Wednesday, November 24, 2010

चायना पोस्ट-तीन (श्यूच्या घरी.पीच फार्मवर)

या आठवड्यात मधे एक चिनी सण होता.ड्रॅगन फेस्टीवल.सुझन म्हणजे श्यूचा एसेमेस आला की ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे.तुला यायचय कां?मी एका पायावर तयार झाले.
श्यूचे वडिल होंगियानपासून जरा लांब लिन हाय नावाच्या शहराजवळ रहात होते.त्यांच्या पीचच्या बागा होत्या.ताज्या,तयार पीचची नुकतीच तोडणी झाली होती.श्यूच्या आईचा आग्रह होता की पीच खायला श्यूने घरी यायलाच हवय.
श्यू आणि मी त्या दिवशीच्या शॉपिंगनंतर खूप भटकलो होतो.चायनिज ब्यूटी सलूनमधे,सुपरमार्केटमधे,बागेत वगैरे अनेक ठिकाणी.इंग्लिश आणि चायनिज बोलू शकणारी श्यू सारखी लोकल मुलगी बरोबर असल्याने मला खूप निर्धास्त वाटायचं.शिवाय ती बार्गेनही मस्त करायची.एका कन्फ्युशियस टेम्पलबाहेर असणार्‍या जेडच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून मला हवी असणारी जेडची बांगडी तिने त्या दुकानदाराने आठशे युआन किंमत सांगितल्यावर बराच चिनी कलकलाट करुन तिने मला ती शंभर युआनला मिळवून दिल्यापासून माझा तिच्याबद्दलचा आदर फारच वाढला होता.श्यूजवळ भयंकर पेशन्सही होता.माझ्या निरुद्देश भटकत रहाण्याचा,चालताना असंख्य अडाणी,बारिकसारिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा,सारखं थांबून काही ना काही गोष्टींचे फोटो काढण्याच्या टिपिकल टुरिस्टी उत्साहाचा तिला कधी कंटाळा येत नाही.
श्यूच्या घरी जाण्यासाठी आम्ही भल्या सकाळी सहा वाजता होंगियानच्या बसस्टेशनवर गेलो.बसस्टेशन चकचकीत आणि एअरपोर्टसारखं सजलेलं.सुरक्षाव्यवस्था सुद्धा तशीच.सामानाचं स्कॅनिंग,चेकइन अगदी साग्रसंगीत.काडीवर आईसफ्रूटसारखे लांबट लालसर मासाचे तुकडे लावून ते विकायला अनेक जण येत होते.
श्यूने आम्ही गेल्यावेळी घेतलेला ड्रेस घातला होता.खरं तर हा पार्टीफ्रॉक.त्यामुळे बरंच अंग उघडं टाकणारा आणि अगदी तोकडा.श्यूला छान दिसत होता पण तरी बसप्रवासाच्या दृष्टीने अगदि अयोग्य असं मला वाटून गेलं.पण ती बिनधास्त होती.इथे जनरलीच अत्यंत शॉर्ट ड्रेसेस घालायची फॅशन आहे.मात्र रस्त्यांवर,बसमधे किंवा कुठेही कधिच इव्हटिझिंगचा त्रास नसतो.चीनमधे रात्रीबेरात्रीही मुली बिनधास्त एकेकट्या फिरु शकतात.अतिशय सेफ आहे त्यादृष्टीने संपूर्ण चायना.
या बसचा पाऊण तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही लिनहाय शहरात पोचलो.तिथून एक दुसरी बस घेतली.त्यातून अर्धा तास प्रवास.आता डोंगराळ,खेड्यांमधून प्रवास सुरु झाला.हवा कमालीची गार झाली.एका अगदी साध्या,धुळीने भरलेल्या खडबडीत रस्त्यावरच्या स्टॉपवर आम्ही उतरलो.श्यूचं गाव अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.पण आम्ही इथे उतरलो कारण इथे भाज्यांच मार्केट आहे.मी शाकाहारी असल्याने श्यू माझ्यासाठी भाज्या,टोफू वगैरे घेऊन घरी जाणार आहे.तिच्या गावात ताज्या भाज्या रोज येत नाहीत.
भाज्या आणि मास इथे शेजारी शेजारीच हारीने लावून ठेवलेलं होतं.आख्खे सोलून ठेवलेले विविध आकारांचे अगम्य प्राणी,अ‍ॅल्युमिनियमच्या टोपांमधले समुद्री जीव,प्लास्टीकवर मांडून ठेवलेले रांगते,सरपटते जीव यांच्यामधून मी जीव मुठीत धरुन कशीतरी भाज्यांच्या एका स्टॉलवर श्यूचा हात धरुन पोचले.चिनी भाजीवाले आणि वाल्या प्रचंड कुतूहलाने माझ्या भारतीय अवताराकडे पहात होत्या.इंदू इंदू करत मधूनच हाका मारत खुदूखुदू हसत होत्या.स्टॉलवर बांबूचे कोंब,चायनिज कॅबेज,गाजरे,फरसबी,समुद्र वनस्पती,सोयाबिनच्या हिरव्या शेंगा,ताजे टोफूचे स्लॅब्स,टोमॅटो,मश्रूम्स यांचे जीव हरखवून टाकणारे ताजे,टवटवीत ढीग होते.श्यूने प्रत्येकातलं थोडं थोडं घेतलं.
मग जवळच्या टपरीवरुन कोकचा मोठा चार लिटरचा कॅन घेतला आणि आम्ही एका सायकल रिक्षात बसलो.अगदी डगमगती सायकलरिक्षा.ओढणारा चिनी दणकट बांध्याचा.या सगळ्या सायकलरिक्षा चालवणार्‍यांची कपड्यांची स्टाईल अगदी एकसारखी.गुडघ्यापर्यंत पोचणार्‍या अर्ध्या चड्ड्या आणि अर्ध्या बाह्यांचा रंगित शर्ट पोटावरुन गुंडाळत छातीपर्यंत दुमडून घेतलेला.बरेचसे चिनी दुकानदार,रस्त्यावरचे विक्रेते वगैरे हे असे पोटं उघडी टाकून फ़िरत असताना इतकी विचित्र दिसतात.
श्यूच्या गावात पोचेपर्यंत तो सायकलरिक्षावाला मागे वळून अखंड बडबडत होता.श्यू मधून मधून त्याचं बोलणं अनुवाद करत मला सांगत होती.यावर्षी पाउस जास्त झाला त्यामुळे पीचच्या फ़ळांचं नुकसान झालं आहे.फ़ळांच्या साली काळ्या पडल्या त्यामुळे भाव कमी आला.नुकसान झालं.सरकारी मदत मिळाली तरच निभाव लागणार यावर्षी वगैरे.मला एकदम मी नाशिकजवळच्या द्राक्षांच्या मळेवाल्यांची गार्‍हाणी ऐकतेय असा भास झाला.
