धडपडतात. निदान ही कौशल्य शिकून घ्यायला, निरखायला तरी यावं की..


पार्थ मित्तरने किती सहज त्याचा खाजगी इमेल आयडी देऊन म्हटलं, कलेच्या प्रांतातलं मराठीत नेमकं काय काय लिहून येतं, कोणत्या विषयांवर ते वाचायला मला नक्की आवडेल. खूप मोठी मराठी नावं आहेत कलेच्या इतिहासात. मला आदर आहे मराठीबद्दल. जास्तीतजास्त लिंक्स मेल कर.

आधी कधीच माहीत नसलेले लेखक, आता त्यांच्या तीन-तीन चर्चासत्रांनंतर इतका माहितीचा, जवळचा होतो, मग तोही बाहेर लॉनवर वगैरे भेटतो तेव्हा ओळखीचं हसतो, मग तुम्ही लगेच त्याची जाडजाड पुस्तकं विकत घेऊन टाकता. एखादी आपली आवडती कादंबरी लिहिणारी लेखिका बोलताना अगदी आपल्यासारखाच विचार करते हे जाणवून देणारा एखादाच क्षण लिटफ़ेस्टमधे तुमच्या वाट्याला येतो आणि तुमचं सेल्फ़ एस्टीम हजार पटींने वाढतं.

जयपूर लिटफ़ेस्ट या अशा अनुभवांकरता प्रत्येकाला घडावा. लिटफ़ेस्टला तोवर जावं, जात रहावं जोवर आपल्याला अजूनही हे सगळं अनुभवता येतय याची खात्री वाटते.


आपण लेखक बनलो कारण आपल्याला लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला खूप आवडतं याची आठवण पुन्हा एकदा लिटफ़ेस्टने करुन दिली. नवे लेखविषय, कथाविषय डोक्यात घोळायला लागले, त्याकरता संशोधन करायला, अभ्यास करायला अमाप उत्साह अंगात भरला.
कोणीतरी भेटतच जे सांगतं आता लिटफ़ेस्टला पूर्वीसारखी मजा नाही. वैयक्तिक जिव्हाळा कमी झाला आहे. फ़क्त व्यावसायिकतेला जास्त महत्व दिलं जात आहे.


एक ब्रिटिश रायटर सांगत होती कोणत्यातरी सेशनला शेजारी बसली असताना- इथे खूप तरुण चेहरे दिसतात. त्यात मजा करायलाच आलेले जास्त असू शकतात, पण ते दिसतात हे मला महत्वाचं वाटतं. लिटफ़ेस्ट आपलाही चेहरा तरुण करुन टाकतं.


चटकन संपूनही गेलेलं, पण मनाला हुरहूर लावून जाणारं उत्कट प्रेमप्रकरण असावं तसं वाटलं लिटफ़ेस्ट. पाच दिवसांमधला प्रत्येक क्षण त्याच्याच विचारांनी व्यापलेला. आणि नंतरही खूप काही शिल्लक ठेवून गेलेला.

* लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ’संवाद’ पुरवणीमधे प्रकाशित झालेला आहे.

Wednesday, September 21, 2011

त्या वर्षी

शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी.त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक,बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे,काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली.ना कुठे जाहिरात ना बोलबाला.
कादंबरी वाचली तेव्हा मला ती विलक्षण 'नवीन’ वाटली.कादंबरीतल्या अशेषच्या तोंडून सांगायचं तर,"नवीन म्हणजे नावीन्य नव्हे.नवीन म्हणजे ताजं.खरं.आतला-बाहेरचा संबंध लावणारं."

'त्या वर्षी'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कथानकाचं वर्तमानाला घट्टपणे जोडलेलं रहाणं.या लिखाणाला एक पक्क ठिकाण आहे,विशिष्ट कालखंड आहे.पात्रांचे वागणे,विचार,त्यांच्यासमोरची आव्हाने या कालपटाशी सुसंगत आहेत.
काही अपवाद वगळता मराठी साहित्यामधे ज्या वातावरणात लेखक लिहित असतो ते त्याच्या लेखनात कधीच उमटत नाही.त्यांनी निर्माण केलेल्या जगाला कोणत्याही काळाचे संदर्भ चिकटलेले नसतात.
'त्या वर्षी' मधले जग कलावंतांचे असूनही कोणत्याही प्रकारे भासमान किंवा अधांतरी नाही.त्याला वर्तमान जगण्याचे निश्चित भान आहे.सामाजिक संदर्भ आहे.कलावंताच्या निखळ कलाप्रेरणेवर आणि प्रकटीकरणावर बाह्य जगातली अपरिहार्य वस्तुस्थिती नेमका काय परिणाम करते,जागतिकीकरण, बाजाराच्या शक्ती,जमावाची मानसिकता,आक्रमक प्रसारमाध्यमं कलावंताच्या आंतरिक अवकाशावर कशाप्रकारे अतिक्रमण करतात,कलावंत आंतरिक स्तरावर याचे कसे विश्लेषण करतो,त्याच्या कलेतून,ते कितपत अभिव्यक्त होते हे हा कथानकाचा प्रमुख गाभा.

वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधे वावरणार्‍या मित्रांच्या एका ग्रूपची ही कहाणी.. याला हिंसेच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे.
कथानकाचा काळ बाबरीमशिद पाडल्यावर १२ वर्षांनंतरचा आहे.त्याला अनुसरुन इतर घटना,समाजमनात झालेल्या सांस्कृतिक,राजकीय स्थित्यंतराच्या,मोडतोडीच्या संदर्भांसकट यात येतात.या काळात जगण्याच्या विविध स्तरांवर धर्मवाद झिरपला.आजवर जी क्षेत्र अलिप्त होती त्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागले.
बाबरी मशिद पाडल्यावर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत जमावाकडून अनिमाचा नवरा सिद्धार्थ मारला जातो.१२ वर्ष रोज तो दिवस जगत राहीलेली अनिमा तिच्या दु:खाचा, संतापाचा निचरा डायरीच्या पानांमधे करत रहाते.एक दिवस ती आपली रोजनिशी लिहिणे बंद करते.पुढे जायचं ठरवते,आठवणींमधून मोकळं व्हायचा तिचा निर्णय कादंबरीची सुरुवात आहे.

अनिमाचा अर्थ- मानवी मनाचा तो भाग जो अंतर्मनाचा वेध घेतो आणि नेणीवेच्या संपर्कात असतो. या अर्थाचा चपखल वापर अनिमाच्या व्यक्तिरेखेच्या प्रवासात होतो.
अनिमाची व्यक्तिरेखा मध्यवर्ती नसली तरी महत्वाची आहे.अनिमा शाळेत शिकवत असते पण तिला तिथून काढून टाकतात कारण ती गाथा सप्तशती वर्गात वाचून दाखवते आणि ते अश्लिल असल्याचे सर्वांचे मत.पोर्शन बाहेरचं वाचून दाखवल्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा हातून घडत असल्याने पालक आणि शाळा तिच्यावर नाराज असतात.
अनिमाचा एक भूतकाळ आहे,तिचे आई-वडिल,सूरगाव आहे.मुलगी आणि तीही सावळी जन्माला आलेल्या अनिमाचं कुटुंबव्यवस्थेमधलं दुय्यम स्थान,भावापेक्षा ती आईच्या नजरेत सहजगत्या कायम खालच्या पायरीवर.पण त्यातूनही तिनं जोपासलेलं तिचं आंतरिक कणखर,संवेदनशील,प्रगल्भ,रसिक आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व.
या उलट तिचा भाऊ अशेष.गोरागोमटा मुलगा म्हणून आईचा विशेष लाडका,पण कदाचित म्हणूनच अशेष अनिमासारखा कणखर, लढाऊ नाही.कचखाऊ आहे.नसरिन बरोबर लग्न ठरवताना आईला दुखावण्याचं धाडसं तो करु शकत नाही.आणि ते दु:ख गोंजारत रहातो.अनिमाचा कणखरपणा ती आंतरजातीय लग्न करताना तिच्या भावच्या तुलनेत सिद्ध करुन दाखवू शकली आहे.
अनिमा आणि अशेषचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.अशेष प्रयोगशिल चित्रकार आहे.हे दोघे आणि त्यांच्या सामायिक कलाकार मित्रांचा एकात एक गुंतलेला नातेसंबंधांचा एक लोभसवाणा पट कादंबरीमधे उलगडत जातो.
अशेषचा चित्रकार मित्र हरिदास,फ़िरोझ,त्याचा माथेरानचा बंगला,कोल्हापूरहून आलेली पत्रकार जानकी पाटील मुंबई ऑब्झर्वर मधे कल्चरखिचडी नावाचा कॉलम चालवते.कॉलमचं नावच माध्यमजगताची कलेकडे पहाण्याची दृष्टी अधोरेखित करतं.जानकीला काही वेगळं,कलाकारांच्या निर्मितीचा वेध घेणारं लिहायची इच्छा आहे.
शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य परंपरेत अडकलेली गायिका शारदा,तिलाही काही नव्या वाटा धुंडाळायची इच्छा आहे,गुरुंचा त्याला विरोध आहे.शारदाचा नवरा शेखर तिला 'कानधर’ घराण्याची म्हणतो.गुरुंचं नाव घेतलं की धरले कान,सूर सटकला धरले कान.
या शिवाय अनिमाच्या भूतकाळाशी संबंधित काही पात्रं,सूरगावातले आदिवासी,रामाचं मंदिर आहे,डॉ.भास्कर आहेत..
कादंबरीमधली सजिव-निर्जिव कोणतीही पात्रं अनोळखी वाटत नाहीत.कधी ना कधी यांच्याबद्दल वाचले आहे,त्यांना ऐकलं आहे,पाहीलं आहे हा फील घेउन ती येतात.

हरिदास माध्यमजगात रमणारा चित्रकार.खरं तर परफॉर्मिंग आर्टिस्टच.रहातो मुंबईच्या एका जुन्या वाडीतल्या कौलारु घरात पण लाल मर्सिडिझ चालवतो,त्यावर हत्ती रंगवतो,ट्रकचा हॉर्न बनवतो.त्याच्या ’ऑल व्हाईट’ प्रदर्शनातील नव्या प्रयोगाला लोकांनी ’ऑल वाईट’ म्हणत हेटाळलं आहे पण आपला नवे प्रयोग करण्याचा हक्क तो अबाधित राखून आहे."वैचारिक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही.आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच काम करु." हे त्याचं आवडतं तत्वज्ञान.हरिदासचं थिल्लर, शोबाजी करणारं वागणं शारदाचा नवरा शेखरला आवडत नाही.शारदाचे आणि हरिदासचे एकेकाळचे संबंधही त्याच्या रागाच्या मागे सावली धरुन आहेत.

आर्टस्कूल सोडून कलाविश्वात उतरलेल्या उदयोन्मुख चित्रकारांचा उडणारा सर्जनशिल गोंधळ प्रकाशच्या व्यक्तिचित्रणातून व्यक्त होतो.राजकीय संदर्भ चित्रातून आणायला हवेत,व्हिडिओआर्टला मागणी आहे तर ते कसं करायचं?त्याच्या गोंधळलेल्या प्रश्नांना उत्तर देताना समंजस चित्रकार फ़िरोझ सांगतो," तुम्हांला जे करावसं वाटतय ना,ते करा.तुमची प्रतिभा,तुमच्या कल्पना,तुमचं आयुष्य,तुमच्या भिती,आठवणी.. समजून घेऊन त्यांच्याशी इमान राखा.तुमची चित्रं म्हणजे तुमचं सत्य असेल.जे तुमच्या आतून येतं ते तुमचं सत्य.त्याचा शोध घ्या."

