Friday, December 04, 2009

पुन्हा एकदा राही!

प्रश्न फक्त दरम्यानचा आहे..

राही अनिल बर्वे सध्या काय करत आहे? 'मांजा' बनवून झालेला आहे, 'तुंबाड' बनायचा आहे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं, तर काहीच नाही.. आणि तरीही खूप काही. गुलजारच्या भाषेत सांगायचं, तर कदाचित तो 'कलेक्टिंग मोमेंट्स..'च्या प्रक्रियेत असू शकतो.एक कलाकृती हातून घडून गेलेली असते. दुसरं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि जास्त अचूक बनवायचं असतं. आता काय निर्माण होणार आहे, याची स्वतःलाच उत्सुकता असते. मनात आत्मविश्वासाची मस्ती असते, उरात लाल धगही असते; पण नवनिर्मितीची प्रक्रिया काही बाह्य कारणांमुळे, मग ती आर्थिक असोत किंवा आणखी काही, पण जागच्या जागी अचानक थांबते. वाट पाहण्याचा कालावधी लांबत जातो. हात दुसरं काही बनवायला नकार देतात. कलाकार ह्या काळामध्ये काय करतो? आताच्या अस्वस्थ, आत बरंच काही खदखदत असताना वरकरणी शांत राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या राही अनिल बर्वेला पाहताना मनात पुन्हा पुन्हा हाच विचार येत होता.

----------------------------------------------------------------------------






















सिनेमॅटोग्राफ़र पंकज, रांका, आणि दिग्दर्शक राही

तू 'मांजा' बनवलास. ज्यांनी ज्यांनी ही फिल्म पाहिली त्यांना ती आवडली. काहींच्या अंगावर आली. ही खूप डार्क शॉर्ट फिल्म आहे. त्याच्यात खूप एक्स्ट्रीम्स आहेत. अर्थात 'राशोमान'वर बोलताना कुरोसावा म्हणाले होते - "I like extremes, because I find them most Alive." तुझ्याबाबतीत काय? ही फिल्म अशीच बनवायची हे तुझ्या डोक्यात पक्कं असणारच अर्थात. तरीही त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांग. खूप वेगळी निर्मिती आहे ही, त्यामुळे तुझ्याकडून हे सर्व ऐकायची उत्सुकता वाटतेय.

