Saturday, March 14, 2009

पेल्टोफ़ोरम डायरी


फ़ेब्रुवारी महिना संपला.
उन्हाळा चांगलाच सुरु झालेला आहे. मुंबईत तो तसा कधी नसतो म्हणा! पण या दिवसांत घाम कमी त्यामुळे उन्हाचा चटका जरा जास्तच जाणवतो. आजूबाजूचा शिल्लक निसर्गही धूळभरला, रुक्ष आणि कोमेजलेला.
भर दुपारी माझ्या खिडकीबाहेरच्या त्या कृश, काटकिट्या, तपकिरी फांद्यांचा पसारा कसाबसा सावरत उभ्या असणा-या उदास पेल्टोफ़ोरमला (दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा असाच दिसतोय) पहात मी हातातलं रस्किनचं पुस्तक हताशपणे मिटते. मला त्याचा (पुन्हा एकदा) हेवा वाटत असतो. या दिवसांत त्याच्या खिडकीबाहेरच्या चेरीच्या झाडांवर गुलाबी कळ्या उमलायच्या घाईला आलेल्या आहेत. वसंत त्याच्या दाराशी आहे अगदी आता. हिमालयातल्या देवदारांनी भरलेल्या उतारांवरच्या गावातल्या त्याच्या घराच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याच्या हाताच्या अंतरावर असतो. आणि तो लवकरच फ़ुलणार असतो.

------------------

मार्चचा पहिला आठवडा संपत आला. उन आता अजूनच वाढलय. अगदी सकाळी आठलाही डोळ्यांवर गॉगल्स चढवावे असं वाटायला लागतं. अकरानंतर तर घामाच्या धाराच सुरु होतात. आंब्यांना आणि ब-याचशा झाडांना छान कोवळी पालवी फ़ुटतेय तांबुस.
माझ्या खिडकीबाहेरचा पेल्टोफ़ोरम अजूनही तसाच आहे. मळकट, तपकिरी सुकलेल्या आपल्य काटकिळ्या फांद्यांचा ढिगारा कसाबसा सांभाळत. काही घरी येणारे तर अगदिच मेलय हे झाड असंही खुशाल म्हणतात. मी लक्ष देत नाही.

-------------------

यावर्षी मुंबईत थंडीही अजिबात पडली नव्हती. फ़ेब्रुवारी महिना संपत आला की खिडकीच्या काचांआडून सोनसळी, उबदार उन्हाच्या लडी अंगावर खेळायला सुरुवात व्हायची आणि कदाचित म्हणूनही असेल पण पेल्टोफ़ोरमचे ते कृश विरुप नजरेला एरवी इतकं खुपायचं नाही.
पण आता त्याकडे बघवेना. संक्रांतीच्या आसपास उडवलेल्या पतंगांपैकी एक पांढरा पतंग एका काडीसारख्या सुकलेल्या फांदीच्या टोकावर अडकून निर्जिवपणे हलत होता. तेव्हढीच काय ती त्या झाडावर जिवंत हालचाल.
शिशिर ऋतुंत तसंही पेल्टोफ़ोरमवर मागे राहिलेलं अस्तित्व असतं फक्त तांब्याच्या लांबट चपट्या शिक्क्यांसारख्या दिसणा-या शेंगांचं. त्या काटकिळ्या फांद्यांना झाकून टाकून आपलं रस्टी कॉपरशिल्ड बेअरर नाव सा-या हिवाळाभर सार्थ करत रहातं हे झाड.
पेल्टोफ़ोरमवर अजून ताम्रयुगच चालू आहे एकंदरीत. हवेत मार्च महिन्यातला ताजा, सोनेरी गंध पसरला असला तरी या झाडावर त्याच्या सुवर्णयुगाची वैभवी झळाळी पसरायला अजून वेळ आहे. वसंत फार दूर आहे...!

------------------------

मार्चचा दुसरा आठवडा सुरु झाला आणि एका पहाटे खिडकीच्या काचेबाहेरचे केशरी पडदे दूर केल्या केल्या समोरच्या उगवतीच्या फिकट कोवळ्या प्रकाशातून एक तेजस्वी, पोपटी, तजेलदार हिरव्या नव्हाळीचा झोतच सामोरा आला. गेले दोनेक दिवस छोट्या, हिरव्या चिंचेच्या पानांहून खूपच सतेज आणि थोड्या मोठ्या आकाराच्या पानांचे झुबके फांद्यांच्या कृश हातांच्या ह्या त्या कोप-यांवर झालरींसारखे झुलत होते खरे पण त्याचा हा एवढा मोठा हिरवा मंडप असा एका रात्रीतून बनेल असं वाटलच नव्हतं.