कादंबरी बरिचशी अनिमाच्या नजरेतून घडते पण ती प्रोटेगोनिस्ट नाही.प्रमुख सूत्रधार आहे वर्तमानकाळ, नियती.कोणत्याही एका विशिष्ट सूत्रातून कादंबरी पुढे जात नाही.कलावंताच्या मनस्वी कलाप्रेरणांचा मागोवा घेत,वास्तव जगाशी त्यांना जोडून घेत,कलेबद्दलचे दृष्टीकोन,परस्परांमधील गुंतागुंतींचे संबंध,हेवेदावे उलगडत कथानक पुढे सरकत रहातं.सुरुवात,मध्य,शेवटाची पारंपारीक चौकट इथे नाही.वर्तमानाचा गतिमान ओघ कथानकाला आपल्यासोबत घेऊन जातो.घटनांच्या ओघात व्यक्तिरेखा उलगडत जातात आणि आजच्या जगण्यातील त्यांचे व्यवहार स्पष्ट होत जातात.

कलाकार काहीतरी भन्नाट वेगळ्या जगात वावरतात,त्यांना अंतराळातून कुठून तरी स्फुर्ती येते आणि मग ते काहीतरी निर्माण करतात अशी रोमॅन्टिक कल्पना बाळगायला लोकांना आवडतं.खरं तर वर्तमानातल्या प्रत्येक घटनेचा एक थेट परिणाम इतर लोकांप्रमाणेच कलाकारांच्याही वागण्यावर,विचारांवर होत असतो. तर्कसंगत प्रतिक्रिया त्यांच्याही जागरुक अंतर्मनावर उमटतात. कलेतून ते प्रकटायला कदाचित वेळ लागतो पण ते जेव्हा येतं तेव्हा काळाचा संदर्भ कलावंताच्या निर्मितीमागच्या प्रेरणा तपासून पहाताना महत्वाचा ठरतो.
सामान्य माणसाच्या मनात कलेविषयी असंख्य गोंधळ असतात.त्याला स्वत:ला चित्र म्हणून जे अभिप्रेत आहे आणि कलाजगत किंवा माध्यमजगताकडून जे उत्तम चित्र म्हणून वाखाणले जाताना दिसतं त्यात मोठी दरी पडलेली दिसते.आजच्या जागतिक देवाण-घेवाणीत चित्रजगतात अशा अनेक दर्‍या निर्माण झाल्या आहेत.कदाचित म्हणूनच आपण कलाकारांना स्वतंत्र स्थानावर,काही अंतरावरच ठेवणे पसंत करतो. आम्ही त्यांच्याशी नाही नातं जोडू शकणार हा गंड बाळगत जगतो आणि कलाकारासाठी कधीच आपल्या मनाचे दरवाजे खर्‍या अर्थाने उघडत नाही.
त्यामुळेच कलाकारांचा स्वत:च्या कलेशी,समाजाशी जोडले जाण्यात असलेला प्रामाणिकपणा,व्यवहारी वृत्ती,उत्तरदायित्व याचा जो वस्तुनिष्ठ ताळेबंद इथे मांडला जातो,कलाकार आणि सामान्य माणूस यांच्यामधली वैचारिक दरी सांधण्याचा जो प्रयत्न इथे होतो तो कलाकारांना समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरतो.

वर्तमान जगात घडणार्‍या घटनांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम यातील पात्रांच्या आयुष्यावर होताना दिसतो. यात दंगल आहे,हुसेनच्या चित्रांवरील हल्ला आहे,कलाकारांचे लैंगिक व्यवहार,चित्रकाराची आत्महत्या,वारली चित्रांचे व्यवहार,तिवरांची तोड, सरकार आणि बिल्डरलॉबी.. कादंबरीत अनेक उल्लेख,संदर्भ,विचार येत रहातात ज्यामुळे ती वर्तमानाला पक्की धरुन रहाते.या घटना कुठेही मुद्दाम आणल्यासारख्या वाटत नाहीत.कादंबरीतल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्याचा या घटना एक भाग आहेत.

व्यक्तिरेखांपैकी काही तत्त्वांना घट्ट धरुन चालणारे,काही तत्त्वाची कास सोडून रस्त्यावरुन भरकटलेले.वेगवेगळ्या पार्श्वभूमी,व्यवसायातल्या वृत्ती-प्रवृत्ती आणि विकृतींचे रेखाटन यात आहे. प्रतिभावंतांनाही दैनंदिन व्यवहारात कराव्या लागलेल्या तडजोडी,तत्त्वांशी, मूल्यांशी फ़ारकत घेताना होणारी त्यांची फरपट,बौद्धिक ताणतणाव,निर्ममता धक्का पोचवते.

स्ट्रगलर प्रकाशच्या आध्यात्मिक,सेलेब्रिटी चित्रकार प्रकाशानंदापर्यंतचा सुमित्रादेवींच्या साहाय्याने झालेल्या प्रवासातून नवोदित कलाकाराचे ताण,शोषण, क्रिटिक्सचा व्यावसायिकपणा,मागणी म्हणून अमूर्त चित्रं काढणं,नामांकित व्हायचं तर मिडियाची गरज आणि तुम्ही नामांकित असल्याशिवाय मिडिया तुमच्याकडे बघणार नाही या चक्राला भेद देण्याकरता चाललेले प्रयत्न,त्यातून घडून येणार्‍या विपरित गोष्टी सामोर्‍या येतात.

अशेष अनिमाच्या आईवडिलांची कथा ही एका परिने स्वातंत्र्योत्तर पिढीचे प्रतिनिधित्व करते.ध्येयवादाने भारुन गेलेल्या पतीच्या बेपर्वा,अव्यावहारिक वागण्याचे चटके सोसणार्‍या सिंधूताई,त्यांना समजून न घेणारा अण्णांचा एरवी नि:स्वार्थी,सामाजिक चळवळींमधे रमणारा स्वभाव,त्यांच्या गायब होण्यामागचे गूढ,उपेक्षित, वयस्कर सिंधूताईंनी सूडाच्या भावनेतून डॉ. भास्करसोबत प्रस्थापित केलेले अनैसर्गिक प्रेमसंबंध..नाती आणि नात्यांमधले समजून घेणे किती सापेक्ष असते हे मोठ्या करुणपणे आपल्याला समजावून जातात.

बच्चूकाकांची सामाजिक चळवळीचे अपयश,खंत पेलणारी व्यक्तिरेखा आणि डॉ. भास्करची हिंदू दहशतवादाच्या दिशेने झालेला प्रवास दाखवणारी व्यक्तिरेखा परस्पर विरोधी तरीही आपल्या जागी खर्‍या.अलिप्त,तटस्थ शैलीतून लेखिका त्यांच्या जगण्याच्या छटांना अनेक परिमाणे देत ठळक करत जाते.

अशेष,हरिदास किंवा फ़िरोझच्या व्यक्तिरेखेतून आजच्या चित्रकारासमोरील आव्हाने,त्याचे विचार आपल्याला समजून घेता येतात.चित्रनिर्मितीची एक सुरेख प्रोसेस या निमित्ताने अनुभवायला मिळते.विशिष्ट रंगाचं चित्रकाराच्या मनावरचं ऑब्सेशन कुठून येतं (अशेषचं काळ्या रंगात अडकून जाणं),कलावंताच्या नेणीवेत काय चालतं, कधीतरी काहीतरी अनुभवलेलं वर येत असताना येणार्‍या सृजनाच्या कळा,अशेषला आपल्या थरथरत्या हाताची वाटलेली भिती जी त्याच्या मनाच्या कमकुवतपणातून वर आलेली असते,सृजनाच्या केंद्रबिंदूचा शोध घेताना होणारी तगमग,नवनिर्मितीचा क्षण पकडतानाचा आनंद-ती सारीच प्रक्रिया फ़ार लोभसपणे येते.

फ़िरोझने चितारलेल्या महाभारतातील चित्रमालिकेमधल्या ’संहार’ चित्रावर जमाव हल्ला करतो.चित्राची नासधूस करतो.अनिमाचा अप्रत्यक्षपणे त्या चित्राच्या निर्मितीमधे सहभाग असतो.हिंसे़चं एक आवर्तन पूर्ण होतं.तिथेच कादंबरी संपते.

कादंबरी कोणत्याही शैलीत,फ़ॉर्ममधे अडकलेली नाही.अनौपचारिक,मोकळं असं हे लिखाण आहे.म्हणूनच वर्तमानाशी सर्वात जास्त जोडलेलं रहातं.भाषा लालित्याच्या सोसात अडकलेली नाही,पत्रकारितेतली स्पष्ट,ओघवती,वैचारिक शैली लिखाणाला आहे पण ती कुठेही कोरडी होत नाही.लेखिकेने पत्रकार म्हणून वावरताना पाहिलेल्या,अनुभवलेल्या वेगळ्या वास्तवाचा हा सृजनशीलपट आहे.त्यातल्या व्यक्तित्वांच्या,आयुष्यांच्या अपरिमित छटा आपल्याला स्तिमित करतात.भाषेमधला उपरोध आवश्यक तिथे व्यक्त होतो,मेलोड्रामा नसलेली संयत,अभिजात मांडणी हे या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य.

भाषेची ललित वळणं नजाकतीने आणि सहजतेनं येतात.याचे उत्कृष्ट उदाहरण चित्रकार अशेषचे काळ्या रंगाशी जुळत गेलेले नाते,त्याला गवसत गेलेला काळ्या रंगाचा अंतरात्मा आणि मग त्या काळ्या रंगातच त्याचे अडकून पडणे,त्यातून सुटण्याची त्याची धडपड किंवा शारदेच्या मनातील "काळ पाहिला रे सख्या..."या नव्या बंदिशीचा जन्माची घटना.
जानकी अशेषला त्याच्या काळ्या रंगाच्या ऑब्सेशनबद्दल विचारत असते तेव्हा तो सांगतो- "काळ्याचं शरीर डोळ्यांना सुखावत नाही,इतर कोणत्या ज्ञानेंद्रियाला ते चाळवत नाही,भावनांशी खेळत नाही,तो वेश्याव्यवसाय कधीच करत नाही,तो केवळ आणि केवळ बुद्धीचा हस्तक असतो.काळ्या रंगाचा आदर ही रंगाची मागणीच आहे.तिथं तडजोडीला जागा नाही.काळा हा रंगही आहे आणि शब्दही आहे.'ब्लॅक’चा उच्चार कडी बंद केल्यासारखा निर्वाणीचा आहे.काळ्याच्या उच्चारात मोकळेपणा आहे.त्याच्या शेवटी ‘आ’कार आहे म्हणून. काळ्यात आणखी एक प्रभावी अक्षर आहे.‘ळ’. ‘ळ’चे दोन गोलाकार,मांसल.पहिल्यातून दुसर्‍यात.दुसर्‍यातून पहिल्यात.गिरवत बसलात तर ’ळ’ कधी संपणारच नाही”. पु.शिं.ची ‘पुष्कळा’ आठवते.

जानकी पाटीलच्या कलासमिक्षणांचे लेख,मुलाखती,बातम्या वगैरे कादंबरीत जशाच्या तशा छापल्या आहेत ते परिणामकारक आणि वेगळं वाटतं.तिचं कलावंताच्या सृजनापर्यंत पोहोचू पहाणं,कलाविश्वातल्या घडामोडींचं, संक्रमणाचं छान भाष्य त्यातून येतं.