राही: ती प्रक्रिया आता खूप मागे राहिली आहे आणि 'मांजा'ही खूप मागे पडलाय. 'मांजा'ने मला फिल्म कशी बनवावी याविषयी जास्त काही शिकवलं नाही, पण कशी बनवू नये याबाबत मात्र भरपूर शिकवलं. मी त्यावेळी ते शिकायला बर्‍याच ठिकाणी, बर्‍याचदा कुठे, कसा कमी पडलो, तेदेखील 'मांजा'च तुम्हाला सांगेल.मी 'मांजा' बनवला, तेव्हा माझे फिल्मविषयक ज्ञान अतिशय जुजबी होतं. लिंच, कोप्पोला, तारकोव्स्की, वाँग के वई.. त्यांची नावेदेखील माझ्या कानांवरून कधी गेली नव्हती. त्यांच्या कामांपासून शिकायचा प्रयत्न 'मांजा'नंतर सुरू झाला. त्यातून आता 'तुंबाड' घडतोय.
मला 'मांजा' बनवल्यावर आता काही वेडी मुले विचारतात, 'How to make a film? At least a short film? Please help us.' मी म्हणतो, तुमचं स्क्रिप्ट जर तयार असेल आणि ते चांगलंच आहे हा तुमचा विश्वास असेल, तर तुमच्यापेक्षा वेडी आणि तुमच्याइतकीच टॅलेंटेड माणसं शोधून काढा. अभिनेते, तंत्रज्ञ.. खूप कठीण जाणार नाही. कारण तेदेखील तुमच्यासारखा माणूस शोधत फिरत असतील. पॅशनेट, अतिशय टॅलेंटेड. पण रिकाम्या खिशांची, बेकार, अशीच माणसे गाठा. Don't go for known names. त्यांनादेखील त्या फिल्मविषयी तुम्ही पेटलाय, तसे पेटवा. Be their leader. तुमची लहानशी टीम बनवा. ती जमेल तितक्या वेगात एकसंध करा. मग खोटं बोला, मॅनिप्युलेट करा, न लाजता बेधडक भीक मागत फिरा. जवळ असलेलं, नसलेलं सारं पणाला लावा आणि हरायलादेखील तयार राहा. हे सारं करताना कुठलीही मर्यादा मनाशी ठरवून ठेवू नका. तशी मर्यादा जर तुम्ही तुमच्यावर घालून घेतलीत, तर मग ती फिल्म करताना असो किंवा इतर काहीही, ती मर्यादाच तुमच्या आयुष्याचा एक हिस्सा बनून जाईल. तुमचं काम, तुमची नीतिमत्ता, तुमच्या सार्‍या अस्तित्वालाच ही मर्यादा वेटोळं घालून बसेल. तुम्हांला ती ओलांडून जाणं भागच आहे. If it kills you, it kills you. भक्कम, छोटी टीम आणि लहानसे, पण प्रॅक्टिकल बजेट उभे करा. खिसे पूर्ण रिकामे असताना, कुठलाही अनुभव पाठीशी नसताना, इतक्या बेसिक स्टेजला जर हे उभे करू शकलात, तर पुढला प्रवास कठीण नाही. फिल्म मेकिंगच्या तांत्रिक बाजू माहीत नाहीत, म्हणून कधीही हातपाय गाळून बसू नका. असा डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी शोधा, ज्याला त्या माहीत आहेत आणि तुम्हांला त्या तो हळूहळू समजावू शकेल. पण वेळ आल्यावर शूट करताना त्याच्या विचारांपेक्षा स्वतःच्या अननुभवी दृष्टिकोनाशी जास्त प्रामाणिक राहा, कारण ती दृष्टी तुमची स्वतःची असेल आणि पुढे चुकली, तर उलट जास्त शिकवेल.
'मांजा'चे ओरिजिनल बजेट चोवीस लाख होते, क्रू रिक्वायरमेंट किमान पंचेचाळीस जणांची होती. आणि शेड्यूल बत्तीस दिवसांचे होते. दोन वर्षे फंड्ससाठी अथक परिश्रम करून हरल्यावर, आम्ही फक्त चारजणांनी (तीन काम करणारे अ‍ॅक्टर्स वगळून) तो अखेरीस साठ हजारांत आणि नऊ दिवसांत बनवला. नाईट शॉट्ससाठी कित्येकदा पंकजने कार-बाईक्सचे लाईट्स वापरले. पण महत्त्वाचे म्हणजे, जर हाती पुढे जायला दुसरा उपाय नसेल, तर ... this method works.


मांजा'चं लोकांकडून झालेलं कौतुक, त्याला मिळालेले 'मिफ'चा सुवर्णशंख आणि इतरही अनेक पुरस्कार, डॅनी बॉयलने ही फिल्म एसएमडीच्या 'ब्ल्यू रे डीव्हीडी'सोबत दाखवण्यास निवडणे, पदार्पणातच असं कौतुक आणि यश मिळणं, या सगळ्यांवर तुझी नक्की प्रतिक्रिया काय?

राही: काही नाही. It's just beginner's luck. That's it. पुढच्या प्रवासात ते माझ्यासोबत राहील की नाही याचा विचार मी केला नाही. सुरुवात ठीक झाली, याहून जास्त या सर्वांना फारसा काही अर्थ नाही.

तुझी 'आदिमायेचे' ही कादंबरी पॉप्युलर प्रकाशनातर्फे नुकतीच प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल सांग. तिच्या लिहिण्यामागच्या प्रेरणेबद्दल सांग. 'पूर्णविरामानंतर..' या तुझ्या कथासंग्रहानंतर जवळ जवळ दहा-बारा वर्षांनी तू ही लिहिलीस. मधल्या काळात लिहावेसे वाटले नाही काही?