लिनहाय आणि आजूबाजूचा हा सारा भाग पीचच्या बागांसाठी प्रसिद्ध.बहुतेकांच्या बागा आहेत.उरलेले सारे तोडणीच्या कामाचे मजूर.गाव बर्‍यापैकी गरीब.रस्ते मातीचे.पण आजूबाजूला कमालीची स्वच्छता.कुठेही कचराकुंड्यांमधून बाहेर वहाणारा कचरा नाही,प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे नाही की गावातला टिपिकल बकालपणा नाही.चीनमधे आपल्याकडे असतात तशाच प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर आहे.पण त्या पिशव्यांचा कचरा किंवा प्रदुषण दिसलं नाही.एकंदरीतच चीनमधे कचरा समस्या कशी हाताळतात हा एक स्वतंत्र,इंटरेस्टींग विषय आहे.बिजिंगसारख्या मोठ्या शहरात कित्येक टन कचरा उचलण्याचा बॅकलॉग रोज शिल्लक रहातो अशा तर्‍हेच्या बातम्या चीनी सीसीटीव्ही या(एकमेव)चॅनेलवरुन कानावर पडायच्या.पण इतर मध्यम,लहान आकारांच्या शहरांमधे चिनी रोजच्यारोज प्रचंड संख्येने कचरा पैदा करत असतात.स्टायरोफ़ोमचे डिस्पोजेबल कप,प्लेट्स,पॅकिंग मटेरियल,प्लास्टिकच्या बाटल्या,चॉपस्टिक्स,खाण्यापिण्याचे ऑरगॅनिक वेस्ट यांचे ढिगारेच्या ढिगारे रात्री उशिरा दुकाने बंद आणि रस्त्याकडेची रेस्टॉरन्ट्स बंद झाल्यावर फ़ूटपाथच्या कडेला गार्बेज बॅग्जमधे भरुन लावून ठेवलेले असतात.ओला-सुका, रिसायकलिंगसाठीचा वगैरे कचर्‍याचं वर्गिकरण वगैरे काहीही केलेलं नसतं.मग त्याची विल्हेवाट नेमकी कशी लावतात हे जाणून घेणं इंटरेस्टींग आहे शहर व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून.पण ते नंतर.
लिनहायमधे घरं दगडांनी बांधलेली.काहींना बाहेरुन गिलावाही दिलेला नाही.


एका पायवाटेवरुन बरच आत चालत गेल्यावर श्यूचं घर आलं.घराला बाहेर मोठा दरवाजा आणि आत एक रिकामा मोठा हॉल.त्यात पीचतोडणीला लागणा-या बांबूच्या टोपल्या,मोठ्या कात्र्या,आणि इतर अवजारे,टोपल्या वगैरे भिंतीला अडकवून,टेकवून ठेवलेले.तीनचार सायकली आणि एक लाकडी बसायचा बाक.चिनी सिनेमांमधल्या शेतकरी चिनीलोकांच्या डोक्यांवर ह्मखास दिसणार्‍या त्या टिपिकल बांबूच्या कामट्यांच्या विणलेल्या मोठ्या कडांच्या हॅट्सही टांगलेल्या.
भिंतीवर चेअरमन माओचा फ़ोटो.एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअर.त्यावर चाललेला चिनी सिनेमा श्यूची मावशी आणि म्हातारी आजी टक लावून पहात बसलेल्या.श्यूची आई बाहेर गेली होती ती नंतर आली.श्यूचे वडिल.त्यांच नाव सॉंग.अगदी गरीब,लाजाळू स्वभावाचे,डोळ्याच्या कडांना सुरकुत्या पाडत हसणारे,घोट्याच्या वर दुमडलेल्या ढगळ पॅन्ट घातलेले मध्यमवयिन शेतकरी गृहस्थ.श्यू आपल्या आईवडिलांबद्दल बसमधून येताना खूप काही आदराने सांगत होती.अगदी अभावग्रस्त परिस्थितीत श्यू आणि तिच्या बहिणीला त्यांनी मोठं केलं,शिक्षण दिलं,कर्ज झालं तरी मुलींना काही कमी पडू दिलं नाही.साँग कुटुंबिय आणि लिनहाय गाव पर्ल बकच्या कादंबरीतून उचलून आणल्यासारखं वाटायला लागलय मला एकंदरीत.

श्यूच्या बाबांनी कोकचे ग्लास भरुन बाहेर आणले आणि आम्ही स्थिरस्थावर होतोय इतक्यात वीज गेली.टिव्ही बंद झाला.श्यूची आजी दु:खाने काहीतरी पुटपुटली आणि बाहेर निघून गेली.आता संध्याकाळपर्यंत पॉवर येणार नाही.श्यू म्हणाली.चीनच्या मोठ्या शहरांमधे जरी वीजेचा झगमगाट असला तरी उर्वरीत चीनमधे,विशेषत:अशा गावांमधे वीजेचा तुटवडा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अजूनही आहे.बिजिंग ऑलिम्पिकनंतर तर पॉवरकटचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे.सहा सात तास वीज जाणं हे नेहमीचंच आहे असं श्यू म्हणाली.
श्यूची मावशी हॉलच्या मागे असलेल्या स्वयंपाकघरात गेली आणि श्यू आणि मी बाकी घर बघायला जिन्यावरुन चढून वर गेलो.वर तीन बेडरुम्स आणि टॉयलेट.ते मात्र चकचकीत,पाश्चात्य पद्धतीचे.चीनमधे गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक केलेल्या सुधारणांमधे ही एक म्हणजे पाश्चात्य टॉयलेट्स सर्वत्र,सार्वजनिक ठिकाणांवर सुद्धा अतिशय स्वच्छतेने मेन्टेन केलेली.काही ठिकाणी पौर्वात्य पद्धतीची म्हणजे भारतात असतात तशी टॉयलेट्स अजूनही आहेत पण त्यांचं प्रमाण जवळपास नाहीच.खेड्यांमधे सुद्धा स्वच्छता दिसण्याचं कारण हेही एक.

घराच्या मागे छोट्या पॅचमधे चिनी हर्ब्जचं गार्डन.आपल्याकडच्या तुळशींसारखी रोपटी.कोरफ़ड आणि एक विशिष्ट गुलाबी छटेची लहान फ़ुलं येणारी रोपं.चिनी लोकं अजूनही पारंपारिक चिनी वैद्यकाला खूप मानतात.चिनी हर्ब्ज,फ़ुलं घातलेलं गरम पाणी दिवसभर कधीही पितात.हिरव्या पानांचा चहा पिणं पूर्वीपासून प्रतिष्ठित लोकांमधेच जास्त प्रचलित.सामान्य,गरिब चिनी जनतेला ग्रीन टी परवडत नाही.हर्ब्ज,सुकवलेली मोग-याची,जिरॅनियमची फ़ुलं घातलेल्या गरम पाण्यालाही ते चहाच म्हणतात.चिनी भाषेतला चहाचा उच्चार आपल्या चाय च्या जवळचा.