मी अतीव आनंदाने काचा उघडते. पानांचा हिरवा पिसारा नजरेसमोर फ़ुलून आला होता. पोपटी पानांच्या गर्दीतून मधूनच माना वर काढून आता सोबत मिळाल्याच्या आनंदात डुलणारे ताम्रवर्णी शेंगांचे तुरे अचानक देखणे, सतेज दिसायला लागले.
सूर्य पूर्ण उगवला आणि त्याच्या सोनेरी प्रकाशाचे झोत आज नेहमीसारखे डायरेक्ट खिडक्यांमधून घरात अधिरपणे नाही घुसले. हिरव्या पानांशी लडिवाळपणे बिलगून पूर्ण एका पानगळीच्या मोसमात राहून गेलेल्या गप्पांची देवाणघेवाण करुन झाल्यावर मग सावकाश ते माझ्यापर्यंत पोचले.
मला घाई नव्हती.
नजरेसमोरची सोनेरी हिरव्या कवडशांची नक्षी आता हा एक आख्खा वसंत ऋतूभर माझ्या खिडकीबाहेर माझ्यासाठी ओठंगून राहणार होती. शिवाय आता लगेचच येणा-या एका रात्रीत कधीतरी ह्या हिरव्या नकाबामागून ते लख्ख सुवर्णमुद्रांचं सौंदर्य अशाच पहाटे माझ्यापर्यंत ह्याच खिडकीतून येऊन पोचणार होतं. विस्तृत वैभव अचानकच डोळ्यांपुढे ओतण्याचं या झाडाचं कसब आता माझ्या परिचयाचं झालं होतं.

मी आनंदाने वाट पहायला तयार होते.


-------------------------------------------------------------------------------------------------


आमच्या घरातून थेट समोर दिसणारा पेल्टोफ़ोरम गेली ६/७ वर्षं तरी तिथे आहे. आता त्याचा विस्तार चांगलाच पसरलाय. रस्त्यावर अजूनही इतर बरीच पेल्टोफ़ोरम, गुलमोहोर, करंज आणि अर्थातच आंब्याची, नारळीची झाडे आहेत. पण आमच्या खिडकीसमोरचा पेल्टोफ़ोरम स्वत:च्याच मस्तीत असल्यासारखा. इतर झाडांवर जेव्हा पालवी तेव्हा हा उघडाबोडका आणि बाकीच्या झाडांवर पावसाच्या झडीत एकही फ़ुल शिल्लक रहात नाही तेव्हा याच्या छतावर पिवळ्याजर्द फ़ुलांचे बुंदके भरभरुन.
पूर्वी फक्त हॉलच्याच खिडक्यांमधून याच्या फांद्या दिसायच्या आणि दुस-या मजल्यावरच्या आमच्या घराच्या लेव्हलला जेमतेम पोचायच्या. आता पूर्ण बहरात असला की नजरेत मावत नाही. स्वयंपाकघर, बेडरुमच्या खिडक्यांमधूनही याच्या फांद्या नजरेसमोर दिसतात. चार वर्षांपूर्वी हॉलच्या पूर्वाभिमुख अर्ध्या भिंतींवरच्या खिडक्या काढून आम्ही फ़्रेन्च विन्डोज बसवल्या. ती भिंत पूर्ण काचेचीच झाली.
आणि त्याच वर्षी पेल्टोफ़ोरमला पहिला भरगच्च बहर आला.

बरेच दिवस आधी हिरव्या पालवीने आणि ताम्रशेंगांनी भरलेल्या त्याच्या फांद्यांवर बुंदीसारख्या कळ्यांचे उभट तुरे डोकावत होते. बघता बघता सा-या झाडाची कॅनोपी या तु-यांनी भरुन गेली. मग त्यावर एकटं दुकटं चुकार पिवळं फ़ुलही दिसायला लागलं होतं. पण पानांची हिरवी गर्दी इतकी दाट की त्यांच्याकडे लक्षही जात नव्हतं. त्यात ह्या फ़ुलांचा रंग अमलताशाच्या फ़ुलांसारखा तकतकित पिवळा नाही. थोडी गडद झाक आणि मधोमध चॉकलेटी पुंकेसरांचा वर्तुळाकार झुबका.
तपकिरी शेंगांची गर्दी आणि हिरवी पाने अजूनही झाडावर ऐन बहरात असताना ही तुरळक फ़ुले फारशी आकर्षक दिसत नव्हती. मात्र एक दिवस पहाटे झाडावरच्या सगळ्याच कळ्यांनी ठरवून ठेवल्यासारखे डोळे उघडले आणि सोनेरी जरतारी बुंदक्यांसरख्या फुलांनी झाडावरचं प्रत्येक हिरवं पान झाकून टाकलं.
भिंतीच्या काचा पूर्ण पिवळ्या रंगांनी रंगल्या.
ते सोनेरी वैभव अवर्णनीय होतं.
घरात येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या सोनेरी झगमगत्या अक्षरश: डोंगरासारख्या आकारात रचलेल्या फ़ुलांच्या राशीकडे पहात रहात. उतरत्या दुपारी त्यावर सातभाईंचा गजबजाट, फ़ुलपाखरांची येजा सुरु होई. सकाळी मधमाशा गर्दी करत. काही उघड्या काचांमधून घरातही शिरत.
पण आमची तक्रार नसे.
अगदी मध्यरात्री सुद्धा उठून ते फ़ुलांच वैभव पहात बसावं असं होतं. आकाशात चंद्राच्या प्रकाशात ते पिवळे जरतारी बुंदके अजूनच सतेज होत. पायातळीचा रस्त्यावरही याच फ़ुलांचे यलोकार्पेट. सारा आसमंतातच सोनेरी आभा पसरुन रहाते.