राही: बारा ते सोळा ह्या वयात मी - बरं-वाईट जे काही असेल ते, पण - झपाटून लिहिले होते. 'पूर्णविरामानंतर..'मधील सर्व कथा त्यावेळच्या आहेत. त्यातल्या बहुतांशी आता मला स्वतःला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे बोलणे टाळतो. नंतर लिखाण पूर्ण थांबले. पुढील अकरा वर्षे एक ओळही लिहिली नाही. पुढे कधी लिहीन असं वाटलं नव्हतं. पण २००४ साली अचानक 'आदिमायेचे' लिहिली. त्याच वेळी 'मांजा'चं फायनल स्क्रिप्ट आणि 'तुंबाड'चा कच्चा ड्राफ्टही लिहिला. त्याचवेळी चित्रे काढायलाही शिकलो. 'आदिमायेचे' लिहायला जितकी कठीण होती, त्याहीपेक्षा ती चारशे पाने एडिट करायला खूप जास्त कठीण होती. आणि मला माझं पुस्तक कुठल्याही परिस्थितीत शंभर-सव्वाशे पानांच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. तिची सारी ताकद थोडक्यातच सामावलेली आहे. पूर्ण झाल्यावर, मला ती मी सोडून दुसर्‍या कुणाला समजेल, आवडेल, अशी खात्री वाटेना. तेव्हा ती आणखी दोन वर्षे तशीच पडून राहिली. त्या अवधीत मी 'मांजा' बनवला. 'तुंबाड'वर पुढे गेलो. भरपूर फिरलो. खूप धमाल उद्योग केले. सारी सुरुवात त्या पुस्तकापासून झाली. एका अर्थी त्या पुस्तकाने मलाच लिहिलं. गेल्या वर्षी ती पॉप्युलरला दिली. त्यांना ती आवडली.
मी एक सतत पाहिलंय, कादंबरीतला हा जो कुणी 'मी' असतो, सतत स्वतःकडे द्रष्ट्याची भूमिका वगैरे घेऊन पानापानाला फार वैतागवाणी ऑनेस्टी झाडत असतो. घडून गेलेल्या घटना आणि व्यक्तिरेखा तो आपल्यासमोर फार प्रांजळपणे, काहीही लपवाछपवी न करता मांडतो. हा आदिमायेतला 'तरंग' फार काळ माझ्या मनात घर करून होता. तो द्रष्टा नाही, दांभिक आहे. भोंदू, चलाख, हलकट, पण खोल आत कुठेतरी माणुसकीचा झरा असलेला. त्याच्याकडे सांगण्यापेक्षा लपवण्यासारखे खूप जास्त आहे. घडून गेलेल्या घटनांविषयी, आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांविषयी फार प्रांजळपणा राखून बोलणे त्याला अजिबात परवडणारे नाही आणि स्वत:च्या फायद्या-तोट्यानुसार घडलेल्या घटना, माणसे मॅनिप्युलेट करून आपल्यासमोर वेगळ्या स्वरूपांत मांडण्याची हातोटी त्याला उपजत आहे.. (आणि ती कमीअधिक प्रमाणात आपल्या प्रत्येकात असते.) फक्त त्याचे चित्त थार्‍यावर नसल्याने सांगताना होणार्‍या विसंगतींतून क्षणासाठी सत्य आपल्यासमोर अवचित झळाळून नाहीसे होत राहते. 'तरंग'च्या शब्दांवर पूर्ण विसंबून 'आदिमायेचे' सरळसोट वाचली, तर ती समजायला थोडी कठीण जाईल इतकं नक्की. आणि तिचा शेवट आवडलेला, किमान 'ठीक' वाटलेला माणूस मला अद्याप भेटायचाय. :D

'मांजा'नंतर तू 'तुंबाड' बनवायला घेतलास. त्याबद्दल सांग.