श्यूची मावशी मला काहीतरी हातवारे करुन विचारत होती.मला काही केल्या कळेना.श्यू आसपास नव्हती.इतक्यात श्यूची लहान मावसबहिण शाळेतून आली.तेरा चौदा वर्षांची.तिने उत्साहाने दप्तरातून इंग्रजीचं पाठ्यपुस्तक काढलं.तिला इंग्रजी वाचता येत होतं पण बोलता येत नव्हतं.सराव नाही म्हणून.पुस्तकातल्या इंग्रजी शब्दांवर बोट टेकवत तिने मावशीचं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं.मावशी म्हणत होती तिला चिनी पद्धतीचा ब्रेड करता येतो तो मला चालेल कां?आणि आज सण होता त्यासाठी काही गोड बनवलं तर मी खाइन कां?शाकाहारी असेल तर मला काहीही चालण्यासारखं होतच.
मावशीने पांढर्‍या पिठाचे गोळे फ़्रीजमधून काढले.लाकडी ओट्यावर एक खोलगट वोक आतमधे बसवला होता.दुसर्‍या बाजूला जरासा उथळ तवा बसवलेला होता.लाकडी ओट्यामागे चुलीला असते तशी आत लाकडं टाकून पेटवायची सोय होती.गॅसचं सिलिंडर होतं पण ते महाग पडतं त्यामुळे रोजचा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवरच होतो असं श्यूने सांगितलं.मावशीने उथळ तव्यावर झाकण ठेवून पांढर्‍या पिठाचे गोळे भाजत ठेवले.आणि भाज्या चिरायला लागली.तिचं सटासट बारिक तुकडे करत भाज्या चिरण्याचं कौशल्य बघण्यासारखं होतं.


भाज्या चिरुन होईपर्यंत श्यूची आई आली.हसरी,गोड आणि जेमतेम पंचविशीची वाटेल अशी.भाषा येत नव्हती त्यामुळे माझ्या खांद्यांवर हात टेकवून,हसून बघत तिनं बिनभाषेचं उबदार स्वागत करत मला स्वयंपाकघरातच ये असं खुणावलं.
त्यानंतरच्या अर्ध्या तासात मला चिनी पाककला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना पहायला मिळाला.एकामागून एक चिनी भाज्या,नूडल्स,टोफ़ू,भाताचे प्रकार श्यूची आई इतक्या झटपट बनवत होती आणि सगळं त्या एकाच खोलगट वोकमधे.नुसतं थोडं तेल टाकून त्यावर आलं,लसणाचे काप टाकून कधी गजर-मटार-सिमला मिरची,कधी समुद्र वनस्पती,कधी टोफ़ू-टोमॆटो,चायनिज कोबी-बटाटे असं सगळं एका मागून एक परतत ती डिशेस भरत होती.काही भाज्यांवर घरगुती राईस वाईनचा शिपकारा मारुन स्मोकी चव आणत होती.बाजूच्या शेगडीवर एका वाडग्यात खास चिनी जातीचा बुटका तांदूळ रटरटत होता.त्यात घरगुती गुळ घालून त्याचा खिरीसारखा पदार्थ बनवला होता.सणासाठी त्रिकोणी सामोश्यासारखे मोमो बनवून त्यात समुद्र वनस्पती-शैवालांपासून बनवलेले सारण भरले होते.हे मोमो समुद्रात अर्पण करतात ड्रॅगन फ़ेस्टीवलच्या दिवशी.या सणामागची कथा इंटरेस्टींग होती.
फ़ार प्राचीन काळी म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्य आजच्यासारखे मलूल नव्हते,तेजस्वी होते आणि लोक दयाळू होते तेव्हा एका गावात एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन प्रेमी रहात होते.समुद्रात जाऊन मासे मारुन आणताना एकदा एक अजस्त्र राक्षसी लाट गावावर चाल करुन येताना त्यांनी पाहिली.गावाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रॅगन देवाचा धावा केला.ड्रॅगनने त्यांना पाठीवर बसायला सांगितले आणि मग ते त्या लाटेचा मुकाबला करायला समुद्रात शिरले.ड्रॅगनने त्या लाटेला अडवायचा खूप प्रयत्न केला.लाट मागे गेली पण ते दोघे प्रेमी समुद्रात बुडाले.गावकर्‍यांनी त्यांना खूप शोधलं पण त्यांची प्रेत मिळाली नाहीत.त्यांचा समज आहे की ड्रॅगनच्या आशीर्वादामुळे ते दोघे जिवंतच आहेत समुद्रात म्हणून त्यांना या दिवशी हे गोड जेवण समुद्रात अर्पण करुन देतात.मोमोमधे भरायचे सारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असते.
श्यूच्याआईने त्यादिवशी तब्बल चौदा भाज्यांचे प्रकार,तांदूळाचीखीर,चिनी ब्रेड,मोमो,नूडल्स,पीचचा मुरंबा,ताजी फळे असे भरगच्च प्रकार बनवून जेवायचे टेबल भरुन टाकले.अत्यंत चवदार.त्यानंतर बिजिंग,शांघाय,होंगझो वगैरे ठिकाणी खास चिनी शाकाहारी पदार्थ मोठमोठ्या हॉटेल्समधून शेफ़ला सूचना देऊन बनवून घेतलेले सुद्धा खायला मिळाले.पण या प्रेमळ चिनी कुटुंबातील घरगुती आदरातिथ्यात ज्या अप्रतिम चिनी जेवणाचा अनुभव घेतला तो केवळ अशक्य.जेवताना श्यूच्या वडिलांनी घरगुती वाईनने बशा भरल्या.चिनी कुटुंबात मुली,बायकांनी बिअर पिणे उथळपणाचे लक्षण मानतात.पण वाइन प्यायलेली चालते.नव्हे तसा आग्रहच असतो.फ़क्त ती वाईन घरी बनवलेलीच हवी.आम्ही प्यायली ती वाईन यामे आणि प्लम या दोन फ़ळांच्या आणि तांदळाच्या मिश्रणातून बनवल्याची माहिती श्यूने दिली.
जेवणानंतर आमचा फ़ोटोंचा कार्यक्रम झाला.श्यूच्या आईला फ़ोटो काढून घ्यायचा खूप उत्साह होता आणि वडिल लाजत होते.