कादंबरीतलं जग कलावंतांच्या वृत्ती-प्रवृत्तींचं सूक्ष्म आणि सखोल दर्शन घडवतं.कलावंतांचे यातले विश्व त्यांच्या वैयक्तिक परिघातून विस्तारत जाते.मनस्वी कलावंताचे आपल्या ध्येयांबद्दलचे,कलेबद्दलचे दृष्टीकोन,त्यांचे गुंतागुंतीचे संबंध,कलावंत आणि माणूस या दोन स्तरांवर आयुष्य जगताना होणारी मानसिक ओढाताण,त्यांचे दांभिक,बेगडी,मुखवट्यांमागचे खरेखुरे चेहरेही प्रकाशमान होत जातात.

कादंबरीची काही वैशिष्ट्य किंवा वेगळेपणा सांगायलाच हवीत अशी- कलाक्षेत्रातल्या वादविषयांची सविस्तर चर्चा कादंबरीत आहे.प्रोग्रेसिव्ह कला चळवळीतल्या कलाकारांचा भारतीय कलेवर पडलेला चांगला-वाईट प्रभाव,कलेमधलं सौंदर्याचं स्थान,फेक आर्ट,कला आणि समाज यातलं नातं,कलाव्यवहारात अधिकाधिक जोमाने प्रवेश करत असलेला कलाव्यापार कलेच्या वृद्धीसाठी चांगला की वाईट,भारतीय कलेत भारतीयपणा किती शिल्लक आहे,तो टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा की गरज नाही वगैरेंबद्दल चित्रकारांची मतं,विचार त्यांच्या भाषेत सविस्तरपणे दिले आहेत.
वेगवेगळ्य़ा प्रवाहाच्या चित्रकारांची परस्परांच्या शैलीवरची टीका,समर्थनं, आजच्या इन्स्टॉलेशन,व्हिडिओआर्टच्या कलाकारांची भाष्य, पारंपारिक कलेच्या स्वरुपाला त्यामुळे गेलेला छेद,कलाकाराचे उत्तरदायित्व काय असते यावरचे भाष्य परिणामकारक आहे.
शांता गोखलेंसारख्या या क्षेत्रातल्या मान्यवर,अनुभवी आर्टक्रिटिकचे विचार त्यानिमित्ताने व्यक्तिरेखांच्या तोंडून ऐकायला मिळतात जे नक्कीच विचार करायला लावतात.
उदा.अशेष एका चर्चासत्रात कलेच्या उत्तरदायित्वाविषयी म्हणतो-" त्याच्या मुळाशी एक साधी पण कठीण प्रक्रिया आहे.‘आपुला संवाद आपुल्याशी’ ह्या वचनात ती सामावलेली आहे.जेव्हा आपला संवाद बाजारपेठेशी होऊ लागतो,आणि बाजारी यशासाठी आपण आपलंच अनुकरण करत राहतो,तेव्हा आपण आपलं उत्तरदायित्व नाकारत आहोत असं समजावं.ही स्थिती कोणाही कलाकाराच्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते.ती ओळखून पुन्हा एकदा स्वत:ला ढवळून काढून प्रश्न विचारायची तयारी असावी लागते.."
लेखिकेची या सार्‍याकडे बघण्याची एक ठाम दृष्टी आहे,एक जाणीवपूर्वक घेतलेला दृष्टीकोन आहे हे जाणवते.
व्यक्तिरेखा सुट्ट्या आहेत आणि त्यांचे तसेच असणे अपेक्षित आहे.कलावंताचा अलिप्ततावाद यातून सामोरा येतो.कलावंतांचं स्वतंत्र बेटांप्रमाणे स्वमग्न जगणे,दुसर्‍या कलावंताच्या निर्मितीकळांची वेदना, आनंदाची जाणीव नाही,व्यक्तींचे तुटलेपण, स्वतंत्र तुकडेच शेवटी सारे.कलाव्यवहारांच्या,मैत्रीच्या समान धाग्याने यातल्या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या असल्या तरीही प्रत्येकाचा अवकाश स्वतंत्रच.प्रत्येकाच्या आयुष्याची रेषा स्वतंत्र.काही समांतर,काही परस्परांना छेदून जाणार्‍या,काही वेड्यावाकड्या गुंतलेल्या..तरीही स्वतंत्र.

कलाकार व सामान्य माणूस यांच्यामधलं आणि कलाकारामधल्या सामान्य माणसाचं नातं,वर्तमान जगण्यातले अनुभव, तणाव,आस्था,समज,समाजातल्या विविध घटकांची मानसिकता जाणून घेण्याच्या धडपडीत येत जाणारी उमज कादंबरीत उमटली आहेच पण त्याही पलीकडे काहीतरी यात आहे.कलावंताच्या मनाच्या अगदी आतल्या पदरातले सृजनाचे कल्लोळ लेखिका ताकदीने मांडू शकली.रंगरेषांच्या निर्मितीमधली संवेदना आपल्यापर्यंत पोचवू शकली.कलावंताच्या निर्मितीप्रेरणेची प्रक्रिया तपासण्याचा हा प्रयत्न मला वेगळा,महत्वाचा आणि नवीन वाटला.
गतिमान,अनंत अशा कालप्रवाहाची आणि कलाप्रवाहाची जाणीव करुन देणारी ही कादंबरी.

कादंबरी वाचल्यावर एखादा कलात्मक सिनेमा बघून झाल्यासारखं वाटतं.दृश्यकलांचा,कलाकारांच्या जगण्याच्या आतल्या परिघाचा,त्यांच्या सृजनाच्या निर्मितीक्षणांचा,तणावांचा,अगदी हेव्यादाव्यांचाही इतका प्रत्ययकारी,शब्दांच्या माध्यमातून श्रुती,दृष्टी संवेदनांनाही जागवणारा,नवीन,समकालीन लिखाण वाचल्याचा अनुभव मला आधी कधीही आला नव्हता.

--
त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये

Thursday, October 28, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!

चित्रकला आवडते,गाणी ऐकायला आवडतात,अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात,कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे..
आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय..रंग,सूर,शब्द,चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या'कुहू'या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला..किंवा असं म्हणूयात'अनुभवला'तेव्हा विश्वास बसला.

दाट,गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल,खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा,पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर,मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र..त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप..खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी'कुहू'
कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते,गाणं मनात रुंजी घालतं,कुहूच सुरेल शीळ मनात घुमते,नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही..मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.


कुहूमधे कविताने स्वतःकाढलेली ४०-४५ऑईल पेंटिंग्ज आहेत,आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत,पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत,नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ,विलोभनीय व्हिडिओ आहे..अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत,दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे,समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत..या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला'पुस्तक'कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे.पुस्तक म्हणायचे कारण यात'शब्द'सर्वाधिक महत्वाचे,पायाभूत आहेत.शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात.शब्द येताना आपले रुप,रंग,नाद,लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच.अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत,आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.
कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली?कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही..पण हे अ‍ॅनिमेशन,संगीत,व्हिडिओज,कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड?शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत.कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे.कुहू हा गाणारा पक्षी.जंगलात रहाणारा.आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे.एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात.जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली.कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो.आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो..माणसाची भाषा त्याला शिकायची आहे,माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय..या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते..गोष्ट पुढे सरकत रहाते..विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात..त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं.हे कुहूचं जग आहे.ते अनुभवयालच हवं.
कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच,पण भारतीय साहित्यात एक नवी,आधुनिक वाट निर्माण होते आहे.कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे.मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते,बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो,जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे.कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.
ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे.तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र,भिन्न,ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही.सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले.आणि त्यासाठी तारण आहे'बौद्धिक मालमत्ता'.मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत'कल्पना'वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत,क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात!
कुहूचे महत्व यासाठीही.



कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल.त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे.तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.

शर्मिला फडके
'चिन्ह' ब्लॉगवरही प्रकाशित.

Sunday, July 25, 2010

वाचायच्या आधीच..

हिंदू हातात आलं आणि अगदी गार गार वाटलं. येताना टॅक्सीत पुरेसा प्रकाश मिळेना बाहेर काळे ढग दाटून आलेले म्हणून, तर मी अगदी खिडकीच्या बाहेर तिरकं काढून वाचायचा प्रयत्न करत होते आणि तशी जेमतेम दोन पाने वाचली मग मिटवून टाकलं. अशा पुस्तकांना रात्रच हवी वाचायला. निरव रात्र. बाहेर पावसाचा आवाज आणि गच्च काळोख. आपल्यापुरत्या प्रकाशाच्या चौकोनात आपल्या आवडणारच याची खात्री असणारं पुस्तक. फार कमी वेळा अशी पुस्तकं हातात येतात.
हिंदू प्रकाशित वगैरे झाली पण खरं तर का कोणास ठाऊक पण मला अजिबात घाई गडबडीने ती वाचायची उत्सुकता वाटत नव्हती. म्हणजे आहे मी नेमाडे किंवा कोसला म्हणूयात तर कोसलाप्रेमी गटातलीच तेव्हा कादंबरीबद्दल उत्सुकता जरुर होती. पण एक तर ती काही मी प्रकाशनपूर्व सवलतीच्या किमतीत आगाऊ नोंदणी वगैरे केलेली नव्हती. त्याबद्दल रोज बातम्या वाचल्या जात होत्या की अमुक जणांनी नोंदवली वगैरे पण मी पडले अशा बाबतीत आळशी. मग ती प्रकाशित झाली तेव्हाही काही मी त्या समारंभाला गेले नाही. मग पार्ल्याच्या मॅजेस्टिकमधे डोकावले तर तिथल्या हिंदूच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती फक्त आगाऊ नोंदणीदारांसाठी आहेत वगैरे कळल्यावर मला वैताग. म्हटलं जाऊचदे. तरी वाटलं पुढे जवाहरमधे विचारावं. निघाले आणि पाऊस सुरु झाला जोरदार. कशाला हिंदूला भिजवा आता. बघू उद्या म्हणत मी तशीच घरी. बरं अजून कोणी काही झाली बुवा आमची वाचून. आवडलीय नाही आवडली काहीच बोलेना. अर्थात मला त्याने फरक पडणाराच नव्हता. मला ती आवडणारच हे मला माहित होत. एक तर मला पुस्तकं, सिनेमे वगैरेबाबत अगदी सिक्स्थ सेन असल्यासारखं आधी कळतच की आपल्याला हे आवडणार. हे नाही आवडणार. आणि हा अंदाज एरीली ९०% वेळा बरोबर ठरतो. मिथिला म्हणते की आता आवडणार म्हटलय ना म्हणून आवडतच. तर त्यात काही अर्थ नाही. १०% वेळा नाही आवडत त्याचं काय? एक तर आधीच वाचलेलं की या पुस्तकात पुरातन मोहन्जोदडो संस्कृतीतल्या उत्खननाची वगैरे थ्रिलिंग पार्श्वभूमी आणि नेमाडे लिहिणार म्हणजे पुरेसा विस्तृत पट घेऊन याची खात्रीच.
तर हिंदू काही त्यादिवशी हातात आली नाही. दुसर्‍या दिवसापासून मुंबईत धुआंधार पाऊस. काल म्हणजे शनिवारी दादरला आयडियल, मॅजेस्टिकवर धाड घालायचं ठरवलं पण पाऊस काही थांबला नाही. पण आज सकाळी प्रहार मधे प्रभा गणोरकरांनी हिंदूबद्दल लिहिलेलं वाचलं आणि ताडकन उठलेच. सही दिसतय आणि हे लगेच अगदी लगेच वाचण मस्ट आहे आणि आपण काय पाऊस, सवलत करतोय मूर्खासारखं असं म्हणत गेले रविवारची दुपार विसरुन दादरच्या शिवाजी मंदिर मॅजेस्टिकमधे. तिथे पुन्हा तेच. प्रती फक्त आगाऊ नोंदणीधारकांकरता. बुक केलय कां? म्हटलं नाही पण हवय आत्ताच. त्या काऊंटरमागच्याला काय वाटलं काय माहीत. तो तिथल्या मुलाला म्हणाला त्या काल सही करुन आलेल्या पंधरा प्रती आहेत त्यातली एक आण. आणि माझ्या हातात प्रत. अगदी नेमाडेंच्या सहीची वगैरे. मग मी असं एखादंच पुस्तक घेणं बरं नसतं म्हणत अजून तीन घेतली. त्यातलं एक अजित हरिसिंघानींचं बाईकवरचं बिर्‍हाड.सानियाचं अशी वेळ, मिलिंद बोकिलचं समुद्रापारचे समाज. सॉरी चार घेतली. तारा वनारसेंचं तिळा तिळा दार उघड. मग वाढलेल्या टॅरिफची वगैरे किरकोळ चिंता न करता टॅक्सी. पुस्तकांना असं बसमधून वगैरे नेणंही बरोबर नाही. मग टॅक्सीत बसल्या बसल्या पहिलं पान उघडलं.
प्रस्तावना-