राही: 'तुंबाड' २०१० च्या ऑक्टोबरमध्ये किंवा २०११ च्या सुरुवातीला रिलीज होईल. 'तुंबाड' अतिशय प्राचीन भयकथांवर आधारित आहे. आम्ही २००५ पासून 'तुंबाड'च्या फायनान्ससाठी प्रचंड प्रयत्न केले, पण बिग बजेट - नो स्टारकास्ट - अतिशय वेगळा, ह्यापूर्वी कधीही न हाताळलेला - बिझनेसच्या परिभाषेत 'अतिशय रिस्की' विषय, आणि कुठलीही तडजोड करायला तयार नसलेल्या डायरेक्टर-सिनेमॅटोग्राफरची जोडगोळी. अशावेळी ज्या चिपळ्या वाजायच्या त्या सार्‍या वाजल्या. दोन मोठे हॉलिवूड स्टुडिओज अखेरच्या स्टेजला शूटिंगच्या फक्त महिना-दीड महिना आधी एकामागोमाग एक 'तुंबाड'मधून बॅक आऊट झाले. त्याही आधी दोन वर्षांपूर्वी - आम्ही 'तुंबाड' खूप लहान स्केलवर करत असताना आमचे फायनान्सर्स शूटिंगच्या फक्त चोवीस तास आधी बॅक आऊट झाले होते. पुढे ते पूर्ण प्रॉडक्शन हाऊसदेखील कोलॅप्स झालं.. आता चौथ्यांदा पुन्हा 'तुंबाड' उभा राहतोय तोदेखील इंटरनॅशनल फंडिंग्ज आणि फॉरेन स्टुडिओजमुळे उभा राहतोय. कारण टिपिकल मेनस्ट्रीम हिंदी फिल्म्सचे प्रोड्यूसर्स 'तुंबाड'वर नजर टाकायलासुद्धा तयार नव्हते.आमचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता, दीड-दोनशे माणसांची टीम पुन्हा पुन्हा अथक परिश्रमांनी उभी करणे आणि ती अगदी अखेरच्या क्षणी पुन्हा कोलॅप्स होणे, दोन वर्षांत तीन वेळा ..Its hard to handle. बरेच अ‍ॅक्टर्स, जिवाभावाचे क्रू मेंबर्स ह्या दोन वर्षांत रिप्लेस झाले. पण चांगलं इतकंच, की मुरून मुरून ह्या सर्व कालावधीत आमच्या नकळत ही फिल्म वाढत गेली. पहिल्या खेपेस शूटिंगच्या चोवीस तास आधी कोलॅप्स झालेला 'तुंबाड', आणि आज पुन्हा चौथ्यांदा उभा राहतोय तो 'तुंबाड', दोन्ही पूर्णपणे भिन्न फिल्म्स वाटाव्यात इतका प्रचंड फरक दोघांत आहे.

डोक्यात आपल्याला आता काय करायचे आहे हे पक्के तयार असते, बाहेर उसळी मारत असते आणि सर्जनाची ही प्रक्रिया कोणत्याही कारणाने - मग ते आर्थिक कारण असो किंवा काही इतर अडथळे - जेव्हा अचानक थांबवली जाते, तेव्हा त्याला तू कसा रिअ‍ॅक्ट होतोस?

राही: ती आत्तापर्यंत इतक्यांदा आणि इतक्या वाइटात वाईट प्रकारे थांबवली गेली आहे, की खूपच पूर्वी माझ्या पोतडीतल्या सार्‍या रिअ‍ॅक्शन्स देऊन देऊन संपल्या. आजकाल मी फक्त शांतपणे फार गाजावाजा न करता उठून पुन्हा उभा राहतो.

संघर्षाच्या काळात आतली धग टिकवून ठेवणे, त्यावर राख जमा होऊ न देणे हे कसं जमवू शकलास?

राही: ते कुणालाही विचारपूर्वक प्रयत्न वगैरे करून जमवता येत नाही. ती खरी असेल, तर आपोआप टिकते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही. नसेल, तर सोबत तुमच्या स्वप्नांची राख घेऊन आपसूक विझते. तुम्हांला काहीही करावे लागत नाही.