आमची जायची वेळ झाली तेव्हा आम्हाला पोचवायला बस्टस्टॉपपर्यंत सारं कुटुंब आलं.श्यूच्या वडिलांच्या खांद्यावर एक मोठी पेटी आणि हातात एक करंडी होती.ओझं खूपच जड वाटत होतं म्हणून मी कुतूहलाने चौकशी केली.श्यू हसली आणि काही बोलली नाही.बसस्टॉपवर उभी असलेली तमाम चिनी मंडळी माझ्या भोवती गोळा झाली.’नी हाव’म्हणजे चिनी हाय हॅलोचा कलकलाट झाला.माझ्या गालांना काही चिनी काकूंनी हात लावला.मी फ़ोटो काढायला गेले तेव्हा सगळे ओळीत उभे राहिले.मला त्यांचा उत्साह,कुतूहल मजेशिर वाटले.श्यू म्हणली आमच्या खेड्यात येणारी तु पहिलीच भारतीय.म्हणून सगळे खुश आहेत.मी सुद्धा हे ऐकून खूशच झाले.
बस आली तेव्हा लगबगीने श्यूच्या वडिलांनी हातातला खोका आणि करंडी आमच्या पायाशी रचून ठेवले आणि तेही बाजूच्या सीटवर बसले.पुढच्या बसस्टॉपवर पुन्हा त्यांनी ते सामान उचलले आणि आमच्या दुसर्‍या बसमधे ठेवले.श्यूला काही सूचना दिल्या आणि ते उतरले.
होंगियान स्टेशनवर तो जड खोका आणि करंडी उचलून टॅक्सीत ठेवताना आमच्या नाकीनऊ आले.त्यात झिमझिम पाऊस सुरू झाला.टॅक्सीत बसल्यावर मी वैतागतच श्यूला विचारले काय इतकं घेऊन घरी चालली आहेस?श्यू म्हणाली हे तुझं सामान आहे.माझं नाही.मी थक्क.म्हटलं आहे काय यात?पीच.आणि प्लम.मी अवाक.
इतके?हो.पीच एकुण नव्वद आहेत आणि प्लम पन्नास.आणि वडिल म्हणाले एका आठवड्यात संपवायला लागतील.
नव्वद पीच आणि पन्नास प्लम.जेवणाच्या टेबलावरच्या चौदा भाज्या.चिनी आदरतिथ्याने थकून जात मी टॅक्सीच्या सिटवर मान टेकवून झोपी गेले.
---------------------------------
होंगियानमधे परतलो तेव्हा काळोख गडद झाला होता.जॉगर्स पार्कमधे चिनी मुली संगिताच्या तालावर मोहक नाचत होत्या.अतिशय तालबद्ध आणि सिन्क्रोनाईज्ड हातापायांच्या हालचाली.बागेमागच्या नदीत काहीजण गळ टाकून मासेमारी करत बसले होते.मध्यमवयीन चिनि पुरुष तायकान्डोचे व्यायाम करत होते.चिनी आज्या सफ़रचंदी गालांच्या नातवंडांना फ़िरवत होत्या.पाण्याच्या काठावरच्या दिव्यांचा झगमगाट नदीवर पसरला होता.
नदीच्या दुसर्‍या तीरावर मोठमोठी सरकारी चिनी होर्डिंग्ज होती.त्यापलीकडचे काहीही दिसत नव्हते इतक्या जवळजवळ आणि उंच होर्डिंग्ज.शहरांबाहेरच्या हायवेच्या किंवा फ़्लायओव्हरच्याही एका बाजूला अशीच उंचच उंच साउंड बॅरिकेड्स आणि होर्डिंग्ज असतात.पलिकडचं काही दिसूनच नये याची दक्षता घेत उभारल्यासारखी.
नदीपलीकडच्या तीरावरच्या या होर्डिंग्जमागे जुनं होंगियान शहर आहे.
तिथे काय आहे?ते असं लपवलं कां आहे?तिथे असाच झगमगाट आहे की वीजतुटवडा आहे?स्वच्छता आहे की कचर्‍याचे इथून उचललेले ढीग तिथे विल्हेवाटीला नेऊन टाकतात?समृद्धी आहे की अभाव?
चीनमधे असे प्रश्न विचारायची मुभा नाही आणि सोयही नाही.पर्यटकांना तर नाहीच नाही.त्यांनी असे प्रश्न विचारले तरी उत्तरे मिळत नाहीत.स्थानिक लोकं इतर बाबतीत भरपूर बोलतात.चिनी प्रगतीबद्दल बोलताना त्यांचं तोंड थकत नाही.पण त्यापलीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांना वेळ नसतो.अचानक त्यांना इंग्रजी कळेनासं होतं.
--------------------------------
परवा रविवारी जवळच्या डोंगरावर आपण सगळे ट्रेकिंगला जाऊया.तुम्ही दोघं आणि मी आणि ज्यो.खूप प्रसिद्ध आहेत इथले ट्रेकिंग रुट्स.श्यू म्हणाली.मला आवडलं असतं.पण पुढचे सलग दोन आठवडे आम्ही चिनी पर्यटनाला जाणार होतो.शांघाय,बिजिंग बघायला.चीनची भिंत,फ़ॉरबिडन सीटी,तियान्मेन स्क्वेअर,समर पॅलेस,शियांचं टेराकोटा वॉरियर वगैरे.होर्डिंग्जपलीकडची जुनी चिनी शहरं काही बघायला मिळणार नव्हती पण शतकांपूर्वीचे प्राचीन राजवाडे,भिंती,चिनी साम्राज्याचे अवशेष येत्या दोन आठवड्यांमधे दिसणार होते.ते बघायला हवेच होते.
बिजिंग शहरातल्या प्रशस्त,भव्य रस्त्यांच्या जाळ्यापलीकडे समांतर अशा जुन्या बिजिंग शहरातल्या अनेक गल्ल्या आहेत.हुटॉंग्ज नावाने त्या प्रसिद्ध आहेत.गेल्या काही दशकांतल्या,विशेषत:ऑलिम्पिकच्या काळात बिजिंगमधे झालेल्या कायापालटामधे नवं,अत्याधुनिक बिजिंग शहर वसवलं गेलं,स्कायस्क्रॅपर्सनी बिजिंगचं आकाश भरुन गेलं.पण या हुटॉंग्जमधून अजूनही पारंपारिक,जुन्या चिनी पद्धतीची घरं,संस्कृती पहायला मिळते.
अत्याधुनिक,झगमगाटी नवं बिजिंग आणि हजारो वर्षांपूर्वीची फ़ॉरबिडन सीटी अजूनही जशीच्या तशी आपल्या पोटात ठेवलेलं प्राचीन बिजिंग.यांच्या मधला एक फ़ार मोठा काळाचा तुकडा या हुटाँग्जमधे अजूनही शिल्लक आहे.सगळ्याच हुटाँग्ज होर्डींग्ज मागे आणि मॉल्सच्या लखलखाटामागे दडवून ठेवणं चिनी सरकारला जमलेलं नाहीच.
बिजिंगमधे असताना या हुटाँग्जमधून फ़ेरफ़टका मारण्याची संधी अनेकदा घेतली.त्यासगळ्या अनुभवांवर पुन्हा कधीतरी.

