Wednesday, September 21, 2011

त्या वर्षी

शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी.त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक,बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे,काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली.ना कुठे जाहिरात ना बोलबाला.
कादंबरी वाचली तेव्हा मला ती विलक्षण 'नवीन’ वाटली.कादंबरीतल्या अशेषच्या तोंडून सांगायचं तर,"नवीन म्हणजे नावीन्य नव्हे.नवीन म्हणजे ताजं.खरं.आतला-बाहेरचा संबंध लावणारं."

'त्या वर्षी'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कथानकाचं वर्तमानाला घट्टपणे जोडलेलं रहाणं.या लिखाणाला एक पक्क ठिकाण आहे,विशिष्ट कालखंड आहे.पात्रांचे वागणे,विचार,त्यांच्यासमोरची आव्हाने या कालपटाशी सुसंगत आहेत.
काही अपवाद वगळता मराठी साहित्यामधे ज्या वातावरणात लेखक लिहित असतो ते त्याच्या लेखनात कधीच उमटत नाही.त्यांनी निर्माण केलेल्या जगाला कोणत्याही काळाचे संदर्भ चिकटलेले नसतात.
'त्या वर्षी' मधले जग कलावंतांचे असूनही कोणत्याही प्रकारे भासमान किंवा अधांतरी नाही.त्याला वर्तमान जगण्याचे निश्चित भान आहे.सामाजिक संदर्भ आहे.कलावंताच्या निखळ कलाप्रेरणेवर आणि प्रकटीकरणावर बाह्य जगातली अपरिहार्य वस्तुस्थिती नेमका काय परिणाम करते,जागतिकीकरण, बाजाराच्या शक्ती,जमावाची मानसिकता,आक्रमक प्रसारमाध्यमं कलावंताच्या आंतरिक अवकाशावर कशाप्रकारे अतिक्रमण करतात,कलावंत आंतरिक स्तरावर याचे कसे विश्लेषण करतो,त्याच्या कलेतून,ते कितपत अभिव्यक्त होते हे हा कथानकाचा प्रमुख गाभा.

वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधे वावरणार्‍या मित्रांच्या एका ग्रूपची ही कहाणी.. याला हिंसेच्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे.
कथानकाचा काळ बाबरीमशिद पाडल्यावर १२ वर्षांनंतरचा आहे.त्याला अनुसरुन इतर घटना,समाजमनात झालेल्या सांस्कृतिक,राजकीय स्थित्यंतराच्या,मोडतोडीच्या संदर्भांसकट यात येतात.या काळात जगण्याच्या विविध स्तरांवर धर्मवाद झिरपला.आजवर जी क्षेत्र अलिप्त होती त्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागले.
बाबरी मशिद पाडल्यावर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत जमावाकडून अनिमाचा नवरा सिद्धार्थ मारला जातो.१२ वर्ष रोज तो दिवस जगत राहीलेली अनिमा तिच्या दु:खाचा, संतापाचा निचरा डायरीच्या पानांमधे करत रहाते.एक दिवस ती आपली रोजनिशी लिहिणे बंद करते.पुढे जायचं ठरवते,आठवणींमधून मोकळं व्हायचा तिचा निर्णय कादंबरीची सुरुवात आहे.