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

ह्या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरुन जगण्याची समृद्ध अडगळ

सुरुवात-
कोण आहे?
मी मी आहे, खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तु कोण?
मी तु आहे, खंडेराव.
अंमळ चुळबुळात्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वतःलाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.
ही तर मोठीच आफत आली आपल्यासारख्या माणसावर. हल्ली सांगायला गोष्टच तेव्हढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं. असं म्हणून मी वरच्या तंबूच्या कापडावरचे काळेपांढरे ठिपके पाहत पुन्हा झोपी जातो. पुन्हा दिसायला लागतो मी मोठ्या मेहनतीने तयार केलेला सप्तसिंधू भुप्रदेशाचा नकाशा. आकाशातून खूप उंचीवरुन अफगाणीस्तानातल्या शरयू नदीपासून राजस्थानातल्या सरस्वती नदीपर्यंतच्या या नव्या नकाशामुळेच माझं संशोधन सर्वचर्चित झालं.


आवडलं. आवडलं हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ. मला कळतं वाचायच्या आधीच बरोबर.

Saturday, May 01, 2010

'A Pack Of Lies'- गौरीच्या मुलीचं पुस्तक

उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.

उर्मिलाचं पुस्तक हे माझ्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतलं एकमेव पुस्तक ठरलं जे मी वाचायला सुरुवात केली आणि संपल्याशिवाय खाली ठेऊच शकले नाही. वाचल्यानंतरही बराच काळ भयंकर अस्वस्थतेमधे गेले. जरी पुस्तक चांगलं लिहिलेलं असलं तरी पुस्तकाचा दर्जा, कथानक, भाषा याचा माझ्या अस्वस्थतेशी अजिबात संबंध नाही.

उर्मिलाचं हे पुस्तक फिक्शन म्हणून लिहिलेलं असलं तरी नि:संशयपणे त्यातली 'जिनी' ही स्वतःची गोष्टच सांगतेय.गौरीच्या 'मी' मधून जशी प्रत्येकवेळी स्वतः गौरीच डोकावत राहिली तसंच हे. उर्मिलाच्या प्रत्येक शब्दातून, वाक्यातून, तिने नॅरेट केलेल्या घटनांमधून या पुस्तकात तिचे तिच्या आईसोबतचे गुंतागुंतिचे संबंध उलगडत जातात. आणि मग या पुस्तकातून उर्मिलाची आई म्हणून जी गौरी देशपांडे दिसत राहिली त्यामुळे मी अस्वस्थ झाले. नुसती अस्वस्थ नाही मुळापासून हलून गेले.

गौरी देशपांडेचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा तिचा आग्रह, तिचं तिने स्वतःच्या अटींनुसार जगलेलं आयुष्य, मुक्त विचार, तिची तर्ककठोर भूमिका, तिची बौद्धिक पातळी, संवेदनशिलता या गोष्टींची भुरळ पडली नाही अशी मराठी वाचक स्त्री बहुधा नसेलच. गौरीचे देशविदेश फिरणे, तिच्या आयुष्यातले समजुतदार पुरुष, मुलांना तिने दिलेले वैचारिक आणि इतर स्वातंत्र्य, तिच्या आयुष्यातला नंतरच्या काळातला एकटेपणा, तिचे व्यसनाकडे झुकत जाणे याबद्दलही सर्वांनी आस्थेने, कुतुहलाने जाणून घेतले. बहुतेकदा ते तिच्याच कथानकांमधून सामोरे आले. काही तिच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखांमधून आपल्याला कळले.
मात्र उर्मिलाच्या पुस्तकातली नायिका 'जिनी' जेव्हा हेच आयुष्य एका मुलीच्या चष्म्यातून, तिच्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर आणते आणि जिनीच्या आयुष्याची जी फरपट झाली, तिचे आयुष्य असंख्य चुकांच्या मालिकेमधून फिरत राहिले, उधळले गेले, न्यूनगंड, असुरक्षितता, कमकुवतपणातून भिरकावले गेले त्या सार्‍याला कळत नकळत तिच्या आईचे आयुष्य, तिचा स्वभाव जबाबदार आहे हे दाखवत रहाते तेव्हा आपली आत्तापर्यंतची गौरीबाबतची सारी गृहितके हलून जातात.

या पुस्तकातली जिनीची आई ही लेखिका आहे आणि तिचे संपूर्ण कॅरेक्टर गौरीवर बेतलेले आहे. जिनीच्या आईचा घटस्फोट, लहान मुलीला एकट्याने, कमी पैशांमधे वाढवताना तिची होत असलेली ओढाताण, नकळत जिनीकडे झालेले दुर्लक्ष, तिचा आत्ममग्नपणा, तर्ककठोर वृत्ती, बुद्धिवाद, जिनीला सावत्र बापासोबत जुळवून घेताना झालेला त्रास, तिच्या मनातील अनेक गंड, ते समजून घ्यायला आईचे कमी पडणे, जिनीने सावत्र बापावर केलेले आरोप, आईने तिच्यावर केलेला खोटेपणाचा आरोप, शिक्षण अर्धवट सोडल्याबद्दलची, ड्र्ग्ज घेत असल्याबद्दलची आईची नाराजी, धाकट्या बहिणीला घेउन आईचे नवर्‍यासोबत जपानला निघून जाणे आणि मग पुढचे जिनीचे बेबंद होत गेलेले आयुष्य, त्यातून तिचे कसेबसे स्वतःला सावरणे आणि नंतर मग स्वतःच व्यसनाधिन होत चाललेल्या आईला समजावून घेत सावरायचा अयशस्वी प्रयत्न करणे हे सारे वाचताना मला 'अरे.. हे तर गौरीच्याही कथानकांमधून वेळोवेळी दिसत राहिले आपल्याला पण किती वेगळे रंग होते त्याला..' असं सतत वाटत राहिलं.

आईच्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात असलेल्या फार्महाऊसबद्दल, जिनीला तिथे रहाताना येत असलेल्या कंटाळ्याबद्दल, तिच्या आईच्या मनात त्यामुळे दाटून येत असलेल्या चिडीबद्दल वाचताना तर घशात आवंढा येतो. गौरिचे ते लाडके 'विंचुर्णीचे घर, तिथला तलाव.. मला ते सारे दिसायला लागले.

स्वतंत्र, बुद्धिवादी व्यक्तिमत्वाची आई आणि तिची सामान्य प्रेमाची अपेक्षा करणारी आणि ते लाभत नाही म्हणून खंतावत राहणारी तिची मुलगी आपापली आयुष्य इतकी गुंतागुंतीची करत यात जगत राहतात की कुणाचे बरोबर आणि कोणामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होतेय याचा फैसलाच होऊ शकत नाही. गौरीच्या 'चन्द्रिके ग सारिके ग' मधले आई मुलींमधले ते संवाद जिनीच्या लेखणीतून वाचताना क्षणभर काय प्रतिक्रिया असावी हे मला नाही कळलं.

आईच्या शेवटच्या दिवसांमधे जिनी आईसोबत नव्याने जोडली जाते, आईकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येण्याइतकी परिपक्वता जिनीमधे आलेली असते. आईचे स्थान एक लेखिका म्हणून किती वरचे होते, लोकांच्या मनात तिची प्रतिमा किती वेगळी होती हे सारे पहिल्यांदाच जाणून घेताना जिनी चकित होते आणि आपल्याला उगीचच आनंद होतो की गौरीला तिच्या लेकीने घेतले समजून एकदाचे!

उर्मिला या पुस्तकात लिहिते," मी सुद्धा लिहू शकते हे आईला कळले असते तर तिला खूप आनंद वाटला असता. तिने माझे पुस्तक वाचायला हवे होते असे मनापासून वाटते. मात्र हेही तितकचं खरं की आई असती तर हे पुस्तक मी लिहूच शकले नसते. इतकं खरं आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडून सांगितलं गेलय ते सांगू शकले नसते."गौरीच्या 'एकेक पान गळावया' मधली राधा यावर काय म्हणाली असती हाच विचार पुस्तक संपवताना मनात डोकावून गेला.

मुलांना वाढवताना आपण आपल्या मते खूप आदर्श संकल्पना बाळगल्या आहेत अशी खात्री असली आणि त्यावर आपण कितीही खुश असलो तरी हे सगळं करताना मुलांना विचारायचं विसरुनच जातो बहुधा की बाबांनो.. नक्की कशाप्रकारची आई हवीशी वाटतेय तुम्हाला?

Saturday, January 23, 2010

रस्किन बाँड : माउंटन्स इन माय ब्लड..

देहराडूनच्या सुप्रसिद्ध 'ग्रीन बुकशॉप'ने खास आयोजित केलेल्या रस्किन बाँडच्या सर्व साहित्याच्या प्रदर्शनाचे आणि त्याच्या 'नोट्स फ्रॉम अ स्मॉल रूम' या नव्या पुस्तकाच्या अनौपचारिक प्रकाशनाचे आमंत्रण रस्किनच्या आवडत्या जिरॅनियमच्या सुकवलेल्या फुलांना चिकटवून तयार केलेल्या एका सुंदरशा बुकमार्कसहित पोस्टाने माझ्याकडे आले. सोबतच्या माहितीपत्रकात पुस्तकातले त्याचे काही लेख छापले होते. एका लेखाचं नाव होतं 'थॉट्स ऑन रिचिंग सेव्हंटी फाईव्''. प्रदर्शनाचे निमित्तच होते रस्किनचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचे.