चायना पोस्ट-दोन

सुझन आणि चिनी बाजार

रविवारी सकाळी साडेआठलाच सुझनचा फोन आला की आपण शॉपिंगला जाऊया कां?मी एका पायावर तयार.शॉपिंगच्या निमित्ताने शहरात भटकता आले असते.
सुझन विशीतली हसरी,खेळकर चिनी मुलगी आहे.इथे जॉब करते आणि एक लहान अपार्टमेन्ट भाड्याने घेउन दोन मैत्रिणींसोबत शेअर करुन रहाते.सुझनची आणि माझी ओळख जॉगर्सपार्कमधे झाली.माझ्या नवर्‍याच्या ऑफिसात ती बरेचदा इंटरप्रिटर म्हणून यायची त्यामुळे त्याची आणि तिची ओळखही होती.
सुझनला बर्‍यापैकी इंग्रजी येतं.पण तिला शांघायला जॉब करायचाय आणि आत्ता येतय तितकं इंग्रजी तिथे पुरेसं नाही म्हणून तिला शक्यतो जास्तीतजास्त इंग्रजी बोलण्याचा सराव हवाय.प्रोफेशनल क्लासेसची फी परवडत नाही.म्हणूनही ती माझ्याशी मैत्री करत आहे असं तिने बर्‍यापैकी स्पष्टपणे सांगून टाकलं.माझी काहीच हरकत नव्हती.
होंगियान औद्योगिक शहर असल्याने इथे नोकरीच्या निमित्ताने एकट्या रहाणार्‍या खूप मुली आहेत.त्यांची एक वेगळीच दुनिया आहे.कामांचे प्रचंड तास आणि फक्त रविवारी सुट्टी असल्याने सुझनला मला भेटायला जास्त वेळ येता येत नाही पण तिचे सारखे फोन आणि एसेमेस सुरु असतात.
सुझन बरोबर वेळेवर आली.तिच्यासोबत एक मित्र होता.ज्यो.तिने ओळख करुन दिली.त्याला इंग्रजी काही बोलता येत नव्हते त्यामुळे तो फक्त सारखा डोळे अजून बारीक करत हसत होता.कॉफी पिऊन तो गेला.ज्यो आपल्याबरोबर शॉपिंगला का नाही येणार असं मी सहज सुझनला म्हणाले तर ती लगेच उत्तरली.कशाला येईल?तो काही माझा बॉयफ्रेन्ड नाही.आता यामागे काय लॉजिक मला कळलं नाही.म्हटल मित्र तर आहे ना?तर म्हणाली नाही.त्याचं लग्न झालय आणि त्याची मुलगी आणि बायको दुसर्‍या शहरात असतात.जेमतेम विशीच्या दिसणार्‍या ज्योला मुलं वगैरे आहे हा धक्काच होता.
चीनमधे असे धक्के सारखे बसतात.तिथल्या लोकांची वयच कळत नाहीत.एकतर सगळे एकजात स्लीम आणि त्वचा कमालीची नितळ.शिवाय तलम,काळ्याभोर,चमकदार केसांचं वरदानच सगळ्यांना.चिनी मुलींचे ते मोकळे ठेवलेले,सळसळीत सुंदर केस हेवा वाटायला लावणारे असतात.काही वेळा बीड्सचे रबरबॅन्ड्स किंवा पिना लावून त्या ते अनोख्या पद्धतीने मागे वळवून बांधतात.मात्र कसेही बांधले तरी कपाळावर रुळणार्‍या बटा हव्यातच.चिनी मुलींची ही लेटेस्ट फॅशन.सुझनच्या कपाळावरच्या बटाही अगदी डोळ्यांवर झुकलेल्या.
टॅक्सी न घेता आम्ही चालतच रस्त्यावरुन निघालो.आम्ही रात्री ज्या कॉफीहाऊसच्या रस्त्यावरुन फिरायचो त्याच रस्त्यावरुन थोडच पुढे जाउन सुझन एका लहानशा गल्लीतून आत वळली.चीनच्या भव्य रस्त्यांवरुन पटकन आत वळणार्‍या ह्या गल्ल्या खूप डिस्क्रिट असतात.आपल्याला तर दिसतच नाहीत.कुठल्या तरी दुकानाच्या शोकेसच्या बाजूने ही गल्ली आत वळली होती.
आत वळलो आणि एकदम बाजाराची गजबजच अंगावर आली.पाश्चात्य संस्कृतीतून एकदम पौर्वात्य संस्कृतीत पाय ठेवल्यासारखं झालं.गोंधळ,गजबजाट आणि गडबड.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने दुकाने.सेलचे कपडे बाहेर टांगलेले.रस्त्यांवरही कपड्यांचे ढीग.आपल्या फॅशनस्ट्रीट किंवा लिंकिंग रोडसारखाच प्रकार.काही चिनी वयस्कार बायका कडेला बसून घट्ट भिजवलेल्या डोशासारख्या पिठाचे तापलेल्या मोठ्या तव्यावरुन पातळ,पापुद्र्यासारखे डोसे काढत होत्या.घट्ट गोळा डायरेक्ट तव्यावरच फिरवायच्या.मग ते पातळ डोसे एकावर एक ठेवून,चार-पाच डोशांची गुंडाळी करुन विकायच्या.काही बायका खुर्च्यांवर बसून शर्टांवर नाहीतर जीन्सवर बारीक भरतकाम करत होत्या.काही कडधान्य निवडत गप्पा मारत होत्या.हातगाडीवर उकडलेली मक्याची कणसं,रताळी,बटाटे,शिंगाडे विकत होते.यामे,चेरी,सफरचंदाचे ढीग होते.
आम्ही दुकानांमागून दुकानं बघत जात होतो.सुझनला काहीच पसंत पडत नव्हतं.तिला एक छान पार्टीफ्रॉक हवा होता.आणि मॅचिंग शूज आणि बॅग.होंगझो नावाच्या दुसर्‍या शहरात त्यांच्या कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींच गेटटुगेदर होतं पुढच्या वीकेन्डला.तिच्या बजेटमधे बसणारा फ्रॉक शेवटी एकदाचा मिळाला.माझ्याकडे खूप छान कपडे नाहीयेत.फक्त जीन्स आहेत.त्यामुळे मला एकही बॉयफ्रेन्ड अजून मिळालेला नाही असं नंतर ज्यूस पिताना सुझन म्हणाली तेव्हा मला मजाच वाटली.
पण सुझन गंभीर होती.कॉलेजात असताना एकही बॉयफ्रेन्ड नसणं म्हणजे आमच्याकडे खूप हसतात सगळे.एकटं पडायला होतं. कुठे जाताना जोडीदार कोणीतरी लागतोच सोबत.म्हणून मग मी ज्यो बरोबर मैत्री ठेवलीय.सुझन सांगत होती.