चित्रपट जितका बिग बजेट तितकी फायनान्सरची चित्रपटावरची सत्ता वाढत जाते. मग यातून मनासारखा चित्रपट बनवणे कितपत शक्य होणार?

राही: मुळात ती सत्ता मर्यादेबाहेर वाढू न देणे, हे सर्वस्वी माणसा-माणसांवर अवलंबून असते. तुम्ही नावाजलेले दिग्दर्शक नसाल - जो, जे हवे ते मिळत नसल्यास विरोध करून ते मिळवण्याच्या फर्म कॉन्फिडंट लेव्हलला आहे - तर तुम्ही आधी तिथवर पोचू शकत नाही, कारण कुणी तेवढा मोठा जुगार तुमच्यावर खेळणार नाही - हे एक. आणि विरोध करायला जी धमक लागते, त्या धमकेचा पाया त्या स्टेजला त्या फायनान्सर्स/प्रोड्यूसर्स/स्टुडिओंच्या लेखी सर्वस्वी तुमच्या तोवर मिळवलेल्या बॉक्स-ऑफिसच्या यशात दडला असतो. तुमच्या सर्जनशील मनाशी त्यांना फारसे देणे-घेणे नसते. तुम्ही फर्म असाल, तर त्या स्टेजला मनासारखा चित्रपट बनवणे तितकेसे कठीण जात नाही. १९७२ साली फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाने गॉडफादर बनवताना स्टुडिओ एक्झिक्युटिव्हजशी सतत अखेरपर्यंत लढून कुणा एका अल पचिनो नावाच्या नवख्या अनोळखी अभिनेत्याला प्रमुख भूमिकेमध्ये शूट संपेपर्यंत टिकवण्याची आणि अशीच असंख्य इतर उदाहरणे आहेतच की. He actually threatened to quit the production. इथलंच उदाहरण द्यायचं, तर अनुरागने 'ब्लॅक फ्रायडे' पासून 'देव-डी' ज्या हलाखीत आणि तरीही ज्या त्वेषाने बनवले त्याला तोड नाही. पण आता तो स्वतःशी एकही काँप्रोमाईज न करता तितक्याच त्वेषाने शंभर-दीडशे कोटींचा 'बाँबे वेलव्हेट' बनवतोच आहे की.. म्हटलं ना.. माणसा-माणसांवर असतं. आणि शर्मिला, प्रामाणिकपणे सांगायचं, तर समोरच्याला विरोध करणे खूप सोप्पे असते, पण त्यामागची कारणे आपण ज्यांना विरोध करतोय त्यांना 'समजतील' अशा पद्धतीने समजावणे आणि मुख्य म्हणजे अखेरीस पटवून देणे, ह्याला खरी चलाखी आणि हातोटी लागते. तो फिल्म मेकिंगचा एक अविभाज्य भाग आहे, असे समज हवं तर. ती हातोटी नसली, की दोन-तीन चांगल्या, पण अपयशी प्रयत्नांनंतर आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये जाऊन बसलेले आणि सार्‍या जगावर 'कळत नाही .. कळत नाही..' च्या खिन्न ओल्या पिचकार्‍या सोडणारे तांब्याचे सेमिनार-संन्यासी निर्माण होतात. पण चांगला चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रचंड बजेटची गरज नसते, हाच इथे सार्‍या फकिरांसाठी एकमेव उ:शाप आहे.

तू लिहितोस, चित्रं काढतोस आणि चित्रपट बनवतोस - अभिव्यक्तीची ही तीनही सारख्याच ताकदीची माध्यमं तू सहज हाताळू शकतोस. तुझं आवडतं माध्यम कोणतं आणि का? या तिन्ही माध्यमांची नक्की ताकद, मर्यादा व त्यांतला फरक काय?