अनिमाचा अर्थ- मानवी मनाचा तो भाग जो अंतर्मनाचा वेध घेतो आणि नेणीवेच्या संपर्कात असतो. या अर्थाचा चपखल वापर अनिमाच्या व्यक्तिरेखेच्या प्रवासात होतो.
अनिमाची व्यक्तिरेखा मध्यवर्ती नसली तरी महत्वाची आहे.अनिमा शाळेत शिकवत असते पण तिला तिथून काढून टाकतात कारण ती गाथा सप्तशती वर्गात वाचून दाखवते आणि ते अश्लिल असल्याचे सर्वांचे मत.पोर्शन बाहेरचं वाचून दाखवल्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा हातून घडत असल्याने पालक आणि शाळा तिच्यावर नाराज असतात.
अनिमाचा एक भूतकाळ आहे,तिचे आई-वडिल,सूरगाव आहे.मुलगी आणि तीही सावळी जन्माला आलेल्या अनिमाचं कुटुंबव्यवस्थेमधलं दुय्यम स्थान,भावापेक्षा ती आईच्या नजरेत सहजगत्या कायम खालच्या पायरीवर.पण त्यातूनही तिनं जोपासलेलं तिचं आंतरिक कणखर,संवेदनशील,प्रगल्भ,रसिक आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व.
या उलट तिचा भाऊ अशेष.गोरागोमटा मुलगा म्हणून आईचा विशेष लाडका,पण कदाचित म्हणूनच अशेष अनिमासारखा कणखर, लढाऊ नाही.कचखाऊ आहे.नसरिन बरोबर लग्न ठरवताना आईला दुखावण्याचं धाडसं तो करु शकत नाही.आणि ते दु:ख गोंजारत रहातो.अनिमाचा कणखरपणा ती आंतरजातीय लग्न करताना तिच्या भावच्या तुलनेत सिद्ध करुन दाखवू शकली आहे.
अनिमा आणि अशेषचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.अशेष प्रयोगशिल चित्रकार आहे.हे दोघे आणि त्यांच्या सामायिक कलाकार मित्रांचा एकात एक गुंतलेला नातेसंबंधांचा एक लोभसवाणा पट कादंबरीमधे उलगडत जातो.
अशेषचा चित्रकार मित्र हरिदास,फ़िरोझ,त्याचा माथेरानचा बंगला,कोल्हापूरहून आलेली पत्रकार जानकी पाटील मुंबई ऑब्झर्वर मधे कल्चरखिचडी नावाचा कॉलम चालवते.कॉलमचं नावच माध्यमजगताची कलेकडे पहाण्याची दृष्टी अधोरेखित करतं.जानकीला काही वेगळं,कलाकारांच्या निर्मितीचा वेध घेणारं लिहायची इच्छा आहे.
शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य परंपरेत अडकलेली गायिका शारदा,तिलाही काही नव्या वाटा धुंडाळायची इच्छा आहे,गुरुंचा त्याला विरोध आहे.शारदाचा नवरा शेखर तिला 'कानधर’ घराण्याची म्हणतो.गुरुंचं नाव घेतलं की धरले कान,सूर सटकला धरले कान.
या शिवाय अनिमाच्या भूतकाळाशी संबंधित काही पात्रं,सूरगावातले आदिवासी,रामाचं मंदिर आहे,डॉ.भास्कर आहेत..
कादंबरीमधली सजिव-निर्जिव कोणतीही पात्रं अनोळखी वाटत नाहीत.कधी ना कधी यांच्याबद्दल वाचले आहे,त्यांना ऐकलं आहे,पाहीलं आहे हा फील घेउन ती येतात.

हरिदास माध्यमजगात रमणारा चित्रकार.खरं तर परफॉर्मिंग आर्टिस्टच.रहातो मुंबईच्या एका जुन्या वाडीतल्या कौलारु घरात पण लाल मर्सिडिझ चालवतो,त्यावर हत्ती रंगवतो,ट्रकचा हॉर्न बनवतो.त्याच्या ’ऑल व्हाईट’ प्रदर्शनातील नव्या प्रयोगाला लोकांनी ’ऑल वाईट’ म्हणत हेटाळलं आहे पण आपला नवे प्रयोग करण्याचा हक्क तो अबाधित राखून आहे."वैचारिक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही.आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच काम करु." हे त्याचं आवडतं तत्वज्ञान.हरिदासचं थिल्लर, शोबाजी करणारं वागणं शारदाचा नवरा शेखरला आवडत नाही.शारदाचे आणि हरिदासचे एकेकाळचे संबंधही त्याच्या रागाच्या मागे सावली धरुन आहेत.

आर्टस्कूल सोडून कलाविश्वात उतरलेल्या उदयोन्मुख चित्रकारांचा उडणारा सर्जनशिल गोंधळ प्रकाशच्या व्यक्तिचित्रणातून व्यक्त होतो.राजकीय संदर्भ चित्रातून आणायला हवेत,व्हिडिओआर्टला मागणी आहे तर ते कसं करायचं?त्याच्या गोंधळलेल्या प्रश्नांना उत्तर देताना समंजस चित्रकार फ़िरोझ सांगतो," तुम्हांला जे करावसं वाटतय ना,ते करा.तुमची प्रतिभा,तुमच्या कल्पना,तुमचं आयुष्य,तुमच्या भिती,आठवणी.. समजून घेऊन त्यांच्याशी इमान राखा.तुमची चित्रं म्हणजे तुमचं सत्य असेल.जे तुमच्या आतून येतं ते तुमचं सत्य.त्याचा शोध घ्या."