म्हटल कसा हवाय तुला बॉयफ्रेन्ड?तर म्हणाली मला चीनी दिसणारी मुलं आवडत नाहीत.भारतीय सुद्धा नाही.मला लिओनार्दो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट सारखा दिसणारा बॉयफ्रेन्ड हवा आहे.म्हणूनच मला शांघायला जायचय.तिकडे खूप वेस्टर्नर्स असतात. मी पुन्हा थक्क.मला आपलं वाटलेलं सुझनला शांघायला जॉब करायचाय म्हणजे करिअर पुढे न्यायच्या दृष्टीने तिला ते महत्वाचं वाटत असणार.तर हे वेगळंच.
सुझनच्या इतर मित्रमैत्रिणींशीही नंतरच्या काळात बर्‍यापैकी ओळख झाली.सगळ्या वीस ते तेवीस वयोगटातल्या.वेगवेगळ्या लहान गावांहून होंगियानमधे नोकरीसाठी आलेल्या.स्वतंत्र, अनिर्बंध आयुष्य.पाश्चात्य संस्कृतिची कमालीची ओढ.फॅशन्स, कपडे,मेकप,ब्यूटी ट्रीटमेन्ट्स यात बराचसा पगार खर्च होतो.घरी जेवण कोणीच बनवत नव्हत्या.वेळच नसतो आणि येतही नाही.दुपारचे जेवण फॅक्टरीमधे मिळते.सकाळी इथे सगळीकडे रस्त्यावर कुठेही सहज मऊ,पेजेसारखा चिकट भात आणि त्यात भाज्या,बीफ घातलेले,किंवा सूपसारख्या पातळ पदार्थात राईसनूडल्स घालून वाडगे तयार ठेवलेले असतात.जॉबला जाताना बहुतेक तेच खाऊन जातात.बाकी इतरवेळी सूर्यफुलाच्या,कलिंगडाच्या भाजलेल्या बिया सोलून किंवा सोयाबिनचे भाजलेले दाणे खात रहायचे.स्मोकिंगचं प्रमाण प्रचंड.मुलगे-मुली दोन्हींमधे.सुझनची मैत्रिण म्हणाली स्मोकिंगमुळे वजन वाढत नाही.कमी वजन असण्याचं इतकं कमालीच ऑब्सेशन चीनी तरुणींना आहे.अक्षरश:वीतभर कंबर आणि पेन्सिलसारखी फिगर असली तरी मी जाडी दिसतेय असं म्हणणार्‍या चिनी मुली बघितल्यावर मला आपल्याकडच्या झिरो फिगर क्रेझचं आश्चर्य वाटेनासं झालं.जेवताना स्टरफ्राईड भाज्या समोर आल्या की,त्यातली फरसबीची शेंग किंवा कोबीचा तुकडा चॉपस्टिकमधे धरुन सुझन तो बाजूला ठेवलेल्या गरम पाण्याच्या ग्लासमधे बुचकळायची आणि मग तोंडात टाकायची.असं कां विचारलं तर म्हणाली.खूप तेलकट आहे.गरम पाण्यात बुडवलं की तेल निघून जातं.धन्य!.
सुझनला माझ्या नावाचा उच्चार करणं फारच अवघड जायचं.तुझं दुसरं एखादं सोपं नाव नाहीये कां असं तिने मला दोनतीनदा विचारलं.म्हटलं माझं नाही.पण तुझं नक्कीच असणार.चिनी लोकांच स्वतःच नाव वेगळं आणि बाहेरच्या लोकांसाठी इंग्लिश नाव वेगळं असतं.तर म्हणाली आहे.पण तुला सांगितलं तर तु हसशील.बर्‍याच आग्रहानंतर तिने नाव सांगितल.श्यू टिंग.खूपच क्यूट वाटलं मला हे.सुझनपेक्षा खूपच गोड.तिला म्हटलं आता मी तुला श्यू म्हणणार.
---------------------------------------------------------------

कंटीन्यूड...

चायना पोस्ट- एक

प्रवासात असतानाच एक इंटरेस्टींग ट्रॅव्हलोग लिहायची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती.म्हणजे कसं की बॅकपॅक ट्रॅव्हलिंग करताना अनेक जण पाठीवरच्या सॅकमधे लॅपटॉप घेऊन फिरतात आणि आज काय पाहिलं,काय खाल्लं,कोण भेटलं याबद्दल आपल्या ब्लॉगवर टाकतात.वगैरे वगैरे..वाचणार्‍यांच्या पेशन्सची फारशी फिकीर न करता लिहिलेले असे ट्रॅव्हलोग आधी इतके उगीचच वाचून झाले होते की आता निदान सूड म्हणून तरी इतरांना असलं वाचायला लावायचंच असाही एक खुनशी विचार यामागे असू शकत होता.)
ते असो.
पण या आधी अशा संधी आल्या तेव्हा प्रवासात एकतर लॅपटॉपचे ओझे वहायचे,संध्याकाळी थकून आल्यावर कंटाळा झटकून लिहित बसायचे हे काही जमलेलं नव्हतं.चीनमधे ते जमायला अजिबातच हरकत नव्हती.मोकळा वेळ हाताशी होता आणि हवं तसं भटकायलाही मिळणार होतं.अगदी रोज ट्रॅव्हलोग लिहिता आला असता.ब्लॉगवर रोज एक पोस्ट:पण हाय रे दैवा..देशात येऊन पर्यटकांना मुक्तपणे भटकायची मुभा आता चीनी सरकारने बर्‍यापैकी उदारपणे दिलेली असली तरी त्यांचे प्रसारमाध्यमं,इंटरनेट इत्यादींवरील निर्बंध मी विसरूनच गेले होते.ब्लॉगरसाईट्स तिथे उघडतच नव्हत्या तर पोस्टणार काय कप्पाळ?
पण आता इथे लिहायच्या निमित्ताने एकेक करुन नोंदी वाचत असताना लक्षात येतय किती आणि काय काय पाहिलं मी चीनमधे असताना.
मुंबईतल्या सततच्या धावपळीच्या,कामाच्या,डेडलाईन्सच्या टेन्शन्सच्या पार्श्वभूमीवर चीनमधे मिळालेला निवांत वेळ मला तापलेल्या मरुभूमीवर सापडलेल्या पाण्याच्या साठ्यासारखा होता.तीव्रतेने हवासा.नवर्‍याच्या खेपा चीनमधे कामाच्या निमित्ताने नेहमीच होत असतात.आत्ता त्याच्याबरोबर मी गेले होते खरी पण कामातून सुट्टी काढून माझ्यासोबत फिरत बसायला त्याला कितपत वेळ काढता येईल याबद्दल तो स्वतःही साशंक होता.पण माझी काही तक्रार नव्हती.अमुकच स्थळ बघायलाच हवं असा माझा आग्रह कधीच नसतो.फिरणं महत्वाचं.मग असं फिरत असताना वाटेत आलंच सामोरं एखादं महत्वाचं पर्यटन स्थळ तर ते बघायला आवडणार निश्चित.पण त्यासाठी आटापिटा करुन तिथपर्यंत पोचावसं फारसं वाटत नाही.