रस्किन ७५ वर्षांचा झाला?
मला इतकं आश्चर्य वाटलं! इतकी वर्षं हातात हात घालून माझ्यासोबत निळ्या पाईन्सच्या आणि देवदारांच्या जंगलात निरुद्देश भटकंती करणारा, मला निसर्ग पाहायला शिकवणारा 'रस्टी' वयातीत आहे असाच माझा समज होता.
बुकमार्क घालून ठेवण्यासाठी मी त्याचं 'बुक ऑफ नेचर' उघडलं.
रस्किनचं कोणतंही पुस्तक उघडलं, की हिमालयातील निळ्या शिवालिक पर्वतराजींचे देवदार, पाईन आणि चीडच्या रांगांचे उतार, मोत्यांचा चुरा उधळत जाणारे स्फटिकशुभ्र खळाळते झरे, जंगली गुलाब, पेट्युनिया, पॅन्सी, बेगोनिया यांसारख्या असंख्य चिमुकल्या रानफुलांनी भरून गेलेल्या हिरवळी; चेरी, अक्रोड, मेपलच्या दाट छायेतलं ते टुमदार आयव्ही कॉटेज आणि त्या कॉटेजच्या पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतल्या खिडकीजवळच्या डेस्कवर बसून 'लँडोर डेज'सारखी नितांतसुंदर पुस्तके एकामागून एक लिहीत राहणारा रस्किन बाँड हे असं सगळं नजरेसमोर शब्दशः दिसायला लागतं. कारण रस्किन पुस्तकं लिहीत नाही, निसर्गचित्र रंगवतो; शब्दांतून! स्वतः रस्किन त्या निसर्गचित्राचाच एक अविभाज्य भाग. तेव्हा तो तर दिसणारच त्याच्या प्रत्येक पानातून.
रस्किन खिडकीजवळच्या डेस्कवर लिहितो आहे. त्याच्या खिडकीखालून एक वळणदार लहानसा रस्ता लँडोरच्या बाजाराकडे जात असतो. खिडकीलगतच एक खूप जुनं चेरीचं आणि वडाचं झाड आहे. झाडाखाली प्रेम आणि राकी वगैरे मुलं खेळत आहेत. पिवळे वॉर्ब्लर्स झाडांचे कोवळे कोंब कुरतडत आहेत. चेरीचा बहर आणि सरत्या हिवाळ्यात अधिकच लालभडक होत जाणारी स्नेकलिलीची फळे न्याहाळत रस्किन लिहितो आहे.गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळ देहराडूनपासून काही अंतरावरच्या 'लँडोर' या निसर्गरम्य, शांत गावात रस्किन राहत आहे. त्याच्या सोबतीला आहे फक्त हिमालयातला निसर्ग आणि त्या निसर्गाइतकीच निरभ्र, निष्पाप पहाडी माणसं!
'इट्स नॉट टाईम दॅट इज पासिंग बाय.. इट इज यू अँड आय..!' ..या पुस्तकातल्या एका पानामध्ये बुकमार्क घालून ठेवताना त्याने लिहिलेल्या वाक्यावर नजर जाते. लॅंडोरच्या बाजारातील रस्त्यावर वर्षानुवर्षे शेंगदाणे विकत बसणार्‍याचे अप्रतिम शब्दचित्र केवळ काही ओळींतच उभे करताना रस्किनने लिहिलेले असते.. "त्याचे नाव काय, वय किती विचारण्याच्या भानगडीत कधी कुणी पडले असतील असे वाटत नाही. बाजारातल्या जुन्या मनोर्‍यावरच्या घड्याळासारखे किंवा तिथल्या त्याहून पुरातन चेरीच्या झाडासारखे त्याचे अस्तित्व सर्वांनी गृहितच धरले होते जणू. पण तो त्या झाडापेक्षाही जास्त टिकाऊ आणि घड्याळापेक्षा जास्त विश्वासार्ह वाटे. त्याला स्वतःचे कुटुंब नव्हते, पण त्याच्या आजूबाजूला माणसांचा सदैव गराडा असे. त्यांच्यात असूनही तो वेगळा, कधीतरी दूरस्थही भासे. त्याचा सगळ्यांशी परिचय होता, पण कुणाशीही जास्त घसट नसावी, एकटा नसूनही एकाकी असणारा तो.." रस्किनच्या बोटांतून झरणार्‍या या शब्दचित्रात त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब उमटले होते का? कदाचित!

आपल्या वडिलांसोबत हिमालयातल्या निसर्गराजींत घालवलेल्या आपल्या बालपणातील आठवणींवर आधारित 'द रूम ऑन द रूफ' हे पहिले पुस्तक लिहिले, तेव्हा रस्किन १७ वर्षांचा होता. या पुस्तकात दिसणारा 'रस्टी' उत्साही, काहीसा अबोल, लाजरा, बिबळ्या दिसावा म्हणून रोज पहाटे उठून झर्‍यावर धाव घेणारा, धुक्यात हरवून जाणारा, झाडांवरच्या पक्ष्यांवर आणि आपल्या सोमी, किशन, रणबीर या दोस्तांवर सारखंच प्रेम करणारा होता.
तो रस्टी ताज्या, टवटवीत मनोवृत्तीचा होता. त्यावेळी रस्किन जिथे राहत होता, ते देहराडून जेमतेम १०-२०,००० लोकवस्तीचं, दाट वृक्षराजीने वेढलेलं, छोटंसं देहरा गाव होतं. रस्किनने त्याच्या आसपासच राहून पूर्णवेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता सहा दशके उलटली. देहराडूनची लोकसंख्या १० लाखांवर पोचली. माथ्यावरच्या विरळ होत गेलेल्या केसांच्या पट्टीसारखे, देहर्‍यातले दाट जंगलही मागे मागे हटत गेले.
रस्किन तिथेच आसपास या सार्‍या बदलांचा साक्षी होऊन राहिला. त्याच्यातला रस्टी हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये, तिथल्या माणसांमध्ये तितकाच मनमुराद रमत राहिला. दरम्यानच्या काळात ६ कादंबर्‍या, ७५ लघुकथा, १२ दीर्घ ललितलेखांचा संग्रह, ६ प्रवास व निसर्ग लेखसंग्रह, असंख्य कविता व गाणी, लहान मुलांसाठी गोष्टी असं शब्दभांडार रस्किनने आपल्या पुढ्यात ओतलं आणि त्यातल्या प्रत्येक शब्दामधून रस्टीची तीच ताजी, टवटवीत, उत्साही मनोवृत्ती आपण अनुभवली.रस्किन खरोखरच किती वर्षांचा झाला आहे, ह्या गोष्टीला आपल्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. रस्टी वयातीतच आहे.

सागरी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अनेकांनी प्रदीर्घ लेखन केले आहे. कॉनराड, मेल्व्हिल, स्टीव्हन्सन, मोसफिल्ड, हेमिंग्वे इत्यादी. पण असं लेखन प्रत्यक्ष पर्वतराजींमध्ये राहून सातत्याने करणारे फार मोजके. पूर्णवेळ लेखनाचाच व्यवसाय करणारे तर अशा भानगडींत पडणेच शक्य नाही. पहाडी जीवनाला काही ग्लॅमर नाही. शहरं प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही पुरवतात. तेव्हा शहरात राहून आणि चार दिवस हिमालयात काढून मग त्यावर वर्णनात्मक लेख लिहिणारे शेकड्यांनी मिळतील. पण रस्किनने असं केलं नाही. त्याचा एक 'निसर्गलेखक' म्हणून असणारा वेगळेपणा ह्यातच आहे. प्रसारमाध्यमांपासून, पर्यायाने प्रसिद्धीपासूनच दूर राहत, लॅंडोरसारख्या, हिमालयातील इतर ग्लॅमरस हिल-स्टेशन्सच्या नखर्‍यांपासून अलिप्त असणार्‍या शांत गावात राहून पूर्णवेळ फक्त लेखनच करण्याचा रस्किनचा तरुण वयात घेतलेला निर्णय नुसता वेगळा नव्हे, तर धाडसीच म्हणायला हवा. पण त्याने त्याची लिखाणावरची आणि निसर्गावरची निष्ठा हिमालयाइतकीच अविचल राखली.
ही निष्ठाच तर त्याच्या लंडनला नव्याने नशीब आजमावायला गेलेल्या तरूण पावलांना देहराडूनमध्ये परत खेचून घेऊन आली होती.

कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किनचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडं लावत. 'अवर ट्रीज स्टिल ग्रो इन देहरा' लेखामध्ये या वडिलांसोबत घालवलेल्या काळाचे आणि त्यावेळी जोपासल्या गेलेल्या निसर्गप्रेमाचे खूप बहारदार वर्णन रस्किनने केले आहे. रस्किन लहानपणी पुस्तकंही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्‍या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षं जात राहिली. पण या सर्व काळात तो रमला फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेलं वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.

सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अ‍ॅंग्लोइंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणार्‍या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झर्‍याकाठी पाणी प्यायला येणार्‍या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला.लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकर्‍या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी झुरत राहिला हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी. त्याला तिथल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले. त्यातल्या शब्दाशब्दांत त्याच्या मनातली हिमालयातल्या दिवसांची उसळती ओढ ठिबकत राहिली.

या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरूण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन र्‍हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बाँडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली.

रस्किन स्वतःच्या घरी परतला.
देहराडूनला परतलेला रस्किन स्वतंत्र व एकटा होता. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा महत्त्वाचा निर्णय त्याने घेतलेला होता. हातात पुन्हा एकदा डायरी होती, भोवती पाचूंसारख्या उलगडणार्‍या हिरव्यागार, चिरपरिचित वाटा होत्या. त्यांवरून तो मनाला येईल, तेव्हा हिंडू शकणार होता आणि पाय थकल्यावर ताज्या मनाने आज काय पाहिलं त्याच्या नोंदी डायरीत करणार होता.

देहराडूनमध्ये रस्किनला राहायला घर हवे होते, ते दिले बिबीजीने. त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. रस्किनला तिचे विलक्षण कौतुक वाटे. देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई, जिचे वाणसामानाचे दुकान होते. रस्किन सकाळच्या वेळात तिच्यासोबत धान्य खरेदी करायला मोठ्या बाजारात जाई. तूर, उडीद, चणे, राजमा वगैरेंची पोती उचलायला त्याची मदत होई. रस्किन लिहितो, "धान्य, डाळींची मला आता चांगली ओळख झाली, पण धान्याचा सौदा करणं मात्र मला जमायचं नाही. कदाचित म्हणूनच बिबीजीने ते दुकान माझ्या नावावर करून देण्याचा विचार रद्द केला असावा." आपण अगदी एकाकी, कष्ट करून लिहिणारे लेखक म्हणून ओळखले जावे, ही रस्किनच्या मनातली हौस काही बिबीजीने पुरी होऊ दिली नाही. तो म्हणतो, " दुपारी ती मला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचं आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घालायची" मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. तिथे वीज नव्हती. "पण माझी काहीच तक्रार नव्हती." आपल्या तिथल्या दिवसांचं खूप सुंदर, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्किल शैलीत वर्णन करताना 'देहरा आय नो' या पुस्तकात रस्किन पुढे लिहितो, "विजेचं बिल भरायला पैसेच नसण्याच्या त्या काळात, कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात लिहिलेल्या माझ्या लिखाणाला उलट एक 'सॉफ्ट आणि रोमॅंटिक ग्लो' आला. मी 'तरुण, आयुष्याशी झगडणारा लेखक' होऊ शकत नसल्याची माझी खंत थोडीफार शमली गेली."