कादंबरी बरिचशी अनिमाच्या नजरेतून घडते पण ती प्रोटेगोनिस्ट नाही.प्रमुख सूत्रधार आहे वर्तमानकाळ, नियती.कोणत्याही एका विशिष्ट सूत्रातून कादंबरी पुढे जात नाही.कलावंताच्या मनस्वी कलाप्रेरणांचा मागोवा घेत,वास्तव जगाशी त्यांना जोडून घेत,कलेबद्दलचे दृष्टीकोन,परस्परांमधील गुंतागुंतींचे संबंध,हेवेदावे उलगडत कथानक पुढे सरकत रहातं.सुरुवात,मध्य,शेवटाची पारंपारीक चौकट इथे नाही.वर्तमानाचा गतिमान ओघ कथानकाला आपल्यासोबत घेऊन जातो.घटनांच्या ओघात व्यक्तिरेखा उलगडत जातात आणि आजच्या जगण्यातील त्यांचे व्यवहार स्पष्ट होत जातात.

कलाकार काहीतरी भन्नाट वेगळ्या जगात वावरतात,त्यांना अंतराळातून कुठून तरी स्फुर्ती येते आणि मग ते काहीतरी निर्माण करतात अशी रोमॅन्टिक कल्पना बाळगायला लोकांना आवडतं.खरं तर वर्तमानातल्या प्रत्येक घटनेचा एक थेट परिणाम इतर लोकांप्रमाणेच कलाकारांच्याही वागण्यावर,विचारांवर होत असतो. तर्कसंगत प्रतिक्रिया त्यांच्याही जागरुक अंतर्मनावर उमटतात. कलेतून ते प्रकटायला कदाचित वेळ लागतो पण ते जेव्हा येतं तेव्हा काळाचा संदर्भ कलावंताच्या निर्मितीमागच्या प्रेरणा तपासून पहाताना महत्वाचा ठरतो.
सामान्य माणसाच्या मनात कलेविषयी असंख्य गोंधळ असतात.त्याला स्वत:ला चित्र म्हणून जे अभिप्रेत आहे आणि कलाजगत किंवा माध्यमजगताकडून जे उत्तम चित्र म्हणून वाखाणले जाताना दिसतं त्यात मोठी दरी पडलेली दिसते.आजच्या जागतिक देवाण-घेवाणीत चित्रजगतात अशा अनेक दर्‍या निर्माण झाल्या आहेत.कदाचित म्हणूनच आपण कलाकारांना स्वतंत्र स्थानावर,काही अंतरावरच ठेवणे पसंत करतो. आम्ही त्यांच्याशी नाही नातं जोडू शकणार हा गंड बाळगत जगतो आणि कलाकारासाठी कधीच आपल्या मनाचे दरवाजे खर्‍या अर्थाने उघडत नाही.
त्यामुळेच कलाकारांचा स्वत:च्या कलेशी,समाजाशी जोडले जाण्यात असलेला प्रामाणिकपणा,व्यवहारी वृत्ती,उत्तरदायित्व याचा जो वस्तुनिष्ठ ताळेबंद इथे मांडला जातो,कलाकार आणि सामान्य माणूस यांच्यामधली वैचारिक दरी सांधण्याचा जो प्रयत्न इथे होतो तो कलाकारांना समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरतो.

वर्तमान जगात घडणार्‍या घटनांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम यातील पात्रांच्या आयुष्यावर होताना दिसतो. यात दंगल आहे,हुसेनच्या चित्रांवरील हल्ला आहे,कलाकारांचे लैंगिक व्यवहार,चित्रकाराची आत्महत्या,वारली चित्रांचे व्यवहार,तिवरांची तोड, सरकार आणि बिल्डरलॉबी.. कादंबरीत अनेक उल्लेख,संदर्भ,विचार येत रहातात ज्यामुळे ती वर्तमानाला पक्की धरुन रहाते.या घटना कुठेही मुद्दाम आणल्यासारख्या वाटत नाहीत.कादंबरीतल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्याचा या घटना एक भाग आहेत.

व्यक्तिरेखांपैकी काही तत्त्वांना घट्ट धरुन चालणारे,काही तत्त्वाची कास सोडून रस्त्यावरुन भरकटलेले.वेगवेगळ्या पार्श्वभूमी,व्यवसायातल्या वृत्ती-प्रवृत्ती आणि विकृतींचे रेखाटन यात आहे. प्रतिभावंतांनाही दैनंदिन व्यवहारात कराव्या लागलेल्या तडजोडी,तत्त्वांशी, मूल्यांशी फ़ारकत घेताना होणारी त्यांची फरपट,बौद्धिक ताणतणाव,निर्ममता धक्का पोचवते.