-------------------------------
चीनमधे सलग काही महिने राहून आल्यावर अनेकांनी तु'हे'बघीतलस कां?'ते'बघीतलस का?असे प्रश्न विचारले.विशेषतःपर्यटन कंपन्यांसोबत जे चीनची सफर करुन आले होते त्यांच्याकडे मी काय काय बघीतलं हे तपासून पहाण्याची एक मोठी यादीच होती.बहुतेकवेळा मी गप्पच होते.'हे','ते'वगैरे ज्यांच्याबद्दलचे त्यांनी प्रश्न विचारले ती सर्व चीनमधली सुप्रसिद्ध पर्यटनस्थळे होती.ती'बघायलाच हवी'वर्गवारीतलीच होती यात काहीच शंका नाही.त्यातली बरीचशी मी सुद्धा पाहून आले होते.माझ्या कॅमेर्‍यात त्या पर्यटनस्थळांचे फोटोग्राफ्सही होते.पण'काय पाहिलं?'बद्दल बोलताना मला फारसं त्या स्थळांविषयी बोलावसं का वाटत नव्हतं याचं मग मलाही जरा आश्चर्यच वाटलं.चीनबद्दलचं माझं आकर्षण जुनं होतं.परदेशांमधे आजवर अनेकदा दीर्घकाळ राहून,फिरुन आल्यावरही मनातलं चीनबद्दलचं गूढ-पौर्वात्य आकर्षण जराही फिकं झालेलं नव्हतं उलट जास्त जास्त खोल जात होतं.
पण हे आकर्षण तिथल्या पर्यटनस्थळांविषयीचं नव्हतंच कदाचित असं आता लक्षात येतय.
काही काही फोटोंमधल्या ठिकाणांबद्दल तर मला तपशिलवार फारसं सांगताही आलं नाही.म्हणजे तिथे कसे,कुठून गेलो..त्याचा इतिहास वगैरे.चीनमधल्या पर्यटनस्थळांबद्दल बोलताना'इतिहास'फार महत्वाचा.सगळीच स्थळं ऐतिहासिक.हे अमुक एका सम्राटाच्या काळातलं..ते तमुक सम्राटाच्या ऐतिहासिक काळात बांधलेलं वगैरे.सम्राटांची चिंग,मिंग,यिंग वगैरे नावही मला सारखीच वाटली आणि त्याचा इतिहासही.तेव्हा कदाचित हे एक कारण असावं मला फारसं काही त्यांच्याविषयी न बोलावसं वाटण्यामागे.
पण तरीही चीनमधे मी पाहिलं खूप.
---------------------------------------------------------------
प्रवासात असताना मुक्कामाच्या अनोळखी शहरात पोचावं तर ते संध्याकाळीच.प्रवास संपल्यावर,शहरात शिरताना दिवसभराच्या धावपळीनंतर जरा संथावलेलं,घरी परतणार्‍या लोकांच्या गडबडीने जरा नादावलेलं शहर दूरस्थपणे पहिल्यांदाच निरखून बघायला मला आवडतं.वेंगझोच्या एअरपोर्ट पोचलो तेव्हा दुपार कलून बराच वेळ झाला होता.वेंगझो एअरपोर्ट छोटेखानी.गोव्यासारखा दिसणारा.तिथून तीन तासांच्या कारड्राइव्हच्या अंतरावर असणार्‍या होंगियान शहरात प्रवेशत असताना चीनमधली पहिली संध्याकाळ पाहिली.
प्रत्येक शहरातली संध्याकाळ वेगळी असते.प्रत्येक शहरात खुललेला सांजप्रकाश वेगळा असतो.वेंगझो ते होंगियान शहरापर्यंतचा द्रूतमार्ग दोन्ही बाजूंच्या गर्द झाडीने व्यापलेला.घरी परतायला अधीर झालेला तिथला सूर्य रस्त्यातच भेटला.तो दिलदारपणा दाखवायच्या मूडमधे.दिवसभर वाटूनही अजून शिल्लक राहिलेली,वरची लखलखती पांढर्‍या किरणांची शोभा उधळून झाल्यावर,तळाशी साचलेली सप्तरंगी किरणे मुठी मुठीने शहरावर भिरकावत आपली पोतडी रिकामी करुन टाकायची घाई त्याला झालेली.
रस्त्याच्या एका बाजूला डोंगरांच्या रांगा आणि दुसर्‍या बाजूला नक्की काय आहे ते झाडांपलीकडे नजर पोचू न शकल्याने नीटसे समजत नव्हते.रस्ता मधूनच कधीतरी जमिनीखालच्या एक एक दीड दीड किमी.लांबीच्या बोगद्यातून तर कधी उंचच उंच फ्लायओव्हरवरुन जाणारा.दुतर्फा गर्द हिरव्या झाडीची भव्य लॅन्ड्स्केप्स आणि स्वच्छ,गुळगुळीत रस्त्यांची ही मजा नंतर चीनमधे मनसोक्त अनुभवली खरी पण पहिल्यांदाच चीनमधल्या एका शहरात शिरत असतानाचा हा रस्त्याचा अनुभव सुखद आणि अनोखा वाटला.मला वाटतं ९९%भारतीय पर्यटक कधीही,कोणत्याही परक्या देशात गेले की त्यांचा त्या त्या देशातला सर्वात पहिला अनुभव या अशा गुळगुळीत,सुखद रस्त्यांवरच्या प्रवासाचाच असतो आणि तो नोंदवून ठेवण्याचा मोह त्यांना नाहीच आवरत.यामागचे लॉजिकल रिझनिंग विषद करुन सांगण्याची गरज अर्थातच नाही).
गडद गुलाबी,केशरी आभाळ.सिंदूरी रंगाची संध्याकाळ.घडीव,लाल दगडांनी बांधून काढलेले पर्वतांचे रस्त्यापर्यंत पोचलेले पायथे.पर्वतकडांवरुन दगड,गोटे,माती घरंगळून रस्यावर कोसळू नये म्हणून पायथ्याला गुंडाळलेल्या बेंगरुळ जाळ्यांच्या तुलनेत हे नक्कीच देखणं दिसत होतं.होंगियान शहरातून गाडी आत शिरली तेव्हा काळसर हिरवा रंग वरच्या झाडांमधून सावकाश पाझरत रस्त्याच्या दोन्ही किनार्‍यांवर साकळत होता.सर्वसामान्य चिन्यांच्या तुलनेत अजस्त्रच म्हणावी अशी साडेसहा फूट उंची लाभलेला आमचा ड्रायव्हर ली अखंड वेळ त्याच्या सेलफोनवरुन कुणाशी ना कुणाशीतरी भांडणार्‍या आवाजात बोलत होता.तो भांडत नाहीये तर चिन्यांचा नॉर्मल आवाजाचा टोनच तो आहे हे ज्ञान नवर्‍याने लगेच पुरवले.