रस्किन बाँडने त्या काळात लिहिलेली एकाहून एक सुंदर अशी 'रेन इन द माउंटन्स, द टाईम स्टॉप्स अ‍ॅट शामली, ऑल रोड्स लीड टू गंगा, व्हाईट क्लाऊड्स्-ग्रीन माउंटन्स, लॅंडोर डेज, अलाँग मंदाकिनी, टेल्स ऑफ ओल्ड मसूरी, ग्रेट ट्रीज ऑफ गढवाल, ग्रोइंग अप विथ ट्रीज, वन्स अपॉन अ माउंटन्स टाईम' वगैरे कित्येक पुस्तकं आणि ललित लेख वाचले, की त्याच्या त्या 'सॉफ्ट-रोमॅंटिक ग्लोइंग' शैलीचा प्रत्यय हमखास आपल्यालाही येतो. फक्त ती त्याच्या लिखाणातली जादू केरोसीनच्या कंदिलाच्या उजेडामुळे नसून त्याच्या मनातल्या हिमालयातल्या झर्‍यांसारख्याच निवळशंख, विशुद्ध निसर्गप्रेमामुळे आलेली आहे, इतपत जाणही आपल्याला आलेली असते.
रस्किन झाडांवर, फुलांवर, पर्वतांतल्या धबधब्यांवर लिहिताना जितका रमतो, तितकाच किंवा जरा अधिकच रमतो त्याच्या आजूबाजूच्या माणसांवर लिहिताना. व्यक्तिमत्त्वे अचूक आणि मोजक्याच शब्दांत उतरविण्याचे त्याचे कसब केवळ अपूर्व आहे. ' द ब्लू अंब्रेला'मधली ती चटपटीत बिनया, 'प्लॅटफॉर्म नंबर एट'वरची अनामिक स्त्री, रुद्रप्रयागवरून लहानपणीच त्याच्या जवळ राहायला आलेला प्रेम, रस्किनसाठी जुनाट, राजेशाही खुर्ची राखून ठेवणारा टेहरी रोडवरचा चहाटपरीवाला, विसरभोळा आणि गप्पिष्ट शेजारी कर्नल बिग्ज, रस्किनला अजिबात न आवडणारी केसांना जस्मिनचं तेल लावणारी मिस् बन आणि जिचं नाव रस्किनने कधीच त्याच्या विश्वासातल्या वाचकांनाही सांगितलं नाही, पण जिच्यावर मनोमन प्रेम केलं, ती तिबेटन दुकानातली विक्रेती आणि शामलीत अचानक भेटलेली त्याची जुनी प्रेयसी सुशीला - रस्किनच्या आयुष्यातली ही सारी लोभस माणसं आपल्या कायम लक्षात राहतात, त्याच्या पुस्तकांतून ती वारंवार डोकावत राहतात.
रस्किन बाँडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट), 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्रीही मिळाला. पण अशा कुठल्याच प्रसिद्धीच्या झगमगाटात तो कधीच रमला नाही.
दिल्ली-मुंबईसारख्या शहरांत आल्यावर तो अस्वस्थ होतो. वाहनांच्या गजबजाटापासून कधी एकदा दूर जाऊन आपण आपल्या खिडकीखालच्या चेरीच्या झाडाखाली बसून, दगडावर विसावलेले निळे फुलपाखरू पाहत लिहायला लागतो असे त्याला होऊन जाते. "हिमालयाची झगमगती शिखरे सर करायचा, त्यांच्यावर चढाई करायचा उत्साह माझ्यात नाही. लहानशा, ओळखीच्या पायवाटा मला खुणावतात. त्यावरून चालत जवळच्या जंगलात, एखाद्या खेड्यात, छोट्या तळ्याकाठी किंवा भणाणता वारा असलेल्या टेकडीच्या माथ्यावर चालत जाण्यात मला अमाप आनंद मिळतो." रस्किन लिहितो. आणि मग आता इतकी वर्षं त्या वाटांवरून चालत राहिल्यावर आपणही त्या पहाडांचाच एक भाग बनलो आहोत, तिथल्या झाडांशी, खडकांशी, जंगली फुलांशी आपले रक्ताचे नाते जुळले आहे, उतरत्या संध्याकाळच्या उन्हात ओकवृक्षाच्या डवरलेल्या फांदीखालून चालत जाताना ते झाड प्रेमाने आपल्या डोक्याला स्पर्श करते, ते या जडलेल्या नात्यापोटीच याची रस्किनला खात्री पटते. आणि आपल्यालाही.

रस्किनची पुस्तकं वाचली नसती, तर आपल्याकरता हिमालय नुसत्याच एखाद्या रम्य निसर्गचित्रासारखा होऊन राहिला असता, असं मला नेहमीच वाटतं. फक्त बघावे आणि सुंदर आहे असे म्हणावे. पण हिमालय वाचायला शिकवला तो रस्किनने. हिमालय म्हणजे केवळ भव्य, चमचमती बर्फाची शिखरे नाहीत, तर तो त्यातल्या माणसांसकट, छोट्यांतल्या छोट्या रानफुलांसकट, पाईन-देवदारांच्या दमदार रांगांसकट, फुलपाखरे आणि झर्‍यांसकट एक जिवंत, स्पंदन करणारे व्यक्तिमत्त्व आहे, हे शिकवले रस्किनने.पुन्हा पुन्हा हिमालयाकडे पावले वळत राहिली, ती त्याने पुस्तकातून दाखवलेला निसर्ग आपल्या डोळ्यांनी पाहून पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी. बद्रिनाथच्या वाटेवरून जाताना किंवा जोशीमठचा प्राचीन तुतीचा वृक्ष पाहताना, मंदाकिनी अलकनंदेच्या तीरावरून चालताना, गढवालच्या खेड्यांतून प्रवास करताना, दरीतून उडत जाणार्‍या पक्ष्यांची आनंदी गाणी ऐकताना प्रत्येक वेळी हा आनंद मिळाला.

आयुष्यभर ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्यांना 'द गार्डियन्स ऑफ कॉन्शस' मानलं, त्या झाडांना, पाईन देवदारांच्या समृद्ध रांगांना, सालाच्या देखण्या जंगलांना आता विरळ होत जाताना, मोठमोठ्या धरणांमुळे एकेक करत उजाड होत जाणार्‍या गावांना, रस्त्यांमुळे, वेड्यावाकड्या बांधकामांमुळे ठिसूळ होत गेलेल्या पर्वतकड्यांना, प्रदूषणामुळे माना टाकणार्‍या फुलांना, पुराने गिळंकृत केलेल्या वस्त्यांना पाहून व्यथित होत जाणारं रस्किनचं मन गेल्या काही वर्षांतल्या लिखाणातून सातत्याने जाणवत राहतं. सरकारी अनास्था, बेपर्वाई, माणसांचं जंगलांपासून तुटत गेलेलं नातं, नव्याने जन्म घेणारा स्वार्थी लोभीपणा यांवर फक्त हताश होणंच आपल्या हातात आहे, असं मानणारी उथळ निसर्गप्रेमी वृत्ती रस्किनकडे सुदैवाने नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वैयक्तिक पातळीवर तो विविध मार्गांनी सतत प्रयत्न करतो. व्याख्याने देतो, लेख लिहीत राहतो. निसर्गाचा वारसा जपण्याचं काम नव्या पिढीकडूनच होऊ शकेल हा दुर्दम्य आशावाद त्याच्याकडे अजूनही आहे.

आपल्या एका लेखात तो लिहितो, "दिल्लीमधलं आधुनिक स्थापत्यशास्त्र हिमालयातल्या नाजूक वाटा-वळणांवर आणून उभं केल्यावर आता हा परिसर टेकडीवरून पाहताना शेकडो थडगी असलेल्या कबरस्तानासारखा दिसायला लागला आहे, यात नवल काय?"हिमालयातल्या या मौल्यवान निसर्गसंपदेची लूट आणि तिचे हे नुकसान होण्याची सुरुवात जेव्हा ब्रिटिशांनी आपल्या चैन आणि सुखसोयींसाठी सिमला, मसूरी, दार्जिलिंग, डलहौसी, नैनिताल सारखी हिल स्टेशन्सची उभारणी केली, तेव्हापासूनच झाली, असं रस्किन बिनदिक्कत परखडपणे नॅशनल जिओग्राफिकवर सांगतो. 'एकेकाळी दर्‍यांमध्ये स्फटिकशुभ्र दंव शिंपडणारे धुके असायचे आणि आता तिथे प्रदूषणाचे मळकट ढग असतात, ही कळ चोवीस तास माझ्या ह्रदयातून जात नाही' असं तो कळवळून म्हणत राहतो.

मात्र अजूनही निसर्गाच्या विजिगीषु वृत्तीवरचा, वसंत ऋतूच्या आगमनानंतर खडकांमागून पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढणार्‍या रानफुलांवरचा, निसर्गसाखळीच्या शाश्वत आणि चिवट सातत्यावरचा त्याचा विश्वास उणावलेला नाही. तो म्हणतो- " Despite everything, each morning I look at the birds and the warm sun shining behind the clouds, and I realize that I still have another song to sing- another tale to tell. May be tomorrow, when winds aren't cold and sun's bit warmer, I'll tell you another story.."
हिमालयातली निसर्गराजी टिकेल, बहरत राहील, माणसं सुजाण बनतील, हा आशावाद मग पुन्हा एकदा आपल्याही मनात जन्म घेतो, रस्किनचं पुस्तक हातांत घेताना.

मुंबईतल्या उकाड्याने आणि प्रदूषणाने जीव हैराण झाला, की मला रस्किनची आठवण येते. शिवालिक टेकड्यांच्या, चीड-देवदार-पाईनच्या रांगांनी झाकून गेलेल्या एका शांत गावात, आपल्या आयव्ही कॉटेजमध्ये, चेरीचं झाड दिसणार्‍या वळणदार रस्त्याकडे पाहत एका थंड निळ्या दुपारी रस्किन अजूनही लिहीत बसलेला आहे, गेली सहा दशके तो तिथेच बसून लिहितो आहे, वयाच्या ७५ व्या वर्षीही जंगलांत भटकणार्‍या तरूण रस्टीच्या हातांनी आपल्या डायरीत नोंदी करून ठेवत आहे, ही भावना मला आश्वस्त करते. उन्हाच्या तडाख्यात माझ्याही खिडकीबाहेर भरभरून फुलत राहणार्‍या पेल्टोफोरमकडे समाधानाने पाहत मी बुकमार्क घालून ठेवलेलं रस्किनचं वाक्य मोठ्यांदा वाचते," .. and when all the wars are done, a butterfly will still be beautiful!"