पेल्टोफ़ोरम त्यावर्षीपासून आमच्या खिडकीसमोर असाच भरभरुन फ़ुलतोय.
वाट पहायला लावतो आणि बहरतो तेव्हां हातचं राखून न ठेवता. मनसोक्त.

त्या फ़ुलांच्या कडांनी कातरल्यासारख्या दिसणा-या नाजूक नक्षीदार पातळ सोनेरी पाकळ्य़ांमधून असंख्य पिवळी त्या फ़ुलांपेक्षा थोड्या फ़िक्या रंगांची फ़ुलपाखरं बागडतात. एखाद्या संध्याकाळी दुर्मिळ ब्लू मॉर्मोनही फ़ुलांवर पंख पसरुन जातं. पहाटेला भारद्वाज त्या सुवर्णराशीवर बसून जातो आणि पिवळे चिमुकले टिट्स, केशरी फ़ुलचुखे, सनबर्ड्स तर झाडावरुन मुक्काम हलवयालाच तयार नसतात.

मुंबईत एप्रिल-मे चा उन्हाळा तेव्हा ऐन भरात असतो. भर दुपारी घामाच्या धारा वहात असताना खिडकीत बसून त्या पिवळ्याजर्द सोनमोहोरांच्या राशीवर आपले निळे पंख पसरुन निवांत पहुडलेलं एखादं फ़ुलपाखरु मला दिसतं.
मला आता रस्किनचा हेवा वाटत नसतो. माझ्याही खिडकीबाहेर वसंत फ़ुललेला असतो. पेल्टोफ़ोरम ऐन बहरात असतो.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पेल्टोफ़ोरम इंडिजिनस नाही. दक्षिण अमेरीकेतून तो आपल्या इथे आलेला आणि आता मुंबईच्या मातीने, पक्षांनी, फ़ुलपाखरांनी आपलाच मानून टाकलेला. उप-यांना आपलं म्हणायच्या त्यांच्या सवयीनेही असेल बहुतेक.
मुळ या मातीतलं नाही म्हणूनच बकुळ, अमलताश (बहावा)चा असतो तसा याचा कुठलाच उल्लेख संस्कृत काव्यांत, चालिरीतींत, अगदी गुलमोहोराचा असतो तसा आधुनिक साहित्यामधेही नाही. त्यादृष्टीने इतक्या देखण्या फ़ुलांचं वैभव अंगावर वागवूनही हा उपेक्षितच. शिवाय अतिरेक करुन मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर याची लागवड करुन सर्वसामान्य करुन टाकलेला. मुंबईत एकेकाळी गुलमोहोर आणि बहाव्याच्या रोडऍव्हेन्य़ूसाठी असणा-या पॉप्युलॅरिटीवरही पेल्टोफ़ोरमच्या संख्येने मात केली. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा पण त्या बळकट नसतात, केबलच्या जाळ्यांना याचा अडथळाच होतो आणि तरी अगदी छोट्या गल्ल्यांमधूनही काही सेन्स न दाखवता मुन्सिपाल्टीने हा लावून टाकलेला. त्यामुळे अनेकांच्या रोषालाही हा पात्र.

माझ्या दृष्टीने मात्र माझ्या खिडकीबाहेर निसर्गाचं एक संपूर्ण चक्र फ़ुलत ठेवणारा हा पेल्टोफ़ोरम अगदी खास. माझ्या घरासाठीच फ़ुलणारा. फ़ुलेल आता. मग मी फोटो टाकीन :)


-------------------------------------------------------------------------------------------------