स्ट्रगलर प्रकाशच्या आध्यात्मिक,सेलेब्रिटी चित्रकार प्रकाशानंदापर्यंतचा सुमित्रादेवींच्या साहाय्याने झालेल्या प्रवासातून नवोदित कलाकाराचे ताण,शोषण, क्रिटिक्सचा व्यावसायिकपणा,मागणी म्हणून अमूर्त चित्रं काढणं,नामांकित व्हायचं तर मिडियाची गरज आणि तुम्ही नामांकित असल्याशिवाय मिडिया तुमच्याकडे बघणार नाही या चक्राला भेद देण्याकरता चाललेले प्रयत्न,त्यातून घडून येणार्‍या विपरित गोष्टी सामोर्‍या येतात.

अशेष अनिमाच्या आईवडिलांची कथा ही एका परिने स्वातंत्र्योत्तर पिढीचे प्रतिनिधित्व करते.ध्येयवादाने भारुन गेलेल्या पतीच्या बेपर्वा,अव्यावहारिक वागण्याचे चटके सोसणार्‍या सिंधूताई,त्यांना समजून न घेणारा अण्णांचा एरवी नि:स्वार्थी,सामाजिक चळवळींमधे रमणारा स्वभाव,त्यांच्या गायब होण्यामागचे गूढ,उपेक्षित, वयस्कर सिंधूताईंनी सूडाच्या भावनेतून डॉ. भास्करसोबत प्रस्थापित केलेले अनैसर्गिक प्रेमसंबंध..नाती आणि नात्यांमधले समजून घेणे किती सापेक्ष असते हे मोठ्या करुणपणे आपल्याला समजावून जातात.

बच्चूकाकांची सामाजिक चळवळीचे अपयश,खंत पेलणारी व्यक्तिरेखा आणि डॉ. भास्करची हिंदू दहशतवादाच्या दिशेने झालेला प्रवास दाखवणारी व्यक्तिरेखा परस्पर विरोधी तरीही आपल्या जागी खर्‍या.अलिप्त,तटस्थ शैलीतून लेखिका त्यांच्या जगण्याच्या छटांना अनेक परिमाणे देत ठळक करत जाते.

अशेष,हरिदास किंवा फ़िरोझच्या व्यक्तिरेखेतून आजच्या चित्रकारासमोरील आव्हाने,त्याचे विचार आपल्याला समजून घेता येतात.चित्रनिर्मितीची एक सुरेख प्रोसेस या निमित्ताने अनुभवायला मिळते.विशिष्ट रंगाचं चित्रकाराच्या मनावरचं ऑब्सेशन कुठून येतं (अशेषचं काळ्या रंगात अडकून जाणं),कलावंताच्या नेणीवेत काय चालतं, कधीतरी काहीतरी अनुभवलेलं वर येत असताना येणार्‍या सृजनाच्या कळा,अशेषला आपल्या थरथरत्या हाताची वाटलेली भिती जी त्याच्या मनाच्या कमकुवतपणातून वर आलेली असते,सृजनाच्या केंद्रबिंदूचा शोध घेताना होणारी तगमग,नवनिर्मितीचा क्षण पकडतानाचा आनंद-ती सारीच प्रक्रिया फ़ार लोभसपणे येते.

फ़िरोझने चितारलेल्या महाभारतातील चित्रमालिकेमधल्या ’संहार’ चित्रावर जमाव हल्ला करतो.चित्राची नासधूस करतो.अनिमाचा अप्रत्यक्षपणे त्या चित्राच्या निर्मितीमधे सहभाग असतो.हिंसे़चं एक आवर्तन पूर्ण होतं.तिथेच कादंबरी संपते.