Wednesday, March 26, 2008

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः एक शोध

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते. त्यातला काळ खूप जुना म्हणजे निदान शंभर वर्षांपूर्वीचा तरी वाटत होता. पुस्तकातले काही काही अनुवादित शब्दही निटसे समजत नव्हते. पण तरी त्या पुस्तकाने मला खिळवून ठेवले. पुस्तकाची नायिका लॉरा माझ्याच त्यावेळच्या वयाच्या आसपासची होती म्हणूनही असेल कदाचित पण ती मला इतक्या वेगळ्या काळातली, वातावरणातली असूनही विलक्षण जवळची वाटली.
'वसंत फार..' मधून मला भेटलेली ती लॉरा साधी, सरळ, निष्पाप आणि आनंदी, खोडकर होती. पुस्तक संपता संपता ती प्रगल्भ, समजुतदार होत गेली. तिच्या स्वभावातला हा बदल तिच्या पुस्तकातल्या प्रवासादरम्यान घडत गेलेल्या घटनांशी सुसंगत असाच होता. लॉराची त्या पुस्तकातली दुनिया, अमेरिकेच्या इतक्या जुन्या काळातले त्यांचे तिथले राहणीमान, लॉरा, तिच्या बहिणी आणि त्यांचा कुत्रा तिच्या मा आणि पा सोबत एका बंद घोडागाडीमधून करतात तो प्रवास हे सारच माझ्या दृष्टीने खूप जितकं अनोळखी तितकच अद्भूत होतं. मात्र अंबादास अग्निहोत्रींनी अनुवादित केलेले हे पुस्तक कोणतेतरी मधलेच असल्याने लॉराचे याआधीचे आयुष्य आणि नंतर तिच्या आयुष्यात काय काय होते याबद्दल तेव्हा काहीच कळू शकले नाही. तिच्या दीर्घ प्रवासादरम्यानचा एक कोणतातरी मधलाच तुकडा माझ्या हाती लागलेला होता आणि बाकी कथानकाबद्दल मनात विलक्षण उत्सुकता दाटून राहिली. मिनेसोटा प्रांतातली ती गवताळ कुरणे, बर्फाची वादळे, तिथली लाकडी ओंडक्यांची घरे, साजरे केले जाणारे नाताळ आणि त्यावेळी माने घरी बनवलेली 'गुडदाणी', चर्चमधला पहाटेचा घंटानाद, टोळधाडीमुळे उध्वस्त झालेलं पांच गव्हाच शेत, लॉराच्या मैत्रिणी, स्वार्थी नेली, मदत करणारे ओल्सन, पायांना चिकटलेल्या जळवा, अलुबुखारच्या जाळ्यांमधून वाहणारे झरे, पांनी मध्यरात्री वाजवलेलं फिडल, लॉराच्या मेरी, कॅरी या बहिणी, त्यांची भांडणं, प्रेम हे सारच त्या पुस्तकातून माझ्या खूप ओळखीच झालं कारण मी अनेकदा, वारंवार ते पुस्तक वाचल होत. मी वाचलं आणि मग माझ्या त्यावेळच्या मित्र-मैत्रिणींनाही वाचायला दिलं. माझ्या आईला आणि बहिणीला सुद्धा पुस्तक विलक्षण आवडलं. म्हणायला किशोरवयीन मुलांसाठी असणार्‍या त्या पुस्तकाची अशी सर्वांना पडलेली मोहिनी चकित करुन जाते आजही विचार केला की.
त्यानंतर बरीच वर्षं ते पुस्तक माझ्या आसपासच होतं. पुस्तकाची प्रत आधीच जुनी होती. सतत वाचून, कुणाला न कुणाला वाचायला देऊन ती आणखीनच जीर्ण झाली. बाईंडिंग करुनही पाने एकत्र राहीनात. पुढे वर्ष उलटली. शाळकरी वय मागे पडले. दरम्यानच्या काळात 'लिटिल विमेन' अर्थातच 'चौघीजणी' मधली ज्यो जास्त जवळची झाली. 'लिटल हाऊस' कुठेतरी हरवूनच गेले. लॉरा कुठेतरी मागेच राहिल्यासारखी झाली. एकदा अचानक आठवण झाली तेव्हा बरीच शोधाशोध केली पण पुस्तक कुठेतरी निट जपून असे ठेवले होते तेच मिळेना. लॉरा हरवल्याची चुटपुट बरेच दिवस मनात राहिली. त्या इतक्या जुन्या अनुवादित पुस्तकाची प्रत कुठल्याच दुकानात तेव्हा उपलब्ध नव्हती. 'लॉरा' हा समान आवडीचा दुवा असलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे याच 'लिटल हाऊस'च्या अजून एका पुस्तकाचा 'एका तळ्याकाठी.. नावाने केलेला अनुवाद मात्र मधल्या काळात वाचायला मिळाला ही खूप खुशीची गोष्ट होती. पण बाकी लॉराची साथ सुटली ती सुटलीच.पुढे अनेक वर्षांनी रविन्द्र पिंगेंशी बोलताना मी या पुस्तकाची आठवण काढली. त्यांनी अंबादास अग्निहोत्रींच्या काही ओझरत्या आठवणी काढल्या पण या दोन पुस्तकाबद्दल बाकी काहीच त्यांनाही आठवत नव्हते. बर्‍याच वर्षांपूर्वी युसिसने अनेक अमेरिकन पुस्तके मराठी लेखकांकडून अनुवादित करुन घेतली होती त्यापैकी ही पुस्तके असावी असे त्यांनी सांगितले.
मग एक खूप मोठा काळ उलटून गेला. माझ्या स्वतःचा प्रवास शिक्षण पूर्ण केल्यावर मग नोकरी-लग्न-मुल हे टप्पे घेत घेत या काळादरम्यान सुरुच होता. आणि मग एकदा युसिसमधे कपाट धुंडाळताना अचानक समोर 'लॉरा' भेटली. अनुवादित नाही तर तिच्या मुळ इंग्रजी स्वरुपातच. आणि एक दोन नाही तर चक्क आठ पुस्तके. लॉरा इन्गाल्स वाईल्डर या अमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या 'लिटल हाऊस' पुस्तकाचे आठ सुबक आणि अत्यंत देखणे भाग कपाटात ओळीने लावून ठेवलेले होते. हिरव्यागार गवताळ कुरणावर, डोक्यावर उन्हाळी टोपी, अंगात झालरीचा लांब पोशाख, पायात कातडी बूट घातलेली कव्हरवरची लॉरा माझ्याकडे पाहून तिचं ते मिश्किल, खोडकर हसू हसत होती. तिच्या मागे लाकडी ओंडक्यांचे घर होते, बाजूला बंद वॅगन होती.
मी अधाशासारखे ते आठही भाग वाचून काढले. यावेळी जास्तच आवडले. लॉराची मूळ इंग्रजी भाषा अत्यंत सोपी, साधीसुधी आहे. शिवाय आता बरेचसे संदर्भ सुसंगत लागत होते. अग्निहोत्रींच्या अनुवादात लॉरा आणि मेरी गुडदाणी खात म्हणजे काय नक्की कळत नसे. आता गुडदाणी म्हणजे कॅन्डी समजल्यावर खूप गंमतही वाटली.
आता पुन्हा लॉराच्या आयुष्यात डोकावून पाहताना मला पुस्तकाच्या पलिकडच्या लॉरा इन्गाल्स वाईल्डरबद्दल अमाप कुतुहल वाटायला लागलं. लॉराची ही कहाणी तिची आत्मकहाणीच आहे हे माहित होतं. लॉराची, तिच्या कुटुंबियांची, ती रहात होती त्या ठिकाणांची, प्रदेशाची खरी ओळख व्हावी म्हणून मग मी नेट धुंडाळलं, अमेरिकन लायब्ररीमधे लॉरा इन्गाल्सवर इतरांनी लिहिलेली असंख्य पुस्तक होती. तिचं आख्ख वास्तव आयुष्य पुस्तकांमधे होतं त्यापेक्षा यत्किंचितही कमी रंजक नव्हतं.
विस्कॉनसिनच्या घनदाट जंगलांमधे लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या एका छोट्याशा घरात लॉरा एलिझाबेथ इन्गाल्स जन्माला आली ७ फेब्रुवारी १८६७ साली. त्यानंतर १९३० साली म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी तिने मॅन्सफिल्ड मिसुरीमधील शेतातल्या रॉकी रिज या घरात बसून लिटल हाऊस या नंतरच्या काळात 'क्लासिक' गणल्या गेलेल्या आठ पुस्तकांच्या मालिकेतले आपले पहिले पुस्तक 'लिटिल हाऊस इन दी बिग वुड्स' लिहिले तेव्हा आपण अमेरिकेच्या इतिहासातील 'पायोनियर पिरियड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मिडवेस्टर्न फ्रॉन्टियरचा १८७० ते १८८० दरम्यानचा सामाजिक आणि सांस्कृतिक कालखंडच शब्दबद्ध करुन ठेवत आहोत याची यत्किंचितही कल्पना तिला नव्हती. ती फक्त आपण ज्या प्रदेशात लहानाच्या मोठ्या झालो त्या विस्कॉन्सिन, मिनेसोटा, कॅन्सास आणि साऊथ डाकोटा येथील आठवणी आपली मुलगी रोझाच्या आग्रहावरुन लिहून काढत होती.
लॉराच्या वडिलांना- चार्ल्स फिलिपना साहसाचे, वेगळे काही करण्याचे विलक्षण आकर्षण. त्यांच्या अंगात सतत सळसळणारे पायोनियर स्पिरिट त्यांना पश्चिम दिशेकडे 'लॅन्ड ऑफ प्रॉमिस अ‍ॅन्ड होप ' कडे जायला आयुष्यभर खुणावत राहिले. लॉराच्या वयाच्या चौथ्या वर्षी इन्गाल्स कुटुंबाने म्हणजे पा चार्ल्स, मा कॅरोलिन, मोठी बहिण मेरी, धाकटी बहिण कॅरी आणि त्यांचा कुत्रा जॅक या सर्वांनी बंद घोडागाडीमधे बसून दूध व मधाचे प्रवाह जिथे वाहतात त्या पश्चिम दिशेकडे कूच केले. मिसुरी-कॅन्सास-विस्कॉनसिन-मिनेसोटा-आयोवा या प्रांतामधला तो प्रवास मग पुढे लॉराचे बालपण, किशोरवय संपून तिने तारुण्यात प्रवेश केल्यानंतरही सुरुच राहिला. याच प्रवासात डाकोटामधे तिला आल्मांझो वाईल्डर भेटला, ज्याच्याशी तिने प्रेमविवाह केला आणि तोही इन्गाल्स कुटुंबाचा एक भाग बनून गेला.
इन्गाल्स कुटुंबाने केलेले हे प्रवास सोपे नव्हते. ते खडतर, रोमांचकारी आणि असंख्य साहसांनी भरलेले होते. रेडइंडियन्सच्या प्रदेशातील त्यांचे मुक्काम, मिनेसोटात असताना सामोरे जावे लागलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी, बलाढ्य मिसिसिपी नदीचे ओलांडावे लागलेले पूर, घनघोर बर्फाची वादळे, संकटांवर त्यांनी एकत्रितपणे, जिद्दीने आणि चातुर्याने केलेली मात, प्रवासात भेटलेली माणसे आणि सर्वात मनोरम असे इन्गाल्स कुटुंबियांचे आपापसातील चिवट, जिव्हाळ्याचे बंध असे सारे एकत्र गुंफलेल्या लॉराच्या मनातील आठवणी गोष्टींच्या स्वरुपात एकतच लॉराची मुलगी रोझा मोठी झाली. आपल्या मनावर लोभस ठसा उमटवणार्‍या आईच्या या विलक्षण गोष्टी जगभरातील सर्वांनाच वाचायला मिळाव्यात म्हणून रोझा सतत लॉराच्या मागे लकडा लावून असे की त्या लिहून काढ. लॉराला सुरुवातीला लिहिण्याचा सराव नसल्याने कंटाळा यायचा तेव्हा तिने लेखनिकाची भुमिकाही बजावली. आणि मग १९३० ते १९४० या कालावधीत 'लिटल हाऊस सिरिज'ची आठ पुस्तके प्रकाशित झाली. अल्पावधीतच या पुस्तकांनी जगाला वेड लावलं. इन्गाल्स फॅमिलीसोबतच्या घनदाट जंगलांमधल्या, लांबलचक सोनेरी गवताळ कुरणांमधल्या, अजस्त्र मिसिसिपी नदीच्या पुरामधल्या. गोठलेल्या हिमनद्यांवरच्या त्या बंद वॅगनमधल्या प्रवासात हे वाचकही सहप्रवासी बनले. त्यांच्यासोबत तेही लॉगकेबिन्समधे राहिले. ४० देशांमधे वेगवेगळ्या २८ भाषांत ही पुस्तके वाचली गेली. या पुस्तकांवर अनेकांनी पुस्तके लिहिली. ती सुद्धा गाजली. इन्गाल्स आणि वाईल्डर कुटुंबे आता फक्त लॉराची राहिली नाहीत. तिच्या वाचकांनी, वाचकांच्या पुढल्या पिढ्यांनीही ती आपली मानली.
लॉराचे आणि तिच्या बहिणींच्या शालेय शिक्षणात या सततच्या प्रवासामुळे आणि कायमच असलेल्या आर्थिक विवंचनेमुळे खंड पडत होता. कुटुंबासोबतचा प्रवास पुढच्या प्रांतात गेल्यावर लॉराला आपल्या आधीच्या इयत्तेमधे पुन्हा एकदा बसून तोच अभ्यास करावा लागे. कधी कधी तर त्या प्रांतांमधे जवळपास शाळाही नसे. लॉराच्या आईने तिच्या वडिलांकडून वचन घेतले की मुलींचे शिक्षण पूर्ण करीन. लॉरा तेरा वर्षांची असताना पांना ते वचन पूर्ण करण्याची संधी मिळाली. लॉरा सोळा वर्षांची होईपर्यंत तिला सलग शालेय शिक्षण घेता आले. घरच्या आर्थिक जबाबदार्‍या उचलून वडिलांचा भार हलका करण्यासाठी लॉरा स्वतः शिकत असतानाच मुलांना शिकवायचेही काम करी. त्यासाठी तिला २० मैलांचा प्रवास करुन जावे लागे. तो तिचा प्रवासही मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पुढे आल्मांझोच्या लाभलेल्या कणखर हातभारामुळे इन्गाल्स कुटुंबाला थोडेफार आर्थिक स्थैर्य लाभू शकले.
अमेरिकेच्या पायोनियर पिरियडमधली जीवनपद्धती, राहणीमान, वृत्ती, तेव्हाची संकटे, आव्हाने सारेच लॉराच्या या साध्यासुध्या अत्मकथनामधून जिवंत झाले. चिरंतन जतन करुन ठेवले गेले. लोकांनीही पुस्तकाला अजरामर केले. लॉराला पुढे असंख्य मानसन्मान मिळाले. तिच्या पुस्तकांमधील ठिकाणांवर, व्यक्तिरेखांवर, त्या कालातल्या तिने वर्णन केलेल्या वस्तूंवर, इन्गाल्स कुटुंब जिथे जिथे राहिली त्या घरांवर कायमस्वरुपी म्युझियम्स उभारली गेली. लिटल हाउस पुस्तकांवर अनेक सिझन्स चाललेली, अत्यंत लोकप्रिय टिव्ही मालिका निघालेली आहे.
पुस्तकांमधे तिने वर्णन केलेल्या ठिकाणांचा, घरांचा वेध तिच्याच प्रवासाच्या मार्गाने घेतला जावा या वाचकांच्या इच्छेपोटी एक ट्रेक आखला जातो. जगभरातले असंख्य पर्यटक उन्हाळी सुट्ट्यांमधे हा ट्रेक करतात आणि लॉराच्या बालपणाच्या प्रवासात आपणही प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा आनंद लुटतात. 'द वाईल्डर ट्रेक' असे या रोमांचकारी प्रवासाचे नाव आहे. तो सुरु होतो पेपिन-विस्कॉन्सिन पासून (लॉराचे पहिले पुस्तक: लिटल हाउस इन द बिग वुड्स), मग तो इंडिपेन्डन्स, कॅन्सासच्या दिशेने (लिटल हाऊस ऑन द प्रेअरी) पुढे उत्तरेला मिनेसोटातील वॉलनट ग्रोव्हपर्यन्त जातो (ऑन द बॅन्क्स ऑफ प्लम क्रीकः लिटल हाऊसचे चौथे पुस्तक) तिथून मग पश्चिमेला द स्मेल्ट, द. डाकोटा प्रांतात पुढे जातो. लॉरा आणि आल्मांझो वाईल्डरच्या ओझार्क माउंटन्समधील घराकडे तिच्या चाहत्यांच्या भेटीचा ओघ तर सतत वाहता असतो. लॉरा इन्गाल्स वाईल्डर मेमोरियल सोसायटीही स्थापन झाली. 'आजपर्यन्तचे सर्वाधिक वाचले गेलेले पुस्तक' अशी मानाची नोंद तिच्या नावे अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने केली आहे. तिच्या सन्मानार्थ उत्कृष्ट साहित्यिक कारकीर्द असणार्‍या लेखिकेला पुरस्कार दिला जातो.