राही: चित्रं केव्हाही मूड आला, की काढता येतात, कल्पना चमकून गेली, की कुठेही बसून केव्हाही लिहिता येते आणि लिहिल्यावर तातडीने ते वाचता येते. पण मध्यरात्री तीन वाजता लाल डोळ्यांनी आणि शांत समाधानाने फायनल एडिट पूर्ण झालेला स्वतःचा प्रोजेक्ट पहिली काही वर्षे रक्त, घाम ओकल्याखेरीज कुणालाही नाही पाहता येत. तीच त्यांची ताकद. त्याच मर्यादा. आणि आवडतं माध्यम? त्या-त्या वेळी जे करत असू, ते त्या-त्या वेळी सर्वांत जास्त आवडत असतं. सिंपल.

ही माध्यमं एकात एक गुंतलेली आहेत आणि एकातून पुढे असा सहज प्रवास होणं नैसर्गिक आहे, असं तुला वाटत नाही?

राही: मी अशा सार्‍यांचा फार विचार नाही करत. झाला, तर कळेल. नाही कळला आणि तरी होत असला, तर बरंच आहे.

लिहिणे आणि चित्रपट बनवणे याबाबतीतले तुझे प्रेरणास्रोत कोणते? त्यांच्यापेक्षा तू कोणत्या पातळ्यांवर वेगळा आहेस असं तुला वाटतं?

राही: प्रेरणास्रोत, पातळ्या, वेगळेपण वगैरे फार गहन खोल्या वगैरे लाभलेली प्रकरणे आहेत. मी नुकता नुकता गुडघाभर पाण्यात पाय मारायला शिकतोय. असा खोलात गेलो, तर बुडेन.

अनिल बर्व्यांचा मुलगा म्हणून ओळखलं जाताना काही दडपणं जाणवतात का? विशेषत: तूही लिहितोस म्हणून.

राही: मला स्वतःला बर्व्यांचं लिखाण फारसं आवडत नाही. बर्‍याचदा फार मेलोड्रॅमॅटिक आणि बहुतांशी 'लाल' नक्सलाईट विचारांनी बजबजून भरलेलं वगैरे असायचं. त्या सार्‍या 'ब्लाइंडली लेफ्टिस्ट' ठोंब्यांचा आणि व्यक्तिरेखांच्या तोंडून स्वतःच्या, लाल केशरी जी काय असेल ती, राजकीय बोंबाबोंब करणार्‍या लेखकांचा, एकूणच मला स्वतःला तिटकारा आणि कंटाळा आहे. थोडक्यात खूप लिहिण्याची त्या माणसाची हातोटी मात्र जबरदस्त होती.
माझ्या लेखी खरं जागतिक तोडीचे मराठी लेखन जी.एं.पासून सुरू झालं आणि जी.एं.सोबत संपलं. पण त्यात कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. कुठल्याही भाषेत असा एखादा लेखक शतकांतून एकदा केव्हातरी चुकून अपघाताने येऊन जातो.. त्यामुळे ठीक आहे.
आणि दडपण? विनोदी प्रश्न. मी लेखक-साहित्यिक वगैरे आहे, असे भयंकर भास माझ्या अतिशय वाईट दिवसांतदेखील मला कधी झाले नाहीत आणि डोकं शुद्धीवर असेपर्यंत होणारही नाहीत. कधीतरी मूड आला, तर थोडेसे लिहून जातो, ते वर्षा-दहा वर्षांतून केव्हातरी टीचभर. बास. त्यामुळे कुठलं दडपण? कसलं दडपण? आणि कशासाठी?

--------------------------------------------------------------------------------

राही एकटाच काही या 'दरम्यानच्या काळात' अडकून पडलेला नाहीये. त्याच्यासारखे अनेक कलाकारांचे अस्वस्थ आत्मे आजूबाजूला असतात. स्वतःशी, बाहेरच्या जगाशी त्यांचा सतत झगडा चालूच असतो. 'ईटर्नल स्ट्रगलर' असतात ते त्या अर्थाने. कदाचित ते आपल्याही आत असतात. या झगड्याला सामोरे जायची वेळ येतेच कधी ना कधी.. काय करायचं असतं तेव्हा आपण? राहीसारख्या मनस्वी कलावंताकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो बहुधा.

2 comments:

priyadarshan said...

किती दिवसानी.

Samved said...

सुंदर.