कादंबरी कोणत्याही शैलीत,फ़ॉर्ममधे अडकलेली नाही.अनौपचारिक,मोकळं असं हे लिखाण आहे.म्हणूनच वर्तमानाशी सर्वात जास्त जोडलेलं रहातं.भाषा लालित्याच्या सोसात अडकलेली नाही,पत्रकारितेतली स्पष्ट,ओघवती,वैचारिक शैली लिखाणाला आहे पण ती कुठेही कोरडी होत नाही.लेखिकेने पत्रकार म्हणून वावरताना पाहिलेल्या,अनुभवलेल्या वेगळ्या वास्तवाचा हा सृजनशीलपट आहे.त्यातल्या व्यक्तित्वांच्या,आयुष्यांच्या अपरिमित छटा आपल्याला स्तिमित करतात.भाषेमधला उपरोध आवश्यक तिथे व्यक्त होतो,मेलोड्रामा नसलेली संयत,अभिजात मांडणी हे या कादंबरीचे मोठे वैशिष्ट्य.

भाषेची ललित वळणं नजाकतीने आणि सहजतेनं येतात.याचे उत्कृष्ट उदाहरण चित्रकार अशेषचे काळ्या रंगाशी जुळत गेलेले नाते,त्याला गवसत गेलेला काळ्या रंगाचा अंतरात्मा आणि मग त्या काळ्या रंगातच त्याचे अडकून पडणे,त्यातून सुटण्याची त्याची धडपड किंवा शारदेच्या मनातील "काळ पाहिला रे सख्या..."या नव्या बंदिशीचा जन्माची घटना.
जानकी अशेषला त्याच्या काळ्या रंगाच्या ऑब्सेशनबद्दल विचारत असते तेव्हा तो सांगतो- "काळ्याचं शरीर डोळ्यांना सुखावत नाही,इतर कोणत्या ज्ञानेंद्रियाला ते चाळवत नाही,भावनांशी खेळत नाही,तो वेश्याव्यवसाय कधीच करत नाही,तो केवळ आणि केवळ बुद्धीचा हस्तक असतो.काळ्या रंगाचा आदर ही रंगाची मागणीच आहे.तिथं तडजोडीला जागा नाही.काळा हा रंगही आहे आणि शब्दही आहे.'ब्लॅक’चा उच्चार कडी बंद केल्यासारखा निर्वाणीचा आहे.काळ्याच्या उच्चारात मोकळेपणा आहे.त्याच्या शेवटी ‘आ’कार आहे म्हणून. काळ्यात आणखी एक प्रभावी अक्षर आहे.‘ळ’. ‘ळ’चे दोन गोलाकार,मांसल.पहिल्यातून दुसर्‍यात.दुसर्‍यातून पहिल्यात.गिरवत बसलात तर ’ळ’ कधी संपणारच नाही”. पु.शिं.ची ‘पुष्कळा’ आठवते.

जानकी पाटीलच्या कलासमिक्षणांचे लेख,मुलाखती,बातम्या वगैरे कादंबरीत जशाच्या तशा छापल्या आहेत ते परिणामकारक आणि वेगळं वाटतं.तिचं कलावंताच्या सृजनापर्यंत पोहोचू पहाणं,कलाविश्वातल्या घडामोडींचं, संक्रमणाचं छान भाष्य त्यातून येतं.

कादंबरीतलं जग कलावंतांच्या वृत्ती-प्रवृत्तींचं सूक्ष्म आणि सखोल दर्शन घडवतं.कलावंतांचे यातले विश्व त्यांच्या वैयक्तिक परिघातून विस्तारत जाते.मनस्वी कलावंताचे आपल्या ध्येयांबद्दलचे,कलेबद्दलचे दृष्टीकोन,त्यांचे गुंतागुंतीचे संबंध,कलावंत आणि माणूस या दोन स्तरांवर आयुष्य जगताना होणारी मानसिक ओढाताण,त्यांचे दांभिक,बेगडी,मुखवट्यांमागचे खरेखुरे चेहरेही प्रकाशमान होत जातात.