लॉरा इन्गाल्स वाईल्डरः द फ्रॉन्टियर गर्ल-
किशोरवयीन वाड्मय म्हणून लिहिल्या गेलेल्या लॉराच्या वैयक्तिक आठवणींचा धांडोळा घेणार्‍या या 'लिटल हाऊस' सीरिजमधील आठही पुस्तकांचे ऐतिहासिक महत्व विल्यम अ‍ॅन्डरसनसारख्या इतिहासकाराच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. खरं तर ते सर्वात आधी लक्षात आले ते त्याच्याच. बिल अ‍ॅन्डरसनची इतिहासकार म्हणून कारकीर्द सुरुच झाली मुळात त्याला लॉराच्या या पुस्तकांच्या बालपणापासून वाटणार्‍या अनिवार आकर्षणामुळे. प्राथमिक शाळेत तिसरीत असताना त्याच्या शिक्षकाने 'लिटल हाऊस ऑन द प्रेअरी' पुस्तकातला काही भाग वर्गात वाचून दाखवला. त्याच्या मोहात तो इतका पडला की त्याने झपाटल्यासारखे सर्व भाग वाचून काढले. त्याला जेव्हा कळलं की ही कुठली ऐतिहासिक कादंबरी नाही, तर लॉरा इन्गाल्सने खरेखुरे जगलेले आयुष्य आहे तेव्हापासून त्याच्या मनात कायम एकच प्रश्न घोळत राहिल,' पुढे काय झाले असेल?'
बिल अ‍ॅन्डरसनचे आई वडिल मग त्याला उन्हाळी सुट्ट्यांमधे लिटल हाऊसमधल्या लॉराच्या कुटुंबांच्या मुक्कामांच्या ठिकाणी घेऊन गेले. त्याने उत्सुकतेपोटी लॉराच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, परिचितांना अनेक भेटी दिल्या आणि त्यातूनच पुढे त्याने अमेरिकन इतिहासाच्या त्या पायोनियर पिरियडचे डॉक्युमेन्टेशन करणारी अनेक इतिहासाची पुस्तके लिहिली. बिल अ‍ॅन्डरसन आज लॉरा इन्गाल्स वाईल्डर होम असोसिएशनच्या संचालक पदावर मोठ्या अभिमानाने विराजमान आहे.
पुस्तकांच्या सहाय्याने इतिहासाचा मागोवा कसा घेता येतो हे बिल अ‍ॅन्डरसने दाखवून दिले आणि वैयक्तिक आठवणींच्या नोंदी ही इतिहासाकडे घेऊन जाणारी पावले ठरु शकतात, हे दाखवण्याचे श्रेय लॉराचे.आठ पुस्तकांमधे वाचकांच्या समोर ठेवलेले आपले सततच्या प्रवासातील आयुष्य जगून झाल्यावर लॉरा आणि आल्मांझो त्यांच्या आयुष्यातील संध्याकाळी विसावले ते मॅन्सफिल्ड मिसोरी येथील रॉकी रिज फार्महाऊसमधे. आल्मांझोने ते आपल्या हाताने लॉरासाठी बांधले. इथेच बसून लॉराने आपली पुस्तके लिहिली. तिच्या पुस्तकांमधे उल्लेख नसलेले हे एकमेव घर. तरीही लॉराच्या चाहत्यांची रीघ सतत वर्षभर या घराकडे असते. लॉराच्या मृत्यूसमयी होते तसेच ते अजूनही आहे.
लॉराची कहाणी वाचत असताना, इतक्या वर्षांनंतर लॉराला खर्‍या अर्थाने जाणून घेत असताना आता मनाला भिडली ती लॉराची आणि तिच्या सार्‍याच कुटुंबियांची चिवट, आनंदी, जीवनाला सामोरी जाणारी आवेगी, विजिगीषु वृत्ती, जी तिने शेवटपर्यंत जपली. आपल्या प्रवासातल्या स्थळांचा उल्लेख लॉराने नंतर' The Land Of Used-to-be' असा केला होता. गतकाळातली ठिकाणे! वर्षे लोटली. शतक संपले, पिढ्या बदलल्या, पण प्रत्येक पिढीच्या शैशवातल्या, कुमार वयातल्या भावभावना त्याच राहिल्या. लॉरा त्या सर्वांसाठी कायमच A girl not only someone we like but someone who is like us अशीच राहणार.
१० फेब्रुवारी १९५८ साली वयाची ९० वर्षे पूर्ण झाल्यावर ओझार्क्स मिसुरी येथून लॉरा अंतिम प्रवासासाठी निघून गेली. त्याला २०१०च्या फेब्रुवारी महिन्यात ५२ वर्षे झाली.लॉराचा हा एकमेव प्रवास, जो तिच्या कोणत्याच वाचकाचे मन रिझवू शकला नाही.

Sunday, April 16, 2006

वाचत असलेली पुस्तके

माझ्या पुस्तक वाचनात शिस्त नाही. म्हणजे एका वेळी एक पुस्तक वाचून पूर्ण करणे किंवा एका लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपविणे, पुस्तका मधून आपल्याला काय मिळालं, पुस्तकाचा सारांश, टिपणं वगैरे काढून ठेवणं मला कधी जमलच नाही. खरतर अशी ही शिस्त वाचनाला लावून घेणे अत्यंत चांगली व आवश्यक गोष्ट आहे. त्यासंदर्भात काही लेखन करने, परीक्षण करणे, आपल्या इतर लेखांसाठी संदर्भ म्हणून टिपणांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यामुळे शक्य तर होतातच पण वाचन सुरळीत चालू असल्याचा एक फ़ील पण येतो.

मला एकतर एकावेळी अनेक पुस्तके वाचायची खोड. म्हणजे समजा मी दुकानातून, प्रदर्शनातून चार पुस्तके आणली तर मी घरी आल्यावर ती एकामागून एक सगळी वाचायला सुरुवात करते. लायब्ररीची पुस्तके सोबतीला असतातच. वाचन वेळ मिळेल तस कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी चालू असतं त्यामुळे मग त्या त्या वेळी हाताला येईल ते, पर्स मधे असेल ते पुस्तक आधीच्या पानावरुन पुढे वाचायला सुरुवात होते. अपवाद असतोही एखाद्या खूपच मनाची पकड घेणार्‍या पुस्तकाचा. पण तसे पुस्तक अपवादानेच हातात पडते हल्ली. रात्रभर जागून हातातले पुस्तकं संपवल्याशिवाय झोपच न येणे असा प्रसंगच खूप कमी येतो.

मॅजेस्टीकच्या ग्रंथयोजनेची मी सभासद आहे. परवा त्या योजनेची वार्षिक मुदत संपली. मग एकदम एकावेळी खूप पुस्तके विकत घ्यायचा सुवर्णयोग आला. अधाशासारखी पुस्तके विकत घेतलीत. आणि आणल्यापासून ह्या पुस्तकाची दोन पाने, त्याची काही प्रकरणे असं चालू केलय. न वाचलेलं पुस्तकं घरात अवतीभवती असणं मनाला त्रासदायक असतं. चैनच पडत नाही. पण ह्यावेळी मात्र मी मनाशी ठरवलय की जमेल तितकं शिस्तीने पुस्तकं वाचायची. त्यांची जमतील तशी परीक्षणं पण लिहायची. त्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग उघडायचा मनात आहे.

सध्या माझ्या अवतीभवती पसरून असलेली पुस्तकं ही आहेत्:

१ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२ ब्र - कविता महाजन
३ मौनराग -महेश एलकुंचवार
४ स्टुडिओ - सुभाष अवचट
५ जगण्यातील काही - अनिल अवचट
६ फुलवा -डॉ. श्रीश क्षिरसागर
७ सिनेमाचे दिवस - विजय पाडळकर
८ कोबाल्ट ब्लू -सचिन कुंडलकर
९ चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
१० रानातल्या वाटा -मारुती चितमपल्ली
११ केशराचा पाऊस -मारुती चितमपल्ली
१२ भूमी -आशा बगे
१३ राजा रविवर्मा - रणजित देसाई
१४ भूप -मोनिका गजेन्द्रगडकर ( ह्या विद्याधर पुंडलिकांच्या कन्या )

तर मित्रांनो .... शक्य तितक्या लवकर संपवते ही पुस्तके आणि लिहीते त्यावर जमेल तस परीक्षण