----
चीनचा दक्षिण-पूर्व भागातला ताइझो प्रांत.त्यातले होंगियान हे छोटे औद्योगिक शहर.औद्योगिक कारखाने शहराबाहेर आणि शहर आधुनिक,सुखसोयींनी परिपूर्ण.शांघाय,बिजिंगसारख्या मोठ्या शहरांचा नोकझोक,नखरा होंगियानमधे नाही पण डोंगरांच्या पोटात वसल्याने हवा थंडगार,ताजी आणि शहरात भरपूर ताज्या पाण्याची तळी.शहराबाहेरच्या शेतजमिनीवर मोठ्या व्यासाचे प्लास्टिक पाईप्स अर्धे कापून जमिनीवर एका शेजारी एक रचून ठेवल्यासारखी दिसणारी लांबट,बुटकी,पांढरी पॉलीहाऊसेस.त्यांच्यामधे मश्रूम्स वाढवतात.
आमचं अपार्टमेन्ट एका प्रचंड मोठ्या कॉम्प्लेक्समधे दहाव्या मजल्यावर आहे.रस्त्याच्या पलीकडे थोड्या अंतरावर वाहणारी नदी आणि तिच्या काठावर गर्द झाडीने भरुन गेलेली बाग आमच्या अपार्टमेन्टच्या खिडकीतून दिसते.बागेच्या सुरुवातीला एक अर्धवर्तुळाकार लाकडी स्टेज जमिनीलगत आहे.एअरोबिक्स साठी.त्यावर रात्री उशिरापर्यंत संगीत चालू असते.चिनी तरुण मुलं-मुली आपापल्या सोयीने कामावरुन आल्यावर तिथे जाउन संगीताच्या तालावर नृत्याचा व्यायाम करतात.चीनमधे सर्वत्र फिटनेसचे प्रचंड वेड असल्यासारखे दिसते.जिकडे तिकडे जीमच्या पाट्या,जॉगर्स पार्क.
रात्री शहरात फेरफटका मारायला बाहेर पडलं की ठळकपणे नजरेस पडतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी,गर्दीने भरुन गेलेली छोटी,छोटी चिनी रेस्टॉरन्ट्स.प्रशस्त,स्वच्छ टाईल्स घातलेल्या फूटपाथवर खुर्च्या आणि टेबलं टाकून ऑफिसातून परतताना घरी जायच्या आधी जरा गप्पा-टप्पा,खाणी-पिणी करण्याच्या मूडमधले चिनी मोठमोठ्या आवाजात कलकलाट करत,हसत बसलेले.
रेस्टॉरन्ट्सच्या बाहेर भाज्या,नूडल्स,फळे कापून,रचून ठेवलेली.ग्रेव्हीत कसले कसले डंपलिंग्ज घातलेल्या चिनी कढया,उकळत्या सूप्सचे ब्लोस टेबलावर भरुन ठेवलेले.आणि या सार्‍याचा संमिश्र,नाकाला अनोळखी असा उग्र वास.
आम्ही कोपर्‍यावरच्या बेकरीतून ब्राऊन ब्रेड आणि तीळ लावलेले बन्स घेतो.बेकरी चकचकीत,स्वछ.होंगियानमधे एकमेव.मला तिचा पत्ता विसरुन चालणार नाहीये.मी शाकाहारी असल्याने मला चीनमधे असताना कायम पुढच्या जेवणाची भ्रांत पडण्याचा धोका आहे.इथे नूडल्स मधे कम्पल्सरी सिझनिंग घालतातच आणि ते म्हणजे माशांच्या पेस्ट्स किंवा बीफची सुकवलेली पावडर. तेव्हा शाकाहारी नूडल्स हा प्रकार फारसा अस्तित्वातच नाही.ब्रेड आणि बन्स चीनमधे निदान मिळायला लागलेत हे माझं सुदैव. होंगियानमधे आणि एकंदरच चीनमधे या ऋतूत भाज्या,फळे भरपूर असतात तेव्हा खाण्याची चिंता फारशी असणार नाही असं वाटतय.
रस्त्यांवर खूपच दुकाने होती.ड्रेसेस,चायना गोल्ड,शूज,केएफसी,मॅकडोनाल्ड्स(हेही गेल्या काही वर्षांतलं)होंगियानमधे एकुण सहा मोठे मॉल्स आहेत.पण एकंदर चीनमधे ही अशी लहान लहान रस्त्याच्या शेजारची दुकाने खूप दिसतात.हे भारताशी मोठंच साम्य.रस्त्याच्या एका बाजूला मोठा बाईकर्स वे.पूर्वी त्यातून फक्त सायकली जायच्या.आता त्यातून बहुतेक रिचार्जेबल इलेक्ट्रॉनिक बाइक्सच जाताना दिसतात.आवाज न करता झपकन मागून येतात.त्यांना स्पीडलिमिट ताशी तीस किमी.अशी ठरवून दिलेली आहे.पण ती कोणी पाळत नाही.
अपार्टमेन्टच्या खाली ई-बाईक्सची रांगच लागलेली असते.सोसायटी त्यांना चार्जिंग पॉइन्ट्स पुरवते.काहीजणं लिफ्टमधून बाईक्स आपल्या घरात घेऊन जातात आणि चार्ज करतात.दर दोन दिवसांनी चार्जिंग करावं लागतं.रस्त्यांवर सायकल रिक्षाही खूप दिसतात.पण सायकली फारच मोजक्या.
रस्त्याच्या कडांना ठराविक अंतरांवर झाडं होती त्यांच्या फांद्यांचा विस्तार एकसारखा डोक्यावर गोल.झाडे शिस्तीत वाढावी,रस्त्यांवर अस्ताव्यस्त फांद्या येऊन रहदारीत अडथळा येऊ नये म्हणून फांद्यांना खालून बांबूंचे टेकू लावून ठेवतात.कम्युनिस्ट शिस्त.माणसांमधून आता नाहिशी व्हायला लागलेली दिसत होती पण झाडांना मात्र होती.

रस्त्यावर अचानक एक पुरातन इमारत दिसली.सोबत असलेल्या इंग्रजी येणार्‍या चिनी मित्राने सांगितले की ही २००० वर्षं जुनी,हेरिटेज दर्जा दिलेली इमारत आहे.काळ्या लाकडाची,वर पॅगोडासारखं उतरतं,कोपर्‍यात दुमडलेल्या,खालून वर वळलेल्या लाल कडांचं छत.सर्व दारं,खिडक्या कडेकोट बंद.बाकी सार्‍या झगमगाटी आधुनिक चिनी रस्त्यावरचं हे एकच प्राचीन इतिहासाच्या खुणा वगवणारं घर एकाकी,अंधारात बुडून गेलेलं.
-----------------------------------------------------------------
कंटीन्यूड...