कादंबरीची काही वैशिष्ट्य किंवा वेगळेपणा सांगायलाच हवीत अशी- कलाक्षेत्रातल्या वादविषयांची सविस्तर चर्चा कादंबरीत आहे.प्रोग्रेसिव्ह कला चळवळीतल्या कलाकारांचा भारतीय कलेवर पडलेला चांगला-वाईट प्रभाव,कलेमधलं सौंदर्याचं स्थान,फेक आर्ट,कला आणि समाज यातलं नातं,कलाव्यवहारात अधिकाधिक जोमाने प्रवेश करत असलेला कलाव्यापार कलेच्या वृद्धीसाठी चांगला की वाईट,भारतीय कलेत भारतीयपणा किती शिल्लक आहे,तो टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा की गरज नाही वगैरेंबद्दल चित्रकारांची मतं,विचार त्यांच्या भाषेत सविस्तरपणे दिले आहेत.
वेगवेगळ्य़ा प्रवाहाच्या चित्रकारांची परस्परांच्या शैलीवरची टीका,समर्थनं, आजच्या इन्स्टॉलेशन,व्हिडिओआर्टच्या कलाकारांची भाष्य, पारंपारिक कलेच्या स्वरुपाला त्यामुळे गेलेला छेद,कलाकाराचे उत्तरदायित्व काय असते यावरचे भाष्य परिणामकारक आहे.
शांता गोखलेंसारख्या या क्षेत्रातल्या मान्यवर,अनुभवी आर्टक्रिटिकचे विचार त्यानिमित्ताने व्यक्तिरेखांच्या तोंडून ऐकायला मिळतात जे नक्कीच विचार करायला लावतात.
उदा.अशेष एका चर्चासत्रात कलेच्या उत्तरदायित्वाविषयी म्हणतो-" त्याच्या मुळाशी एक साधी पण कठीण प्रक्रिया आहे.‘आपुला संवाद आपुल्याशी’ ह्या वचनात ती सामावलेली आहे.जेव्हा आपला संवाद बाजारपेठेशी होऊ लागतो,आणि बाजारी यशासाठी आपण आपलंच अनुकरण करत राहतो,तेव्हा आपण आपलं उत्तरदायित्व नाकारत आहोत असं समजावं.ही स्थिती कोणाही कलाकाराच्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते.ती ओळखून पुन्हा एकदा स्वत:ला ढवळून काढून प्रश्न विचारायची तयारी असावी लागते.."
लेखिकेची या सार्‍याकडे बघण्याची एक ठाम दृष्टी आहे,एक जाणीवपूर्वक घेतलेला दृष्टीकोन आहे हे जाणवते.
व्यक्तिरेखा सुट्ट्या आहेत आणि त्यांचे तसेच असणे अपेक्षित आहे.कलावंताचा अलिप्ततावाद यातून सामोरा येतो.कलावंतांचं स्वतंत्र बेटांप्रमाणे स्वमग्न जगणे,दुसर्‍या कलावंताच्या निर्मितीकळांची वेदना, आनंदाची जाणीव नाही,व्यक्तींचे तुटलेपण, स्वतंत्र तुकडेच शेवटी सारे.कलाव्यवहारांच्या,मैत्रीच्या समान धाग्याने यातल्या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या असल्या तरीही प्रत्येकाचा अवकाश स्वतंत्रच.प्रत्येकाच्या आयुष्याची रेषा स्वतंत्र.काही समांतर,काही परस्परांना छेदून जाणार्‍या,काही वेड्यावाकड्या गुंतलेल्या..तरीही स्वतंत्र.

कलाकार व सामान्य माणूस यांच्यामधलं आणि कलाकारामधल्या सामान्य माणसाचं नातं,वर्तमान जगण्यातले अनुभव, तणाव,आस्था,समज,समाजातल्या विविध घटकांची मानसिकता जाणून घेण्याच्या धडपडीत येत जाणारी उमज कादंबरीत उमटली आहेच पण त्याही पलीकडे काहीतरी यात आहे.कलावंताच्या मनाच्या अगदी आतल्या पदरातले सृजनाचे कल्लोळ लेखिका ताकदीने मांडू शकली.रंगरेषांच्या निर्मितीमधली संवेदना आपल्यापर्यंत पोचवू शकली.कलावंताच्या निर्मितीप्रेरणेची प्रक्रिया तपासण्याचा हा प्रयत्न मला वेगळा,महत्वाचा आणि नवीन वाटला.
गतिमान,अनंत अशा कालप्रवाहाची आणि कलाप्रवाहाची जाणीव करुन देणारी ही कादंबरी.

कादंबरी वाचल्यावर एखादा कलात्मक सिनेमा बघून झाल्यासारखं वाटतं.दृश्यकलांचा,कलाकारांच्या जगण्याच्या आतल्या परिघाचा,त्यांच्या सृजनाच्या निर्मितीक्षणांचा,तणावांचा,अगदी हेव्यादाव्यांचाही इतका प्रत्ययकारी,शब्दांच्या माध्यमातून श्रुती,दृष्टी संवेदनांनाही जागवणारा,नवीन,समकालीन लिखाण वाचल्याचा अनुभव मला आधी कधीही आला नव्हता.

--
त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये